अन्या - ३

Submitted by बेफ़िकीर on 14 November, 2013 - 03:39

थक्क!

अवाक होणे म्हणजे काय ते अन्या अनुभवत होता. पूर्वी एकदा तो तालुक्याला आला होता तेव्हा तीन चार वर्षांचा होता व आठवणी पुसट झालेल्या होत्या. तेव्हा तो गावातल्या एका माणसाचा हात धरून आला होता आणि त्या माणसाने बराच वेळ काही खायला न दिल्याने त्याचे मनगट चावून दुसर्‍याच एका ओळखीच्याबरोबर गावात परतला होता. तो मनगट चावले गेलेला माणूस रात्री अन्याच्या घरी आला होता व त्याने अन्याच्या आईबापाशी भांडण केलेले होते. इतपत अन्याला आठवत होते.

पण आज अन्या तालुक्यात एकटाच आला होता. अंगभर मार खाल्लेला! पहाटे कधीतरी एक रुचकर भाजलेला पक्षी पोटात गेलेला! अर्धे टमरेल भरून कसलेतरी आंबूस पाणी वर ढोसलेले! अतीश्रम होऊनही तालुक्याच्या दर्शनाने तरतरी आलेली. खिशातील माळ मनाला उब देत होती. डोळे भिरभिरत होते. अजुनही तो कुणाला दिसावा अश्या जागी आलेलाच नव्हता. पण त्याला बरेच काही दिसत होते.

कोंबड्याच कोंबड्या! रंगीबेरंगी कोंबड्यांनी अन्याचे लक्ष जे खेचून घेतले तसा एखाद्या लांडग्याप्रमाणेच अन्या त्या कोंबड्यांकडे पाहू लागला. त्याच्या मनात आलेला पहिला विचार हा होता की नुसते येथे लपूनछपून राहिलो तरी रोज पहाटे एक कोंबडी चोरता येईल. एक झरा वाहात होता आणि त्यावर काही बायका धुणी धूवत होत्या. दोन चार गडी माणसे आंघोळ उरकत होती. तो झरा अन्याच्या गावातील कोणत्याही डबक्यापेक्षा घाण होता पण तरीही त्या क्षणी फार आवश्यक वाटत होता. अन्याने सर्वदूर नजर फिरवली तसे एका टेकडीच्या माथ्यावर एक पुरुष व एक बाई चालताना दिसले. काही वेळाने ते दिसेनासे झाले व काही वेळाने पुन्हा तो पुरुष दिसू लागला. यावेळी तो पुरुष जरा घाईघाईत टेकडी उतरून येत होता. तोवर इकडे दोन कुत्र्यांना अन्याचा सुगावा लागला तशी ती त्याच्यावर भुंकू लागली. वैतागून अन्या पांगला. पुन्हा मागे जाऊन दुसर्‍या बाजूने खाली आला.

ह्या बाजूला आजूबाजूने गटारे वाहात असलेल्या अनेक झोपड्यांमधून धूर येत होता. झोपडीबाहेरील 'अ‍ॅटॅच्ड बाथरूम'च्या जमीनीलगतच्या पन्हाळींमधून साबणयुक्त पाणी वाहात होते. एका डबक्याभोवती काही ज्येष्ठ डुकरे आपल्या भावी पिढ्यांचे कसे होणार या चिंतेत बसलेली होती. त्यांची निरागस पिल्ले हुंदडत होती. एका लांबवरच्या उंचवट्यावर गाढवाचे एक दांपत्य पुतळ्यासारखे निश्चल उभे होते. गाय, बैल, म्हशी या मुबलक प्रमाणात हिंडत होत्या. म्हातारी कोतारी थंडीपासून बचाव करत बिड्यांचे झुरके मारत होती. म्हातार्‍या बायका दारात बसून मिश्री लावून विश्वावर थुंकत होत्या. शेळ्याबिळ्या कसायाच्या दुकानापासून लांब राहून चरत होत्या. म्हशींच्या पाठीवर इंटरिम लँडिंग करून काही कावळे परिसराला शोभा आणत होते. त्यांना काँट्रास्ट म्हणून झर्‍याच्या वरच्या बाजूला काही बगळे मासेमारीचा पिढीजात व्यवसाय करत होते. प्रकाशामुळे आक्रमकपणामधील गावठीपणा उघड झाल्याचा राग म्हणून काही कुत्री सूर्याकडे बघून भुंकत होती. नुकतीच उठलेली लहान मुले घरापासून जमेल तितक्या जवळ प्रातर्विधीला बसत होती. काही दुकाने उघडली जात होती. दोन तीन गाड्यांवर चहाच्या पातेल्यातील वाफा आणि भज्यांचा तेलकट धूर एकमेकांत मिसळत होते. लांबवर एक हॉटेलही उघडले जात होते.

