दुखरी नस...!

Submitted by चेतन.. on 19 February, 2014 - 22:16

संध्याकाळची वेळ... मला ही संध्याकाळची वेळ खूप आवडते... काय होतं देव जाणे पण खूप हळवं वाटतं... म्हणजे दरवेळेस मनात दुःख, वेदनाच असायला हवी असं नाही पण तरीही फार भावनिक व्हायला होतं... ज्या गोष्टींचा आपण संपूर्ण दिवसात कधीच विचार करत नाही त्या गोष्टी आठवू लागतात... काही गोष्टींचे संदर्भ बदलतात..तर काही गोष्टींचे संदर्भ अजून पक्के होतात... संध्याकाळची वेळ ही आत्म्यानं जागं व्ह्यायची वेळ असते. आपलं खरं आस्तित्व काय आहे? आपण नक्की कोण आहोत? आपले नक्की कोण आहेत? आपण नक्की कोणाचे आहोत? ह्या सगळ्या गोष्टींचा त्रयस्थ दृष्टीकोनातून विचार करायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेसारखी दुसरी कुठलीही वेळ नाही... मी तर जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा (शक्यतो शनिवारी आणि रविवारीच ) अश्या संध्याकाळी पुण्याच्या अगदी बाहेर कात्रज घाटाच्या पलीकडे एकटाच जातो. जेंव्हा तुम्हाला तुमच्याशी बोलायचं असतं तेंव्हा एकांतच हवा. गोंगाटात स्वतःशी संवाद नाही साधता येत. मग तो कुठलाही असो.. आणि त्यासाठी आई आणि निसर्गाची कुशी सोडली तर माझ्यासाठी तरी कोणतीच दुसरी जागा नाही... आणि कात्रज घाटातला निसर्ग मला प्रचंड आवडतो.. म्हणजे एका बाजूला प्रचंड गोंगाटातलं शहर आणि एका बाजूला नीरव शांतता.. एकीकडे निसर्गावर अत्याचार आणि दुसरीकडे त्याच निसर्गाचा अगदी विलोभनीय साक्षात्कार… मग हे सगळं अनुभवत असताना मला एफ एम ऐकणं जाम आवडतं.. तसं त्यावर जी काही गाणी लावतात त्यातली बहुतेक माझ्याकडे असतातच पण तरीही कुठलीही कल्पना नसताना कैलाश खेरची "तेरे नाम से जीलू".. ची तान कानावर पडली कि जे आतून खवळून येतं ना.... ते शब्दात नाही सांगता येत..
.....
तर अश्याच एका संध्याकाळी एफ एम ऐकत कात्रज घाटात स्प्लेंडर स्टँडला लावली आणि त्याला टेकून उभा राहणार एवढ्यात तिचा फोन..
"काय करतोयेस??"
"काहीच नाही.. "
"तरी"
"काहीच नाही गं"
"असं कसं शक्यंय?"
"काय??"
"काहीतरी करत असशील... "
"घाटात आलोय.."
"काही विशेष?"
"काहीच नाही.."
"मग असाच गेलायेस तिकडे?"
"हम्म"
"कोणासोबत??"
"एकटाच आहे ..."
"मला तरी सांगायचं... "
"आली असतीस???"
"........ "
".... बर्याचदा मी एकटाच येतो इकडे.. "
"तरी... ?"
"काही नाही गं छान तंद्री लागते इथे.. "
"ठेऊ मग फोन.. ?"
"स्वतःलाच भेटल्यासारखं वाटतं.."
"ठेऊ का मग फोन??"
"मी स्वतःलाच भेटल्यासारखं वाटतं म्हणालो.. "
"ठीके... ठेऊ का मग फोन..?. थोड्या वेळानं करेन.. "
"अगं बाई... मी पुन्हा सांगतोय कि इथे.. मला.. स्वतःलाच.. भेटल्यासारखं... वाटतं म्हणालो… "
"अच्छा... म्हणजे तुला……" शी इज लाजिंग..
"हो गं... "
".................. "
"तुला भेटल्यासारखं वाटतं... "
"…………"
"असं तर पाहिजे तेंव्हा नाही भेटता येत.. जेंव्हा खूप वाटतं तुला भेटावं तेंव्हा मी इथे येतो…"
"............ "
