पृथ्वी वृत्त : ‘’ नभ निळे ‘’

Submitted by भारती.. on 6 December, 2013 - 11:36

पृथ्वी वृत्त : ‘’ नभ निळे ‘’
(लगाल ललगा लगा लललगा लगागा लगा )
( वृत्तलक्षण -ज,स,ज,स,य,ल,ग -'अधी ज स ज त्यापुढे, स य ल गीच पृथ्वी वसे ', यति ८ वर )

विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी
गती भरत यंत्रणा थरथरे अवाढव्यशी
सहास्य परिचारिका सुवसना करे आर्जवा
‘’सुटे धरणिबंध हा पथिकमित्रहो सज्ज व्हा’’

जसे हळुहळू चढे वर विमान वेगे उठे
घरे नगर कार्यक्षेत्र पथजाल मागे सुटे
क्षणैक नजरेपुढे झरझरा नकाशा सरे
विशाल तिमिरावरी विरळ रोषणाई उरे

उडे शकट एकटा नवनव्या प्रदेशांवरी
किती प्रहर नेणिवेत झरती उदासीपरी
अधांतरच आपले घर नवे मनाला गमे
गवाक्ष पडद्यामधे लपत शर्वरी आक्रमे

सरे समय नाकळे असत नीज की जागृती
तशात परिचारिका दिसत भास-शी आकृती
नसेच पण भास तो, हसत ती करे स्वागता
‘’उठा दिवस हा शुभंकर असो तुम्हा सर्वथा ‘’

गवाक्ष उजळे दिसे उगवती धरे लालिमा
अपार नभपोकळीत झळके नवा नीलिमा
कुठे पुसट पुंजके ढग असे वहाती सुखे
असा दिन महोत्सवी नयन पाहती कौतुके

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे

प्रवास असती किती कुठुनसे कुठे जायचे
मला निखळ वैभवी क्षण असे सवे न्यायचे
असो कलह तल्खली गलबला जिवाभोवती
परंतु एकट क्षणी नभ निळे मला सोबती ..

- भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री. अशोकजी,
आपण वर पोस्ट केलेल्या कवितेसंदर्भाने ----
दुसर्‍या कुणाचेही लेखन मायबोलीवर प्रकाशित करताना प्रताधिकाराबाबत सतर्कता बाळगणे आवश्यक असते. असे लेखन प्रकाशित करीत असताना त्या लेखनकर्त्याची/पुस्तक-प्रकशाकाची लेखी अनुमती घेतली जावी किंवा लेखन प्रताधिकारमुक्त झाले आहे याचा खात्रीलायक पुरावा असणे अत्यावश्यक आहे; अशा स्वरूपाचे मायबोली प्रशासनाचे धोरण आहे असा माझा अनुभव आहे.

तरी आपणांस नम्र विनंती की आपण मायबोली-प्रशासकांशी संपर्क साधून, सदर लेखन मायबोलीत प्रकाशित करणे संयुक्तिक आहे का याची कृपया शहानिशा करून घ्यावी.

मायबोलीविषयी असलेल्या आत्मीयतेमुळे आपणांस ही विनंती केली आहे.
आगाऊपणा केला आहे असे वाटल्यास क्षमस्व.

अरे बापरे ! हे सर्व आत्मीय , उत्साही प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. आजवर कविता जशी स्फुरली तशी लिहिली, तो आनंद वेगळा होता, स्वत:च्या कवीपणावर हा वृत्ताच्या कडव्या शिस्तीचा
प्रयोग केला त्याचे समाधान वाटत आहे तुम्हा सर्वांना ही रचना आवडल्याने.
ही अनेकानेक सुंदर लयबद्ध वृत्ते आपल्या सांस्कृतिक संचिताचा एक भाग आहेत , अक्षरश: ती संस्कृतातून आली आहेत. माझे हे छोटेसे प्रयास ते नादमाधुर्य जागवण्यासाठी.

