आपण कोण आहोत या विषयावर इतका विचार करायची वेळ अन्यावर आजतागायत आलेली नव्हती. आई भूक लागली की झुरळे शोधून खायची. बाप दारू पिण्यापुरता जागा असायचा. आपण कोणी झोपडीबाहेर फेकलेले अन्न खाऊन किंवा अन्न चोरून जगायचो. रानोमाळ भटकायचो. स्वच्छतेचा गंधही नव्हता. कोणीही यावे आणि कान पिळावा किंवा चार दणके देऊन थाटात निघून जावे अशी आपली अवस्था होती. दुबेच्या कोंबडीवर आपली वाईट नजर पडली आणि दुबेने आपल्याला सडकावून काढले. मग आपण पळ काढला. मग तालुक्याला गेलो. चिटभर किरकोळ चमत्कार दाखवून जनतेला नादी लावले. बघता बघता इतके मोठे झालो की आता आपल्यालाच हे खरे वाटत नाही आहे.
पहाटे पाचला उठावे. प्रातर्विधी उरकून दणकून व्यायाम करावा. थंड पाण्याची तीन घंगाळी अंगावर रिकामी करावीत. उत्तम साबण लावावा. लांबसडक वाढलेले केस नरसूने पुसून द्यावेत. आपण सोवळे नेसून घडाघडा काही स्तोत्रे म्हणावीत. तिन्मुर्ती दत्ताची पूजा करावी. मग गाईचे दूध, केळी आणि दोन जाडजूड भाकरी अशी मजबूत न्याहारी करावी. हे झाले की कर्तव्य संपले. मग दिवसातून दोन वेळा तीही खांद्यावरून आंघोळ केली की नमस्कार करवून घ्यायला आपण दिवसभर मोकळे.
लाहिरीने आपल्यात घडवून आणलेले बदल, लाहिरी कितीही नालायक निघाला असला तरीही, अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहेत हे अन्याला समजलेले होते. आज शरीरात जी अमाप ताकद होती, शरीर जसे लोखंडाच्या कांबीप्रमाणे कणखर आणि तुकतुकीत झालेले होते, डोळ्यात जसे तेज आलेले होते, उच्चारात जसा खणखणीतपणा होता, भाषा जशी शुद्ध झालेली होती आणि एकोणिसाव्या वर्षीच जसे पंचविशीचे दिसता येत होते तसे सगळे लाहिरीशिवाय होणे अशक्यच होते.
सामान्य माणूस प्रथम व्यक्तिमत्वाला आणि पाठोपाठ वलयाला व सर्वात शेवटी चमत्काराला भुलतो. अन्याचे व्यक्तिमत्व भलतेच प्रभावी आणि तेजस्वी झालेले होते. वलय तर अनोखेच होते. गावातले यच्चयावत लोक न चुकता एकदातरी दर्शनाला येऊन जातच होते. पंचक्रोशीत नांव झाल्यामुळे इतर गावांमधील भाविकही आता नियमीतपणे येऊ लागले होते. माया जमत होती. दोन गुप्त तिजोर्या रोख रकमेने भरलेल्या होत्या. रोज मिळणारे नारळ नरसू बाजारात प्रसादाचे नारळ म्हणून विकून पुन्हा मायाच आणून ठेवत होता. नरसूही ह्या वयात चांगला गबदूल दिसू लागला होता. शकुंतला जांभळे, जी तालुक्यापासून आश्रमात असायची, तिलाही आता महत्व मिळालेले होते. काही भाविक तिचेही दर्शन घेऊन जात असत. पोलिस खाते किंचितसे वचकून होते. मशालकराचे कुटुंबीय दिवसाला हजेरी लावून जात होते. मोठमोठ्या असामी अधूनमधून येतच होत्या.
रात्री आठ वाजता दर्शनाला बंदी झाल्यानंतर आता पुन्हा राजरोसपणे मांसाहार सुरू झालेला होता. अपेयपानाची सोय व्यवस्थित झालेली होती. नरसू अधिकाधिक विश्वासू बनत चालला होता. इतकेच नाही तर गावाची नजर चुकवून मध्यरात्री बोलवल्यावर रतनही निवासावर येऊन जात होती.
एक सुकन्या सोडली तर दुनिया पायाशी लोळण घेत होती. पण अन्या?
अन्या सुखावत नव्हता. त्याच्यात काहीतरी बदल होत होते. ते त्याला शब्दबद्ध करता आले नसते, पण जाणवत मात्र होते. सलग पाच वर्षे सुविचार ऐकणे आणि ऐकवणे, प्रकृतीची उत्तम निगा राखणे, मिळणारी श्रद्धा आणि भक्ती, आदर, शब्दाला आलेले महत्व, पूजनीय बनणे ह्या सगळ्याचा एक नवीनच परिणाम अन्यावर होऊ लागला होता. हळूहळू त्याला चांगले वागण्याचे महत्व समजू लागले होते. उगाच कोणालातरी चकीत करून भक्त करवून घेण्यापेक्षा चांगला मार्ग दाखवून आणि स्वतः सत्कार्य करून आदरास पात्र ठरणे हे त्याला अधिक आवडू लागले होते. त्यामुळेच तो आता स्वच्छना अभियान, संस्कार वर्ग, रोगराईचे उच्चाटन, शिक्षणाचा प्रसार, घरगुती हिंसेवर निर्बंध असे उपक्रम अधिकाधिक राबवू लागला होता. गावकर्यांच्या मनात महाराजांबाबतचा आदर त्यामुळे द्विगुणितच झाला होता. रोज सकाळी उठून एक मोठा समुदाय चक्क निवासाबाहेर जमून रोज सकाळी जाहीर होणार्या उपक्रमाच्या घोषणेची प्रतीक्षा करू लागला होता. ह्या समुदायात बायका, पुरुष, लहान, थोर, तरुण, प्रौढ असे सगळे असत. महाराज सकाळी नऊ वाजता आदेश देत असत. आज गावातील कचरा वाहून बाहेर नेऊन टाका. आज लहान मुलांना केळी व खोबरे द्या. आज तरुणांना तालमीत व्यायाम करायला सांगा. आज व्यसनमुक्तीवर भाषण द्या.
