महाभारतातील “चलाख” महापुरुष आणि तत्व कि अस्तित्वाची लढाई

Submitted by अतुल ठाकुर on 5 January, 2014 - 08:54

mb-300x225.jpg

महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे. याला हुशारी, बुद्धीमत्ता असं नाव देता आलं असतं. मात्र मुद्दामच “चलाखी” हा शब्द वापरलेला आहे. समोरच्या माणसाचा कमकुवतपणा हेरुन आपला हेतु साध्य करण्याची किमया या माणसांमध्ये होती. हा मान साधारणपणे कृष्णाला देण्याची लोकपरंपरा आहे. मात्र कृष्णाशिवाय देखिल अनेकांनी हा प्रकार महाभारतात करुन दाखवलेला आहे. कृष्णाच्या “भगवंत” होण्याने बाकीच्यांची “चलाखी” काहीशी झाकोळुन गेली आहे. शिवाय कृष्णाने इतर कुणाहीपेक्षा अशा तर्‍हेची कामगिरी अनेकानेक वेळा यशस्वीपणे पार पाडलेली आहे. याचा शकुनीच्या कपटाशी संबंध नाही. कणिकाच्या कुटील नीतीशीही संबंध नाही. समोरच्याला आपल्याला हवं तसं वागण्याला उद्युक्त करणं ही करामत या घटनांमध्ये घडते.

अतिशय प्रसिद्ध घटनेचा उल्लेख करायचा झाला तर कृष्णाच्या शिष्टाई बद्दल बोलता येईल. द्रौपटीने कॄष्णाला शिष्टाईला जाण्याआधी तिच्या मोकळ्या केसांची आठवण करुन दिली होती. कॄष्ण ही घटना विसरला असण्याची शक्यताच नव्हती. दुर्योधनाचा हट्टी स्वभाव पूर्णपणे माहीत असलेल्या कॄष्णाने चलाखपणे फक्त पाच गावांची मागणी केली. कृष्णाला जरा जरी शंका असती कि दुर्योधन पाच गावांची मागणी मान्य करेल तर त्याने हा प्रस्ताव ठेवलाच नसता. त्यामुळे झाले हे की बिचार्‍या पांडवांनी हक्काचे अर्धे राज्य सोडुन फक्त पाच गावांवर समाधान मानले तरी दुर्योधनाचा लोभ आणि युद्धपिसाटपणा इतका कि सुईच्या अग्रावर मावेल इतकी देखिल जमीन तो द्यायला तयार झाला नाही असा संदेश जनसामान्यांत गेला. पुढे जे काही “महाभारत” झाले त्याला बहुतांशी कौरव जबाबदार धरले गेले याचं कारण कृष्णाने अत्यंत मुत्सद्दीपणे जगासमोर दुर्योधनाला हट्टाग्रही सिद्ध केलं. अर्थात दुर्योधनाला राज्याचा वाटा द्यायचा नव्हताच. पण त्याच्या स्वभावाची ही बाब कृष्णाने शिष्टाईच्या निमित्ताने चव्हाट्यावर आणली. अशा घटना महाभारतात अनेक असल्या तरी येथे फक्त तीनच घटना विचारार्थ घेतल्या आहेत. या तीन घटना त्या काळच्या विचारसरणीवर तर प्रकाश टाकतातच शिवाय या घटना घडल्यामुळे महाभारताला वेगळं वळण देखिल लागतं.

पहिली घटना भीष्माने केलेल्या अम्बाहरणाची. अम्बाहरणाच्या वेळची हकीकत लक्षात घेतली तर त्या काळचे राजे कसे वागत याचा अंदाज येऊ शकतो. केशीराजाने आपल्या तीन मुलींचं स्वयंवर लावलं होतं. त्यात भीष्म स्वतः ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेऊन देखिल भाग घेण्यासाठी आला. स्वयंवर कुणाचंही असो. मुलीची इच्छा काहीही असो. त्याच्या अटी वाट्टेल त्या असोत. बाहुबल असेल, धमक असेल, पराक्रम असेल तर मुलगी पळवुन न्यावी असा त्याकाळचा खाक्या दिसतो. पुढच्या काळात कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं आणि आपला जिवलग मित्र अर्जुन याला देखिल बहिण सुभद्रेला पळवुन नेण्याचा सल्ला दिला. बायका स्वयंवरात ऐनवेळी कुणाला माळ घालतील याचा नेम नाही त्यामुळे पळवुन नेणेच इष्ट असा भगवंताचा चतुर, व्यावहारिक सल्ला होता. याचा अर्थ स्वयंवरातुन मुली पळवुन नेणे ही त्याकाळी दुर्मिळ घटना नव्हती. पळवणार्‍याने पराक्रम करुन हरण केले असेल, त्याचे घराणे कुलवंत असेल तर कदाचित ती इष्टापत्तीच मानली जात असेल. भीष्म स्वयंवरात आला तो सावत्र भावांसाठी मुलगी मिळवायला. कुणाच्या वतीने स्वयंवरात भाग घेता येत नाही हे भीष्माला ठाऊक असणारच. आणि असाच दंडक असण्याची शक्यता आहे. अन्यथा इतर देशीच्या रा़जांनी त्याची चेष्टा आरंभली नसती. ही चेष्टा भीष्माच्या वयाचीही आहे. राजांनी चेष्टा आरंभल्याबरोबर जणुकाही याच संधीची वाट पाहात असल्याप्रमाणे भीष्माने तिन्ही कन्यांना बळजबरीने रथात घालुन इतर राजांना युद्धाचे आव्हान दिले. भीष्म हा महाभारतात नुसताच महापराक्रमी नाही तर महाज्ञानी म्हणुनही प्रसिद्ध आहे. शांतीपर्वात युधिष्ठीरासारख्या ज्ञानी पुरुषाला आपल्या शंका निरसन करण्यासाठी भीष्माचा आश्रय घ्यावा लागला. अशा ज्ञानवान, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कुरुला स्वयंवराचे नियम माहित नसतील ही केवळ अशक्य गोष्ट आहे. भीष्माने तेथे हजर राहुन काही गोष्टी घडु दिल्या आणि आपला कार्यभाग साधला असे वाटते.

भीष्माचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला कधीही स्वतःच्या पराक्रमाबद्दल शंका नव्हती. कुरुंदकरांनी याचं विश्लेषण करताना हनुमानाचं उदाहरण दिलं आहे. हनुमानाला त्याच्या पराक्रमाची आठवण करुन द्यावी लागली आणि मग ते उड्डाण घडले. इथे प्रकार तसा नाही. भीष्माला स्वतःच्या पराक्रमाची इतक्या यथायोग्य प्रकारे जाणीव होती की त्याने परशुरामासारख्या स्वतःच्या गुरुलाही सोडले नाही. समजा राजांनी भीष्माची थट्टा आरंभलीच नसती तर पुढचा प्रकार करणे भीष्माला काहीसे जड गेले असते असे माझे मत आहे. यात चलाखि अशी कि मुळात भीष्माला क्षत्रियांच्या उद्दामपणाबद्दल खात्री असणारच. त्यांच्या दर्पोक्ती करण्याच्या स्वभावाशीही तो परिचित असेलच. आपण आल्याचे पाहुन सारे क्षत्रिय आपली थट्टा करणार याचा त्याने आधिच कयास बांधला असावा. तेव्हा आधी त्यांना कुरापत काढु द्यावी आणि नंतर उग्र रुप धारण करुन, आव्हान देऊन, कन्यांना पळवुन न्यावे असा प्रकार करावा असा विचार भीष्माने केला असेल असे मानायला जागा आहे.

दुसरी घटना इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये सांगितली आहे. मात्र या घटनेकडे लोकांनी द्यावं तसं लक्ष दिलेलं दिसत नाही. “परधर्मो भयावहः” या लेखात त्यांनी द्रोणवधाचा प्रसंग वर्णिताना द्रोण आपला पुत्र अश्वत्थामा मेला हे ऐकुन देखिल शस्त्र खाली ठेवीत नाही हे मुद्दाम नमुद केलं आहे. मात्र जेव्हा भीम त्वेषाने त्याला ही जाणीव करुन देतो कि तो ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नाही. तेव्हा त्याचे धैर्य गळते. या घटनेचा थोड्या तपशीलाने विचार आवश्यक आहे. मुळात बहुतेक लोकांना माहित असलेली घटना म्हणजे भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारणे आणि त्यानंतर युधिष्ठीराचे ते सुप्रसिद्ध “नरो वा कुंजरो वा ” असे उत्तर देणे. त्यानंतर दु:खाने दोणाचार्यांचे शस्त्र खाली ठेऊन बसणे. आणि धृष्ट्द्युम्नाने त्याचे शीर तलवारीने उडवणे. सर्वजण परंपरेने सांगितलेल्या या कथेशी परिचित आहेत.

