संभ्रम

Submitted by मोहना on 24 October, 2013 - 20:54

"किंचाळणं बंद कर तुझं आधी, बंद कर म्हणते ना." खडीची घमेली उचलणार्‍या मजूर बाईच्या अंगावर मीना जोरात ओरडली. तिच्या चढलेल्या आवाजाने गप्प होण्याऐवजी त्या बाईला अधिकच चेव चढला.

"ए ऽऽऽऽऽऽ बाई, माज्या मागं नगं लागू. माज्या अंगावर येत होता त्यो. त्येला धर आधी." मोठ्याने गळा काढत तिने जमिनीवर फतकल मारली. गर्दीतल्या बघ्यांनी दाखवलेल्या दिशेने मीना धावली पण एव्हाना खूप दूर पळालेल्या पुसटशा आकृतीचा पाठलाग करणं शक्य नव्हतं. तिने तो नाद सोडून दिला. मजूर बाईच्या समोर तीही मांडी घालून बसली. बाईने कसं जपून राहायला पाहिजे ते समजावीत राहिली. तिच्या भोवती जमलेल्या कामगार बायकांच्या कलकलाटात पोटतिडकीने ती त्या बाईला आधार द्यायचा प्रयत्न करत होती. कामगार स्त्रिया समजल्यासारखं करीत माना डोलवत होत्या.

मुंबई गोवा हायवेलगतच्या लांज्यातला महिलाश्रम मीनाचं विश्व होतं. शिरोळ, वडगाव, माखजन, निपाणी अशा कुठल्या कुठल्या गावातून कुणाचा आधार नसलेल्या, अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया या संस्थेत होत्या. प्रत्येकीचा आवाका अजमावून त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं या ध्येयाने मीना आणि तिच्या सहकारी झपाटलेल्या. वाढता व्याप सांभाळण्यासाठी नवीन इमारत बांधण्याचं काम चालू झालं. जेमतेम पंधरा दिवस झाले होते आणि आवारात पालं टाकलेल्या मजुरांमध्ये झालेला हा प्रकार.
"पालामधलाच असणार कुणीतरी. नशीब तोंडावर हात दाबून नाही ठेवला. ओरडताही आलं नसतं त्या बाईला." ज्योतीच्या बोलण्यावर मीना खिन्नपणे हसली.
"म्हणजे आपल्यासारखंच की. तोंडावर हात दाबून ठेवल्यासारख्याच आपण गप्प बसणार आहोत ना आता? कुठे ते पोलिस बोलवा, चौकशीच्या चक्रात अडका असं म्हणत तोंड बंद. अशा किती घटना, अन्याय सहन करतो, वाचाच फुटू देत नाही. हे नुसतं बाईचं नाही गं. समाजाचंच चित्र होत चाललं आहे. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहिल्यासारखं आयुष्य. गप्प राहायचं. आवाज म्हणून उठवायचा नाही कशाविरुद्ध." ज्योती चकीत नजरेने मीनाकडे पाहत राहिली.
"कुठून कुठे पोचलीस तू मीना. नाही म्हणजे तू म्हणते आहेस ते खरं आहे. पण आपला विषय काय आणि...."
"जाऊ दे. फार थकायला झालं आहे. पडते मी खोलीत जाऊन." मीनाने विषय संपवलाच. संथ पावलं टाकत आश्रमातल्या तिच्या खोलीकडे ती वळली. ज्योतीही पर्स उचलून तिथून बाहेर पडली.

झुलत्या खुर्चीवर मीनाचं मनही झोके घेत राहिलं. डोळे मिटून ती तशीच शांत पडून राहिली. ती शांतताही अंगावर यायला लागली तसं खुर्चीच्या बाजूलाच ठेवलेला लॅपटॉप तिने चालू केला. थोडावेळ या पानावर, त्या पानावर निरर्थक उड्या मारत राहिली. वर्तमानपत्र, ब्लॉग वाचत राहिली. कशात मन म्हणून लागत नव्हतं. फेसबुकवर आलेल्या फ़्रेंड रीक्वेस्ट तिने पाहिल्या. त्या नेहमीच भरपूर असत. समाजसेवेतल्या अनुभवावरच्या तिच्या लिखाणामुळे खूप जण मैत्रीचा प्रयत्न करत. एका नावावर ती अडखळली. चेतन? खात्री करण्यासाठी ती पुन्हा पुन्हा नाव वाचत राहिली. चेतन पाटील. अंगातून तप्त ज्वाळा आल्यासारख्या तिचे कान लाल झाले. काय करावं? स्वीकारावी ही मैत्री? की नकोच ते भूतकाळात गाडलेल्या आठवणी उकरून काढणं? तो नुसती मैत्री करण्याच्या अपेक्षेवर थांबला नव्हता. पत्रही होतं.
"प्रिय मीना,
कशी आहेस? तुला फेसबुकवर पाहिलं आणि गंमत वाटली. मी नवीन आहे फेसबुकवर. इतकी वर्ष नव्हतोच इथे. पण तुझी इथे पुन्हा भेट होईल याची कल्पना असती तर... कल्पनाच केली नव्हती की तुला तुझ्या कामातून उसंत मिळेल. त्यामुळे अशा सोशल नेटवर्किंग संकेत स्थळांवर तू आहेस ह्याचंच आश्चर्य वाटतं आहे. तुझ्याकडून पत्रोत्तर यावं याची, फोनची त्याहूनही तुला प्रत्यक्ष भेटायची अतीव इच्छा आहे. भेटशील, निदान एकदा तरी?- चेतन." तो अगदी तिच्यासमोर उभाच आहे असं वाटलं मीनाला. ताडमाड उंची, सावळा तजेलदार चेहरा आणि त्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसणारा चष्मा, तिच्या बोटांना सूक्ष्म थरथर सुटली, पायातलं त्राण गेल्यासारखं वाटलं. त्याचा शोध घेण्याची इच्छा तिने जाणीवपूर्वक टाळली होती पण त्याच्या या पत्राने तिचा निग्रह डळमळला. उतावळेपणाने तिने फेसबुकवरचे त्याचे फोटो पाहिले. फार फरक नव्हता पडला इतक्या वर्षात. क्षणभर तिने फोटोतली मूर्ती डोळ्यात साठवली आणि झटकन लॅपटॉप बंद केला. का अडकतो आहोत आपण परत? कशाला पुन्हा संपर्क साधतोय हा? कशाला गाडलेली भुतं उकरायची ? लॅपटॉप किंचित बाजूला सरकवून ती चेतनचाच विचार करत राहिली. किती वर्ष मध्ये लोटली तरी त्याची पहिली भेट जशीच्या तशी आठवत होती तिला.

