सॅव्हेज माऊंटन - ९

Submitted by स्पार्टाकस on 14 January, 2014 - 13:34

 

३ ऑगस्ट

पहाटे ५.००

विल्को वॅन रुजेनला झोपेतून जाग आली !

गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून रुजेन के २ वर खुल्या आकाशाखाली वावरत होता. छत्तीस तासांपूर्वी त्याने पाण्याचा शेवटचा घोट घेतला होता. मात्रं अद्यापही तो जीवंत होता !

खाली उतरून जाण्याला दुसरा पर्याय नव्हता !

रुजेनने दगडाच्या कडेकडेने खाली जाणारी वाट पकडली. पहाडाच्या कडेने जाणारा धोकादायक मार्ग आणि आदल्या रात्री त्याला धडकी भरवणारी कपार ( क्रिव्हाईस ) टाळण्याचा त्याचा विचार होता.

बेस कँपवर असलेल्या क्रिस किंकलला लाल ठिपक्यासारखा दिसणारा गिर्यारोहक पुन्हा हालचाल करत असल्याचं दृष्टीस पडलं होतं. किंकलने वॅन ऑसला गाठून ते दृष्य दाखवलं. तो गिर्यारोहक सेसन मार्गाच्या डाव्या बाजूला आणि कँप ३ च्या वर सुमारे ३०० फूट उंचीवर उजव्या दिशेने मार्गक्रमण करत होता.

किंकल आणि ऑस त्या गिर्यारोहकाचं निरीक्षण करत असतानाच एका सर्बीयन गिर्यारोहकाला कँप ३ च्या बरोबर वर सेसन मार्गावर खाली उतरत असलेला आणखीन एक गिर्यारोहक दिसला. तो अर्थातच कॅस वॅन डी गेवेल असणार होता ! गेवेल आणि रुजेन रात्रं उघड्यावर काढूनही अद्याप जिवंत होते !

किंकलने कँप ३ वर असलेल्या पेम्बा ग्याल्जेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु पेम्बा गाढ झोपेत होता.

गाढ झोपेत असलेल्या पेम्बाला आपल्या तंबूवर दगड येऊन आदळल्यामुळे जाग आली होती ! भीतीने हादरुन त्याने बाहेर नजर टाकली. काही अंतरावरुन खाली उतरत असलेल्या गेवेलमुळे तो दगड कोसळला होता. गेवेलला पाहिल्यावर पेम्बाला हायसं वाटलं.

पेम्बाने बेस कँपवर किंकलशी संपर्क साधला,

" मला कॅस दिसतो आहे ! काही मिनीटांतच तो इथे येईल !"

दहा मिनीटांतच गेवेल कँप ३ वर पोहोचला. बेस कँपवरुन किंकलने त्याला सेसन मार्गाजवळ दिसलेल्या गिर्यारोहकाबद्दल सांगीतलं.

" तुमच्यापासून तो जेमतेम अडीचशे ते तीनशे फूट अंतरावर असेल. फक्त मधे असलेल्या बर्फाच्या ढिगामुळे तो तुम्हाला दिसत नसावा ! त्याला गाठण्याचा प्रयत्न करा !"

कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांनी कँप ४ सोडला आणि बेस कँप कडे कूच केलं. अद्यापही कँप ४ वर असलेल्या मार्को कन्फर्टोलाला कोणतीही मदत करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही.

सकाळी ६.००

पेम्बा ग्याल्जे आणि कॅस वॅन डी गेवेल त्या गिर्यारोहकाला गाठण्यासाठी बाहेर पडले होते.

रुजेनने खाली उतरण्यास सुरवात केली होती. रात्रीच्या विश्रांतीने तो बराच ताजातवाना झाला होता. खडकाळ भागाच्या कडेने आणि काही धोकादायक कपारी ओलांडून तो खाली सरकत असतांनाच त्याचा सॅटेलाईट फोन वाजला.

" विल्को !" त्याचा आवाज ऐकू येताच हेलीन अत्यानंदाने चित्कारली.
" मी एकदम ठीक आहे !" रुजेन उत्तरला, " मी खाली जातो आहे ! उतार हळूहळू कमी होत चालला आहे ! मी बहुतेक कँप १ जवळ पोहोचलो आहे !"
" खाली उतरत रहा ! कीप् मूव्हींग !"
" ठीक आहे ! कँपवर पोहोचल्यावर मी पुन्हा फोन करेन !"

