क्रेझी जर्नी (अर्थात धुळे दिल्ली आणि दिल्ली धुळे प्रवास थेट)

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 22 February, 2014 - 02:24

१० फेब्रुवारी २०१० रोजी मी मारूति-सुझुकी इंडिया लिमिटेड च्या माय कार पुणे प्रायवेट लिमिटेड या वितरकाकडून आठ आसनी ओम्नी हे वाहन खरेदी केले. वाहनाचा वापर सुरुवातीपासूनच अतिशय कमी राहिल्यामुळे वाहनाची हमी (वॉरंटी) ४०,००० किमी अथवा दोन वर्षे अशी असली तरीही वाहन सुरुवातीच्या दोन वर्षांत केवळ १३००० किमीच वापरले गेले होते.

३० जुलै २०१२ रोजी कामानिमित्त पुण्याहून धुळे येथे राहावयास आल्यानंतर निवास आणि कार्यालय एकाच आवारात असल्यामुळे वाहनाचा वापर तर केवळ तीन / चार महिन्यातून एकदा पुण्याला जाण्यासाठीच होऊ लागला. इमारतीच्या आतील वाहन तळात एकदा वाहन उभे केले म्हणजे कित्येकदा तर ते सलग तीस-चाळीस दिवस सुरू देखील केले जात नसे. एका जागी उभे राहून टायर्सची झीज होऊ नये म्हणून मीच वाहन हाताने ढकलून मागे पुढे करायचो. वाहनाची २+२ वर्षी अशी अतिरिक्त हमी देखील ६०००० किमी पर्यंत असूनही डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत वाहन केवळ २१००० किमीच वापरले गेले होते.

वाहनाच्या हमी कालावधीत आतापर्यंत दोनवेळा क्लच प्लेट, एकदा स्टीअरिंग गिअर बॉक्स, एकदा शॉक ऍब्सॉर्बर, एकदा वायपर मोटर आणि इतरही काही लहान मोठे सुटे भाग बदलून घेतले होते.

१० फेब्रुवारी २०१४ ला वाहनाचा हमी कालावधी संपण्यापुर्वी त्याचा अजून थोडा जास्त वापर झाला तर हमी कालावधीत अजून काही सुटे भाग बदलून घेता आले असते.

दरम्यानच्या कालावधीत पत्नीनेही अनेकदा तिच्या माहेरी दिल्लीला आम्ही दोघांनी जायला हवे असे सूचविले होते. एप्रिल २०१२ मध्ये विवाह झाल्यापासून अथवा त्यापूर्वीदेखील एकदाही मी तिचे घर पाहिले नसल्याची तिची तक्रार होती. त्याशिवाय ती दिल्लीत नोकरी करीत असताना तिने शीतकपाट (रेफ्रिजरेटर), धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन), अतिसुक्ष्म लहर भट्टी (मायक्रोवेव्ह ओव्हन), विविध विषयांवरील अनेक पुस्तके, एअरोबिक्स स्टेपर, व्हायब्रेशन वेट लूझर, इत्यादी ज्या वस्तू विकत घेतल्या होत्या त्याही इथे धुळ्यात आणण्याविषयी ती आग्रही होती. अर्थातच या वस्तू आणावयाच्या म्हणजे आम्ही आगगाडी अथवा विमानाने दिल्लीला गेलो तरी परतताना एखादा ट्रक भाड्याने करावा लागणार हे उघड होते आणि त्या वस्तूंच्या किंमतीच्या तूलनेत वस्तूंच्या वाहतूकीचा खर्च जास्त होणार हे उघड होते.

तेव्हा काही ठळक मुद्दे विचारात घेतले ते असे:-
आम्ही दोघे दिल्लीला जर विमानाने गेलो तर जाऊन येऊन किमान वीस हजार रूपये इतका खर्च येणार. आणि दिल्लीला पत्नीच्या माहेरी किमान एकदा तरी मला जाणे भाग आहेच.
ओम्नी वाहनाचा अजून काहीसा वापर हमी कालावधी पूर्वी करणे भाग आहे.
पत्नीने माहेरी जमविलेल्या वस्तू धुळ्यात आणणे ही तितकेच आवश्यक आहे.
वरील तीन मुद्यांपैकी मुद्दा क्रमांक दोन हा माझ्या इच्छेचा भाग होता आणि मुद्दा क्रमांक एक व तीन हे माझ्या पत्नीच्या इच्छेचा भाग असल्यामुळे अनिच्छेने का होईना परंतु मला ते मान्य करणे भाग होते. तेव्हा या तीनही गोष्टी साध्य व्हाव्यात या उद्देशाने मी माझे ओम्नी वाहन घेऊन दिल्लीला जायचे ठरविले. या आठ आसनी वाहनात सर्वात सुरुवातीला चालक व सहचालकाची दोन सुटी आसने आहेत त्यांच्या बरोबर पाठीस लागून तीन आसनांचा एक एकत्रित बाक आहे ज्याची दिशा विरुद्ध आहे. या बाकाच्या समोर अजून एक तीन आसनांचा एकत्रित बाक आहे. हा जो शेवटचा तीन आसनांचा बाक आहे तो नट बोल्ट्स च्या साहाय्याने वाहनात बसविलेला आहे. तो बाक डिकीचे मागचे झाकण उघडून नट बोल्ट्स खोलून मी अगदी दहा मिनीटांत वाहनातून वेगळा काढला. आता वाहनात बरीच मोकळी जागा झाली.

यानंतर धुळ्याहून दिल्लीस जाण्याच्या प्रवासाचे नियोजन सुरू झाले. गुगल मॅप्स मध्ये धुळ्याहून विविध टप्प्यांनुसार अंतराचे मापन केले असता खालील माहिती मिळाली.

Manpur 218 किमी, 2 घंटे 57 मिनट
Ratlam 345 किमी, 4 घंटे 41 मिनट
Chittaurgarh 544 किमी, 7 घंटे 41 मिनट
Bhilwara 601 किमी, 8 घंटे 28 मिनट
Jaipur 852 किमी, 11 घंटे 39 मिनट
Gurgaon 1,082 किमी, 15 घंटे 1 मिनट
Rohini New Delhi 1,125 किमी, 15 घंटे 54 मिनट

मी सध्या अवधान, धुळे येथे राहतो. या जागेपासून सरळ महामार्ग क्रमांक तीन वरून साधारण २१८ किमी आग्र्याच्या दिशेने गेल्यावर मानपूरच्या अलीकडे रतलाम जाण्याकरिता डावीकडे वळावे. त्यानंतर रतलाम चित्तौडगड, भिलवाडा, जयपूर, गुरगाव मार्गे रोहिणी, नवी दिल्ली येथे जावे असे ठरविले. महामार्ग क्रमांक तीन वरूनच सरळ आग्रा येथे जाऊन तेथून दिल्लीस जाण्याचाही अजून एक पर्याय उपलब्ध होता परंतु तो मार्ग खराब आहे असे अनेकांनी सांगितल्यामुळे तो पर्याय विचारात घेतला गेला नाही.

गुगल मॅप्स ने स्थळांचे अंतर व पोचण्याची अंदाजे वेळ दाखविली होती, ती पाहता आणि आपणांस त्यापेक्षा दीडपट वेळ लागेल हे लक्षात घेता चित्तौडगड अथवा भीलवाडा येथे मुक्काम करावयाचे ठरले. म्हणजे अंदाजे सहाशे किमी वाहन एका दमात चालवावे लागणार होते. वाहनात एकच चालक असताना एका वेळी इतका प्रवास करू नये असे मला मित्र, परिचित, नातेवाईक सर्वांनीच सुचविले. माझ्या धाकट्या भावाने पूर्वी एकदा सलग एका दिवसात ४५० किमी वाहन चालविले होते तेव्हा थकवा / झोप येऊ नये म्हणून त्याने व्हर्टिन आठ मिग्रॅ. ही गोळी सकाळी नाष्टा करून प्रवासास सुरुवात करण्यापुर्वी घेतली होती. मीही तशी गोळी घ्यावी असे त्याने मला सुचविले.

सोबत खाण्यापिण्याचे जिन्नस, पुरेसे पिण्याचे पाणी आणि थंडीत आवश्यक ते कपडे इत्यादी सर्व सामान वेगवेगळ्या थैल्या व सुटकेसेस मध्ये भरून ते सर्व वाहनात व्यवस्थित ठेवले आणि शुक्रवार, १७ जानेवारी २०१४ रोजी सकाळी सात वाजता अवधान, धुळे येथून प्रवासास प्रारंभ केला. भावाच्या सूचने प्रमाणे न्याहारी करून व्हर्टिन आठ मिग्रॅच्या एका गोळीचे सेवनही केले. प्रवासास निघायच्या आठवडाभर आधीच वाहनाची जवळच्या परिसरात एक फेरी मारून चाचणी घेतली आणि ते सुस्थितीत असल्याची खात्रीही करून घेतली होती. त्याबरोबरच इंधन टाकीही पूर्ण भरून घेतली होती.

प्रचंड थंडी आणि धुके यांचा सामना करीत आणि महामार्ग क्रमांक तीनच्या घाटातील ट्रक्सच्या रहदारीतून वाट काढीत तीन तासांत २१८ किमी वरील मानपूर जवळचे रतलामला जाण्यासाठीचे डावे वळण गाठले. हा मार्ग अतिशय चांगल्या दर्जाचा असून रहदारी देखील फारशी नाही हे जाणवले. रतलामपाशी आधी वाहनात इंधन भरले आणि नंतर मध्यान्ह भोजन उरकले. भोजनानंतर चित्तौडगडच्या दिशेने प्रयाण केले. मध्यप्रदेश राज्याची सीमा नयागांव येथे संपते. तोपर्यंतचा प्रवास अगदी सुकर होता आणि गुगल मॅप्स ने दर्शविलेल्या अंदाजित वेळेपेक्षाही कमी वेळात आम्ही ठिकाणे गाठत होतो. सरासरी वेग ताशी सत्तर किमीपेक्षाही अधिक राखला गेला होता. वातावरणात थंडीही बरीच जाणवत होती. दुपारी तीनच्या सुमारास राजस्थान राज्यात प्रवेश केला आणि वातावरणात प्रचंड उकाडा जाणवू लागला. त्याचप्रमाणे रस्ताही अगदीच खराब होता. दुभाजकाचा पत्ताच नाही, अतिशय अरूंद मार्ग आणि त्यातच मार्गावर मोठ्या आकाराचे खड्डे. वाहन चालविणे अतिशय त्रासदायक होऊ लागले. अनेकदा वाहनापुढे अतिशय मंद गतीने चालणारी अवजड वाहने आल्याने रस्त्याखाली उतरून डाव्या बाजूने मातीतून पुढचे वाहन ओलांडून पुन्हा रस्त्यावर येण्याची कसरत करावी लागली. अशा प्रकारे साधारण साठ किमी खडतर प्रवास केल्यावर चित्तौडगडनजीक पुन्हा रस्त्याचा दर्जा सुधारलेला आढळला. त्यानंतर भीलवाडा पासून पुन्हा वेगाने प्रवास करता आला.

