खुळ लागल्यासारखा अन्या त्या मंद प्रकाशाला ज्वाळेप्रमाणे आव्हान देणार्या देहाकडे बघत राहिला होता. आपण हे काय करून बसलो आहोत हे त्याचे त्यालाच समजेना. चार पावलांवर एका कमजोर लाकडी दरवाजाच्या पलीकडे इग्या आणि पवार अजुन कुजबुजत असल्याचे त्याला ऐकू येत होते. ह्या पोरीचा बाप बाहेर कुठेतरी पथारी पसरून निजलेला आहे हे अन्याला माहीत होते. आपण आपल्या स्थानाचा अचानक वापर करण्याचे सुचल्यामुळे ह्या मुलीला आत जाऊन निजण्याचे सांगितले आणि त्यावर कोणाला काही बोलताच न आल्याने ही आत येऊन आडवी झालीही, पण आता पुढे काय?
भरदिवसा अमाप गर्दीत हिचे शरीर आपल्या शरीरावर रेटले गेले होते तेव्हा त्या स्पर्शात पाप जाणवले नव्हते. तेव्हा जाणवले होते कुतुहल आणि नावीन्य! ते कुतुहल शमवण्यासाठी हा सापळा रचला तर आता आपल्यालाच लाज वाटत आहे की आपण हे काय करत आहोत. बरं, आपण तर मोठे अवलिया बाबा आहोत. म्हणजे निदान त्या प्रकारे आपले वागणे तर असायला हवे. आपण लहान पोरासारखे वागलो तर भलतेच व्हायचे. पण मोठ्या माणसाप्रमाणे किंवा अवलिया बाबाप्रमाणे वागायचे म्हणजे करायचे काय?
लाकडी दार करकरण्याचा आवाज झाला. चमकून अन्याने तिकडे बघितले तर दाराखाली एक सावली पटकन हाललेली दिसली. इग्याच असणार डोळा लावून, हे अन्याच्या लक्षात आले. अब्रू घेणे जमले नाही अशी आपलीच बेअब्रू सर्वांदेखत होऊ नये म्हणून अन्याने उठून चिमणी बंद केली. आता लावा म्हणावं डोळे दाराला, झाट काही दिसायचे नाही, असा विचार करून भेदरलेला अन्या त्या पोरीशेजारी कसाबसा बसला तर भलताच प्रकार झाला. त्या पोरीने उठून अन्याला गच्च आवळले आणि त्याला ओढून आपल्याशेजारी आडवे केले.
एक प्रकारे अन्याला मनातून सुटका झाल्यासारखेच वाटले. काय करायचे असते ते तिचं ती स्वतःच करून घेईल आणि आपल्यालाही शिकता येईल असा काहीसा विचित्र विचार त्याच्या मनात आला. पण त्या पोरीचा आवेग काही त्याला सहन होईना! ना श्वास घेता येईना ना तिचे वजन पेलवेना! त्यातच भरपेट जेवण झालेले! मनात नाही नाही ते विचार येत होते. हा प्रकार तावडे पाटलाला समजला तर काय होईल? इग्या आणि पवारच आपले भांडे फोडतील का? हा सगळा आपल्याला बनवण्याचा डाव तर नाही? आजच संध्याकाळी कोणी शहरातला हरामखोर आपले भांडे फोडण्याच्या इराद्याने येऊन गेलेला आहे, त्यानेच तर ही पोरगी आपल्याविरुद्ध पेरलेली नसावी? हिला मूल होत नाही म्हणून ही आपल्याला असे काय करते आहे?
मधेच ती पोरगी अचानक गचका बसल्यासारखी थांबली. उठून बसली. अंधारातच अन्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत म्हणाली......
"काह्यालं म्हाराज?"
"कश्याचं?"
"माझं कल्यान कराल न्हवं?"
तिचं कल्याण करायचं म्हणजे काय करायचं ते अन्याला कुठे माहीत होतं? आणि नेमकं तेच तो अडाण्यासारखा विचारून बसला......
"म्हन्जे? म्हन्जे काय करायचं?"
