हिलरी आणि तेनसिंग्च्या काळात आणि नंतरही अनेक वर्षे काठमांडूहून एव्हरेस्ट बेस कँपपर्यंतचा ट्रेक ३१ दिवसांचा असे. अनेक लहानमोठ्या खेड्यांतून वाट काढत आणि पहाडातून उंच चढत ही वाट एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचते. आता मात्र काठमांडू ते लुकला पर्यंत विमान अथवा हेलीकॉप्टरने जाता येते. अर्थात हे सर्वस्वी काठमांडू आणि लुकला इथल्या हवामानावर अवलंबून असते. लुकला समुद्रसपाटीपासून २८६० मी ( ९३८३ फूट ) उंचीवर वसलेले लहानसे खेडेगाव आहे.
लुकला पासून दुधकोसी नदीच्या काठाने फकडींग आणि तिथून नामचे बाजार ( उच्चार : नामचे बझार ) हे नेपाळमधलं शेर्पांचं सर्वात मोठं गाव गाठण्यास दोन दिवस लागतात. समुद्र्सपाटीपासून नामचे बाजार ३४४० मी ( ११२८६ फूट ) उंचीवर आहे. नेपाळच्या खुंबू विभागातील एक प्रमुख व्यापाराचं केंद्र म्हणून ते ओळखलं जातं. इथे गिर्यारोहणासाठी लागणारं सगळं साहित्य विकत मिळू शकतं. नामचे बाजारहून पुढे निघाल्यावर एका ठिकाणी अमा दाबलाम आणि नुपसे च्या पाठी असलेल्या एव्हरेस्टचं दर्शन होतं. अर्थात ढग नसतील तरच ! नामचे बाजार वरुन पुढे तेंगबोचे हे इथल्या मॉनेस्ट्रीमुळे प्रसिध्द असलेलं गाव आणि त्यापुढे डिंगबोचे, लोबचे आणि मग गोरखशेप वरून एव्हरेस्ट बेस कँप असा हा ट्रेकचा मार्ग आहे. एव्हरेस्ट बेस कँप समुद्रसपाटीपासून ५३६४ मी ( १७५९८ फूट उंचावर आहे ).
एव्हरेस्टचा बेस कँप हा बर्फाने भरलेल्या पर्वतराजीने वेढलेला आहे. बेस कँपच्या वरच्या भागात मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे कड्यांना लटकलेले अनेक हिमखंड दिसून येतात. हे हिमखंड तुटून कोसळल्यामुळे येणा-या अॅव्हलॉन्चच्या गडगडाटाचा आवाज बेस कँपमध्ये रात्रंदिवस येत असतो. पूर्वेला सुमारे पाव मैलांवर नुपसे आणि एव्हरेस्टची पश्चिम भिंत याच्या मधे खुंबू आईसफॉल आहे. या खुंबू आईसफॉल मधे अनेक बर्फाळ कपारी (क्रिव्हाईस) आहेत. हिमनगांच्या सततच्या हालचालींमुळे या कपारींचा आकार सतत बदलत असतो. पश्चिमेला २३५०७ फूट उंच पुमोरी हे शिखर आहे.