तालुका आणि अन्याचे नशीब या दोघांना एकदम जाग येत होती.

काय करू अन् काय नको असे झालेल्या अन्याने झाडीझुडुपातूनच निरिक्षण करत तालुक्याला फेरी मारायला सुरुवात केली. पण त्याच्या कपनेपेक्षाही तालुका फारच मोठा निघाला. इतक्या वेळात तर त्याच्या गावालाही त्याने तीन चकरा मारल्या असत्या, पण तालुका अजुन एक दशांशही पाहून झालेला नव्हता.

एखाद्या ध्यानस्थ साधूप्रमाणे एका निर्जन बिंदूवर अन्या मांडी घालून बसला. समोर तालुका होता. मागे टेकडी होती. आजूबाजूला झाडे होती.

आपण येथे आलो तर आहोत, आता करायचे काय यावर तो विचार करू लागला. विचार करण्याची त्याची हातोटी मात्र अतिशय सिस्टिमॅटिक असायची. सर्वप्रथम ध्येय ठरवायचे. ते प्राप्त होण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करायचा. त्यातील तुलनेने सर्वात सोपा पर्याय निवडायचा व कार्यरत व्हायचे.

अन्याचे ध्येय साधे होते. बसून भरपूर खाता यावे आणि सर्वांनी आपल्याला सलाम ठोकावा. बाकी काहीही नको.

बसून खाण्यासाठी अन्न जागेवर मिळण्याची आवश्यकता होती. तसे होण्यासाठी आजूबाजूच्या माणसांमध्ये एक तर कोणीतरी आपल्या रक्ताचे असायला हवे होते, की ज्याने मायेखातर अन्न आणून दिले असते, किंवा मग आपण या तालुक्याची गरज बनायला हवे आहे हे अन्याच्या लक्षात आले. अश्या रीतीने ध्येयाची लहान लहान ध्येयांमध्ये विभागणी सुरू झाली. आपण तालुक्याची गरज कशी बनू यावर तो विचार करू लागला.

माणसाला कश्याची गरज असते? राहायला घर, अन्न, पाणी, पैसा आणि देव! येथे तर बहुतेकांकडे त्याच्या गावातल्यांच्या तुलनेत मोठाल्ली घरे किंवा झोपड्या होत्या. बहुतेकांकडे अन्न पाणी होते. पैसा तर येथे वार्‍याबरोबरच वाहात असावा. देवळेही होतीच. मग आपण कशी काय गरज बनणार कोणाची?

एकमेव मार्ग उरत होता. चमत्कार! काहीतरी चमत्कार दिसला की बावळट जनता नमते हे अन्याला बारा वर्षाच्या आयुष्यात फार आधीच समजलेले होते. आपण चमत्कारी अन्या व्हायला पाहिजे असा त्याच्या मनाने त्याला कौल दिला.

'काय करायचे' हे ठरल्यावर त्याला पुन्हा हुरूप आला. आता लोकांच्या भानगडी, कुलंगडी आणि रहस्ये समजल्याशिवाय चमत्कार करता येणार नाहीत हेही त्याच्या लक्षात आले. अन्या पुन्हा झुडुपांमधून पाऊल उचलून फिरू लागला. पण आता शरीर साथ देत नव्हते. खायला तर हवेच होते. पण विश्रांतीही हवी होती.

