प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा

Submitted by पराग१२२६३ on 22 January, 2014 - 01:19

राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट यादरम्यान पसरलेल्या राजपथावर दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे भव्य संचलन पार पडते. हे संचलन म्हणजे भारताची लष्करी क्षमता, विविध क्षेत्रांमधील प्रगती, इतिहास, संस्कृती, परंपरा अशा अनेक गोष्टींची माहिती करून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन असते. इतके वैविध्य असलेले आणि विविध रंगांची उधळण करणारे हे आज जगातील एकमेव भव्य संचलन ठरले आहे. गेली वीस वर्षे मी हा सोहळा न चुकता पाहत आहे. हा सोहळा मला कायमच प्रेरणा देत राहिला आहे, इतका की वर्षभर मला केवळ या सोहळ्याचीच प्रतीक्षा असते. माझ्या पीसीचे वॉलपेपरही याच सोहळ्याशी संबंधित असतात. हा सोहळा अन्य दूरचित्रवाहिन्यांपेक्षा केवळ दूरदर्शनवरच पाहणे मला अधिक भावते. अशा प्रकारे सतत मला प्रेरणा देत राहिलेल्या आणि या जगातील सर्वांत मोठ्या प्रजासत्ताकाच्या सोहळ्याची थोडक्यात माहिती इतरांनाही व्हावी हा या लिखाणामागील हेतू.
२६ जानेवारी १९५० रोजी भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू होऊन भारत एक सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक बनला. कित्येक वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारताचा राज्यकारभार थेट भारतीयांकडून पाहिला जाऊ लागला. प्रौढ मताधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही यांसारख्या नवनवीन संकल्पनांशी भारतीयांची ओळख झाली. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन पाळला जाऊ लागला.
२६ जानेवारी या दिनांकाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातही महत्त्व आहे. डिसेंबर १९२९मधील ‘लाहोर काँग्रेस’च्या शेवटी रावी नदीच्या किनारी अधिवेशनाचे अध्यक्ष पं. नेहरु यांच्या नेतृत्वाखाली ‘संपूर्ण स्वराज्या’चा ठराव संमत झाला होता. त्या ठरावावर विचार करण्यासाठी ब्रिटिश प्रशासनाला २६ जानेवारी १९३०पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ब्रिटिशांकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने २६ जानेवारी १९३० रोजी ‘संपूर्ण स्वराज्या’च्या ठरावाचे देशभर जाहीर वाचन होऊन दरवर्षी हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दरवर्षी २६ जानेवारी ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा होत राहिला. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झालेली भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५०पासून अंमलात आणण्याचे ठरले.
राजधानी नवी दिल्लीत पूर्व-पश्चिम पसरलेल्या अडीच किलोमीटर लांबीच्या राजपथाच्या पूर्वेला आहेत असीम त्यागाची प्रतीके इंडिया गेट आणि अमर जवान ज्योती, तर पश्चिमेला आहेत भारताच्या सार्वभौमत्वाची प्रतीके राष्ट्रपती भवन, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्स आणि संसद भवन. इंडिया गेटच्या मागील तळ्यात असलेल्या छत्रीमध्ये पूर्वी जॉर्ज (पाचवा)चा पुतळा होता. स्वातंत्र्यानंतर तो हटविला गेला. याच राजपथावर दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन पार पडते. तेथील हिरवळीवर बसून भारताचे सामर्थ्य, सांस्कृतिक वैभव, प्रगती प्रत्यक्ष पाहणे हा अनुभव काही औरच!
हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा या संचलनापुरताच मर्यादित नसतो. या निमित्ताने केंद्र सरकारची विविध मंत्रालये राजधानीत विविध कार्यक्रम आयोजित करतात. जसे, लोकनृत्याचे आणि संगीताचे राष्ट्रीय महोत्सव, सर्वभाषा कवी आणि हास्यकवी संमेलन, राष्ट्रीय छात्रसेनेची (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजनेची (एनएसएस) एक महिन्याची राष्ट्रीय शिबिरे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २३ जानेवारीला राष्ट्रपती भारतातील विविध देशांच्या राजदुतांसाठी राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभ आयोजित करतात.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून संदेश देण्याबरोबरच लष्करी, निमलष्करी दलांसाठी परमवीर व अशोक चक्र आदी, पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांसाठी राष्ट्रपतींचे पदक, भारतरत्न व पद्म सन्मान जाहीर करतात. पंतप्रधान शूर मुलांना जाहीर झालेले शौर्य सन्मान प्रदान करतात.