फोन बंद करुन रुजेन पुढे निघाला. बर्फाच्या एका मोठ्या तुकड्याला वळसा घालून तो खाली आला आणि त्याला सुरक्षा दोर दिसला ! निश्चीतच तो खाली जाणारा मार्ग होता ! सेसन किंवा दुसरा कोणता तरी मार्ग !

सकाळी ७.००

दोराच्या सहाय्याने खाली उतरण्याच्या तयारीत असलेल्या रुजेनला खाली दूरवर दोन तंबू दिसत होते. तो बहुधा कँप १ असावा.

त्याचवेळी आपल्या दिशेने येणा-या दोन गिर्यारोहकांकडे त्याचं लक्षं गेलं !

सुटका !

त्या गिर्यारोहकांजवळ पाणी असणार होतं ! जवळपास चाळीस तासांनी त्याला पाणी मिळणार होतं !

एकेक पाऊल सावकाशपणे उचलत रुजेन त्या दोन गिर्यारोहकांच्या दिशेने निघाला. ते अद्यापही सुमारे तीनेकशे फूट दूर होते. काही अंतर गेल्यावर त्याला एका गिर्यारोहकाचा निळ्या रंगाचा आणि दुस-याचा त्याच्यासारखाच लाल गिर्यारोहणाचा पोशाख दिसला आणि त्याक्षणी तो गिर्यारोहक कोण असावा याची रुजेनला कल्पना आली.

कॅस ! कॅस वॅन डी गेवेल ! विल्को वॅन रुजेनचा जिवलग मित्रं !

रुजेनची गाठ पडताच गेवेलने त्याला गाढ आलिंगन दिलं. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूंच्या सरींवर सरी वाहत होत्या.

" आपण पुन्हा कधीच एकमेकाला पाहू शकणार नाही अशी माझी कल्पना झाली होती !" गेवेल म्हणाला.

कँप ४ वर असलेल्या मार्को कन्फर्टोलाला जाग आली. कँप ४ वर त्याच्याव्यतिरीक्त केवळ दोन पाकीस्तानी पोर्टर उरले होते. कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांनी कधीच गाशा गुंडाळून खाली प्रस्थान केल्याचं त्याच्या नजरेस पडलं. कन्फर्टोलाने अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने बेस कँपची वाट धरली.

सकाळी ८.००

पेम्बा आणि गेवेलच्या सहाय्याने रुजेन कँप ३ वर परतला. दोन-तीन लिटर पाणी प्यायल्यावर त्याला जरा हुशारी आली. पेम्बाजवळ असलेल्या ऑक्सीजन सिलेंडरचाही त्याने वापर केला. स्थिरस्थावर झाल्यानंतर आपण अद्यापही कँप ३ वर असल्याचं कळल्यावर मात्रं त्याचा मूळचा चिडखोर स्वभाव उफाळून वर आला !

" अशक्यं ! कित्येक तास मी खाली उतरतो आहे आणि तुमच्या मते मी अद्याप कँप ३ वरच आहे ? मी खात्रीने सांगतो मी कॅंप १ च्या जवळ पोहोचलो होतो !"

रुजेन अत्यंत आक्रमक स्वरात खेकसला.

पेम्बाने त्याला सत्य परिस्थीतीची जाणीव करून दिली. तो कँप ३ वरच होता. बेस कँप अद्यापही ७००० फूट खाली होता !

गेवेलने त्याला पर्वतावरील मृत्यूंची माहीती दिली. मार्को कन्फर्टोला कँप ४ वर सहीसलामत होता. ह्यूजेस डी'ऑब्रेड आणि जेरार्ड मॅक्डोनेल मरण पावले होते. अर्थात बाकी कोणाबद्दल त्यांनी काहीच चर्चा केली नाही. रुजेनला इतरांची झालेली ससेहोलपट झालेली ऐकून आश्चर्य वाटलं.

" मला वाटलं, मी एकटाच या परिस्थीतीत सापडलो आहे !"

पेम्बाने बेस कँपवर रेडीओ संपर्क साधला. रुजेन सुरक्षीत असल्याचं समजल्यावर सर्वांनी जल्लोष केला. बेस कँपवर असलेल्या काही गिर्यारोहकांनी मदतीसाठी वर येण्याची तयारी दर्शवली, पण पेम्बाने त्यांना सक्त मनाई केली.

" आम्ही खाली उतरुन येऊ शकतो !" पेम्बा म्हणाला, " अद्याप अ‍ॅव्हलाँचचा धोका टळलेला नाही. आधीच बरेच जण मृत्यूमुखी पडले आहेत. उगाच आणखीन धोका पत्करु नका !"

