१९८६
१९८६ च्या चढाईच्या मोसमात के २ वर चढाईच्या दृष्टीने अनेक गिर्यारोहकांनी पाकीस्तान गाठलं होतं. वेगवेगळ्या वाटांनी के २ च्या माथ्यावर चढाई करण्यासाठी पाकीस्तान सरकारने अनेक मोहीमांना परवाने दिलेले होते.
अॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेचा त्यात समावेश होता. रोझ एक उत्कृष्ट गिर्यारोहक होता. १९८० साली मायकेल वॉर्ड आणि सुप्रसिध्द गिर्यारोहक क्रिस बॉनींग्टन यांच्यासह त्याने चीनमधील अनेक शिखरांवर चढाई केली होती. १९८० मध्ये थंडीच्या मोसमात रोझच्या नेतृत्वात ब्रिटीश तुकडीने पश्चिम धारेवरून एव्हरेस्टवर चढाईची मोहीम आखली होती. मात्र एव्हरेस्टचा माथा गाठण्यात त्यांना यश आलं नाही. १९८० मध्ये रोझ, बॉनींग्टन, पीटर बोर्डमन आणि जो टस्कर ७६४९ मी ( २५४९७ फूट ) उंचीच्या कोंगर ताग शिखरावर यशस्वी चढाई केली होती. के २ च्या मोहीमेवर येण्यापूर्वी रोझने नुपसे आणि ब्रॉड पीकचा माथा गाठलेला होता.
के २ वर आतापर्यंत चढाई न करण्यात आलेल्या ईशान्य मार्गाच्या दक्षिणेच्या मार्गाने चढाई करण्याची रोझची मूळ योजना होती. त्याच्या मूळ योजनेनुसार रॉजर बॅक्स्टर-जोन्स, अॅन्डी पर्कीन आणि जीन अॅफान्सीफ हे गिर्यारोहक आणि छायाचित्रकार आणि बेस कँप मॅनेजर म्हणून जिम करन यांचा त्याच्या तुकडीत समावेश होता. रॉजर बॅक्स्टर जोन्सला १९८३ मध्ये के २ च्या मोहीमेवर ८३०० मी वर माघार घ्यावी लागली होती.
रोझच्या मूळ योजनेला १९८५ मध्ये एक जबरदस्त हादरा बसला. शामोनीक्समध्ये गाईड म्हणून काम करणा-या बॅक्स्टर-जोन्सचा एका अपघातात आपल्या क्लायंटसह दुर्दैवी मृत्यू झाला होता. पीटर ब्रॉडमन, जो टस्कर, अॅलेक्स मॅकइन्टायर आणि पीट थेक्स्टॉन या नावाजलेल्या ब्रिटीश गिर्यारोहकांनाही वेगवेगळ्या मोहीमांत प्राण गमवावे लागले होते. अॅंडी पर्कीनला झालेल्या भीषण अपघातातून तो नुकताच सावरत होता. या दुर्दैवी घटनांमुळे के २ च्या मोहीमेसाठी पुनश्च हरी ॐ करण्याशिवाय रोझपुढे पर्याय नव्हता.
रोझच्या तुकडीत जॉने बॅरीचा समावेश होता. रोझने निव्वळ चढाईवर लक्षं केंद्रीत करण्याच्या दृष्टीने बॅरीवर मोहीमेच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. गिर्यारोहकांत ब्रायन हॉल, फिल बर्क, जॉन पोर्टर, जिम हर्ग्रीव्हज् आणि अॅल आणि एड बर्जेस या जुळ्या भावंडांचा समावेश होता. मूळ योजनेपैकी छायाचित्रकार जिम करनचाही मोहीमेत समावेश होता. शेवटच्या क्षणी डेव्ह विल्कीन्सनचा समावेश करण्यात आला होता. पाकीस्तान सरकारने या मोहीमेला परवानगी दिली परंतु ईशान्य धारेच्या दक्षिण मार्गाऐवजी उत्तरेच्या कठीण मार्गाने चढाई करण्याची !
आतापर्यंत उत्तरेच्या मार्गाने चढाई करणा-या केवळ दोनच मोहीमांतील गिर्यारोहक के २ चा माथा गाठण्यात यशस्वी झाले होते. १९७८ मध्ये जेम्स व्हिटेकरची अमेरिकन मोहीम आणि १९८२ ची जपानी मोहीम यातील गिर्यारोहकांना शिखर गाठण्यात यश आलं होतं. याच मार्गाने आता रोझच्या तुकडीला चढाई करावी लागणार होती.
