डॉ. थालमान यांनी केला संजीवनी-विद्येचा प्रयोग !
एखाद्या उत्तुंग इमारतीवरून पडत असलेल्या मुलीला झुपकन येवून पडतापडता अलगदपणे झेलून सुखरूपपणे जमिनीवर आणून सोडणारा 'सुपरमॅन' अथवा 'शक्तिमान' आपण आपल्या मुलांसोबत टी व्ही वर पाहून नक्कीच टाळ्या वाजवल्या असतील. पण एखाद्या हिमतळयात बुडून लौकिक अर्थाने अर्धा तासभर मेलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीला पुन्हा जीवित करण्याचा 'संजीवनी विद्या प्रयोग' केला होता एका सुपर-डॉक्टरने !
अशा ह्या आठवणी पुन्हा जागृत होण्याचे कारण घडले एक झपाटून टाकणारे पुस्तक! भारतीय वंशाचे एक अमेरिकन डॉक्टर श्री अतुल गवांदे यांनी लिहिलेले 'चेकलिस्ट मॅनिफेस्टो' हे ते पुस्तक! याची मराठी अनुवादित आवृत्तीदेखील सुदैवाने उपलब्ध आहे. या पुस्तकातील ही सत्यकथा मला एक वेगळाच अनुभव देवून गेली.
मी माझ्या इतर काही आठवणीसोबत लिहिलेली ही वैद्यकीय प्रबोधन कथा आपणास निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे !
------------
बुडत्याचा पाय आणि मदतीचा हात !
बोरावके वस्तीवर एकच गलका झाला,"गावंडांच्या विहिरीमध्ये उत्तम आणि अनिल बुडाले!" ही बातमी घेवून येणाऱ्या सोपान्याची पुरती दमछाक झाली होती. हातामधील कामे तशीच सोडून सगळी माणसे विहिरीकडे धावली. एका हाताने आपल्या धोतराचा सोगा कसाबसा सावरत उत्तमचे वडील, किसनअप्पा, त्यासर्वांच्या पुढे होते.
वस्तीवरील सर्व मुलांना अप्पांनीच पोहायला शिकवले होते. किसनराव बोरावके हे माझे मामा होते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी महिनाभर मामांकडे राहण्यासाठी जात असे. इतर भावंडांबरोबर अप्पामामा मलाही विहिरीवर घेवून गेलेले. कंबरेला पोकळ भोपळा बांधून मी ही पाण्यात उतरलो खरा पण थंड पाण्याला घाबरून मी पाण्याबाहेर आलो ते कायमचाच! मी मात्र एक शहरी आणि घाबरट मुलगा म्हणून सर्वांच्या चेष्टेचा विषय झालो होतो.
उत्तमला देखील अप्पांनीच नुकतेच पोहायला शिकवले होते. त्या दिवशी दुपारी सर्वांची नजर चुकवून उत्तम आणि झगड्यांचा अनिल विहिरीकडे पळाले होते. रस्त्याच्या कडेला असलेली गावंडांची विहीर वापरात नसल्यामुळे पडीकच होती. पाण्याचा उपसा नसल्यामुळे तिच्या तळाशी खूपच गाळ साचलेला होता. दहा वर्षे वयाच्या चिमुरड्या उत्तम आणि अनिल यांना मात्र त्याची कल्पना मुळीच नव्हती. एक, दोन आणि तीन म्हणून दोघांनीही विहिरीमध्ये सूर मारला. उत्तम वेगाने पाण्याखाली गेला आणि तळाच्या गाळामध्ये अडकला. अनिल मात्र पोहू लागला. उत्तमची वाट पाहूनही तो दिसेना तेंव्हा त्याचे धाबे दणाणले. मदतीसाठी त्याने आरडा ओरड सुरु केली. त्याचा आवाज ऐकून शेजारीच राहणारा शंकऱ्या भिल्ल आणि त्याचा मुलगा सोपान्या धावत आले. तोपर्यंत अनिलने डुबकी मारून उत्तमला वर काढण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैव असे कि तो ही त्या गाळामध्ये अडकला. विहिरीच्या पाण्यामध्ये त्याच्या शेवटच्या धडपडीचे आणि श्वासाचे बुडबुडे वर येवून फुटले आणि नंतर पाणी शांत झाले.