"मग तुझ्याशी जे काही बोलायचं असतं ते बोलायला इथे संध्याकाळ असते. तुला एक माहितीये?? तुझ्यामध्ये आणि संध्याकाळमध्ये खूप साम्य आहे. तुम्हा दोघींशीही मी सगळं बोलू शकतो... तुम्ही दोघीही येताना पाउस आणता पण जाताना काही तो घेऊन जात नाहीत.... तुम्ही दोघीही खूप कडकडून भेटता. पण समाधान ??? शुन्य... तुम्हा दोघींना पण भेटायला अजिबात लांब जावं लागत नाही… तुम्हा दोघींनाही खूप हळवी झालर आहे.. दोघींनाही भेटायच्या आधी खूप जीवघेणं उन लागतं ….आणि भेटल्यानंतर भयानक काळ्या रात्रीला सुरुवात होते... पण ....…हॅलो..….
"……..."
"ठेवतो मी... "
"…… बो…… बोल... " काय करणार तिकडे पाउस पडायला लगेच सुरुवात होते..
"ठेवतो मी..... "
".......... बोल ….! "
"नाही... नको... "
"एक तर हे असं खूप दिवसांनी बोलतोयेस.. "
"आय नो... तुला परत त्रास होतो ह्याचा.. "
"नाही रे.. "
"मग आवाज असा का झालाय??"
"आता थंडावा मिळाला कि वातावरण बदलतंच कि ... "
"…"
"... तुझा पण... अर्धवट राहिलाय... "
"तो तसाही अर्धवटच राहणारे... "
"म्हणजे???"
"तो पूर्ण कधीच होऊ शकणारा नाहीये... "
"बोलशील??"
"थंडावा मिळतोय ना.. पोळवून घ्यायचे डोहाळे कशाला??"
"काय राहिलंय अजून??"
"ऐक मग…. संध्याकाळ... कधीच... वाट... पहायला लावत नाही.."
"बास्स... "
"आणि"
"आता बास्स "
"आणि.......... तुझी वाट... पाहून... काहीच... उपयोग नाहीये..."
"बास्स म्हणाले ना.. "
"और तभीभी ये कम्बख्त दिल... "
"........... "
"............."
"आता त्याला मी काय करू रे?…"
"मी फरक सांगितला............. तक्रार नाही करत "
"……..... "
"ज्या गोष्टी करून फायदा नाही, त्या गोष्टी करायचा विचार करणंही मूर्खपणा आहे.. "
"तरीही वाट बघतोयेस माझी?.. "
"मी वाट नाहीये बघत.. "
"मग??"
.
.
.
.
"माझ्या वाटेचा अंदाज घेतोय..."
फोनच्या दोन्हीकडेही जीवघेणं मौन पसरलं..
एक तुळस आपल्याला खूप आवडावी.. आपल्या अंगणात ती तुळस खूप शोभून दिसेल म्हणून आपण तिच्याकडे बघावं.. आणि तेंव्हाच तिनं दुसर्याचं अंगण सजवावं… असंच काहीसं झालं आमच्याबाबतीत.. काळाला विचारलेल्या बर्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत.. मुळात काळाला काही प्रश्न विचारूच नयेत.. कारण काळानं दिलेली काही उत्तरं आपल्याला पटतीलच असं नाही.. मग अश्यावेळेस काय करावं?…. असा प्रश्नही विचारू नये.. कारण ह्यालाही उत्तर नाही..
बराच वेळ आमचं मौनंच बोलत होतं.. तिकडून कुणीतरी तिला हाक मारली... तिनंही काहीही नं बोलता फोन ठेवला. . आणि फोन कट होताच एफ एम वर गाणं लागलं होतं…
"जाने वो कैसे… लोग थे जिनके.. प्यार को प्यार मिला.. "
.
"हम ने तो बस्स कलीया मांगी... काटोंका हार मिला.."
.
.
"सगळा कात्रज घाट पुन्हा एकदा धूसर झाला.. "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेतन मित्रा !!!!!!

सही.......काही दिवसांपुर्वी गेलोय ह्या प्रसंगातुन.....;-)
छान लिहिले आहेस.

पु. ले. शु.

मस्तच, खरतर आयुष्याच्या मध्यावरही ह्या सर्वातून जातात माणस ...... सन्दर्भ बदललेले असतात

मस्त...
स्वतः शी बोलताना स्वतःचे बोल एकु येतात तसच काहिस झाल वाचुन...म्हणजे आपल्याला जे हवय तेच आपण आपल्याकडुन वदवुन घेतो.. काहिही न बोलता...