प्रमाण ७-८ खेकड्यांसाठी लागणार्या जिन्नसाचे देत आहे. मी जास्त खेकड्यांसाठी केले आहे फोटोत.
७-८ खेकडे
रश्यासाठी
४ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
आल्,लसुण्,मिरची कोथिंबीर पेस्ट
अर्धा चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
१ चमचा गरम मसाला
चविनुसार मिठ
पाव वाटी तेल
पाणी गरजे नुसार
लिंबा एवढ्या चिंचेचा चिंचेचा कोळ (जास्त घेऊ नये.)
कांदा खोबर्याचे वाटण
साधारण पाऊण सुक्या खोबर्याची वाटी किसून
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
भ्ररायचे सारण.
१ मोठी वाटी बेसन (अंदाज येत नसेल तर थोड जास्त घेतल तरी चालेल)
पाव वाटी तांदळचा पीठ
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद पाऊण चमचा मसाला
अर्धा चमचा गरम मसाला
चवी नुसार मिठ
१-२ चिंचेचा कोळ (लिंबापेक्षाही कमी आकार होतील इतका चिंचेचा गोळा)
पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ.
खेकडे म्हणजे लहान मुलांचा आवडीचा बाऊ. अगदी त्यांना चालताना पाहण्या पासून ते खाण्या पर्यंत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही खेकडे म्हणजे आवडते प्रकरणच. त्यात हे खेकडे लाखेने भरलेले असले म्हणजे तर अजूनच चविष्ट गंमत. तर ह्या खेकड्यांचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मला माहीत असलेले समुद्रातले, खाडीतले व डोंगर-जमिनीतले खेकडे. डोंगरातील खेकडे काळे कुळकुळीत पाठीचे असतात. त्यांना मुठे म्हणतात. इतर खेकड्यांपेक्षा हे जास्त चविष्ट असतात. समुद्रातील व खाडीतीत खेकडे जरा फिक्कट कळापट-करड्या रंगाचे असतात. समुद्रात तर नक्षिदार पाठीचे खेकडेही असतात.
अमावस्या-पोर्णिमे नुसार खेकडे भरलेले मिळतात असे म्हणतात. पण मी आणते त्या अनुभवा वरून तसे मला काही आठळले नाही. कधी कधी मिळतात भरलेले तर कधी कधी नाही. तर भरलेले खेकडे ओळखण्यासाठी खेकड्याची पाठ दाबून पहावी. दाबताना जर पाठ वाकत म्हणजे आत सहज जात असेल तर तो पोकळ आणि जर कडक असेल तर तो भरलेला खेकडा. शिवाय चांगल्या लाखेसाठी माद्या जास्त बघून घ्यायच्या. जर आपल्याला खेकड्यांचे पाय काढता येत नसतील तर ते शक्यतो कोळणींकडूनच काढून घ्यायचे.
खेकड्यांच्या पाठीच्या आकारा वरून नर-मादी ओळखायची. खालील फोटोतील पहीला नर खेकडा, दूसरी मादी खेकडा (खेकडीण किंवा मिसेस खेकडीण म्हणायची का? :हाहा:)
https://lh6.googleusercontent.com/-0F4ftxy9M6E/Um__7rVMOVI/AAAAAAAADyI/Z...
आता बर्याच जणांना जीवंतपणी खेकड्याचा रस्सा करणे अवघड वाटते तसेच त्यांचे इतर पायही काढायला भिती वाटते म्हणून हे खेकडे पिशवीत बांधून फिजर मध्ये ठेवा. साधारण १ तासानंतर ते पूर्णपणे मंद होतात. मग आरामात ह्यांचे पाय काढता येतात. काही जण बाजूच्या दोन मिशांसारख्या नांग्या ठेवतात. पण त्या ठेवल्याने भांड्यात जागा कमी पडते म्हणून मी ठेवत नाही.
तर आता पाककृती कडे वळू.