पोरगा बुडाल्याचे शंकऱ्या भिल्लाने पाहिले होते. क्षणाचाही विलंब न लावता अंगावरील कपड्यांनिशी त्याने विहिरीमध्ये उडी टाकली. तो पट्टीचा पोहोणारा असल्याने काही सेकंदातच अनिलची चड्डी पकडून त्याने त्याला वर काढले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे अनिल गुदमरून बेशुद्ध झाला होता. असा प्रसंग शंकऱ्यासाठी काही नवा नव्हता. त्याने पटकन अनिलचे पाय धरून त्याला गरगर फिरवून बरेचसे पाणी बाहेर काढले. त्याच्या ह्या गावठी प्रथमोपचारामुळे अनिलचा श्वास सुरु झाला आणि थोड्याच वेळात त्याने डोळे देखील उघडले. आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याला उत्तम तेथे दिसला नाही.
"बोरावक्यांचा उत्तम खाली गाळात अडकलेला आहे, त्याला काढा." अनिलचे हे बोलणे ऐकून शंकरच्या ओल्या अंगावर पुन्हा शहारे आले. सोपानला अनिलकडे लक्ष द्यायला सांगून त्याने पुन्हा विहिरीचा तळ गाठला. उत्तम गाळामध्ये चांगलाच फसला होता. मोठ्या मुश्किलीने शंकरने त्याला ओढून वर आणले. अनिलच्या तुलनेत उत्तमची प्रकृती खूपच गंभीर होती. शरीर पूर्णपणे थंडगार पडले होते, श्वास चालू नव्हता. उत्तम बोरावके जवळजवळ गेल्यातच जमा होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेवून शंकरने सोपानला उत्तमच्या घरी निरोप देण्यासाठी पिटाळले व स्वतः उत्तमच्या नाकातोंडात गेलेला चिखल काढू लागला. त्याच्या पोटावर व छातीवर दाब देवून बरेचसे पाणी बाहेर काढून त्याने पुन्हा पायांना धरून गरगर फिरवले पण उत्तमची काहीच हालचाल दिसत नव्हती. एव्हांना अप्पामामा आणि वस्तीवरील मंडळी येवून पोचली. अप्पा मोठ्या धीराचे पण पोटाच्या पोराला निपचित पडलेला पाहून त्यांचेही पाय लटपटू लागले. गावात कम्पौंडरचे काम करून करून कामचलावू डॉक्टर झालेला दगू इतरांना बाजूला करीत पुढे आला. निपचित पडलेल्या उत्तम शेजारी बसून त्याने उत्तमचे हातपाय हलवून पाहिले. हातपाय एकदम लुळे पडले होते. हाताचे मनगट हातात धरून त्याने उत्तमची नाडी पाहण्याचा प्रयत्न केला. एकाच्या फाटलेल्या धोतराचा धागा तोडून उत्तमच्या नाकापुढे धरून तो हलतो कि नाही तेही पाहिले. अप्पांच्याकडे पाहत तो भीतभीतच म्हणाला,"अप्पा, पोराची तब्ब्येत मोठी गंभीर दिसतेया, थोडीशी धुगधुगी वाटतेय, कोळपेवाडीच्या दवाखान्यात न्यायला पायजेल." तोपर्यंत घरची मोटारगाडी घेवून ड्रायव्हर बाबुभाई आलेच होते. अप्पांनी खाली वाकून उत्तमला उचलले आणि गाडीत घालून पुढच्याच मिनिटात गाडी पाच किलोमीटर अंतरावरील कोळपेवाडीच्या दिशेने सुसाट निघाली.
कोळपेवाडीतील डॉक्टर चव्हाणांनी उत्तमला तपासले व म्हणाले,"अप्पा, याची पल्स अगदी स्लो चालू आहे पण बिपी लागत नाही. मी सलाईन लावून देतो पण त्याला कोपरगावला नेणे योग्य होईल. डोक्याखाली उशी देवू नका. डोके थोडे खालीच ठेवा म्हणजे छातीमधील पाणी निघून येण्यास मदत देखील होईल. अंगावर दोन तीन पांघरुणे घाला म्हणजे त्याला जर उब देखील येईल. " या सूचना अंमलामध्ये आणून बाबुभाईंची गाडी कोपरगावच्या दिशेने निघाली. अर्ध्या तासाच्या या प्रवासामध्ये सर्वांचा जीव मात्र टांगणीला लागला होता.
