चढाई लिंगाण्याची !! शिदोरी अनुभवाची !!!

Submitted by shekharkul on 28 January, 2014 - 09:48

सदर लेख आमचे मित्र श्री. रमेश प्रभु, (मुख्य प्रबंधक, कार्मिक विभाग, भारतीय आयुर्विमा महामंडळ, कोल्हापुर विभाग ) यांनी लिहीला आहे..

1.1.jpg1.jpg

लिंगाणा ! राजगड ते रायगड या माळेतील एक अनगड किल्ला ! बेलगाम सुळका ! डोंगरभटक्यांना / ट्रेकर्सना ख-या अर्थाने आव्हान देणारा हा सुळका त्याच्या पायथ्याला जाऊन पाहिला तर आपण त्याच्यासमोर किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते. पण हाच सुळका समोरच्या रायलिंग पठारावरुन पाहिल्यानंतर त्याचा भारदस्तपणा त्याच्या चढाईची भुरळ पाडतो. तथापि, राजगड ते रायगड असा जंबो ट्रेक करणारे बहुतेक सर्व ट्रेकर्स राजगड, तोरणा आणि रायगडला जातात पण लिंगाण्याच्या या सुळक्याला लांबूनच नमस्कार करतात. पण ज्याच्या बाहूंत रग आहे, पायात धग आहे आणि ज्याचे मन उंच उंच सुळक्याविषयी सजग आहे अशा प्रत्येकाने लिंगाण्याच्या मस्तकावर झेपावण्याची उर्मी मनात बाळगलीच पाहिजे.

समुद्रसपाटीपासून २९७९ फूट उंच असलेल्या या किल्ल्यावर चढाई करायची तर त्यासाठी ७ ट्प्प्यामध्ये अंदाजे १००० फूट प्रस्तरारोहण करावे लागते.

लिंगाण्याच्या या सुळक्याला पाहण्याची संधी आम्हाला २ वेळा मिळाली. ४ वर्षांपूर्वी सिंगापूर नाळ उतरुन दापोली मार्गे रायगडला जाताना लिंगाणा पाहिला आणि मनामध्ये येऊन गेले कि लिंगाण्यावर आपण गेलेच पाहिजे. दिड वर्षांपूर्वी बोराट्याची नाळ उतरुन पाने गावात जाताना लिंगाण्याच्या पायथ्याला गेलो आणि निश्चय केला कि पुढच्यावेळी इकडे यायचे ते कमरेला हार्नेस बांधुनच.

त्या अनुषंगाने माझे सहकारी भारत महारुगडे व शेखर कुलकर्णी यांनी फेसबुक/सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून ट्रेक आयोजित करणा-या विविध संस्थांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आणि प्रस्तरारोहणची थोडीफार शारिरीक व मानसिक तयारी व्हावी या उद्देशाने माझे सहकारी श्री भारत महारुगडे श्री शेखर कुलकर्णी, श्री श्रीकांत टाकळकर व श्री परशुराम नांदवडेकर, यांच्याबरोबर सह्याद्रीच्या रांगेतील अवघड अशा किल्ल्यांची/सुळ्क्यांची भटकंती सुरु ठेवली. गेल्या वर्षभरात आम्ही कळसुबाई, रतणगड, कोराईगड, घनगड, श्रीवर्धन, मनरंजन, साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड आणि धोडपचा किल्ल्याच्या चढाईबरोबरच सांदणदरी, नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड, अलंगगड, मदनगड, गोरखगड, सिद्धगड इत्यादी ठिकाणी प्रस्तरारोहण केले. तथापि, सिद्धगडच्या मुक्कामांत आमची भेट सह्याद्रीतील २८ वर्षे प्रस्तरारोहणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या गिरिविराज या संस्थेच्या श्री किरण आडफाडकर आणि त्यांच्या सहकार्यांशी झाली. श्री आडफडकरांनी आमचे सिद्धगडाच्या चढाईबद्दल कौतुक केले, त्यामुळे आमचा आत्मविश्वास ख-या अर्थाने जागृत झाला आणि आम्ही त्याचदिवशी ठरवले की पुढची चढाई असेल ती लिंगाण्यावरच !

