'लावणी' नावातच लावण्य ! -marathi lavani

Submitted by मी मी on 31 December, 2013 - 02:38
vidya balama marathi lavani

लावणी अगदी नावातच लावण्य… नृत्य, संगीत अन अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे 'लावणी'. शब्दात सौंदर्य असत कि नृत्यासाठी शब्द लिहिले जातात कुणास ठावूक पण लावणीचं रूप मनात भरल्या वाचून राहत नाही. प्रत्येक लावणीची एक कहाणी किंवा प्रत्येक कहाणीला एक लावणी लागू करता येईल इतकी ती मार्मिक असते. लावणीत शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. शृंगाराच्या भावाबरोबर,भक्ती,शांत,वीर,करुण,वत्सल,हास्य,बीभत्स,असे विविध रस ही लावणीत दिसतात. कधी जवळून अनुभवलंय का लावणीच्या शब्दांना? त्यातला अर्थ ? त्या ठुम्क्यातल्या ठासून भरलेल्या संवेदना…? ढोलकीवर थाप, घुंगरांची साथ रुपवतीचा ठुमका आणि मनाला चटका लावणारे खटकेबाज शब्द …. जीव ओवाळून टाकू नये तर काय ?

'लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्याचं बोलण गं मंजुळ मैनेचं
नारी गं …… नारी गं '

नारीची हि स्तुती शृंगारिक आहे त्यात लावण्य आहे पण त्यात मादकता नाही त्या शब्दांना वासनेचा स्पर्श नाही.

कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्‍नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

नारी च्या रूपाचे इतके सुंदर हृदयस्पर्शी शब्दांनी वर्णन त्याला सुरात लेवून ठुम्क्यात दिलेला ताल आणि मन उमलून टाकेल इतकी सुंदर चाल ….

लावणीची खट्याळ तर्हा तर न्यारीच काय ते प्रश्न अन कसली ती उत्तर …

'कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ?
काल काय ऐकलं, ते खरं हाय का ?
काल म्हनं तुम्ही हितं-तिथं गेला, बघता बघता घोटाळा झाला
काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, खाली नका बघु आता लाजताय का '

पाटलाने लाजून मरून जाऊ नये म्हणजे मिळवले ….

हि काय विचारते आहे बघा तरी …. आणि तिच्या सवंगड्या त्या देखील काही कमी खट्याळ नाहीत हो …

'कुनी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी'
हा प्रश्न तर भारीच

'कुणाची ग कुणाची' सख्यांनीच विचारायचं आणि मग उत्तर हि स्वतःच द्यायचं

'ह्याची का त्याची'
वरून सांगच असा आग्रह
'लाजू नको लाजू नको लाजू नको'

तिची ती जीव ओतून केलेली प्रीत, ती जीवघेणी विनवणी ….

'तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल'

स्वतःच्या शब्दांना आधार देण्यास ती पुढे म्हणते

'अहो जाईजुईच्या फुला
जरा हसुन माझ्यासंगं बोला
जीवघेणा पुरे हा अबोला'

तरीही साजन ऐकणार नसेल तर सख्यांना विनवते तिच्या रायांना घेऊन यायला सांगते …

रातिची झोप मज येइ ना
की दिसं जाइना
जा जा जा ना
कुणितरी सांगा हो सजणा !'

बहाणे तरी कित्ती

मी लई भुलते रुबाबाला,
कुणी तरी बोलवा दजिबाला

गोंधळ, पोवाडे, लावणी आणि भारुड या प्रकारांनी महाराष्ट्राचे संगीत समृद्ध करण्यास मदत केली त्यातल्या त्यात लावणीचे स्थान अग्रगण्य मानले गेले ते काही उगाच नाही…. लावणी विना मराठी सिनेमाचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा इतिहास परिपूर्ण होऊच शकत नाही.

marathi lavani

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख !
पण चित्रपटा बाहेर प्रत्यक्षात जे लावणी / तमाशाचे कार्यक्रम असतात ते जरा अतीच (?) असतात असे ऐकले आहे.

लावणी च खर रूप हेच असावं (अंदाज) … पण सध्या लावणी, तमाशे, पोवाडे अश्या काही कलाकृतींच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणे … शेवटचे श्वास वाचाव्ण्यासाठीची धडपड असावी …. मरता क्या ना करता सारखे

छोटा पण छान लेख !
महेश वाईट कोणीच नसतं परिस्थिती किंवा पब्लिक त्यांना अती करायला भाग पाडतं . अर्थात अती म्हणजे काही अगदीच वाह्यात वगैरे नसतं. आयटम साँग्स पेक्षा बरचं म्हणायचं.

मयी,
चांगला लेख. पण हा विषय खुपच मोठा आहे. यावर पुस्तके आहेत शिवाय मराठी जूने चित्रपटही आहेत.
जुनी नाटके मात्र आता बघता येणार नाहीत.
वर्‍हाडी माणसं, आतून किर्तन वरून तमाशा, होनाजी बाळा या नाटकात उत्तम लावण्या होत्या. स्वरसम्राज्ञी नाटकातही अनेक लावण्या आहेत ( इथं मांडला इश्कबाजीचा, श्रीरंगा सारंगधरा वगैरे, गायिका किर्ती शिलेदार )

बालगंधर्वांचे नाट्यपद, वद जाऊ कुणाला शरण, हेदेखील नेसली पितांबर जरी या लावणीवरच आधारीत आहे.
पेशवाईकालीन लावणी, बैठकीची लावणी असे दर्जेदार कार्यक्रम देखील सादर होत असत.