शंभरवेळा खोटे सांगितले की ते खरे वाटू लागते तसा अन्या सगळ्यांना महाराज वाटू लागला होता. पण शंभरवेळा चांगले ऐकले की दुर्जनाचा सज्जन व्हावा तसा अन्या खरंच सज्जन बनण्यास उत्सुक होऊ लागला होता. नुसतेच सगळ्यांना फसवून स्वतःची तुंबडी भरण्यापेक्षा खरोखरच काही चांगले करून आदरास पात्र व्हावे हा विचार जोर धरू लागला होता.
काय होते ह्याचे कारण? पोट भरल्यावर, समाधानी झाल्यावर, क्लेषांपासून मुक्त झाल्यावर माणूस उदात्त विचार करू शकतो, करण्यास प्रवृत्त होतो. अन्याला खासगी आयुष्यात जे पाहिजे ते सर्वकाही विनासायास मिळत होते. इतके मिळत होते की ते अधेमधे नाही मिळाले तरी चुकल्याचुकल्यासारखे वाटत नव्हते. मग मनात अपराधी भावना येत होती की हे आपल्याला जे मिळते आहे ते केवळ आपल्याला ह्या समाजाने अंधश्रद्धेतून दिलेल्या एका विशिष्ट स्थानामुळे मिळते आहे. हे स्थान डळमळीत असून उद्या लयालाही जाऊ शकेल. मग हे स्थान जर बळकट करायचे असेल तर समाजाच्याही अपेक्षा पूर्ण करायला हव्यात. उद्या कोणी सवाल केला तर उत्तरे द्यायला, कार्य दाखवायला काहीतरी केलेले असायला हवे. उगाच गावकरी पूजतात असे कोणाच्या मनात येऊ नये. गावकरी आपल्याला दत्ताचा अवतार म्हणून पूजत आहेत,. महत्व दत्ताचे आहे, आपले नव्हे. आपले महत्व अबाधित राहण्यासाठी समाज ज्या गोष्टींना चांगल्या गोष्टी समजतो त्या आपण करत राहायला हव्यात. लाहिरींनी काय सांगितले होते? शंभर चांगल्या गोष्टी करून देवपदाला पोचलेल्या माणसाची एक जरी वाईट गोष्ट समाजाला आढळली तरी त्याच्या प्रतिमेचा चक्काचूर होऊन त्याला सामान्य माणसापेक्षाही हीन स्थान प्राप्त होते. आपण तर सगळी हीनच कृत्ये करत आलो. तो मनावरचा, चारित्र्यावरचा आणि कर्तृत्वावरचा 'सध्या फक्त आपल्यालाच दिसू शकणारा' डाग पुसण्यासाठी अधिकाधिक चांगली कार्ये करत राहायला हवीत. दिसतेच आहे की आपले हे जोमात चाललेले समाजकार्य पाहून सुकन्याही चकीत झालेली आहे. बोट ठेवावे असे काहीही नाही आता आपल्यात! फक्त आपल्या भानगडी तेवढ्या लपून राहायला हव्यात.
काय असते दारूत? मटणात काय असते आणि बाईत काय असते? कोणतीही दारू प्या, ती चढते तेव्हा जे व्हायचे तेच होते. कश्याचेही मटण खा, जिभेला तीच झणझण मिळते. कोणतीही बाई......
...... कोणतीही बाई?
कोणती बाई? आपण कुठे रतनशिवाय कोणावर कधी प्रेम केले? कोणी आपल्या मनातही भरले नाही कधी! कोणाला पाहून ती भावनाही आपल्या मनाला शिवली नाही. आपल्याला तशी इच्छा झाली की ती आपण रतनकडेच व्यक्त करायचो. शक्य असेल तेव्हा ती इच्छा पुरवून घ्यायचो. शक्य नसेल तेव्हा 'इच्छा पूर्ण झाली असती तर' ह्या स्वप्नातच झोपी जायचो.