कोपरगाव म्युनिसिपल हॉस्पिटल मधील डॉ. पाटील हे एक नामांकित भूलतज्ञ म्हणून प्रसिध्ध तर होतेच पण अशा गंभीर केसेस हाताळण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांनी उत्तमला ताबडतोब उपचार सुरु केले. " उत्तम आपल्या उपचारांना प्रतिसाद देतो आहे पण त्याचे बिपी अजूनही कमी आहे. बिपी लवकर वर न आल्यास मूत्रपिंडांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मेफेन्टीण हे इंजेक्शन अहमदनगरहून तांतडीने आणावे लागेल." कोपरगाव एसटी डेपोचे पोंक्षे साहेब अप्पांचे मित्रच होते. त्यांनी नगरला ट्रंककॉल करून पुढील एसटीद्वारे ते इंजेक्शन दोन तासांत मागवून दिल्यामुळे पुढील उपचार सुकर झाले. सुमारे बारा तासांनंतर उत्तमने डोळे उघडले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. आज पंचेचाळीस वर्षांनंतर ही उत्तमची तब्ब्येत ठणठणीत आहे.
'बुडून मृत्यू' अशी बातमी आपण अनेकदा ऐकतो. तीन वर्षांपेक्षा लहान मुलांत तर बादलीमध्ये अथवा संडास मधील कमोड मध्ये पडून बुडण्याचे अपघाती प्रमाण खूप आहे. 'टायट्यानीक' या ऐतिहासिक बोटबुडीवर आधारित चित्रपटामधील समुद्राच्या बर्फाळ पाण्यामध्ये गारठून हातांपायांच्या स्नायूंमधील शक्ती कमी कमी होवून नायिकेचा हात सुटून बुडालेला कथानायक आपल्या डोळ्यासमोरून लवकर हलत नाही. तीन शतकांपूर्वी फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला, विशेषतः स्त्रीयांना, पाण्यामध्ये बुडवून मारीत असत कि ज्यामुळे मृत व्यक्तीची जास्त तडफड होत नसे. बुडालेल्या व्यक्तींना वाचविण्याच्या तंत्रामध्ये आजकाल खूपच प्रगती झाली आहे. विशेषतः गारठून बुडालेल्या किंवा बुडून गारठलेल्या व्यक्ती तर पाण्याखाली चक्क एक तास राहूनही पुन्हा पूर्ववत झाल्याची उदाहरणे आहेत. गारठलेले शरीर म्हणजे रेफ्रीजरेटरमध्ये ठेवलेले जणू सफरचंदच ! हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी हायपोथर्मिया नावाचे तंत्र वापरीत असत. त्यामध्ये रुग्णाचे शरीर तापमान कृत्रिमरीत्या उतरविले जात असे, हृदयक्रिया थांबविली जात असे व नंतर शस्त्रक्रिया करीत असत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या शरीराचे तापमान हळूहळू पुन्हा वाढवून हृदयक्रिया पुन्हा चालू केली जात असे. बुडालेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी नेमके असेच करावे लागते. माणसाचा मेंदू प्राणवायूशिवाय फक्त सहा मिनिटेच जगू शकतो. तेंव्हा या उपचारांमधील धोका आणि डॉक्टरांचे कौशल्य यांवर बुडालेल्याचे भवितव्य अवलंबून असते.
