सलग सहा दिवस पहाटेचे उठून आणि रात्रीबेरात्री गावातून लपून छापून फिरत हेरगिरी करूनही काहीच हाती लागले नाही तसा अन्या वैतागला. भजनी मंडळातील लोकांनाही आता त्याचा त्यादिवशीचा तो प्रकार एक बतावणी असल्याचे खात्रीलायकरीत्या वाटू लागले. चुकून काहीतरी पाहायला मिळाले आणि त्या गोष्टीचा उपयोग या कार्ट्याने हनुमंताचा निस्सीम भक्त असण्याचे नाटक करण्यासाठी केला यावर आता बहुतेकांचे एकमत झालेले होते. आता अन्या दिसला की काही लोक उगाच 'या मारुतीराया' करत स्वतःचा उजवा हात खांद्यातून गरगर फिरवू लागले व टाळ्या देऊन हसू लागले.
या नालायक गावकर्यांची तोंडे बंद होतील अशी काहीतरी शक्कल लढवायला हवी हे अन्याच्या लक्षात आले. काय केले की आपण महान ठरू यावर तो विचार करू लागला. चमत्काराला गाव फसते हे त्याच्या लक्षात आलेले होते. दरम्यानच्या काळात त्याने लहान मुलांना मारणे वगैरे प्रकार पूर्ण बंद केले. प्रतिमा सुधारायलाच हवी हे त्याला पटलेले होते. अन्याच्या चिमूटभर मेंदूत काय चाललेले आहे याचा थांगपत्ता त्याला स्वतःला तरी होता की नाही कोण जाणे!
खायची मात्र आबाळ होत होती. उगीच कुठेतरी काहीतरी पडलेले दिसले तर ते खावे लागत होते. आपल्यापेक्षा जनावरांनाही जास्त खायला मिळते ही बोच अन्याला सोसवत नव्हती. कोणाच्याच शेतात आता त्या कुटुंबाला प्रवेश राहिलेला नव्हता. त्या तिघांपैकी एकजण जरी शेताच्या आसपास दिसला तर लोक शिवीगाळ करून त्याला हाकलून देत होते. लांबून शेतातील शेंगा, वांगी आणि भेंड्या बघून खा खा सुटत होती. दगड मारून कबूतर पाडावे म्हंटले तर नेमही लागत नव्हता आणि उगीच दगड मारून दमही लागत होता.
गेले दोन दिवस अन्याच्या नजरेत दुबे नावाच्या माणसाच्या घराच्या अंगणात स्वैर विहार करणारी एक गुबगुबीत कोंबडी भरलेली होती. ही कोंबडी कापली तर दोन अडीच दिवस काही बघायला लागणार नाही हे त्याला माहीत होते. पण कोंबडी कापण्याआधी कोंबडी पकडणे आवश्यक होते आणि दुबेच्या घरापासून वीस मीटर त्रिज्येतही अन्याला प्रवेश मिळणार नव्हता. ती कोंबडीही त्यामुळे बेदरकारपणे अन्याकडे बघत हुंदडत होती. एक कोंबडीही आपल्याला घाबरत नाही या जाणिवेने अन्या प्रचंड संतापलेला होता. मी मरेन पण तुला विधवा करेन या म्हणीप्रमाणे त्याला आता वाटू लागले होते की हवे तर दुबेचा मार खाऊ पण या कोंबडीला अद्दल घडवूच. ती कोंबडी बघितल्यापासून त्याच्या मनात दुसरा कोणताही विचार येत नव्हता. डोळ्यासमोर कोंबडीच्या भाजलेल्या तंगड्या तरळत होत्या. कोंबडी मिळाल्यामुळे बापाने स्वखुषीने दिलेले चार आठ आणे दिसत होते. पण कोंबडी चोरून मारली तर आणखीन निराळेच दोन प्रश्न होते. कोंबडी भाजल्याचा वास अन्याच्या घरातून येतोच कसा ही शंका येऊन गावकरी घराबाहेर फिरू लागणार होते. त्यातच दुबेने कालवा केलाच असता कोंबडी हरवल्याचा. दुसरा प्रश्न म्हणजे पिसे आणि हाडे, त्याचे करायचे काय? कुठे टाकायला गेलो आणि कोणी पाहिले की बोंबलले.