झालं! अवलिया बाबा बनण्याचा फुगा बंद खोलीच्या अंधारात एकदाचा फुटला. चक्रावलेल्या नजरेने अन्याकडे दोन चार क्षण बघत शेवटी ती पोरगी स्वतःचे दोन्ही हात तोंडावर गच्च दाबून खदखदत हासू लागली. तिचे ते हासणे ऐकून भयानक संतापलेला अन्या शरमलेला असल्याने संताप व्यक्तही करू शकत नव्हता. त्या मुलीला हासण्याची उबळ सहन होईना! तिचा प्रकार निराळाच होता. तिच्या नवर्यात दोष होता, दोष म्हणण्यापेक्षा त्याला ह्या सगळ्यात काही रसच नव्हता. त्यामुळे लग्न झाल्यापासून तिला तिच्या नवर्याने स्पर्शही केलेला नव्हता. सासरचे मात्र तिला मूल होत नाही म्हणून तिला छळत होते. लग्न होऊनही इच्छा पूर्ण होत नसलेली ती मुलगी मनातल्या मनात कुढत होती आणि आज अचानकच एका तालुक्याच्या गावात सर्वानुमते महान असलेल्या बाबाच्या सहवासात ती इच्छा पूर्ण होण्याची घटिका नशिबात आली होती. त्यासाठी मनाने तयार झालेल्या त्या मुलीला अंधारात अचानक एका विनोदी सत्याचा साक्षात्कार झाला होता. ते सत्य म्हणजे हा अवलिया बाबा अजुन पुरता पुरुषही न झालेला एक पोरगा आहे. हे बघून तिचे हासणेच थांबेना! काय पण वळणे घेत आहे आपले नशीब असा विचार करून शेवटी कपाळाला हात लावून खुसखुसत बसली. तसा अन्या उठला. त्याच्या मनात येत होते की तिच्या दोन कानफटात चढवाव्यात, पण परिणाम काय होईल ते त्याला माहीत नव्हते. पण निदान एक गोष्ट त्याला समजलेली होती की ही पोरगी काही कोणी मुद्दाम तेथे पेरलेली नव्हती. तो उठून बसला आणि तिला म्हणाला......
"हासू नकूस"
ते ऐकून ती पोरगी अजुनच चेकाळत हासत सुटली. आता मात्र अन्याचा संताप शिगेला पोचला. त्याने तिची मान धरली आणि तिला गदागदा पुढेमागे हालवली. त्याचा परिणाम वेदना जाणवण्याऐवजी त्या मुलीला आनंद होण्यातच झाला असावा, कारण ती अन्याला म्हणाली.....
"ह्यीच ताकद थितं लावा की? गळा काह्यला धरताय?"
पण अन्याला आणखीन बावळट न बनवता तिने अलगद तिचे ओठ अन्याच्या ओठांवर ठेवले आणि अवलिया बाबांच्या आयुष्यातील एक महत्वाचे प्रशिक्षण सुरू झाले.
====================
अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता ह्या घटकांची पूर्तता झाल्यानंतर जर सामाजिक पतप्रतिष्ठाही मिळत असेल तर चाकोरीबद्ध आयुष्यच जगण्याचे बंधन कोण स्वतःवर लादून घेईल?
रतनचे तेच झाले. त्या रात्री तिने अवलिया बाबांची रात्र संस्मरणीय केली आणि सकाळी उठल्यापासून पाहते तर तीही एक साध्वी ठरू लागली. खायला प्यायला भरपूर, राहायला जागा, तावडे पाटलांच्या खानदानाच्या तोलामोलाचे महत्व आणि परत बायाबापड्या वाकून जाणार! पाहिजे कशाला सासर, नवरा आणि मूलबाळ? तिने बापाला अन्यासमक्ष सांगितले की माझ्या आयुष्याचा मार्ग मला समजलेला आहे. मी येथेच राहणार, तुम्ही गावी जा! हरखलेला आणि अचंबीत झालेला बाप खुळ्यासारखा निघून गेला.