खेकड्यांचे पाय काढले की खेकडे आणि त्याचे पुढचे जे जाडे पाय (नांगे) स्वच्छ धुवून घ्या.
बाकीचे बारीक पाय असतात काढून फेका किंवा ते धुवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस्सा गाळून तो रस्सा करताना वापरा. ह्यामुळे चव येते पण कटकटीचे काम असल्याने मी करत नाही टाकून देते.
आता खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे खेकड्याच्या कडेच्या मधोमध टोकदार जाडी टोकदार वस्तूच्या सहाय्याने खेकड्याची पाठ व पोट वेगवेगळे करा.
ह्यांच्या मध्ये जर काळसर छोटी पिशवी सारखे करखरीत वाटले तर तो भाग काढा.
आधीच पिठाचे पुढील प्रमाणे सारण करून ठेवा.
बेसन थोडे भाजून घ्या. त्यात तांदळाचे पिठ, हिंग, हळद, मसाला, गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ टाकून थालीपिठा एवढे घट्ट करा. अगदी पातळ नकोच. चिंचेचा कोळही प्रमाणातच वापरा. जास्त नको.''
आता हे सारण खेकड्याच्या पोटाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या खाचेत तसेच पाठीच्या मध्य भागात भरून घ्या.
आता पाठ आणि पोट पुन्हा एकत्र जुळवा. पहिल्यांदाच केल्यामुळे एकत्र राहणार नाही असे वाटत असेल तर दोर्याने बांधून घेतले तरी चालेल.
राहिलेल्या पिठाचे गोळे करून बाजूला ठेवा. ते नंतर रश्यात सोडता येतात.
आता आपण रस्सा करायला घेऊ.
भांड्यात तेल गरम करून त्याला लसूण पाकळ्यांची फोडणी द्या. त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतवा.
ह्यावर आले- लसुण पेस्ट टाकून परता मग त्यात हिंग, हळद मसाला घालून ढवळा व १ ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त गरजे नुसार पाणी घाला आणि खेकडे अलगद त्यात ठेवा.
वरून खेकड्यांचे मोठे नांगे टाका.
आता झाकण टाकून चांगले उकळू द्या. पाणी भांड्या बाहेर जाईल असे वाटत असेल तर थोडी गॅप ठेवा झाकणात.
एकीकडे कांदा खोबर्याचे वाटण करायला घ्या.
कांदा अगदी चमचाभर तेलात भाजून घ्या. नंतर सुके खोबरे बाजून घ्या.
थंड झाले की मिक्सर मधून वाटून घ्या.
रस्सा उकळत असताना मधूनच हलक्या हाताने ढवळून घ्या. पहिल्या उकळी नंतर ढवळल्या नंतर पिठाचे केलेल गोळे रश्यात शिजण्यासाठी सोडा.
साधारण १५ ते २० मिनीटे तरी मध्यम आचेवर हा रस्सा उकळू द्या. पाण्याची गरज वाटल्यास मधून पाणी टाका. आता २० मिनीटां नंतर ह्यात चिंचेचा कोळ घाला नंतर खांदा-खोबर्याचे वाटण, मिठ गरम मसाला घाला. व पुन्हा चांगली उकळी येऊ द्या.
उकळले की गॅस बंद करा. वाटल्यास थोडी चिरलेली कोथिंबीर स्वादासाठी वरून पेरा.
बहुतेक टिपा मी वर दिल्या आहेतच. तरीपण चिंच कमी घाला. कारण चिंबोर्याचा रस्सा इतर माश्यांप्रमाणे आंबट चांगला नाही लागत. फक्त वास मोडण्या करीता चिंचेचा वापर केला आहे.
लाख म्हणजे काय हा ही प्रश्न बर्याचदा विचारला आहे म्हणून खालील आख्खा शिजवलेला खेकडा लाखेने भरलेला. लाख अंडे किंवा गाभोळीच्या प्रकारात मोडते.
