लांबच लांब पसरलेली पोपडे धरलेली जमीन आणि भक्क ऊन. अंगाची लाही लाही करणारं. पिवळ्यापासून नारंगी-तांबड्या-लालभडक रंगांच्या असतील नसतील तेवढ्या छटा प्रदर्शन मांडून बसल्यागतच. एखादं माणूस, झाड किंवा सावलीचा तर प्रश्नच नाही. जिवंतपणाचं कुठचंही चिन्ह नाही. ते ओसाड माळरान होतं, की वाळवंट, की एखादं बेट की काहीतरी तसंच. पण या अशा वैराण जागेत त्याला स्वतःचं अस्तित्व एकदम भगभगीत आणि एखाद्या दुखर्या जागेसारखं किंवा जखमेसारखं सटसट करत कळवळायला लावणारं आणि एकदम क्षुद्र-क्षुल्लक वाटल्यागत. या सार्यात आपण का आहोत- असा विचार करत असतानाच जवळच ती पडकी खोली अचानक उगवल्यागत दिसल्यासारखी. खोलीत तर्हेतर्हेचे रसायनांचे दर्प भरून राहिलेले आणि बाहेरच ते उजाड ऊन आतमध्ये आणखीच चटके दिल्यागत जाणवणारं. खोलीतही सावली नाही, म्हणाजे कमालच आहे, आणि शिवाय ते बाहेर दिसणारे जमिनीचे पोपडे तर इथे थरचे थर रचून ठेवल्यागत. त्यामुळे ती खोली आणखीच कोरडी, भयाण, भणंग झाल्यासारखी. रिकामी खोली असूनही आपल्याला त्यात जागा नाही म्हणजे ही आणखीच मोठी कमाल..
***
नेहेमीचंच स्वप्न रीतसर पाहून झाल्यावर तो रीतसर जागा झाला. मग तेच ते स्वप्न पाहून जाग आल्यावर तसंच गादीवर उठून बसणं. अस्वस्थ होऊन सर्वांगाला आलेला घाम तसाच टॉवेलने खसाखसा पुसणं. तसंच उठून जन्माची तहान लागल्यागत दोन तीन ग्लास घटाघटा पाणी पिणं. आणि मग झोप न आल्याने विचार करत बसणं.
स्वप्नांची भिती त्याला वाटतेच. पण त्यांपासून सुटका नाही. आज काय सिनेमा दिसणार ही चिंता अंथरूणावर पडल्यापासूनच सुरू. हा फुकटचा सिनेमा रोजचाच. छान गोड स्वप्नही पडायचीच अधुनमधून. पण जाग आल्यावर त्याला कळायचंच, की नाईलाज म्हणून आपण ते तेव्हा एन्जॉय केलं.. दोरीने बांधून घातल्यावर नाईलाज झाल्यागत.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाग आल्यावर स्वप्नावस्थेतल्या त्या निष्क्रियतेची चीड यायची. स्वप्नात असूनही नसल्यासारखे. स्वप्नाचे नायक असूनही त्रयस्थ असल्यागत ते बघत राहणं म्हणजे तीच ती खपली रोजच्यारोज काढली गेल्यागत वाटायचं. बाहेर यायची वाट बघणार्या लाव्हारसासारखी अस्वस्थता तटतटून भरून राहणं, वाहणं, अन ती शरीरात-मनात दिवसभर घेऊन फिरणं- हे काही खरं नाही, असं तो स्वतःला सतत बजावे. मात्र या अभद्र अस्वस्थतेचं नक्की काय करावं हे त्याला अजून उमगलं नव्हतं.
विशेषतः त्या पिवळ्या-तांबड्या-लाल उन्हाचं, रसायनांचे उग्र दर्प असलेल्या कुरूप रिकाम्या भितीदायक खोलीचं स्वप्न तर नेहमीचंच. दुसरं काही नसलं, तरी थोडाफार फरक पाडून हा सिनेमा आहेच. टॉकीजमध्ये लावायला दुसरा सिनेमा नसला, की दोन-चार दिवस भरून काढण्यासाठी जुनी एखादी प्रिंट काढून 'लोकाग्रहास्तव' लावावी तसंच हे..!
डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत त्याने जोरजोरात मान हलवली. गळून जाऊन नाईलाज झाल्याप्रमाणे तो उठला. उठताना सवयीप्रमाणे पलीकडच्या कॉटवर बघितलं, तर डोईजोडे नेहमीसारखाच ध्यानधारणा करत होता. हा रात्रीबेरात्री केव्हाही उठून मेडिटेशन करी. मंत्रारत्या म्हणे. मध्येच आंघोळ करे. हे सारं कधी खोलीमध्येच, तर कधी खोलीला लागूनच असलेल्या भल्यामोठ्या टेरेसवर करे. त्या टेरेसवर खालच्या मजल्यावर राहत असलेल्या घरमालकांचा कुत्रा बांधलेला असायचा. हे कुत्रं कितीही नाठाळ असलं, तरी डोईजोडेला घाबरे. त्याच्याशेजारी हा मेडिटेशन करत बसला, की किर्तन ऐकायला बसल्यागत त्याच्या पुढ्यात बसून ल्हा-ल्हा करी. कुत्रा हा प्राणी त्याला कधी आवडला नाही. रस्त्यावरच्या कुत्र्यांवर तर तिरस्कार करण्याचे, बदला घेण्याचे उपलब्ध असलेले सगळे मार्ग तो वापरत असे. पण आता या खोलीत राहायला आल्यापासून पुन्हा आहेच कुत्रं नशीबात.
बाहेर तो कुत्रा भुंकल्यामुळे डोईजोडेची तंत्री भंगली आणि त्याने डोळे उघडले. असहाय्यपणे तो डोईजोडेच्या पुरीसारख्या गोल फुगलेल्या मतिमंद दिसणार्या चेहर्याकडे आणि आरपार बघणार्या आणि निर्जीव भासणार्या मोठ्या डोळ्यांकडे दोन क्षण बघत राहिला, आणि मग डोळे मिटून मान खालीच घातली. मग मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं तर आठ वाजले होते. आता तासाभराने ऑफिस सुरू होणार म्हणजे आता उठून आवरायलाच हवं होतं. नोकरीच्या रोजच्या या शुक्लकाष्ठाचा विचार आल्या आल्या अचानक सार्याचा भयानक कंटाळा आल्यागत त्याला वाटलं, आणि पायातलं बळ गेल्यागत त्याने पुन्हा पलंगावर बसकन मारली.