एव्हरेस्टच्या माथ्यावर जाणा-या अनेक मोहीमांच्या बेस कँपवर मुक्काम होता. या पैकीच एक होती रॉब हॉलच्या अॅडव्हेंचर कन्सल्टंट या कंपनीतर्फे जाणारी व्यावसायिक मोहीम. न्यूझीलंडमधल्या क्राईस्टचर्च इथला सुमारे सव्वासहा फूट उंच आणि तगडा रॉब हॉल गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नावाजलेला होता. १९९० साली तो प्रथम एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचला होता. रॉबचा जोडीदार होता एडमंड हिलरीचा मुलगा पीटर हिलरी. एव्हरेस्टच्या माथ्यावरून रॉब आणि पीटरने रेडीओद्वारे न्यूझीलंडच्या जनतेशी संवाद साधला होता. १९९२ साली हॉल आणि गॅरी बॉल यांनी सहा क्लायंट्सना एव्हरेस्टच्या शिखरावर नेण्याची मोहीम यशस्वी केली होती. पुढच्या वर्षी सात जणांना एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचवण्यात ते यशस्वी झाले. त्या दिवशी एकूण ४० जणांनी एव्हरेस्टचं शिखर गाठलं होतं ! एव्हरेस्टच्या या होत असलेल्या व्यावसायिकीकरणाबद्दल एडमंड हिलरीनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. १९९० ते ९५ च्या दरम्यान एकूण ३९ क्लायंट्सना एव्हरेस्ट्च्या माथ्यावर पोहोचवण्यात रॉब यशस्वी झाला होता. १९९० साली हॉल प्रथम एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचला तेव्हा एव्हरेस्टच्या वाटेवरच्या खेड्यात दवाखाना चालवणा-या जान अरनॉल्डशी त्याची गाठ पडली होती. तिला पहिल्या डेटसाठी म्हणून रॉबने अलास्काला जाऊन माऊंट मॅकीन्ली चढून जाण्यासाठी विचारल! आणि तिने होकार दिला ! १९९३ मध्ये त्यांचं लग्नं झालं. रॉब बरोबर तिने १९९३ मध्ये एव्हरेस्टचा माथा गाठला होता. या वर्षी मात्र गरोदर असल्यामुळे तिला एव्हरेस्टवर येणं शक्यं झालं नव्हतं.
हॉलच्या तुकडीमध्ये न्यूझीलंडचाच अँडी हॅरीस हा गाईड होता. माई़क ग्रूम हा मूळचा ब्रिस्बेनचा ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक तिसरा गाईड होता. हेलन विल्ट्न ही बेस कँप मॅनेजर आणि कॅरोलीन मॅकेंझी ही डॉक्टर होती. एव्हरेस्टवर चढण्याच्या उद्देशाने आलेल्या क्लायंट्स मध्ये सिएटलचा जॉन क्राकुअर होता. आउटलूक मासिकातर्फे एव्हरेस्टच्या होत असलेल्या बाजारीकरणावर लेखमाला लिहीण्याच्या कामगिरीवर तो आला होता. त्याच्याशिवाय सिएटलचाच डग हॅन्सन, मिशीगनचा लू कासिस्च्के, डलासचा बेक वेदर्स, कॅनडाचा स्टुअर्ट हचिन्सन, ब्रिस्बेनचा जॉन टेस्क, हाँगकाँगचा फ्रॅक फिशबेक आणि जपानची यासुको नम्बा हे हॉलचे क्लायंट्स होते. यांच्यापैकी अनेकजण उत्तम गिर्यारोहक असले तरी फिशबेक, हॅन्सन आणि हचिन्सन वगळता कोणालाही ८००० मी.वर चढाईचा अनुभव नव्हता. गाईड अँडी हॅरीसचीही एव्हरेस्टला येण्याची ही पहिलीच खेप होती.
रॉब हॉलच्या अॅडव्हेंचर कन्सल्टंटशी सगळ्यात मोठी स्पर्धा होती ती स़्कॉट फिशरच्या माऊंटन मॅडनेस कंपनीची. सिएटलचा फिशर हॉलप्रमाणेच उंच आणि धिप्पाड होता. केसांची पोनीटेल बांधणारा फिशरही उत्कृष्ट गिर्यारोहक होता. ११९४ मध्ये काराकोरम पर्वतातलं ब्रॉड पीक आणि १९९४ मध्येच एव्हरेस्ट्चा माथा त्याने गाठला होता. वयाच्या १८ व्या वर्षी अमेरिकेतील नॅशनल आऊटडोअर लीडरशीप स्कूल बरोबर काम करतान फिशरची भेट जीन प्राईसशी झाली. ती अलास्का एअरलाईन्समध्ये कमर्शियल पायलट होती. एका चढाईच्या दरम्यान झालेल्या अपघातानंतर त्याच्या पायाला पेन्सील जाईल इतकं मोठं भोक पडलं ! पण त्यावर उपचारांची पर्वा न करता पुढचे सहा महिने तो वेगवेगळ्या चढायांत भाग घेत राहीला ! आपल्या शारिरीक क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त कष्ट करण्याची त्याला सवय होती. १९९४ साली ऑक्सीजन टँकचा वापर न करता एव्हरेस्ट्चा माथा गाठल्यामुळे गिर्यारोहकांत तो प्रसिध्द झाला होता.