बर्याच व्हेजी माबोकरांना फोटो पहावणार नाहीत पण बर्याच जणांनी मला ही रेसिपी विचारली होती म्हणून डिटेल मध्ये दिले आहे.
मी खात नाही, पण नवख्याना हे
मी खात नाही, पण नवख्याना हे कसं खायचं ह्याची टिप्स द्या राव,

कडामकुडुम आवाज नुसता.
आहाहा... ते बघुनच भुक लागली.
आहाहा... ते बघुनच भुक लागली. आमच्या आई पण अगदी असेच करतात भरलेले खेकडे. मस्त लागतात एकदम.
wow!!!! दिल गार्डन गार्डन हो
wow!!!!
दिल गार्डन गार्डन हो गया
आता नक्कीच भेट तुझ्याकडे
आलि आलि जागुचि रेसिपि
आलि आलि जागुचि रेसिपि आलि...... मस्तच......आताच ताव मारा .....:)
:
जागु>>>>>>>>>>> माधुरीचं
जागु>>>>>>>>>>>
माधुरीचं गाणं आठवलं गं बाई फोटू पाहून..
,' मार डाला.. हाय मार डाला>>>> "
जबरी !! कसलं डीटेल मध्ये
जबरी !!
कसलं डीटेल मध्ये लिहिलय..
घरी वगैरे करणार नाही.. कोणी आयते दिले तर खाऊ येउन..
कसलं डीटेल मध्ये लिहिलय..>>
कसलं डीटेल मध्ये लिहिलय..>> +१ .मस्त फोटो!
आम्ही बेसनाऐवजी आख्खे मूग भाजुन त्याचे भरड पीठ घेतो. आणि पीठ भिजवायला बारीक पायांचा रस वापरतो.
रच्याकने डोंगरी खेकडे खाल्ल्याला आता २० वर्षं उलटली.
मी शाकाहारी आहे, तरी रेसीपी
मी शाकाहारी आहे, तरी रेसीपी आवडली आणि डीटेलींग सुद्धा...!
जियो जागू ताई...!
मस्त गं.. आमच्या कॉलनीतल्या
मस्त गं.. आमच्या कॉलनीतल्या एक आज्जीबाई करतात पण त्यांना रवीवारी वेळ नसतो आणि मला रविवारशिवाय वेळ नसतो त्यामुळे ही रेसिपी कशी करायची हा प्रश्न पडलेला. आता खेकडे आणुन करतेच. तोवर चैन नाही

जबरदस्त! ही तूझी आत्ता
जबरदस्त!
ही तूझी आत्ता परेन्तची सगळ्यात बेस्ट पाक्रु.
सुपरभन्नाट पाककृती!
सुपरभन्नाट पाककृती! व्यवस्थीत, पायरीनं लिहिल्या आणि दाखवल्यामुळे करून बघण्याचा धीर होईल.
फोटोपण आवडले.
फोटो तोंपासु आहेत एकदम. पण हे
फोटो तोंपासु आहेत एकदम. पण हे प्रकरण कसे खायचे हेच मला समजत नाही त्यामुळे हॉटेलात ऑर्डर करण्याची हिंमत झाली नाहीये कधी
सुपरभन्नाट पाककृती!>>+१
सुपरभन्नाट पाककृती!>>+१
बाप रे जागू सॉलिड. कित्ती
बाप रे जागू
सॉलिड. कित्ती कष्ट असतील ह्या पाकृत ते फोटोवरूनच कळतंय.
पाप लागेल तुला 
बाकी मासा खायला शिकले खूप झालं.
हे खायला शिकवू नकोस मला...
अहा, पाककृती आहे. पण फार
अहा, पाककृती आहे. पण फार खटपटीची आहे.
भारी आहे रेस्पी. उन्हाळ्यात
भारी आहे रेस्पी. उन्हाळ्यात चांगले भरलेले खेकडे मिळायला इथे, तेंव्हा करुन पाहीन.