रतन! अचानक त्या आश्रमात शकुंतला जांभळेच्या पाठोपाठ प्रवेशलेले हे स्त्री पात्र चर्चेचा विषय ठरले. महाराजांच्या ऐहिक अवताराची यथोचीत सेवा करण्यासाठी खुद्द मायादेवीने अवतार घेतल्याचे मूर्ख गावकर्यांनी मनाशीच मान्य केले. कोण कुठली रतन आणि अचानक आश्रमातील एक खोली व्यापून पुन्हा मोठीही ठरू लागली. बरं, चारचौघांदेखत तिचे वर्तन असे असायचे की इग्या आणि पवारचे छपरी स्वार्थाने लिंपलेले चेहरे पाहून वैतागलेल्यांना रतनचा चेहरा मोठा पवित्र आणि प्रेरणादायी वाटायचा. तिच्या मिटल्या डोळ्यांच्या चेहर्याचे फोटो आता अन्याच्या फोटोखालोखाल विकले जाऊ लागले. फोटो विकले जाणे हे यश तर अजुन इग्या आणि पवारनेही पाहिलेले नव्हते. ही रतन सफेद वस्त्रांमध्ये ध्यानस्थ बसल्यासारखी बराच वेळ बसायची. अनेकदा महाराजांच्या राहत्या खोलीची साफसफाई करायची. दत्ताचा जप अखंड चालू असे! लहान मुलांना ती विशेष आपुलकीने वागवून त्यांच्याकडून विविध जपजाप्य वगैरे करून घ्यायची. हा तिच्या योजनेतील एक महत्वाचा भाग होता. मुलांवर चांगले संस्कार करणारी माता अशी तिची प्रतिमा अल्पावधीत तयार होऊ लागली होती. रात्री मात्र कटाक्षाने ती आतल्या खोलीत महाराजांबरोबर निद्रिस्त व्हायची. मूळच्याच रसरशीत शरीरावर आता मिळत असलेल्या अन्नामुळे आणि सन्मानामुळे एक झळाळी आलेली होती. रतनचे चौफेर लक्ष असायचे. कोण काय करत आहे हे ती नीट निरखून ठेवायची. तिला गोम बरोबर समजलेली होती. दुनियेला येडे कोण बनवत आहे? तर अवलिया बाबा! म्हणजे आपण कोणाला येडे बनवायला पाहिजे? तर अवलिया बाबाच! अन्याचा एक शब्द ती खाली पडू द्यायची नाही. परिणाम असा होऊ लागला होता की अवलिया बाबांपाशी भक्तांना पोचवण्याचे जे एक्स्क्ल्युझिव्ह राईट्स इग्या आणि पवारकडे होते ते हळूहळू रतनकडे शिफ्ट होऊ लागले. उघड होते की हे इग्या आणि पवारला सहन होणे शक्यच नव्हते. पण जिथे बाबा स्वतःच भुललेले आहेत आणि जिथे बाबांशिवाय आपल्या अस्तित्वाला स्वतंत्र असा काही अर्थच नाही आहे तिथे त्यांची उलट वागण्याची टापच नव्हती. काही झाले की अन्या 'रतनला बोलवा, रतनला सांगा, रतन कुठे आहे, रतनला विचारा' असे करू लागला होता,. त्यात पुन्हा दिवसाकाठी मिळणारा मोकळा वेळ अन्या वाया घालवतच नव्हता. त्याहीवेळी रतनला बोलवतच होता. आणि जे रतन अन्यासाठी करू शकत होती ते इग्या आणि पवार करूच शकत नव्हते.