वाहनाचा आसन सुरक्षा पट्टा अतिशय घट्ट होऊन उजव्या खांद्यापाशी काचू लागला म्हणून सोडून दिला आणि नेमके महामार्गावरील पोलिसांनी अडविले. तीनशे रूपये दंड भरा अशी मागणी केली. खरे तर नियमानुसार केवळ शंभर रूपये इतकाच दंड असूनही तीनशे रूपये भरावे लागले, कारण इतर वाहनचालकही निमूटपणे तेच करीत होते. हुज्जत घालून फक्त वेळ वाया जाण्याखेरीज इतर काहीच हाती लागले नसते. दंड भरून पुन्हा मार्गस्थ झालो आणि थोड्या वेळाने एके ठिकाणी थांबून इंधन भरले आणि पुढे लगेच रात्रीचे भोजनही उरकून घेतले. भोजनापश्चात् अजमेर जयपूर महामार्गाला लागलो. हा महामार्ग अगदी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची आठवण करून देणारा आहे. या मार्गावर अतिशय कमाल वेगाने वाहन हाकीत रात्री दहाच्या सुमारास जयपूर येथे पोचलो. घरापासून आता आम्ही साडे आठशे किमी अंतरावर आलो होतो. जितके अंतर पार केले होते त्याहूनही कमी अंतर पार करावयाचे होते. आता यापुढचा मार्ग म्हणजे जयपूर दिल्ली द्रुतगती मार्ग होता तोही अजमेर जयपूर मार्गाइतकाच प्रशस्त असेल तर आताच पुढे मार्गस्थ व्हावे कारण दिवसा दिल्लीत अतिशय जास्त रहदारी असते असे पत्नीने मला सूचविले. तसेही रात्री दहा वाजता जयपूर सारख्या गजबजलेल्या पर्यटनस्थळी आगाऊ नोंदणीशिवाय हॉटेलात खोली मिळविणे सोपे नव्हते आणि मिळाली तरी इतक्या प्रचंड थंडीत व्यवस्थित झोप होऊन पुन्हा दुसर्‍या दिवशी ताजे तवाने होऊन पुढचा प्रवास नीटपणे करता येईल याची काहीच खात्री देता येत नव्हती. तेव्हा सर्व बाजूंनी विचार करून मी प्रवास पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.

माझ्या पत्नीचा भाऊ अविनाश गुरगाव येथे नोकरी करतो. त्याची कार्यालयीन वेळ रात्री दहाच्या सुमारास संपत होती. पत्नीने त्यास दूरध्वनीद्वारे संपर्क करून वेळ संपल्यानंतरही अधिक काळ कार्यालयात थांबण्यास सांगितले, जेणे करून आम्ही गुरगावात पोचू तेव्हा तो आमच्या सोबत येऊन रोहिणी, नवी दिल्ली येथ पर्यंत जाण्याकरिताच्या पुढील प्रवासास आम्हांस मार्गदर्शन करू शकेल.

जयपूरहून दिल्लीला जाण्याचा मार्ग केवळ नावापूरताच द्रूतगती मार्ग आहे हे लवकरच आमच्या लक्षात आले. पथकर नाक्यांची वारंवारिता जास्त आणि तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा, रस्त्यात अनेक उड्डाण पुलांची रखडलेली कामे, रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे आणि अनेक ठिकाणी महामार्गाचे अरूंद असणे या सर्व समस्यांसोबत अजून एक मोठी समस्या ही होती की महामार्गावर प्रवास करणारी बहुतांश अवजड वाहने होती आणि ती एकमेकांना समांतर जात असल्यामुळे अनेकदा पुढे जाण्यास वाट मिळत नव्हती. हॉर्न वाजवून वाजवून मी बेजार झालो तरी ही वाहने सहजी वाट देत नव्हती. या सर्व समस्यांमुळे रात्रीचे दोन वाजले तरीही आम्ही गुरगावपर्यंत पोचू शकलो नाही. इकडे अविनाश कडून पुन्हा पुन्हा कुठवर पोचलात अशी विचारणा होत होती. पहाटे अडीच वाजता आम्हाला महामार्गावर अनेक ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आढळल्या. पुढे जायला वाटच दिसत नव्हती. काही हलकी वाहने बाजूच्या सेवा रस्त्यावर उतरून पुढे मार्गक्रमण करीत होती म्हणून मीही तेच केले, परंतु तरीही पुढे सरकण्याचा वेग लक्षणीय रीत्या मंदावला होता. पुढे पुढे तर वाहन अगदी इंच इंच गतीने सरकत होते. आता तुम्ही हल्दीराम पथकर नाक्यापाशी पोचाल तेथून पुढे आल्यावर उजवीकडे वळा असे आम्हाला अविनाश सांगत होता. हा हल्दीराम पथकर नाका काही केल्या आमच्या दृष्टीपथात येत नव्हता. तेव्हा तुम्ही महामार्ग क्रमांक आठ वर च आहात ना? याची खात्री करून घ्या असे अविनाशने मला सूचविले. आम्ही महामार्ग क्रमांक आठ वरच असल्याची खात्री करून घेतली आणि तो हल्दीराम पथकर नाका अजून बराच पुढे असल्याचेही आम्हाला समजले. वाहनांची तोबा गर्दी, पहाटेची वेळ, संथ गतीने वाहनांचे पुढे सरकणे आणि तशातच पाऊस सुरू झाला. मी वायपर फिरविण्यास सुरुवात केली परंतु समोरच्या काचेवर घट्ट धूळ, सिमेंटचे कण उडालेले असल्यामुळे वायपरचे रबर फाटले आणि वायपर अतिशय थरथरत फिरू लागला. समोरचे नीट दिसतही नव्हते. अशाच परिस्थितीत वाहन पुढे दामटले आणि थोड्या वेळात हल्दीरामचा पथकर नाका दिसला. परंतू वाहनांच्या रांगा प्रचंड मोठ्या होत्या. अशा वेळी काही हलकी वाहने अगदी डावी कडून जाताना दिसली म्हणून मीही त्यांच्या पाठी मागेच माझे वाहन पळविले. बरेच अंतर पुढे गेल्यावर कळले की हा मार्ग बंद आहे, मग सर्वांबरोबरच मीही वाहन उलट दिशेने फिरवून मुख्य रांगेत ट्रक्सच्या मध्ये घुसविले. असे करीत करीत एकदाचा हल्दीराम पथकर नाका पहाटे सव्वातीन नंतर ओलांडला.

आता नेमक्या कुठल्या टिकाणी उजवीकडे वळायचे हे विचारण्या करिता पत्नीने अविनाशला संपर्क केला. तो एकंदरीत आम्हाला डावी उजवीकडे कोणत्या इमारती दिसत आहेत ते विचारत होता आणि सरळ मार्गक्रमण करण्याचाच सल्ला देत होता. अचानक डी एल एफ ची इमारत आम्हाला दिसली हे ऐकल्यावर त्याने पुढच्या वळणावर उजवीकडे वळून यू टर्न घेण्यास सांगितले. पत्नीने मला त्याचा तसा निरोप दिला. परंतु बरेच अंतर पुढे जाऊनही रस्ता दुभाजक अखंडच दिसत होता आणि यू टर्न घेण्यास वाव नव्हता. तसे मी पत्नीला सांगितले. तीही पुन्हा पुन्हा अविनाशला उजवीकडे वळण घेण्यास कुठे जागा आहे हे विचारत होती. अचानक माझ्या लक्षात आले की हा सारा रस्ता वरून जाणारा (इलेव्हेटेड रोड) आहे. म्हणजे मला यू टर्न घेण्याकरिता रस्तादुभाजकाचा खंडित भाग ओलांडायचा नसून डावीकडे निघणार्‍या एक्झिट्स मधून बाहेर पडून खाली येऊन रस्त्या खालून यू टर्न घ्यायचा आहे. मी तसे अविनाशला विचारून खात्री करून घेतली. आता एकच समस्या होती ती म्हणजे आमचे वाहन अगदी उजवी कडे होते आणि डावीकडून जाणार्‍या इतर वाहनांचा तसेच आमच्याही वाहनाचा वेग बराच जास्त होता. हळूहळू इंडिकेटर्स देत डावीकडे व्हावे लागणार होते. तसे करेपर्यंत अजून दोन डाव्या एक्झिट्स पार झाल्या. शेवटी तिसर्‍या एक्झिट मधून बाहेर पडत यू टर्न घेतला आणि अजून काही किमीचे अंतर पार करीत एकदाचे आम्ही अविनाशच्या कार्यालयीन इमारतीपाशी पोचलो.

अविनाशला सोबत घेतले आणि पुन्हा पुढे जाऊन यू टर्न घेतला कारण मगाशी आम्ही ज्या इलेवेटेड रोडने जात होतो त्याच मार्गाने पुन्हा रोहिणी, नवी दिल्लीला जायचे होते. थोड्या वेळातच पहाटे ०४:३० च्या सुमारास आम्ही नवी दिल्लीत प्रवेश केला. त्यानंतर अविनाशने दिशादर्शन केले आणि त्यानुसार मी रोहिणी येथील त्यांच्या घरापाशी पहाटे ०५:३० च्या सुमारास पोचलो. शेवटच्या अर्धा तासाच्या प्रवासात मला प्रचंड झोप येत होती. कसेबसे झोपेला टाळत मी वाहन घरापर्यंत आणले.

खाली वसाहतीच्या वाहनतळापाशी वाहन उभे करून वरच्या मजल्यावर सर्व सामान आणले आणि सकाळी ०६:०० ते दुपारी ११:०० पर्यंत एक झोप घेतली. झोप झाल्यावर सकाळची आन्हिके उरकून भोजन केले आणि शनिवार १८ जानेवारीचा उरलेला वेळ आम्हाला भेटावयास आलेल्या परिसरातील इतर नातेवाईंकाशी बोलण्यात घालविला.

त्यानंतर रविवार १९ जानेवारी रोजी पत्नीच्या काकांना व मोठ्या आत्याला भेटावयाचे ठरले. मी माझ्याच वाहनातून प्रवास करायचे ठरवित होतो परंतु पत्नी व सासुबाई या दोघींनीही सक्त मनाई केली. त्यांच्या मते दिल्लीतल्या प्रचंड वाहतूकीत मला वाहन चालविणे शक्य होणार नव्हते. शेवटी त्यांच्या आग्रहाला बळी पडून मेगा कॅब द्वारे संचलित टूरिस्ट टॅक्सी मागविण्यात आली. त्या टॅक्सीत बसून आमचा प्रवास सुरू झाला. पत्नीच्या काकांची भेट झाली. त्यानंतर सागर रत्न उपाहारगृहात भोजनही झाले, परंतु काही कारणास्तव मोठ्या आत्याबाईंची भेट होऊ शकली नाही. मराठी संकेतस्थळावर लेखन करणारे माझे एक स्नेही श्री. अरूण जोशी हेही दिल्लीतच राहतात हे मला ठाऊक होते. तेव्हा त्यांची भेट घेण्याचे ठरविले. वेस्ट मुकर्जी नगर परिसरात राहणार्‍या श्री. जोशी यांचे निवास स्थान सागर रत्न उपाहारगृहापासून जवळच असल्याचे समजले आणि मग आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळविला.