हे इतकं हेवी खावून झोप नाही
हे इतकं हेवी खावून झोप नाही येत? मला नेहमीच खेकडे खाल्ले की झोप येते.
नाही नाही मला हा बाफ बघायचा
नाही नाही मला हा बाफ बघायचा पण नाही

बाप रे .. केव्हढी खटपट! पण
बाप रे .. केव्हढी खटपट!
पण हे आवडून घेणं, खाणं, करणं आपल्याच्याने नाही जमायचं बाबा!
लहान असताना भरलेल्या
लहान असताना भरलेल्या चिंबोर्या प्राणप्रिय होत्या..
जागूताई, मस्त प्रकार आहे.
जागूताई,
मस्त प्रकार आहे. क्षुधाग्नी रसरसून प्रज्वलित झालाय. खेकडे विशेषत: चिंबोर्या म्हंटलं की जणू देहभान हरपायला होतं.
व्यवस्थित खायचे झाले तर तीन खेकडे नांग्यांसकट फोडून खाण्यात तासभर सहज जातो.
>> जर आपल्याला खेकड्यांचे पाय काढता येत नसतील तर ते शक्यतो कोळणींकडूनच काढून घ्यायचे.
इथे नांगडे हवं होतं ना? कोळीणींना पाय उचकटून देतांना बघितलं नाहीये.
इथे इंग्लंडमध्ये अटलांटिक महासागरातले खेकडे मिळतात. पण आमच्या घरी पीठ न घालता करतात. बायकोला ही पाकृ देतो. बघूया पीठ घालून कसे करते ते. धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
अप्रतिम आत्ता खाव्याशा वाटत
अप्रतिम आत्ता खाव्याशा वाटत आहे!
काही करणार नाही आहे. .. इकडे
काही करणार नाही आहे. ;)..
इकडे जबरी मोठ्ठाले खेकडे मिळतात त्यामुळे ही मेहनत मरोच ...:)
जागू आमच्या गुरूवारी तू हे असले प्रकार टाकून पुण्य गमवतेय्स
मस्त क्रमवार फोटोज...लगे रहो (फक्त पुढच्या वेळी मुहुर्त रविवारचा वगैरे काढ) खेकडे खायला इतका वेळ लागतो की तू मधल्या वारी केलेस तरी निवांत खायला कसं जमतं????
एकदम भारी फोटो जागु! पण
एकदम भारी फोटो जागु!
पण खाण्यापेक्षा खाण्याची कसरतच खुप करावी लागते.
इथे नांगडे हवं होतं ना? >>> गापै किमान नांगी तरी म्हणा
जगुदि खूप दिवसांनी तुमची नवीन
जगुदि खूप दिवसांनी तुमची नवीन पाककृती पहिली. क्रमवार फोटो सुद्धा सुरेख आहेत. पाककृती खरच खूप छान आणि मेहनत पण तितकीच आहे. मला जमण्यासारखी नाही आहे पण पहावयास मात्र नक्की आवडली.
जागु, तोंपासु रेसिपी. फोटो
जागु, तोंपासु रेसिपी. फोटो बघुन तर कधी खाते असे झाले. मस्तच!
मी कधीच करणार नाही आणि खाणार
मी कधीच करणार नाही आणि खाणार नाही!
पण तुझ्या पेशन्सला सलाम! एव्हढी किचकट पाकृ स्टेप बाय स्टेप फोटो काढून किती सोप्या पद्धतीने लिहीली आहेस.
वत्सला +१
वत्सला +१
मस्त लिहिले आहेस. नवख्या
मस्त लिहिले आहेस. नवख्या लोकांना पण हाताळता येतील.
आपल्याकडे सॉफ्ट शेल क्रॅब्स नाही का मिळत ? हे खेकडे मऊ पाठीचे असतात आणि कवचासकट खातात.
जागु मस्तच !!!!!!!!!!!!!!!!!
जागु मस्तच !!!!!!!!!!!!!!!!! आता खेकडे आणले कि या पद्धतीने करून ब्घेन
Pages