***
रिसेप्शनला सीमेला बघून त्याला जरा मरगळ कमी झाल्यागत, बरं वाटलं. एक महिन्यात त्याला पहिल्यांदाच जरा उत्साह वाटला. ऑफिसला आज दांडी न मारल्याचं त्याला जरा समाधान वाटलं. एक महिना रजा घेऊन काय करत होती ही? विचारलं पाहिजे जरा बोलणं काढून. पण तिच्याशी कसं बोलावं ते कळत नाही. मनात आलं तर अगदीच गोड गोड बोलेल, नाहीतर त्या गावचीच नसल्यागत, झुरळ झटकल्यासारखं बोलेल, आणि धड बघणारही नाही. पण काहीही असलं, तरी तिला ऑफिसच्या पॅसेजेसमधून ये-जा करताना रिसेप्शनला बघून त्याला बरं वाटायचं. तिथल्या सोफ्यावर लंच ब्रेकमध्ये पेपर वाचण्याच्या बहाण्याने तिला न्याहाळता येई. त्याचं ते न्याहाळणं पकडल्यागत कधीतरी ती फिस्सकन हसे, पण तेवढंच. आज तिच्या कपड्यांची झुळझूळ आणि पर्फ्युमचा वास एकदम मादक वाटला, आणि तिथं दोन क्षण रेंगाळून तो तरंगल्यागत त्याच्या जागेवर आला. चहा घेताना तो तिला आठवत समोरच्या सॉफ्टबोर्डकडे बघत राहिला. त्याला हा आयताकृती सॉफ्टबोर्ड सिनेम्याच्या पडद्यासारखा वाटायचा. लंच टाईममध्ये सहज त्याच्याकडे बघत तंद्री लावून बसल्यावर कधीकधी डुलकीही लागे. ही सॉफ्टबोर्डची जागा म्हणजे स्वतःच्या बसायच्या खुर्चीपेक्षाही जास्त 'आपली' आहे, असं त्याला नेहमी वाटे. आताही समोर सिनेमा सुरू झाला आहे, आणि सीमा रेशमी साडी नेसून स्लो मोशमध्ये पळते आहे, आणि आपण तिच्यामागे- असं त्याला वाटून गेलं. सुख सहन न होत असल्याने डोळे मिटले, की ते आधीच मिटले होते, ते त्याला सांगता आलं नसतं.
'..साहेबांनी बोलावलंय आत!' असं रवीने जवळजवळ ओरडूनच सांगितल्यावर त्याने टक्क जाग आल्याप्रमाणे डोळे उघडले, आणि गडबडीने जायला निघाला.
***
साहेबाच्या भयंकर थंडगार केबिनीतून तो बाहेर आला तेव्हा उत्तर ध्रुवावरून एकदम विषुववृत्तावर आल्यागत वाटलं. इतका वेळ आपण आत जिवंतच होतो की काय अशी एक शंकाही त्याच्या मनाला चाटून गेली.
जो 'आत' जाऊन आला, त्याच्याभोवती चारेक जणांनी तरी जमलंच पाहिजे अशा शिरस्त्याप्रमाणे रवी, कदम, कमल आणि पटवर्धन सभेला आल्यागत जमून आले आणि एकाग्रतेने त्याच्याकडे पाहत राहिले. झालंच तर पाठकही शेजारच्या क्युबिकलमध्ये होता. त्याला असलं जमून बिमून यायची गरज भासत नसावी. त्याचे कान आणि अदृष्य डोळे इकडे लावलेले असावेतच. तो शरीराने इथं असला तरी शंभरेक फूट पलीकडे असलेल्या डेटा सेंटरमध्येही मनाने असू शकतो याची खात्री एव्हाना सार्यांना झाली होती. इतकंच काय, पण देहाने त्याच्या सहा बाय सहा फुटांच्या क्युबिकलमध्ये फाईलीत डोकं खूपसून बसलेला पाठक्या मनानेच काय, पण डोक्यानेही कधीकधी नव्वद किलोमीटर दूर असलेल्या कंपनीच्या फॅक्टरीतही असतो असं कमल एकदा त्याला म्हणाला होता. हा जागतिक दर्जाचा विचित्र आणि हलकट माणूस आहे, याची इतक्या महिन्यात एव्हाना त्याला खात्री पटली होती.
तो काही बोलेना, तसा पाठक बसल्या जागेवरून बारीक डोळे करून त्याला जोखू लागला. मुंबईला जाऊन काही असोसिएट्सना भेटायला सांगितलं आहे असं त्याने सांगितलं, आणि त्यावर, 'सांभाळा रे.. नसती कामं उकरून काढली जात आहेत..' असं कुणा एकाला उद्देशून न म्हणता वर तोंड करून पाठक मोघमपणे म्हणाला तेव्हा त्याला चीड आली. समोरच्या सॉफ्टबोर्डाकडे बघत त्याने ती कशीबशी जिरवली.
मग कमल आणि पटवर्धनची कुजबूज सुरू झाली.
मग डेटा एंट्री ऑपरेटर वाघमोडे जवळ येऊन निर्बुद्धपणे प्रश्न विचारू लागला.
मग तेवढ्यात बाहेर रिसेप्शनवरच्या सीमेचा कुणाशी तरी बोलत असतानाचा आवाज आला.
मग फायनान्स मॅनेजर वर्मा मुर्खासारखा कँटीनच्या कुपनांवरून कुणाला तरी पॅसेजमध्येच जाब विचारू लागला.
त्याचवेळी समोरच्या विंगेत रवी आणि कदम कशावरून तरी हुज्जत घालू लागले.
पाठक पुन्हा ओठातल्या ओठांत हसू लागला.
मग त्याने समोर बसल्याबसल्या एक आयत तयार केला. या सार्यांना त्यात रांगेत उभं केलं. प्रत्येकाच्या चेहर्याभोवती वर्तुळं काढली. आणि त्या वर्तुळांचा विचार करत गढून गेला.