ब्रिटीश मोहीमेव्यतिरीक्त रेनाटो कॅसारॉट्टोच्या इटालियन तुकडीचाही चढाईच्या दृष्टीने पाकीस्तानात मुक्काम होता. रेनाटोच्या जोडीला त्याची पत्नी गॉरेटा आणि दोन अनुभवी बसाक गिर्यारोहक मारी अब्रेगो आणि जोसेमा कासिमीरो यांचा इटालियन मोहीमेत समावेश होता. रेनाटोने १९८३ मध्ये ब्रॉड पीक आणि १९८५ मध्ये गॉरेटाच्या साथीने गशेर्ब्रम २ वर यशस्वी चढाई केलेली होती. अब्रेगो आणि जोसेमा अॅब्रझी स्परच्या मार्गाने चढाई करणार होते तर रेनाटो कॅसारॉट्टोचा नैऋत्येच्या कठीण मार्गाने एकट्याने चढाईचा बेत होता !
रेनाटोचा १९७९ च्या रेनॉल्ड मेसनरच्या के २ मोहीमेत समावेश होता. मात्र मेसनर आणि रेनाटो यांचं आपसात अजिबात पटलं नव्हतं. मेसनरने आपल्या के २ माऊंटन ऑफ माऊंटन्स या पुस्तकात रेनाटोवर तीक्ष्ण टीका केली आहे. एक गिर्यारोहक म्हणून रेनाटो मेसनरच्या अपेक्षेला उतरला नव्हता. के २ वर नैऋत्य मार्गाने आणि एकट्याने चढाईचा बेत म्हणजे रेनाटोचं मेसनरला आव्हान होतं !
लिलेन आणि मॉरीस बराडच्या फ्रेंच मोहीमेलाही के २ वर चढाईची परवानगी मिळाली होती. बराड पती-पत्नी उत्कृष्ट आणि अनुभवी गिर्यारोहक होते. के २ च्या मोहीमेपूर्वी दोघांनी १९८२ मध्ये गशेर्ब्रम २ ( ८०३५ मी ) आणि १९८४ मध्ये नंगा पर्वत ( ८१२५ मी ) या ८००० मी वरील शिखरांवर यशस्वी चढाई केली होती. मात्र मकालू ( ८४६२ मी ) च्या मोहीमेत मात्र त्यांना शिखरापासून अगदी थोड्या अंतरावर असताना माघार पत्करावी लागली होती. त्यांच्या मोहीमेत फ्रेंच गिर्यारोहक मिचेल पार्मेंटिअर आणि डच गिर्यारोहक वांडा ऋत्कीविझ यांचाही समावेश होता. ऋत्कीविझने १९७८ मध्ये एव्हरेस्ट आणि १९८५ मध्ये नंगा पर्वतावर यशस्वी चढाई केलेली होती.
फ्रेंचांची मोहीम पॅरीसमधून निघण्यापूर्वीच जवळपास बारगळली होती. मॉरीस आणि लिलेन बराड आपल्या मोहीमेच्या खर्चासाठी लागणारे पैसे, पासपोर्ट आणि विमानाची तिकीटं विमानतळावर येताना टॅक्सीत विसरले होते ! आयत्यावेळी उसने पैसे घेऊन आणि सर्व कागदपत्रांची जमवाजमव करून त्यांनी पाकीस्तान गाठलं होतं. मोहीमेवरुन परतल्यावर कर्जाचा मोठा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहणार होता !
जेर्झी कुकुच्झ्का आणि तडेउस्झ पिट्रोवस्की यांची मोहीमही के २ च्या चढाईच्या उद्देशाने पाकीस्तानमध्ये होती. के २ वरील सर्वात धोकादायक वाटेने साऊथ फेसवरून चढाई करण्याची त्यांची योजना होती. ही वाट अत्यंत कठीण टेक्नीकल चढाईची असून या मार्गावर हिमखंड ( सीरॅक ) कोसळण्याचा आणि हिमप्रपाताचा ( अॅव्हलॉन्च ) इतका धोका असतो की सुप्रसिध्द गिर्यारोहक रेनॉल्ड मेसनरने या वाटेचं आत्महत्येचा मार्ग अशा शब्दांत वर्णन केलं आहे ! डॉ. कार्ल हेर्लीगकॉफ्फरच्या स्विस-जर्मन मोहीमेत कुकुच्झ्का आणि पिट्रोवस्कीचा समावेश असला तरी अॅब्रझी स्परच्या मार्गाने न जाता साऊथ फेसवरुन चढाई करण्याबद्दल ते दोघे ठाम होते !