बर्‍याच वेळाने त्याला एक असे घर दिसले जे इतर घरांपासून जरा लांबवर व एकटेच होते. लग्नात यथोचित मानपान न झाल्याने वरपक्षातील एखादा तिरसट म्हातारा कार्यालयातून निघून न जाता असहकार पुकारून दारातच उभा थांबतो तसे ते घर स्वतंत्र होते. आपसूकच दमलेल्या अन्याची पावले त्या घराकडे वळली. सुदैवाने भुंकणारी जमात आजूबाजूला नव्हती. अजुन तरी तालुक्याला कल्पना आलेली नव्हती की भल्या पहाटे डोंगरावरून एक भूत गावात आलेले आहे. दबक्या पावलांनी अन्या घराकडे जाऊ लागला तेवढ्यात एक मध्यमवयीन बाई हातात पाण्याची बादली आणि कपडे घेऊन घरालगतच्या मोरीत शिरताना त्याला दिसली. ती जेमतेम मोरीत शिरून लाकडी फाटक लोटून घेतीय तोवर एक लहान मूल दुडदुडू धावत तिच्यादिशेने जाऊ लागले. त्या बाईने आत कोणालातरी आवाज दिला तसा एक माणूस बाहेर आला आणि त्याने त्या मुलाला उचलले. त्या मुलाला बहुधा आईकडेच जायचे असावे कारण ते किंचाळून रडू लागले. आता त्याचे मन रमवण्यासाठी तो माणूस त्याला घराबाहेरच्या झाडांवरील चिऊ काऊ दाखवण्यात मग्न झाला.

अन्याला पहिली संधी मिळाली.

कमालीची चलाखी दाखवून अन्या थेट घरात शिरला. घर अंधारे होते. एका टोपलीखाली खुडबुड होत होती. त्यात काही कोंबड्या असाव्यात हे अन्याला समजले. पण अत्ता कोंबडी उचलली तर आपणच उचलले जाऊ हे त्याच्या लक्षात आले. चुलीपाशी असलेल्या दोन तीन भांड्यांवरील झाकणे दूर करून बघितल्यावर एका ठिकाणी त्याला काही भाकरी दिसल्या. तिथ्थेच बसून त्या भाकरी खाव्यात इतकी प्रचंड भूक लागलेली असूनही अन्याने संयम दाखवून तीन भाकरी उचलल्या आणि दोन कांदे आणि बचकभर मीठ हाफपँटच्या खिशात कोंबत तो दाराबाहेर जाऊ लागला तर बाहेरून तो माणूस मुलाला घेऊन आत येत होता.

तालुक्याला आल्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच एक दोन तासात आपण पकडले आणि बदडले जाणार या चिंतेने अन्या अजिबात काळवंडला नाही. त्याने झर्रकन आत येऊन टोपली वर उचलली. चार कोंबड्या जिवाच्या आकांताने बाहेर पळाल्या. कडेवरच्या मुलाला आहे तिथे टाकून तो माणूस कोंबड्यांच्या मागे धावू लागला. खाली ठेवल्याने ते मूल ओरडू लागले होतेच, त्यात कोंबड्याही ओरडत होत्या आणि त्यांना पकडणारा तो माणूसही ओरडू लागला. जेमतेम दारापर्यंत पोचलेल्या अन्याला हे सगळे आवाज ऐकल्यामुळे आंघोळ करताना मधेच उठून उभी राहिलेली ती बाई दिसली. त्या बाईचे लक्ष दाराकडे गेले नाही हे अन्याचे नशीब! पाळलेल्या कोंबड्या उगाच धावत नाहीत. या बहुधा आणलेल्या कोंबड्या असणार किंवा काहीतरी! क्षणभर अन्या तो गदारोळ पाहात राहिला. त्या माणसाच्या हाताला पहिली कोंबडी लागायच्या आत सटकणे आवश्यक आहे हे त्याला माहीत होते. ती बाई पुन्हा खाली बसताच अन्या तिथून बाहेर आला. ते लहान मूल अन्याकडे पाहून स्तब्ध झाले. पण त्याच्या तोंडातून रडण्याच्या आवाजाशिवाय काहीही बाहेर पडत नसणार हे अन्याला माहीत असल्याने अन्या बिनदिक्कत त्याच्यासमोर उभा ठाकला. तो माणूस आता लांब लांब जाऊन कोंबड्या धरू पाहात होता. अन्याला पाहून ते पोरगं बोबड्या स्वरात 'दद्दा' म्हणालं! तसा अन्या हादरला. त्याने तेथून धूम ठोकली.

झाडीत पोचला तर जवळपास खसखस झाली. अन्याने निरखून पाहिले तर पंधरा एक फुटांवर एक कोंबडी अन्याला घाबरून उभी होती. बारापैकी गेली तीन वर्षे कोंबडी पकडण्याचे एकलव्यी प्रशिक्षण घेतलेल्या अन्याने निव्वळ सहाव्या सेकंदाला ती कोंबडी झडप मारून धरली.