अरूण जोशी यांच्या घरी गप्पा मारण्यात आमचा वेळ अगदी मजेत गेला. त्यांच्याकडून निघून पुन्हा रोहिणी येथील निवासस्थानी गेलो तेव्हा टूरिस्ट टॅक्सीचे बिल सत्तावीसशे रूपये झाल्याचे समजले आणि मला धक्काच बसला. त्यानंतर पुढचा दिवस सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी पत्नीच्या सर्वात धाकट्या आत्याबाईंना भेटावयाचे ठरले. टूरिस्ट टॅक्सी इतकी महागडी आहे हे ठाऊक झाल्यामुळे आता माझ्या वाहनाचाच वापर करावयाचे ठरवले. ठरल्याप्रमाणे दुपारी दोन वाजता मी माझी पत्नी व माझ्या सासुबाई असे आम्ही तिघे रोहिणीतून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागलो. दिल्लीतली वाहतूक अतिशय बेशिस्त असल्याचे जाणवले. देशाची राजधानी असूनही बिनदिक्कत इथे दुचाकी वाहनावर तिघे प्रवास करताना आढळत होते. सायकल रिक्षा व विजेवर चालणार्‍या मोटर सायकल रिक्षांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. टाटा एस मॅजिक वाहनातून तर वीस पंचवीस प्रवासी कोंबले जात होते. अशा परिस्थितीतून वाट काढीत एकदाचे आत्याबाईंच्या घरी पोचलो. काही वेळ तिथे थांबून संध्याकाळी रोहिणीत परतलो.

आता दिल्लीच्या वाहतूकीचा अंदाज आला आणि तिथे वाहन चालविण्याचा सरावही झाला. पुढचा दिवस दिनांक २१ जानेवारी मंगळवार - दिल्ली विद्यापीठात शिकविणार्‍या आणि तिथेच राहणार्‍या पत्नीच्या आतेबहीणीला भेटावयाचे ठरले. हे जरा लांबच्या अंतरावरील ठिकाण होते आणि रहदारी देखील जास्त होती. त्यामुळे आदल्या दिवशीपेक्षा थोडा जास्त त्रास झाला तरी सायंकाळी ०५:०० वाजता विद्यापीठातील त्यांच्या निवासस्थानी पोचलो. सायंकाळी आठ वाजता परत रोहिणी कडे येण्यास सुरूवात केली आणि एक वेगळीच समस्या उद्भवली. एके ठिकाणी रस्त्याचे वेगवेगळ्या पातळीत तीन भाग केले होते आणि तसे दर्शविणारे दगड बसविण्याचे काम अपूर्णावस्थेत होते. सायंकाळच्या अपुर्‍या प्रकाशात ते नीट दिसले नाही आणि वाहनाची डावीकडील दोन चाके खालच्या पातळीच्या रस्त्यावर आणि उजवीकडची दोन चाके वरच्या पातळीच्या रस्त्यावर येऊन वाहन रस्त्यावरच अडकून बसले. ऍक्सलरेटर पेडलवर कितीही दाब दिला तरी वाहन जागचे हलेना. फक्त मागची चाके जागेवरच फिरू लागली. शेवटी मदतीकरता रस्त्यावरच्या काही लोकांना बोलावले. लगेचच आठ दहा लोक जमले आणि त्यांना वाहनाला हलकासा धक्का देत डावी कडे कमी पातळीच्या भागात आणले. त्यांचे आभार मानत पुढचा प्रवास सुरू केला आणि अर्ध्या तासात रोहिणीला परतलो.

बुधवार २२ जानेवारी - पत्नीचे साऊथ एक्स्टेंशनला काही काम असल्यामुळे तेथे जावे लागले. रोहिणीच्या त्यांच्या घरापासून हे अंतर फारच जास्त म्हणजे ४० किमी आहे. भयंकर वाहतूक, चिखल पाऊस अशा अडचणीतून वाट काढत इच्छित स्थळी पोचलो आणि परतताना क्लच पेडल व ब्रेक दाबण्याचा विक्रमच करावा लागला इतकी वाहनांची तोबा गर्दी. वाहनांच्या पाच समांतर रांगा. कुठली रांग केव्हा पुढे जाईल याचा नेम नाही. हळू हळू इंडिकेटर्स देत सारखे या रांगेतून त्या रांगेत होत एकदाचे अडीच तासात घरी पोचलो तेव्हा आपल्याला दिल्लीच्या गर्दीत वाहन चालविण्याचा पुरता सराव झाल्याचे समाधान झाले. पत्नी व सासुबाईंनीही माझ्या या निष्कर्षास पुष्टी दिली.

त्यानंतर गुरूवार दिनांक २३ जानेवारी रोजी रोहिणीच्या जवळपासच असलेल्या एका ग्रामीण भागात जावे लागले. तिथून परतताना जवळचा मार्ग (शॉर्ट कट) पकडण्याच्या नादात वाहन एका मोकळ्या मैदानातून नेले आणि नेमके ते तिथल्या चिखल, दलदलवजा भागात अडकले. वाहनातून खाली उतरून कोणास मदतीला बोलवावे म्हंटले तर तीही सोय नव्हती कारण वाहनाच्या चारही बाजूला प्रचंड चिखल. त्यात उतरणार तरी कसे? शेवटी वाहन एकदा पहिल्या गियरमध्ये टाकून एक्सलरेटर पेडलवर पूर्ण दाब दिला. वाहनाची मागील चाके वेगात जागेवरच फिरली आणि फिरताना त्यांनी बराचसा चिखल मागे उडविला. त्यानंतर वाहन रिवर्स गिअर मध्ये टाकून पुन्हा एक्सलरेटर पेडलवर पूर्ण दाब दिला. पुन्हा बरेचसे चिखल घुसळले गेले. असे रिवर्स फॉरवर्ड मध्ये अनेक वेळा केल्यानंतर शेवटी एक वेळ अशी आली की, पहिल्या गिअर मध्ये टाकले गेलेले वाहन एक्सलेटर पेडलवर पूर्ण दाब दिले असता हळू हळू इंच इंच पुढे सरकते आहे हे जाणवले. त्याच स्थितीत स्टीअरिंग घट्ट धरून बसून राहिलो आणि पंधरा वीस मिनीटात संपूर्ण दलदल पार करून बाहेर आलो तेव्हा सूटकेचा नि:श्वास टाकला आणि एकदाचे घरी पोचलो.

दिनांक २४ आणि २५ जानेवारी रोजी कुठेच गेलो नाही. घरीच आराम केला. रविवार, दिनांक २६ जानेवारी रोजी अविनाशसोबत त्याच्याच अल्टो ८०० वाहनातून बाहेर फिरलो. काही जरूरीच्या वस्तूंची खरेदी केली आणि सायंकाळनंतर सामानाची आवराआवर सुरू केली. आमच्या दोन सुटकेसेस आणि इतर पिशव्यांसोबतच आता धुलाई यंत्र, अतिसुक्ष्म लहर भट्टी (मायक्रोवेव्ह ओव्हन), विविध विषयांवरील अनेक पुस्तके, एअरोबिक्स स्टेपर, व्हायब्रेशन वेट लूझर, इत्यादी वस्तूही वाहनात भरल्या. शीतकपाट फारच मोठ्या आकाराचे (२०० लीटर्स) असल्यामुळे ते काही वाहनात बसविता आले नाही. बाकी सर्व वस्तू भरल्यावर वाहनाची पुन्हा एक फेरी मारून चाचणी घेतली आणि इंधन टाकीदेखील पूर्ण भरून घेतली.

सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ०६:३० वाजता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. याही वेळी आधी न्याहारी आणि व्हर्टिन आठ मिग्रॅचे सेवन केले होतेच. रोहिणीतून बाहेर निघून मुख्य रस्त्याला (रिंग रोड) लागलो तेव्हा बरीच थंडी आणि विरळ धुके होते. हळू हळू धुके नाहीसे झाले आणि हलक्या वाहनांची रहदारी वाढू लागली. अर्थात अवजड वाहने नसल्यामुळे वाहतूकीला वेग होता. सकाळी ०७:३० च्या सुमारास नवी दिल्ली चा पथकर नाका ओलांडून गुरगाव मध्ये प्रवेश केला. वीसच मिनीटांत गुरगावचा पथकर नाकादेखील ओलांडला आणि दिल्ली जयपूर मार्गावर धावू लागलो. येतेवेळी जितका खराब वाटला होता तितका हा मार्ग आता त्रासदायक वाटला नाही. एकतर अवजड वाहनांची वर्दळ तूलनेने कमी होती. दुसरे म्हणजे दिवसा उजेडी उड्डाण पुलांची रखडलेली कामे, मार्गाची कमी जास्त होणारी रूंदी या बाबी पुरेशा लवकर दृष्टीपथात येत असल्यामुळे वाहनाच्या गतीवर आणि सुकाणूवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येत होते.

काही वेळाने मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तपासणी चालविलेली दिसली. यावेळी आम्ही (काचत असले तरीही) आसन सुरक्षा पट्टे व्यवस्थित लावले होते त्यामुळे निर्धास्त होते. तरीही पोलिसांनी आमचे वाहन थांबवलेच. आम्ही वेगमर्यादा ओलांडली असल्याचे त्यांनी आम्हास सांगितले. माझ्या वाहनाने वेगमर्यादा ओलांडली यावर माझा विश्वास नसल्याचे मी त्यांना प्रत्यूत्तरादाखल सांगितले. त्यावर त्यांनी त्यांच्या जिप्सी वाहनात असलेले संगणक मला दाखविले. पडद्यावर माझे वाहन दिसत होते आणि वेग ताशी ७३ किमी इतका दिसत होता. मी समाधानी होत त्यांना वेगमर्यादा ताशी ८० किमी असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी महामार्गावर तुम्ही ८० च काय पण ९० किमी वेगाने देखील वाहन चालवू शकाल परंतू आता शहर हद्दीत तुम्हाला ताशी ६० किमी इतक्या वेगमर्यादेचे पालन करावे लागेल असे सांगितले. तसेच त्यांनी आम्ही कोठून आलो व कोठे चाललो याचीही विचारणा केली. आम्ही दिल्लीहून महाराष्ट्रात चाललो हे ऐकल्यावर रस्ता चूकल्याचेही सांगितले. त्यांच्या म्हणण्यानूसार आम्ही जयपूर शहराच्या हद्दीत प्रवेश केला होता आणि काही अंतर आधीच एक डावीकडचे वळण घेतले असते तर जयपूर बाह्यवळण मार्गे जयपूर अजमेर द्रुतगती मार्गाला लागलो असतो. आता आम्हाला जयपूर शहराच्या हद्दीतून अजमेर रस्त्याला जावे लागणार होते. त्याशिवाय वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल दंड म्हणून रू.१,१००/- (रूपये अकराशे फक्त) भरावे लागतील असे सांगण्यात आले. तसेच वाहनात जे गृहोपयोगी सामान भरले होते त्याबद्दल अजून वेगळा दंड - जो की पोलिस ठरवू शकत नाही आणि त्यासाठी आमच्या वाहनास न्यायालयासमोर सादर करावे लागेल. खरे तर वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल इतक्या रकमेचा दंड होत नाही. तसेच वाहनात सामान भरण्याचा मुद्दा असेल तर पोलिसांच्या जिप्सीतही तीन संगणक आणि इतर सामग्री होती त्याचे काय? अर्थात पोलिसासोबत वाद घालण्यात अर्थ नव्हता. त्याने दंड न भरता तडजोड म्हणून सहाशे रूपये भरण्यास सांगितले. शेवटी घासाघीस करीत त्यास तीनशे रूपये दिले आणि पुढे मार्गस्थ झालो.