जॉन स्मॉलीचच्या अमेरीकन मोहीमेचाही के २ वरच्या गिर्यारोहकांत समावेश होता. आतापर्यंत कोणीही न गेलेल्या आणि अतिशय कठीण टेक्नीकल चढाई असलेल्या नैऋत्येच्या मार्गाने चढाईचा अमेरिकनांचा बेत होता. याच मार्गाने रेनाटो कॅसारॉट्टोची एकट्याने चढाईची योजना होती.
यांच्याव्यतिरिक्त जानुस्झ माजरची झेक-पोलंड मोहीम, आल्फ्रेड इमित्झरची ऑस्ट्रीयन मोहीम आणि दक्षिण कोरीयन मोहीम यांचा के २ वर चढाईच्या प्रयत्नात असलेल्या गिर्यारोहकांत समावेश होता.
अॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेला उत्तरेच्या मार्गाने चढाईची परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्षात चीनमध्ये प्रवेश करून चढाई करण्यापेक्षा पाकीस्तानमध्येच मुक्काम करून उत्तर-वायव्येच्या मार्गाने चढाई करण्याचा रोझचा बेत होता. ७५ च्या क्रिस बॉनींग्टनच्या आणि त्यानंतरच्या सर्व मोहीमांतील गिर्यारोहकांनी के २ च्या पश्चिमेच्या उताराखाली बेस कँप उभारले होते. ५३६५ मी उंचीच्या बेस कँपवर अॅक्लमटायझेशनला कमी वेळ मिळतो ही यातील मुख्य समस्या होती. त्यातून आणखी धोकादायक भाग म्हणजे हा बेस कँप पश्चिम उताराखालील ग्लेशीयरवर होता. या ग्लेशीयरवरील बर्फाची सतत सुरू असणारी हालचाल आणि क्षणार्धात आ SSS वासणा-या कपारी आख्खा बेस कँप गिळंकृत करू शकत होत्या.
या सर्व बाबींचा विचार करून रोझने के २ च्या पायथ्याशी असलेल्या आर्ट गिल्के स्मारकाच्या जवळच आपला बेस कँप उभारण्याचा निर्णय घेतला. अॅब्रझी स्परच्या पायथ्याशी असलेल्या के २ च्या बेस कँप पासून ब्रिटीशांचा बेस कँप काही अंतरावरच होता.
जिम करनच्या मते ब्रिटीशांच्या बेस कँपची जागा कधीही येऊ शकणा-या अॅव्हलाँचच्या मार्गात होती. अॅलन रोझला मात्रं तसं वाटत नव्हतं. बेस कँपच्या वर काही अंतरावर एक मोठी घळ होती. कोणतंही अॅव्हलाँच या घळीमुळे बेस कँपपर्यंत पोहोचणार नाही अशी रोझची पक्की खात्री होती. १९८३ च्या मोहीमेत रोझला बेस कँपवर एका भीतीदायक अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. बर्फाच्या जोरदार अॅव्हलाँचमुळे सर्वांनी आपापले तंबू सोडून बाहेर धाव घेतली होती. सुदैवाने त्या घळीतून बर्फाचा लोंढा वाहत गेला होता ! मात्र आपल्या तुकडीतील एक गिर्यारोहक स्टीव्ह सस्टड गायब असल्याचं ध्यानात आल्यावर सर्वजण त्याच्या तंबूकडे धावले.
दगडांच्या आडोशाला असलेल्या आपल्या तंबूत तो कानाला वॉकमन लावून वाचत बसलेला आढळला ! अॅव्हलाँच आल्याचा त्याला पत्ताच नव्हता !
फ्रेंच मोहीमेतील मिचेल पार्मेंटिअर आणि डच गिर्यारोहक वांडा ऋत्कीविझ यांचं आपापसात एक मिनीटही पटत नव्हतं. पोलंडच्या टीव्ही कंपनीतर्फे मोहीमेचं चित्रीकरण करण्याचं काम मूळच्या डच असलेल्या वांडाला मिळालं होतं, मात्र त्यासाठी आवश्यक असणारं आवश्यक ते सर्व सामान हाताळणं तिला जमत नव्हतं.