एकुण कोंबडी हा देवाने खाण्याची वासना सुटावी यासाठी निर्मीलेला जाडसर पक्षी आहे हे अन्याला पटू लागले. तरीही ती कोंबडी काही नजरेसमोरून जाईना!
आत्ता अन्या भर दुपारचा एका वडाखाली बसून लांबवर पण नजरेच्या टप्प्यात असलेल्या दुबेच्या अंगणातील ती कोंबडीच निरखत होता. आपण बिबट्या असतो तर सरळ घुसलो असतो आणि कोंबडी उचलली असती असे त्याला वाटले. अंधार पडला की दुबे कोंबडी खुराड्यात ठेवत असे. खुराडे मागच्या बाजूने फोडून ठेवता येईल का यावर अन्या विचार करू लागला. त्या हेतूने त्याने किंचित जवळून दुबेच्या घराभोवती एक चक्करही मारली. अन्याला तसा फिरताना पाहून कोंबडी आठ दहा फूट उडून एका स्लॅबवर बसली. तिने अन्याला संदेश दिला की मी लठ्ठ असले तरी एक पक्षी असून मी उडूही शकते. त्या कोंबडीला उडलेले पाहून अन्या निराश झाला. खुराडेही फोडून ठेवणे अशक्यच होते हे दिसत होते. त्यातच एक उन्हाने आळसटलेले, मेंगळट पण कोकलू शकणारे कुत्रे जिवाच्या आकांताने अन्यावर भुंकले. ते ऐकून दहा पाच कुत्री जमा झाली. सवयीने अन्याने एक दगड उचलला तशी निगरगट्ट कुत्री दोन चार पावले मागे झाली पण भुंकायची थांबेनात! शेवटी एक दगड अन्याने खरच भिरकावला. भिरकावताना नेमका नको तसा हात फिरला आणि हातातून सुटलेला दगड थेट दुबेच्या घराच्या खिडकीवर आदळला. क्षणार्धात खिडकीच्या काचेचे अवशेष आसमंतात उधळून अंगणात स्थिरावले. चक्रावलेला दुबे नेसत्या लुंगीनिशी अंगणात आला तेव्हा लांबवर अन्या पळून जात असलेला त्याला दिसला. दुबेच्या तोंडातून हवी ती आज्ञा मिळण्याची प्रतीक्षा करणारे त्याचे मेंगळट कुत्रे दुबेने छू म्हणताच अन्याच्या दसपट वेगाने अन्यामागे धावू लागले. पाठोपाठ बंडी घालून दुबेही चपळाईने अन्याच्या घराकडे जाऊ लागला. दुबेच्या नजरेत क्रोधाचा लाव्हा होता. अन्यासमोर आता शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आपण आपल्या घरात गेलो तर उगाच बापही मार खाईल म्हणून अन्याने पळता पळताच दिशा बदलली आणि गावाबाहेर असलेल्या डोंगराची दिशा पकडली. वाटेत पडलेली एक काठी उचलून त्याने लांबून येणार्या कुत्र्यावर उगारली. त्याचा मात्र भलताच चांगला परिणाम झाला. कुत्रं कधी नव्हे इतकं घाबरलं आणि उलटं पळालं! आता तर्हा विचित्र झाली. दुबेला काही समजायच्या आत त्याचे मेंगळट कुत्रे त्याच्याच दिशेने घाबरून पळत येताना दिसले. मागून एक काठी घेऊन अन्या धावत असलेला दिसला. अन्याला जणू रणमद चढलेला होता. अन्याचा तो आवेश पाहून दुबे जागच्याजागी गळाठला. पोरगं बारकं असलं तरी काठी भरीव आहे आणि पोरगं यडचाप आहे हे दुबेला समजत होते. आता दुबे घाबरून पळू लागला. काही क्षणातच गावकर्यांना एक अद्भुत दृष्य बघायला मिळाले. दुबेचे कुत्रे केविलवाणे होऊन धावते आहे, पाठोपाठ दातखीळ बसलेला दुबे कसाबसा धापा टाकत धावतो आहे आणि सर्वात मागून प्रचंड उग्र चेहरा करून बारा वर्षाचा अन्या हातात काठी घेऊन धावतो आहे. वरात दुबेच्या घराकडे गेली तेव्हा दुबेची बायको डोळे विस्फारून घडणार्या घटना पाहात होती. तिला पाहून दुबे तिच्या मागे जाऊन उभा राहिला. क्षणार्धातच अन्या त्याच्यासमोर उभा ठाकला. दुबे पूर्ण घाबरलेला आहे हे पाहून अन्याने ठेवणीतला आवाज काढला आणि म्हणाला...