हॉल आणि फिशर व्यावसायिक प्रतिस्पर्धी असले तरीही जवळचे मित्र होते. १९९२ साली एव्हरेस्ट खालोखाल दुस-या क्रमांकाच्या शिखरावर - पाकीस्तानातील के २ - त्यांची प्रथम भेट झाली होती. हॉल आणि गॅरी बॉल के २ चढत असताना फिशर, एड व्हिस्टर्स आणि चार्ली मेस हे देखील के २ चा माथा गाठण्याच्या मोहीमेवर होते. के २ च्या उतारांवर उंचीमुळे होणा-या त्रासामुळे बॉलची अवस्था गंभीर झालेली होती. आपणहून एक पाऊलही टाकणं त्याला अशक्य झालेलं होतं. फिशर, व्हिस्टर्स, मेस आणि हॉल सर्वजण मिळून अखेरीस गॅरी बॉलची हिमवादळातून सुरक्षीत सुटका करण्यात यशस्वी झाले होते. वर्षाभराने अशाच परिस्थितीत धौलागिरी पर्वताच्या मोहीमेवर बॉलचा म्रृत्यू झाला होता. १९९६ च्या एव्हरेस्ट मोहीमेनंतर नेपाळमधल्या मनास्लू या ८१५६ मी ( २६७५९ फूट ) उंचीच्या शिखरावर एकत्र चढाई करण्याची दोघांची योजना होती.
हॉलच्या तुकडीतला जॉन क्राकुअर फिशरला सिएटलपासून ओळखत होता. क्राकुअर आधी फिशरच्या माऊंटन मॅडनेसतर्फेच मोहीमेवर जाणार होता, पण आऊटलूक मासिकाला क्राकुअरसाठी मोठी सवलत देऊन हॉलने त्याला आपल्या तुकडीत सामील करून घेतलं होतं. हॉल आणि फिशर दोघांनाही क्राकुअर आपल्या तुकडीत असावा असं वाटण्याचं कारण त्याच्यामार्फत आणि आऊटलूक मासिकातर्फे मिळणारी प्रसिध्दी होती हे उघड होतं. अर्थात हॉल आणि फिशरच्या मैत्रीत यामुळे कोणताही खंड पडला नव्हता. क्राकुअरशी बेस कँपवर भेट झाल्यावर फिशरनेही त्याचं स्वागत केलं.
फिशरच्या तुकडीतही हॉलप्रमाणेच दोन गाईड होते. त्यापैकी एक होता कझाकस्तानचा मूळचा रशियन असलेला अनातोली बुकरीव. बुकरीव एक अत्यंत धाडसी आणि प्रसंगावधानी गिर्यारोहक होता. १९९६ पूर्वी त्याने ८००० मी पेक्षा उंच असलेली सहा शिखरं सर केली होती. बुकरीवचं वैशिष्ट्य म्हणजे तो कधीही ऑक्सीजन टँकचा वापर करत नसे ! बुकरीवबरोबर नील बीडलमन हा अमेरीकन गाईड होता. हॉलप्रमाणेच फिशरच्या तुकडीतही आठ क्लायंट्स होते. त्यातले बरेचसे अमेरीकन होते. कोलोरॅडोची शार्लोट फॉक्स आणि तिचा बॉयफ्रेंड टिम मॅडसन, न्यूयॉर्कची सँडी हिल पिट्मन, फिशरचा जवळचा मित्र डेल क्रूस, अमेरीकन मार्टीन अॅडम्स, कोपनहेगनची (डेन्मार्क) लेनी गॅमलगार्ड आणि पीट आणि क्लेव स्कोनींग हे दोघं काका-पुतणे होते. अडुसष्ट वर्षांचा पीट स्कोनींग एक गाजलेला गिर्यारोहक होता. १९५३ सालच्या चार्ल्स ह्युस्टनच्या के २ मोहीमेवर एका आणीबाणीच्या क्षणी पीटने आपल्या बर्फाच्या कु-हाडीचा योग्य वापर करून आपल्या सहा सहका-यांचे प्राण वाचवले होते, क्रूस, मॅडसन आणि क्लेव स्कोनींग या तिघांची ८००० मी वरच्या शिखरावरची ही पहिलीच मोहीम होती. डॉक्टर इन्ग्रीड हंट ही बेस कँप मॅनेजर आणि डॉक्टर होती.