अॅलन रोझने आपल्या तुकडीची दोन गटात विभागणी केली. पहिल्या गटात स्वतः रोझ, एड बर्जेस, फिल बर्क आणि जॉन पोर्टरचा समावेश होता. दुस-या गटात जॉन बॅरी, डेव्ह विल्कीन्सन, अॅल बर्जेस आणि ब्रायन हॉल हे गिर्यारोहक होते. मात्र ब्रायन हॉलच्या पायाला काही महिन्यांपूर्वी शामोनीक्समध्ये स्कीईंग करताना दुखापत झालेली होती. तसंच १९८५ च्या मकालू मोहीमेत डोक्यावर बर्फाचा तुकडा आदळल्याने त्याला डोकेदुखीचा त्रासही जडला होता. बेस कँपवर दोन आठवडे काढल्यावर अखेरीस हॉलने नाईलाजाने मोहीम सोडून परतण्याचा निर्णय घेतला.
रोझच्या तुकडीतील गिर्यारोहक अॅक्लमटायझेशन मध्ये मग्न होते. बेस कँप वरुन कँप १ आणि अॅडव्हान्स बेस कँप ( कँप २ ) वर त्यांच्या फे-या सुरू होत्या. अशाच एका फेरीनंतर बेस कँपवर परतलेल्या गिर्यारोहकांना के २ च्या लहरी हवामानाची एक झलक पाहण्यास मिळाली.
रात्री ११.३० च्या सुमाराला सर्व गिर्यारोहक आपापल्या तंबूत झोपलेले असतानाच के २ जवळच असलेल्या अॅग्नेल शिखराजवळून प्रचंड मोठा हिमखंड कोसळला ! झंझावाती आवाज करत बर्फाचा लोंढा बेस कँपच्या वर असलेल्या घळीतून वाहत गेला ! अचानक झालेल्या या हिमप्रपाताने जिम हार्ग्रीव्हज् अक्षरशः अर्धवस्त्र अवस्थेत आपल्या तंबूतून बाहेर पडून धूम पळत सुटला होता ! रेनाटो कॅसारॉट्टोच्या मोहीमेतील एका गिर्यारोहकाने तसेच जॉन स्मॉलीचच्या मोहीमेतील डॉ. स्टीव्ह बॉयरने ब्रिटीश मोहीमेच्या दिशेने झेपावणारा हिमप्रपात पाहीला होता ! ब्रिटीश गिर्यारोहक या हिमप्रपातात गाडले जाणार अशी त्याची पक्की खात्री झाली ! सुदैवाने कोणालाही कसलाही धोका झाला नव्हता !
सर्व गिर्यारोहक आपापल्या अॅक्लमटायझेशनमध्ये मग्न असताना आणि हवामान सुधारण्याची वाट पाहत असतानाच एक दिवस आणखीन दोन गिर्यारोहक बेस कँपवर येऊन धडकले. त्यापैकी एक होती ब्रिटीश गिर्यारोहक जुली टुलीस. टुलीस के २ वर चढाईचं चित्रीकरण करण्याच्या कामगिरीवर आली होती. १९८४ मध्ये तिने ब्रॉड पीकवर यशस्वी चढाई केली होती. नंगा पर्वत आणि के २ च्या पहिल्या मोहीमेत मात्र तिला शिखरावर चढाई करण्यात अपयश आलं होतं.
दुसरा होता विख्यात ऑस्ट्रीयन गिर्यारोहक कर्ट डिअॅम्बर्गर !
कर्ट डिअॅम्बर्गर म्हणजे एक जिवंत दंतकथा होती ! अ लिव्हींग लेजंड ! के २ वर हजर असलेल्या गिर्यारोहकांपैकी कर्ट इतका अनुभवी गिर्यारोहक शोधूनही सापडला नसता. त्याने ८००० मी वरील दोन पर्वतशिखरांवर सर्वात प्रथम यशस्वी चढाई केली होती. ९ जून १९५७ ला फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस् श्च्मक आणि हर्मान बुह्ल च्या साथीने त्याने ब्रॉड पीक सर्वप्रथम सर केलं होतं. १३ मे १९६० ला पॉल डिएनर, एडमंड फोरर, अल्बर्ट शेलबर्ट आणि दोन शेर्पा न्यिमा दोर्जे आणि नवांग दोर्जे यांच्यासह त्याने धौलागीरीचा माथा गाठला होता ! के २ वर यशस्वी चढाई हे डिअॅम्बर्गरचं स्वप्नं होतं. गेल्या तीस वर्षांपासून तो हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तो अविरत धडपडत होता.