***
मुंबईची ट्रेन त्याने कशीबशी पकडली. हे नेहमीचंच. परीक्षेच्या वेळेपासून ते लग्ना-बारशा-मुंजीच्या मुहुर्तपर्यंत तो कधी वेळेवर पोचला असं झालं नाही. प्रत्येक वेळी धापा टाकणं हे ठरलेलं. आताही त्याने आधी ब्रीफकेस आत फेकली, आणि मग जीवाच्या आकांताने प्लॅटफॉर्म सोडत असलेल्या गाडीला पकडलं. एकाने त्याचा हात घट्ट पकडला नसता, तर जवळजवळ तो पडलाच होता. धापा टाकत आत तो कसाबसा स्थिरावणर, तेवढ्यात अजबच घडलं. ताटातली बर्फी चाकूने कापल्यागत ट्रेनचे दोन भाग झाले. बॅग पलीकडे, हा अलीकडे. तो घाबरला, हवालदिल झाला. गाडीचा वेग वाढत होता, तसं दोन्ही तुकड्यांतलं अंतर वाढत होतं. त्याने दोन्ही तुकड्यांच्या मधून बाहेर बघितलं, तर भडक पिवळं ऊन आणि क्षितिजापर्यंत, नजर जाईल तिथवर लाखो मैलभरून पसरलेली पोपडे धरलेली दुष्काळी वांझ जमीन आणि तीच ती नतद्रष्ट खोली. निरनिराळ्या रसायनांचे उग्र दर्प आल्यावर त्याने नाक दाबलं. दम कोंडल्यावर मात्र त्याला कळलं, आतातरी खच्चून ओरडायलाच हवं. पण ओरडणार कसं..? जबरदस्तीने कुणीतरी दाबून धरल्याप्रमाणे स्वतःचेच हात नाकातोंडावर. दुसरं म्हणजे साला तो डोईजोडे खोलीत किंवा कुठे बाहेर टेरेसवर मेडिटेशन करत असेल तर?
***
मुंबईहून तो आला, आणि मग त्या दोन दिवसांचा भलामोठा रिपोर्ट तयार करण्यात गढून गेला. दिवसभर त्याचं ते काम चालू होतं- कुणाहीकडे लक्ष न देता, मन लावून. टिपणं काढून वाघमोडेला टायपिंगला देणं, जुन्या फायली आणि कागदांतून, रिपोर्ट्समधून संदर्भ शोधणं, स्प्रेडशीट्स तयार करणं, प्रिंट्स घेणं, सँपल्सची बैजवार मांडणी आणि पॅकिंग करणं- वगैरे. रवी, कमल, पटवर्धन, कदम, पाटेबाई, सीमा, अमृत, यादव, काया- इत्यादी अनेक लोक आलटून पालटून त्याचं काय चाललं आहे, ते बघून जात होते. कमल आणि पटवर्धन नेहमीप्रमाणे कुजबुजत होते. त्याने लिहिलेल्या प्रत्येक शब्दा-वाक्यांतून विश्वनिर्मितीचा अर्थ आणि गुपित उलगडण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे पाठक किनर्या आवाजात कॉमेंट्स करत होता, तिरकं बघत ओठांच्या कोपर्यांतून हसत होता- वगैरे.
हे सारं रीतसर पार पडून गेलं, तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले होते. घड्याळ बघत पार दमून, गळून गेल्यागत तो पुतळा होऊन खुर्चीवर निपचित बसून राहिला.
***
दुसर्या दिवशी तो साहेबाच्या केबिनमध्ये रिपोर्ट दाखवायला निघाला, तर कुठेच सापडेना. सार्या ड्रॉवर्समध्ये नाही, कपाटांत नाही. ट्रे मध्ये नाही, फायलींत नाही. डेटा सेंटर आणि इतर क्युबिकल्सही धुंडाळून झाल्यावर मग तो हादरलाच. हे सारं नव्याने तयार करण्याचा विचार केल्या केल्या त्याच्या अंगावर काटा आला. शिवाय ती सँपल्स, लेटर्स- ते सारं कुठून नव्याने आणणार? अगदीच केविलवाणं आणि असहाय्य वाटलं त्याला. बाजूच्या पार्टिशनच्या पलीकडे त्याने सहज बघितलं, तर पाठक हलकट दर्जाचं स्मित करत होता, शिवाय पलीकडे कमलही काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या डोक्यात अक्षरशः बाँबस्फोट झाला आणि सर्व शक्ती एकवटून तो 'हाऽड..!' ओरडला. मग स्वतःच्याच आवाजाने जागा झाला, तेव्हा टेरेसवरून भल्या पहाटे तोच तो नेहमीचा भलामोठा काळाकभिन्न कुत्रा जीवाच्या आकांताने भुंकत होता.
नीट जाग आल्यावर त्याला कळलं- आपल्याला सडकून ताप भरला आहे. आज ऑफिसात जाणं तर दूरच, पण बेडवरून खाली उतरणंही मुश्किल.
***
त्या दिवशी डोईजोडे पण काहीतरी कामासाठी सुटी घेऊन घरीच बसला. खूप वेळ घेऊन त्याने घोटून दाढी केली. त्यानंतर तसाच खूप वेळ खर्च करून आंघोळ. मग कपडे घालताना म्हणाला, 'माझा चेहरा तेजस्वी झालाय की नाही? मेडिटेशनचे इफेक्ट्स दिसायला लागलेत बहुतेक.'
डोईजोडे त्याच्यापेक्षा पाचसात वर्षांनी तरी मोठा असावा. त्याचं लग्न होऊन घटस्फोट झाला होता. बायकोशी जमत नाही म्हणून. का जमत नव्हतं- त्याची आजवर त्याने शंभर तरी वेगवेगळी कारणं ऐकली होती. हसून डोईजोडेला उत्तर देत म्हणाला, ' हो तर. चांगलाच तजेलदार आणि आणखी तरूण दिसतो आहे तुमचा चेहरा. काय बेत आहे आज?'
'एका स्थळाला बघायला जायचंय.' डोईजोडे उत्साहाने म्हणाला, 'म्हणजे आधी बघितली आहे. आज पुन्हा भेटणार आहे. मस्त आहे अगदी. गोल चेहरा आणि अंगापिंडाने मजबूत. हिच्या तुलनेत आमचं आधीचं ध्यान म्हणजे ध्यानच होतं बघा. तिला जवळ ओढलं, तर लाकूड चुलीत घालायला ओढावं, तसं वाटायचं. हीऽ एवढीशी दुष्काळातल्या कोथिंबीरीच्या जुडीएवढी मान. शिवाय बुटकी. आता जवळ ओढताना काय त्यातल्या त्यात बरं धरावं म्हणून मान धरायची झालं! तुम्हाला सांगतो..'