...... आणि रतन? रतनचा एक नवरा होता. त्याला सोडून ती आपल्याकडे आली. माहीत नाही तावडे पाटलाकडे कधी गेली असली तर! कोणास माहिती मशालकराबरोबरही निजली असेल तर! असे का मनात येते आपल्या? कारण आपला कायापालट करणारा महान गुरू लाहिरी हरामखोर माणूस निघाला. नुसते त्यानेच रतनला वश केले नाही तर रतनही बिनदिक्कत, आपल्याला विसरून, आपल्या नाकावर टिच्चून, आपल्यामुळे मिळालेल्या स्थानाचा गैरवापर करून त्या लाहिरीचा बिछाना गरम करू लागली. आणि आपण? मशालकराला घाबरून रतनला तिकडे दूर राहू देत होतो. लाहिरी तिच्या बापाचा वयाचा आहे असे बघून त्याने तिला शिकवावयास जाण्यात कसलाही संशय घेत नव्हतो. स्त्री म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय हे जिच्यामुळे आपण शिकलो तिला आपण आपले सर्व काही मानून बसलो. त्या स्त्रीने आपल्यामुळे तिलाही आलेल्या वलयाचा फायदा घेतला. आता आपण बोलावू तेव्हा इथे येते आणि मेल्यासारखी पडून राहते. आपण करू ते अत्याचार सहन करून पहाटेच्या अंधारात नरसूच्या बैलगाडीतून स्वतःच्या खोलीवर जाऊन पडते. आपल्या नजरकैदेत राहते. हे रतनला आवडत असेल का? ते आधीचे तुटून पडणे कुठे गेले? एक दिवस सोबत झाली नाही तर हुरहुरणे कुठे गेले? तिच्या मनात जर नाहीच आहे आपल्याकडे यावेसे वाटणे, तर आपण करत आहोत ती नुसती जबरदस्तीच नव्हे, तर तो एक घातक प्रकारही आहे. ही रतनसारखी बाई उद्या स्वतःची अब्रूही वेशीला टांगेल पण आपल्याला जगासमोर नागडा करायला मागेपुढे पाहणार नाही. बंदोबस्त! बंदोबस्त करायला हवा तिचा! किंवा तिला गुप्तच करायला हवी. आणि मुख्य म्हणजे......
...... रतनसारख्यांमुळे बदनाम झालेल्या नव्हे तर मुळातच छचोर असलेल्या स्त्रीजमातीवर सूड उगवायला हवा. ह्या स्त्रियांना त्यांची लायकी दाखवूनच द्यायला हवी.
एवढे एक सोडले, तर बाकी मात्र गावाचे भले करायचे.
अन्या उघड्या अंगाने बसून विचार करत असतानाच मागून नरसूने कोमट पाण्याचे एक घंगाळे हळूहळू अन्याच्या डोक्यावर रिकामे केले आणि अन्याची पाठ साबणाने चोळू लागला. प्रथमच, अगदी प्रथमच अन्याच्या मनात विचार आला. हे आपल्या स्नानाचे काम ह्या म्हातार्या नरसूने का म्हणून करावे? का एखाद्या भक्त स्त्रीने करू नये?
त्यादिवशी सकाळी नऊ वाजता आजवर कोणी न ऐकलेली अद्भुत घोषणा करण्यात आली.
उद्यापासून सलग नऊ दिवस वीर गावातील स्त्री भक्तांना महाराजांना स्नान घालण्यासाठी वेळ देण्यात येत आहे. ह्या कृपेचा लाभ उठवावा व स्वतःचे कल्याण करून घ्यावे.
==============
तावडे पाटला समोर बघून अन्याच्या मनात संतापाचे स्फोट होत होते. पण पाटील भलताच लीनपणे बोलत होता. इतका काकुळतीला का आला होता ते अन्याला समजत नव्हते. येताना बरोबर मोठा लवाजमा घेऊन आलेला तावडे पाटील अन्याला भेटायला मात्र निवासाच्या आत एकटाच आलेला होता. त्याचे नोकर चाकर, आणलेल्या भेटी इत्यादी सर्व काही बाहेर अंगणातच होते. नरसू आणि शकुंतला त्या भेटीदाखल आणलेल्या वस्तूंची योग्य ती खबरदारी घेत होते.
आत आल्याआल्या तावडे पाटलाने अन्यासमोरची माती मस्तकी चोपडून एक साष्टांग दंडवत घातले. अन्याचा चेहरा इतका तेजस्वी कसा काय झाला ह्याचे नवल व्यक्त न करता पाटील मान खाली घालून नम्रपणे बसला. अनेक मिनिटे तशीच गेल्यानंतर अन्यानेच विचारले.
"वीर गाव जैसे पिछडे गाँवमे इस कमनसीबसे मिलने क्युं आये हो पाटील?"
पाटलाने स्वतःच्याच हलकेच थोबाडात हाणून घेतल्या आणि पुन्हा लोटांगण घातले व म्हणाला......
"मोठाल्ले गैरसमज झालेल्यात म्हाराज! त्यो इग्या आन् त्यो पवार लई बाराचे व्हते! तवाच तर पळाले. पर जाताना आमच्या तोंडालाबी काळं फासून गेल्याती. आमच्यात हिम्मत कुटून यायची तुमच्यासामनं यन्याची? पर आज कारनच तसं घडल्यालंय, तवा धीर क्येला आन् आलू"
"क्या कारण है?"
"म्हाराज, पैलं आपला ह्यो डावा हात आमच्या मस्तकावं धरा आन् यकबार माप केल्याचं म्हना, यवढी किरपा करा म्हाराज!"