असाच एक प्रसंग माझ्या स्मरणात अजूनही ताजा आहे. ते साल बहुतेक १९८० असावे. मी नुकतीच खाजगी प्रॕक्टीस सुरु केली होती. स्वारगेट जवळच्या एका पोहोण्याच्या तलावामध्ये एक दहा वर्षे वयाचा मुलगा मित्रांबरोबर पोहोणे शिकण्यासाठी गेला असताना तलावातील पाण्यात बुडाला. त्याला जवळच्याच हरजीवन हॉस्पिटलमध्ये घेवून आले होते. नेमकाच मी तेंव्हा तेथेच होतो. मुलाच्या शरीरामध्ये जीवनाची काहीही लक्षणे दिसत नव्हती. तरीही मी व डॉ. शेठ यांनी प्रथोमोपचारास सुरुवात केली. घशामध्ये ट्यूब घालून कृत्रिम श्वास देण्यास सुरुवात केली. सुमारे अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर त्याचे हृदय पुन्हा सुरु झाले. नाडी लागू लागली. लघवी देखील झाली. आता तो शुद्धीवर येणे बाकी होते. बारा तासांनी त्याच्या डोळ्यांच्या पापण्या देखील हलू लागल्या. पण त्या पापण्यांचे हलणे हेतुपूर्वक नसून मेंदूमधील पेशींची मृत्युपुर्वीची तडफड होती. त्याला वैद्यकीय प्रभाषेमध्ये 'मायोकलोनिक जर्क्स ' असे म्हणतात. त्यांचे तसे हलणे म्हणजे मेंदूला प्राणवायू कमी पडल्यामुळे झालेल्या व पुन्हा भरून न येणाऱ्या नुकसानीचे द्योतक होते. नातेवाईकांच्या आग्रहानुसार आम्ही प्रसिद्ध चेतापेशीतज्ञ डॉ. रुस्तम वाडिया यांचा सल्ला घेतला. त्यांनी पेशंटला बार्बीचुरेट हे औषध देवून काही दिवस कोमामध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. पण आमच्या अथक प्रयत्नांना प्रतिसाद न देता तो अनंतामध्ये विलीन झाला. त्यानंतर कितीतरी वेळ मी आणि डॉ. शेठ हताश होवून त्या अचेतन मृतदेहाकडे पाहतच राहिलो होतो.
ह्या आठवणी पुन्हा जागृत होण्याचे कारण घडले एक झपाटून टाकणारे पुस्तक! भारतीय वंशाचे एक अमेरिकन डॉक्टर श्री अतुल गवांदे यांनी लिहिलेले 'चेकलिस्ट मॅनिफेस्टो' हे ते पुस्तक! याची मराठी अनुवादित आवृत्तीदेखील सुदैवाने उपलब्ध आहे. या पुस्तकातील ही सत्यकथा मला एक वेगळाच अनुभव देवून गेली.
ऑस्ट्रिया हा मध्य युरोपमधील एक छोटासा देश. जवळ जवळ संपूर्ण देश आल्प्स पर्वताच्या रांगांनी व्यापलेला! हिमकुंडामध्ये पडून बुडण्याच्या घटना येथे नेहमीच घडतात. डॉ. मार्कस थालमान नावाच्या एका तरुण सर्जनला ही समस्या नेहमीच भेडसावीत असे. बुडालेल्या रुग्णांना कसे वाचविता येईल यावर त्याने खूप विचारआणि अभ्यास करून एक 'प्रोटोकॉल' म्हणजेच एक 'कृती-सूचिका' तयार केली होती आणि ती अमलात आणण्याचा दिवस लवकरच उजाडला !
चिमुकल्या गौरीने आपला तिसरा वाढदिवस नुकताच साजरा केला होता. आपल्या बोबड्या बोलीने आणि दुडक्या चालीने आईबाबांचे भावविश्व भारून टाकले होते. अशाच एका सकाळी तिला बरोबर घेवून आईबाबा फिरावयास निघाले. नुकताच बर्फवर्षाव होवून गेला होता. रस्त्याच्या शेजारी एक बर्फाळलेले तळे होते, अगदी आपल्या काश्मीरमधील सुप्रसिद्ध दाल सरोवरासारखेच ! वाटेमध्ये भेटलेल्या मित्रांबरोबर बोलताना छोट्या गौरीने केंव्हा हात सोडवून घेतला व नजर चुकवून केंव्हा पळाली हे त्यांच्या लक्ष्यातही आले नाही. आणि मग धप्पकन काहीतरी पडल्याचा आवाज आणि पाठोपाठ छोट्या गौरीची आर्त किंकाळी!