"मर्दासारखा मरद तू? बायकूच्या पदराआड लपतोस? तालुक्याला जाऊन तक्रार करंल मी! पिसाळल्येलं कुत्रं पाळून गावाला भिववतूस म्हनून! ह्ये कुत्तरडं चावलन् तर दवापान्याचा खर्च तू देनार काय?"
दुबेने नम्रपणे कुत्रे पिसाळलेले नसल्याची माहिती बायकोच्या पदराआडूनच पुरवली. आपला नवरा आपल्या मागे लपलेला पाहून दुबेच्या बायकोने त्याला खेचून पुढे ओढला आणि म्हणाली...
"लपताय काय? द्या ठिवून त्याला दोन"
त्यावर अन्याने हातातील काठी तिच्यावर उगारली. तशी ती भीतीने गळाठून मागे सरकली. अन्या म्हणाला..
"ह्या पिसाळलेल्या कुत्र्यांनं मला धावाया लावलं त्येचा दंड पायजेल मला! न्हाईतर तक्रार करंल"
"ते पिसाळलेलं नाही"
"मी पिसाळलूय आता... दंड भर"
"दंड बिंड काही नाही.. कुत्र्याने काहीही केलेले नाही"
"केले असते तर जित्ते र्हाइले असते व्हय त्ये? मला उद्योग आस्तात.. घाईच्या यळी ह्या कुत्र्यानं मला धावाया लावलन्... दंड भर"
"तू कोण दंड मागणारा?"
"बाकीच्याबी काचा फोडू काय?"
दरम्यान दुबेला जरा धीर आला होता कारण दहा पाच गावकरी जमा झालेले होते. त्यातल्याच एकाने मागून अन्याच्या हातातील काठी खेचली. हेलपाटत अन्या मागे झाला तसा दुबे पुढे झाला आणि त्याने अन्याला धरून बुकलायला सुरुवात केली. आता पब्लिकलाही जोर चढला. हे बेणं एकदा मार खाणारच होतं असं वाटून जो तो हात धुवून घेऊ लागला. दुबेच्या बायकोनेही दोन लगावल्या. दुबेचे कुत्रे अर्धवट घाबरलेल्या आणि अर्धवट धीट मनस्थितीत लांबून का होईना पण भुंकू लागले. दुबेची कोंबडी अंगणभर थुईथुई नाचू लागली.
काही मिनिटांनी लोकांनी मारणे थांबवल्यावर काळा निळा पडलेला अन्या निगरगट्टपणे गर्दीतून बाहेर पडला. अन्याच्या चेहर्याकडे पाहून तमाम गावकर्यांनी आ वासलेला होता. इतका मार खाल्लेला अन्या निर्लज्जपणे हासत रखडत रखडत चालत होता. चेहर्यावर वेदनेचा लवलेष नव्हता. हा हसतो कसा काय हेच लोकांना समजत नव्हते. अन्या का हसत होता ते फक्त अन्यालाच माहीत होते. मारहाण होत असताना झालेल्या घिसाडघाईत दुबेच्या बायकोच्या गळ्यातील एक माळ अन्याच्या खिशात गेलेली होती. काही महिने तरी आपली गरीबी संपली हे अन्याला माहीत होते. आता मारा किती मारायचे ते! त्या कोंबडीसारख्या पन्नास कोंबड्या आता भाजता येतील हे अन्याला ठाऊक होते. फक्त या गावातून पसार व्हावे लागेल असा त्याने विचार केला. लांबूनच दुबेच्या कोंबडीकडे बघून त्याने डोळे मिचकावले. तशी मग ती कोंबडी थोडी गंभीर दिसू लागली.
गावातून पसार होण्याच्या हेतूने अन्या पुन्हा डोंगराच्या दिशेने चालू लागला. काही वेळ गावकरी मागून येत राहिले. शेवटी मार खालेला अन्या एकांतात चालला असावा असे वाटून कंटाळलेले गावकरी आपापल्या दिशेने निघून गेले.