८००० मी शिखरांवर सर्वप्रथम चढाई करणा-या गिर्यारोहकांपैकी डिअॅम्बर्गर हा आजही हयात असलेला एकमेव गिर्यारोहक आहे !
नऊ वेगवेगळ्या मोहीमांतील गिर्यारोहक आपापल्या अंतिम चढाईच्या तयारीत असतानाच के २ ने आपले रंग दाखवण्यास सुरवात केली !
२१ जून
जॉन स्मॉलीचच्या अमेरिकन मोहीमेचा नैऋत्येच्या कठीण आणि टेक्नीकल मार्गाने चढाईचा बेत होता. स्मॉलीच आणि अॅलन पेनींग्टन नेग्रोटो कोलकडे जाणा-या घळीच्या पायथ्याशी असलेल्या कँप १ मध्ये होते. बर्फाच्या मोठ्या पठारावर हा कँप होता. पहाटे ५.३० च्या सुमाराला त्यांनी कँप २ गाठण्यासाठी चढाईला नुकतीच सुरवात केली होती.
कँप २ च्या वर असलेल्या एक भला मोठा खडक अनपेक्षीतपणे खाली घरंगळला ! अमेरिकन मोहीमेतील गिर्यारोहकांनी पूर्वी कँप २ वर चढाई केल्यावर या खडकाला सुरक्षा दोर बांधलेला होता ! हा खडक कोसळला तो नेमका घळीत असलेल्या हिमखंडांवर ! मग काय ! बर्फाचा महापूर घळीतून खालच्या पठारावर झेपावला ! कँप २ च्या मार्गावर असलेल्या स्मॉलीच आणि पेनींग्टनची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करणं अशक्यं आहे.
अमेरिकन मोहीमेतील गिर्यारोहक ब्रायन हकारी आणि स्टीव्ह बॉयर यांना त्याच दिवशी पेनींग्टनचा मृतदेह आढळून आला. अॅव्हलाँचच्या मार्गातून बाजूला होण्यासाठी त्याने कडेला धाव घेतली होती. सुरक्षीत ठिकाणापासून अवघ्या काही यार्ड अंतरावर असताना कोसळणा-या बर्फाने त्याचा बळी घेतला होता. पेनींग्टनचा मृतदेह बेस कँपवर आणण्यात आला आणि आर्ट गिल्केच्या स्मारकाजवळच त्याचं दफन करण्यात आलं.
जॉन स्मॉलीचचा मृतदेह अद्याप कोणाच्या नजरेस पडलेला नाही !
दरम्यान फ्रेंच मोहीमेतील गिर्यारोहकांची धीम्या गतीने शिखराकडे वाटचाल सुरू होती. ६३०० मी, ७१०० मी, ७७०० मी आणि उंचीवरील कँपमध्ये मुक्काम करत अखेरीस त्यांने ७९०० मी वरील शेवटचा कॅंप गाठला होता.
२३ जून
पहाटेच्या आधीच फ्रेंच गिर्यारोहकांनी शिखराकडे कूच केलं होतं. बॉटलनेक पार करून शिखरापासून काही अंतरावर असतानाच बराड पती-पत्नी आणि मिचेल पार्मेंटिअर विश्रांतीसाठी काही वेळ थांबले होते. वांडा ऋत्कीविझने मात्र आपली चढाई सुरूच ठेवली होती.
वांडा ऋत्कीविझ सुमारे १०.३० वाजता के २ च्या माथ्यावर पोहोचली !
के २ वर यशस्वी चढाई करणारी पहिली स्त्री गिर्यारोहक होण्याचा मान तिने मिळवला होता !
तिच्यापाठोपाठ ११.०० वाजता मॉरीस आणि लिलेन बराड आणि मिचेल पार्मेंटिअर शिखरावर पोहोचले !
दुपारी १.०० च्या सुमाराला फ्रेंचांनी परतीचा मार्ग पत्करला.