त्यापुढचं त्याला ऐकवलं नाही. डोईजोडेचा चेहरा बघून आणि वर्णन ऐकून त्याला किळसच आली, आणि त्याने न राहवून डोक्यावरून पांघरूण ओढून घेतलं, तरी डोईजोडे बडबडतच होता.
डोईजोडे लख्ख तयारी करून अखंड बडबडत बाहेर पडला. बहुधा बाहेर पडल्यावरही स्वतःशी बोलत असावा. त्याला उगाचच पाठकची आठवण आली. आणि मग ऑफिसची. साहेबाला फोन करून आज येणार नसल्याचं कळवणं राहून गेलं होतं, ते त्याने धडपडत उठून एकदाचं करून टाकलं. उपचार म्हणून साहेब 'टेक केअर' म्हणाले. तो पुन्हा तेवढ्याशा श्रमाने गळून गेल्यागत झोपून राहिला.
***
संध्याकाळी डोईजोडेने पाहिलेल्या स्थळाबद्दल पुन्हा अखंड बडबड सुरू केली. मग बडबडून तोही दमला असावा. जेवण करून पुन्हा श्लोक आणि ध्यानधारणा सुरू केलं. सकाळपासून घेतलेल्या औषधांचा परिणाम असेल, डोईजोडे बडबडत असतानाच केव्हातरी त्याला झोप लागली.
मध्येच त्याला जाग आली तेव्हा अनेक लोकांचे एकत्र आवाज येत होते. झालं असं होतं, की टेरेसवर मध्यरात्रीनंतर दोन वाजता डोईजोडे अंगावरचे सारे कपडे काढून इकडेतिकडे फिरत होता. बहुधा त्याचं ते मेडिटेशन झाल्यानंतर तशा चकरा मारत असावा. समोर असलेल्या बंगल्यांच्या ओळीतून कुणीतरी ते बघून चोरभामटा असल्याच्या संशयाने पोलिसांना फोन केला. मग पोलिसव्हॅन आली. खाली राहत असलेल्या घरमालकाला घेऊन वर टेरेसवर पोलिस आले, तरी हा बहाद्दर तसाच तंद्रीत चकरा मारतोय, तेही एवढ्या थंडीत अंगावर एकही कपडा न ठेवता. पोलिस त्याला वाजवणारच होते, पण मग घरमालकाने समजूत घातली आणि कसंबसं त्यांना वाटेस लावलं.
पोलिस गेल्यावर मालकाने डोईजोडेला प्रचंड खडसावलं, तर तो आपला खाली मान घालून गुमान ऐकतोय. डोक्यावर हात मारून घेऊन घरमालक जायला वळला. जाता जाता त्याने त्याच्याच कुत्र्याच्या पेकाटात लाथा घातल्या. तेही केविलवाणं केकाटू लागल्यावर मग आणखीच नाईलाज झाल्यागत निघून गेला.
डोईजोडे अजूनही तशा थंडीत अंधारात बेमालूमपणे मिसळून गेलेल्या कुत्र्याकडे मायाळूपणे बघत बसून होता. आणि डोकं बंद झाल्यागत तो डोईजोडेकडे पाहत होता.
***
सकाळी ऑफिसला जायला निघताना त्याला वाटलं, ही जागा आपण सोडली पाहिजे. तो डोईजोडे घरमालकाचा कुणीतरी लांबचा नातेवाईक आहे, त्यामुळे त्याला बाहेर काढणं शक्य नाही. तिसर्या मजल्यावर खोली, भरपूर पाणी, सर्वबाजूंकडून ओणवं होऊन इमारतीवर झाडांनी धरलेली सावली, खाली भरपूर मोकळी जागा, समोर शंकराचं छोटं देऊळ, मोक्याच्या ठिकाणी असूनही शांत परिसर, खोलीसमोर खोलीच्या पाचसातपट आकाराची मोठी मोकळी गच्ची.. हे सारं बघून त्याने ही जागा पसंत केली होती. पण आता हे सारं त्याला दिवसेंदिवस रोगट आणि कसल्यातरी अभद्र छायेतलं वाटू लागलं होतं.
ऑफिसला आल्यावर त्याने परवा तयार केलेला रिपोर्ट घेतला आणि फोन करून 'आत येऊ का' म्हणून विचारलं. 'लगेच या' असं उत्तर मिळाल्यावर त्याला उत्साह आला. आतल्या दहा-बारा डिग्री तापमानात न कुडकुडता त्याने घडाघडा सारं सांगून टाकलं. रिपोर्ट पुढे केला. साहेबांची खुशी चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. 'वेल डन, माय बॉय' असंही त्यांनी कौतुकाने म्हटलं. रिपोर्टची पानं उलटवत शेवटच्या पानावर ते आले, तेव्हा त्याला स्पष्ट दिसलं- 'प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपेअर्ड बाय..' याखाली त्याच्या नावासोबत कमल आणि पाठकचीही नावं!
ही नावं कशी आली, ते ठाऊक नसल्याचं त्याने स्पष्ट सांगून टाकलं. साहेबांनाही कल्पना असावीच. त्यांनी हसून तो रिपोर्ट त्याला परत दिला, आणि म्हणाले, 'आय नो, ते सारं तुच केलं आहेस. डोंट वरी. अँड कीप इट अप. आपल्याला यावर अजून खूप काम करायचं आहे, मी सांगेनच तुला. तोवर याची एक कॉपी मला दे.'
बाहेर येऊन त्याने मोठ्या आवाजात पाठक आणि टायपिस्ट बाघमोडेला धारेवर धरलं. आधीच्या कस्टमर सपोर्ट अँड कंप्लेंट्सच्या सार्या रिपोर्ट्सवर आपली तिघांची नावं होती, म्हणून यातही घातली, असं निर्लज्ज उत्तर पाठकने दिलं, तेव्हा आणखीच भडकला. शेवटी शक्तीपाताने, आजारी असल्याने आणि रगाने आपल्याला नीट बोलता येत नाही आहे, हे त्याला कळलं, तेव्हा तो शांत झाला. वाघमोडेने मान खाली घालत त्याला शेवटचं पान बदलून दिलं, तेव्हा मागच्या सेक्शनमधल्या एक्स्पोर्टच्या पटवर्धनच्या क्युबिकलमध्ये कमल पटवर्धनशी कुजबुजत असल्याचं त्याला ऐकू आलंच.