प्रजासत्ताक दिनाचे संचलन राजपथाच्या पश्चिमेकडील विजय चौकापासून लाल किल्ल्यापर्यंत जाते. संचलनाच्या सुरुवातीला पंतप्रधान देशाच्यावतीने अमर जवान ज्योती येथे शहीद जवानांना आदरांजली वाहतात. ही परंपरा १९७२पासून सुरू झाली. त्यावेळी या परिसरात ६१ कॅव्हेलरी या जगातील एकमेव घोडदळाचे जवान आणि तीन्ही सैन्यदलांचे १७१ जवान उपस्थित असतात. या प्रसंगी संपूर्ण परिसरातील वातावरण गंभीर झालेले असते. या सोहळ्यासाठी राजपथावर विविध रंगी फुलांची सजावट केली जाते. राजपथाच्या मध्यभागी राष्ट्रपती, प्रमुख अतिथी, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आदींसाठी एक सलामी मंच उभारला जातो. सलामी मंचासमोर असलेले लष्कराचे संगीतपथक संचलनाच्यावेळी वेगवेगळ्या संगीतरचना सादर करतात. त्यांच्या संगीताबरोबरच संपूर्ण राजपथाच्या दोन्ही बाजूंना फडफडणारे राष्ट्रध्वज संचलनात वेगळाच उत्साह भरतात.
आकर्षक वेशभूषेतील ‘राष्ट्रपतींच्या अंगरक्षकां’बरोबर होणारे राष्ट्रपती आणि प्रमुख अतिथींचे आगमन, ध्वजवंदनानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते परमवीर किंवा अशोक चक्र प्रदान केले जाते. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी, जीपमधून येणारे आधीचे परमवीर आणि अशोक चक्रविजेते, देशाच्या लष्करी क्षमतेचे प्रदर्शन, विविध रेजिमेंटच्या जवानांबरोबरच निवृत्त जवानांचे उत्स्फूर्त संचलन, ‘६१ कॅव्हेलरी’ आणि जगातील एकमेव उंटदळ (सीमा सुरक्षा दल) यांचा सहभाग, चित्ररथ, शाळकरी मुलांचे नृत्य, मोटरसायकलस्वारांच्या कसरती, फ्लाय पास, संचलनाची ही काही खास आकर्षणे. संचलनाच्या शेवटी केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगांचे फुगे हवेत सोडले जातात.
दरवर्षी भारताचे राष्ट्रपती वर्षभरात ज्या देशाशी विशेष प्राधान्याने संबंध विकसित केले जाणार असतील, त्या देशाच्या प्रमुखाला या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करतात. संचलनानंतर राष्ट्रपती सायंकाळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ, भारताचे सरन्यायाधीश, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, सर्व खासदार, प्रमुख पाहुणे आदींसाठी ‘ॲट होम’ हा स्वागत समारंभ आयोजित करतात.
संचलनानंतर राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती एनसीसीच्या छात्रांसाठी विशेष समारंभ आयोजित करतात. उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीही संचलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या विविध राज्यांमधील कलाकारांच्या भेटी घेतात. तसेच राजधानीमध्ये प्रजासत्ताक दिन शिबिराला आलेल्या एनसीसी छात्र आणि चित्ररथाच्या कलाकारांसाठी पंतप्रधान चहापानचा समारंभ आयोजित करतात. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराचा समारोप ‘पंतप्रधानांच्या रॅली’ने २८ जानेवारीला होतो.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप समारंभ ‘बिटींग रीट्रिट’ २९ जानेवारीला सायंकाळी होतो. ‘विजय चौका’त होणारा हा समारंभ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विविध देशांचे राजदूत आदींच्या उपस्थितीत पार पडतो. यात लष्कराच्या तिन्ही दलांची संगीत पथके खास वेषभूषेत आकर्षक धून सादर करतात. त्यावेळी सीमा सुरक्षा दलाचे सजलेले उंट आणि ’६१ कॅव्हेलरी’चे घोडेस्वार या समारंभाची शोभा आणखीनच वाढवितात. समारंभाच्या शेवटी रीट्रिटच्या धूनवर राष्ट्रध्वज सन्मानाने उतरविला जातो. यानंतर ‘सारे जहां से अच्छा’च्या धूनवर सर्व जवान राष्ट्रपती भवनाकडे माघारी जातात आणि एका क्षणात राष्ट्रपती भवन, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्स, संसद भवन, इंडिया गेट ही सारी प्रजासत्ताकाची प्रतीके आकर्षक रोषणाईने उजळून निघतात. अशी रोषणाई आठवडाभर केली जाते.
प्राचीनकाळी सूर्यास्त झाल्यावर शंखनाद करून सूर्योदयापर्यंत युद्ध थांबविण्याची भारतात प्रथा होती. शंखनाद झाल्यावर युद्धभूमीवरील ध्वज उतरवून बराकीत जाताना विविध प्रकारच्या धून वाजवित असत. अशा प्रकारचे उल्लेख महाभारतातही आढळतात. ही परंपरा युरोपात सतराव्या शतकात ‘बिटींग रीट्रिट’च्या पद्धतीने नावारुपाला आली.
वक्तशीरपणा, विविध रंगांची उधळण, उत्साह, शिस्त, राष्ट्रभावना ही संपूर्ण सोहळ्याची ठळक वैशिष्ट्ये. एकाच संचलनात इतके वैविध्य जगात केवळ याच संचलनात आढळते. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडिअममध्ये पार पडले होते. त्यानंतर राजपथावर होऊ लागलेल्या या संचलनात सुरुवातीची काही वर्षे लष्कराचाच सहभाग असे. पुढे पं. नेहरुंच्या इच्छेनुसार या संचलनात सांस्कृतिक संचलनही सुरू झाले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान समयोचित लेख. प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती एका परिच्छेदात का बरं आटपली? सविस्तर वाचायला आवडले असते.