"हम माफभी नही करते और सजाभी नही देते, वो सब दत्तमहाराज करते है"
पाटील पुढच्या भागात असलेल्या दत्तासमोर लोटांगण घालून पुन्हा लगबगीने आत आला.
"बोलिये पाटीलसाहब, हुकूम कीजिये"
"म्हाराज, लाजवू नगा, यकबार झाली आसंन चूक! अवो आमी अडानी!"
"आगे बोलो"
"म्हाराज...... तुमी तर सर्व्यग्यानी"
"काम बोलो पाटील, अभी पूजा का वखत होरहा है"
"म्हाराज, ईर गावात बिबट पालन केंद्र आणायलायत"
"तर?"
"न्हाई! आता बिबट पालन केंद्र यनार म्हन्जे काय साधं काम न्है! पारच्या पार कायापालट करावा लाग्नार हितला. पार कुटच्याकुटं विकास व्हनार! गावोगावचीच काय, शहरात्ली मान्सं यनार बिबटं बघायला तवा! गणं उलाढाली व्हनार! हितल्यांचं डोळं आन उखळबी पांढरं व्हनार! कोनाची घरं जानार, कोनाचं श्यात जानार, कोनाचा रोजगार जानार! वर पुन्ना शासन म्हन्नार की हितं ह्यं करा आन् त्यं करा! बसथांबा वाढवा, रस्तं बनवा, शौचालयं बनवा, आता ह्ये सगलं...... म्हन्जे... ह्ये सगलं बघायला...... आपलं.... आपलं मशालकर कुटं हायत?"
पाटलाचा प्रश्न ऐकून अन्याची नजर शून्यात गेली. मुद्यात तथ्य होतं! सुकन्या अजुनही पोरगेलीशीच होती. एवढा विकास होत असताना येऊ शकणार्या अडचणींचा नि:पात करण्यासाठी लागणारी वजनदार असामी गावात नव्हतीच. अन्या स्वतः सुकन्यापेक्षाही एक दोन वर्षांनी लहानच होता. ही गोष्ट वेगळी की अन्याच्या शब्दाला महत्व होतं. पण शासन दरबारी अन्याची नोंद काहीही नव्हती. निव्वळ नागरिकांसाठी आदराचे स्थान अशी कोणतीही पोस्ट गव्हर्नमेंटमध्ये नव्हती ना राजकारणात होती. हे स्थान वापरून अन्या सुरू झालेल्या प्रयत्नांना झळाळी देण्याचे किंवा खीळ घालण्याचे काम लीलया करू शकला असता, पण मुळात प्रयत्न सुरू व्हावेतच किंवा होऊच नयेत असे काही करणे त्याच्या आवाक्यातच नव्हते.
समोर पंचपक्वान्नांनी भरलेले ताट दिसत होते, ते खाण्याचा अधिकारही होता, पण ते दिसणे व न दिसणे ह्यावर अन्याचे काहीही नियंत्रण असू शकत नव्हते. तावडे पाटलाला शासन दरबारी कधीकाळची काही ना काही मान्यता तरी होती.
"कहना क्या चाहते हो पाटील?"
अन्याच्या स्वरामध्ये आलेला विचारीपणा पाटलाला त्यातही सुखावून गेला. खडा बरोबर जागी बसल्याचे पाटलाला जाणवले होते.
"म्हाराज, साधी गोष्ट हाये. अवो ईर गाव बिबट पालन केंद्राचं केंद्रस्थान झालं तर होऊ घातल्याला विकास म्हना, शासकीय कामं म्हना, ईर गावातल्यांना हवी तशी पार पाडली जाया म्हत्वाचं मानूस कोन हाय गावात तुमच्याबिगर? उद्या चारजनांची श्यातं जातील आन् ते रस्त्यावं यतील. त्यांचं यक आंदोलन! दहाजनांची घरं जातील त्यांचं दुसरंच! न्हाई त्यांच्या हाती पैका यील त्ये तिसरंच! गणं भाईरची न्हाई न्हाई ती मान्स यून दुकानं थाटत्याल आन् हित्तंच दादागिरी करत्याल त्ये आनि निराळंच! आवो झ्येपायला तं हवा ना इकास? म्हन्जी हापचड्डीतल्या प्वाराला धोतार निसवायचं आन् म्हनायचं आता घाल लंगडी! आँ? यडझव्यागत हित मारामार्या हू लागतीन् म्हाराज? कोन कधी कोनाच्या जीवावं का उठंल सांगता यायचं न्हाई! आन् त्यात पुन्ना तुमच्या बाजूनं आसल्यालांचा यक गट आन् इरुद्ध आसल्यांलाच दुसरा गट! तुमचं स्थान नगं धोक्यात याया म्हाराज!"
पाटलाने पुन्हा दंडवत घातला. लहान वयाचा अननुभवी अन्या गप्पांना भुलत होता. त्याला वीर गावच्या विकासाच्या नावाखाली होऊ शकणारा गावाचा आणि स्वत:च्या प्रतिमेचा विनाश स्वच्छ दिसत होता.