सकाळी ९.००

पेम्बा, रुजेन आणि गेवेल कँप ३ वरुन परतीच्या वाटेला लागले. गेवेलला आता प्रचंड थकवा जाणवत होता. एकेक पाऊल उचलणं त्याच्या जीवावर आलं होतं. रुजेनने आपल्याजवळचा ऑक्सीजन सिलेंडर त्याला दिला. हुशारी आलेल्या गेवेलने पुन्हा खाली उतरण्यास सुरवात केली खरी, पण लवकरच त्याचा ऑक्सीजन संपून गेला.

मार्को कन्फर्टोला हळूहळू अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने खाली उतरत होता. त्याच्याबरोबर असलेले दोन्ही पोर्टर त्याच्या मागे सुमारे पन्नास एक मीटर अंतरावरुन येत होते. मात्र कन्फर्टोलाला कोणतीही मदत करण्याची ते तसदी घेत नव्हते. त्याच्या वारंवार केलेल्या विनंत्यांकडे त्यांनी साफ दुर्लक्षं केलं ! संतापलेल्या मार्कोने त्यांना शिव्यांची लाखोली वाहीली, परंतु त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही !

सकाळी १०.००

सेसील स्कॉग, लार्स नेसा आणि ऑयस्टीन स्टँगलँड बेस कँपवर पोहोचले होते. इतर मोहीमांतील गिर्यारोहकांनी त्यांचं स्वागत केलं. कँपजवळ पोहोचताना सेसीलच्या पाठीवरची बॅग घेण्याचा एका गिर्यारोहकाने प्रयत्न केला, पण तिने त्याला ठाम नकार दिला.

ती बॅग रॉल्फ बेईची होती.

आदल्या दिवशी रॉल्फला सोडून खाली उतरण्यास तयार नसलेली सेसीलची आता क्षणभरही के २ वर थांबण्याची इच्छा नव्हती. आपल्या तंबूत स्लीपींग बॅगमध्ये शिरुन तिने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.

मार्को कन्फर्टोलाच्या मोहीमेतील रॉबर्टो मॅनी बेस कँपवर होता. मार्कोच्या मदतीला शेर्पांना पाठवण्याची त्याची धडपड सुरु होती. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्याची तयारी होती. अमेरिकन गिर्यारोहक जॉर्ज डिमारेस्कू, रिंगजींग शेर्पा आणि मिंगमा शेर्पा यांनी अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने कन्फर्टोलाला गाठण्यासाठी चढाईला सुरवात केली.

दुपारी १२.००

पेम्बा, रुजेन आणि गेवेल कँप २ वर पोहोचले होते. पेम्बा बर्फ वितळवण्याच्या मागे असतानाच गेवेल अतीश्रमाने बाहेरच आडवा झाला होता. पेम्बा आणि रुजेनचा बर्फ वितळण्याचा कार्यक्रम झाल्यावरही तो उठण्यास तयार नव्हता. अखेर रुजेनने त्याला जवळपास खेचूनच बसवलं.

" माझ्या हाताला फ्रॉस्टबाईट झाला आहे !" गेवेल म्हणाला, " मी आजची रात्रं इथेच आराम करतो ! तुम्ही दोघं जा !"
" अ़जीबात नाही !" पेम्बा गरजला, " तुला आमच्यासोबत यावंच लागेल ! उठ आणि चल !"

दुपारी १.००

पेम्बा, रुजेन आणि गेवेल पुन्हा बेस कँपच्या मार्गाला लागले.

गेवेलच्या मनात के २ वरच्या दुर्दैवी अपघातांचा आणि त्यात प्राण गमावलेल्या गिर्यारोहकांचे विचार येत होते.

रॉल्फ बेईच्या मृत्यूने सेसील स्कॉग उध्वस्त झाली होती. जेरार्ड मॅक्डोनेलच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्याच्यापाशी शब्द नव्हते. ह्यूजेस डी'ऑब्रेडच्या मुलीचा काही दिवसांतच विवाह होता ! जुमीक भोटे आपल्या नवजात मुलाचं तोंडही न बघता मरण पावला होता. मोठ्या पसांग भोटेच्या मुलींवरही त्याच्या मृत्यूने दु:खाची कु-हाड कोसळणार होती.