त्यानंतर जयपूर शहरातून पुढे अजमेर ला जायचा रस्ता विचारला असता अनेकांना तो ठाऊक नसल्याचे समजले. अनेकांनी चूकीचे मार्गदर्शनही केले. त्यामुळे आम्ही अधिकच गर्दी असलेल्या भागात शिरलो. काही ठिकाणी तर चिंचोळा रस्ता, दोन्ही बाजूला झोपडपट्टी, मध्येच आलेले रेल्वे क्रॉसिंग अशी दिव्ये ओलांडत शेवटी एका डेड एंडपाशी पोचलो. शेवटी तिथून मागे फिरत पुन्हा अनेकांना विचारत एकदाचे मेट्रो लाईनपाशी आलो. रस्त्याच्या वरून जाणार्‍या मेट्रो लाईनच्या मार्गानेच पुढे गेल्यास अजमेर रस्ता लागेल असे खात्रीने समजल्यावर त्याप्रमाणे मार्ग क्रमू लागलो. जयपूरच्या वाहतूक नियंत्रक दिव्यांचे चक्र दोन मिनीटांहूनही अधिक असल्यामुळे अजूनच वेळेची नासाडी झाली. शेवटी मजल दरमजल करीत जयपूर अजमेर द्रुतगती मार्गावर एकदाचे आलो.

मध्यान्ह भोजन उरकून प्रचंड वेगात प्रवास सुरु केला कारण आधीच पोलिसांमुळे आणि नंतर जयपूर शहरात प्रवेश करून अजमेर मार्ग हुडकण्यात बराच वेळ नाहक खर्ची पडला होता. वाटेत दुदू येथे इंधन भरून घेतले आणि पुढे चित्तौडगढ, भीलवाडा ओलांडून राजस्थान मध्यप्रदेश सीमेच्या ६० किमी अलीकडे पोचलो. पुन्हा एकदा खराब एकेरी रस्त्याचा सामना करावा लागला. रस्त्यावरचे खड्डे, पुढे अवजड वाहनांची गर्दी यासोबतच अंधारामुळेही अजूनच उशीर होत होता. पुन्हा आधीसारखेच रस्त्याच्या खाली उतरून पुढची अवजड वाहने ओलांडावी लागत होती. अंधारामुळे खड्डे नीट दिसत नव्हते आणि वाहनात सामान असल्यामुळे खड्ड्यांची ही समस्या अधिकच जाणवत होती. तरीही मोठ्या नेटाने हा खडतर मार्ग पार केला आणि मध्यप्रदेश सीमेच्या नजीक येऊन ठेपलो.

आता रस्त्यावर दुभाजक होता आणि पुढे बर्‍याच अंतरावर पथकर नाकाही दिसत होता. दुभाजकाच्या डाव्या बाजूने आम्ही जात होतो आणि पथकर नाक्याच्या अलीकडे आम्ही असल्यामुळे इकडच्या वाहनांची तपासणी केली जात होती. वाहनांची प्रचंड मोठी रांग होती आणि या मंदगतीने समोरचा पथकरनाका ओलांडायला आम्हाला कित्येक तासही लागू शकणार होते. काय करावे ते सूचत नव्हते. अशावेळी अचानक माझ्या निदर्शनास आले की आमच्या पुढे असलेल्या महिन्द्रा झायलो वाहनाने दुभाजक ओलांडून चक्क रस्त्याच्या उजव्या बाजूने (रॉंग साईडने) पुढे जायला सुरुवात केली होती. त्याचा उद्देश तत्काळ माझ्या ध्यानात आला आणि मीही त्याचेच अनुकरण करीत परिणामांचा विचार न करता माझेही वाहन त्याच्या मागे दामटले. एक अतिशय साधी गोष्ट होती. विरुद्ध बाजूने येणारी वाहने ही मध्य प्रदेशाची सीमा ओलांडून राजस्थानात शिरली होती. त्यांची तपासणी पथकर नाक्याच्या आधीच करण्यात आली होती त्यामुळे त्या वाहतूकीला वेग होता. त्या पट्ट्यात कुठलीही तपासणी चालु नव्हती. त्या वाहनांच्या बाजुला मिळणार्‍या अरूंद चिंचोळ्या वाटेतून महिन्द्रा झायलो वाहन वेगाने चालले होते आणि मीही त्या वाहनाचे मागोमाग माझे वाहन दामटत होतो. आम्ही रस्त्याच्या अगदी उजव्या बाजूने चाललो होतो परंतु राजस्थान पोलिस आमच्या वाहनांकडे ढुंकूनही पाहत नव्हते. अगदी अल्प वेळेत आम्ही फार मोठा पल्ला पार करून पथकर नाक्यापाशी पोचलो होतो. आता अगदीच कसोटीचा क्षण होता कारण पथकर नाक्यापाशी अंतिम तपासणी होती आणि तिथे आम्हाला कुणीही चूकीच्या दिशेने नाका ओलांडून देणार नव्हते. मी झायलोवर अगदी बारकाईने लक्ष ठेऊन होतो. झायलो चालकाने अवजड वाहनांच्या गर्दीतून मिळालेल्या फटींमधून अगदी शिताफीने वाहन रस्त्याच्या मधोमध आणून उभे केले. त्याच्या मागोमाग मीही येऊन पोचलो. त्याने रस्ता दुभाजकावर वाहन चढविले आणि संधी मिळताच पुन्हा दुभाजकाच्या डाव्या बाजूला असलेल्या अवजड वाहनांच्या गर्दीत आपले वाहन घुसविले. मध्ये जराही अंतर पडू न देता मी त्याचे अनुकरण केले. आता आम्हा दोघांचीही वाहने योग्य प्रवाहात आली होती. पथकर नाक्यावर अंतिम तपासणी होऊन आम्ही मध्यप्रदेश राज्यात प्रवेश केला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. आता पुन्हा चांगला प्रशस्त गुळगुळीत रस्ता समोर दिसत होता. आमचा प्रवास पुन्हा वेगात सुरू झाला. थोड्या वेळाने रात्रीचे भोजन उरकून आम्ही रतलामच्या दिशेने कूच केले.

रतलाम पार केल्यावर आता आम्हाला मुंबईला जाणारा मार्ग धरायचा होता. त्यानुसार मार्गफलक पाहून जावराच्या दिशेने आम्ही निघालो. जावराला पोचलो आणि पुन्हा इंधन भरून घेतले. बाहेर प्रचंड गारवा होता आणि आम्हाला खिडक्यांच्या काचा बंद करणे भाग होते. परंतु तसे केले म्हणजे समोरच्या काचेवर आतील बाजूस बाष्प साचत होते. ते सारखे पुसत बसणे ही एक समस्या होऊन बसली. त्यामुळे थंडी वाजत असूनही अत्यंत नाईलाजाने खिडकीच्या काचा अगदी किंचित किलकिल्या होतील इतपत खाली घेतल्या. या सर्व अडचणींमुळे वाहनाचा वेग काहीसा मंदावला होता. रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि आता मला समस्या जाणवू लागली ती झोपेची. डोळ्यांवर गाढ झोप येऊ घातली होती आणि तिच्यावर मात करीत मी कसाबसा वाहन हाकत होतो. पत्नी तर शेजारच्या आसनावर सुरक्षा पट्टा बांधून कधीची निद्राधीन झाली होती. मी कोणत्या स्थितीत वाहन चालवित होतो याची तिला अजिबात कल्पनाही नव्हती. आम्ही अजून मध्यप्रदेश राज्यातच असल्यामुळे महामार्गावर दर ठराविक अंतरावर वाहने उभी करून विश्रांती करण्याचीही सोय उपलब्ध होती. या ट्रक बे वर अनेक ट्रक्स उभे होते आणि त्यांचे वाहन चालक / सहचालक विश्रांती घेत होते. सोबत स्वच्छतागृहांचीही सुविधा होती. अनेकदा माझ्या मनात आले की आपणही त्या जागी वाहन उभे करून वाहनात जराशी विश्रांती घ्यावी. परंतु पुन्हा तो विचार बाजूस सारून मी वाहन पुढे नेत होतो. दोनदा वाहन थांबवून मी डोळ्यांवर थंड पाणी मारले आणि पुन्हा प्रवास पुढे चालु ठेवला. रात्री दोनच्या सुमारास झोपेचे आक्रमण फारच तीव्रतेने होऊ लागल्यावर पुन्हा एक व्हर्टिन आठ मिग्रॅ चे सेवन केले आणि पुन्हा प्रवासास सुरूवात केली. थोडे अंतर पुढे जाताच मला दिसले की एक जोडरस्ता आणि पूल ओलांडला की आम्ही महामार्ग क्रमांक तीन (आग्रा मुंबई रस्ता) वर पोहोचू. आता आपले मुक्कामाचे ठिकाण जवळ आले या आनंदात मी झोपेचा अंमल दूर सारीत वाहन चालविणे सुरूच ठेवले. या जोडरस्त्यावर एका पथकर नाक्यापाशी पथकर भरण्याकरिता थांबलो असता दोन पोलिस वाहनाजवळ आले आणि त्यांनी काहीशा संशयाने माझ्याकडे पाहिले आणि मी कोठून आलो, कोठे जात आहे याची चौकशी केली. त्यांच्या नजरेत संशय का आहे हे आधी मला कळलेच नाही पण शेजारी वळून बघताच मला त्याचा उलगडा झाला. पत्नी गाढ झोपेत होती आणि झोपेत व्यक्ती एखाद्या बाजूला कलते त्याप्रमाणे तिचे शरीर प्रवासादरम्यान कलले असले तरी आसन पट्ट्यामुळे तिची मान आणि चेहरा पुढे लटकत होते. बाहेरून पाहणार्‍या पोलिसाला कदाचित ती जिवंत तरी आहे की नाही असे वाटले असावे. पोलिसांचे शंका निरसन व्हावे म्हणून मी आधी पत्नीला उठविले आणि मग पोलिसांच्या चौकशीला तोंड दिले. वाहनात मागे ठेवलेले मोठ्या आकाराचे धुलाई यंत्र आणि इतर सामान पाहून पोलिसांनी त्याचीही चौकशी केलीच. परंतु हे सामान आपण आपल्या माहेर च्या घरून स्वत:च्या घरी नेत आहोत असे पत्नीने त्यांना सांगितल्यावर पोलिसांनी अधिक चौकशी केली नाही व पथकर भरून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. पत्नीही लगेच पुन्हा पहिल्यासारखी गाढ झोपी गेली.

थोड्याच वेळात महामार्ग क्रमांक तीन वर पोचून तो अवघड घाटही पार केला. अजूनही झोपेचा त्रास जाणवत होताच. त्यामुळे अर्थातच आता सरासरी वेग बराच मंदावला होता. सेंधवा पाशी पोचताच पुन्हा टाकीत इंधन भरून घेतले. डोळ्यांवर पाणी मारले आणि प्रवास पुढे चालु ठेवला. थोड्याच वेळात महाराष्ट्र सीमेपाशी पोचलो इथे पोलिसांनी आमची कुठलीही तपासणी केली नाही की सोबत असलेल्या सामानाबद्दल चौकशी. ते अवजड वाहनांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात मग्न होते. थोड्याच वेळात सकाळी ठीक सहा वाजता अवधान, धुळे येथील आमच्या निवासस्थानी पोचलो.

यानंतर एका आठवड्याने म्हणजे २ फेब्रुवारी रोजी धुळ्याहून पुणे येथे गेलो आणि ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत साई सर्विस फुगेवाडी येथे वाहनाची हमी काळातली शेवटची मोफत दुरूस्ती करून घेतली. यात वाहनाचा स्पीडोमीटर व इतर काही नादुरुस्त झालेले सुटे भाग बदलून घेतले.

