पुरणाची खीर उर्फ हयग्रीव.

Submitted by नंदिनी on 20 November, 2013 - 06:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ १ वाटी
गूळ पाऊण ते एक वाटी (तुमच्या गोडाच्या आवडीनुसार)
ओले खोबरे
कजू बदाम मनुका इत्यादि (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

चणा डाळ प्रेशर कूकरला पूर्णपणे शिजवून घ्या. डाळ पूर्ण शिजलेली हवी.
प्रेशर उतरल्यावर डाळीमधले पाणी काढून घ्या. (शिकाऊ लोकांसाठी: यालाच कट असे म्हणतात, कटाची आमटी करण्यासाठी वापरा)
एका पॅनमधे शिजवलेली डाळ काढून त्यामधे आवडीनुसार गूळ मिक्स करा. डाळडाळ आवडत नसेल तर गूळ घालण्याअधी मॅशरने डाळ मॅश करून घ्या. (भांडी तुम्हीच घासणार असाल तर ज्या कूकरमधे डाळ शिजवली त्यातच घालून केलेत तरी चालेल.
गूळ विरघळल्यावर (खीर तयार झाली, यापुढे आता गार्निशिंग फक्त!!) त्यामधे आवडत असेल तितके ओले खोबरे घाला. शक्य असेल तर नारळाचे दूध घातलेत तर उत्तमच. मस्त क्रीमी बनते खीर.
काजू बदाम मनुका वगैरे आवडत असतील तर तुपात तळून मग घाला अथवा तसेच घाला (अथवा घालू नका. चॉइस इज युअर्स!) जायफळ, वेलदोडे वगैरेची पूडअघाला.
वाढताना वरून चमचाभर तूप अथवा आवडत असेल तर दूध घालून द्या.

वाढणी/प्रमाण: 
कराल तसे.
अधिक टिपा: 

हयग्रीव बनवताना पुरण गार झाले की कोरडे पडेल या अंदाजाने कन्सिस्टन्सी ठेवा. आधीच खूप कोरडे केले तर खाताना तोठरा बसतो.
गोडाची तुमची जशी आवड असेल तसं गुळाचं प्रमाण कमी जास्त करा.
ही खीर जर खूप कोरडी झालीच तर नारळाचे दूध घालून अथवा दूध घालून सारखी करता येईल.
डाळ नीट मॅश केली असेल तर हेच सारण भरून कडबू, मोदक अथवा करंज्या वाफवता येतील.

आमच्याकडे ही खीर नैवेद्याला कंपल्सरी लागते. मंगलोरे उडुपीकडे देवळांमधून ही खीर प्रसादाला वाटली जाते. या खीरीला हयग्रीव (घोड्यासारखी मान असणारा) असे नाव का आहे मला माहित नाही. मात्र, एक पुराण कथा यासंदर्भात सांगितली जाते.

माहितीचा स्रोत: 
आई+पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे हे. नारळाचे दूध घालून तर सुरेखच लागेल. नक्की करुन बघेन Happy

पण ही खीर, पुरण नाही. मला वाटले आपले नेहेमीसारखे घट्ट पुरण कुकरमध्ये शिजवण्याचा काही शॉर्टकट आहे.

अगो, पुरण पोळीसाठी मी असंच पुरण कोरडं शिजवून घेते आणि पुरणाच्या जाळीवरून काढते. पुरणयंत्रापेक्षा ते सोयिस्कर पडतं आणि पोळ्या करताना मायक्रोवेव्हमधे मिनिटभर ठेवते, त्याने पुरण चांगलं घट्ट आणि कोरडं होतं.

>>भांडी तुम्हीच घासणार असाल तर..
भारी टीप्स नंदु! Happy
ही खीर माझ्या आज्जीकडेही नैवेद्यासाठीच करतात. तूप घालून गरमगरम खीर खायला मस्त मज्जा येते.

आली आली, मोस्ट अवेटेड रेसिपी आली. Happy
श्रावणी शुक्रवारी, स.पुजेला असंच शॉर्टकट पुरण करतात.

आता पुन्हा करशील तेव्हा फोटो टाक नक्की.
मी हयग्रीव नारळाचं दुध घातलेलं खाल्लं आहे.

श्रावणी शुक्रवारी, स.पुजेला असंच शॉर्टकट पुरण करतात.>>> +१ मी तर गणपतीत आणि इतरवेळी पुपो साठी नसतं करायचं तेव्हा असच शॉर्टकट पुरण करते Proud

मी नेहमीच असेच पुरण करते. Uhoh यात शॉर्ट्कट किंवा वेगळे असे काय आहे ते कळले नाही. Uhoh

कन्सिस्टंसी कशी असते या पदार्थाची? गव्हाच्या खीरीसारखी ठेवायची का कन्सिस्टंसी ? म्हणजे पूरणासारखा घट्ट गोळा होऊ द्यायचा नाही त्याआधीच उतरवायचे, बरोबर का?
यात नारळाचे दूध घालायचे झाले तर कधी घालायचे?

मीही असेच पुरण करते पण त्यातसुद्धा भांड्याला खाली लागत नाही ना ह्यावर लक्ष द्यावे लागतेच. पुरणात चमचा उभा राहू शकला की पुरण झाले अशी खूण असते Happy
डाळ चांगली मोडून घेतली तर नाही काढावे लागत पुरणयंत्रातून ...पण तरी ते 'इंस्टंट पुरण' नाही. थोडी मेहनत आहेच Happy

ही खीर करुन बघणार तळलेले काजू घालून. पुरण घट्ट होण्याची गरज नाही त्यामुळे लवकर होईल.