दुपारी २.००

मार्को कन्फर्टोला अखेरीस कँप ३ वर पोहोचला होता. कँप ३ वर कोणाचाही मागमूस नव्हता. शोधाशोध केल्यावर एका तंबूत त्याला पाण्याची एक बाटली आणि खाण्यासाठी दोन एनर्जी बार मिळाले. सॅटेलाईट फोनसाठी बॅटरी मिळाल्यावर त्याने इटलीत आपल्या भावाच्या ऑफीसमध्ये फोन केला,

" मी मार्को बोलतो आहे !"

मार्कोचा भाऊ लुईगी नेमका ऑफीसमधून बाहेर गेला होता. निरुपायाने त्याने फोन बंद केला आणि स्लीपींग बॅगमध्ये शिरून तो झोपेच्या आधीन झाला !

काही वेळ वाट पाहून त्या पाकीस्तानी पोर्टर्सनी सरळ बेस कँपचा मार्ग पकडला !

संध्याकाळी ७.००

कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहक आणि शेर्पा अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर पोहोचले होते. तिथे रात्रीचा मुक्काम करुन दुस-या दिवशी सकाळी बेस कँपवर परतण्याचा त्यांचा विचार होता.

रात्री ९.००

पेम्बा ग्याल्जे, विल्को वॅन रुजेन आणि कॅस वॅन डी गेवेल बेस कँपवर पोहोचले ! बेस कँपपासून काही अंतरावर असतानाच अनेक गिर्यारोहकांसह रोलँड वॅन ऑस त्यांच्या मदतीला आला होता.

वॅन ऑसने सॅटेलाईट फोनवरुन मार्टीन वॅन एकशी संपर्क साधला. काही वेळातच वॅन एकच्या वेबसाईटवर बातमी झळकली,

" पेम्बा, विल्को आणि कॅस सुखरुप बेस कँपमध्ये परतले आहेत !"

.. आणि जेरार्ड मॅक्डोनेल बचावून सुखरुप परत येईल ही त्याच्या कुटुंबियांची आशा मावळली !

एरिक मेयरने रुजेन आणि गेवेलचा ताबा घेतला. त्यांच्या हाता-पायांच्या फ्रॉस्टबाईट झालेल्या बोटांवर शक्य ते उपचार करण्यास त्याने सुरवात केली.

फ्रेड्रीक स्ट्रँगला पाहताच रुजेनने त्याला प्रश्न केला,

" किती जण ?"
" अकरा !" रुजेनच्या प्रश्नाचा रोख समजून स्ट्रँग उत्तरला.
" बेपत्ता ?"
" नाही ! सर्वजण मरण पावले आहेत ! रॉल्फ, ह्यूजेस, जेरार्ड.."

रात्री ११.००

मेयरचे दोन्ही गिर्यारोहकांवर उपचार सुरुच होते. फ्रॉस्टबाईट झालेल्या त्यांच्या बोटांवरचं वरचं मांस आणि कातडं त्याने खरवडून काढलं. दोघांनाही त्याने मॉर्फीन आणि पेनकिलर इंजेक्शनं दिली.

रोलँड वॅन ऑसने पाकीस्तानी सैन्यदलाशी संपर्क साधून रुजेन आणि गेवेलला स्कार्डूला नेण्यासाठी हेलीकॉप्टरची व्यवस्था केली होती. हवामानाने साथ दिल्यास दुस-या दिवशी दोघांना घेण्यासाठी हेलीकॉप्टर येणार होतं.

४ ऑगस्ट

सकाळी ८.००

रोलँड वॅन ऑसला सकाळी ९.०० वाजता हेलीकॉप्टर येत असल्याची खबर मिळाली. ही बातमी मिळताच ऑसची एकच धावपळ उडाली. रुजेन आणि गेवेल परतल्यावर बेस कँपच्या आवरा-आवरीचं सर्व काम त्याच्यावर येऊन पडणार होतं. रुजेनने त्या दृष्टीने त्याला सर्व सूचना दिल्या.

बेस कँपपासून सुमारे मैलभर अंतरावर पाकीस्तानी आर्मीच्या अधिका-यांनी पोर्टर्सच्या मदतीने हेलीकॉप्टर उतरण्यासाठी जागा तयार केली होती.

कँप ३ वर असलेल्या मार्को कन्फर्टोलाला जाग आली होती. विश्रांतीमुळे त्याला खूपच हुशारी आली होती, परंतु आपल्या डाव्या हाताला फ्रॉस्टबाईट झाला असावा अशी त्याला शंका आली होती. कॅंप ४ वरुन त्याच्यापाठोपाठ खाली उतरलेले पाकीस्तानी पोर्टर्स आदल्या रात्रीच बेस कँपवर परतले होते. ब्लॅक पिरॅमीड आणि हाऊस चिमनी उतरुन खाली जाण्यासाठी त्याला कोणाचीही मदत मिळणार नव्हती.