या प्रवासादरम्यान काही निरीक्षणे नोंदविली गेली ती अशी:-

  1. एकूण प्रवास जातेवेळी ११९१ किमी तर येतेवेळी ११९३ किमी झाला. जाताना २२ तास ३० मिनीटे तर येताना २३ तास ३० मिनीटे लागली. दिल्ली अंतर्गत प्रवास एकूण १८१ किमी झाला.
  2. Table1.jpg

  3. एका बाजूचा एकूण पथकर रूपये ९६२/- इतका खर्च झाला. महाराष्ट्रात केलेला प्रवास हा तूलनेने कमी असला तरी पथकराची बरीच रक्कम त्याकरिता खर्च झाली. येतेवेळी आम्ही जयपूर शहर बाह्यवळण न घेतल्याने दौलतपुरा नाक्यावरील रूपये ४६/- इतका पथकर वाचला असला तरी त्याची किंमत आम्हाला जयपूर शहरांतर्गत प्रवासात खर्ची पडलेला नाहक वेळ आणि पोलिसांना द्याव्या लागलेल्या तीनशे रुपयांच्या भुर्दंडाच्या स्वरूपात चूकती करावी लागली.
  4. Table2.jpg

  5. निरनिराळ्या ठिकाणी इंधन दरांमध्येही अतिशय तफावत आढळली. अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्रात इंधन दर अतिशय जास्त असून मध्यप्रदेश, राजस्थान मार्गाने ते घटत दिल्लीत सर्वात कमी असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे इंधन कार्यक्षमतेचा विचार केला असता महाराष्ट्र मध्यप्रदेश दरम्यानच्या प्रवासात रस्ता चांगला होता परंतु मला प्रति लिटर केवळ १३.५ किमी इतकीच सरासरी धाव मिळाली. मध्यप्रदेश राजस्थान दरम्यान काही अंतर रस्ता अतिशय खराब व रहदारी अतिशय वर्दळीची असूनही मला प्रति लिटर १४.३ किमी इतकी सरासरी धाव मिळाली. तर राजस्थान पासून दिल्लीला जाताना सर्वात जास्त काळ आणि सर्वात जास्त वाहतूक खोळंबा होऊन ही १५.९ किमी इतकी सर्वोच्च प्रति लिटर धाव मिळाली. याचाच अर्थ ज्या मार्गावर मी ताशी ११० / ११० किमी इतका कमाल वेग घेतला होता त्या मार्गावर मला इंधन कार्यक्षमता अतिशय कमी असल्याचे आढळले. परतीच्या प्रवासातही हेच दिसून आले की जिथे माझा वेग कमी त्या मार्गावर मला इंधन कार्यक्षमता अत्युच्च मिळाली आहे. प्रत्येकच ठिकाणी इंधनाची टाकी पूर्ण भरणे शक्य न झाल्याने त्या त्या वेळी इंधन कार्यक्षमता मोजता येऊ शकली नाही. तसेच मोठ्या अंतरावरील सरासरी इंधन क्षमतेचे मापन करण्याकरिता मी दिल्ली धुळे प्रवासानंतर जो धुळे पुणे आणि पुन्हा पुणे धुळे असा प्रवास केला त्यावेळच्या इंधन भरल्याच्या नोंदीही खालील तक्त्यात दर्शविल्या आहेत.
  6. table3.jpg

  7. ओम्नी वाहनाचा आसन पट्टा मध्येच घट्ट होऊन शरीराला काचतो. यापूर्वी एकदा मी हमी कालावधीत आसन पट्टा बदलून घेतला होता पण काही दिवसातच हा आसन पट्टादेखील घट्ट होऊ लागला. ओम्नी वाहनाच्या विशिष्ट रचनेमुळे आसन पट्टा अशा प्रकारे घट्ट होतो अशी माहिती मला सेवा केंद्रात मिळाली. केवळ पोलिसांकडून दंड आकारला जाऊ नये म्हणून मग आसन पट्टा वरून खेचताना जरा जास्त प्रमाणात खेचावा आणि त्याच्या वरील टोकाकडे तो थोडासा दुमडून त्यास यू क्लिप लावावी अशी युक्तीही मला सेवा केंद्रातील वाहनचालकाने सांगितली. खरे तर इतर कार्सच्या तूलनेत ओम्नीचे आसन बरेच उंचावर आहे आणि सुकाणू चक्र (स्टीअरिंग व्हील) खाली आहे. इतर कार श्रेणीतील वाहनांमध्ये अपघात प्रसंगी सुकाणू चक्र शरीरावर आदळण्याचा जसा धोका असतो तसा तो ओम्नी वाहनात अजिबात नसतो. सबब ओम्नी वाहनास आसन सुरक्षा पट्ट्याची गरज व उपयोग अजिबात नाही. तरी ज्याप्रमाणे बस अथवा ट्रक चालकाने आसन सुरक्षा पट्टा लावला आहे किंवा नाही हे पोलिस अजिबात तपासत नाही त्याचप्रमाणे ओम्नीलाही या तपासणीतून वगळले पाहिजे.

एकूणच मध्यप्रदेशातील रस्ते व पोलिस यांचे अनुभव चांगले आहेत. तूलनेने राजस्थान पोलिस व रस्ते यांचे अनुभव अतिशय वाईट म्हणावे लागतील. दिल्ली येथेही रस्ते बरे आहेत. पोलिस कुठे दिसलेच नाहीत. अगदी राजधानीच्या मुख्य रस्त्यांवरही टाटा एस मॅजिक वाहनातून २५ / ३० प्रवासी कोंबून नेले जात असतानाही त्यांना पोलिस दंड करताना दिसत नाहीत ही आश्चर्याची गोष्ट आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत बेकायदेशीर वाहतूक होताना निदान मी तरी पाहिली नाही. रहदारीच्या शिस्तपालनाकरिता मुंबईच्या बर्‍याच भागांमध्ये तर तीन आसनी रिक्षांना देखील परवानगी नाही. देशाच्या राजधानीत मात्र सर्रास ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, इलेक्ट्रीक बाईकला मागे सहा आसने जोडलेल्या रिक्षा, टाटा मॅजिक एस यांची वाहतूक सुरूच असते.

असो. तर असा हा सलग १२०० किमीचा प्रवास आम्ही धुळे ते दिल्ली आणि दिल्ली ते धुळे मिळून दोन वेळा केला. प्रवासास निघण्याआधीही अनेकांनी मला असा प्रवास न करण्याविषयी सुचविले होते. प्रवासाहून आल्यावरही अनेकांनी तुम्ही यातून काय साध्य केले अशी विचारणा केली. यापेक्षाही कमी खर्चात दोघे विमानाने जाऊन आला असता असेही लोकांचे मत पडले. एक मात्र खरे की, यापैकी कुणीही सलग एका वेळी इतका लांबचा प्रवास स्वत:च्या वाहनाने रस्त्यावरून केला नव्हता.

या प्रवासातून आम्ही काय साध्य केले अशी विचारणा करणार्‍यांना मला इतकेच सांगावेसे वाटते की, अनेक जण गिर्यारोहण, पॅराजम्पिंग, पॅराग्लायडिंग आणि अजून काही साहस कृत्ये करतात त्यातून त्यांना काय साध्य होते? मध्यंतरी एका युवतीने उत्तर ध्रुव आणि नंतर दक्षिण ध्रुव अशा दोन्ही ठिकाणी पॅराजम्पिंग केले. तिला त्यातून काय साध्य झाले? खरे तर तिचे तिथे काही कामही नव्हते. ती तर फक्त साहस करण्याकरिताच तिथवर गेली. मला तरी निदान दिल्लीला जायचे काही तरी प्रयोजन होते. विमानाने किंवा आगगाडीने जावे लागणार होतेच. त्याऐवजी स्वत:च्या वाहनाने गेलो इतकेच. म्हणजेच इच्छित कार्य घडण्यासोबतच साहसही घडले. नाहीतरी स्वतंत्र रीत्या साहसी मोहिमा घडवाव्या हे निदान मला तरी पटत नाही.

व्हर्टिकल लिमिट या गाजलेल्या चित्रपटात सुरुवातीस एक साहसी गिर्यारोहण मोहीम दाखविली आहे. या मोहिमेत एक वृद्ध आणि त्याचा एक मुलगा व मुलगी असे तिघे एका संकटादरम्यान नाईलाजास्तव असा एक निर्णय घेतात की ज्यामुळे वृद्धाचा मोहिमेदरम्यान अपघाती मृत्यू होतो व त्याची मुले जगतात. त्यानंतर मुलगा साहसी मोहिमांमधून अंग काढून घेतो व नॅशनल जिओग्राफिक करिता कार्य करू लागतो. त्याच्या कार्यातही साहस असते परंतु ते कार्याबरोबरीनेच येत असते. याउलट त्याची बहीण केवळ साहसाच्या समाधानाकरिता अशा मोहिमांमध्ये भाग घेतच राहते. एक वेळ अशी येते की ती तिच्या मोहिमेदरम्यान संकटात सापडते. तेव्हा तिच्या सुटकेकरिता जे पथक जाते (रेस्क्य़ू टीम) त्यात भाऊ देखील सामील होतो आणि तिला सुखरूप सोडवून आणतो. बहीण साहसाकरता साहस करते तर भाऊ काही एका निश्चित हेतूने साहसी मोहिमेत सामील होतो. यात भावाचा निर्णय योग्य आहे असे निदान मला तरी वाटते.

हौशी साहसवीरांचे जग नेहमीच कौतूक करीत आले आहे. सहेतूक कार्यात साहसाचे मिश्रण करणार्‍यांचे जगाने कौतूक करावे अशी त्यांची अपेक्षा नसतेच; निदान त्यांना नाउमेद तरी केले जाऊ नये इतकीच माफक अपेक्षा हा लेख संपविताना व्यक्त करतो.

03_07_2014_103_004.jpg

या लेखात मांडता न येऊ शकलेले काही खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येतील.

http://factsandimagination.blogspot.in/2014/02/blog-post.html


Picture 3983.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झालेल्या प्रसंगांचे हे फक्त टाचण आहे, डायरी. जे झालं, जसं झाल ते फक्त उतरवून काढले आहे. इथे प्रत्येकजण आम्ही नाही बा त्यातले असा आव का आणत आहे? आम्ही कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ! प्लीजच. कोणाला झुरळ, मुंग्या, कबूतर, उंदीर मारणंसुद्धा साहस वाटू शकतं, बिचार्‍यांचा जीव गेलेला असतो, तेव्हा नाही कोणी गळा काढत ते, खून केला हो! खून करू नका हो! ह्याला काय साहस म्हणतात? आपल्याला नाही पटलं जे लिहिले आहे ते, वाचावं आणि सोडून द्याव. इथे प्रत्येकजण धोपटतो का आहे? त्याने काय कालचक्र उलटे फिरणार आहे का?

तरी बरं शिर्षकांत 'क्रेझी जर्नी' असं लिहिलयं. लेखकांला माहित आहे की सगळंच काही योग्य झालं नाही प्रवासांत, ग्रे एरियाज होते, तरी त्याला मजा पण आली. आता सगळ्यांना प्रॉब्लेम नॉट सो राईट वागून त्यांना मजा कशी आली असा असेल तर कोण काय करू शकतो?