गौरीच्या आईबाबांवर तर आकाशच कोसळले. त्यांच्या डोळ्यादेखत गौरी त्या हिमतळ्यात दिसेनाशी झाली! तळे तसे खूपच खोल होते. आजूबाजूची माणसे मदतीला धावून आली. गौरीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. अनेकांनी तळ्यात उड्या टाकल्या पण गौरीचा तपास लागत नव्हता. पाण्याचे तापमान होते आठ डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच पाणी बर्फासारखे थंड असल्यामुळे एकाच व्यक्तीला जास्त वेळ पोहता येणे शक्य नव्हते. क्षणाक्षणाने काळ पुढे जात होता आणि गौरी सापडण्याची शक्यताही कमी होत होती. तोपर्यंत अशा प्रकारच्या पाण्यात उतरणारे खास पाणबुडे तेथे येवून पोहोचले आणि काही मिनिटांतच त्यांनी गौरीचा अचेतन देह पाण्यातून बाहेर काढला. गौरी तब्बल तीस मिनिटे त्या पाण्याखाली बुडालेली होती.
आता सुरु झाला 'डॉ. थालमान प्रोटोकॉल'! या ऑपरेशनमध्ये सर्वात महत्वाचा भाग होता टेलिफोन ऑपरेटरांचा! त्यांनी त्यंच्या चेकलिस्टनुसार सर्वांना संदेश पाठविण्यास सुरु केले. रुग्णवाहिका, हेलीकॉप्टर, स्वतः डॉ थालमान आणि त्यांची सर्व टीम, क्लागूनफ़र्त हॉस्पिटल मधील सर्व विभाग व ज्या सर्वांची गरज पडण्याची शक्यता होती ते सर्व! त्यानुसार प्रथमोपचार तज्ञांसह एक खास रुग्णवाहिका अपघातस्थळी येवून थांबली होती. गौरीला बाहेर काढताक्षणीच त्या टीमने आपले प्रथमोपचाराचे काम सुरु केले. त्यांची त्रिसूत्री होती,'ए ,बी, सी' - ए म्हणजे एअरवे अर्थात मोकळा श्वसनमार्ग , बी म्हणजे ब्रेथ्स अर्थात रुग्णाच्या तोंडावर आपले तोंड ठेवून त्याच्या फुफ्फुसामध्ये दर मिनिटास सोळा वेळा श्वास भरणे आणि सी म्हणजे कॉम्प्रेशनस म्हणजे मिनिटास साठ वेळा रुग्णाची छाती दाबून हृदयास मसाज करणे. या उपायांनी रुग्णाचे रक्ताभिसरण कृत्रिमरीत्या चालू ठेवले जाते. या क्रियेला वैद्यकीय प्रभाषेमध्ये 'सीपीआर ' असे म्हणतात. पुढच्या आठ मिनिटात गौरीला ऑस्ट्रियातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सुसज्ज हेलीकॉप्टर-रुग्णवाहिका येवून पोहोंचली आणि सतत सिपिआर करीतच पुढील वीस मिनिटांमध्ये गौरी क्लागूनफ़र्त हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. थालमान आणि टीम आता झपाट्याने कामाला लागले. प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेले काम करू लागला.
"सर, ह्या रुग्णाचा ग्लासगो कोमा स्केल स्कोर शून्य आहे. श्वास बंद, हृदयक्रिया बंद, डोळ्याच्या बाहुल्या पूर्ण विस्फारलेल्या असून शरीर कोणताही प्रतिसाद देत नाहीये. कानातील तापमान संवेदक एकोणीस डिग्री सेंटीग्रेड दाखवीत आहे."
गौरी सर्वसामान्य अनुमानानुसार मृत झाली होती नव्हे तर मृत होवून दीड तास उलटला होता. पण थालमानची टीम हार खाणार नव्हती. "जोपर्यंत शरीराचे तापमान पुन्हा नॉर्मल होत नाही तोपर्यंत बुडून थंडगार झालेली व्यक्ती मृत होत नसते!" - हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यानुसार त्यांचे प्रयत्न सुरु झाले होते.
"डॉक्टर डेव्हिड, गौरीचे रक्ताभिसरण पूर्णपणे बंद आहे ते आपणाला प्रथम सुरु केले पाहिजे. तिच्या हृदयाचे स्नायू पूर्णपणे गोठून आकसले असणार व त्यामुळे बाहेरून कितीही मसाज केला तरी ते सुरु होणार नाही. तिचे तापमान हळूहळू वाढविल्यानंतर हृदय पुन्हा काम सुरु करील यात मला शंका नाही. बाहेरून कृत्रिम पंप वापरून रक्ताभिसरण सुरु करू या."