सकाळी ९.००

पाकीस्तान आर्मीची दोन हेलीकॉप्टर्स अखेर के २ च्या बेस कँपवर पोहोचली.

विल्को वॅन रुजेनला हेलीकॉप्टरपर्यंत चालत जाण्याइतकीही ताकद शिल्लक राहीली नव्हती. त्याला स्ट्रेचरवर घालून मैलभरावरील हेलीकॉप्टरपर्यंत नेण्यात आलं. दोनपैकी एका हेलीकॉप्टरमध्ये रुजेनला चढवण्यात आलं. हेलीकॉप्टरने स्कार्डूच्या दिशेने उड्डाण केलं.

रॉबर्टो मॅनीने दुस-या हेलीकॉप्टरच्या पायलटला अ‍ॅब्रझी स्परवर मार्को कन्फर्टोलाच्या सुटकेसाठी जाण्याची विनंती केली. मार्को हाऊस चिमनीच्या खाली आल्यावर दोराला लटकावलेल्या पाळण्याच्या सहाय्याने त्याची सुटका करावी अशी योजना होती. पायलटने अ‍ॅब्रझी स्परच्या दिशेने शोध घेतला, परंतु कन्फर्टोला अद्यापही हाऊस चिमनीच्या खाली उतरुन आला नव्हता.

कन्फर्टोलाला बेस कँपवरुन वर येणा-या हेलीकॉप्टरचा आवाज आला. काही वेळातच त्याला अ‍ॅब्रझी स्परच्या दिशेने आलेलं हेलीकॉप्टर दिसलं, परंतु ते खाली न उतरता परत फिरलं.

ब्लॅक पिरॅमीड उतरून खाली आल्यावर कन्फर्टोलाला त्याच्या मदतीसाठी आलेले जॉर्ज डिमारेस्कू, रिंगजींग शेर्पा आणि मिंगमा शेर्पा हे दृष्टीस पडले. त्यांच्यासहाय्याने तो बेस कँपच्या मार्गाला लागला.

हेलीकॉप्टर बेस कँपवर परतलं आणि कॅस वॅन डी गेवेलला घेऊन स्कार्डूच्या मार्गाला लागलं.

तासाभरातच रुजेन आणि गेवेल यांच्यावर स्कार्डूच्या मिलीटरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू झाले.

सेसील स्कॉगने एका पोर्टरला साथीला घेऊन बेस कँप सोडला आणि ती अ‍ॅस्कोलच्या मार्गाला लागली. लार्स नेसा आणि ऑयस्टीन स्टँगलँड बेस कँप आवरण्यासाठी मागे थांबणार होते.

सकाळी १०.००

कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांनी बेस कँप गाठला. तीन कोरीयन गिर्यारोहक आणि जुमीक - मोठा पसांग भोटेच्या मृत्यूचं त्यांच्यावर सावट होतं. बेस कँपवर पोहोचल्यावर त्यांनी कँप गुंडाळून परत निघण्याची तयारी सुरू केली.

मार्को कन्फर्टोला कँप २ वर पोहोचला होता. डिमारेस्कूच्या सॅटेलाईट फोनवरून अखेर त्याने लुईगीशी संपर्क साधला. आपण सुखरुप असून बेस कँपवर परतत असल्याचं त्याने लुईगीला सांगीतलं.

दुपारी १२.००

कन्फर्टोला, डिमारेस्कू आणि दोन शेर्पा हाऊस चिमनीच्या खाली आले होते. हेलीकॉप्टर उतरण्याच्या दृष्टीने त्यांनी जागा तयार केली. परंतु कन्फर्टोलाचे हाल अद्यापही संपले नव्हते. के २ च्या लहरी हवामानाने पुन्हा आपला रंग दाखवला. खराब हवामानामुळे हेलीकॉप्टर उड्डाण करु शकत नव्हतं ! बराच वेळ वाट पाहूनही हवामान सुधारण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती.

दुपारी ३.००

कन्फर्टोला, डिमारेस्कू आणि दोन्ही शेर्पा हेलीकॉप्टरचा नाद सोडून कँप १ च्या दिशेने निघाले. कँप १ वर रात्रं काढून दुस-या दिवशी बेस कँपवर परतण्याचा त्यांचा विचार होता.