चौथा कोनाडा,

<< चेतनराव, तुमी काय डॉक्यूमेंटरी वै बनवता काय? अतिशय नीट नेटका प्रवास वृतांत ! काय भन्नाट तपशिल दिलेत! अंतरे, वेळा, टोल-शुल्क, व्वा ! या कारणासाठी १०० पैकी १०० गुण ! मजा आली वाचून ! >>

<< तुमची लेखन-शैली भन्नाट आहे. लगे रहो चेतनभाय, लिखते रहो चेतनभाय ! >>

धन्यवाद. डॉक्यूमेंटरी वगैरे बनवित नाहीत, डॉक्यूमेंटरी बनविणारे कै. प्रभाकर पेंढारकर यांचे लेखन वाचले आहे. बारीकसारीक तपशील ध्यानात ठेवून त्याबरहुकूम वृत्तांत कसा लिहावा हे त्यातून शिकलो.

<< पण मला वाटते, वेळोवेळी तुमच्या मनाने व क्षमतांनी कौल दिला की “ होऊ दे अजून ड्रायव्हिंग” त्या नुसार तुम्ही आगेकुच करत राहिलात ! कधी-कधी अशी वेळ येते की “आतला आवाज ढुसण्या मारत तुम्हाला खेचत नेतो” हे या सभासदांनी लक्षात घेतलेले दिसत नाही !>>

अगदी योग्य वर्णन. अंतर्मनाचा कौल असाही एक भाग असतो, जो ऐकूनच आपण असे धाडस करण्यास धजावतो. सहसा हा आवाज आपल्याला दगा देत नाही. त्या जोरावर जीवनातली मोठ मोठी साहसे करता येतात.

<<आणखी तुमी तुमची अर्धांगिनी जिने ह्या सारया प्रवासात तोला मोलाची साथ दिली तिचे नांव नाही लिहिलेत ? बाकीच्यांच्या नावाचा उल्लेख केलात. बाय दे वे, या धाग्यावरच्या सारया दंग्याबद्दल त्यांचे काय मत आहे?>>

इथे विशाल दीक्षित सारख्या सदस्याने काही अनुचित प्रतिसाद दिला होता जो संपादकांनी संपादित केलाय ते पाहता पत्नीचं नाव नाही लिहिलंय तेच बरंय. या सार्‍या दंग्याविषयी पत्नीला काहीच ठाऊक नाहीये. तिला मराठीच समजत नाही तर मराठी संस्थळ वगैरे बाबी फारच दूर राहिल्या.

वेदिका२१,

संपूर्ण लेख आणि सर्व प्रतिसाद नीट न वाचताच प्रतिक्रिया दिलेली दिसतेय, अन्यथा <<मुळात ट्रॅफिकचे नियम तोडणं, पोलिसाला लांच देणं, झोप आलेली असताना गाडी चालवून >> या सर्व बाबी मी कुठल्या परिस्थितीत केल्यात आणि << इतरांचा जीव धोक्यात घालणं >> असं काहीही मी केलेलं नाही हे तुम्हाला कळलं असतं. अर्थात <<विकृतपणा >> हा शब्द संदर्भाने तर चूकलाच आहे शिवाय व्याकरणदृष्ट्याही योग्य नाही. विकृती असा शब्द वापरला जातो. तेव्हा इतरांना सल्ले देण्याआधी आपल्या लेखनातली विकृती सुधारावी हे इष्ट.

@ SATI

Thanks for the support (as usual).

@राजसी ,

<<झालेल्या प्रसंगांचे हे फक्त टाचण आहे, डायरी. जे झालं, जसं झाल ते फक्त उतरवून काढले आहे. इथे प्रत्येकजण आम्ही नाही बा त्यातले असा आव का आणत आहे? आम्ही कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ!>>

अगदी अगदी! हे म्हणजे असं झालं की निवडणूकीच्या प्रचारात मर्यादेपेक्षा जास्त खर्च बहूतेक सर्वच विजयी उमेदवारांनी केला पण तशी जाहीर कबूली देणारे मुंडे टीकेला पात्र ठरले तशातला प्रकार आहे. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

<< तरी बरं शिर्षकांत 'क्रेझी जर्नी' असं लिहिलयं. लेखकांला माहित आहे की सगळंच काही योग्य झालं नाही प्रवासांत, ग्रे एरियाज होते, तरी त्याला मजा पण आली. आता सगळ्यांना प्रॉब्लेम नॉट सो राईट वागून त्यांना मजा कशी आली असा असेल तर कोण काय करू शकतो? >>

निश्चितच. आपण अगदी यथार्थ वर्णन केले आहे. महाभारतातल्या युद्धातला विजय देखील १०० टक्के नियमपालन करून झाला नव्हता, अर्थात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आधी एका पक्षाने नियम मोडले म्हणून दुसर्‍या पक्षालाही नाईलाजाने ते मोडावे लागले. त्याचप्रमाणे आपल्या प्रशासकीय व्यवस्थेच्या गलथानपणामुळे रस्त्यावर खड्डे, नाक्यावर वाहतूक खोळंबा अशा अन्यायकारक बाबी घडल्यामूळे वाहनचालकांचे अपवादात्मक परिस्थितीत नियम मोडणे अपरिहार्य आणि नाईलाजास्तव समर्थनीय देखील ठरते. सगळेच करतात. कबूली देणारा रोषास पात्र ठरतो, इतकेच.

मारुती कंपनी ने या लेखाचा वापर जाहिरात म्हणून करून घ्यावा व त्या बदल्यात चेसुगु यांना १ फ्री सर्विसिंग द्यावी.

मामी,

<< ओम्नी ही जगातली सर्वांत सुरक्षित, मजबूत आणि चालक कसाही असला तरीही समजून घेणारी अशी समजूतदार आणि स्वयंचलित गाडी असल्याची खात्री पटली. >>

या प्रतिसादामुळे आपण दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रायोजित मालिकांमधील स्त्रीपात्रापेक्षाही अधिक खवचट विधाने करू शकत असल्याची खात्री पटली.

खवचट विधानांमध्ये जे व्यक्त केलेले असते त्यापेक्षा वेगळेच काही अभिप्रेत असते. तद्वत आपल्याही प्रतिसादात आपणांस नेमके काय अभिप्रेत आहे त्याचा अंदाज घेत त्याविषयी खाली स्पष्टीकरण देत आहे.

जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू ही स्वत:च्या काही अंगभूत वैशिष्ट्यांसह अस्तित्त्वात असते. तिची काही वैशिष्ट्ये ही तिची बलस्थाने असतात तर उरलेली काही म्हणजे तिच्या उणिवा. त्या वस्तूला स्वीकारताना बलस्थाने व उणिवांचाही स्वीकार करणे अपरिहार्य असते. वाहने या नियमास अपवाद नाहीत. प्रत्येक वाहनाप्रमाणेच ओम्नीचीही काही बलस्थाने व काही उणिवा आहेत. प्रथमदर्शनीच बाहेरून जाणवणारी ओम्नीची सर्वात मोठी उणिव म्हणजे तिला पुढे बॉनेट नसणे. त्यामुळे समोरून अपघात झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु बॉनेट नसणे ही उणिव असण्याबरोबरच बलस्थान देखील आहे कारण यामुळे वाहनचालकाची दृश्यमानता (Visibility) मोठ्या प्रमाणात वाढते व अपघात होऊन कमी नुकसान होण्यापेक्षाही ते टाळण्यात जे शहाणपण आहे ते या वाहनामुळे आपोआप घडते. तसेच आसनाखाली असणार्‍या इंजिनाच्या उष्णतेमुळे प्रवासातली प्रचंड थंडीही आम्हाला जाणवत नव्हती.

अर्थात ओम्नीत ज्या उणिवा आहेत त्या टाळून त्यातील बलस्थाने कायम राहतील अशा वाहनाचा मी देखील शोध घेत आहेच. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मी आज टाटा व्हेन्चर या वाहनाची चाचणी घेतली आहे. आता या वाहनाच्या खरेदीकरिता रकमेची जमवाजमव आणि ओम्नीच्य़ा विक्रीचे प्रयत्न चालु आहेत. सारे काही जुळून आले तर लवकरच वाहन खरेदी होईलही. तसेच मार्च महिन्याची अखेर जवळ येत चालली आहे. व्यवसायात जर अपेक्षित फायदा झालाच कदाचित ओम्नी न विकताही व्हेंचर खरेदी होईल.

Doctor इब्लिस,

<< मारुती कंपनी ने या लेखाचा वापर जाहिरात म्हणून करून घ्यावा व त्या बदल्यात चेसुगु यांना १ फ्री सर्विसिंग द्यावी. >>

हा सल्ला मारूतीला देताय ना? मारूती सुझुकी इंडियाचे कोणी अधिकारी मायबोलीवर सदस्य आहेत काय? नसल्यास हा सल्ला त्यांच्यापर्यंत पोचणार तरी कसा? आणि त्यांना सल्ला मिळेल तेव्हा कदाचित माझ्याकडे ओम्नी नसेलही. (वर मामींना दिलेला प्रतिसाद वाचा).

<< मे महिन्यात दिल्लीला अजुन एक चक्कर मारून यायला हरकत नाही चेसुगु. वेगळीच मजा येईल अजून. >>

प्रस्तावाबद्दल धन्यवाद.

जानेवारीत आणि फेब्रुवारीत मिळून २० दिवस उत्पन्न बुडले होतेच आता पुन्हा इतक्या लवकर मला व्यवसाय बंद ठेवता येणार नाही आणि मे महिन्यात मध्य प्रदेश - राजस्थान - गुडगाव - हरयाणामार्गे दिल्लीला जाताना सहन कराव्या लागणार्‍या प्रचंड उकाड्यात कसली आलीये मजा? अर्थात ही सहल तुम्ही प्रायोजित (इंधन + इतर प्रवास खर्च + प्रवासातल्या दिवसांचे माझे बुडलेले उत्पन्न इत्यादी) करणार असाल टाटा विंगर / व्हेन्चर, एन्डेव्हर अथवा निस्सान एक्स ट्रेल / इविलिआ सारख्या एखाद्या वातानुकूलित वाहनातून जायला माझी तयारी आहे. तुमचे प्रत्युत्तर लवकर कळवा त्याप्रमाणे नियोजन करता येईल. सोबत तुम्हीही याल तर अत्युत्त्म. परतल्यावर आपण दोघे मिळून प्रवास वृत्तांत लिहू आणि मायबोलीवर प्रकाशित करुयात.

या प्रतिसादामुळे आपण दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रायोजित मालिकांमधील स्त्रीपात्रापेक्षाही अधिक खवचट विधाने करू शकत असल्याची खात्री पटली. >>> धन्यवाद. तो प्रतिसाद तसाच होता. भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर!

तुम्हाला हरभर्‍याच्या झाडावर चढवणार्‍यांना सांगावेसे वाटते की नियमांचे उल्लंघन करून आणि झोप टाळून सलग ड्रायव्हिंग करण्यात काहीही धाडस नाही. जोवर काही होत नाही तोवर पोकळ धाडस वाटू शकते, पण ईश्वर न करो, काही अपघात झाला तर हेच धाडस एक मूर्खपणा ठरतो.

ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यासंदर्भातील सुचनांचे पालन केल्याने अपघाताची probability आपल्या कडून तरी नगण्य होईल. बाकी कधी काय होईल ते कोणीही सांगू शकत नाहीच.