फ्रेंच तुकडी परतीच्या मार्गावर असतानाच मारी अब्रेगो आणि जोसेमा कासिमीरो या रेनाटो कॅसारॉट्टोच्या इटालियन मोहीमेतील बसाक गिर्यारोहकांशी त्यांची गाठ पडली.
दुपारी २.०० च्या सुमाराला अब्रेगो आणि कासिमीरो के २ च्या माथ्यावर पोहोचले.
मॉरीस बराड चढाईच्या श्रमांनी प्रचंड थकला होता. भराभर उतरणं त्याला अशक्य झालं होतं. त्याच्यासारखीच अवस्था लिलेनचीही झाली होती. दुपारी १.०० च्या सुमाराला परत फिरल्यावरही प्रचंड थकव्यामुळे बराड दांपत्याने कशीबशी ८३०० मी पर्यंतच खाली मजल मारली होती. शिखरापासून फक्त ३०० मी खाली ८३०० मी उंचीवर बराड दांपत्य, पार्मेंटिअर आणि ऋत्कीविझ यांना मुक्काम ( बायव्हॉक ) करावा लागला ! त्यांच्याजवळ तंबू होता, मात्र स्लीपींग बॅग नव्हत्या !
दुपारी २.०० वाजता शिखरावर पोहोचलेले अब्रेगो आणि कासिमीरो कोणत्याही अडथळ्याविना ८००० मी वरील आपल्या कँपमध्ये परतले होते.
२४ जून
८००० मी वरील डेथ झोनमध्ये गिर्यारोहक अडकले होते. डी-हायड्रेशन टाळण्यासाठी बर्फ वितळवून त्याचं पाणी करणं अत्यावश्यक होतं. बर्फ वितळवण्यासाठी फ्रेंच गिर्यारोहकांनी बरोबर घेतलेल्या स्टोव्हमधील इंधन कधीच संपलं होतं. फ्रेंच मोहीमेतील गिर्यारोहकांनी ऑक्सीजन सिलेंडर्स वापरले नव्हते, त्यामुळे लवकरात लवकर खाली उतरणं त्यांच्या सुरक्षीतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं होतं.
दुस-या दिवशी पहाटे लवकरच मिचेल पार्मेंटिअरने अब्रेगो आणि कासिमीरो यांना गाठलं. मात्र अब्रेगो आणि कासिमीरो यांच्याजवळही इंधनाचा खडखडाटच होता. पार्मेंटिअरनंतर काही वेळाने निघालेल्या ऋत्कीविझने लवकरच त्याला गाठलं, परंतु बराड पती-पत्नी मात्रं बरेच मागे पडले होते. अब्रेगो, कासिमीरो आणि ऋत्कीविझने ७८०० मी उंचीवरील फ्रेंचांचा कँप ३ गाठला, मात्र मिचेल पार्मेंटिअर बराड पती-पत्नीची वाट पाहत वाटेतच थांबून राहीला होता !
इटालियन मोहीमेतील गिर्यारोहक शिखरावरील अंतिम चढाईच्या वाटेवर असताना त्यांची मिचेल पार्मेंटिअरशी गाठ पडली. हवामान झपाट्याने बिघडत असतानाही तो अद्याप बराड दांपत्याच्या प्रतिक्षेत थांबला होता ! इटालियन मोहीमेतील फ्रेंच गिर्यारोहक बेनॉईट शामॉक्सने पार्मेंटिअरची खाली उतरण्यासाठी बरीच मनधरणी केली, मात्र बराड पती-पत्नीचा शोध न घेता खाली परतण्याचं त्याने साफ नाकारलं. प्रतिकूल हवामानापुढे शरणागती पत्करून खाली उतरण्यापूर्वी शामॉक्सने आपला रेडीओ पार्मेंटिअरला दिला होता. अक्षरशः अशक्य वेगाने उतरून जवळपास धावतच शामॉक्सने बेस कँप गाठला होता !
मॉरीस आणि लिलेन बराडचा काहीही पत्ता लागत नव्हता ! त्यांच्याकडून कोणताही रेडीओसंदेशही आला नाही ! वादळात ते भरकटून बर्फाच्या कड्यावरुन खाली कोसळले का अतिश्रमाने त्यांचा बळी घेतला हे कदाचित कधीच कळू श़़कणार नव्हतं !