डच मोहीमेतील गिर्यारोहक आपलं सामान आवरत असतानाच जेरार्ड मॅक्डोनेलच्या सामानात त्यांना बीयरची एक बाटली आढळून आली. रात्री सर्वांनी जेरार्डच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याला आदरांजली वाहीली.

" त्याच्या मृतात्म्यास शांती मिळो !" एरिक मेयर उद्गारला.

५ ऑक्टोबर

बेस कँपवरील बहुतेक सर्वांनी परतीच्या प्रवासाच्या दृष्टीने आवराआवर करण्यास सुरवात केली होती.

के २ वर प्राण गमावलेल्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्ट गिल्के स्मारकावर त्याच्या नावाची धातूची प्लेट लावण्यात येणार होती. बेस कँपवरील इतर सर्वजण या प्लेट तयार करण्याच्या उद्योगाला लागले.

कोरीयन गिर्यारोहकांनी आपला कँप गुंडाळला होता. बेस कँपवरुन निघण्यापूर्वी लार्स नेसाने किम जे सू आणि गो मी यंगची भेट घेतली. के २ वरील गिर्यारोहकांच्या मृत्यूने ती व्यथीत झाली होती. कोरीयन गिर्यारोहकांनी बेस कँप सोडला आणि ते ब्रॉड पीकच्या बेस कँपवर पोहोचले. तिथून त्यांनी हेलीकॉप्टरने स्कार्डू गाठलं.

सर्बीयन गिर्यारोहकांनी आपला कँप गुंडाळून अस्कोलची वाट धरली होती. ड्रेन मँडीकच्या मृत्यूने ते सर्वजण हादरले होते. बेस कँप सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्याजवळचं गिर्यारोहणाचं सर्व सामान विकून त्यातून आलेले पैसे जेहान बेगच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिले होते.

कँप १ वरुन मार्को कन्फर्टोला, डिमारेस्कू आणि दोन शेर्पांनी बेस कँपचा मार्ग पकडला. अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर त्यांची एरिक मेयर, क्रिस किंकल, चिरींग दोर्जे आणि इतरांशी गाठ पडली. सर्वांच्या मदतीने मार्को कन्फर्टोला दुपारी ४.०० च्या सुमाराला बेस कँपवर पोहोचला !

मेयरने कन्फर्टोलाच्या फ्रॉस्टबाईटवर उपचार करण्यास सुरवात केली. रुजेन आणि गेवेलच्या तुलनेत त्याच्या हाता-पायांची परिस्थीती बरीच चांगली होती. कन्फर्टोलाच्या हातावर उपचार सुरू असतानाच कँप ४ वरुन त्याला उतरण्यासाठी कोणतीही मदत न करता खाली उतरलेला एक पोर्टर तिथे आला. त्याला पाहताच चिरींग दोर्जेने त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.

६ ऑगस्ट

मार्को कन्फर्टोलाला बेस कँपवरुन हेलीकॉप्टरने स्कार्डूच्या मिलीटरी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं.

बेस कँपवर असलेल्या इतर सर्व गिर्यारोहकांनी आपली मोहीम आवरती घेतली आणि अस्कोलचा मार्ग प़कडला.

२००८ च्या मोसमात के २ वरील मृत्यूसत्रात अकरा गिर्यारोहक प्राणाला मुकले होते.

ड्रेन मँडीक, जेहान बेग, रॉल्फ बेई, ह्यूजेस डी'ऑब्रेड, मेहेरबान करीम, जेरार्ड मॅक्डोनेल, जुमीक भोटे, मोठा पसांग भोटे, किम ह्यो गियाँग, पार्क कियाँग हो, हवांग डाँग जिन हे आता के २ वरील कायमचे रहिवासी झाले होते !

एका मोसमात एकाच चढाईच्या दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या गिर्यारोहकांच्या संख्येचा हा दुर्दैवी विक्रम होता.

के २ वरुन जीव बचावून परत आलेल्या गिर्यारोहकांच्या भविष्यात पुढे काय लिहीलं होतं ? आजही त्यांच्यापैकी कोणी गिर्यारोहणात सक्रीय आहेत का ?

क्रमशः
 

सॅव्हेज माऊंटन - ८                                                                                                            सॅव्हेज माऊंटन - १०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पार्टाकस,

थरारक वर्णन! हे सगळं माहीत असूनही गिर्यारोहक जिवावरचा धोका पत्करतात. त्यांच्या धाडसास अभिवादन!

असो.

जरा, ते ५ ऑक्टोबरचं ५ ऑगस्ट हवं होतं. धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.