तें . . .

Submitted by अंकुरादित्य on 15 November, 2013 - 12:00

समस्त महाराष्ट्राने ' तें ' वर मनापासून प्रेम केलं . त्यांना आपलंसं मानलं . 'तें ' च्या वेगळेपणाला स्वीकारलं . कारण 'तें ' म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे . तर ती एक मानसिकता आहे . एक जीवनशैली आहे . प्रस्थापित शक्ती , समजुती , भाकडकथा यांना हादरवून टाकणारी ताकद आहे . इतिहासात न रमता इतिहास निर्माण करण्याची जिद्द आहे . वर्तमानाला न चुचकारता भविष्याला आव्हान देण्याची धमक आहे . समाजात वावरताना सामाजिक नैराश्या विरोधात केलेला विद्रोह आहे . मोठ्ठ होत असताना मोठेपणातील फोलपणा ओळखून जमिनीशी नातं टिकवून धरण्याचा मोठेपणा आहे . वैयक्तिक आयुष्यातील दुक्खे मागे सारून समाजाला , देशाला पुढे नेण्याचे नेतृत्व आहे . मागाहून येणाऱ्या अनेक पिढ्यांवर गारुड राहावं अस कर्तुत्व आहे . उंचीवर जाऊन देखील खोलीतला खोलपणा जाणण्यातलं अन मानण्यातलं तत्व आहे . पराकोटीचे प्रेम अन टोकाचा विरोध एकाचवेळी मिरवण्याचे निष्काम कर्मयोग्याचे 'तें ' चे जीवन आहे . . . . 'तें ' . . मग ते विजय असो वा सचिन . . . क्षेत्र भिन्न पण कार्य एकच . साधने वेगळी पण साधना एकच . . . दिशा वेगळ्या पण अंतिम क्षितीज एकच . . फटकारे वेगळे पण भिरकावणे एकच . . . व्यक्ती वेगळ्या पण आत्मा एकच . . महतीचे पोवाडे अनेक पण महानता स्पष्ट करण्यास पुरेसा शब्द एकच . . ' तें ' . . . !!

या दोन्ही तेंडुलकरांनी जोरदार अन जोमदार कलात्मक फलंदाजी केली . . . यांनी रचलेला प्रत्येक शब्द आणि मारलेला प्रत्येक फटका येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरला . बागुलबुवा करून महत्व दिलेल्या गोष्टीना सीमापार भिरकावून द्यायची शक्ती यांनी दिली . यांची अदाकारी म्हणजे समोरच्याला कोड्यात टाकणारी , कोडे सोडवच म्हणून मजबूर करणारी , कमाल स्वगत घडवून आणणारी अन अंती कमालीचा आनंद देणारी . मला तेंडूलकर समजले असा कोणीही सखाराम गटणे म्हणण्याचे धाडस करणार नाही अन मला तेंडूलकरचे तंत्र समजले असे निवृत्ती नंतरही म्हणायचे धाडस कोणी गोलंदाज करणार नाही . . या दोनीही ' तें ' नी गूढता जपली . सूर्यप्रकाशात सर्व गोष्टी सुर्यप्रकाशासारख्या स्वच्छ दाखवूनही बरेच काही आकलनासाठी शिल्लक ठेवले . आपली ओळख निर्माण करत असताना आपल्या क्षेत्राला सुद्धा मोठे केले . . विजय तेंडूलकर मलाही आताशी जरा कोठे समजायला लागले आहेत . सचिन बऱ्यापैकी समजला आहे . आजचा दिवस आणि येणारे काही दिवस सचिनचे असल्याने त्यावर थोडे अधिक भाष्य करतो . .

भारतीय क्रिकेट मध्ये आपण चेंडू पर्यंत जायचे नाही तर चेंडूला आपल्या पर्यंत येऊ द्यायचे असा प्रघात असल्याचे काही मुलाखतीतून मला समजले . गोलंदाजाला अवास्तव महत्व देण्याचा हा प्रकार होता . 'पुढे सरसावून आघात ' करायची वेस्ट इंडिअन खुनशी मानसिकता आपण दूरच ठेवली होती . त्याचमुळे विशीच्या आतल्या एका पोराने अब्दुल कादिर ला पुढे सरसावून खणखणीत चार षटकार मारले तेव्हा भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलत असल्याचे अनेकांना जाणवले . भारत परदेशात जिंकू शकत नाही हा इतिहास कोठेतरी बदलायला लागला . गोळी सारख्या तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूला हतबलतेने पाहणारे गोरे सर्रास दिसू लागले . सुनील गावस्कर वगिरे यांनी याचा शुभारंभ केला होताच पण दूरदर्शन बाळबोध अवस्थेत असल्याने त्याचे दर्शन म्हणावे तितके झाले नाही . सचिन आल्यावर त्याने गोलंदाजांची जी कत्तल सुरु केली ती घरोघरी पोहोचली . आपल्यातलाच कोणीतरी आपल्याला एक वेगळाच अनुभव देतोय याचा आनंद देशभर पसरायला लागला . प्रस्थापीत , नावाजलेली , दहशतनिर्माण केलेली ओस्त्रेलिया , पाकिस्तान , विंडीज यांची गोलंदाजी बेदरकारपणे फोडून काढता येते याचे प्रात्यक्षिक सचिन च्या रुपात पहायला मिळाले . अर्थात त्याच्या सहकार्यांनी सुद्धा गिअर चेंज केल्याने भारतीय क्रिकेट अन भारतीय प्रेक्षक यांची मानसिकता एकाच वेळी बदलायला लागली . सत्तांतराची सुरुवात झाली . . याचा शिलेदार म्हणजे 'तें ' डूलकर . . .

गेली पंचवीस वर्षे सचिन खेळत आहे . रोज काहीतरी शिकत आहे . कोणालातरी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे शिकवत आहे . मोठेपणासोबत येणारी प्रसिद्धी आपल्या सहजतेवर मात करणार नाही याची दक्षता घेत 'तें ' प्रमाणे वाटचाल करत आहे . असामान्य गुणवत्तेला शालिनतेची जोड देऊन सभ्यतेचे नवे पायंडे पाडत आहे . विजय तेंडूलकर गेल्यावर साहित्य विश्वात जी पोकळी निर्माण झाली तीच पोकळी सचिन निवृत्त झाल्यावर क्रिकेट विश्वात निर्माण होणार आहे . कारण सचिन सोबत 'तें ' ची मानसिकता असलेल्या , संस्कार असलेल्या , जीवनशैली असलेल्या अनेक पिढ्या एकाच वेळी निवृत्त होतील . . अनुकरण करणारे अनेक 'तें ' जन्माला येतील किंवा घातले जातील . काही काळाने त्यांचाही उबग येउन मूळ 'तें ' ची गरज , साधना , आराधना पुन्हा एकदा अधोरेखित होईल . कारण तो , ती , ते अनेक जन्माला येतात पण 'तें ' . . . . . ?? आपण जन्माला आल्याचे सार्थक करून निघून जातात . . . आपल्याला अस्वस्थ करून . . !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users