प्रचिती म्हणींची (२) - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वप्ना_राज

Submitted by स्वप्ना_राज on 27 February, 2014 - 03:47

'मला कंटाळा येतो आजकाल टीव्ही लावायला." आई वैतागून म्हणाली.
'आं?' हे प्रकरण नवं होतं. नाहीतर ६:३० वाजता होम मिनिस्टर, ७ ला तू तिथे मी, ७:३० ला ससुराल सिमरका + राधा ही बावरी (parallel mode मध्ये), ८ ला बालिकाबधू आणि ९ वाजता पवित्र रिश्ता असा रोजचा भरगच्च कार्यक्रम असतो.

'बरी आहेस ना?'
'मला काय धाड भरलेय? सेटटॉप बॉक्स बिघडलाय बहुतेक. टीव्ही लावला की आधी ते AV1 १० मिनिटं दिसतं. मग L + R ५ मिनिटं दिसतं. मग एकदम कलर्स चॅनेल लागतं. ते पण एव्हढ्या मोठ्या आवाजात की कानठळ्या बसतात. मग १० सेकंद चित्र फ्रीझ होतं. आणि नंतर नीट दिसायला लागतं. आजकाल मी ६ लाच टीव्ही लावते तेव्हा कुठे ६:२० च्या आसपास चित्र दिसायला लागतं.' आईसाहेबांनी सेटटॉप बॉक्सच्या पापांचा पाढा वाचला.

'बॉक्सच्या मागून कनेक्शन लूज झालं असेल. मागच्या वेळेला त्यांना फोन केला होता आणि मग लक्षात आलं आपल्या. ते चेक केलंस का?'
'घरात इंजिनियर कोण आहे? तू का मी? तू बघ ते सगळं.'

हे आपलं बरं आहे. मी आणि भाऊ कॉम्प्युटर इंजिनियर आहोत. पण घरात मिक्सरपासून वॉशिंग मशीन पर्यत काहीही बिघडलं तरी ते आम्ही दुरुस्त करावं अशी मातोश्रींची अपेक्षा असते. बरं माझी स्थिती अशी की स्क्रू ड्रायव्हर वापरून कुकरच्या झाकणाचं हॅन्डल घट्ट बसवायला जमलं तरी 'जय मातादी'! भावाला तेही जमत नाही. मग 'कसले इंजिनीयर म्हणायचे तुम्ही' हे ठरलेलं आहे.

'आलिया भोगासी असावे सादर' म्हणून मी टीव्ही बंद करून बॉक्सच्या मागे खाडखुड करायला सुरुवात केली. नंतर टीव्ही लावला तो १५ मिनिटं झाली तरी लागेचना. 'रोगापेक्षा इलाज भयंकर' ह्याला म्हणत असावेत.

'अग, आता त्या साक्षीच्या मित्राला शिक्षा झाली का नाही ते कळणार नाही मला उद्यापर्यंत टीव्ही चालू झाला नाही तर' आईसाहेब कळवळल्या.
'तुला युट्यूब वर दाखवते तो एपिसोड. मग तर झालं.'

बॉक्सच्या मागून निघालेली एक वायर तेव्हढ्यात मला दिसली. तिला स्वगृही पोचवल्यावर टीव्ही लागला खरा पण 'पहिले पाढे पंचावन्न'.

वैतागून मी कस्टमर सपोर्टला फोन लावला. आयव्हीआरच्या कचाट्यातून सुटून एक मानवी आवाज ऐकला. 'सॉरी मॅडम, हमारा सिस्टीम बंद है. आपका रेकॉर्ड चेक नही कर सकते. प्लीज एक घंटे बाद फोन किजीये.' त्यांना ज्या शिव्या घातल्या त्या लिहिण्याची ही जागा नव्हे. एक तासानंतर परत फोन केला.