आजच सकाळी आकाशवाणीवरच्या बातम्यांद्वारे राजपथ आणि इंडिया गेटची सैर झाली.
कडाक्याच्या थंडीत लष्कराच्या, पोलिसांच्या आणि शाळकरी मुलांच्या तुकड्यांचा संचलनाचा सराव चालला होता.
लहानपणापासून या संचलनाचे आकर्षण आहे ते अजून ओसरलेले नाही हे या लेखाच्या निमित्ताने लक्षात आले. वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ बघताना महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असेल याची उत्सुकता वाटत राही. २००९ च्या प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कारांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. शौर्य पुरस्कार मिळालेली मुले हत्तीवर बसून मिरवतात ना?

छान लेख. आवडला.

मीही दरवर्षी आवर्जून हा संचलन सोहळा दूरदर्शनवर बघते. दरवर्षी नव्याने अंगावर रोमांच उभं राहतं. निवेदकांची हिंदी भाषा कानांना सुखावते.

२००९ शौर्य पुरस्कार>>> भरत मयेकरांना अनुमोदन! खूपच भावूक व्हायला झालं होतं ते दृश्य बघताना...

२००३ - या २००४ साली मरिन ड्राईव्ह वर एअरफोर्स यांचा संचलन झालेले..

सुखोई... मिग २९ , जॅग्वार, मिराज... सुर्यकिरण .. चेतन हॅलिकॉप्टर यांचे प्रात्यक्षिक जबरद्स्त झालेले....

प्रत्यक्ष बघताना रोमांच उभ राहते