तुम्हाला पटणार नाहीच. पण ज्यांना पटेल त्यांच्यासाठी. तुम्हाला पुढच्या धाडसासाठी शुभेच्छा!

धन्यवाद, चेतन !

आणखी एक : आणखी तुमी तुमची अर्धांगिनी जिने ह्या सारया प्रवासात तोला मोलाची साथ दिली तिचे नांव नाही लिहिलेत ? बाकीच्यांच्या नावाचा उल्लेख केलात. बाय दे वे, या धाग्यावरच्या सारया दंग्याबद्दल त्यांचे काय मत आहे? :

या बद्दल काही लिहिले नाही? असा प्रवास घडताना जोडीदाराची मानसिकता काय होती? विरोध तर नक्की झाला असेल ना ? ड्रायव्हिंगमधला सिंहाचा वाटा त्यांनी तर उचलला नाही ना? की हे तुम्ही शिताफीने दडवून ठेवताय? आम्हाला आपली एक उत्सुकता.

या प्रतिसादामुळे आपण दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रायोजित मालिकांमधील स्त्रीपात्रापेक्षाही अधिक खवचट विधाने करू शकत असल्याची खात्री पटली.
>>>
Rofl

@ चौथा कोनाडा,

<< असा प्रवास घडताना जोडीदाराची मानसिकता काय होती? विरोध तर नक्की झाला असेल ना ? ड्रायव्हिंगमधला सिंहाचा वाटा त्यांनी तर उचलला नाही ना? >>

तिला वेगाची प्रचंड आवड आहे. ह्याच प्रवासात नव्हे तर इतर वेळी केलेल्या प्रवासात देखील तिने मला वाहन वेगाने चालवायला प्रोत्साहनच दिलंय. आता अजून जास्त ताकदीचे वाहन विकत घ्यायचा हट्ट धरून बसलीये. वाहनाने दिल्लीला जाण्य़ाची तिलाच जास्त उत्सुकता होती त्यामुळे विरोध अजिबात झाला नाही. फक्त दिल्लीला पोचते वेळी अपेक्षेपेक्षा फारच उशीर झाला तेव्हा शेवटी शेवटी अगदी गुरगावच्या पुढे फारच वैतागली होती. त्या वेळी या प्रवासाला तिनेच "क्रेझी जर्नी" असे म्हंटले होते, पण पुन्हा येताना हा क्रेझीपणा करायची तिचीच इच्छा होती. येताना मी तिला आपण २४ जानेवारीलाच परतीचा प्रवास सुरू करूयात असे सूचविले परंतू तिला माहेरी अजून काही काळ व्यतीत करायचा होता त्यामुळे आम्हाला २७ जानेवारीला (कारण २५ व २६ जानेवारीला केजरीवालांच्या संभाव्य आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमा बंद करण्यात येणार असे कळले होते) परतीचा प्रवास करावा लागला. अर्थात २७ ला परतीचा प्रवास सुरू केला तर मग वाटेत कुठे मुक्काम करता येणार नाही कारण २८ जानेवारी धुळ्याला पोचण्याचे मी माझ्या ग्राहकांना वचन दिले होते आणि जे पाळणे अपरिहार्य होते. सबब जाताना व येतानाही हा प्रवास सलग घडला त्यास माझी पत्नीच कारणीभूत आहे.

<<आणखी तुमी तुमची अर्धांगिनी जिने ह्या सारया प्रवासात तोला मोलाची साथ दिली तिचे नांव नाही लिहिलेत ? बाकीच्यांच्या नावाचा उल्लेख केलात>>

इथे सलग प्रवास केल्यामुळे काही आक्रस्ताळ्या प्रतिसादकांनी माझ्या नावे जो शंखनाद केला आहे, त्याऐवजी तिच्या नावाने बोंब ठोकायला सुरुवात केली असती. तिचे नाव इथे दिले नाही ते योग्यच केले असे माझे मत आहे.

मामी,

<< जोवर काही होत नाही तोवर पोकळ धाडस वाटू शकते, पण ईश्वर न करो, काही अपघात झाला तर हेच धाडस एक मूर्खपणा ठरतो.>>

माझा अपघात जानेवारी २००७ मध्येच झाला होता आणि त्या घटनेचा सविस्तर वृत्तांत मी याच संकेतस्थळावर इतरत्र प्रकाशित केला आहे. अनुभवातूनच माणूस शिकतो आणि घडलेल्या चूका टाळून पूर्वीपेक्षा आधिक चांगले सादरीकरण (Better Performance) करू शकतो यावर माझा विश्वास आहे आणि माझ्या कृतीतून तो सिद्ध झाला आहे.

धन्यवाद चेतन, शंका-निराकरणासाठी! आता लक्षात आले की तुमच्या या धाडसामागचा बोलवता “धनी” अर्थात “ड्रायव्हिंग” फोर्स कोणता होता!

<<< …. तिने मला वाहन वेगाने चालवायला प्रोत्साहनच … जास्त ताकदीचे वाहन विकत घ्यायचा हट्ट धरून बसलीये . . . … तिलाच जास्त उत्सुकता होती ……. विरोध अजिबात झाला नाही…… क्रेझीपणा करायची तिचीच इच्छा होती. …….. सबब जाताना व येतानाही हा प्रवास सलग घडला त्यास माझी पत्नीच कारणीभूत आहे……..>>>
एवढेच सांगतो दर वेळा सर्व गोष्टी आपल्याच फेवर मध्ये असतील असे नाही, त्यामुळे आग्रहाला बळी पडताना विचार करा.

<<<…. इथे सलग प्रवास केल्यामुळे काही आक्रस्ताळ्या प्रतिसादकांनी माझ्या नावे जो शंखनाद केला आहे, त्याऐवजी तिच्या नावाने बोंब ठोकायला सुरुवात केली असती. तिचे नाव इथे दिले नाही ते योग्यच केले असे माझे मत आहे… >>>
व्वा, आपल्या शंखनाद होण्याचा आत्मविश्वास चांगलाच आहे!
॥.... बुरा न मानो होली हैं .... ॥ ॥.... बुरा न मानो होली हैं .... ॥ ॥ ..... बुरा न मानो होली हैं ..... ॥

मस्त लेख् आणी मस्त प्रतीसाद (चेसुगुंचे). मजा आली वाचतांना.

अवांतर आहे तरी लिहीतेच.
>>>>>चार गाड्या रस्त्यावर सतत असल्या तरी आजवर इन्शाअल्ला एकही अप्घात नाही. (टचवूड!!! देवाची कृपा) <<<<<
इथे माशाअल्ला/अलह्म्दुलिल्ला हवे आहे. इन्शाल्ला पुढे घडण्यार्या घटनांसाठी वापरले जाते. म्ह्णजे देवाची मर्जी असेल तर ती घटना होईल.

हा लेख वाचून एका अतिशय कटू प्रसंगाची आठवण झाली.

माझ्या मित्राच्या गाडीला झालेला भयंकर अपघात ज्यात त्याचे वयस्कर आई-वडील गंभीर दुखापतीने कायमचे अंथरूणावर आहेत.
ज्या गाडीला चुकवण्यासाठी झाडावर जाऊन गाडी आदळली, ती गाडी रस्त्याच्या चुकीच्या बाजूने आली. चालक त्याचा क्रेझी प्रवास लवकर किंवा त्याच्यामते योग्य कारणासाठी योग्य वेळेवर संपवण्यासाठी समोरचा ट्रॅफिक जॅम चुकवण्यासाठी उलट बाजूला उतरला होता.
चौकशीअंती हे ही कळलं की गाडी भाड्याची वगैरे नव्हती.. चालकाची स्वतःचीच आणि १०-१२ तासांचा सलग, रात्रीसकट प्रवास करून झाला होता. चालक प्यालेला नव्हता.
ह्या लेखात म्हटलेला क्रेझी प्रवास कुणाचं आयुष्यं विधुळवाट करून गेला नाही हे नशीब आहे. म्हणून लेखकाचं अन त्या दिवशी त्यांच्या रस्त्यावर असलेल्या सगळ्यांचं अभिनंदन.

पण... असलाच लेख माझ्या मित्राच्या अपघाताला कारणीभूत झालेल्या अन व्यवस्थित वाचलेल्या "त्या" गाडीच्या लेखकानं लिहिला असता तर...

कृपया लेखकाने... पण असं काही झालं असतं मी थांबलो असतो... आणि लेख लिहिण्याइतका मी ... हा.... वगैरे नाही... इ इ म्हणू नये. तुमच्यासाठी आणि तुम्ही रस्त्यावर असताना रस्त्यावर असलेल्या इतरांसाठी प्रार्थना करणं इतकच हातात आहे माझ्या.
ह्यात किंचीतही उपहास नाही, चेतन. ही कळकळीच्या प्रार्थना आहे. कोणत्याही परिस्थितीत असा वेडा प्रवास पुन्हा तुमच्या हातून घडू नये ह्यासाठी... अन तीही देवाकडे... तुमच्याकडे नाही.

संपूर्ण लेख आणि प्रतिसाद वाचूफन मोदींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ते देखील एकटेच माया, ममता, सोनिया, जयललिता, मुलायम, लालू, बेनी या सर्वांसोबत लढताहेत.

फरक इतकाच की मोदी हा एकांडा शिलेदार आहे आणि इथला लेखक एक फेकांदा शिलेदार आहे. सरळ सरळ फेका मारल्या आहेत. काय तर म्हणे २४ तासात १२०० किलोमिट्र अंतर द्रायविंग केलेय. अरे शक्य तरी आहे का आणि ते सुद्दा मारूति ओम्नी सारखी लिंबूटिंबू गाडी चालवून! केवळ अशक्य रस्त्यातच एन्जिन फेल होईळल.

म्हणजे या मानसाने इतकं अंतर द्रायविंग नक्कीच केलं असणार, त्यामूळेच त्यांने अगदी माय्न्यूट दितेल् दिल्या आहेत. फ्कत त्याने हा प्रवास तीन ट्प्प्यात म्ह\णजे दोन रात्री मुक्काम करून पूर्ण केला असणार.

शिवाय सलग इतका प्रावास केल्याचा लिहीलं तर लोक विष्वास ठेवाणार नाहीत म्हणून नोएण्ट्री तून ड्राअय्विहींग केल्याचा आणि रात्री झोपेत देखील गाडी चालविल्याच्या मसाल्याचा तदका मारला आहे.

त्याला पुन्हा असा स्टंट करू न्कोसाअसा उप्देश करणारे मूर्ख ठरले आहेत.

दुणिया झुक्तीहिऐ जुह्काने वाला चाहेए आणि पागलोकी क्मई न नही है दुनिएमे एक धुंदो हजार मिल जाएंगे ही वाक्ये आठवली

ज्य हो बाअबा फेकचंड की!

@ VD

<< माझे प्रतिसाद संपादकांनी नाही तर स्वतः मीच संपादित केले आहेत>

हे म्हणजे "टीचरनी मला थोबाडीत मारली नाही तर मीच स्वतः स्वतःच्या चूकीबद्दल (टीचरच्याच सांगण्यावरून) दहा उठाबशा काढल्या" असे म्हंटल्यासारखे झाले.

VD, प्रतिसाद स्वतः संपादित केला काय किंवा संपादकांनी; तो अयोग्य असल्याने संपादित करावा लागला यातच सारे काही आले.