डोंगर ओलांडून साडे चार तास चालून तालुक्याला पोचावे आणि ती माळ एखाद्याला विकून रोकड घेऊन तिकडेच कुठेतरी आरामात खावे प्यावे असा विचार करत अन्या डोंगर चढू लागला. बरोबर पाणी नाही का पोटात अन्न नाही. चक्कर येऊ लागली. करायचे काय हे त्याला कळेना! थोडे गवत आणि एक झाड पाहून बसला. आजूबाजूला काही विचित्र किडे होते. ते त्याने झाडून टाकले. अंगातली ताकद पूर्ण खलास होण्याच्या मार्गावर होती. हातापायात त्राण नव्हते. शरीराचा प्रत्येक भाग मार खाल्ल्यामुळे ठणकत होता. उपाशीतापाशी उन्हात या अवस्थेत डोंगर चढणारा अन्या आता ग्लानी येऊन पडायला आला होता. पण त्याच्या मेंदूने त्याला निर्णय दिला. खिशातील माळ विकेपर्यंत झोपू नकोस. कारणे दोन! पहिले म्हणजे दुसराच कोणी माळ चोरून जायचा. आणि दुसरे म्हणजे आपण केलेली चोरी पकडली वगैरे जायची. कसाबसा उठून अन्या पुन्हा डोंगर चढू लागला. प्रत्येक पावलाला दुबेच्या नावाने अर्वाच्य शिवीगाळ करत होता. दुबेची कोंबडी आत्ता स्वतःहून पुढे येऊन चुलीवर बसली असती तरी ती खाण्याचे त्राण अन्यात नव्हते खरे तर! पण खिशातील माळ नवनवी स्वप्ने दाखवत होती.
अचानक अन्याला एक डबकं दिसलं! पाणी स्वच्छ नसलं तरी अगदीच खराब नव्हतं! अन्याने पोटभर पाणी प्यायलं! तरतरी वगैरे आली तसा इकडेतिकडे पाहून किंचित लवंडला. संध्याकाळ व्हायला आलेली होती. मार खाणे, श्रम होणे, उपास घडणे या तिन्हीचा एकत्रीत परिणाम म्हणून त्याच्या नकळत त्याचे डोळे मिटले. निर्जन डोंगरात कोणत्याश्या एका अज्ञात बिंदूवर अन्या घोरू लागला.
किती वेळ झोपला होता हे त्याचे त्यालाही समजले नाही. वेदनांमुळेच पुन्हा जाग आली तेव्हा आकाशात थेट तारेच दिसले. हबकून उठायला गेला तर कंबर, पाठ आणि पाय तिन्ही ठिकाणाहून मरणाच्या वेदना उसळून आल्या. अंगात तापही असल्यासारखे वाटले. लांबून चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते. डबकं जवळच असल्याने पाणी प्यायला एखादे जनावर येऊ शकेल हे लक्षात आल्यावर अन्या मुळासकट हादरला. आता धड लपायलाही जागा नव्हती आणि पळायचेही त्राण नव्हते. कुठून बुद्धी सुचली आणि इथेच झोपलो असे त्याला वाटू लागले. खिशातली माळ आता निरर्थक वाटू लागली. आत्ता हवी होती सुरक्षितता, नंतर अन्न आणि मग भरपूर पाणी! आपल्या झोपड्यात आपण किती सुरक्षित असतो याची जाणीव त्याचे मन पोखरू लागली. दुबेची कोंबडी आपल्या या अवस्थेला कारणीभूत आहे हे आठवताच त्याला स्वतःचाच संताप येऊ लागला. डबक्यापाशी आत्तापर्यंत काही जनावरे येऊन गेलेलीही असली तरी आपल्याला कुठे कळले असणार असेही त्याला वाटले.
पण अन्या रडला नाही. आजवर तो फार कमी वेळा रडलेला होता. जेव्हा रडलेला होता तेव्हाची कारणेच अतर्क्य होती. स्वतःला काही झाले, शारीरिक वेदना झाल्या, आजारी पडला, उपास घडला, पब्लिकने धुतले असल्या कारणांनी तो कधीच रडत नसे. बापाने जबरदस्तीने शाळेत बसवले तेव्हा तो रडला होता. बापाने एकदा दारू पिऊ दिली नव्हती तेव्हा रडला होता. त्याला फक्त समजून घ्यायचे होते की बाप हे द्रव्य का पितो.
