ग्रेस यांस ....

Submitted by गौरव पांडे on 9 January, 2014 - 12:34

‘कावळे उडाले स्वामी..’ म्हणत ,
तू कवितेच्या अनवट वाटेवर केलेली शब्द्फुलाची उधळण
डोळ्यांत साठून राहिली आहे अजून...
तू दु:खाचा महाकवी असशीलही,
पण तुझ्या कवितेत आत्मशोधाचा , कारुण्याचा
रक्तगंधाचा दिवा जागत राहिलाय अजून....
‘चर्चबेल’च्या निनादात ‘ओल्या वेळूच्या बासरी’चे सूर शोधणारा
तू एकटाच असशील..
महाकवीची मिजास जपत,
उभ्या आयुष्याचं एकटेपण साजरं करणारा
तू एकटाच असशील..
प्रतिभेच्या पूजेसाठी लौकिकाचे अस्तर झुगारणारा
तू...
दुर्बोधतेच्या वाळवंटात कवितेची बेसरबिंदी लपवणारा
तू...
संध्याकाळच्या कातरवेळांत, उडून गेलेल्या कावळ्यांत,
रुणझुणत्या नुपूरांत, वाहून जाणाऱ्या पाण्यात,
तू शोधलेले साक्षात्काराचे क्षण
आमच्या हाती लागतच नाही आहेत अजून.....
इंग्रीड बर्गमनच्या आरस्पानी डोळ्यांत तुझे ऐहिक प्रेम जितके बुडून गेलयं,
तितकेच बुडलोय आम्ही पण तुझ्या रेशमाच्या शब्दसंभ्रमात...
आम्ही पुन्हा पुन्हा शोधात राहू अर्थान्वयाचे सेतू ,
तुझ्या कवितेच्या शब्दांत, नादलयीत आणि
खोल साद घालणाऱ्या ललित स्वगतांत...
आणि तू...
ख्रिस्ताचा क्रूस धरून, भौतिकाला उधळत,
‘संध्याकाळच्या कविता’ गात असशील
तुझ्याचं ‘चंद्रमाधवीच्या प्रदेशात’.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users