कस्टमर सपोर्टच्या बाईने आधी माझं नाव, पत्ता, फोन नंबर, कार्ड नंबर अशी सगळी कुंडली तपासली. मग मी तक्रारीचा पाढा वाचला तो शांतपणे ऐकून घेऊन म्हणाली 'लेकिन मॅडम, पिक्चर तो दिख रहा है ना.' हायला!

'We can see the picture after half an hour from the time of switching the TV on. Do you think that's acceptable?' पु.लं. म्हणतात तशी 'दमदाटीला इंग्रजी बरी'.
'सॉरी मॅडम' असं म्हणून तिने कम्प्लेंट रजिस्टर करायचा सोहळा पार पाडला. वर '२४ घंटे के अंदर टेक्निशियन आ जायेगा' हेही सांगितलं.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मासाहेब "राधा ही बावरी" बघत असताना 'टेक्निशियन महाराज' अवतीर्ण झाले. 'पॉवर सप्लाय मे प्रॉब्लेम होगा' असं काहीतरी पुटपुटत त्याने बॅगेतून आपली आयुधं बाहेर काढली. मग 'क्या मै थोडी देर के लिये आपका टीव्ही बंद कर सकता हू?' असं अत्यंत लीनतेने विचारलं. बहुतेक सास-बहु सिरियल चालू असताना टीव्ही बंद करायच्या पापाची शिक्षा त्याने आधी कधीतरी भोगली असावी. मासाहेबांच्या चेहेर्‍यावर 'टू बी ऑर नॉट टू बी' चे भाव आले. तेव्हढ्यात त्या सिरीयलीत केदारने गायला तोंड उघडलं. आणि मासाहेब त्वेषाने 'हा, हा, जरूर किजीये' असं म्हणाल्या. त्यांचं आणि त्या केदार धर्माधिकारीचं मागच्या जन्मीचं हाडवैर आहे.

टेक्निशियनने जेमतेम पाच मिनिटं खाडखुड केली. आणि मग म्हणाला 'अब बॉक्स को थोडा थंडा हो जाने दिजीये. फिर चेक किजीये'. आम्ही इमाने इतबारे त्या बॉक्सला थंड होऊ दिला. मग टीव्ही लागला तर काय अहो आश्चर्यम! सेटटॉप बॉक्स खडखडीत बरा झाला होता.

३०० रुपये वट्ट वाजवून घेऊन टेक्निशियन अंतर्धान पावला. आणि मी आणि आई एकदमच म्हणालो 'जेणो काम तेणो थाय, बीजा करे सो गोता खाय'.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग 'कसले इंजिनीयर म्हणायचे तुम्ही' हे ठरलेलं आहे.>> यावर "ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं" ,
<<'सॉरी मॅडम, हमारा सिस्टीम बंद है. आपका रेकॉर्ड चेक नही कर सकते. प्लीज एक घंटे बाद फोन किजीये.' >>> यावर "नाचता येईना अंगण वाकडे"
आणि,
<<'लेकिन मॅडम, पिक्चर तो दिख रहा है ना.' हायला!>> यावर "चोर तो चोर वर शिरजोर" या म्हणी फिट्ट बसल्या असत्या.

आणि,
३०० रुपये वट्ट वाजवून घेऊन टेक्निशियन अंतर्धान पावला.>> यावर "पादा पण नांदा!" Biggrin

'We can see the picture after half an hour from the time of switching the TV on. Do you think that's acceptable?' पु.लं. म्हणतात तशी 'दमदाटीला इंग्रजी बरी'.>>> मला वाटलं ती म्हणेल की मग रोज अर्धा तास लवकर TV लावा Proud

>>मला वाटलं ती म्हणेल की मग रोज अर्धा तास लवकर TV लावा
अग नाही ग, ही लघुकथा सत्यघटनेवर आधारित आहे Proud ती खरंच 'पिक्चर तर दिस्तंय ना' असं म्हणाली मला. धन्यवाद लोक्स!

Lol मस्त