त्याप्रमाणे ‘ऑफ-बीट सह्याद्री’ च्या आमच्या मित्रांशी आम्ही संपर्क साधून ५ जानेवारी ही तारीख मक्रुर केली. कोल्हापूरचे आम्ही ५ आणि मुंबई-पुण्याचे १५ असे एकूण २० सवंगडी तयार झाले. याकरिता लागणारे सर्व साहित्य – रोप हार्नेस, कॅरॅबिनर, डिसेंडर इत्यादी आणण्याची जबाबदारी ‘झी’ [झीनत सिकीलकर] व तिचे सहकारी श्री रोशन साळवे आणि नितेश यांनी उचलली.
2.JPG3.JPG

४ जानेवारी रोजी दुपारी १.३० वा. आम्ही जोतिबाच्या नावाने चांगभलं केले आणि नसरापूरकडे प्रयाण केले. पण वाटेतच आमच्या उत्साहावर विरजण पडेल अशी बातमी समजली. मुंबईची गाडी रद्द झाल्यामुळे १२ लोकांचे येणे रद्द झाले आहे. तथापि ‘झी’ ने लिंगाण्याची चढाई आपण ठरविल्याप्रमाणेच करावयाची आहे हेही सांगितले. आम्हाला फार बरे वाटले. ठरल्याप्रमाणे नसरापुरात आमची या सहकार्यांशी भेट झाली. त्याठिकाणी आम्ही पिकप वाहनात आमच्या सॅक ठेवल्या आणि मोहरी गावाकडे जाण्यासाठी निघालो. नसरापूर-मार्गस्थणी-वेल्हे–केळदची खिंड पार करीत रात्री ८ च्या सुमारास आम्ही मोहरी गावात पोहोचलो. मोहरी गाव म्हणजे ८-१० घरे असलेला धनगर पाडा. तेथील एका घराच्या बाजूला रोशन आणि निलेश यांनी तंबु ठोकला. तोपर्यंत ‘झी’ ने अतिशय उत्साहाने फास्ट फूडचे रुपांतर प्रिपेर्ड फूडमध्ये केले आणि त्या रात्री आम्ही चांदणे भोजनाचा आनंद लुटला. जेवणानंतर तंबूत बसून आम्ही उद्याचे नियोजन करु लागलो. लिंगाण्यावर चढाईसाठी अगोदरच १५ जणांचा ग्रुप गेला आहे असे आम्हाला समजले होते त्यामुळे बोराट्याच्या नाळेतून लिंगाण्याच्या पायथ्याला जाण्यासाठी दुस-या दिवशी थोडं लवकर म्हणजे, पहाटे ५.३० वाजता निघायचे ठरवले. इतक्यात आम्हाला दुचाकी व मोठ्या वाहनांचा आवाज ऐकू आला. तंबूतून बाहेर येऊन पहातो तो काय, पुणे-वाइल्ड ट्रेकर्सचा २० जणांचा जथा लिंगाणा चढाईसाठी दाखल झाला होता. म्हणजेच उद्या लिंगाण्यावर किमान ४० लोकांची चढाईसाठी असणार. मनावर थोडसं दडपण येऊ लागलं. कारण ४० लोकांनी सकाळी चढाई सुरु करुन संध्याकाळपर्यत पुन्हा पाय‍‍थ्याला येणे एकंदरीत अवघड वाटू लागले. यावर उपाय म्हणून ‘झी’ ने आमची निघण्याची वेळ पहाटे ५.३० ऐवजी ४.३० केली.