जेव्हा अश्वत्थामा मेल्याची आवई उठुनसुद्धा द्रोण शस्त्र खाली ठेवित नाही तेव्हाच या हा प्रसंग वाटतो तेवढा साधा नाही याची जाणीव होते. आपला मुलगा मृत्युंजय आहे हे द्रोणाला ठावुक होते. त्यामुळे पुन्हा त्याने लढायला सुरवात केली. तेव्हा मात्र भीमाने न राहवुन त्वेषाने आपल्या गुरुला स्वधर्माची जाणीव करुन देण्यास प्रारंभ केला आणि हा वार द्रोणाच्या वर्मी बसला. खिन्न होऊन त्याने शस्त्र खाली ठेवले. आणि पुढे धृष्ट्द्युम्नाच्या हातुन तो ठार मारले गेला. या घटनेचा बारकाईने विचार केला तर अनेक बाबी लक्षात येतात.

द्रोणाचा भीमावर मुळीच विश्वास बसला नव्हता. त्याने युधिष्ठीराला विचारुन खात्री करुन घेण्याचे ठरवले. या सार्‍या लांड्यालबाड्या पांडवांना कराव्या लागल्या याचं महत्वाचं कारण हे की द्रोणाच्या अफाट आणि अचाट पराक्रमामुळे पांडवांना विजयाचा भरवसा उरला नाही. भीष्माप्रमाणे “पांडवांना मारणार नाही” वगैरे बोलुन द्रोणाने दुर्योधनाची पंचाईत केली नव्हती. खाल्ल्या मीठाला जागुन त्याने पांडव सैन्याचा भयंकर संहार केला. अभिमन्युला एकटं गाठुन ठार मारायलाही द्रोणाला गैर वाटले नाही. द्रोणाचा हा झंझावात थांबविण्यासाठी ऋषीसुद्धा युद्धभुमीवर उपस्थित झाले होते. या ऋषींमध्ये महत्त्वाची नावे आहेत. विश्वामित्र, जमदाग्नी, भरद्वाज, गौतम, वसिष्ठ, कश्यप, अत्री यासारख्या ऋषींनी तेथे येऊन द्रोणाला शस्त्रत्याग करण्याची सुचना केली. यासर्व गोष्टींचा परिणाम इतकाच झाला की द्रोणाला ज्याच्या सत्यवचनाबद्दल खात्री होती त्या धर्मराजाला त्याने अश्वत्थाम्याच्या मृत्युच्या खरेपणाविषयी विचारले. द्रोणाच्या पराक्रमाने पांडवांचा नाश खात्रीने होणार हा धोका श्रीकृष्णाने सर्वप्रथम ओळखला आणि धर्मराजाला असत्य बोलुन पांडवांना वाचविण्याची विनंती केली.

अर्जुनाच्या पराक्रमाबाबत कुणी कितीही म्हणोत पण द्रोणाला मारण्याची ताकद अर्जुनात नव्हती हे मान्य करणं भाग आहे अन्यथा श्रीकृष्णाने ही गळ युधिष्ठीराला घातलीच नसती. युधिष्ठीराने नाईलाजाने हे मान्य केल्यावर चाचपडत “नरो वा कुंजरो वा” म्हटले. अगोदर तेथे उपस्थित झालेल्या ऋषींनी “हे युद्द तु अधर्माने केले आहेस” असा ठपका द्रोणावर ठेवला होताच. त्यातुन युधिष्ठीराने अश्वत्थाम्याच्या मृत्युला दुजोरा दिला. त्यानंतर आपल्या मृत्युसाठीच ज्याचा जन्म झालेला आहे अशा धृष्टद्युम्नाला चालुन येताना पाहुन द्रोण उदास झाला आणि त्याला पुर्वीसारखे त्वेषाने, कौशल्याने युद्ध करता येईना. मात्र कौशल्य कमी झाले तरी द्रोणाचा पराभव पांडवांना करता येईना. इथे भीमाने द्रोणाच्या मर्मस्थानी लागेल असे संभाषण केले. त्यातले प्रत्येक वाक्य महत्त्वाचे आहे.

भीम म्हणतो” आपल्या स्वतःच्या कर्माविषयी समाधानी नसलेल्या ज्ञानी ब्राह्मणांनी युद्धाचा (अव्यापारेषु) व्यापार सुरु केला नाही तर क्षत्रियांचा जगातुन नाशही होणार नाही. सर्व प्राण्याविषयी अहिंसा पाळणे हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असे ज्ञानी लोक म्हणतात. ब्राह्मण हा त्या धर्माचे मूळ आहे. आणि तु तर ब्रह्मवेत्त्यात सर्वश्रेष्ठ आहेस. एका पुत्रासाठी अधर्माचे आचरण करुन आणि स्वतःच्या नैसर्गिक कर्माचा त्याग करुन, आपापल्या कर्मात मग्न असलेल्या अनेक क्षत्रियांचा वध करताना तुला शरम कशी वाटत नाही? ज्याच्यासाठी तु शस्त्र धारण केलेस आणि ज्या पुत्राच्या विचाराने तु जगत आहेस तो हा तुझा पुत्र पाठीमागे मरुन पडला आहे. आणि त्याच्याविषयी धर्मराजाने स्वतः तुला माहिती दिली आहे. धर्मराजाच्या त्यावचनाविषयी तु शंका घेणे उचित नाही.”

मुळात ही सर्व योजना कृष्णाची. द्रोणाला रोखलं नाही तर पांडवांचा सर्वनाश अटळ आहे हे त्याला दिसु लागले होते. त्याने अश्वत्थामा मेल्याची आवई उठवुन द्रोणाला शत्रत्याग करण्यास भाग पाडावे ही मसलत युधिष्ठीराच्या गळी मोठ्या कष्टाने उतरवली. ज्याला “सीदन्ती मम गात्राणि” च्या अवस्थेतुन अठरा अध्यायी गीता सांगुन युद्धासाठी उभा केला त्या कृष्णसखा अर्जुनाला तर ही योजना आवडलीच नाही. भगवंताची योजना ताबडतोब कुणी उचलुन धरली असेल तर ज्याला गीता सांगण्याची कधी गरजच भासली नाही त्या भीमाने. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारुन द्रोणपुत्र अश्वत्थामा मेल्याची आवई भीमाने तात्काळ उठवली. त्यादरम्यानच ऋषींनी उपस्थित होऊन द्रोणाला युद्धापासुन परावृत्त होण्याची सुचना केली. तो अधर्माने लढत असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवला. पण द्रोण बधला नाही. त्याने पुत्राच्या मृत्युबद्दल सत्यवचनी युधिष्ठीराकडुन खात्री करुन घेतली. त्याच्या उत्तराने द्रोण विचलित जरी झाला तरी तो शस्त्रत्याग करेना आणि त्याचे बळ जरी कमी झाले तरी त्याचा पराभव होईना. तेव्हा ही सारी मसलतच फसण्याची वेळ आली. महाभारतात जरी उल्लेख नसला तरी माझ्या मनात एक कल्पना येते कि जर अशावेळी जिवंत असलेला अश्वत्थामा आपल्या पित्यासमोर आला असता तर पांडवांची अवस्था काय झाली असती? एका क्षणात पाण्डवांचा बनाव द्रोणाला कळुन चुकला असता आणि कदाचित त्याने भूतो न भविष्यती असे घनघोर युद्ध अतिशय त्वेषाने केले असते.

भीमाने मात्र प्रसंगावधान राखुन अत्यंत चलाखपणे, ज्यामुळे द्रोण खरोखरच अस्वस्थ होईल असा स्वधर्माचा अमोघ बाण काढला. महाभयंकर अस्त्र शस्त्रांना सहजतेने तोंड देणार्‍या महापराक्रमी द्रोणाला या बाणाचे मात्र निवारण करता आले नाही. भीमाचे वाग्बाण द्रोणाच्या मनात आरपार रुतले आणि त्याने शस्त्रत्याग केला.

स्वधर्माचे महत्त्व अपरंपार असलेल्या त्याकाळात वर्णानुसार कर्म करणे हा नियम असणार आणि तो नियम मोडणारे द्रोणासारखे महापराक्रमी पण लौकिकार्थाने भ्रष्ट समजले जाणारे असे ब्राह्मणसुद्धा असणारच. त्यातुन ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ वर्ण. समाजासाठी गुरुपदी असणारा. त्याच्याकडे समाज नेहेमी मार्गदर्शनासाठी पाहाणार असा. अशा ब्राह्मणांच्या मनात आपण स्वधर्मापासुन ढळलो ही सतत कुडतरणारी, अपराधी भावना असण्याची दाट शक्यता आहे. नेमक्या या कमकुवत जागेचा फायदा भीमाने अत्यंत हुशारीने उचलला आणि द्रोणाच्या मर्मस्थानी बोट ठेऊन आपला कार्यभाग साधला.