संध्याकाळी जाताना त्याने सीमेकडे पाहिलं. तीही उठून उभी राहत निघायच्या तयारीत होती. कपडे नीट करत आणि केसांना झटके देत ती त्याच्याकडे मधाळ नजरेने बघत हसली, आणि तो जरा थिजल्यासारखा झाला. काहीतरी बोलणं सुचायची वाट बघत तो रिसेप्शन एरियात रेंगाळत राहिला.
टेबल आणि स्वतःचं आवरून झाल्यावर सीमा बाहेर पडली, मग भान आल्यागत तोही तिच्यामागून बाहेर पडला.
***
बाहेर आल्यावर तो थोडं अंतर ठेऊन सीमेच्या मागे चालत राहिला. त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी ते दोघं आल्यावर मग त्याने आजूबाजूला बघून कुणीच ऑफिसमधलं किंवा ओळखीचं दिसत नाहीये ना- याची खात्री करून घेतली. मग तो निवांत होऊन तिचा हात हातात घेऊन थोडावेळ बसून राहिला. तिचा ऊबदार मऊ रेशमी तळहात त्याला खूपच आश्वस्त वाटू लागला. ती काळजीने त्याच्याकडे पाहत राहिली. तो मग न थांबता बोलत राहिला. त्याने केलेल्या प्रोजेक्टबद्दल. पाठक, कमल, पटवर्धन, रवी, वर्मा, कदम- हे सारे कमीअधिक प्रमाणात कसे खुनशी आहेत त्याबद्दल. स्वतःबद्दल. डोईजोडेबद्दल. त्याच्या बायकोबद्दल. आणि बरंच काही. खूप कारंजी. खूप रोषणाई. उत्साहाचे लोट आणि भरलेलं पोट.
एवढं सारं होईस्तोवर तो फोपशा काळा कुत्रा आणि डोईजोडे या दोघांनी आज काहीही गडबड केली नाही, याचं त्याला नवल आणि समाधानही वाटत राहिलं.
***
आपण भलं नि आपलं काम भलं- असं कितीही वागायचं ठरवलं तरी ते शक्य नसतंच हे त्याला अनेक वेळा कळून चुकलं होतं. पाण्यात राहून माशांना कसं टाळायचे उपाय काय असतात? तर बहुतेक वेळा नसतातच. लंच टाईममध्ये तो खाली गेला तेव्हा टपरीवर पाठक नि पटवर्धन विनोद करत खुसुखुसू हसत होते. पाठक उकळी आल्यागत म्हणत होता, 'हे असं नगार्यासारखं पोट तुझं, आणि कसं करतोस रात्री तू?'
'साल्या पोटाला कशाला त्रास द्यायचा? हे असं-' पटवर्धन तोंडातलं पान सांभाळत आणि एखादी उसाची मोळी कवेत घेऊन वरखाली हलवण्याची अॅक्शन करून म्हणाला, '-हे असं जमलं पाहिजे. त्याला प्रॅक्टिस लागते. तंत्र लागतं. साधना लागते..!' त्यावर पाठक एकदा पटवर्धनकडे आणि मग एकदा बाजूला गुपचुप उभा असलेल्या ह्याच्याकडे- असं आळीपाळीने बघत पाण्याचा मोठा फुगा फुटल्यागत हसू लागला. त्यानंतर पाठकने- तो घरी बायकोला जास्तीत त्रास कसा होईल याची काळजी घेऊन कसं कसं कायकाय करतो त्याचं डिटेल वर्णन सांगू लागला.
त्याला पुन्हा किळस आली, आणि सिगरेट अर्धीच टाकून तो निघाला, तसा पाठकने त्याच्या खांद्यावर हात टाकून थांबवलं. म्हणाला, 'सॉरी तुला आवडलं नसेल हे सारं तर. आता जे खरं आहे, ते आणखी वेगळ्या सौजन्यपूर्ण भाषेत कसं सांगणार? पण ठीक आहे, आपण विषय बदलू. आजची विशेष गोष्ट म्हणजे मी करड्या रंगाचा आणि लाल रेषा असलेला तो शर्ट घातला आहे..!'
''तो' शर्ट घातला आहे? म्हणजे?' त्याने गोंधळून विचारलं तसा ढेरपोट्या पटवर्धनाच्या तोंडातून पान खाता खाता एकदम लाल गुळणी बाहेर पडली, आणि पोट सावरत तो गुदगुल्या होत असल्यागत खुदूखुदू हसू लागला.
आता तो दोघांकडे आळीपाळीने बघू लागला. दोघेही अगदी उच्च दर्जाचे हरामखोर दिसत होते. 'तो' शर्ट घातला आहे म्हणजे काय? आणि त्यावर ढेरपोट्या पटवर्धन बायकांगत खुसूखुसू काय हसतो?
मग त्याच्या पाठीवर हात ठेऊन पटवर्धनने पोट सावरत विचारलं- 'हां. तू पहिले हे सांग बघू, की बाबा, पश्चिम बंगाल हे भारताच्या कुठच्या दिशेला आहे? आणि का आहे?'
त्याला हे असे लहान मुलांचे पीजे असलेलं बोलणं अजिबात आवडत नाही. शर्टाचा, पश्चिम बंगालचा आणि दिशेचा काय संबंध? तो रागाने पटवर्धनकडे पाहू लागला, तसा पटवर्धन कुजबुजीच्या आवाजात खाली वाकून त्याला म्हणाला, 'तो शर्टचा एक अतिभारी सस्पेंस आहे. सांगेन कधीतरी. नाहीतर तूच सांगून टाक रे पाठक्या नंतर..!'
तो त्यांच्याकडे लक्ष न देता सरळ वरती आला, तर रिसेप्शनला सीमा तिची ओढणी तोंडाला लावून खाली मान घालून मुसमुसूत होती. तो चरकलाच. दोन सेकंद तिला निरखत राहिला. जवळ जाऊन काहीतरी विचारावं असं त्याला वाटलं, पण हिंमत मात्र झाली नाही. मागून येणारे पाठक, पटवर्धन आणि आणखी एकदोघे त्याला ओलांडून आत गेल्यावर नाईलाजाने पाय ओढत आत यावंच लागलं.