जवळच तीन भाकरी आणि दोन कांदे पडलेले, हातात एक गलेलठ्ठ कोंबडी! खरे तर दोन अडीच दिवस काही करावे लागले नसते. पण इतक्या किरकोळ बाबींवर समाधानी व्हायला हे काही त्याचे मूळ गाव नव्हते. हा होता तालुका!

ती कोंबडी दुबेच्या कोंबडीपेक्षा गुबगुबीत होती. तिचे असे स्वतःचे एक वलय होते. अन्याला मोह आवरत नव्हता. गेल्या कित्येक दिवसात पोटभर खाणे हा प्रकार झालेला नव्हता. पण आज त्याग केला तर रोज कोंबडी मिळू शकेल हे त्याला माहीत होते.

अन्या कोंबडी आणि एक भाकरी घेऊन टेकडी चढू लागला. बराच वर जाऊन एका झाडाखाली बसला. तेथून दिसत होते. खाली त्या घराभोवती तो माणूस अजुन शोधाशोध करत होता. त्याचं ते पोरगं अन्या गेला त्या दिशेला हात करून काहीतरी निरर्थक आवाज घशातून काढत होतं! त्या मुलाची आई नवर्‍याला उद्देशून काहीबाही बोलत होती व हातवारे करत होती. एकुण, चारपैकी अगदी तीन जरी कोंबड्या मिळालेल्या असल्या तरी सर्वात गुबगुबीत कोंबडीच गायब झाल्यामुळे ती मंडळी अस्वस्थ झालेली होती. एका हाताने कोंबडी दाबून धरत अन्याने दुसर्‍या हातातील भाकरी तोंडात कोंबायला सुरुवात केली.

जवळपास एक तासभर अन्या कोंबडी धरून बसून राहिला. कोंबडीची फडफड सोसवेनाशी झाली तसा भलत्याच दिशेने टेकडी उतरला. पाहतो तर तेथे तीन घरे! दोन घरांमध्ये गजबज होती. एका घरात फारसे कोणी नसावे. अन्याने संधी साधून सहज त्या गजबज नसलेल्या घराचे दार बाहेरून ढकलून पाहिले. आतमधल्या अंधारात एक जख्खड म्हातारी निपचीत पडलेली आढळली. कोंबडी घेऊन अन्या आत शिरला आणि त्या घरातील एका टोपलीखाली ती कोंबडी त्याने अत्यंत दु:खी मनाने सारली. आवाज ऐकून म्हातारी काहीतरी पुटपुटली. अन्याला तिची कीव आल्याने अन्याने तिला तिथलेच थोडे पाणी पाजले. त्या म्हातारीने देवाला जोडावेत तसे हात जोडलेले पाहून क्षणभर अन्याच्या मनात कालवाकालव झाली. साधे पाणी पाजले तर आपल्याला कोणीतरी हात जोडू शकते? पण आत्ता विचार करत बसायला वेळच नव्हता. बाहेरील कोणीही आपल्याला पाहात नाही हे पाहून अन्या चोरपावलांनी पुन्हा टेकडीकडे धावला. तेथून काही झालेच नाही अश्या थाटात टेकडी न चढताना टेकडीच्या बाजूबाजूने चालत पुन्हा मगाचच्या घराकडे आला. आला तो सरळ दारात उभा राहिला. ते बारकं पोरगं लगेच पुढे होऊन 'दद्दा, दद्दा' म्हणू लागलं. अन्याने त्याला उचलले व म्हणाला......

"ह्याचं नांव नवनाथ ठिवा"

धावत बाहेर आलेले त्या मुलाचे आईबाप बघतच बसले. आईने ते मूल पटकन अन्याच्या हातातून ओढून घेतलं! कोंबडी गेली ती गेलीच वर पोरगंही जायचं असं वाटून! तो माणूस म्हणाला......

"तू कोन??"

"दत्त"

"कोन दत्त?"

"तिन्मुर्ती दत्त"

"कुट्नं आलास?"

"म्हैत नै"

"म्हन्जे?"

"ह्या प्वाराचं नांव नवनाथ ठिवा"

"का? त्याचं नाव तानाजीय"

"तानाजी बिनाजी नाय, त्यो नवनाथे"

"आरं तू कोन पन?"