द्रोणवधाचा खरेतर सुत्रधार कृष्ण. त्याची योजना पार पाडली भीमाने. शेवटी या योजनेला सुरुंग लागण्याची वेळ आली असताना आपली स्वतंत्र बुद्धी वापरली तीही भीमानेच. आणि द्रोणवधाचे सारे श्रेय दिले जाते ते शत्रत्याग करुन बसलेल्या माणसाचे डोके तलवारीने उडवणार्‍या धृष्टद्युम्नाला.

तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. हे सारं काही असुनसुद्धा साध्वी गांधारीने त्याला आपल्या सामर्थ्याचं कवच घातलं. गांधारीने दुर्योधनाला युद्धापूर्वी भेटायला बोलावताना संपूर्ण नग्न होऊन बोलावले. ती क्षणभर डोळे उघडुन त्याच्याकडे पाहाणार होती ज्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर लोखंडाचं होणार होतं. पण कृष्णाने हा प्रकार आधीच ओळखुन दुर्योधनाला मध्येच गाठुन मातेकडे जाताना नग्न कसा काय जातोस म्हणुन त्याची चेष्टा केली. तेव्हा दुर्योधन कमरेभोवती वस्त्र पांधरुन गेला आणि त्याच्या मांड्या तेवढ्या कमकुवत राहिल्या अशी कथा सांगितली जाते. एरवी गांधारीबद्दल आदराने बोलण्याची प्रथा आहे. धृतराष्ट्राच्या शारिरीक अंधत्वावर बोलताना तो पुत्रमोहाने आंधळा झाला होता याचा उल्लेख तर न चुकता होतो. पण नवर्‍यासाठी डोळ्यावर पट्टी बांधुन घेतलेल्या गांधारीची गोष्ट तरी नवर्‍यापेक्षा काय वेगळी आहे? पांडवांची बाजु न्याय्य आहे असे जरी तिला वाटत असले तरी युद्धात दुर्योधनाचाच विजय व्हावा अशी तिची इच्छा दिसते. अन्यथा तिने दुर्योधनाला आपल्या तपःसामर्थ्याचं कवच घालुन लोखंडी बनवण्याचा घाट घातला नसता. दुर्योधनाचा विजय याचा दुसरा अर्थ पांडवांचा पराजय किंचा कुठल्यातरी पांडवाचा मृत्यु हे देखिल येथे लक्षात घ्यायला हवं. थोडक्यात धृतराष्ट्राप्रमाणेच गांधारीदेखिल पुत्रामोहाने आंधळीच झाली होती हे म्हणण्यास वाव आहे. आणि हे सर्वात प्रकर्षाने जाणवते ते शेवटी. युद्ध संपल्यानंतर कृष्णाची भेट झाल्यावर गांधारी त्याला शाप देते. नवर्‍याचा पुत्रमोह, मुलांचे प्रताप, त्यांनी पांडवांशी केलेली अन्याय्य वर्तणुक, प्रत्यक्ष सुनेचे राजसभेत केलेले वस्त्रहरण सारं काही विसरुन, अगदी शंभर पुत्र ठार मारलेल्या भीमालादेखिल बाजुला ठेऊन तिची न्याय बुद्धी दोषी कुणाला ठरवते तर श्रीकृष्णाला. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचे इतके उत्कृष्ट उदाहरण दुसरे सापडणे कठीण. .

पुढे दुर्योधन कसा मारला गेला हा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र त्यात कृष्णाची गदेने मांडीवर प्रहार करण्याची सुचना आणि त्याबरहुकुम भीमाचे वागणे या सर्व प्रकारानेच हा प्रसंग पूर्णपणे झाकोळला आहे. या सार्‍या गोष्टी झाल्या केव्हा तर दुर्योधन गदायुद्धासाठी बाहेर आल्यावर. तोपर्यंत तो पाण्याखाली लपुन बसला होता. तो बाहेर आलाच नसता तर हे गदायुद्ध घडलेच नसते. त्याला डिवचुन बाहेर काढ्ण्याचे श्रेय युधिष्ठीराचे. इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये असा उल्लेख केला आहे कि धॄतराष्ट्राकडुन जर दुर्योधनाला जीवदान देण्याचा निरोप आला असता तर पांडवांचा नाईलाज झाला असता त्यामुळे असा काही निरोप येण्याआधी दुर्योधनाला मारणे आवश्यक होते. एकाचढ एक शस्त्रास्त्रे माहित असलेल्या अर्जुनालादेखिल एखादे अस्त्र वापरुन दुर्योधनाला बाहेर काढता आलं नाही आणि तसा काही उल्लेखही महाभारतात नाही याचा अर्थ दुर्योधन पाण्याखाली संपूर्ण सुरक्षीत होता आणि तो स्वतःहुन बाहेर येइपर्यंत पांडवांकडे वाट पाह्ण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाघाच्या गुहेबाहेर उभे राहुन वाट पाहण्याचाच हा प्रकार होता. दुर्योधनाला बाहेर काढणे जरुरी होते. अवघड प्रसंगी युक्त्याप्रयुक्त्या सुचविणार्‍या श्रीकृष्णानेसुद्धा काही उपाय यावेळी सांगितलेला दिसत नाही याचा अर्थ त्यालाही मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी पुढे सरसावला तो जुगारी युधिष्ठीर. यावेळी त्याने फेकलेले फासे बरोबर त्याच्या बाजुने पडले आणि दुर्योधन अलगत जाळ्यात सापडला. याप्रसंगी धर्म-दुर्योधनामध्ये जो संवाद झाला तो अभ्यासल्यास युधिष्ठीर किती “चलाख” माणुस होता हेच सिद्ध होतं.

युधिष्ठीर हसत हसत म्हणतो,” सुयोधना हे पाण्यात तु अशासाठी अनुष्ठान आरंभलं आहेस? आपल्या कुलाचा नाश करुन स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तु पाण्यात दडला आहेस काय? येथे येऊन लपुन बसला आहेस तेव्हा तुझा तो पुर्वीचा दर्प आणि अभिमान कोठे गेला? राज्यसभेत सर्वजण तुला शूर म्हणतात पण आता जेव्हा तु पाण्यात दडला आहेस तेव्हा मला तुझे सारे शौर्य व्यर्थ वाटत आहे. कोठे गेलं तुझं पौरुष? कोठे गेला तुझा अभिमान? कोठे गेली तुझी वज्रसमान गर्जना? कोठे गेलं तुझं अस्त्रविद्येचं सारं ज्ञान? उठ आणि क्षत्रिय धर्मानुसार आमच्याशी युद्ध कर. आमचा पराभव करुन पृथ्वीचं राज्य मिळव अन्यथा आमच्या हातुन वीरगतीला प्राप्त हो.” युधिष्ठीराचा प्रत्येक शब्द खोचक आणि वर्मी लागणारा आहे. मात्र त्याचा तत्काळ परिणाम झालेला दिसत नाही. दुर्योधन म्हणतो,” मी प्राणांची रक्षा करण्यासाठी किंवा घाबरुन येथे बसलेलो नाही. मला जरा विश्रांती हवी आहे. तुम्हीही विश्रांती घ्या. मी त्यानंतर तुमच्याशी युद्ध करेन.” युधिष्ठीराला मात्र जराही वेळ दवडण्याची इच्छा नव्हती. तो लगेच म्हणाला.” आमची विश्रांती घेऊन झाली आहे आणि आम्ही बर्‍याच वेळापसुन तुला शोधत आहोत. तेव्हा चल आमच्याशी युद्ध कर.” यानंतर दुर्योधनाने वेगळाच सूर लावला आहे. पांडवांना विजयाचा आनंद धड उपभोगायला मिळु नये यादृष्टीने त्याने उत्तर दिलं असावं. तो म्हणतो,” ज्यांच्यासाठी मला राज्य हवं होतं ते माझे सारे बांधव मारले गेले आहेत. पृथ्वीवरील समस्त शूर क्षत्रियांचा नाश झाला आहे. ही भूमी आता विधवा स्त्रीसमान संपत्तीहीन झाली आहे. म्हणुन तिचा उपभोग घेण्यात मला जराही रस नाही. जेव्हा कर्ण, द्रोण, पितामह भीष्म मारले गेले आहेत तेव्हा माझ्या दृष्टीने आता या युद्धाची काही आवश्यकता उरलेली नाही. आजपासुन ही सारी पृथ्वी तुझी होवो, मला ती नको. मी मॄगचर्म धारण करुन आजपासून वनात जाऊन राहीन. माझे म्हटले जातील असे कुणीच जीवीत नाही तेव्हा मलाही आता जिवंत राहाण्याची इच्छा नाही. आता तु जा आणि जिचा राजा मारला गेला, योद्धे नष्ट झाले, जी संपत्तीहीन झाली अशा पृथ्वीचा उपभोग घे.”