गौरीच्या उजव्या जांघेतील शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये प्लास्टिकच्या नळ्या घालून अंशात्मक कार्डियाक बायपास मशीन सुरु करण्यात आले. सतत बिपी मॉनिटर करण्यासाठी डाव्या जांघेमध्ये आर्टेरियल लाईन तर निरनिराळी औषधे देण्यासाठी मानेतील शिरेमध्ये सेन्ट्रल लाईन अशा नळ्या बसवण्यात आल्या. तिच्या रक्तातील आम्लाचे प्रमाण व पोट्याशियमची पातळीदेखील खूपच वाढलेली होती. त्यावरही उपचार सुरु झाले. दर तासाला सुमारे तीन डिग्रीने शरीराचे अंतर्गत तापमान वाढू लागले. अपेक्षेप्रमाणे चोवीसपर्यंत तापमान वाढल्यानंतर गौरीची हृदयक्रिया पुन्हा सुरु झाली.
पहिला पडाव पार झाला होता!
पुढील तीन तासांपर्यंत गौरीची प्रगती उत्तमप्रकारे चालू होती. शरीरक्रिया हळूहळू सुधारत होत्या आणि तसे हळूहळू होणेच योग्य होते. अन्यथा मेंदूला कायमची इजा होण्याची शक्यता होती. पण तेवढ्यात धोक्याची घंटा वाजली. गौरीच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने उतरत असल्याचे डॉ. डेव्हिड यांच्या लक्षात आले. तिच्या तोंडातून रक्तमिश्रित फेस येवू लागला होता. त्यांनी तांतडीने डॉ. थालमानशी संपर्क साधला.
"सर, गौरीची तब्बेत बिघडली आहे, तिचे ऑक्सिजेन सॕच्युरेशन कमी होत आहे, बिपी देखील कमी होत आहे. मी डोपामिन सुरु केले आहे. पण तिला पल्मोनरी एडीमा झाला आहे असे मला वाटते आहे. माझ्या अनुभवातील अशा ' रीवार्मिंग शॉक'चा एकही रुग्ण आजपर्यंत तरी वाचलेला नाही. व्हेरी अनफोर्च्यूनेट गर्ल !"
"डॉ. डेव्हिड, या मुलीला वाचविण्यासाठी आपण एक नवे तंत्र वापरून पाहू या. तुम्ही ताबडतोब कृत्रिम फुफ्फुसतज्ञ डॉ. हाऊस यांना बोलवा, मी पण येतोच आहे. गौरीसाठी आपण प्रथमच एक्मो हे तंत्रज्ञान वापरणार आहोत. "
"पण सर, लहान तोंडी मोठा घास म्हणा पण आपल्या हॉस्पिटलमध्ये गौरी एवढ्या छोट्या मुलीसाठी लागणारे साहित्य आणि सर्जन्स देखील नाहीयेत! आणी हा प्रयोग फसला तर तिचे आईवडील आपल्याला व हॉस्पिटलला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाहीत!" डेव्हिडच्या बोलण्यातून भीती डोकावत होती.
"मी ते सर्व मॕनेज करीन, तुम्ही तयारीला लागा. मी स्वतःच हे ऑपरेशन करणार आहे. दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही आणि मला हताशपणे बसून ह्या मुलीला मरताना पाहायचे नाहीये !"
पुढील काही मिनिटांतच थालमान आणि हाऊस यांनी गौरीवरील शस्त्रक्रिया सुरु केली. तिची चिमुकली छाती हनुमानाप्रमाणे उधडून त्यांनी कृत्रिम फुफ्फुसाच्या दोन नळ्या तिच्या इवल्याशा हृदयात बसवल्या आणि एक्मो मशिनने आपले आपले काम सुरु केले. गौरीच्या तब्बेतीचा धोका आत्तापुरता तरी टळला होता. तिच्या उधड्या छातीवर प्लास्टीकचे आवरण घालून तिला आयसीयू मध्ये हलविण्यात आले. गौरीची फुफ्फुसे पाण्याशी संपर्क आल्यामुळे काम करीत नव्हती. आपल्या फुफ्फुसांचे कार्य नीट चालण्यासाठी सरफक्टन्ट नावाच्या रेणूची आवश्यकता असते. हे औषध आता कृत्रिमरीत्या तयार करतात. गौरीला त्या औषधाची वाफ सुरु केली. एक्मो मशीनबरोबर तिच्या फुफ्फुसांनाहि व्हेंटीलेटर लावून कृत्रिम श्वासोच्श्वास चालूच होता. सुमारे पंधरा तासांनंतर गौरीची स्वतःची फुफ्फुसे काम करू लागली आणि डॉ. हाऊस यांनी एक्मो मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला. थालमान यांनी तिच्या हृदयातील नळ्या काढून तिची छाती पूर्ववत शिवून टाकली.