चेसुगु- तू दिलेले उदाहरण (टीचर विद्यार्थी वगैरे ) मुळात गैरलागू आहे. उगाच वाद वाढवायचा नाही म्हणून मी ते संपादित केले तू पण मला तसे करण्याविषयी सुचवले होते (वर शोधले तर सापडेल). तुला त्याचा काय अर्थ लावयचा ते लावायला तू मोकळा आहेस.

@ VD,

<< उगाच वाद वाढवायचा नाही म्हणून मी ते संपादित केले तू पण मला तसे करण्याविषयी सुचवले होते >>

वाद तूच वाढवितो आहेस. माझ्या सूचविण्यामूळे तू जर प्रतिसाद संपादित केला असतास तर मला तो त्याच वेळी करायला हवा होता जेव्हा मी सूचविले होते. तुझा प्रतिसाद बर्‍याच उशिराने संपादित झालेला दिसला नेमक्या त्याच कालावधीत इतरही खोडसाळ प्रतिसाद संपादकांकडूनच संपादित झालेले होते.

<< (वर शोधले तर सापडेल). तुला त्याचा काय अर्थ लावयचा ते लावायला तू मोकळा आहेस. >>

शोधायची गरज नाही मला ठाऊक आहे. तू त्यावेळी माझ्याशी वाद घालत खालील विधान केले होते.

<< संपादकांनी माझा प्रतिसाद उडवला तरी हरकत नाही. >>

त्यामूळेच मी त्याचा असा अर्थ लावला.

चेसूगुजी- ओके ठीक आहे. मात्र तो प्रतिसाद मीच संपादित केला होता. आपण म्हणता तसे कदाचित बर्‍याच उशिराने केला असेल मात्र तरीही तो संपादकांनी नाही तर मी स्वतःच संपादित केला होता एवढेच मला सांगायचे होते.बाकी काही नाही.'तू तुझे लिखाण उडव मी माझे उडवतो' असे काहीसे आपण लिहिले होते मात्र मी संपादित केल्यावर आपणही आपले लिखाण उडवा वगैरे बद्दल मी बोललो नाही. मला जे वाटले ते मी केले गैरसमज नसावा.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/destructive-communication-on-soc...

अग्रलेख
जल्पकांचा उच्छाद

वस्तुत: भारतीय परंपरेला वाद नवा नाही. उपनिषद काळापासून आपण वादच घालतो आहोत. फार काय, आपल्याकडे न्याय नावाचे दर्शन आहे आणि वादपद्धत हा त्यातील एक विषय आहे. पण हा वाद कसा, तर त्यातून तत्त्वाचा बोध झाला पाहिजे. कारण वाद याचा अर्थच मुळी एखाद्या विषयातील तत्त्व कळावे या हेतूने सुरू केलेली चर्चा असा आहे. आज व्यवहारात वाद या शब्दाला नकारात्म अर्थ असला, तरी खरी धारणा हीच. त्यामुळे जल्प आणि वितण्ड हे वादप्रकार आपल्याकडे दुय्यम मानले गेले. केवळ शब्दाला शब्द वाढविणे, दांडगाई करून चर्चाच बंद पाडणे आणि मग वादात आपलाच जय झाला म्हणून शेखी मिरवणे म्हणजे वितण्ड. तर जल्प म्हणजे आपण कोणताही पुरावा द्यायचा नाही. दुसरा कोठे चूक करतो यावर बारीक लक्ष ठेवायचे आणि ती चूक सापडली रे सापडली की तिचेच भांडवल करून समोरच्याचा पराभव झाला असे म्हणून पुन्हा दांडगाईने चर्चा बंद पाडायची. आज नेमक्या याच वितण्डक आणि जल्पकांनी समाजमाध्यमांतून उच्छाद मांडला आहे. सुसंवादाची प्रेरणाच जणू संपुष्टात येऊ लागली आहे. हे केवळ भारतातीलच चित्र आहे, अशातला भाग नाही. जगात सर्वत्र समाजमाध्यमांतून हेच दिसते. आणि त्याचे एक कारण समाजमाध्यमांचे स्वरूप आणि व्यवस्था हेही आहे. या माध्यमांनी माणसा-माणसांत भाषणसेतू बांधला हे खरे. पण तो आभासीच. अनेकदा तर मायावी. फेसबुकवरच्या मित्र या कल्पनेसारखे. क्षणापूर्वी ओळख-पाळख नसणारी व्यक्तीही तेथे निमिषात आपली मित्र बनते. या अशा माध्यमांना गप्पांचे कट्टे वगैरे म्हटले जाते. त्यातही तसा अर्थ नाही. कट्टय़ांपेक्षा यांना फलाट म्हणावे. फलाटावर अनोळखी व्यक्तीशीही गप्पा रंगू शकतात. ओळख, किमान समानशील ही कट्टय़ांसाठीची अर्हता असते. एकमेकांचा परिचयही नसणाऱ्या व्यक्तींच्या झुंडी तयार करणे हे या समाजमाध्यमांमुळे शक्य झाले आहे. या झुंडी हव्या तशा पळवता येतात, वळवता येतात. पुन्हा सगळ्याच जमावांचे जे वैशिष्टय़ तेही येथे जपले जाते. ते म्हणजे अनामिकता. आपल्याला पाहणारे, ओळखणारे कोणीही नाही, म्हटल्यावर समाजातल्या सज्जनाचाही वानर होण्यास कितीसा वेळ लागतो? आपल्या घराच्या भिंतीआड अनामिकतेचा वा अनोळखीपणाचा बुरखा ओढून संगणकासमोर बसलो, की मग हव्या तशा वानरचेष्टा करण्यास आपण मोकळे. मनात भावनांची हळवी गळवे ठसठसत असतातच. एरवी चारचौघांत ती बोलून दाखविता येतातच असे नाही. समाजाचे भय असते. मूर्खता, अज्ञान उघड होण्याची भीती असते. पण अनामिकतेच्या अंधारात सगळे काही करता येते. आपल्या विरोधातील विचार दिसला की त्याची खिल्ली उडवा, विरोधी मत दिसले की त्यावर तुटून पडा, प्रसंगी शिव्या घाला, असे हे चाललेले असते. राजकीय नेते ही अशा जल्पकांची नेहमीची 'गिऱ्हाइके'. पण केवळ राजकारणीच नव्हे, तर सगळ्यांनाच याचा कधी ना कधी फटका बसला आहे. अण्णा हजारे यांची दुसऱ्या की तिसऱ्या स्वातंत्र्याची लढाई, नुकतीच झालेली निवडणूक या काळात हे प्रामुख्याने दिसले. मार्क्‍सने भले विरोधविकासवाद सांगितला असेल. पण आज कोणाला विरोध नकोच आहे. याल तर आमच्यासह, नाही तर पायच कापून टाकू, ही समाजमाध्यमी पिढीची भाषा बनलेली आहे. हे सारे चिंताजनक आहे. बहुवैचारिकता हे खरेतर समाजाचे बळ. ते संपवून एकसाची आणि एकसुरी समाज बनविण्याची घाई तर आपणांस लागली नाही ना अशी शंका यावी असे हे वातावरण आहे.

समोरच्याचा मुद्दा मान्य नसला, तरी तो मांडण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. त्याचा हवा तर आपण सभ्यपणे प्रतिवाद करू. मात्र त्याच्या व्यक्त होण्याच्या हक्कांवर कोणी गदा आणत असेल, तर ते सहन करणार नाही. त्याला कडाडून विरोध करू, हा व्हॉल्टेअरी उदारमतवाद जोवर समाजाचा स्थायिभाव होत नाही, तोवर हा जल्पकी उच्छाद कायमच राहणार. भारतीय समाजाला अच्छे दिन दिसावेत याकरिता हे आव्हान सर्वाना पेलावेच लागणार आहे.

तपशीलवार प्रवास वर्णन अतिशय आवडलं! इतके तपशील देता आले ह्याचे नवलच वाटते आहे. 'जे जसे आहे तसे' सांगण्याची शैलीही आवडली.

वाहतुकीचे नियम पाळणे आपल्या व इतरांसाठी आवश्यकच असते. एखादी अनवधानाने घडलेली चूकही बरीच महागात जाऊ शकते. आपण वाहतुकीच्या ठिकाणी अगदी जबाबदारीने केलेले क्षुल्लक बेकायदेशीर कृत्यही काहीही घडवून आणू शकते.

अपघाताचा तुम्हालाही अनुभव आहे, मलाही आहे.

प्रतिसाद देतानाचा संयमही आवडलाच.

चिनूक्स ह्यांनी दिलेला अल्पाक्षरी, महत्वाचा व अजिबात न दुखावणारा प्रतिसाद आवडला.

पु ले शु

Proud

अहो चांगले लेखन आहे ते! मूळ लेखात कोणालातरी खच्चून शिवीगाळ केल्याशिवाय, कोणाचीतरी अक्कल काढल्याशिवाय लेखाला लेख म्हणायचं नाही ही व्याख्या तुमच्या डोक्यात फिट्ट बसलेली आहे. ती जरा बदला की?

धन्यवाद बेफिकीर.

शक्य तितके तपशीलवार प्रवासवर्णन मांडायचा प्रयत्न केला असला तरीही मला तक्ते (टेबल्स) इथे कसे दाखवावेत ते काही जमले नाही. माझ्या ब्लॉगवर मी ते तक्ते मांडले आहेत ज्यामध्ये एकूण प्रवासाचे अंतर, लागलेला वेळ, पथकराची रक्कम, प्रत्येक पथकर नाक्यावर कोणत्या वेळी पोचलो त्याची नोंद, प्रवासात प्रत्येक वेळी भरलेले इंधन व त्यानुसार मोजलेली इंधन कार्यक्षमता इत्यादी बाबींचा तपशील दिला आहे.

इथे मायबोलीवर लेखात तक्ते कसे चढवावेत याचे मार्गदर्शन कुणी करू शकेल काय?

संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक +९१९५५२०७७६१५

इथे मायबोलीवर लेखात तक्ते कसे चढवावेत याचे मार्गदर्शन कुणी करू शकेल काय? <<
तक्ते पिडीएफ केल्यास तुमच्या अकाऊंटला जी 'खाजगी जागा' आहे तिथे अपलोड करा आणि मेसेज टाकताना खाली इमेज किंवा लिंक द्या मधून अपलोड करा.
किंवा तक्ते सरळ इमेज फाइल्स म्हणून सेव्ह करा आणि इमेजेस इथे चढवा.

वरचा जल्पकांबद्दलचा लेख भारीच आहे !!! Happy

मी येथेच आधी दिलेले प्रतिसादातले काही तुकडे पुन्हा देत आहे,
हा धागा वर आलेला दिसल्याने, पुन्हा टंकावेसे वाटले.

>>>
चेतन मान गये भाई ! एवढ्या नम्रपणे आणि पद्धतशीरपणे प्रतिसाद देणारे फार थोडे लोक माबोवर आहेत. (खुद्द मला देखील जमणार नाही).
ड्रायव्हिंग स्किल्स बद्द्ल तर तुला नमस्कारच केला पाहिजे.
वर जरी अनुमोदन म्हणले असते तरी चिनुक्सादी आयड्यांचा मुद्दा देखील अत्यंत महत्वाचा आहे.
मी माझ्या अनुभवात पण लिहिले आहेच. पुरेशी झोप न घेता असली साहसे शक्यतो करू नयेत.

Pages