दुर्योधनाने जे चित्र उभे केले ते बर्‍याच प्रमाणात सत्याच्या जवळ जाणारे होते. एखादा ऐरागैरा बावचळुन गेला असता. पण युधिष्ठीर लेचापेचा नव्हता. त्याने दुर्योधनाला लागलीच फटकारले,” मला ही पृथ्वी तुझ्याकडुन दान म्हणुन नको. मी तुला युद्धात जिंकुनच तिचा उपभोग घेइन. तु स्वतःच ज्या पृथ्वीचा राजा राहीलेला नाहीस तिचं दान कसं काय करायला निघालास?” यानंतर त्याने दुर्योधनाच्या सार्‍या पापांचा पाढा वाचुन दाखवला आणि पुन्हा त्याला डिवचले.” चल उठ आणि युद्ध कर. त्यातच तुझं भलं आहे.” हे बोलणे मात्र दुर्योधनाच्या वर्मी लागले. त्याला पांडवांचा संताप येऊ लागला. युधिष्ठीराने बिनतोड उत्तरे देऊन त्याला निरुत्तर केले होते. आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता. त्याने आता युद्धाच्या दृष्टीने बोलणे सुरु केले,” मी एकटा आणि निशस्त्र आहे तेव्हा मी तुम्हा सार्‍यांशी एकाचवेळी युद्ध असे काय करणार?” युधिष्ठीर पहिली बाजी जिंकला होता. दुर्योधनाला युद्धासाठी त्याने उद्युक्त केले होते. आता त्याने बाहेर येणे आवश्यक होते. युधिष्ठीर पुढे बोलतो,” तुला हवं ते शस्त्र निवड आणि आमच्याशी एकेकट्याने युद्ध कर. आमच्यापैकी एकाला जरी मारलंस तरी सारं राज्य तुझं होईल.” दुर्योधनाने हा प्रकार आता आपल्या बाजुने होत असल्याचा कयास बांधला असावा. कुणाही एकाशी युद्ध आणि त्यातही हव्या त्या शस्त्राने. त्याने अर्थातच ज्यात तो अजिंक्य गणला गेला होता ती गदा निवडली. यानंतर मात्र त्याची जीभ सैल सुटली. मी इंद्राला देखिल घाबरत नाही तर तुम्हाला कशाला घाबरेन अशा वल्गना सुरु केल्या. इथे मात्र युधिष्ठीराने त्याच्या अहंकाराला बरोबर डिवचले. स्वतःच्या शौर्याचा गर्व वाहणार्‍या व्यक्तीला तुल्यबळ प्रतिस्पर्धी हवा असतो. दुबळ्या व्यक्तीला पराभूत करुन त्यांना स्वतःच्या शौर्याचा अपमान करायचा नसतो. युधिष्ठीराने पुन्हा फटकारले,” अरे उठ तर खरा. एकेकाशीच युद्ध करुन आपल्या पौरुषाचा परीचय दे. चल ये माझ्याशीच लढ. आज खुद्द इन्द्राने जरी तुझी साहाय्यता केली तरी तु जिवंत राहु शकणार नाहीस.”

दुर्योधनाच्या पराक्रमाची युधिष्ठीराने ही सरळ सरळ खिल्ली उडवली होती. दुर्योधनासारखा मानी पुरुष हे सहन करणे शक्यच नव्हते. तो त्वेषाने पाण्यातुन बाहेर आला. युधिष्ठीराने दुसरी बाजी जिंकली होती. यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. दुर्योधन भीमाशिवाय इतर कुणाशीही लढणे शक्यच नव्हते. तो कसाही असता तरी वीर पुरुष होता. त्याला तुल्यबळ प्रतिस्पर्धीच लढण्यासाठी लागला असता. युधिष्ठीराच्या “आमच्यापैकी कुणाशीही लढ” हे आततायीपणाने वचन देण्याबद्दल कॄष्णाने त्याला दोष दिला आहे. मात्र युधिष्ठीराने ही अत्यंत चलाखपणे दुर्योधनाने बाहेर यावे म्हणुन खेळलेली चाल होती असे म्हणण्यास वाव आहे. खुद्द भगवंताला युधिष्ठीराचा कावा यावेळी कळला नाही. तिसरी बाजी अर्थातच भीमाने जिंकली. पांडवांच्या सुदैवाने “मांडीवर गदेचा प्रहार कसा काय करु” असे म्हणुन भीम अडखळला नाही आणि श्रीकृष्णाला दुसरी गीता सांगावी लागली नाही. दुर्योधन मारला गेला. शारिरीक युद्ध भीमाने जिंकले असले तरी या विजयाचा खरा शिल्पकार युधिष्ठीरच.

महाभारतातील चर्चिलेल्या या घटनांमुळे काही प्रश्न मनात डोकावले आहेत. ते या लेखाच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न आहे. युद्धाचे नियम दोन्हीकडुन मोडले गेले. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडुन सातत्याने झाले. त्यासाठी त्यावेळी जो योग्य वाटेल तो उपाय योजला गेला. महाज्ञानी आणि महापराक्रमी भीष्माने मृत्युशय्येवर युधिष्ठीरासारख्या ज्ञानी माणसाला शांतीपर्वात तत्वज्ञान सांगितले पण स्वयंवरातुन बळजबरीने काशीराजाच्या कन्या हरण करताना हे तत्वज्ञान आड आलेले दिसत नाही. द्रोणासारखा योद्धा पराभूत होत नाही म्हणुन त्याजवर मुलाच्या मृत्युची खोटी बातमी सांगुन दबाव आणताना श्रीकृष्ण नि:शंक असतो. पुढे हा बनाव यशस्वी होत नाही हे पाहिल्यावर भीम द्रोणाची स्वधर्माची दुखरी नस दाबतो आणि त्याला शस्त्रत्याग करायला भाग पाडतो. शस्त्रत्याग करुन स्वस्थ बसलेल्या माणसाला धरुन आणावे असे अर्जुनाचे मत असताना धृष्टद्युम्न त्याचे डोके उडवतो. पुढे युधिष्ठीर चलाखिने दुर्योधनाला पाण्याबाहेर काढुन अधर्माने भीमाकडुन मारवतो. या सार्‍या घटना नीट पाहिल्या तर हा प्रश्न पडतो को महाभारतात सांगितलेलं तत्वज्ञान आहे तरी नक्की कुणासाठी? कारण कुणीही ते पाळलेले दिसत नाही. शेवटी तत्वज्ञान हा दुबळ्यांचा धर्म आहे काय? श्रीकृष्णाने प्रत्येकवेळी तत्वज्ञानाचा सोयीस्कर अर्थ लावलेला दिसतो. याचा अर्थ आपदधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे काय? जीव वाचविण्यासाठी खोटे बोलावे, विजय मिळविण्यासाठी युद्धाचे नियम मोडावे, बाहुंत बळ असेल तर सारे तत्वज्ञान काखोटीला बांधुन मुली पळवाव्यात. म्हणजे शारीर बळ हेच शेवटी वरचढ ठरते काय? वरवर पाहता असे वाटते कि “बळी तो कान पिळी” हा नियम प्राचिन काळापासुन चालत आलेला दिसतो.

मात्र दुसर्‍या बाजुने पाहीले तर तत्वज्ञानाची बाजुदेखिल वरचढ दिसते. मी शाल्वाला मनाने वरले आहे म्हटल्यावर भीष्म अंबेला शाल्वाकडे परत पाठवतो. येथे त्याने शक्य असुनदेखिल बळजबरी केलेली नाही. भीमाने ब्रह्मणधर्म न पाळल्याबद्दल द्रोणाला दोष दिला त्यावेळी शस्त्र त्याग करण्याइतका त्याच्या बोलण्याचा परिणाम झाला. याचा अर्थ स्वधर्माने वागण्याला त्या काळात नक्कीच खुप किंमत होती. आपापला धर्म पाळावा, धर्माने सांगितलेली नीतीत्त्वे पाळावीत असा विचार समाजात प्रभावी होता. युधिष्ठीर खोटं बोलला असेल मात्र समाजात सत्यवचनी माणसे असतात. काहींचा त्यांच्यावर विश्वास असतो अशी परिस्थीती होती. द्रोण युधिष्ठीराकडुन अश्वत्थाम्याच्या मृत्युबद्दल खात्री करुन घेणार याची कृष्णाला कल्पना होती, इतका युधिष्ठीर सत्यवचनी होता आणि खरं बोलण्याला इतका मान होता. दुर्बलाशी लढुन निसटलेला विजय पुन्हा मिळण्याची शक्यता असताना तुल्यबळाशीच लढायचं हे नीतीतत्व समोर विनाश दिसतानाही दुर्योधनाने पाळलेलं दिसतं. हे सारं काय दर्शवतं? शारीरबळापेक्षा नीतीतत्वे आणि तत्वज्ञान महत्वाचे नाही काय? कारण या प्रत्येक माणसाने, तो भीष्म असो कि द्रोण कि दुर्योधन, नीतीतत्वाचं पालन करुन जीव गमावला आहे. मग तत्वज्ञान महत्वाचे नाही काय?