मस्तच रेसिपी. मलाही माहित होती कारण आमच्याकडे पण मोस्टली शुक्रवारी होतेच.
एक शंका गुळ घातल्यावर परत खीर गरम करू शकतो का?

गूळ घातल्यावर मग नारळाचे दूध घालायचे.

कन्सिस्टंसी कशी असते या पदार्थाची? गव्हाच्या खीरीसारखी ठेवायची का कन्सिस्टंसी ? म्हणजे पूरणासारखा घट्ट गोळा होऊ द्यायचा नाही त्याआधीच उतरवायचे, बरोबर का?
यात नारळाचे दूध घालायचे झाले तर कधी घालायचे?<<< हो. गव्हाच्या खिरीपेक्षा थोडी पातळ ठेवलेली चांगली. गार झाल्यावर फार कोरडी होत येते. पुरणासारखा घट्ट गोळा होण्याइतपत शिजवायचे नाही.

ही कृती आपण पुरण करतो तशीच आहे, फार वेगळी नाही. पण झटपट आहे.

पुरण हार्ड अ‍ॅनोडाईझ्ड कूकरमधे केल्यास खाली लागायचे चान्सेस फार कमी आहेत. कूकरमधे म्हणजे प्रेशर कूकर वापरून, प्रेशर कूकींगसारखे शिट्या काढून नव्हे. या खीरीमधे चमचा वगैरे उभा करत बसायची गरज नाही. गूळ विरघळून सगळे एकजीव झाले की खीर झाली. सारखे ढवळत बसायची पण गरज नाही.

बर्‍याच दिवसानी हा शब्द ऐकला... उत्तर कन्नडा स्पेशालिटी डिश !

ही खीर तर आवडतेच.. पण त्याचं इंग्लिश स्टाईल नाव जास्त आवडते Happy

मी नारळाचे दूध घालून (तेही टेट्रा पॅकमधील) एक दोनदाच बनवली आहे. तेव्हा तरी नासली नव्हती. आमच्याकडे बर्‍ञाचदा ओले खोबरे घालून बनवली जाते.

एक शंका गुळ घातल्यावर परत खीर गरम करू शकतो का?>>> हो करू शकता, फार कोरडी वाटली तर आधी शिजवलेला कट असेल तर घाला किंवा थोडं दूध घाला.

बीएस, दलिया घालून मी कधी केली नाही, पण मंगलोरला साबुदाणा घालून केलेली पाहिली आहे. ती वेगळीच बनवतात खीर. चवीला अर्थात ऑस्सम लागते.

मस्तंय खीर. नक्की करणार. चांगली हेवी होत असेल ही, दुपारीच आणि नंतर एक-दोन तास पहुडायला असतील तेव्हाच करायला हवी. हयग्रीव हा शब्द वाचल्यावर उग्गीचच रामायण-महाभारताची आठवण झाली!

पण मंगलोरला साबुदाणा घालून केलेली पाहिली आहे. ती वेगळीच बनवतात खीर. चवीला अर्थात ऑस्सम लागते. >>> ही खीर मी दसर्‍याच्या आधीच्या वर्किंग डे ला कँटीनमध्ये खाते. कँटीन काँट्रॅक्टर्स नेहमी मंगलोरियनच असतात कसे कोण जाणे. ते त्या दिवशी पूजा ठेवतात आणि सगळ्यांना प्रसादाची साबुदाणा घातलेली पुरणाची खिर देतात वाटी वाटी भर :-). सुपारीचे पांढरे तुरेही देतात बायकांना. त्यांना बरं वाटावं, दिल्याचा मान राखावा म्हणून आम्ही ते डोक्यात घालतो मज्जेशीर दिसलं तरी Uhoh

खीर तयार झाली<< पर्यन्त पुरणाचीच क्रुती आहे ना? फोटो टाक मला पुरणाचा गोळाच येतोय डोळ्यासमोर Happy

आमच्याकडे सणावाराला देवांसाठी हयग्रीव, कडबू, चित्रान्न असे एरव्ही न बनवले जाणारे पदार्थ बनवतात. पण मंत्रालयम इथे (आंध्रप्रदेश) राघवेंद्र मठात खालेल्ल्या हयग्रीव ची चव अजून काही घरी जमली नाही. तिथे हयग्रीव मध्ये बहुतेक खायचा कपूर, तुळशीची पाने किंवा रस घालतात.

तिथे खायचा कापूर घालतात असे सांगितलेले एका मैत्रीणीने. सौदिंडियन बुंदी लाडवात पण घालतात खायचा कपूर म्हणूनच त्याला एक विशिष्ट वास (स्मोकी वास वाटतो मला तरी तो लाडू खूप आवडतो) असतो लाडू व खीर जे सॉउथच्या देवळात (बहुतेकश्या) मिळतात.

आम्ही असे लाडू जे प्रसाद म्हणून मिळत ते फोडून त्यात दूध घालून बुंदीची खीर म्हणून खायचो ते आठवले.
हयग्रीव पण मस्त वाटते कधीतरी खायला.

Pages