आत्ताही अन्या रडला नाही. त्याने कसेबसे उठून उभे राहायचा प्रयत्न केला. सुदैवाने खिशातील माळ तशीच राहिलेली होती. कोठेतरी लांबवर काहीतरी दिसले. त्या अंधारातही दिसले. ज्वाळा वगैरे असावी तसे! कितीतरी वेळ अन्या नजर रोखून तेच पाहात राहिला. भुताटकी तर नसेल ना असा विचार त्याच्या मनात आला. पण भीती वगैरे नाही वाटली त्याला. फारसे काही भयावह नसावे अशी खात्री पटू लागल्यावर तो आवाज न करता त्या दिशेला सरकू लागला. बर्यापैकी जवळ पोचल्यावर त्याला ते दिसले. काल भजनी मंडळाच्या महाराजाच्या घरी त्याच्याच बायकोशी वेडे चाळे करणारा पुरुष आत्ता इथे चुलीवर काहीतरी भाजत होता. म्हणजे हाही फरार झालेला दिसतो हे अन्याच्या लक्षात आले. ह्याच्याशी बोलायला गेलो आणि त्याला जर कळलेले असले की आपण केलेल्या चुगलीमुळे त्याच्यावर डोंगरात राहून चूल पेटवण्याची वेळ आली आहे तर तोही आपल्याला बुकलायचा असे अन्याला वाटले. पण खरपूस वास येत होता. संपूर्ण शरीर जणू आता अन्नाची मागणी करू लागलेले होते. करावे काय तेच अन्याला समजेना! शेवटी त्याने शक्कल लढवली. एका बाईच्या आवाजात चेटकिणीसारखा किंचाळत हासला तो. बुडापासून हादरलेला तो पुरुष तो आवाज ऐकून जागीच हबकून बसला. त्याच्या चेहर्यावर चुलीचा प्रकाश पडल्यामुळे तो स्वतः अंतर्बाह्य हादरलेला दिसत असला तरी तो स्वतःही भयावह दिसत होता. त्यामुळे क्षणभर अन्याही चरकला. पण अन्याच्या लक्षात आले. आपण कोण आहोत आणि कुठे आहोत हे त्याला दिसणे शक्यच नाही. मग अन्याने धावत लांबूनच त्या माणसाभोवती एक गोल चक्कर मारली. चक्कर मारताना त्याने असलेच विकृत आवाज काढले. परिणामतः तो माणूस अक्षरशः पळत सुटला उतारावरून!
तो माणूस दिसेनासा झाला तरीही अन्या दहा एक मिनिटे चुलीपासून लांबच उभा राहिला. उगीच तो पक्षी खायला जायचो आणि हा इथेच लपलेला असायचा असे व्हायला नको म्हणून! शेवटी हिय्या करून तो चुलीजवळ गेला. बराच जास्त भाजला गेल्यामुळे पक्ष्याचा एक भाग काळा ठिक्कर पडलेला होता. उरलेला भाग फुंकर मारत मारत अन्याने घशाखाली उतरवला. शेजारीच एका टमरेलात काहीतरी द्रव्य होते. अन्याने वास घेतला तशी त्याला स्वतःच्या बापाची आठवण झाली. आज आपल्याला ते प्यायला मिळणार जे बाप पितो या आनंदात त्याने गटागटा टमरेलातील द्रव्य प्यायला सुरुवात केली. तिसर्या घोटालाच घशात वेदना झाल्याने फवारा उडवून अर्धवट गिळलेले ते द्रव्य त्याने बाहेर फेकले. पुन्हा हिय्या करत आणि नाक दाबत त्याने कसेबसे उरलेले द्रव्य प्यायले. चूल अजुनही पेटलेलीच होती. पण आता भाजायलाच काही उरलेले नव्हते. अन्या अंदाजाने डबक्यापाशी आला आणि पाणी पिऊ लागला. खाली बसून पाणी पिताना त्याच्या लक्षात आले. आत्ता जे काही पोटात गेलेले आहे त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर होत आहे. दहा हत्तींचे बळ संचारल्यासारखा पाणी पिऊन तो उठला आणि डोंगर चढू लागला. आपला बाप जे पितो ते का पीत असावा हे त्याला समजले. एखाद्या राजाच्या पोसलेल्या मस्तवाल हत्तीसारखा अन्या निघाला होता. आता माराने अंग दुखत नव्हते. कसलीच वेदना राहिलेली नव्हती.