4.JPG5.JPG

पहाटे ४.०० वाजता उठून ‘झी’ ने पोह्यांचा नाप्टा तयार करुन घेतला आणि दूधपावडरीचा फक्कड चहा पिऊन आम्ही अंधारातच रायालिंग पठाराकडे चालायला सुरुवात केली. चांदण्यांचा संधी प्रकाशाबरोबरच हातातील विजे-यांचा प्रकाश टाकत आम्ही रायलिंग पठारावर साधारणपणे २५ मिनिटात पोहोचलो आणि बोराट्याच्या नाळेकडे जाणारा रस्ता हरवून बसलो. रस्ता शोधण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहचली. एवढ्यात भारतने सुचना केली की मोबाइल मधील कंपासच्या सहाय्याने आपण दिशेचा शोध घेऊया. या सर्व खटाटोपात झुंजूमुंजू केव्हा झाले ते समजलेच नाही आणि थोडेसे वरच्या बाजूस आल्यावर लिंगाण्याचा सुळका आणि रायलिंग पठारावर रात्री आलेल्या पुणे वाइल्ड ट्रेकर्सचे तंबू दिसू लागले. त्या तंबूच्या शेजारुनच आम्ही तीव्र उतार असलेल्या बोराट्याच्या नाळेच्या घळीत प्रवेश केला आणि अत्यंत सावधपणे अस्ताव्यस्त पडलेल्या ओबडधोबड दगडधोंडयातून कसरत करीत लिंगाण्याच्या पायथ्या च्या खिंडीत पोहोचलो. घड्याळात बघितले तर साडेसात वाजले होते. पुणे-वाइल्ड ट्रेकर्सच्या सहकार्यांनी आम्ही येण्यापूर्वीच लिंगाण्याची चढाई सुरु केली होती. आणि त्यांच्यापैकी २-३‍ भिडू खाली राहीले होते. आम्ही आमची कवचकुंडले ( हार्नेस, कॅरॅबिनर व डिसेंडर) धारण केली आणि छोटी सॅक पाठीला अडकवून चढाईसाठी सज्ज झालो. खिंडीतून वर सुळक्याकडे पाहिल्यानंतर मनावर थोडेसे दडपण आले पण पर्याय नव्हता. एकच उद्दिप्ट ठरवलं होतं – चढाई लिंगाण्याची.

6.JPG

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार आणि जोतिबाच्या नावानं चांगभलं करीत सुळक्याला नमस्कार केला आणि चढाई सुरु केली. अवघड असे २ रॉक पॅच पार करीत साधारणपणे ४५ मिनिटात ४०० फूटाचे आरोहन करीत आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो आणि थोडासा उसासा टाकला. इथपर्यंत आम्ही ४० टक्के चढाई पूर्ण केली होती. यानंतर आम्हाला किमान ४ ते ५ अवघड रॉकपॅच पार करणे म्हणजेच साधारणपणे ६०० फूट आरोहन करावे लागणार होते. गुहेनंतरचा पहिला रॉकपॅच पार करण्यासाठी बरेचजण थांबले होते, तेवढ्या वेळेत आम्ही थोडेस खाऊन घेतले आणि जवळच्या टाक्यातील पाणी पिऊन पुढ्च्या चढाईसाठी तयार झालो. लिंगाण्याच्या सुळ्क्यावर आम्हाला उजव्या बाजूला असलेली ८ ते १० लोक थांबू शकतील अशी छोटी गुहा व डाव्या बाजूला असलेले हे पाण्याचे टाके इतकेच अवशेष आम्हाला दिसले.

DSCN0348.JPG7.JPG8.JPG9.jpg10.jpg

जागोजागी दगडांमधे मारलेले बोल्ट पाहिले कि आम्हाला रॉकपॅचच्या भिषणतेची जाणीव व्हायची आणि आम्ही आमचा कॅरॅबिनर रोपमधे व्यवस्थित अडकवला आहे ना याची खात्री करायचो. अशारितीने साधारणपणे दीड पावणेदोन तास रॉक पॅचशी झटापट करीत, एकापाठोपाठ एक असे आम्ही सर्व लिंगाण्याच्या माथ्यावर आलो आणि आम्हाला आपण वेडं साहस केल्याची जाणीव झाली. निश्चितपणे आजपर्यंतच्या केलेल्या चढायांपेक्षा ही एक आगळंवेगळं चढाई होती.