अल्पावधीतच महिला वर्गासाठी एक स्वतंत्र अशी देवी निर्माण झाली तालुक्यात! रतनदेवी! ह्या रतनदेवीचा यडा बाप चार वेळा तिथे येऊन गेला आणि चारहीवेळा स्वतःच्याच पोरीसमोर वाकून गेला. दोन महिन्यांमध्ये तिने मिळवलेले हे तुफान यश अन्या सोडून इतर सर्व संबंधितांच्या डोळ्यांवर आलेले होते. अन्याला त्यात काहीच वाटत नव्हते कारण अजुनतरी रतनदेवीचा अवतार हा अवलियाबाबांच्या इहलोकीय अवताराच्या परिपूर्णतेपुरताच असल्याचे सर्वमान्य होते. ह्या दोन महिन्यात स्वच्छता अभियान, संस्कार वर्ग, शिक्षणाचे महत्व पटवून देणे, जपजाप्य, कीर्तन प्रवचने अश्याच गोष्टी घडत राहिल्या. ह्या सगळ्याच गोष्टी चांगल्याच होत्या. त्या हरकत घेण्याजोग्या गोष्टी नव्हत्याच. अधूनमधून स्थानिक पेपरांमध्ये काही ना काही छापून यायचे, कधी अवलियाबाबांच्या समाजकार्याचे गुणगान गाणारी बातमी तर कधी त्यांच्यावर अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा आरोप करणारी सनसनाटी बातमी! पण जोवर हानीकारक असे प्रत्यक्ष काहीच घडत नव्हते तोवर असल्या फुटकळ बातम्यांना घाबरायचे अन्याला तर कारण नव्हतेच, वर पुन्हा पाठीशी तावडे पाटलांचा आधारही होताच.
पण ह्या तावडे पाटलांच्या शेतातल्या घरावर आज रात्री एक मीटिंग चालू होती. गुप्त मीटिंग! खुद्द तावडे पाटील, इग्या आणि पवार!
गेल्या एक तासात तावडे पाटलांनी पाजलेल्या इंग्लिश रमला जागून इग्याने अनेक मुद्दे पाटलाच्याच गळी उतरवलेले होते. बाई आल्यापासून अवलियाबाबा खुळावलेला आहे हे सर्वात महत्वाचे! त्यामुळे एक दिवस बाबाचेच महत्व कमी होऊन ही देवीच सगळे बळकावून बसेल ही भीती घातलेली होती. आज बाबांना आलेले महत्व तावडे पाटलांच्या पाठिंब्यामुळे आहे म्हणून, नाहीतर ह्या बाईच्या नादी लागलेल्या बाबाला गावाने गांडीत लाथा घालून हाकलूनही दिले असते हेही गळी उतरवले. मुळात त्या बाईची काही लायकीच नाही, नवर्याने टाकलेली बाई आपल्या ज्वानीचा फायदा करून अवलिया बाबाला खुळा करतीय आणि आश्रमावर सत्ता करतीय. तिचे फोटो विकले जायला लागलेत, बाबांच्याइतकेच गावकरी तिला मानू लागले आहेत. ती तावडे पाटलांना मानतच नाही, ती मानते फक्त अवलिया बाबांना! ह्या सगळ्याचा परिणाम एक दिवस आपण उभारलेला हा आश्रम तिच्या खिशात जाण्यात आणि निवडणुकीत तुमच्या विरोधी मतदान होण्यात होणार हे निश्चीत, वगैरे वगैरे!
हळूहळू तारवटलेल्या डोळ्यांच्या तावडे पाटलाच्या चेहर्यावर उग्र संताप विलसू लागला. त्याने प्रॉब्लेम जणू अॅप्रिशिएट केलेला होता. तीन चार वेळा त्यानेही रतनदेवीकडे पाहून मान तुकवलेली होती. पण प्रत्येकवेळी त्याच्या मनात तिचे शरीरच भरलेले होते. पण हिला वश करण्याचा प्रयत्न निवडणुकीनंतर केलेला बरा हा राजकीय विचार करून पाटील शांत बसला होता. पण आता शिकार करणे आवश्यक झाल्याचे त्याला पटले असल्याचे त्याचा चेहरा सांगत होता. लवकरच ह्या रतनदेवीचे बस्तान हालवले नाही तर ऐनवेळी निवडणुकीत कोण कोणाला मतदान करेल आणि अवलिया बाबाचे किती मतदार ऐकतील हा एक प्रश्नच होता. न जाणो तेव्हा अवलिया बाबापेक्षा ही भवानी मोठी ठरलेली असायची आणि ती म्हणत असायची की भलत्यालाच मत द्या? बरं आपण तर जे काही केले ते सगळे अवलिया बाबासाठी केले, तिच्यासाठी खास असे काहीच केले नाही. तिच्यासाठी काही करावे म्हंटले तर तिच्या मोठे होण्याला आपणच पाठिंबा दिल्यासारखे व्हायचे. आता करायचे काय?