कि शारिरीक बल, तत्वज्ञान यापेक्षा बुद्धीबलाचा विजय झाला आहे? तत्वज्ञान पाळण्यापेक्षा तत्वज्ञानाचा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लावण्यात श्रीकृष्णापेक्षा वरचढ महाभारतात कुणीही नाही. तत्वज्ञानाचा आपद्धर्म म्हणुन वेगळा अर्थ लावणे याला बुद्धीबलच आवश्यक आहे. द्रोणवधात आणि दुर्योधनाला भीमाकडुन मारवताना कृष्णाने नेम़कं हेच केलं. भीमाने तर तत्वज्ञानाचा वापरच द्रोणाला नेस्तनाबुत करण्यासाठी केला. युधिष्ठीरानेही दुर्योधनाला पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी बुद्धीचाच वापर केला. याचा अर्थ शारीर बलापेक्षा आणि नीतीत्वापेक्षा बुद्धीच वरचढ असते काय?

शेवटी कुठल्याही परिस्थीतीत विजय मिळविण्यासाठी, जीव वाचविण्यासाठी जे काही करावे लागेल ते योग्यच असा सरधोपट अर्थ यातुन काढला तर तो आततायिपणा ठरेल. मात्र माणसाने संकटात करावे तरी काय? कुठलाही उपाय योजुन जीव वाचवावा? कि तत्वपालन करुन मरावे? हा प्रश्न मला आजच्या काळाला लावावासा वाटतो. आजच्या संघर्षात टिकुन राहावे कि तत्व पालन करुन बाजुला फेकले जाणे पसंत करावे? कि महाभारतानंतरच्या शेकडो वर्षाच्या काळात जगाने काही वेगळा उपाय या समस्येवर शोधला आहे? महाभारताकडे पाहताना “तत्व कि अस्तित्व” हा मला पडलेला गहन प्रश्न आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शंका....वर वरदा यांनी म्हटल्याप्रमाणे धृतराष्ट्र थोरला म्हणून दुर्योधन वारसदार हे बरोबरच, पण मुळात दुर्योधन का युधिष्ठिर असा प्रश्न युधिष्ठिर हा दुर्योधनापेक्षा वयाने मोठा असल्याने उद्भवला होता ना? की नाही?

>>महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे >>Iravati karvaynich Yugant madhye ase mat vyakt kele ahe.

(I am not able to toggle to Marathi fonts.)

सर्वप्रथम एक उत्कृष्ट लेख वाचायला दिल्याबद्दल अतुल ठाकूर यांचे आभार मानतो.

महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे.

सहमत आहे.
अतुल ठाकूर यांचे तीनही प्रसंगासंबंधीचे विवेचन चिंतनीय आहे. त्यांनी वर्णिलेल्या द्रोणवधाच्या प्रसंगात 'भीम' हा नायक असल्याचे म्हटले आहे, ज्याच्याशी मी सहमत आहे. भीमाला नेहमीच आडदांड, युक्तीपेक्षा शक्तीवर भरवसा ठेवणारा, शीघ्रकोपी असे दाखवले जाते. पण माझ्यामते भीमही जितका महापराक्रमी, तितकाच तत्वज्ञ आहे. धर्माचे ज्ञान आणि समज, त्याला (आणि द्रौपदीला) इतर पांडवांच्याइतकीच, किंबहुना काकणभर जास्तच आहे. आपला धर्म काय, आपले कर्तव्य काय याबद्दल त्याचे मन कधीही द्विधा होत नाही. प्रसंग युद्धाचा असो, द्रौपदी वस्त्रहरणाचा असे किंवा वनवासातले दिवस असो- भीमाचे लख्ख माणूसपण अन्य पांडवाच्या तुलनेत झळाळून उठलेले दिसते.

महाभारताची ही मानवी बाजू समजून घ्यायची असेल, तर महाभारतातला चमत्काराचा, अद्भुताचा सर्व भाग वगळून महाभारतातील प्रत्येक पात्राला निखळ मानवी पातळीवर आणणारी एस. एल. भैरप्पांची 'पर्व' ही कादंबरी प्रत्येकाने मनःपूर्वक वाचली पाहिजे. इरावती कर्वेंची 'युगान्त' मी अद्याप वाचलेली नाही, पण 'पर्व' सारखे उत्कृष्ट पुस्तक वाचल्यावर महाभारताची जी मानवी बाजू कळते, त्यामुळे अंतर्मुख व्हायला होते. अतुल ठाकूर यांनी म्हटल्याप्रमाणे "आजच्या संघर्षात टिकुन राहावे कि तत्व पालन करुन बाजुला फेकले जाणे पसंत करावे? कि महाभारतानंतरच्या शेकडो वर्षाच्या काळात जगाने काही वेगळा उपाय या समस्येवर शोधला आहे? महाभारताकडे पाहताना “तत्व कि अस्तित्व” हा मला पडलेला गहन प्रश्न आहे." असाच प्रश्न पडतो.

एक शंका....वर वरदा यांनी म्हटल्याप्रमाणे धृतराष्ट्र थोरला म्हणून दुर्योधन वारसदार हे बरोबरच, पण मुळात दुर्योधन का युधिष्ठिर असा प्रश्न युधिष्ठिर हा दुर्योधनापेक्षा वयाने मोठा असल्याने उद्भवला होता ना? की नाही? >> तस असल तरी युधिष्ठिर राजा होऊ शकत नाही .
राजाचा मुलगा राजा .
राजाच्या लहान मुलाचा मुलगा मोठा आहे म्हणून राजा करायला लागले असते तर लवकरात लवकर मुले जन्माला घालायची रेस लागली असती Happy

भीमाला नेहमीच आडदांड, युक्तीपेक्षा शक्तीवर भरवसा ठेवणारा, शीघ्रकोपी असे दाखवले जाते. पण माझ्यामते भीमही जितका महापराक्रमी, तितकाच तत्वज्ञ आहे. धर्माचे ज्ञान आणि समज, त्याला (आणि द्रौपदीला) इतर पांडवांच्याइतकीच, किंबहुना काकणभर जास्तच आहे. आपला धर्म काय, आपले कर्तव्य काय याबद्दल त्याचे मन कधीही द्विधा होत नाही. प्रसंग युद्धाचा असो, द्रौपदी वस्त्रहरणाचा असे किंवा वनवासातले दिवस असो- भीमाचे लख्ख माणूसपण अन्य पांडवाच्या तुलनेत झळाळून उठलेले दिसते.
<<<<
+ १०० modak ya paragraphla

लेख ज्जाम आवडला. कृष्णाबद्दल 'देव'पणाची भावना केव्हाच संपली आहे मनातली. अतिशय धूर्त, व्यवहारी, सावध प्रेमी, प्रसंगावधानी, पडद्यामागचा सूत्रधार, कर्मप्रधान व्यक्ती (थोडक्यात म्हणजे आजच्या काळात अस्संच वागायला हवं असं वागणं असलेला) म्हणजे कृष्ण!

अतुल ठाकूर,

लेख आवडला. पण पाहिल्या वाक्याबद्दल थोडं स्पष्टीकरण हवं. देव म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे? महाभारतात कोणी देव नाही असं आपण म्हणता, तर देव इतरत्र कुठे आढळतो का?

आ.न.,
-गा.पै.

अतुल ठाकूर,

>> कुणाच्या वतीने स्वयंवरात भाग घेता येत नाही हे भीष्माला ठाऊक असणारच.

मी कुठेतरी वाचलेलं की त्याकाळी वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या चालरीती अस्तित्वात होत्या. भीष्माने त्रिकन्यांचं हरण का केलं त्याचं कारण इथं आहे (हिंदी दुवा).

असो.

व्यासरचित महाभारताचं मराठी भाषांतर वाचून श्री. प्रभाकर फडणीस या गृहस्थांनी काही लेख लिहिले आहेत. ते बरेच रंजक आणि माहितीपूर्ण आहेत. त्यांची अनुदिनी : http://mymahabharat.blogspot.co.uk/

आ.न.,
-गा.पै.

धृतराष्ट्र पांडू पेक्षा वयाने मोठा पण अंध म्हणून पांडू सम्राट झाला. पांडू वनात गेला म्हणून परत धृतराष्ट्र सम्राट झाला. शेवटी अंध सम्राट चालणार होता तर आधीच त्याला सम्राट ठेवायचे ना! मला महाभारताच्या कथेत हे नीट पटले नाही.

कथा म्हणून बघत असू तर! नाहीतर विरोधाभासात जगणे आपल्याला नवीन नाही.