"तिन्मुर्ती दत्त. आमी येतू. आज दुपारच्यापात्तर घरातली हारवल्याली वस्तू खालच्या अंगाला तीन झोपड्यायत त्यातल्या म्हातारीच्या झोपडीत गावंल. प्वाराचं नाव नवनाथ ठिवा"

ताडताड अन्या विरुद्ध दिशेने निघालाही. याक्षणी तो इतका वेगात चालला की तो पळतोय असेही म्हणता येऊ नये आणि चालतोय म्हणावं तर गाठताही येऊ नये. दोन भाकरी मागच्या झाडीत कुठे पडलेल्या आहेत हे त्याच्या लक्षात असल्याने आत्ता त्याला भुकेची चिंता नव्हती. बघता बघता अन्या दिसेनासा झाला आणि तो माणूस आणि त्याची बायको बघतच बसले.

अन्याच्या अंगात आता दहा हत्तींचे बळ आले होते. याक्षणी थांबण्यात अर्थ नव्हता. ऊन चढू लागलेले होते. पण अन्याच्या मनातील उभारी त्याहीपेक्षा जोरात चढू लागली होती. मागच्या त्या माणसाने आत्तापर्यंत म्हातारीचे घर गाठले असेल किंवा गाठले नसले तर तो तिकडेच निघाला असेल हा अंदाज असल्याने अन्याने वेळ न दवडता तालुक्यात जाहीररीत्या पहिले पाऊक टाकले आणि समोरच बसलेल्या एका म्हातार्‍यांच्या टोळक्यातील एका म्हातार्‍याला उद्देशून म्हणाला......

"तुझी विच्छा तीन दिवसांनी पूर्ण होणारे.... नवचंडीचा जप कर"

हा कोण, आला कोठून आणि बोलला काय हे समजायच्या आत अन्या तीरासारखा तालुक्यात घुसला. थेट जाऊन एका घरात घुसला आणि म्हणाला......

"आमी पोटापुरतंच मागतो. चतकोर भाकरी आन् एक कांदा आन् मीठ द्या... दत्ताची आज्ञाय तुमच्याच घरचं खान्याची"

तिथल्या माणसाने मागे बघितले नाही, पुढे बघितले नाही आणि अन्याच्या कानाखाली खण्णखन वाजवली. मार खाण्यात जन्मजात पारंगत असलेल्या अन्याने पुढचे वाक्यही फेकले.

"तिन्मुर्ती दत्ताचा अवमान करंल त्याला अद्दल घडंल"

"आरं हाऽऽऽड" म्हणत तो माणूस आणखी मारायला धावला. त्याची नजर चुकवून अन्याने खिशातील दुबेबाईची माळ हळूच त्या माणसाच्या घरातील एका कपाटाखाली टाकली आणि धूम ठोकली. तिथी बदललेली असावी कारण अचानक अन्याचे भाग्य उजळले. एक म्हैस उधळलेली होती आणि एक बारकं पोरगं निरागसपणे तिच्याकडे बघत असताना ती हिंस्त्र नजरेने त्याच्याचकडे येत होती. त्या मुलाची आई अन् बाप आसपास दिसत नव्हते. अन्याने ते पोरग उचललं तोवर एक बाई धावत आलीच. अन्या तिला म्हणाला......

"तिन्मुर्ती दत्तानं धाडलं मला हित्तं... दत्ताला दोन केळी आन् एक नारळ ठिव... आता हे प्वारगं ऐंशी वर्षं जगंल... आता वाईट काळ संपला"

जे जे पब्लिक बघत होतं त्यांना दिसलं की अन्या काहीतरी बडबडला आणि त्या बाईने हात जोडून नमस्कार केला. तोवर मागून म्हातार्‍यांच टोळकं चालत चालत तेथे पोचलं आणि एक म्हातारा गर्दीला उद्देशून म्हणाला...

"ह्यो कोन हाये?"

सगळ्याच माना नकारार्थी हालल्या तसा अन्या गंभीत होत मागे वळला आणि प्रश्न विचारणार्‍या म्हातार्‍याला म्हणाला...

"दत्त! गावात चोरंचिलटं वाढल्यालीयत. त्या घरातल्या कपाटाखाली चोरल्याली माळ घावंल. घावली तं दत्ताला नारळ ठिवा. आमी निघतो"

आता निघतो म्हणून सरळ रस्त्याने जायचे तर अन्या झाडावर चढला. धड चढता येईना तेव्हा अंग खरचटवून घेतले पण निग्रहाने चढला. एका फांदीवर तो मावत होता, तीवर मस्तपैकी अंग ताणून पडून राहिला.