या दोन मोहीमांव्यतिरीक्त तैवान सरकार पुरस्कृत मोहीमेची तुकडी बेस कँपवर होती. 'मकालू' गाऊ मिंग हो च्या नेतृत्वाखालील या तुकडीत अनेक अननुभवी गिर्यारोहकांचा भरणा होता.
डेव्हीड ब्रेशीअर्सच्या नेतृत्वाखालील आयमॅक्स मोहीमेची तुकडीदेखील बेस कँपवर होती. एव्हरेस्टच्या यशस्वी चढाईचं चित्रीकरण करण्याच्या हेतूने ही मोहीम आखण्यात आलेली होती. एड व्हिस्टर्स या तुकडीचा सदस्य होता. या दोन अमेरिकनांव्यतीरिक्त स्पेनची अर्सेली सेगारा, जपानची सुमियो सुझुकी, ऑस्ट्रीयन रॉबर्ट शॉअर हे गिर्यारोहक आणि चित्रपट तंत्रज्ञ होते. पॉला व्हिस्टर्स ही बेस कँप मॅनेजर आणि ब्रिटीश ऑड्री साल्केल्ड ही अमेरीकन पत्रकारही मोहीमेवर होती.
दक्षिण आफ्रीकेतील जोहान्सबर्गच्या सन्डे टाईम्सने पुरस्कृत केलेली पहिल्या दक्षिण आफ्रीकन मोहीमेच्या तुकडीतील गिर्यारोहकदेखील बेस कँपवर तळ ठोकून होते. या तुकडीचाचं नेतृत्व मूळच्या ब्रिटीश नागरीक असलेल्या इयन वूडॉलकडे होतं. वूडॉलचं व्यक्तीमत्वं अत्यंत वादग्रस्त होतं. तो कमालीचा हेकेखोर होता. त्याच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला कंटाळून तीन अनुभवी आफ्रीकन गिर्यारोहक एडमंड फेब्रुवारी, अँडी डी क्लर्क आणि अँडी हॅकलँड मोहीम सुरू झाल्याच्या दुस-याच दिवशी काठमांडूला निघून गेले होते. त्याच्या परवानगीशिवाय एका शेर्पा स्त्रीच्या भाजल्याच्या जखमांवर उपचार केले म्हणून त्याने तुकडीची डॉक्टर शार्लोट नोबेल हिची मोहीमेतून हकालपट्टी केली होती ! केन व्हर्नान आणि रिचर्ड शोरे या सन्डे टाईम्सच्या दोघा पत्रकारांनाही त्याने मोहीमेतून डच्चू दिल्यावर आणि एडीटर केन ओवेनशी झालेल्या जोरदार भांडणानंतर सन्डे टाईम्सने मोहीमेतून अंग काढून घेतलं. वूडॉलच्या तुकडीची सदस्य असलेल्या कॅथी ओ'ड्वडची एव्हरेस्टवर वर्णी लावण्याकरता त्याने दुस-या गिर्यारोहकाचा पत्ता कट केला होता. आपल्या गिर्यारोहणाच्या आणि लष्करी कारकिर्दीबद्दलही त्याने अनेक थापा मारल्याचं पुढे सिध्द झालं. वूडॉलच्या तुकडीत ब्रूस हॅरॉडचाही समावेश होता.
