आर्जव

Submitted by संतोष वाटपाडे on 16 January, 2014 - 20:08

तिच्या पावलांच्या खुणा शोधतो मी कबर आठवांची जुनी खोदतो मी,
उरी गोठल्या हुंदक्यांना नव्याने पुन्हा लोचनातून बोलावतो मी..

जिथे भेटलो कैक वेळा तिथेही फ़िरायास जाता तिचा भास होतो,
नदिच्या किनार्‍यासवे बोलताना तिची बोलकी सावली पाहतो मी....

कधी हाक प्रेमात मारायची ती कधी घ्यायची नाव लाडातलेही,
पहाडात आवाज देताच काही जुनी हाक कानी पुन्हा ऐकतो मी.....

गुलाबास वेणीत लावायची ती नवे देत हाती जुने घ्यायचो मी,
घरी ठेवलेल्या वहीतील आता सुट्या पाकळ्या मस्तकी लावतो मी....

तिच्या पांढर्‍या लाजर्‍या ओढणीने कधी झाकले तोंड होते सुखाने,
नभी थांबल्या श्वेतमेघात एका तसा स्पर्श शोधायला लागतो मी....

जुन्या प्रेमपत्रातल्या भावनांची मुळे कागदातून बाहेर आली,
फ़ुले यातनांची फ़ुलू लागली की मनातील धाग्यातही माळतो मी...

मला सोडताना तिने ढाळल्या आसवांची फ़ुले आज बहरून आली,
तरी वाळलेली तिची आसवे रोज बागेत सार्‍या कसा शोधतो मी.....

रडायास येता मला सावरावे मुखातील गाणे तिने थांबवावे,
जुन्या आठवांच्या नको यातना या तिचा हात हाती पुन्हा मागतो मी.....

--- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख रचना!

तिच्या पांढर्‍या लाजर्‍या ओढणीने कधी झाकले तोंड होते सुखाने,
नभी थांबल्या श्वेतमेघात एका तसा स्पर्श शोधायला लागतो मी.>> हे फार आवडले!

मस्त..

जुन्या प्रेमपत्रातल्या भावनांची मुळे कागदातून बाहेर आली,
फ़ुले यातनांची फ़ुलू लागली की मनातील धाग्यातही माळतो मी..>>
व्वा

संपूर्ण रचना आवडली.

गुलाबास वेणीत लावायची ती नवे देत हाती जुने घ्यायचो मी,
घरी ठेवलेल्या वहीतील आता सुट्या पाकळ्या मस्तकी लावतो मी....>>> हे फार भिडले मनाला!