11.jpg12.jpg13.JPG14.1.jpeg14.2.jpeg14.JPG

आमची नजर आता लिंगाण्याच्या माथ्यावरुन दिसणारे रायालिंग पठार, तोरणा, रायगड, आणि सह्याद्रिचे उंच उंच सुळक्यांचे विहंगम दॄष्य साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. आम्ही जवळजवळ ३००० फुटाच्या सुळक्याचे आरोहन केले होते. आता मनामधे रूखरूख लागली होती ‍ती चढून आलेले सर्व रॉकपॅच उतरण्याची. यावर आमच्यापेक्षा अनुभवाने श्रेष्ठ असलेल्या पण वयाने कनिष्ठ असलेल्या रोशन आणि निलेश यांनी एक मार्ग सुचवला. आम्हाला आमच्या हर्नेसमधे असलेल्या डिसेंडरमध्ये रोप कसा लावयचा याचे प्रात्यक्षिक दाखविले व आमच्याकडून ते करवून घेतले. आता आम्ही सुळक्याच्या उतराईसाठी तयार झालो होतो. रोशनचे मार्गदर्शन, हर्नेस-रोपवरचा भरवसा आणि मनाची एकाग्रता यामुळे पहिला १५० फुटाचा रॉकपॅच आम्ही रॅपलिंग करीत सहजपणे उतरलो. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आणि पुढचे सर्व रॉक पॅच आम्ही स्वत:च डिसेंडरमध्ये रोप टाकत टप्प्याटप्प्याने उतरत गेलो. जसजसा पायथा जवळ येत गेला तसतसा आम्ही एक अवघड मोहिम फत्ते केल्याचा समाधान आम्हाला मिळत होतं.
15.JPG15.1.jpeg15.2.jpeg16.1.jpeg16.JPG16.2.jpeg16.3.jpeg

साधारणपणे २ तासात आम्ही अंदाजे १००० फुटांचे रॅपलिंग करत टप्प्याटप्प्याने लिंगाण्याच्या माथ्यावरुन पायथ्यापर्यंत पोहचलो होतो. आमचे पाय जमिनीला लागल्यानंतर लिंगाण्यासमोर नतमस्तक झालो आणि आल्या पावली बोराट्याच्या नाळेतून रायलिंग पठाराकडे परतीचा प्रवास सुरु केला आणि मनात पुन्हा विचार आला खरंच ज्याच्या बाहूंत रग आहे, पायात तग आहे आणि ज्याचे मन उंच उंच सुळक्याविषयी सजग आहे तोच फक्त लिंगाण्याच्या मस्तकावर झेपावू शकतो.

20.JPG21.JPG22.JPG23.JPG

---------------------------------रमेश प्रभू

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थरारक वर्णन!!

बोराट्याच्या नाळेची वाट पडलेल्या दरडी, झाडी, मधमाश्यांमुळे बंद झाली होती असे वाचले होते. हा मार्ग परत सुरु झाला आहे का?

shekharkul, मस्त थरारक वर्णन आहे. खिळे पूर्वीपासूनच होते ना? का तेही तुम्हीच मारले?
आ.न.,
-गा.पै.

नमस्कार कोल्हापूरकर

सिद्धगडावर आपली भेट झाली आहेच, आणि तुम्ही माझ्या हातचा चहा पिऊन कृतकृत्य झालेले आहात याची मला पूर्ण खात्री आहे. ;);-):डोमा:

शेवटी आपली खूप वर्षापासूनची इच्छा पूर्ण झाली तर. अभिनंदन!

शुभेच्छुक
टीम गिरीविराज

सलाम!

धन्यवाद मीत्रानो बोराट्याच्या नाळेची वाट ओके आहे. हा मार्ग परत सुरु झाला आहे .. खिळे पूर्वीपासूनच होते

मस्त

थरारक .... मला बघुनच भिति वाटत आहे..........

ग्रेट ........................^.............>>>>आपल्या धाडसाचे तहे-दिलसे कौतुक !

अरे जबरी! फोटो बघून आता लिंगाणा क्लाईंब करावाच असं वाटायला लागलंय... ऑफबीट म्हणजे घरचीच माणसं! Happy

मन:पूर्वक अभिनंदन.. मस्त प्रचि.. Happy

(रच्याकने, लिंगाण्यावर 'कमर्शियल' पद्धतीने काही ग्रूप्स मोहिमा काढताहेत, त्यामुळे इथलं दुर्गमत्व-पावित्र्य-सौंदर्य ढळू नये अशी शिवराय अन् सह्याद्री चरणी प्रार्थना!!!)