या सर्व मोहीमांव्यतिरीक्त गोरान क्रप हा एकांडा शिलेदार होता. मूळचा स्वीडनचा असलेला गोरान स्वीडनपासून सायकलने काठमांडूला आला होता ! गोरान व्यतीरिक्त नॉर्वेचा पीटर नेबी हा एकांडा शिलेदारही बेस कँपवर होता. अल्पाईन अस्सेंट मोहीम, मॅल डफची आंतरराष्ट्रीय मोहीम आणि हेन्री टॉडची मोहीम यांचादेखील तिथे मुक्काम होता.
एव्हरेस्टच्या तिबेटच्या बाजूचा बेस कँप हा ५१५० मी ( १६९०० फूट ) उंचीवर आहे. या प्रदेशात जाण्यास चीन सरकारची परवानगी आवश्यक असते. १९९६ साली दोन वेगवेगळ्या मोहीमांतील गिर्यारोहक तिबेटमधील बेस कँपवर मुक्काम ठोकून होते.
जपानच्या फुकोका मोहीमेचं नेतृत्व कोजी याडा याच्याकडे होतं. हिरोशी हनाडा आणि इझुकी शिगेकवा यांचा त्याच्या तुकडीत समावेश होता.
दुसरी मोहीम होती भारताच्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसांची ! कमांडर मोहींदरसिंहच्या नेतृत्वाखालील या तुकडीत हरभजन सिंह, त्सेवांग सामलां, त्सेवांग पाल्जर, दोर्जे मोरुप, हिरा राम आणि ताशी राम यांचा समावेश होता.
एव्हरेस्ट बेस कँपवर पोहोचल्यानंतर प्रत्येक तुकडीचे सदस्य एका महत्वाच्या कामाला लागले ते म्हणजे सराव आणि अॅक्लमटायझेशन. सर्वसामान्यतः रोजच्या वातावरणात वावरणं आणि ५३०० फुटांवर असलेला बेस कँप आणि त्यापेक्षा उंचीचा शरिराला सराव होणं हे अत्यावश्यक होतं. ऑक्सीजनचं विरळ होत असलेलं प्रमाण आणि वाढत जाणारी उंची याचा शरिराला सराव न झाल्यास जीवघेणे ठरू श़कणारे 'हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडेमा' ( फुफ्फुसात प्रमाणाबाहेर द्रवपदार्थ साचणं ) आणि हाय अल्टीट्यूड सेरेब्रल एडेमा ( मेंदूला सूज येऊन द्रवपदार्थ साचणं ) आजार होण्याची शक्यता असते. फार काळ अती थंड वातावरणात शरीराचा कोणताही भाग उघडा राहिल्यास होणारी हिमबाधा ( फ्रॉस्ट बाईट ) हा अत्यंत धोकादायक प्रकार ! अनेकदा फ्रॉस्ट बाईटमुळे गिर्यारोहकांना आपल्या हाता-पायाची बोटं आणि कित्येकदा हात-पायही गमवावे लागतात.
एव्हरेस्ट बेस कँपवरून शिखरापर्यंतची चढाई ही अत्यंत सुनियोजीत आणि काळजीपूर्वक आखावी लागते. बेस कँपपासून निघाल्यावर पुढच्या प्रत्येक कँपपर्यंत मार्ग आखणं आणि त्याचं नियोजन करणं आणि शेवटच्या कँप वरून शिखरापर्यंतच्या अंतीम चढाईचा मार्ग आखणं हे कौशल्याचं आणि जिकीरीचं काम असतं. हे काम शेर्पा अत्यंत तरबेज आणि व्यावसायिक पध्द्तीने करत असतात. सामन्यतः प्रत्येक एव्हरेस्ट मोहीमेवर शेर्पांची मोठ्या संख्येने नेमणूक होत असते. केवळ मार्गाचं नियोजन करण्याबरोबरच शेर्पांचं दुसरं महत्वाचं काम म्हणजे मोहीमेसाठी लागणारी सर्व सामग्री - ज्यात ऑक्सीजन सिलेंडर्सपासून ते तंबूच्या खुंट्या ठोकायला लागणा-या हातोड्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश होतो - ती बेस कँप आणि प्रत्यक्ष चढाईदरम्यानच्या कँपस् वर पोहोचवणं ! अनेक शेर्पा हे उत्कृष्ट गिर्यारोहक असतात आणि आपल्या मोहीमेतील क्लायंट्स समवेत ते शिखरापर्यंत सहज चढून जातात. तब्बल २१ वेळा एव्हरेस्ट चढणारे आपा शेर्पा हे तर प्रसिध्दच आहेत!