इग्या आणि पवारचे काम फत्ते झालेले होते. आपली बाजू मांडणे आणि ती गळी उतरवणे इतकेच त्यांचे काम होते. ह्यानंतर रोज नुसते योग्य ते फीडबॅक देत राहिले तरी चालणार होते. पाटलाला तर रतनदेवीचा राग आल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे भयाण मध्यरात्री पाटलाच्या शेतातल्या घरून तर्र अवस्थेत इग्या आणि पवार आश्रमात यायला निघाले.
दोघांच्याही कुजबुजत्या आवाजातील चर्चेचे विषय दोनच होते. कसे पाटलाला फितवले आणि रतन आपल्याला कशी मिळेल? पवार तर इरेला पेटल्यासारखा बोलत होता की आता एवीतेवी पाटील आपल्या पाठीशी आहेच तर आजच त्या रतनला बाहेर ओढून काढू आणि अद्दल घडवू.
आश्रमात नित्य चालणारी जपजाप्ये, कीर्तन - प्रवचने आणि नामस्मरण ह्या सर्वाचा मनावर असलेला तकलादू अंमल गळून पडलेला होता. मनात असलेले जनावर जागे झालेले होते. पशू प्रकट झालेला होता. आपल्याला आज मिळालेले स्थान ज्या व्यक्तीमुळे आहे त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध दुसर्या व्यक्तीला त्रास देण्याने आपल्याला काहीच सोसावे लागणार नाही हा गर्व पोटात पोचलेली दारू पुरवत होती. अवलिया बाबाचा उल्लेख 'कालचं पोरगं अन्या' असा होऊ लागला होता. कुजबुजीचे रुपांतर किंचित चढ्या आवाजात बोलण्यात होत होते.
मैलभर अंतर चालल्यावर गावाची वेस लागली आणि पोटातली अख्खीच्या अख्खी दारू आता डोक्यात पोचली. भण्ण गार वारा, उगाच भुंकणारी कुत्री, पोटात गेलेली झणझणीत कोंबडी, डोक्यात गेलेली हवा आणि दारू! समोर अंधारात दिसणारे गावाचे तुरळक अवशेष! मंगलोरी इग्या आणि पवारला जणू चेव चढला. आत्ताच्या आता रतन मिळायला हवी अशी इच्छा ते आता उघडपणे एकमेकांशी बोलताना व्यक्त करू लागले. तावडे पाटील आपल्या पाठीशी असल्यावर भय कोणाचे असेही म्हणू लागले. त्यांचे आवाज आता जवळपास असणार्या कोणालाही सहज स्पष्टपणे ऐकू आले असते. पण इतक्या रात्री कोण जागे असणार?
पण होते. काही गावकरी जागे नव्हते, पण ह्यांच्या बोलण्यामुळे जागे होत होते. आपापल्या घराच्या खिडकीच्या फटीतून ह्या दोघांना बघून आणि त्यांची बडबड ऐकून अवाक होत होते. पावलांचा आवाजही न होऊ देता त्यांच्या मागेमागे चालू लागले होते. त्यातला एक जण अवलिया बाबांचा खंदा समर्थक होता. तो दुसर्या रस्त्याने अवलिया बाबा आणि रतनदेवींना सावध करण्यासाठी धावला.