पूर्वापार थोर ठरवल्या गेलेल्या " महाभारत " ग्रंथात पांडव सच्चे आणि कौरव मतलबी, पाताळ्यंत्री, अप्पलपोटे इ. असे डेपिक्ट केले गेले आहेत.

ही लढाई नक्किच अस्तित्त्वाची आहे असं माझं मत आहे. "मी" आहे, मी जिंकणार, माझं राज्य... हा "अहं" सुखावण्यासाठी केली गेलेली लढाई.. त्यात कुणी तरी हरणार, कुणीतरी जिंकणार.. जे जिंकले ते गौरवले जाणार अन कालौघात त्यांचाच उदो उदो होणार.. ग्रे शेड अ‍ॅक्सेप्ट करणं समाजाला अवघड जातं कदाचित.

श्री. शशांक पुरंदरे यांनी पाठवलेला व्यनि जसाच्या तसा देत आहे. याचे महत्त्वाचे कारण हे की धाग्यावरील चर्चा मला व्यनित करायची नसते. दुसरे कारण हे की चर्चा ही पारदर्शक वातावरणात व्हायला हवी. त्यामुळे गैरसमज होत नाहीत. सबब अशा तर्‍हेचे कुणाचे मत असल्यास बेलाशक धाग्यावर मांडावे. मला वाईट वाटणार नाही. माझे यावरील उत्तर मी श्री.शशांक पुरंदरे यांच्या व्यनि अखेर दिले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्री. रा. रा. अतुलजी ठाकूर महाराज,

बालके शशांकचा आपल्या चरणी शिरसाष्टांग दंडवत....

तुमचा "भगवान"(?) कृष्णावरचा लेख वाचला. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की - मी काही तुमच्याएवढा जाणकार नाहीये का भागवत/ महाभारत्/रामायणाचा यांचा तुमच्यासाखा सखोल अभ्यास केलाय.

पण तुमचा लेख वाचताक्षणीच माझ्या लक्षात आले की - कसला तो आपमतलबी चलाख कृष्ण आणि काय गीता सांगतोय तो - सगळाच आचरटपणाच तो - बरे झाले तुम्ही माझ्या डोळ्यात वेळीच झणझणीत अंजन घातले, मला झोपेतून जागे केले....

कोणी एकाने असेच मला पढवले किंवा बहकवले म्हणा - मी उगाचच त्या ज्ञानेश्वरांच्या नादी लागलो. हाच तुमचा लेख आधी वाचला असता तर माझ्या डोक्यात तेव्हाच प्रकाश पडला असता की अर्र र्र.... केवढा चुकीचा उपदेश केलाय या "चलाख" कृष्णाने आणि ज्ञानेश्वर तर फक्त १४-१६ वयाचे - त्यामुळे त्यांना काय पोच असणार या सगळ्या प्रकाराचा....
इतकेच काय आदि शंकराचार्य काय आणि पार लोकमान्य काय कोणालाही हे साधे लक्षातही आले नाही - किती बुद्धिहीन माणसे ही ....
या सर्वांनी तुमचा हा लेख वाचला असता तर नक्कीच सर्व जगाची माफी मागून आपले ग्रंथ मागे घेतले असते व तुमचेच शिष्यत्व पत्करले असते, तुमचेच पाय धरले असते...
आणखी कोणा-कोणाची नावे घ्यावीत - एकनाथ, तुकाराम, नामदेव, रामदास, रामकृष्ण, विवेकानंद ते पार स्वरुपानंदापर्यंत हो- सगळे ते एकाच माळेचे मणी.... कोणाच्याच हे लक्षात आले नाही पहा.... सगळीच अंधमालिका....

पण असो, ते सर्व तर या जगात नाहीयेत - तेव्हा मीच आता (या लेखामुळे शहाणा झालेला) तुमचा अनुयायी होऊ इच्छितो, तुमच्या मागे यायचे म्हणतो - तुम्ही कृपया मला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. तुमचा कृपया पत्ता व मोबाईल नं. द्यावा - कधी एकदा हे गुरुचरण पाहीन असे मला झाले आहे.
(मागे एकदा अशाच एका व्यक्तिने एक लेख लिहिला होता- कृष्णाने अर्जुनाचा रथ नरकात लोटला - त्या महापंडिताचे, महाविद्वानाचे, महात्म्याचे तर दर्शन झाले नाही, निदान तुमचे तरी व्हावे ही मनापासूनची इच्छा.)

-------------------------------------------------------------------------

आता तुमच्या भल्यासाठी काही सांगू इच्छितो - तुम्ही या आधी पातंजल योग आणि हटयोग यासंबंधीही काही तरी लिहिले होते - ते मी नीट वाचले नाही - कारण या कृष्णावरील लेखाने ते सगळे कचकड्याचे आहे हेच सिद्ध केलेत की - या विधानाचा तुम्हाला प्रचंड संताप आला तरी हरकत नाही - कारण तुम्ही जर खरोखरीच योग जाणू इच्छित असाल तर योगाचा साधा अर्थ - "युज्" या धातूपासून आलेला हा योग - जोडणे असा याचा अर्थ - परमेश्वराशी ज्याने जोडला जातो तो योग - इतका साधा अर्थ याचा. आणि ज्या मनात निंदा, द्वेष आदि विकार भरले असतील त्याला का योग प्राप्त होणार - (हे सगळे माऊलींचे आहे - मला तर काहीच कळत नाही) - असे असताना तुम्ही डायरेक्ट योगेश्वराचीच निंदा केलीत तर योग पचनी पडेल का ?

दुसरे असे की तुम्ही त्याची निंदा करा वा स्तुती करा - तो त्याच्या ठिकाणी शांताकार स्वरुपातच आहे, त्या सगळ्याच्या पार पलिकडे आहे. प्रश्न आहे की माझे मन प्रसन्न होणार का अप्रसन्न ?? तर याचे उत्तरही यातच आले - निंदेने अप्रसन्न आणि स्तुतीने प्रसन्न.
आता ठरवा तुम्हीच काय करायचे ते.

समजा, तुम्हाला त्याची निंदाच करायची आहे तर एक काम करा - दररोज "नियमाने" त्याला शिव्यांची लाखोली वहा - काय परिणाम होतो ते तुमचे तुम्हीच अनुभवा .... - तो शाप वगैरे देईल अशी बाळबोध भिती बिती मी घालण्या इतका मीही बावळट नाहीये - पण निंदाच करायची ना तर ती कशी जोरकस, दमदार हवी ना - उगीच इकडे-तिकडे आपले चार शब्दांचे शिंतोडे उडवले असे नको - अगदी सचैल निंदा - मनसोक्त निंदा करा ना .... आणि हो तीही "वर्षभर नियमाने" करा - आणि परिणाम पहा ...

हे सगळे लिहिताना मी तुम्हाला जर दुखावले असेल तर आताच माफी मागतो - पण तुमच्यातही काही सात्विकतेचा अंश आहे - तो फुलावा, उजळून निघावा इतकीच माझी अपेक्षा. परम कृपाळू माऊली तुम्हाला सद्बुद्धी देवो.

आचार्य विनोबांचे एक प्रख्यात विधान -
"अंधःश्रद्धा म्हणजे काय ? तर्क तो देव जाणावा ही अंधःश्रद्धा"

(हे सर्व लिहिताना माझ्या मनालाही प्रचंड वेदना झाल्या -कारण मीही विकारवश झालो- त्याकरता मीही माऊलींच्याच चरणी प्रार्थना करीत आहे - मलाही सद्बुद्धी लाभो, माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष, निंदा, मत्सर, इ. विकार न येवोत ... )

इति लेखन सीमा.....

शशांक
पुणे
--------------------------------------------------------------------------------------------------------

श्री. शशांकसाहेब,

नमस्कार.

१. माझ्या लेखात मी श्रीकृष्णाची निंदा केली आहे असे अजुनही मला वाटत नाही.

२. महाभारताचा अभ्यास हा अनेक दृष्टीकोनातुन केला जातो. मी माझा अभ्यास समाजशास्त्र व मानसशास्त्र या दृष्टीकोनातुन करत असतो. माझा दृष्टीकोन भक्ताचा नाही. तो तसा सर्वांचाच असावा असा आग्रह धरणे योग्य आहे असे मला वाटत नाही.

३. महाभारतातील सर्व व्यक्तीरेखा ही माणसेच आहेत असे धरुन हे विवेचन केले आहे. ज्यांना ते देव आहेत असे वाटते त्यांना तसे मानण्याचा पूर्ण अधिकार आहे. यावर मला वाद घालायचा नाही.

४. बाकी आपण केलेली टिका (तेव्हा मीच आता ("या लेखामुळे शहाणा झालेला) तुमचा अनुयायी होऊ इच्छितो, तुमच्या मागे यायचे म्हणतो - तुम्ही कृपया मला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. तुमचा कृपया पत्ता व मोबाईल नं. द्यावा - कधी एकदा हे गुरुचरण पाहीन असे मला झाले आहे.") यावर मला मत देण्याची इच्छा नाही. अशा तर्‍हेच्या लिखाणावर मत दिल्याने फक्त वादच वाढतात असा माझा अनुभव आहे.