बेस कँपवरून निघाल्यावर शिखराकडे जाण्याचा मार्ग खुंबू ग्लेसीयरवरून २३००० फूट उंचीवरच्या ग्लेसीयरच्या वरच्या टोकाशी जातो. ही प्रचंड हिमनदी वेस्टर्न कूम या नावाने ओळखल्या जाणा-या दरीच्या परिसरातून सुमारे अडीच मैल वाहत जाते. या दरीच्या अनेक टेकड्यांवरून जाणा-या या हिमनदीमुळे इथे सहा इंचापासून ते अर्धा मैल लांबीपर्यंत आणि अंत न दिसणा-या अनेक कपारी ( क्रिव्हाईस ) तयार झालेल्या आहेत. या कपारींचे आकार सतत होणा-या बर्फाच्या हालचालींमुळे सतत बदलत असतात.
वेस्टर्न कूमच्या खालच्या भागातून - सुमारे २०००० फूट उंचीवरून ही हिमनदी एका प्रचंड उतारावरून बेसकँपच्या १७५०० फुटांच्या उंचीवर उतरते. साऊथ कोल रूटवरून एव्हरेस्ट चढाईच्या मोहीमेत गिर्यारोहकांना सर्वात धडकी भरवणारा खुंबू आईसफॉल तो हाच ! या सर्व मार्गावरील सर्वात जास्त बर्फाच्या हालचाली होणारा आणि क्षणार्धात एक फूट लांबीच्या कपारीचं शंभर फूटांपर्यंतच्या अंतहीन कपारीत करणारा हा प्रदेश अत्यंत बेभरवशाचा म्हणून ओळखला जातो. या भागातील बर्फाची दिवसाला चार-पाच फूट हालचाल होत असते. अनेकदा या बर्फाचे मोठ्या इमारतींच्या आकाराचे हिमखंड ( सिरॅक ) तयार होतात. खुंबू आईसफॉलमधून जाताना आणि एकूणच शिखरापर्यंत कधीही कोसळण्याच्या तयारीत असलेले हे हिमखंड म्हणजे सतत टांगती तलवारच. एखादा प्रेमाने मीठी मारायला आला की खेळ खलास ! अर्थात शिखराची चढाई सोडाच पण अॅक्लमटायझेशन साठी बेस कँप वरून कँप १ आणि २ पर्यंत जाताना खुंबू आईसफॉल पार करण्याला पर्याय नसतो. आईसफॉलमध्ये असलेल्या अनेक कपारी पार करण्यासाठी दोरांच्या शिड्यांचा वापर केला जातो. या कपारींतून खाली डोकावल्यास कित्येक वेळेला त्यांचा तळही दिसून येत नाही. १९६३ सालच्या हॉर्नबेन आणि उन्सोल्डच्या मोहीमेतील जेक ब्रेईटनबॅच एका कोसळणा-या हिमखंडामुळे गाडला गेला. खुंबू आईसफॉलने घेतलेला हा पहिला बळी. १९९६ पर्यंत आणखी अठरा गिर्यारोहक आणि शेर्पांचा इथे बळी गेला होता.