जवळपास वीस मिनिटांनी अर्वाच्य बडबड करत जोडी आश्रमानजीक पोहोचली. आश्रमाबाहेर लावलेल्या दोन कंदिलांच्या प्रकाशात त्यांना जे दृष्य दिसले ते पाहून त्यांची अक्षरशः बोबडी वळली. पीतांबर नेसून अवलिया बाबा आश्रमाच्या दारात उभे होते. त्यांच्या हातात आसूड होता. डोळे संतापाने या दोघांवर रोखलेले होते. बाजूलाच साध्वी रतन देवी संपूर्ण पांढर्या पोषाखात पद्मासन घालून तीव्र तिखट नजरेने ह्या दोघांकडे पाहात बसलेल्या होत्या. जवळपास पंचवीस गावकरी अवलिया बाबांच्या आज्ञेचे जणू पालन करण्यासाठी हात शिवशिवत असल्याप्रमाणे चुळबुळ करत उभे होते.
आणि अवलिया बाबा जहाल स्वरात म्हणाले......
"दगडानं ठ्येचून मरायचं नस्संल...... तं तालुका सोडून जायचं आत्ताच्या आत्ता...... आन पुन्न्ह्हा पाय ठिवायचा न्हाय हित्तं"
पार्श्वभागाला पाय लावून नशेत कसेबसे पळत असतानाही दोघांच्या पाठीवर काही दगड बसलेच. पण तितक्यावरच निभावले.
अन्याने नेमके काय केले ते फक्त अन्या आणि रतनलाच समजलेले होते. ही कल्पना रतनचीच होती. इग्या आणि पवार पाटलाच्या वाड्यावरून असे बरळत चालत येत आहेत हे समजल्यावर अन्याने प्रथम ठरवले होते की दोघांनाही जाब विचारायचा आणि त्यांच्याकडून वदवून घ्यायचे की ते पाटलाच्या वाड्यावर होते व तेथे खलबते झाली. पण रतनने त्याला सुचवले. डायरेक्ट पाटलाच्या विरुद्ध तुम्ही जाऊच नका, तो विचार गावकर्यांना स्वतःचा स्वतः करूदेत. तुम्ही फक्त पवार आणि इग्याला हाकला. गावकरी आपोआप स्वतःच ठरवतील की पवार आणि इग्याला फूस लावणारा पाटील वाईट आहे. तुम्ही पाटलाविरुद्ध थेट काही बोलल्याने जे वैर उघडपणे घ्यावे लागेल त्यापेक्षा अजिबात वैर नाही आहे असे दाखवून गावकर्यांना आपल्या बाजूने फितवणे हे उत्तम ठरेल.
रतनची दूरदृष्टी अन्याला पटलेली होती आणि त्याने नेमके तेच केले. कसलाही जाब न विचारता फक्त इग्या आणि पवारला हाकलून दिले. त्यामुळे तो पाटलाविरुद्ध आहे की नाही हे गावकर्यांना समजलेच नाही, पण गावकर्यांना इतके समजले, की इग्या आणि पवारच्या मागे असलेली ताकद तावडे पाटीलच आहे.
इग्या आणि पवार दिसेनासे झाले, पण गावक्री खिळून उभे राहिले. त्यांना काहीतरी ठोस भूमिका अपेक्षित होती अवलिया बाबांकडून! हे अन्याच्या लक्षात आले नाही पण रतनदेवींना समजले. रतनदेवी स्वतःच तीक्ष्ण आवाजात म्हणाल्या......
"आम्ही आमच्या विरोधकांना शिक्षा देत नाही, फक्त आमच्यापासून दूर करतो. जो आमच्यापासून दूर होतो तो आपोआपच सुखसमाधानापासून दूर होतोच"
तावडे पाटलाला राजकारण शिकवू शकेल अशी व्यक्ती रतनदेवीच्या रुपाने गावाला मिळालेली होती.
==================
-'बेफिकीर'!
सही.....
सही.....:)
छान च आहे.
छान च आहे.
वाचन्या आधि तुमचे आभार
वाचन्या आधि तुमचे आभार बेफिजि.......भाग टकल्या बद्द्ल
छान !!!!!!!!!!
छान !!!!!!!!!!
most awaited and
most awaited and excelent
Hats of to you sir
लगे रहो
लगे रहो
किती दिवसांनी हा भाग टाकलात?