एक नम्र विनंती. यापुढील सर्व प्रतिसाद धाग्यावरच द्यावेत. कृपया व्यनित देऊ नयेत.

आपला नम्र

अतुल ठाकुर

अतुल, तुमचा प्रतिसाद आवडला. क्र.२ व ३ च्या मुद्यांना अनुमोदन

शशांक पुरंदरे, तुम्ही अतिशय श्रद्धाळू दृष्टीकोनातून गीता, ज्ञानेश्वरी यांचा अभ्यास करता. याचाही इथल्या वाचकांना आदर आहेच की! पण म्हणून दुसर्‍याचा दृष्टीकोन वेगळा असूच नये असं कसं म्हणता येईल? ठाकूर कुठेही कुठल्याही व्यक्तिरेखेला उद्देशून अपशब्द वापरत नाहीयेत. 'चलाख' हा अपशब्द नव्हे (निदान माझ्या मते तरी)..

आणि सनातन हिंदू देवताही कधीही पूर्ण पांढर्‍या रंगात नव्हत्या. कृष्णचरित्र, रामचरित्र, इंद्रचरित्र बघा. शंकराने अनेकदा अयोग्य भक्ताला दिलेले वर आठवा... त्याने त्या त्या देवतांची महती, महत्व कुठल्याही भक्ताच्या नजरेतून कमी होत नाही. मग एखाद्याने एक लेख लिहिला तर इतकी तिरकस, औपरोधिक प्रतिक्रिया कशासाठी?

महाभारत ही एक अद्वितीय 'कलाकॄती' आहे असे म्हणल्याने तिचे महत्व कमी होते का?
गीता महाभारताचा एक भाग असल्याने (का बनल्याने?) या जबरदस्त महाकाव्याला धार्मिकतेचे वलय मिळाले. यामुळे त्याच्या साहित्य म्हणून रसास्वादात अडचणीच आल्या.

महाभारताच्या गोष्टीत गीता इ.स च्या पहिल्या-दुसर्‍या शतकात कधी तरी अ‍ॅड झाली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
ती त्याकाळी असलेल्या विविध (वेळप्रसंगी विरोधी वाटणार्‍या) सगळ्या तत्वज्ञानप्रवाहांचा समन्वय साधते, किंवा तसा प्रयत्न करते. त्यातलं तत्वज्ञान हे 'कृतीशील जगण्याचं' तत्वज्ञान आहे जे सर्वसामान्य व्यक्तीलाही आचरणात आणता येते. इतर संन्यासी किंवा उच्च तात्विक चर्चेपासून वेगळं. शिवाय भक्ती संकल्पना (जी सगळ्या आचरणात सोपी) तीही तिथे येतेच... या आणि अशाच अनेको गोष्टींमुळे त्यानंतर किंवा आधी येणार्‍या कुठल्याही तात्विक ग्रंथापेक्षा गीता सर्व समाजात पोचली, मान्यता पावली. शिवाय महाभारताचाच एक भाग असल्यानेही तिचे पावित्र्य वाढले

लक्षात घ्या मूळ गीतेचा प्रसंग काय? तर किंकर्तव्यमूढ अर्जुनाला श्रीकृष्ण 'हाच तुझा धर्म आहे' असं समजावून लढायला उद्युक्त करतो. तो तिथे ते एका वाक्यात समजावणे ते अठरा अध्यायांची गीता सांगणे या स्पेक्ट्रममधल्या कुठल्याही प्रकाराने सांगू शकतोच की! गीताच पाहिजे असं नाही...

शशांक पुरंदरे - अतुल, मी अशी चिल्लरखुर्दा मंडळी जाऊदेत. आमची मतं काउंट होत नाहीत. पण आपण किमान श्री. म. माटे यांच्या विज्ञानबोध या पुस्तकातील गीतेवरचा लेख तरी वाचा! आता त्यालाही तुमची अशीच प्रतिक्रिया होणार असेल तर मग आणखी काय म्हणणार? डी डी कोसम्बींचा गीतेवरचा लेख वाचा असं सांगतच नाही कारण ते पडले मार्क्सिस्ट! शिवाय त्यांनी गीतेविषयी श्रद्धाळूंच्या परिप्रेक्ष्यातून खरंच 'अनुदार' लिहिलं आहे.

कृष्णाने "धर्मापेक्षा" "कर्माला" प्राधान्य दिलेले. .. कृष्णचरित्र नीट अभ्यास केल्यास हेच कळते.. कृष्णाल भुत भविष्य वर्तमान तिघांचेही ज्ञान होते पण मनुष्यरुपात असल्याने त्याला बंधने होतीत.. कृष्णाने भविष्यात होणार्या घटना त्याच स्वरुपात घडाव्यात म्हणुन दुसर्यांकडुन कर्म करुन घेतले.. स्वतः काही केले नाही.. कारण भविष्यात कृष्ण नाहीच आहे कुठे... त्यामुळे त्याने कोणत्याही घटना ज्या भविष्य बदलु शकतील स्वतहुन केल्या नाहीत दुसर्याकडुन करुन घेतल्या.. त्यासाठी त्याला प्रसंगी धर्माविरुध्द देखील जावे लागले... का जावे लागले ? याचा विचार करावा......कारण देव स्वतःच्या स्थापित धर्माविरुध्द कसा जाणार ? हे आपले विचार आहेत आजच्या काळाचे..
त्याकाळात जाउन विचार केल्यास आपल्याला थोडीफार उत्तर तरी मिळतीलच...

अर्जुनाने युध्द लढण्यास नकार दिला....... त्याचा नकार धर्माचरणाशी संबंधीतच होता परंतु त्याचा या निश्चयाचा भविष्यात फार विपरीत परिणाम दिसुन आले असते.. सग़ळे भविष्यच उलटे झाले असते.. आता कृष्णाला भविष्यात काय घडणार आहे हे माहीत आहे आणी ते तसेच घडावे याची जवाबदारी कृष्णाचीच होती...म्हणुनच त्याला अर्जुनाला गीता सांगावी लागली.. जो त्या काळाच्या प्रचलित रुढींपरंपराच्या फार पुढची होती...(कलयुगाची होती) अर्जुनाला भविष्यातल्या धर्माच्या आचरणाची कर्तव्याची जाणिव कृष्णाला करुन द्यावी लागली.. थोडक्यात अर्जुनचा माईंड अपडेट केला कृष्णाने... त्याला ज्ञान पुढील काळातले द्यावे लागले कारण तो त्या काळात अडकुन बसलेला ( जसे आपला कंम्पुटर काही प्रोग्रम्स साठी अडकुन बसतो.. मग त्याला अपडेट केले की त्याचा परफोर्मंस वाढतो) .. अर्जुनाला अपडेट केल्यामुळे भविष्यात घडणार्या घटना जसे घडायच्या आहेत तसेच घडु लागतात...

अवतार का होतात........ ? याचे महत्वाचे कारण .. त्या त्या काळात अश्या काही घटना संभवतात ज्याने भविष्यात फार चुकिचे बदल होतील आणि भविष्याचे कंट्रोल देवाच्या हातातुन निघुन जाण्याची शक्यता संभवते .. अश्या वेळेला त्या घटंनांवर कंट्रोल ठेवण्याकरीता अवतार होतात.. जेणेकरुन त्या त्या घटना योग्य पध्दतीने पुढे सरकतील..आणि भविष्यात काही अडचणी होउ नये...

रामायण मधे इतक्या काही घटना नव्हत्या ज्यासाठी रामाला स्वतः धर्माविरुध्द जावे लागले..उलट त्या घटना घडाव्यात म्हणुन तो धर्माशी निष्ठीत राहिला... उदा. सीता वर संशय घेणे इत्यादी तेव्हा जर सीता वर संशय वगैरे घेतला नसता तर पुढचे लव- कुश प्रकरण त्यानंतरचे नाट्य घडणे शक्यच नव्हते .. ते नाट्य देखील एक धागा असु शकतो भविष्याचा... अन्यथा देवाकडुन चुका होणे शक्य नसते...... ( आता जर मला माहीत आहे १० पावले चाललो तर मी खड्यात पडु शकतो तर मी १० पावले चालेल का ? नाही ..पण हे इतरांच्या दृष्टीने चुक आहे कारण त्यांना हेच माहीत आहे... परंतु मला माहीत आहे की १० पावले चाललो की मी खड्यात पडणार आणि मला त्यात काही मौल्यवान मिळणार..मग मी चालणारच.. हे जगाच्या दृष्टीने चुक असेल माझ्या नाही कारण मला भविष्य माहीत आहे..)