१९८८ साली अमेरीकन मोहीमेचं नेतृत्व करणा-या जिम फ्रुशच्या डोक्यात एक निराळीच कल्पना आली. खुंबू आईसफॉलमधून जाणारा रस्ता तयार करण्याबद्दल त्याने बाकीच्या सर्व मोहीमेतील लोकांकडून दर मोहीमेमागे २००० डॉलर्सची मागणी केली. हे ऐकल्यावर खवळलेल्या हॉलने त्याच्यावर चढाईचा बाजार मांडल्याचा आणि खिलाडूवृत्ती सोडून खंडणीखोरीचा आरोप केला. फ्रुश बधला नाही. अखेर हॉलने माघार घेऊन नंतर त्याला चेक पाठवण्याचं कबूल केलं आणि आपला मार्ग सुधारला. फ्रुशच्या म्हणण्यानुसार हॉलने त्याला कधीच चेक पाठवला नाही ! दोनच वर्षानी हॉलने स्वतः फ्रुशचाच मार्ग पत्करला ! १९९३ ते ९५ पर्यंत तर स्वतः हॉलनेच खुंबू आईसफॉलमधून मार्ग तयार करुन बाकीच्या सर्व मोहीमांकडून पैसे गोळा केले होते. १९९६ मध्ये त्याने आईसफॉल मधून मार्ग तयार करण्याऐवजी मार्ग बनवणा-या मॅल डफच्या मोहीमेला पैसे देण्याचा मार्ग पत्करला.
मॅल डफच्या शेर्पांनी हिमखंडांच्या बाजूने जाणारा आणि असंख्य कपारी ओलांडून आईसफॉलच्या पलीकडे वेस्टर्न कूमच्या वरच्या भागात जाणारा मार्ग शोधून काढला होता. या कामी त्यानी अॅल्युमिनीयमच्या साठपेक्षा अधीक शिड्यांचा वापर केला होता. गोरखशेपच्या एका चलाख शेर्पाने या शिड्या विकत घेऊन दरवर्षी त्या भाड्याने देण्याचा धंदा सुरू केला होता ! आईसफॉलमधून जाणा-या संपूर्ण मार्गावर त्यांनी सुरक्षा दोर बांधलेला होता. आपल्या कमरेला बांधलेला सुरक्षा दोर आणि कॅराबिनर त्यात अडकवल्यावर इतर गिर्यारोहकांच्या दोराला जोडण्याची आवश्यकता नव्हती. या पध्दतीने आईसफॉलमधून लवकरात लवकर मार्गक्रमणा करणं सोपं जात होतंच, पण दुस-या गिर्यारोहकांच्या वेगावरही अवलंबून राहवं लागत नव्हतं.
या आईसफॉलमधून जाताना एका सरावाच्या वेळी जॉन क्राकुअरला एक भीतीदायक अनुभव आला. क्राकुअर एका शिडीवरून जात असतानाच एक प्रचंड मोठा आवाज झाला. क्राकुअर पार करत असलेली शिडी भूकंपात सापडल्याप्रमाणे हादरू लागली. नक्कीच कुठेतरी एखादा हिमखंड मोकळा ' सुटला ' होता. तुफान वेगात येणारा तो हिमप्रपात त्याच्यापासून अवघ्या पन्नास फूट अंतरावरून जात दिसेनासा झाला. जीव मुठीत धरुन अखेरीस एकदा तो शिडीवरून पलीकडे पोहोचला !
खुंबू आईसफॉलमधे आणि एकूणच ग्लेसीयरमध्ये होणा-या हालचालींमुळे प्रत्येक कपार पार करणं आणि प्रत्येक शिडी ओलांडणं हे वेगळंच आव्हान असतं. कधी कपारी मूळ आकारापेक्षा आकुंचन पावतात तर कधी अचानक प्रसरण पावल्याने शिडी आणि शिडी बांधलेल्या आधाराच्या खुंट्या हवेत लटकू लागतात. मार्गाची रोजच्यारोज पाहणी होत असली तरीही प्रत्येक कपार ओलांडताना किंवा कोनात पुढे डोकावणा-या हिमखंडाखालून जाताना हे आपलं शेवटचं पाऊल असू शकेल ही भावना प्रत्येकाच्या मनात आल्यावाचून राहत नाही.