किती दिवसांनी हा भाग टाकलात? छान आहे
भारी! बाबाच्या बरोबर बाबी पण
भारी! बाबाच्या बरोबर बाबी पण आली सन्गतीला. रन्गत चाललीय कथा.
बेफिकीर, आयला, जब्बरदस्त!
बेफिकीर,
आयला, जब्बरदस्त! ट्विष्टावरी ट्विष्ट सुप्परट्विष्ट!!
रच्याकने, माझाही एकदा औटघटकेचा अन्या झाला होता त्याची गोष्ट. एके ठिकाणी गेलो होतो देवदर्शनार्थ. स्थान फारसं लोकप्रिय नव्हतं. बाहेर एक साधू बसला होता. अगदी निरिच्छ म्हणावा असा. त्याला नमस्कार वगैरे केला. तो म्हणाला आत जाऊन रीतसर दर्शन घ्या. तसा गेलो गाभार्यात आणि बसलो दहापंधरा मिनिटं. थोडं ध्यान (किंवा झोप) लागल्यासारखं झालं. तेव्हढ्या वेळात काही चारपाच माणसांचं कुटुंब दर्शन करून गेलं. मी बाहेर पडून भिंतीस टेकून डोळे मिटून स्वस्थ बसलो. पण बाहेर आल्याआल्या 'अजि म्या ब्रह्म पाहिले' असे भाव पाहुण्यांच्या तोंडावर उमटलेले दिसले. मी फारसं लक्ष दिलं नाही.
पण अवतीभवती पाहुण्यांची लगबग सुरू झाली. विवाहित तरुण मुलगी, तिचे आईवडील आणि अजून दोघेतिघे होते. विवाहितेने मला वाकून नमस्कार केला. मला आधी काही कळेना काय प्रकार चाललाय. मी आपला हात जेमतेम वर केला. पोरीच्या मुखी धन्यभाव प्रकटला. आईवडील आणि बाकीच्यांनी दुरूनच नमस्कार केला. माझ्यासमोर सफरचंद, केली संत्री वगैरे ठेवली. थोड्या वेळाने निघाले. साधूमहाराजांनी ती फळे त्यांना प्रसाद म्हणून परत केली. माझ्या अनुमतीचा वा हरकतीचा प्रश्नच नव्हता.
पाहुणे गेल्यावर मी साधूमहाराजांना म्हंटलं, "बाबा, काय म्हणंत होते पाव्हणे?"
"फार काय नाय बगा. प्वारीला मूल व्हईना. हितं आलं मग घेऊन."
"अन तुमी काय म्हणाले, बाबा?"
"मी म्हनलं माज्याकडं काही न्हाई. तितं आत गारानं घाला."
अन माझी ट्यूब पेटली. साधूमहाराजांनी गाभार्याकडे अंगुलीनिर्देश केला तेव्हा अस्मादिक तिथं होते! मग मी आणि साधूमहाराज बराच वेळ हसत बसलो होतो.
पाहुण्यांनी काढायचा तो अर्थ बरोबर काढलाच. काय करणार बिचारे. संसारचक्रात पिळलेले होते. सांगायची गोष्ट काय की, अवलियाबाबा हे पात्र काल्पनिक असलं तरी गोष्ट खरी असू शकते.
आ.न.,
-गा.पै.
खुप काळाने हा भाग आला. बाबाचे
खुप काळाने हा भाग आला. बाबाचे आता कठीण आहे.
मस्त.. गापै बाबा
मस्त..
गापै बाबा
खुपच छान अन भाग टाकल्याबद्दल
खुपच छान अन भाग टाकल्याबद्दल धन्यवाद............
पुढचे भाग लवकर लवकर येऊ द्या मी याची खुप वाट पाहतो
Befikir tumhi far chaan
Befikir tumhi far chaan lihita , tumch purn nav kay aahe, tumhi fb var aahat ka , plz mala mail kara maja mail id nishagaikwad1986@gmail.com
thanx