गौरीने आता दुसरा पडाव पार केला होता.
आता वाट पाहणे होते गौरीच्या शुद्धीवर येण्याची! पण केवळ शुद्धीवर येवूनच नव्हे तर तिचा मेंदू पूर्ववत होणे आवश्यक होते. नाहीतर तिच्या जीवनाला काही अर्थ उरणार नव्हता. मात्र पूर्वीचा अनुभव पाठीशी असल्यामुळे डॉ. थालमान निश्चिंत होते. आपला मेंदू हाडांच्या कवटीमध्ये सुरक्षित ठेवलेला असतो. त्याला सूज आल्यानंतर फुगण्यासाठी पुरेशी जागा कवटीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे मेंदूतील दाब वाढतो आणि हाच वाढलेला दाब मेंदूची हानी करतो, अनेकदा मृत्यूचे कारण ठरतो. या दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याच दिवशी मेंदूच्या सर्जन करवी गौरीच्या कवटीला गिरमीटाने एक छोटेसे छिद्र पाडून त्यात एक छोटीशी नळी म्हणजेच कॕथेटर बसवण्यात आला. योग्य अशी औषधे वापरून मेंदूचा दाब वीसपर्यंत ठेवावा असे सर्वानुमते ठरले.
गौरीने आता तिसरा पडाव पार केला होता आणि आता बहुतेक अंतिम पडावामध्ये प्रवेश केला होता.
पण आता परीक्षा होती थालमान यांच्या पूर्ण टीमची! अजूनही गौरीचा श्वासोच्श्वास व्हेन्टीलेटर मशीनने चालू होता. बीपीसाठी डोपामिन, जंतूसंसर्ग टाळण्यासाठी अन्टीबायोटीक्स, मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित चालावे म्हणून अनेकविध प्रकारची सलायीन्स, रक्तातील वायू आणि क्षार यांचे सतत नियंत्रण असे एक ना अनेक प्रश्न अजून सुटायचे होते. पुढील दहा दिवस थालमान यांच्या टीमची परीक्षा चालूच राहिली. बारा दिवसांच्या या आधुनिक महाभारतानंतर गौरीच्या घशातील व्हेन्टीलेटरची नळी काढता आली आणि गौरीने क्षीण आवाजात आईला साद घातली !
दोन महिन्यांच्या फिजिओथेरपीनंतर गौरी पुन्हा आपल्या पायांवर घरी गेली.
त्यानंतर जगभरात सर्वत्र गेल्या चौदा वर्षात डॉ. थालमान यांच्या चेकलिस्टचा आणि त्यांच्या आदर्शाचा पाठपुरावा करीत त्यांच्या अनेक फॉलोव्हर्स चाहत्यांनी गौरी सारख्या अनेक बुडत्यांच्या पायाला मदतीचा हात दिला आहे.
धन्य धन्य डॉ. थालमान ! धन्यवाद डॉ. अतुल गवांदे सर !
खूप छान लेख! आश्चर्यचकित
खूप छान लेख! आश्चर्यचकित करणारी माहिती आहे!
छान लेख.
छान लेख.
छान आहे लेख.
छान आहे लेख.
लेखाबद्दल धन्यवाद डॉ. सुरेश
लेखाबद्दल धन्यवाद डॉ. सुरेश शिंदे!
डॉ. अतुल गवांदे यांचेही आभार. डॉ. थालमन तर महान आहेतंच!
आ.न.,
-गा.पै.
थरारक लेख. फार छान सोप्या
थरारक लेख. फार छान सोप्या शब्दात लिहिलय. मनापासुन धन्यवाद.
इतके दिवस कुठे होतात??? एवढ
इतके दिवस कुठे होतात??? एवढ मस्त लेखन खूप दिवसांनी वाचायला मिळत आहे! अप्रतिमच लेख.
अप्रतिम लेख.... धन्यवाद...