पाटील बराच वेळ बोलत होता. पाटलाचा मुद्दा एकच होता. अरण्य वीर गावालगत असले तरी वीर ते कोर्हे ह्या तालुक्याच्या गावातील अंतर फक्त बारा किलोमीटर आणि तेही एका टेकडीचंच आहे. तालुक्याला मुळातच तालुक्याचे स्थान आहे शासनदरबारी! तालुक्यात स्वतः तावडे पाटील गावाचा प्रमुख आहे. तिकडे बिबट पालन केंद्र झालं तर फक्त वीरलगतच्या जंगलातून बिबटे पकडून तिकडे न्यावे लागतील इतकेच, पण एकदा बिबटे तिकडे पोचले की ती सुरक्षित राहिले असते आणि गावात कोणताही तंटाही झाला नसता. तसेच, वीरपेक्षा प्रगतीची पहिली संधी तालुक्याला मिळण्यातही गैर काही नव्हतंच! हे अन्याच्या गळी फुकटातंच उतरत होतं. म्हणजे हे अन्याला पटावं म्हणून वाक्चातुर्यावाचून काही इतर करण्याची तावडे पाटलाला खरे तर गरजही नव्हती. पण मासा पक्का गळाला लागावा म्हणून त्याने सरतेशेवटी हुकुमाचे पान अन्याच्या समोर टाकलेच!
"आन त्ये सग्लं र्हाऊदे म्हाराज! मुख्य म्हन्जे तालुक्याला त्या क्येंद्रापायी जो काय नफा व्हईल त्यातले आठ लाख आपन ह्या निवासाला द्येनगी द्येतूय ना वरतून? मंग काय इषय र्हाइला??"
अन्याचे डोळे चमकलेले तावडे पाटलाच्या अनुभवी नजरेने क्षणात हेरले. अन्याही मूर्खच! आढेवेढे घ्यायच्या ऐवजी म्हणाला......
"बारा करो पाटील, बारा करोगे तब हम बात करेंगे प्रशासनसे"
चौथा दंडवत आणि बारा लाखांची हमी देऊन मिश्यांना पीळ घालत हासत हासत तावडे पाटील तालुक्याला निघाला आणि आठच दिवसांनी सकाळी सकाळी तणतणत सुकन्या निवासात आली.
"आप यहाँ?"
अन्याने चमकून विचारले.
"किती रुपयांपायी तालुक्याला हाललं म्हनायचं बिबट पालन क्येंद्र?"
कितीतरी क्षण अन्या सुकन्याकडे रोखून पाहात होता. आत्ता घाबरण्यात अर्थच नव्हता त्याच्यामते! त्याने हुषारी करून सांगून टाकले.
"छे लाख, तुम्हारेको कितना होना?"
आता सुकन्या रोखून पाहू लागली. बर्याच वेळाने म्हणाली......
"तीन लाख"
"होजायेगा"
मंद हासत दोघे एकमेकांकडे पाहू लागले. दोघेही मूर्ख होते, तावडे पाटील एकटाच हुषार होता. सुकन्या निघून गेली आणि अन्या स्वतःच्या हुषारीवर खूष झाला. सुकन्याही 'त्यातली' आहे हे कळल्यावर त्याला आता आभाळच ठेंगणे झालेले होते.
चार दिवसांनी एका पहाटे एका पेटीतून काही रक्कम निवासावर आली.
चारच लाख होते ते!
पहिला हप्ता!
अन्याच्या आयुष्यात नवीन पर्व सुरू झाले होते. आधी कोंबडी की आधी अंडे ह्या प्रश्नाच्या ऑर्बिटमधून अन्या एकदाचा बाहेर पडलेला होता. आधी स्थान की आधी पैसा, हा प्रश्न आता उरलेला नव्हता. आता स्थानामुळे पैसा आणि पैश्यामुळे स्थान ही चेन सुरू झालेली होती.
आजवर नशिबाने अन्याला अलगद उचललेलेच होते. चारपैकी एक लाख रुपये अन्याने मशालकरच्या वाड्यावर धाडले होते. आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून, मशालकरच्या वाड्यावरून एक सुंदर गुलाबाचे फूल निवासावर आले होते.
====================
स्नान घालणार्या सहा पोरींपैकी त्या एका मुलीचे तारुण्य अन्याच्या नजरेला पहिल्या दिवसापासूनच खुपत होते. भक्तीभावाने स्नान घालणार्या त्या मुलींपैकी ही एकच मुलगी अशी होती जी बिनदिक्कतपणे अन्याच्या सर्वांगावरून हात फिरवून साबण चोळत असे. चार दिवस उलटून गेल्यावर इतर मुलींमुळे अन्याला समजले की ती मुलगी मुकी होती. या सर्व सहाही मुलींना रोज भरघोस अन्न आणि काही पैसे प्रसाद म्हणून मिळत असत. कोणाचे लग्न व्हायचे होते तर कोणाला नवर्याने टाकलेले होते. कोणाला मूल होत नव्हते तर कोणी निव्वळ भक्ती किंवा घरच्यांनी आणलेला दबाव म्हणून येथे आलेली होती. एकुणात रतनची अनुपस्थिती आता जाणवतही नव्हती. हा स्नानाचा प्रकार नऊ दिवसांनी थांबवण्याचे काहीही कारण आता अन्याला आठवत नव्हते. त्यामुळे नरसूनेही त्या मुलींच्या घरोघरी जाऊन हा स्नानविधी असाच चालू ठेवण्याची आज्ञा पोचवलेली होती. त्या मुलींच्या घरचे उलट सुखावलेलेच होते. सर्व सहाजणींच्या घोळक्यात आपल्या लेकीसुनेशी कोणी वाईट वागूही शकणार नाही, बर्यापैकी पैसेही मिळवता येतील आणि पुन्हा गावात महत्व मिळेल ते वेगळेच!