तो जागेवर आला तेव्हा पाठक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, 'हा बघ, करड्या रंगाचा नि तांबड्या रेघांचा शर्ट.' आता हा तर त्याने मघाशीच पाहिला होता, त्यावरून त्याचं नि पटवर्धनचं चीड आणणारं खुसूखुसू हसूही सहन करून घेतलं होतं. आता त्यात काय पुन्हा बघायचं? तो न समजल्यागत पाहत राहिला तेव्हा पाठक पुन्हा म्हणाला, 'पुर्वेला असूनही नाव पश्चिम बंगाल असतं की नाही? तसंच हा शर्ट म्हणजे फक्त शर्टच नाही. तो निर्जीव असला तरी जिवंत आहे. मंतरलेला आहे तो!'
वेड्याकडे बघावं तसा तो पाठककडे बघू लागला. तो खरोखर वेडसर दिसत होता, ओठांच्या कडेतून हसत होता आणि डोळे चकाकत असल्यागत वाटत होते. मग भयंकर गुप्त गोष्ट सांगावी तसं खालच्या आणि खर्जातल्या पण किनर्या आवाजात तो म्हणाला, 'हे बघ. कमीत कमी चार वेळा मला अनुभव आला आहे. मी हा शर्ट घालून आलो रे आलो की या ऑफिसातला कुणीतरी एकजण उडतो. उडतो म्हणजे काढून टाकला जातो, किंवा तोच राजीनामा देतो. काहीतरी डेंजर होतं म्हणजे होतंच. बघच तू.'
तो नवीनच जन्माला आलेल्या बाळाच्या नजरेने पाठककडे आश्चर्यचकित आणि अगम्य चेहरा करून बघू लागला. न राहवून त्याने विचारलं, 'कोण उडणार आहे आता?'
पाठक खुनशी हसत म्हणाला, 'सीमा. कुरियरच्या पैशांच्या घोळात वर्माने तिला पकडलं आहे. सकाळपासून हिशेब जुळवत बसलीये. गेल्या सहा महिन्यांचे हिशेब आहेत. वर्माचा दात आहेच तिच्यावर. आता ती काय टिकत नाही बघ..!'
पाठक तिथून निघून गेला. तो क्युबिकलमधल्या त्याच्यासमोरच्या सॉफ्ट बोर्डकडे बघत अगतिकतेने कितीतरी वेळ बसून राहिला.
***
तो रिसेप्शनमध्ये आला तेव्हा सीमा त्याच्याकडे अजीजीने बघत होती. रडून तिचं नाक लाल झालं होतं, आणि डोळे सुजले होते. ती पैशांचा घोटाळा करणं शक्य नाही, याची त्याला खात्री पटल्यावर आत साहेबांकडे जायचं त्यानं निश्चित केलं. तिच्यावर थोपटल्यासारखी नजर टाकून तो तीरासारखा आत घुसला आणि साहेबांना म्हणाला, 'सर, वर्मा विकृत आहेत. चहाची कुपनं मोजत बसणारा फायनान्स मॅनेजर मी आजवर पहिला नव्हता. त्यांनी कंपनीच्या फायनान्स आणि अकाऊंटिंगकडे नीट लक्ष दिलं, तर कंपनीला आणखी फायदा होईल. सीमा त्यांना या ऑफिसात नको आहे. तिची काहीच चूक नाही, आणि पैशांचा घोळ तर ती या जन्मात तरी करणार नाही. काहीतरी गफलत आहे सर. तुम्ही वर्मांनाच जरा नीट विचारा प्लीज..'
त्याचं हे असं झपाटल्यासारखं बोलणं बघून साहेब आश्चर्याने बघत राहिले मग त्यांना जरा रागच आला. ते म्हणाले, 'मला समजतं सारं. मी ते बघून घेईन. नाऊ गेट आऊट!'
त्याला खात्री होती, की साहेबांनी कितीही हळू आवाजात हे म्हटलं असलं, तरी ते त्याला टेरेसवरच्या त्या कुत्र्याच्या भितीदायक भुंकण्याच्या आवाजातच ऐकू येईल. झालंही तंतोतंत तस्संच!
***
लंच टाईममध्ये इतर कुणाहीमध्ये न बसता एकट्यानेच बसायचं त्याने गेल्या काही दिवसांपासून ठरवलं होतं. अकाऊंट सेक्शनच्या पलीकडे बसायला मोठी जागा होती. दोन भलीथोरली टेबलं आणि दहाबारा खुर्च्या. फायली आवरायला, कागदांचे गठ्ठे आणि डिस्पॅचेसचे घोळ निस्तरायला अमृत, महिपत आणि इतर लोक ती जागा वापरत. लंच टाईममध्ये ती सार्वजनिक जेवणाची बने. तिथेच सरे जमून चकाट्या पिटत, ते त्याला आजकाल नकोसं होऊ लागलं होतं. तो त्याच्या जागेवर उभा राहिला तर ती जागा दिसे. खाली बसून जेवत असताना दृष्टीआड. पण तरी तिथलं सारं बोलणं ऐकू येईच. मग अशावेळी तो समोरच्या सॉफ्टबोर्डकडे बघत दुसर्या एखाद्या विचारात तंद्रीमग्न होऊन बसे.
आज तिथं बसून पाठक म्हणत होता, 'बायकोशी मी भांडत नाही. न बोलता शिक्षा करण्याचे माझ्याकडे भरपूर मार्ग आहेत. उदाहरणार्थ, असेल नसेल तेवढा स्वयंपाक ती तिच्या ऑफिसातून यायच्या आत एकट्याने संपवून टकायचा. संपत नसेल, तर लपवून ठेवायचा. आणि सारं काही नव्याने करायला लावायचं!'
तो अजून बरेच मार्ग सांगत होता. पण त्याला नेहमीप्रमाणे किळस आली. चीडही आली. पाठक नावाचं घाणीनं बरबटलेलं डुक्कर त्याच्या समोरच्या स्क्रीनवर जीवाच्या आकांताने पळतं आहे, अशी काहीतरी छान आणि सुखद कल्पना करायला त्याने सुरूवात केली.