२५ जून
बेस कँपवरील सर्व गिर्यारोहक बराड पती-पत्नी आणि पार्मेंटिअरच्या संदेशाची वाट पाहत होते. शामॉक्स रेडीओला कान लावून असतानाच पार्मेंटिअरचा संदेश आला ! बराड पती-पत्नीची वाट पाहणं सोडून त्याने खाली उतरण्यास सुरवात केली होती ! मात्र हिमवादळामुळे त्याला खाली जाणारा मार्ग सापडत नव्हता !
" मिचेल, उजव्या बाजूला सरकत रहा !" शामॉक्सने पार्मेंटिअरला बजावलं, " चुकूनही डावीकडे पाऊल टाकू नकोस ! उजव्या हाताने सरळ खाली उतर ! दोनशे ते तीनशे मीटर !"
पार्मेंटिअरने आणखी काही माहीती विचारुन रेडीओ बंद केला. शामॉक्स नुकताच खाली परतला असला तरी पार्मेंटिअर नेमका कुठे आहे याचा तो केवळ अंदाज बांधून त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करत होता. हिमवादळात भरकटून पार्मेंटिअर चुकीच्या दिशेला गेला तर सीरॅकवरुन तो कोसळणार हे उघड होतं. शामॉक्स म्हणतो,
" त्या वादळात मिचेलला खाली उतरण्यासाठी बांधलेले सुरक्षा दोर सापडण्याची शक्यता अंधूक होती. फिफ्टी-फिफ्टी चान्स ! मात्र त्याला दोर न मिळाल्यास त्याच्याशी झालेलं संभाषण शेवटचं ठरणार अशी याची मला पक्की खात्री होती !"
अंधार पडण्याच्या सुमाराला पार्मेंटिअरचा पुन्हा संदेश आला ! त्याला बर्फात गिर्यारोहकांच्या खुणा आढळल्या होत्या. तो योग्य मार्गावर होता !
सुटकेची आशा पालवली !
रात्री उशीरा पार्मेंटिअर हाउस चिमनीच्या वर असलेल्या कँप २ वर पोहोचला होता ! वांडा ऋत्कीविझ आणि अब्रेगो-कॅसिमीरो त्याच्याही खाली उतरल्यामुळे तस्रे सुरक्षीत होते !
२६ जून
बराड दांपत्याच्या जिवीताची आशा एव्हाना संपुष्टात आली होती !
दुपारी पार्मेंटिअर आणि ऋत्कीविझ बेस कँपवर पोहोचले. बेनॉईट शामॉक्स त्यांना भेटण्यासाठी आणि सुरक्षीतपणे बेस कँपवर आणण्यासाठी कँप १ वर गेला होता. ऋत्वीकिझच्या बोटांना फ्रॉस्टबाईट झाला होता.
" आम्ही अनेक अक्षम्य चुका केल्या !" पार्मेंटिअर म्हणतो, " डेथ झोनमध्ये कमीत कमी वेळ घालवणं सुरक्षीततेच्या दृष्टीने महत्वाचं असतं, पण आम्ही जवळपास आख्खा एक दिवस तिथे जास्त घालवला. मॉरीस आणि लिलेन २४ जूनच्या सकाळी सर्वात शेवटी निघाले होते. !"
पार्मेंटिअर आणि ऋत्कीवीझ यांच्यातील वाद आता इतक्या टोकाला पोहोचला की ते एकमेकाशी एक शब्दही बोलेनासे झाले होते !
या सर्व प्रकाराला आणखीन एक करूण किनार होती.
२४ जूनला मॉरीस आणि लिलेन बराड मृत्यूशी झुंजत असताना मॉरीसच्या आईचं त्याच्या नावे पत्र आलं होतं. मॉरीस आणि लिलेन यशस्वी चढाई करून सुखरूप परत येतील अशी तिची पक्की खात्री होती ! सत्य परिस्थीतीची कल्पना आल्यावर तिचं काय झालं असेल याची कल्पना करणंही अशक्यं आहे !
के २ वरील मृत्यूसत्राला आता कुठे सुरवात झाली होती !
क्रमश :
ओह्ह हाही भाग सुंदरच.
ओह्ह
हाही भाग सुंदरच.
हाही भाग सुंदरच. >> +१
हाही भाग सुंदरच. >> +१
थरारक !!!
थरारक !!!