पण अन्याने आता सहाजणींचे सहा वार ठरवले आणि कोणाला नाही म्हणता येईना! सातव्या दिवशी पुन्हा त्याच मुक्या मुलीला आणखी एकदा स्नानविधीची जबाबदारी घ्यायला सांगण्यात आले. तिने अबोलपणे ते मान्य केले कारण अमान्य करणे म्हणजे गावाचा रोष ओढवून घेणे होते.
अन्या आपले जाळे हळूहळू फेकणार होता. रतनचे निवासावर येणे त्याने हळूहळू कमी करत आणले. आता गावासमोर प्रश्न असा पडला की रतनदेवीला काही स्वतंत्र महत्व आहे की नाहीच? सगळी माया तर निवासावर जमा होत होती. सुकन्याताई मशालकरही निवासावर रोज यायच्या पण बागेतल्या घरी म्हणजे रतन राहायची तिथे फिरकायच्याही नाहीत. थोडक्यात, निवास हे आता केंद्रस्थान झाले आहे हे गावकर्यांच्या लक्षात येऊ लागले. तसे मग रतनच्या घरासमोर नावाला डोके टेकवून जो तो निवासाकडे धावू लागला.
दरम्यानच्या काळात लाहिरींनि शिकवल्यानुसार अन्याने आपल्या सत्कार्याची वर्तमानपत्रांना दखल घ्यायला लावली. नाही म्हंटले तरी कोना एकाच्या शब्दावर अख्खा गाव काही भले कार्य करत आहे हे राजकीय नेत्यांना विचारात घ्यावेच लागले. ते गाव लवकरच आदर्श गाव ठरेल यात कोणालही शंका उरलेली नव्हती. इतर गावे वीर गावाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागली. प्रकार असा झाला की इतर गावांनीही आपले स्फुर्तीस्थान अवलिया बाबाच असल्याचे दाखवल्यामुळे अन्या, जो आजवर दोन चार गावांपुरता कोणी महाराज होता, तो आता अचानक सातारा जिल्ह्याला ज्ञात झाला. येऊ घातलेल्या बिबट पालन केंद्रामुळे तालुक्याला काय होईल अशी गर्दी आता वीर गावात सुरू झाली. ह्या गर्दीत भाविक, नास्तिक, अडीअडचणी असणारे, पत्रकार, बुरखा फाडू पाहणारे, धंदा करू पाहणारे असे सगळेच आले. नवनवी दुकाने थाटली गेली. नवससायासांना ऊत आला. लहान मुलांना महाराजांच्या पायावर घालण्याची चढाओढ सुरू झाली. गावाचा रंगच बदलू लागला. एरवी हिरवेगार म्हणून प्रसिद्ध असलेले आणि जलाशयाने मढलेले वीर गाव आता लाकुडतोड अनुभवू लागले. जेथे बैलगाडी आणि एखाददोन जीपशिवाय वाहन दिसायचे नाही तिथे ट्रॅक्टर्स, लोडर्स, मोटरसायकली आणि मोटारगाड्या वेळीअवेळी दिसू लागल्या. हपापल्याप्रमाणे आता वीरचा प्रत्येक गावकरी आपली तुंबडी कशी भरून घेता येईल ह्याचा विचार करू लागला. रस्त्यात भांडणे मारामार्या होऊ लागल्या. शाळा न शिकताही अमाप पैसे मिळवणे शक्य आहे हे टारगटांना समजू लागले. व्यसनाला महत्व प्राप्त होऊ लागले पण छुपेपणाने! स्वच्छता अभियान नावापुरते राहून सर्वत्र कचरा साठू लागला. भेटदात्यांची रीघ लागली आणि पुढारी लोक आपला ठसा उमटवायला तेथे उगवू लागले. वीर गावचा ओला मसाला, मच्छी आणि हिरव्या पालेभाज्या वगैरे 'स्पेशालिटीज' गाजू लागल्या.
कोणाच्याही डोळ्यावर येईल असा हा विकास होता. म्हणायला विकास, खरे तर गाव विद्रूप होऊ लागले होते. अफवांचे पीक येत होते. गेल्या आठवड्यात महाराजांनी नुसती काठी उगारून अस्थिरोग घालवला, मागच्या महिन्यांत महाराजांनी नुसता हात फिरवून एक मरणासन्न रोगी बरा केला. काय वाट्टेल ते! जो तो स्वतःच्या मनातील कहाण्या रंगवून रंगवून सांगत मोठा भक्त ठरू लागला.
मित्र वाढले की शत्रू वाढतात!