उल्हासजी,अशोक, रे. टिळकांच्या ''केवढे हे क्रौर्य '' चं शेवटचं कडवं पृथ्वी वृत्तात नाहीय, ते संपादित केल्यास घेतलेला आक्षेप कदाचित गैरलागू ठरेल.. उत्स्फूर्तपणे काही उद्धृत करण्यावर/ रसग्रहण लिहिण्यावर / पद्यानुवाद करण्यावर हे मोठं बंधन तर आलंच आहे, त्याचं नेमकं स्वरूप आपण समजून घेऊ ..असो. रेव्ह. टिळकांच्याच ''कुणास्तव कुणीतरी सतत येरझारा करी ' या जिव्हाळ प्रेमकवितेतही ( जी त्यांनी लक्ष्मीबाई टिळकांना उद्देशून लिहिली होती ) याच वृत्ताचा वापर होता.

भारतीजी,
माझ्या सूचनेनुसार वृत्तलक्षणे दिल्याबद्दल धन्यवाद.

''केवढे हे क्रौर्य '' चं शेवटचं कडवं पृथ्वी वृत्तात नाहीय >>> ते वसंततिलका वृत्तात आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीजी, मी आक्षेप नाही हो घेतला.
फक्त, आपल्या मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत व्यवहाराच्या दृष्टीकोनातून प्रताधिकाराच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला इतकंच. गै.न. (अशोकजींना विपूतून तसे आधीच कळवले आहे.)

(गुगलवर शोधले असता नारायण वामन टिळक यांचा कालखंड १८६१ ते १९१९ असा दिसला.
कदाचित् त्यांचे लिखाण प्रताधिकारमुक्त झालेही असेल. पण आपण खात्री केलेली बरी.)

अभिजात मराठी कवितेची धुरा एकविसाव्या शतकात
"भारती बिर्जे डिग्गीकर" ह्यांच्याकडे आहे असे
म्हणतो.>>>क्या बात है....सहमत

बाकी कवितेसाठी दंडवत ____/\____

===============
'रात्रीच्या गालावरून विमान..' अशी काहीतरी ओळ होती भारतीताईंची ती आठवली सहज. Happy

सुशांत Happy , इथेच आहे तीही कविता, ' निद्राप्रहर' नावाची. ''रत्नखचित कुंडलसे खुपते विमान रात्रीच्या गालावर '' अशी सुरुवातीची ओळ होती .

भारती... साष्टांग नमस्कार तुला. आणि एक कडकडून मिठीही.
नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे...

कितीदा वाचली कविता... त्यातही हे वरचं अत्यंत लयदार कडवं... सगळच किती लोभस आहे...

दाद Happy भेटायचं आहेच आपल्याला, अगदी असंच.
उल्हासजी, गैरसमज तोही तुमच्याबद्दल होण्याचा प्रश्नच नाही.हेतूबद्दल शंकाच नाही.

किती उत्कट प्रतिसाद दिलेत तुम्ही सर्वांनी. समिंग अप केल्याशिवाय राहवत नाहीय,
वैभव, श्रीयु. विदिपा, रसप, अमेय,अगो, शरद , सुशांत, अंजली,पुलस्ति ,चैतन्य, जाई,शिल्पा ..खूपच जबाबदारी टाकलीत एकेका अपार कौतुकाच्या विशेषणा-शब्दांमधून. लक्षात राहतील हे शब्द.त्या अपेक्षांना साजेसं थोडं तरी लिखाण होवो माझ्याकडून.
ज्ञानेश तुम्ही स्वत: फार तयारीचे कवी/ गझलकार आहात..धन्यवाद पुनश्च. अतुल,निपो , मला तुमचे प्रतिसाद नवीन असले तरी तुम्ही कवितेचे अभ्यासक आहात हे कळतंय.
अशोक, तुम्ही नभनादाने वेडावल्याचे लिहिले आहे. तुमच्या प्रतिसादांची श्रीमंती लेखनाची उंची, आकलनाची खोली वाढवत असते नेहमीच.
दिनेश, शशांकजी .. खूप आपलेपणाने दिलेले तुमचे प्रतिसाद माझ्यासाठी नेहमीच मोलाचे आहेत .
शार्दुल, होय, एकट क्षण अत्यंत महत्वाचा शब्द.
शेवटी , ''अंतरातल्या अंतराळात सत्ता करते ही कविता !'' तिची रुपं अनंत..एवढंच.

अप्रतिम ...
विशेष आवडले....

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे

Pages