***
'या कुत्र्याचं काहीतरी केलं पाहिजे घरमालकांना सांगून. इथं कशाला बांधून ठेवतात ते? खालीही भरपूर मोकळी जागा आहेच की. आणि हे बघ भावशा, हा डोईजोडे नावाचा माणूस मला काही बरोबर वाटत नाही. तुझ्या मित्राच्या इमारतीत जागा असेल तर बघशील का ह्याच्यासाठी. मला बघवत नाही रे. मागल्या वेळी बरा चेहर्या-अंगाने भरलेला दिसत होता. आता बघ कसा झालाय..' असं काहीतरी आणि अजून बरंच काही आई भावाला, म्हणजे त्याच्या मामाला सांगत होती. नंतर त्याने लक्ष देणं सोडून दिलं. आई बिछान्यावर शेजारी बसून त्याच्या केसांत हात फिरवत होती, तेवढंच त्याला पुष्कळ होतं. डोईजोडेच्या मंत्रांचा आवाज आला तेव्हा त्याला कळलं, आता पांघरूण काढल्यावर शेजारी मामाही नसणार, आणि आईही. ते नसल्याचं बघायला नको, म्हणून त्याने पांघरूण काढलंच नाही. त्याच्या लाडक्या, दिवंगत मामाच्या आठवणीत तो रंगून गेला. एक आठवण आल्यावर त्याला गंमत वाटली. तो लहान असताना असाच एकदा मामा त्याच्या घरी आलेला, तेव्हा तो झोपलेला असताना मामा त्याच्या बिछान्यावर शेजारी बसून त्याच्या केसांत हात फिरवत आईशी गप्पा मारत होता. तो अर्धवट झोपेत होता, आणि स्वप्नातही. त्याचवेळी आई आणि मामाचं बोलणंही त्याला अधुनमधून ऐकू येत होतं. दोघांचं खोटं खोटं भांडण चाललेलं होतं बहुतेक. पूर्ण जागा झाल्यावर त्याच्या उडालेल्या गोंधळाची गंमत त्याला स्वतःलाच नंतर किती वर्षे वाटत राहिली. खरंतर अजूनही.
***
ऑफिसमध्ये 'परिवर्तन' नावाचा 'मॅनेजमेंट अँड ह्युमन स्किल्स'वाला कार्यक्रम सुरू झाला. बाहेरचे कुणीतरी प्रसिद्ध प्रशिक्षक येऊन गुणवत्ता, कार्यक्षमता, जबाबदारीचं भान, सामाजिक बांधिलकी इत्यादी अनेक गोष्टी स्वत:मध्ये कशा बाणवाव्यात याची दोन दिवसाआड लेक्चर्स देत होते. दर शनिवारी बाहेर आऊटिंग असायचं. तिथंच जेवण, खेळ, गप्पा असं व्हायचं. एकमेकांत मिसळणं व्हावं, संवाद व्हावा- हा हेतू.
सीमा अजूनतरी होती, पण हिशेब चालूच होते. वर्माला बघितल्यावर त्याचा संताप व्हायचा. शनिवारच्या या असल्या कार्यक्रमांतही तो एकटा बसून असायचा. समोर चाललेलं चुपचाप बघत.
***
या शनिवारी एंजल्स रिसॉर्टमध्ये पाठक आला तेव्हा त्याने 'तो' शर्ट पुन्हा घातला होता. सामोरा आला तेव्हा त्याच्याकडे बघत ओठ तिरके करून पाठक त्याच्या नेहमीच्या लकबीत हसला. आपण घातलेल्या शर्टकडे लक्ष वेधून घेणारे हावभावही केले. चडफडत, असहाय्यतेने त्याने खाली बघून मान हलवली.
सीमा आली तेव्हा मात्र त्याला हलकंहलकं वाटलं. केवढी छान दिसत होती आज. वर्मामुळे आलेलं मळभ दूर सारून आल्यागत प्रसन्न. तिच्याकडे बघून न राहवून त्याने पसंतीचं स्मित करत मान हलवली. तिलाही त्याचं तसं करणं आवडलं असावं. तीही खुश होऊन हसली.
थोडंसं लेक्चर झाल्यावर खेळ सुरू झाले. पण त्यात सगळेच भाग घेत नव्हते. ब्रेकफास्ट टेबलजवळ जाताना शेजारी कमल, पटवर्धन, काया, पाठक आणि इतर लोकांशी जुजबी बोलावं लागलंच. मग शेजारी बसताना इच्छा नसतानाही त्यांचं बोलणं ऐकणं भागच होतं. पाठकच्या शर्टाचीच चर्चा चाललेली होती. खूप मोठे विनोद झाल्याप्रमाणे सारे हसत होते. या सार्या बिनडोकपणाची, बालिशपणाची, हलकटपणाची त्याला पुन्हा एकदा शिसारी आली.
***
सीमा छान आहे. आपल्याला मनापासून ती आवडते. आईलाही आवडेल खरंतर. मामा असता तर त्यानेच पुढाकार घेतला असता एखाद्या मित्रासारखा.
एकदा नीट आपण तिच्याशी बोलत का नाही? असंख्य स्वप्ने तिचीच तर असतात. त्या एका अभद्र स्वप्नाच्या तावडीतून आपण सुटू बहुतेक.
समोरच्या नॅपकीन्स ठेवलेल्या टेबलावर त्याची बोटं फिरू लागली. सीमा जाईल तिकडे नजर भिरभिरू लागली. टेबलावरचा नॅपकीन तळहाताच्या घामाने ओलाचिंब झाला. सारं शरीर ताठर झालं. पुतळ्यासारखा स्तब्ध होऊन, बर्फासारखा गोठून तो तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या पलीकडे, आरपारही बघत असावा बहुतेक.
***
'बघ कशी ऐटीत फिरतेय. कसली जातेय नि कसलं काय. फेक तुझा तो चेटूकवाला शर्ट.' पटवर्धन म्हणाला. कमल फिस्सकन हसला.
'अरे, मलाही नकोय आता खरं तर ती जायला. आजतर दिसतेय बघ कशी. अगदी अश्शी..' पाठकचा आवाज. त्यासरशी हलकट हसण्याचे एकदम पाचसात आवाज आले, म्हणून त्याने बघितलं. त्यादिवशी ऊसाची मोळी कवेत घेऊन पटवर्धनने जसं करून दाखवलं होतं, तसंच आता पाठक करत होता. पुन्हापुन्हा करून दाखवत होता.