स्कॉट फिशरच्या क्लायंट्सपैकी पीट स्कोनींग म्हणजे हिमालयातील एक यशोगाथा होती ! अ लिव्हींग लेजन्ड ! १९५३ साली के २ च्या मोहीमेत त्याने एकट्याने सहा गिर्यारोहकांचा जीव वाचवलेला होता. १९६६ साली पीटने अंटार्क्टीकातील सर्वोच्च शिखर - व्हिन्सेंट मॅसीफ प्रथम पादाक्रांत केलं होतं. १९५८ साली गशेरब्रम या ८००० मी वरच्या मोहीमेचं नेतृत्व त्याने केलं होतं. अमेरीकन गिर्यारोहकांनी यशस्वी केलेली ती सर्वात मोठी मोहीम ठरली होती. नील बिडलमनच्या शब्दांत सांगायचं तर पीट स्कोनींगना मी गाईड करणं याला काहीच अर्थ नाही. मी त्यांच्या तुकडीचा एक सदस्य आहे हाच माझा सन्मान आहे !
या उलट परिस्थिती मकालू गाऊच्या तैवान सरकार पुरस्कृत मोहीमेची होती. त्या मोहिमेतील गिर्यारोहकांना साधा क्रॅम्पॉन बुटावर लावण्याचं ज्ञान नव्हतं. त्यांचं नेतृत्व करणा-या मकालू गाऊची आणि त्याच्या सहा सहका-यांची अलास्कातील मॅकीन्ली पर्वतावरुन अलेक्स लोवे आणि कॉनरॅड अॅन्कर यांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीतून धाडसी सुटका केली होती. शिखरावरच्या वादळात अडकलेल्यांपैकी एक गिर्यारोहक मृत्युमूखी पडला पण लोवे आणि अॅन्कर वेळेवर पोहोचले नसते तर सात जणांपैकी कोणीही वाचलं नसतं. अॅन्कर म्हणतो,
" आम्ही मकालूसह खाली उतरत असताना भेटलेल्या प्रत्येकाला पाहून तो चित्कारत होता व्हिक्टरी ! आम्ही मॅकीन्ली जिंकलं ! जणू काही काही अपघात झालाच नव्हता !"
पंचवीस वर्षांच्या नॉर्वेजियन पीटर नेबीने एक दिवस एक विलक्षण घोषणा केली.
" मी एव्हरेस्टच्या नैऋत्य धारेवरून ( साऊथवेस्ट फेस ) एकट्याने चढाई करणार आहे !"
एव्हरेस्टची नैऋत्य धार हा पर्वतशिखरावर जाण्याचा सर्वात धोकादायक आणि अत्यंत तांत्रीक चढाईचा मार्ग आहे. नेबीचा हिमालयाचा पूर्वानुभव पाहता ही चढाई एकट्याने जमणं त्याला कठीणच होतं.
हॉल आणि फिशरच्या तुकडीतील लोकांमध्ये तैवानी मोहीम, पीटर नेबी आणि वादग्रस्त इयन वूडॉलचे दक्षिण आफ्रीकन यांची नेहमी चर्चा चालत असे. इतके अननुभवी गिर्यारोहक आसपास वावरत असताना कोणती ना कोणती तरी दुर्घटना होणार अशी भीती सर्वांना लागून राहीली होती.
क्रमश :
१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १.............................................................................................१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ३
जबराट!!!!!!!!!!!!!!!!
जबराट!!!!!!!!!!!!!!!!
मस्त लेख आहे , एकदम सही !!!
मस्त लेख आहे , एकदम सही !!!
चांगलं चाललय.
चांगलं चाललय.
मस्तचे हा लेख .... एक साधे
मस्तचे हा लेख ....
एक साधे एव्हरेस्ट शिखर - पण किती त्यासंबंधी माहिती, गिर्यारोहकांचा अभ्यास व इतरही अनेक गोष्टी ....
लिहित रहाणे....
एक साधे एव्हरेस्ट
एक साधे एव्हरेस्ट शिखर???
येवढी माहिती वाचून पण साधे एव्हरेस्ट शिखर???
चांगलं लिहीताय १९९६ च्या
चांगलं लिहीताय
१९९६ च्या एव्हरेस्ट मोहीमेनंतर नेपाळमधल्या मनास्लू या ८१५६ मी ( २६७५९ फूट ) उंचीच्या शिखरावर>>>>> मनास्लु की मानालसू?
के२ सारखंच आता एव्हरेस्टही मोहिमांकरिता बंदच करावा.