महेश,
ते सवंग रुप आता आलेय. पुर्वी थोर कलाकार अत्यंत नजाकतीने अदा करत असत. दूरदर्शनवर काही कार्यक्रम झाले होते. लिला गांधींला मी प्रत्यक्ष लावणी सादर करताना बघितलेय.
तश्याही जून्या चित्रपटात ( दादा कोंडके यांच्या पुर्वीच्या ) लिला गांधी, हंसा वाडकर, जयश्री गडकर, जयमाला काळे, संजीवनी बीडकर आदी कलावती उत्तम लावण्या सादर करत असत. नंतरच्या कलावतींनी तो प्रकार सवंग केला.

उषा चव्हाणदेखील दादा कोंडके यांच्या सिनेमापुर्वी उत्तम लावण्या सादर करत असे. ( उदा. सख्यासजणा, ( यात लताच्या लावण्या होत्या, सख्यासजणा नका तुम्ही जाऊ, सजण शिपाई परदेसी ) मुक्काम पोस्ट ढेबेवाडी ( यात बहुतेक तिच्या स्वतःच्या आवाजात लावणी होती. ) )

दिनेशदा छानच माहिती देत आहात तुम्ही लावणी हि आवडती कला असूनही कधी फार ज्ञान नाही घेता आले. या माध्यमाने माहिती गोळा होईल हा उद्देश घेऊनच हा धागा काढला … तरीही बरीच माहिती अभ्यास करून लिहिताही आली असती खरतरं पण फारच मोठा लेख वाचनाचा कंटाळा करतील असे वाटून गेले आणि मी हात आटोपता घेतला …. तसेही मी पाहिलेली लावणी फार अलीकडची त्यामुळे आपणा कुणाला आधीची किंवा त्याही उपरची ची विशेष माहिती असेल तर नक्की सांगा … खूप आवडेल वाचायला

फक्त सिनेमामधील गाण्यांना त्यातही नटरंग वगैरे मधल्या "लावणी" म्हणू नका. लेखामधले बरेचसे उल्लेख चुकलेले आहेत. लावणीची अदा, गायकी आणी शब्द सगळेच गुंता झालेला आहे. अशा विषयांवर लिहिताना अभ्यास करावाच लागतो. किमान गूगल सर्च तरी.

दिनेश. लावणी हा आधीपासूनच "सवंग" प्रकारात मोडणारा भाग आहे, सवंगता "केवढी" हा ज्याचा त्याचा प्रश्न. लावणी ही प्रामुख्याने "मासेस" साठी होती आणि आहे. अस्सल जत्रेच्या तमाशामधे चालणारे डबल मिनींगचे प्रकार असतात, आणि लोक ते एंजॉय करतात. फार पूर्वी म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वीदेखील असेच प्रकार चालत होते. लोकांच्या करमणुकीचा तो एक भाग असल्याने त्यात वावगं वाटण्यासारखं काही नाही.

लावणी लिहिणे अथवा गायकीबद्दल मला फारसं माहित नाही, नृत्याबद्दल मात्र थोडंफार मला माहित आहे तेवढं सांगू शकते.

लावणीचे नृत्यप्रधान, गायकीप्रधान आणि अभिनयप्रधान असे तीन भाग पडतात. अर्थात तिन्ही स्वतंत्र प्रकार नाहीत. ओव्हरलॅप होणारे प्रकार आहेत. लावणी ही कथ्थक बेस्ड असते. लावणीचे पदन्यास कथ्थकचे असतात, मात्र मुद्रा, भाव आणि अभिनय यांवर दाक्षिणात्य नृत्यशैलीचादेखील प्रभाव आहे. "लास्य" रस आणि शृंगारिक रस हा त्यातला प्रमुख भाव. मग त्यामधे हा शृंगार कधी सहजपणे येईल, कधी सूचकपणे, तर कशी अश्लीलपणे तर कधी भडकरीत्या.

जुन्नरी, बालेघाटे, हौद्याची, छकडी असे लावणीचे काही प्रकार आहेत. बैठकीच्या लावणीमधे "गायकी" आणि "अभिनय" महत्त्वाचे तर फडाच्या लावणीमधे नृत्याविष्कार महत्त्वाचा.

>>अस्सल जत्रेच्या तमाशामधे चालणारे डबल मिनींगचे प्रकार असतात, आणि लोक ते एंजॉय करतात.
एकदा सासवड जवळच्या एका गावात तमाशा पहायला मिळाला होता. तुम्ही म्हणता तसे मावशी नावाच्या (बाईचे रूप घेतलेला बाबा) असंख्य दुहेरी अर्थाचे संवाद होते. अगदी दादा कोंडकें यांच्या चित्रपट आणि संवादांप्रमाणे.
तसेच हिंदी गाण्यांच्या चालीवर अनेक मराठी गाणी लावून त्यावर लावणीसारखे नृत्य करणे, इ. पाहिले होते.
अर्थात अगदी पुर्वीसारखे ढोलकी नाही, पण आधुनिक तंत्राचा वापर करून वाद्ये (डीजे यालाच म्हणतात का ?) होती.