नेमके किती वाजलेले असावेत हेही कळत नव्हते. पण चक्क अर्ध्या पाऊण तासातच एका दिशेला जरा उजाडल्यासारखे वाटले. हळूहळू बघतो तर काय? एका बर्यापैकी मोठ्या गावापासून तो आता फक्त वीस एक मिनिटांच्या अंतरावर उभा होता. आपण जिवंत आहोत याबद्दल त्याने स्वतःचेच आभार मानले व चालू लागला.
तालुका!
या तालुक्यात असा कोण असेल जो माळ विकत घेईल यावर अन्या विचार करत असताना...
त्या जाग्या होत असलेल्या तालुक्याला काहीही कल्पना नव्हती की डोंगरावरून कसले भयानक रसायन भल्या पहाटे तालुक्यात प्रवेशलेले आहे....
क्रमशः
==========================
-'बेफिकीर'!
मी
मी पहिला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त चाललीए!!!
कप्रे गप्रे ! तू पहिला का ?
कप्रे गप्रे !
तू पहिला का ? का ? का ?
पुभाप्र
मस्तच चालली आहे!!!!!!!!!!!
मस्तच चालली आहे!!!!!!!!!!!
पुलेशु.........
हा भाग जास्त आवडला.... कथानक
हा भाग जास्त आवडला.... कथानक मस्त आकाराला येतय .
प्रसंग डोळ्यासमोर उभे ठाकण्याच शब्दातल सामर्थ्य वाखाणण्याजोगयं.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-सुप्रिया.
पुलेशु.........
पुलेशु.........
पुढील भागाच्या
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!!!!!!!!!!!!
पुलेशु बद्दल - पुढील
पुलेशु बद्दल - पुढील लेखनासाठी शुभेच्छा असा त्याचा अर्थ आहे. नवीन लेखकांचं पहिलंवहिलं लिखाण वाचल्यावर साधारण हा वाकप्रचार वापरतात. कदाचित या वाचकांना पुभाप्र ( पुढील भागाच्या प्रतिक्षेत) असं म्हणायचं असेल, पण पुलेशु हा शब्द अज्ञानातून वापरला गेला असेल.
बेफिकीर हे खूप जुने आहेत आणि त्यांचं लिखाण चतुरस्त्र आहे. त्यांना किंवा त्यांच्यासारख्या जुन्या आणि सिद्धहस्त लेखकांना पुलेशु म्हणणं खटकतं. पुलंना कुणी पुढील लेखनासाठी शुभेच्छा म्हटलं असतं तर ?
बेफिकीर हे खूप जुने आहेत आणि
बेफिकीर हे खूप जुने आहेत आणि त्यांचं लिखाण चतुरस्त्र आहे. त्यांना किंवा त्यांच्यासारख्या जुन्या आणि सिद्धहस्त लेखकांना पुलेशु म्हणणं खटकतं. ?>> शुभेच्छा देण्यात काय चुक आहे?
नेहमी प्रमाणे सुरुवात चानच
नेहमी प्रमाणे सुरुवात चानच झाली आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
भाग छान झालाय पण..... भुक्कड
भाग छान झालाय पण.....
भुक्कड आणी सनम पण पुर्ण वाचायची आहे...... (रडणारी बाहुली)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!!!!!!!!!!!
नेहमी प्रमाणे
नेहमी प्रमाणे ऊत्तम
बेफिकिरजीनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.. की मायबोलीवर त्याच्या इतका ताकदवान लेखक नाही आहे..
वाचकाना कथेत गुंतवुन ठेवण्यात बेफिकीरजी एकदम माहीर आहेत.
ह्या कथेमधुन सुद्धा सामाजीक प्रभोधन होईल
पुढिल भाग लवकर येउ द्यात
अन्या ३ येऊ द्या. उत्सुकता
अन्या ३ येऊ द्या. उत्सुकता वाढता वाढे या दिशेने चाल्ली आहे.
आपल्या लेखणीला नमस्कार.
आपल्या लेखणीला नमस्कार. अन्याने मार खाण्याचा प्रसंग एकदम जिवंत उतरवलेला आहे.