गर्दी बघत बसली. पंधरा एक मिनिटांत एक माणूस हातात कोंबडी घेऊन धावत आला. मागून एक बाई कडेवर एक लहान मूल घेऊन धावत आली. आलेल्या माणसाने गर्दीला विचारलं.

"हितून यक प्वारगा ग्येला व्हय दत्त नावाचा?"

गर्दीने झाडाकडे बोट दाखवले. अन्या दिसताच माणूस खालूनच ओरडला.

"म्हाराज... ह्या लहान नवनाथाला आन्लाय दर्शनाला... खाली उतरा आन् दर्शन द्या.... हारवल्याली वस्तू घावली बघा"

अन्या हादरला. हे खरं का खोटं कळेना! नेमकी जी माणसे भेटली तीच अंधश्रद्धाळू निघाली की अख्खा तालुकाच तसा आहे का आपल्याला यड्यात काढून खाली बोलावून बदडण्याचा कार्यक्रम ठरला आहे हे काही त्याला समजेना! खरेतर मनातून घाबरून पण तसे चेहर्‍यावर न दाखवता वरूनच गर्दीकडे बघत तो बोलला...

"दत्त म्हनाले की मग उतरू आमी.... आमाला काई नगं.... दत्ताला पर्साद ठिवा"

इतका नि:स्वार्थी अवतार तालुक्याच्या पाहण्यात नव्हता. गर्दी जरा वेळ थांबली. काही जण पांगू लागले. अर्धपोटी अन्या विचित्र अवस्थेत फांदीवर बसून राहिला. खाली उरलेले लोक आपल्याला मारायच्या उद्देशाने थांबलेले नाहीत हे त्याला पटायला जवळपास दुपारचे चार वाजले. मग तो घाबरत घाबरत खाली उतरला.

'म्हाराज उतरले' ही बातमी वणव्यासारखी पसरली. तीस चाळीस जण जमा झाले. पण अजून अन्याचा चमत्कार कोणालाही पुरेसा मान्य झालेला नव्हता. सर्वच चेहर्‍यांवर कुतुहल असले तरी शरणागतीचे, समर्पणाचे भाव अजिबात दिसले नाहीत अन्याला! अजुनही कित्येकजण 'अंदाज घेण्याच्याच' हेतूने अन्याकडे बघत होते.

आता अन्याने शेवटचा उपाय योजला. गर्दीकडे तीक्ष्ण नजरेने बघून तो एका दिशेला तीरासारखा चालू लागला. हा उपाय जर लागू पडला नाही तर सरळ पळून जायचे हे अन्याने ठरवलेले होते. अन्या चालला कुठे हे समजत नसल्याने गर्दीही भरभर पावले उचलू लागली.

केवळ आठ दहा मिनिटांतच अन्या एका टेकडीची वाट चढू लागला. तसे मग गर्दीतील काही जण म्हणाले.

"का ओ म्हाराज? हिकं कुनीकडं?"

एक अक्षर न बोलता अन्या टेकडी चढू लागला. जवळपास वीस मिनिटे लागली त्याला टेकडी चढायला. ज्यांना टेकडी चढणे शक्यच नव्हते ते खाली थांबले, पण जवळजवळ पंधरा वीसजण वर आलेले होते. त्यात तो 'कोंबडी घावलेला'ही होताच. अन्या काही वेळ तिथेच थांबला. वर आकाधाकडे बघत त्याने हात जोडले. अचानक त्याने एका कड्याच्या दिशेला हात केला आणि तीक्ष्ण स्वरात म्हणाला......

"वंगाळ पर्कार झाल्यालाय थितं खाली.... जाऊन बघा कोनीतरी"

ही धावली गर्दी! वरून बघतात तर काय? कड्याला खाली आलेल्या एका झाडात एक बाई अडकलेली. क्षीन हालचाली करून गर्दीचे लक्ष वेधत होती. एक तासाच्या आत वरून सुतळीला बांधून एक तरुण खाली सोडून त्याच्याबरोबर ती बाई वर आणण्यात आली. बघतात तर जांभळ्याची शकुंतला! इकडे अन्याने खर्‍या अर्थाने दत्ताला आकाशाकडे बघत हात जोडले. पहाटे पाहिलेल्या दृष्याला खरंच काहीतरी अर्थ होता तर!