या करिताच कृष्णाला सगळ्या परिणामाची जाणिव असुन सुध्दा त्याने केवळ आपल्या कर्मावर ध्यान दिले.. धर्मावर नाही.......

महाभारतात त्या काळात इतक्या घटना घडत होत्या की त्यातल्या बर्याच घटना प्रचंड महत्वाच्या होत्या भविष्याच्या दृष्टीने... अश्यावेळेला त्या हव्या त्या पध्दतीने घडल्या नाहीत तर सगळे भविष्यच बदलुन गेले असते.. लाक्षागृहात जर पांडव मरण पावले असते तर... अर्जुनाने माघार घेतली असती तर... दुर्योधनाला पुर्ण आशिर्वाद गांधारीने दिला असता तर.. असे असंख्य तर जर मधे बदलु नयेत म्हनुन कृष्णाची भुमिका योग्य होती... तिथे कृष्णाला दुषणे देउन काहीही उपयोग नाही... त्याला प्रत्येक घटनाची प्रतिक्रिया माहीत होती म्हणुन त्याने त्या क्रिया करण्यास धर्माचा विवेकाचा नैतिकतेचा विचार केला नाही.... फक्त त्याला ती कर्म करता येत नव्हती म्हणुन त्याने इतरांना ते करण्यास विवश केले...

कृष्णाने महाभारतात म्हटले आहे.. महाभारताचे युध्द मी काही मिनिटातच संपवले असते जर मी शस्त्र हाती घेतले असते .. पण ते माझे काम नाही ... किंबहुना त्याचे ते कामच नव्हते... तो फक्त कर्म करुन घेण्याकरीता आलेला कर्म करण्यासाठी नाही........जे काम त्याच्या संबधीत होते ते काम त्याने स्वतः केले.. जे काम त्याच्या संबधित नव्हते ते काम त्याने बिल्कुल केले नाही.....

कृष्ण अद्वितीय आहे... चांगले काम केले.. अधर्म देखील केला... शत्रुला संपवण्याकरिता धुर्तपणा तर शकुनीला सुध्दा विचारात आला नसेल इतका केला... शेवटी मानवा सारखे दुख देखील झेलले.. स्वतःचा कुळाचा नाश होताना देखील पाहिला..

त्याने जे कर्म केले त्याचा परिणाम कुळाचा नाश होता.. हे त्याला माहीत होते.. तरी त्याने ते केले .. ( आता हा विचार करा की त्याने हे परिणाम माहीत असुन सुध्दा का कर्म केले?)

................................................

वरील प्रतिसादात काही चुका असल्यास क्षमा असावी.....भाषा देखील काही ठिकाणी चुकीची वाटु शकते त्यासाठी देखील क्षमा असावी

वि. सुचना:-

मी "देव" ही संकल्पना मानत नाही..

अन मला वाटले की मी अन गापै मिळून परत श्रद्धा / भक्ती / धर्म असा तिसराच फाटा फोडत आहोत की काय?

*

आधी शशांकजींना प्रश्न.
<<
दुसरे असे की तुम्ही त्याची निंदा करा वा स्तुती करा - तो त्याच्या ठिकाणी शांताकार स्वरुपातच आहे, त्या सगळ्याच्या पार पलिकडे आहे. प्रश्न आहे की माझे मन प्रसन्न होणार का अप्रसन्न ?? तर याचे उत्तरही यातच आले - निंदेने अप्रसन्न आणि स्तुतीने प्रसन्न.
<<
भक्ती, श्रद्धा या गोष्टी कोणतेही प्रश्न विचारू नका असे सांगतात.
श्रद्धास्थानाबद्दल कुणी काही म्हटले अशी शंका जरी आली, तरी नेहेमी बालकथा कविता लिहिणारे, मृदूभाषी असे तुम्ही, जे चिडलात, (वर उर्धृत केलेल्या परिच्छेदापुढचा निंदेबद्दलचा भाग) ते पाहून पुन्हा एकदा वाटते, की भक्तीचा अन धर्माचा संबंध काय?

*

आता गापै Happy

धर्माच्या नावाखाली श्रद्धाळू धार्मिकांनी चवताळून उठणे, किमानपक्षी मॅक्सिमम लेव्हल संताप येणे, हे वर दिसलेच. इतिहासच पहायचा आंधळ्या भक्तीपोटी धर्मयुद्धे करणे, अन प्रचण्ड नरसंहार व इतर संस्कृतींचा, पुस्तकांचा नाश करणे इ. पाहिले तर भक्ताला धर्म आपोआप कळतो, या तुमच्या गृहितकात काय दम नाही असेच म्हणावेसे वाटते Proud

.

लेख छान आहे Happy

उदयन, प्रतिसाद आवडला.

यशस्विनी,
स्वतः देवाने विविध योग सांगुन ठेवले आहेत. आपण कदाचित भक्तिमार्ग अनुसरत आहोत तर इतर ज्ञानमार्ग. परंतु ज्ञानमार्गाने येणारा व भक्तिमार्गाने येणारा दोघेही त्याच एका ठिकाणी पोचतील हे तर तुम्ही जाणताच. त्यामुळे सत्य शोधायची त्यांची प्रोसेस त्यांच्या परिस्थितीप्रमाने, बुद्धीप्रमाने चालुच आहे असे मला वाटते. त्यामुळे ते चुकिचे आहेत असे आपण बोलु शकत नाही.>>> हे आवडले.

ज्यावेळी त्यांची वेळ येइल त्यावेळी त्यांनाही सत्याचे ज्ञान होईलच>>
ज्ञानमार्गाने येणारा व भक्तिमार्गाने येणारा दोघेही त्याच एका ठिकाणी पोचतील>>

या दोन्ही वाक्यांशी असहमत, यशस्विनी.

मी, आगाऊ, ईब्लिस असे लोक नास्तिक आहोत. आमची सत्याची व्याख्या वेगळी अस्ल्याने आमचे सत्याचे ज्ञानही वेगळे असणारे. आम्हाला भक्तीमार्गाने जाणार्‍यांच्या गावाला जायचं नाही.

लेट्स अ‍ॅग्री टू डिसॅग्री - तुम्ही आम्ही वेगळे विचार तरी एकाच ठिकाणी पोचणार वगैरे पोकळ समजुती करून नको घ्यायला Happy
आस्तिकांच्या, श्रद्धाळूंच्या मतांचा आदर आहे पण म्हणून कृपया आम्हाला तुमच्यात ओढू नका Happy

आगाऊ आणि इब्लिस - तुमच्या पूर्वपरवानगीशिवाय तुमची नावं इथे टाकली आहेत. आक्षेप नसावा बहुदा. असल्यास सांगावा, उडवेन

त.टी - आगाऊ आणि इब्लिस यांची नावं मी इथे माझ्याबरोबर घेतली म्हणजे आमच्या तिघांचेही प्रत्येक विचार प्रत्येकाला पटतातच असं नाही याची इतरांनी ठळकपणे नोंद घ्यावी. त्यावरून इथे किंवा इतर बाफवरती रंगणं करताना ही टीप लक्षात ठेवणे Proud

गिल्टी अ‍ॅज चार्ज्ड! मी देव मानत नाही, व वेदवाक्य प्रमाण आहे असेही मानत नाही, या दोन्ही दृष्टींनी नास्तिक आहे.

आता कंपू केला म्हणतील लोक्स Wink

वरदा यु गो अहेड Happy

मला अभिप्रेत असलेला ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग हे नास्तिकांशी संबधित नाहीत. ते मी भगवतगीतेच्या संदर्भात बोलत आहे. तुम्ही सर्वजण नास्तिक आहात याबद्दल माझी काही तक्रार नाही. तुमचे लाईफ आहे कसे व कोणत्या विचारांनी जगायचे त्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात. त्याबद्दल नो कमेंट्स Happy

परंतु ज्ञानमार्गाने येणारा व भक्तिमार्गाने येणारा दोघेही त्याच एका ठिकाणी पोचतील हे तर तुम्ही जाणताच.
<<
हे बरिक खरे.
शेवटी अमरधाम प्लस मुन्शीपाल्टीने दिलेली सव्वा मण लाकडे. मार्ग कोणताही असो. पोहोचणार एकाच ठिकाणी हे नक्की Wink

(बघा. लगेच वरदा यांच्या मतावेगळे मत मांडले की नाही?)

असे पोचण्याचे काही 'एक' ठिकाण आहे/असते/असावे हेच मान्य नाही त्यामुळे मार्ग कोणता वगैरे तर फारच पुढच्या गोष्टी आहेत!
@ वरदा Lol
माट्यांचा लेख म्हणजे 'गीता अपुरी आहे' हाच का?

हेच, हेच ते!
इन्मिन तीन नास्तिक अन तीन वेगळी मते. म्हणूनच तुम्हा नास्तिकांचं कै खरं नै Lol

Pages