’आधार’ संस्थेसाठी ती तेव्हा काम करत होती. समाजसेवेची पदवी नुकतीच हातात पडली होती. जग बदलून टाकायची स्वप्न, जिद्द होती मनात. कुठल्यातरी आडगावी जाऊन, जिथे शासकीय यंत्रणा पोचूच शकत नव्हती अशा गावी गावकर्‍यांना रस्ता बांधायच्या कामी मदत करायचं संस्थेने ठरवलं आणि त्यांचा गट दोन तीन महिन्यासाठी दुर्गम भागात मुक्कामालाच राहिला. सकाळी उठल्या उठल्या घमेली उचलायची, खडी फोडायची, रांग लावून गाण्याच्या तालावर खडी भरलेली घमेली पुढच्या हातात सोपवायची. ऊनं अंगावर यायला लागली की गाण्यात, हालचालीत संथपणा यायला लागायचा. दिवस संपत आला की हातपाय एकदम पार गळून जात. त्या दिवशी तर सकाळी मीनाला उठवतंही नव्हतं. सगळं सोडून घरी जावं, आईच्या हातचे चार घास खावेत आणि ताणून झोपावं याच विचारांची साखळी फेर घालत होती.
"समाजसेवा करता आहात म्हणे. अक्कल तरी आहे का समाजसेवा कशाशी खातात त्याची? हात हलत नसतील तर कशाला ती नाटकं कामं करण्याची. तुमच्यासारख्यांना नाही हे झेपण्यासारखं."
शब्दांच्या दिशेने तिची मान आपोआप वळली. काय बोलतोय हा माणूस? आणि याला कुणी दिला हा अधिकार हे असं काही बोलण्याचा. आजूबाजूची सगळीजणं माना खालून काम करत होती.
"मी तुमच्यासारख्यांबद्दलच बोलतो आहे. मख्खासारख्या उभ्या काय राहिल्या आहात?"
ती तशीच ताठपणे त्याच्या नजरेला नजर देत उभी राहिली.
"तुमच्यासारखे म्हणजे?"
"म्हणजे घरी सुखाच्या राशीत लोळत पडता. मग काहीतरी काम करायला हवं म्हणून पाट्या टाकायचं झालं."
"तुम्हाला कुणी सांगितलं की घरी सुखाच्या राशी आहेत माझ्या?" खो खो करून तो पोट धरून हसला.
"हसणं थांबवा तुमचं आणि उत्तर द्या." तिचे डोळे आग ओकायला लागले.
"अहो, सांगायला कशाला हवं? कळत नाही का तुमच्याकडे बघून?"
क्षणभर ती त्याच्याकडे पाहत राहिली. आक्रमकपणे, पण शब्द तोंडातून फुटत नव्हते. हातातलं घमेलं तिने तिथेच आपटलं आणि दाणकन पाय आपटत पाठ फिरवली. पायवाटेवरून झपाझप चालत तिथल्या शाळेत तात्पुरत्या उभारलेल्या संस्थेच्या कार्यालयात पोचली. पायरीवरच तिने बसकण मारली.