मात्र हे सूत्र लाहिरींनी अन्याला शिकवलेले नव्हते. त्या आधीच लाहिरींच्या पार्श्वभागावर लत्ताप्रहार करून अन्याने त्यांना हाकलून दिलेले होते. ह्या सगळ्या गदारोळात रतनदेवीला गेलेले महत्व काही प्रमाणात तरी परत मिळाले. तिचेही उत्पन्न सुधारले. पण आता रतनदेवी आणि अवलिया बाबा ह्यांची भेट क्वचितच होत असे, जवळजवळ होतच नसे. दोन स्वतंत्र पॉवर सेंटर्स असल्यासारखे भासू लागले. अवलिया बाबांच्या पुढे रतनदेवी किरकोळ आहे हे कोणीही उघडपणे बोलू लागले. पण रतनदेवी जणू नजरकैदेत होती. ती पळून जाऊ शकतच नव्हती असे नाही, पण तिला माहीत होते की पळून ती जिथे जाईल तिथे इतकेही महत्व तिला मिळणार नाही. त्यामुळे संधीची वाट पाहण्यासाठी ती तिथेच अपमानित जिणे व्यतीत करू लागली.
आणि एक दिवस दुपारी तो विचित्र प्रकार घडला.
ध्यानीमनी नसताना एक पांढरी जीप निवासासमोर थांबली आणि पाच आडदांड पुरुष आत आले. त्यांनी अन्याला नमस्कार वगैरे न करता सरळ त्याच्यासमोर बैठक ठोकली आणि त्यातील म्होरक्या मोठ्या जरबयुक्त आवाजात म्हणाला......
"चला महाराज! तुमचे अवतार कार्य संपले! आता बाकीचे समाजकार्य गजाआड करा"
पोलिस!
कोणीअरी दिलेली खबर घेऊन म्हणा किंवा पाळत ठेवून म्हणा, अचानक ती धाड पडलेली होती. ते लोक कोण आहेत, का आले आहेत हे समजण्यातच अन्याची पंधरा मिनिटे गेली. एवढे करून ते जेव्हा अन्याला घेतल्याशिवाय निघायचे नांवच घेईनात तेव्हा अन्याने प्रस्ताव ठेवला.
"हां ठीक है हमारे आश्रमको लोग संपत्ती दान करते है! लेकिन हम वो संपत्ती लोगोंकेलियेही काममे लाते है! आप लोग बताओ, आपकी कोई चिंता?"
तीन तास! मेंदुचा भुगा करणारे, क्षणाक्षणाला बाजी पलटवणारे आणि भीतीने ठासून भरलेले तीन तास संपले तेव्हा सात चेहरे उजळलेले होते. अन्या, नरसू आणि ते पाच पोलिस! बर्याच मोठ्या रकमेचा सौदा, थोडक्यात सेटलमेंट मान्य झालेली होती. रोख रक्कम घेऊन पोलिसांची जीप निघाली तेव्हा घामाघुम झालेल्या अन्याने कसलाही विचार न करता एक बिडी पेटवली आणि म्हातार्या नरसूच्या पेकाटात लाथ घातली. तसली अजिबात अपेक्षा नसलेला नरसू भेलकांडत जखमी होत पुन्हा अन्याचेच पाय धरून रडू लागला तेव्हा अन्याने त्याला विचारले......
"मादरच्योत...... कोणी खबर दिल्याली हाये त्यान्ला??????"
"न्हाय बा ठाव म्हाराज! आमी तर साधी गरीब मान्सं"
"गरीब होय रं तू? भाड्या रोजच्यारोज दारवा आन् मासळी आन्तूस आमच्यासाठी, तुझ्यावाचून कोन आसनार रं?"
नरसूने स्वतःच्या फाड फाड थोबाडात मारून घेत सांगितले की त्याच्या बापालाही असा विचार करणे शक्य झाले नसते. मात्र बर्याच वेळाने नरसूने रडत रडत एक वाक्य ऐकवले......
"आजकाल द्येवी लय नाराज र्हातात म्हाराज!"
शॉकच लागला अन्याला! नरसू म्हणत होता त्यात तथ्य होते. रतननेच ही टीप दिलेली असणार ह्यात शंका नव्हती.
शून्यात पाहिल्यासारखे पाहात खर्जातल्या आवाजात अन्या जे वाक्य बोलला ते ऐकून नरसूची दातखीळच बसली
"यत्या हप्त्यात द्येवी समाधी घ्येनारायत म्हून झाईर कर"
मशालकरचा खून रतनला पचलेला होता, पण रतनचा खून अन्याला पचला असता का? प्रश्नच होता हा एक!
गुलाबाचे लाल फूल पाठवणारी सुकन्या पुन्हा पाठीशी उभी राहिली असती तर...... नक्कीच पचला असता म्हणा!
=======================
अन्याची वखवख आता शिगेला पोचली होती. आज पहाटे ती मुकी आली की तिला अंधारातच धरायची हे त्याने ठरवून ठेवलेले होते. नरसूलाही सांगून ठेवले होते की दारावर गस्त दे! नाही तो भलताच प्रकार व्हायला नको. हादरलेल्या नरसूने गुमान दारावर पहारा ठेवलेला होता.