त्याच्या मज्जातंतूंतून लाखो व्होल्ट्सचा करंट गेला, आणि वीज पडल्यासारखं झालं. समोर बघितलं तर लांबच लांब पसरलेली पोपडे धरलेली जमीन आणि भक्क ऊन. अंगाची लाही लाही करणारं. शिवाय तीच भितीदायक, कोरडी, भयाण, भणंग खोली आणि रसायनांचे उग्र दर्प. त्याचे ओठ थरथरले आणि डोळ्यांत रक्त आणि हातात स्टीलचा काटाचमचा घेऊन तो उठला. त्याचा अवतार बघून तिथले सारे एकदम शांत झाले. पटवर्धनच्या समोर उभा राहिला, तसा पटवर्धन दोन पावलं मागे सरला. मग थोडं वळून पाठकच्या समोर तो आला. दोन क्षण त्याच्या डोळ्यांत नजर रूतवली. त्याचा काटाचमचा असलेला हात वेगाने मागे गेला, आणि दुप्पट वेगाने, सारी शक्ती एकवटून पाठकच्या पोटाच्या दिशेने आला.
सीमाने किंकाळी फोडली. त्याने रक्ताळलेल्या डोळ्यांनी हसत तिच्याकडे पाहिलं, आणि पुन्हा एकदा पाठकच्या पोटात तोच चमचा वेगात घुसला.
***
पोलिस आलेत म्हणजे त्या अभद्र डोईजोडेने पुन्हा काहीतरी नाटक केलेलं दिसतंय. शिवाय इतके आवाज होत आहेत, त्या अर्थी कुत्र्यानेही भुंकून जबरी धुमाकुळ घातलेला दिसतो आहे. इथून लवकर बाहेर गेलं पाहिजे हेच खरं. नाहीतर आपलं काही खरं नाही.
पण डोईजोडे तर आजूबाजूला कुठेच दिसत नाही. घरमालकही दिसत नाही. ते अग्यावेताळ कुत्रंही कोपर्यात कुठेतरी मुटकुळं करून पडलं असणार. काळं असल्याने अंधारात दिसणरही नाही. मागल्या अनेक वेळेला त्याने तसंच केलं. आता हे मूर्ख पोलिस आपल्यालाच जाब विचारणार. एकतर या सार्या हलकट ऑफिसवाल्यांना यातलं काहीही ठाऊक नसणार. डोईजोडेला आपणच शोधला पाहिजे लवकर. इथेच टेरेसच्या कोपर्यात थंडीमध्ये सारे कपडे काढून ते अभद्र मेडिटेशन करत बसला असेल साला.
डोईजोडे लवकर शोधला पाहिजे. पटकन. नाहीतर आपलं काही खरं नाही.
***
***
***
('माहेर' जानेवारी २०१३ मध्ये 'त्याची कथा' या नावाने पुर्वप्रकाशित)
अफाट _/\_
अफाट _/\_
खरंच अफाट!!! मान गये साब.
खरंच अफाट!!! मान गये साब.
बेफाट ! ! !
बेफाट ! ! !
आवडली कथा.
आवडली कथा.
बापरे, स्वप्नं आणि सत्य किती
बापरे, स्वप्नं आणि सत्य किती बेमालूम सरमिसळलय...
मान्या रे बाबा.
सहीच. ....
सहीच. ....
कथा आवडली .. पण अध्येमध्ये
कथा आवडली .. पण अध्येमध्ये थोडी स्लो वाटली ..
साजिरा, आधी वाचली होती तेव्हा
साजिरा, आधी वाचली होती तेव्हा आवडली होतीच. आत्ता पण आवडलीच. भारीये
जबरी लिहिलेय !
जबरी लिहिलेय !
व्वा ! जबरी कथा.
व्वा ! जबरी कथा.
जबरी!! सही लिहिली आहेस,
जबरी!! सही लिहिली आहेस, साजिर्या!
अफाट !!! डोक्याचा भुगा
अफाट !!! डोक्याचा भुगा झाला...
म॑स्त.
म॑स्त.
कथा पण डोईजड!!
कथा पण डोईजड!!
पुन्हा वाचतानाही पहिल्याइतकीच
पुन्हा वाचतानाही पहिल्याइतकीच सुन्न झाले. स्वप्नातली निष्क्रीयता, अभद्र मेडिटेशन आणि एकूणच डिटेलिंग भन्नाट जमलंय.
अस्ल्या भितीदायक/गुढ वगैरे
अस्ल्या भितीदायक/गुढ वगैरे कथांवर बन्दी घालायचा कायदा आणला पाहिजे!

]
अस कधी होत अस्त काय?
[मुळात काय होतय तेच कळत नाहीये - अन बहुधा तेच लिखाणाचे यश मानायला हवे, नै का?
जोक्स अपार्ट, छान लिहीलय.
अन अस लिहीणे अवघड असते.
जबरीच
जबरीच
डोक्याचा भुगा झाला राव
डोक्याचा भुगा झाला राव
भारीच लिहिलंय...!!
भारीच लिहिलंय...!!
.... मग तो निवांत होऊन तिचा
.... मग तो निवांत होऊन तिचा हात हातात घेऊन थोडावेळ बसून राहिला.
>>>>> हे स्वप्न होतं कि सत्य ?
स्वप्न च ओ...
स्वप्न च ओ...
हे स्वप्न होतं कि सत्य ?
हे स्वप्न होतं कि सत्य ?
>>>
त्या भागाचा शेवट 'एवढं सारं होईस्तोवर तो फोपशा काळा कुत्रा आणि डोईजोडे या दोघांनी आज काहीही गडबड केली नाही, याचं त्याला नवल आणि समाधानही वाटत राहिलं.' असा आहे. त्यामुळे अर्थ स्पष्टच आहे..
स्वप्न आणि सत्य यांत होणार्या गल्लतीची नायकाला लहाणपणापासूनच सवय आहे. जाणता झाल्यावर आजूबाजूच्या खुपणार्या, न आवडणार्या आणि अस्वस्थ करणार्या गोष्टींवर तो या सवयीचं पांघरूण घालू लागतो. हे सारं वाढत जाऊन नियंत्रणाबाहेर गेल्यावर अशा गोष्टीचा कडेलोट कधीतरी होतोच. तसा नायकाचाही होतो..
सर्व मित्रांना धन्यवाद.