अप्रतिम लेख.... धन्यवाद...
मनावर प्रचंड दडपण आले वाचुन.
मनावर प्रचंड दडपण आले वाचुन. पण तितकच कौतुक डोक्टारांचेही. खुप वेगळी आणि चांगली, आशादायक माहीती. धन्यवाद.
आवडलं लिखाण .
आवडलं लिखाण .
़खूप छान. वाचायला खूप मजा
़खूप छान.
वाचायला खूप मजा आली.
वा..! हा लेखही छान. सकाळी
वा..! हा लेखही छान.
सकाळी सकाळी असे चांगले लेख वाचायला मिळाले की दिवस चांगला जातो.
सुंदर लेख. धन्यवाद
सुंदर लेख.
धन्यवाद
थरारक आणि अफाटदेखील.
थरारक आणि अफाटदेखील.
सुंदर लेख.. तुमचे दोन्ही लेख,
सुंदर लेख.. तुमचे दोन्ही लेख, लिहिण्याची हातोटी, सोपे शब्द वापरणे हे फार आवडले.
अप्रतिम लेख...
अप्रतिम लेख...
डॉक्टर, सुंदर लेख तुमचे
डॉक्टर, सुंदर लेख तुमचे दोन्ही लेख, लिहिण्याची हातोटी, सोपे शब्द वापरणे हे फार आवडले. >>> +१
जबरदस्त लेख गौरीची मृत्यूशी
जबरदस्त लेख गौरीची मृत्यूशी फाईट तर थरारकच. ते छाती उघडून आणि कवटीला भोक पाडून काय काय केलं ते वाचताना थोडं गरगरायला लागलं. तुमचं लिखाणच असं आहे की सगळं डोळ्यासमोर उभं रहातं.
बारा दिवसांच्या या आधुनिक महाभारतानंतर गौरीच्या घशातील व्हेन्टीलेटरची नळी काढता आली आणि गौरीने क्षीण आवाजात आईला साद घातली !>>>> डॉ. थालमानसारखा सारथी तिच्यापाठीशी होता.
डॉक्टर, धन्यवाद
अप्रतिम लेख! थरार जाणवला
अप्रतिम लेख! थरार जाणवला वाचताना.
थरारक लेख. बाप रे!
थरारक लेख. बाप रे!
छान अप्रतिम लेख.............
छान अप्रतिम लेख.............
लेखाबद्दल धन्यवाद.
लेखाबद्दल धन्यवाद.
अप्रतिम माहितीयुक्त लेख ही
अप्रतिम माहितीयुक्त लेख ही सत्य घटना आहे यावर विश्वास बसणार नाही अशीच आहे. पण आहे हे असेही आहे.
इथे लिहील्याबद्दल धन्यवाद.
वाचताना दर ओळीमागे ठोके वाढत
वाचताना दर ओळीमागे ठोके वाढत होते.. खुप छान लिहिता तुम्ही डॉक्टर. इतकी उत्कंठावर्धक वैद्यकिय कथा आणि त्यातले सत्य प्रथमच वाचले. सर्वस्वी नव्या गोष्टी आणि माहिती.
खुप खुप धन्यवाद.
छान अप्रतिम लेख. धन्यवाद.
छान अप्रतिम लेख. धन्यवाद.
मस्तच
मस्तच
छान अप्रतिम लेख. धन्यवाद.>+१
छान अप्रतिम लेख. धन्यवाद.>+१
खूप छान लेख! धन्यवाद
खूप छान लेख! धन्यवाद
अप्रतिम आणि अद्भुत... मजा
अप्रतिम आणि अद्भुत... मजा आली.
धन्यवाद डॉक्टर.
अप्रतिम माहितीयुक्त लेख स्मित
अप्रतिम माहितीयुक्त लेख स्मित ही सत्य घटना आहे यावर विश्वास बसणार नाही अशीच आहे >>+१
वाचताना दर ओळीमागे ठोके वाढत
वाचताना दर ओळीमागे ठोके वाढत होते.. खूप छान लिहिता तुम्ही डॉक्टर. इतकी उत्कंठावर्धक वैद्यकिय कथा आणि त्यातले सत्य प्रथमच वाचले. सर्वस्वी नव्या गोष्टी आणि माहिती. >>>>> +१००....
मनापासून धन्यवाद.
Pages