जांभळेला गर्दीने पकडले आणि पोलिस पाटलाच्या हवाली केले. चारित्र्याचा संशय येऊन त्याने 'चल तुझ्या माहेरी जाऊ' असे सांगून तिला टेकडीच्या मार्गाने नेले आणि कड्यावरूण खाली लोटले होते. पण ती जिवंतच राहिली होती. बरीच जखमी झालेली होती. सगळे मार्गी लागले तेव्हा गर्दीच्या डोस्क्यात प्रकाश पडला.

हे सगळे आपल्याला कळले कोणामुळे?

शोधाशोध सुरू झाली. बघतात तर संधिप्रकाशात त्याच झाडाच्या त्याच फांदीवर केळी खात म्हाराज बसलेले आहेत. गर्दीने जयघोष केला. बारा वर्षाचा पोरगा 'झाडवाले बाबा' ठरला.

संध्याकाळी मोठ्या आरतीची तयारी झाली. चार बूकंही धड न शिकलेला अन्या भारावून झाडावरून उतरू लागला. खाली प्रसाद म्हणून काय काय पदार्थ होते. भजनी मंडळ जमलेले होते. या भजनी मंडळामुळे त्याला आपल्या गावचे भजनी मंडळ आठवले. उद्या गावातून जो पहिला माणूस तालुक्यात येईल त्याला आपली माहिती आणि महती कळेल आणि मग या तालुक्यातल्यांना आपले खरे स्वरूप समजेल. मग आपली धडगत नाही हे अन्याला ठाऊक होते. जोवर येथे आपली शान आहे तोवरच जास्तीतजास्त माया किंवा दक्षिणा जमवून पहाटे पहाटेच पसार व्हायचे हा विचार अन्याच्या मनात आला तेव्हा त्याची चरणकमळे झाडावरून जमीनीला लागली आणि बायाबापड्या नमस्काराला वाकल्या.

झाडवाल्या बाबांना जीवनातील सर्वात महत्वाचा मंत्र ज्ञात झाला होता.

दुनिया च्युत्या बनती है, बस बनानेवाला चाहिये!!!!!!

=======================================================

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका डबक्याभोवती काही ज्येष्ठ डुकरे आपल्या भावी पिढ्यांचे कसे होणार या चिंतेत बसलेली होती>>>>> अशक्य हसले या वाक्याला Rofl

हा भाग तर बोक्याच्या वळणावर गेला. त्यात पण तो दागिने लपवून, न खाता पिता लोकांना उल्लू बनवतो.
बेफी जुनाच मसाला नविन रुपात...
कुछ जम्या नही

बेफी,
लय भारी !!!!!!!!!
एका डबक्याभोवती काही ज्येष्ठ डुकरे आपल्या भावी पिढ्यांचे कसे होणार या चिंतेत बसलेली होती. त्यांची निरागस पिल्ले हुंदडत होती. एका लांबवरच्या उंचवट्यावर गाढवाचे एक दांपत्य पुतळ्यासारखे निश्चल उभे होते. गाय, बैल, म्हशी या मुबलक प्रमाणात हिंडत होत्या. म्हातारी कोतारी थंडीपासून बचाव करत बिड्यांचे झुरके मारत होती. म्हातार्‍या बायका दारात बसून मिश्री लावून विश्वावर थुंकत होत्या. शेळ्याबिळ्या कसायाच्या दुकानापासून लांब राहून चरत होत्या. म्हशींच्या पाठीवर इंटरिम लँडिंग करून काही कावळे परिसराला शोभा आणत होते. त्यांना काँट्रास्ट म्हणून झर्‍याच्या वरच्या बाजूला काही बगळे मासेमारीचा पिढीजात व्यवसाय करत होते. प्रकाशामुळे आक्रमकपणामधील गावठीपणा उघड झाल्याचा राग म्हणून काही कुत्री सूर्याकडे बघून भुंकत होती. >>>>>
अशक्य हसलोय मी !!!!!!!!! Biggrin

एक तासाच्या आत वरून सुतळीला बांधून
<<
सुतळी ही पोती शिवायला, किंवा तिरडी बांधायला वापरतात. सुतळीला बांधून माणूस कड्याखाली उतरवला असेल तर तुमच्या सुतळीत नक्कीच सुपर पॉवर असणारे.

दोरखंड वगैरे करा थितं. Wink