पहाटे साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान ती मुकी निवासात आली. ठरलेल्या नेमाप्रमाणे तिने कोमट पाणी अन्याच्या अंगावर ओतून साबण लावायला सुरुवात केली. तिचा हात जसजसा अन्याच्या उघड्या अंगावरून फिरू लागला तसे तिचे मुकेपण बोलके होऊ लागले आहे असे अन्याला वाटू लागले. अंधारातच त्याने तिच्याकडे रोखून बघितले. तिची त्याच्या नजरेला नजर भिडवण्याची हिम्मत झाली नाही. पण त्याच्या नजरेतील धग ओळखून ती लागलीच मागे झाली. पातळ सावरून ती अलगद पुढच्या खोलीत आली. दारावर असलेल्या नरसूला ती हाताने दूर सारून पळणार तोच तिच्या तोंडावर एका मजबूत हाताची पकड पडली आणि दुसरा मजबूत हात तिच्या पोटावर आवळला गेला.
घाबरलेल्या मनस्थितीतच तिला जाणवले की अन्याने तिला उचललेले आहे. अन्या तिला घेऊन पुन्हा आतल्या खोलीत गेला आणि तिला जमीनीवर आडवे करून म्हणाला......
"हम तेरा उपचारका पैसा देंगे, तू बोल सकेगी, तेरा और भी कल्याण करायेंगे, समझी?"
अन्याच्या अजस्त्र ताकदीपुढे हवालदिल झालेली ती मुलगी तोंडातून निरर्थक आवाज काढत असहाय्यपणे बघू लागली. बघता बघता अन्या तिच्या अंगावर व्यापू लागला आणि त्याने आपले तोंड तिच्या तोंडाजवळ आणले.
पण काय झाले कोणास ठाऊक! अन्याच्या पाठीवर, मधोमध, काहीतरी फिरले. काहीतरी भयंकर धारदार! इतके तीव्रपणे, की अन्याच ओरडत उठला. तत्क्षणी ती मुलगी उठली आणि निवासातून सुसाट वेगाने पळून गेली.
असह्य वेदनांनी तळमळत पाठीवर हात दाबून अन्या धावत दारापाशी आला तेव्हा......
...... एडिमाट्टी मणी दिसेनाशी झालेली होती.
================
-'बेफिकीर'!
मी पहिली!
मी पहिली!
अन्याचा पर्दाफाश होणार तर
अन्याचा पर्दाफाश होणार तर आता..
मस्तच..
मस्तच..
भारीच...
भारीच...
अरे व्वा लगेच नविन भाग. हाही
अरे व्वा लगेच नविन भाग.
हाही भाग मस्त.
मुकी एडिमाट्टी मणी होती होय. आता पुढील भागाची आतुरतेने प्रतिक्षा
सुस्स्स्स्स्साट !!!!!! लय
सुस्स्स्स्स्साट !!!!!!
लय भारी
lagech pudhacha bhag..
lagech pudhacha bhag.. Dhanyavad..:)
मस्त्...मजा आली ..
मस्त्...मजा आली ..:)
भले शाब्बास...! फिर भी अन्या
भले शाब्बास...!
फिर भी अन्या मेरा हीरो है! (जेम्स बॉन्ड टाईप असला तरी काय झालं)
मस्त कथा जाम आवड्ली अन्या नी
मस्त कथा जाम आवड्ली
अन्या नी अस नको करायला पाहिजे होत
एकीकडे सुधारतोय अस वाट्तय कि लगेच व्हिलन झाल की हे कारट:\
Muki mani hoti tar tichi
Muki mani hoti tar tichi helper yugandhara kuthe aahe?
Ha bhag pan mastach zala aahe. Pudhacha bhag lavkar taka.
मस्त... पुढचा भाग लगेच टाकलात
मस्त... पुढचा भाग लगेच टाकलात की बेफिकीर सॉलीड उत्सुकता वाढत चालल्ये. काय होणार आता अन्याचं?
मस्त मस्त
मस्त मस्त मस्त.................. लै भारी............ पुढचा भाग लगेच टाकल्यामुळे धन्यवाद बैफिजी
काय होणार आता अन्याचं????
काय होणार आता अन्याचं????
लै भारी!!!
लै भारी!!!
सारखे सारखे ट्विस्ट पचत
सारखे सारखे ट्विस्ट पचत नाहीत, बीपी वाढतेय, सगळी कथा एकदम वाचावी म्हणतेय, तेवढा तग धरेल का मला?
का कुणास ठावूक पण हाफ राईस
का कुणास ठावूक पण हाफ राईस दाल मारके वाला - "दिपक अण्णू वठारे" आठवला... कदाचित वाठारे गावा वरुनच..
अपेक्शेप्रमाणे जबरद्स्त
अपेक्शेप्रमाणे जबरद्स्त कलाटणी
पुढे काय होईल काहीच सांगता येत नाही आहे..
बेफीकिरजीच्या सुपीक डोक्यातुन काय बाहेर पडेल काय माहीती?
एक नक्की वाचकांचा मेंदु काम करतोय.. बीपी वाढतेय
pudhachya bhagachya
pudhachya bhagachya pratikshet ..
pudhacha bhag kadhi yetoy ..
pudhacha bhag kadhi yetoy ..
????????????????next.........
????????????????next..........
बेफिजी, पुढचा भाग कधी?????
बेफिजी, पुढचा भाग कधी????? खुप वाट पाहतोय.....
लवकर.................
लवकर.................:(
पुढचा भाग
पुढचा भाग ????????????????????????????
अतिशय सुन्दर कथा.
अतिशय सुन्दर कथा.
pudhacha bhag kadhi yetoy
pudhacha bhag kadhi yetoy ..??