"मी चेतन. चेतन पाटील." गुडघ्यात डोकं खुपसून बसलेल्या मीनाने डोकं वर काढून पाहिलं आणि ती चकित होऊन पाहत राहिली. पाच मिनिटांपूर्वी रुद्रावतार धारण केलेला हाच माणूस आपल्यासमोर उभा आहे यावर तिचा विश्वास बसेना.
"क्षमा करा पण कामात कुणी चालढकल केली की संताप होतो माझा."
"चालढकल? रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही सगळे काम करत होतो तेव्हा तुम्ही कुठे होता? दुसर्‍यादिवशी भर उन्हात काम करताना दोन मिनिटं थकवा आल्यासारखं वाटलं म्हणून नुसतं उभं राहिलं तर काय कामचुकारपणा झाला? तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची मला मुळीच आवश्यकता नाही खरं तर. हे असं बोलायचा अधिकार दिलाच कुणी तुम्हाला?"
"मी चेतन पाटील."
"बरं मग? ऐकलं मी ते दोनदा."
"तुम्ही माझा अधिकार विचारत होता ना म्हणून पुन्हा सांगितलं नाव." मृदू स्वरात तो म्हणाला. काही न कळल्यासारखी ती नुसतीच त्याच्याकडे पाहत राहिली.
"ही संस्था माझ्या कल्पनेतून सुरू झाली आहे. फारसा येत नाही मी काम चालू असेल तिथे. म्हणजे वेळच नसतो. काम खूप वाढलं आहे. देणग्या मिळवणं, त्यासाठी संस्थेला योग्यं ती प्रसिद्धी मिळवून देणं, परदेशातल्या सेवाभावी संस्थांचा अभ्यास करून त्यांच्या काही चांगल्या योजना आपल्याकडे राबवता येतील का याचा अभ्यास करणं यातून प्रत्यक्ष कामावर जाणं जमतंच नाही." अनपेक्षितपणे संस्थेचे संस्थापकच समोर उभे आहेत म्हटल्यावर मीना थोडीशी भांबावली. पण काही क्षणच.
"हं.......थोडक्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नशा तुम्ही विसरून गेला आहेत. त्यामुळेच होतं असं. एक सांगू? माणूस सुखाच्या राशीत लोळत असला तरी त्याची पात्रता असू शकते कोणतंही काम करायची." ती उठलीच तिथून. तिला नेमून दिलेल्या खोलीकडे ताडताड पावलं टाकीत निघूनही गेली. चेतन पाटील तिच्या त्या पाठीमोर्‍या चालीकडे पाहतं राहिला.

शाळेच्याच व्हरांड्यात पसरलेल्या सतरंजीवर चेतनने अंग टाकलं पण काही केल्या झोप येईना. जिचं नावंही माहीत नाही अशा मुलीने त्याच्या डोळ्यात अंजन घातलं होतं. ’आधार’ च्या फांद्या आता विस्तारल्या होत्या. किती लोकं या संस्थेसाठी काम करत होते पण संस्था वाढली तसं त्याच्या कामाचं स्वरूप बदलत गेलं. संस्थेसाठी पैसा कसा जमा करता येईल याची आणि पर्यायाने त्यासाठी कराव्या लागणार्‍या योजना, कामकाज यातच तो गुरफटला होता. काय करायला गेलो आणि काय होत चाललं आहे या विचाराने त्याला थकवा आला, स्वत:चा रागही. दगडी फरशीचा गार स्पर्श पाठीच्या कण्यातून शिरशिरी जागवत होता. टक्क उघड्या डोळ्यांनी तो छताकडे पाहत ’आधार’ च्या सुरुवातीच्या दिवसांपर्यंत जाऊन पोचला.

थकल्या भागल्या मनाने तो एसटीमध्ये चढला तेव्हा रात्रीचे जवळजवळ नऊ वाजले होते. दुपारचं खाणं धड झालं नव्हतं. डॉक्टरांची वाट बघत ताटकळत बसावं लागलं होतं दवाखान्यात. पण काम झाल्याचं समाधान मिळालं. त्या गडबडीत खायचं सुचलंच नव्हतं. आता मात्र पोटात भुकेचा डोंब उसळला होता. पण त्या आडगावात सामसूम झाली होती. तालुक्याला पोचलं की पोटात काहीतरी ढकलून खोलीवर जायचं त्यानं मनाशी ठरवलं. औषधं विकायची म्हणजे अखंड पायपीट, दुर्गम भागात जायचं, खेड्यापाड्यातून फिरायचं आणि मिळेल त्या वाहनाने परत येऊन भाड्याने घेतलेल्या खोलीत रात्री अपरात्री अंग टाकायचं. रात्रीची पाठ टेकायला हवी म्हणून घेतलेली ती खोली. त्याला कधी एकदा खोलीवर पोचून पाठ टेकतो आहोत असं झालं, त्यातच उद्या कुठे जायचं आहे त्याचा विचार मनात चालू असतानाच धाडकन दार बंद करीत चालक गाडीत चढला. गाडी चालू होणार इतक्यात चेतनचं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं. लांबून पुसटशी आकृती गाडीच्या रोखाने धावत येत होती. त्याने ओरडून कंडक्टरचं लक्ष वेधलं. गाडी थांबली. धावत आलेली मुलगी आत चढली आणि गाडीचा दरवाजा तिने जोरात लावला.
"जाऊ दे ऽऽऽ" कंडक्टर ओरडला. तिच्या मागून धावत येणारे चार पाचजण दारावर जोरजोरात धक्के मारायला लागले तेव्हाच कंडक्टर, चेतन आणि मागच्या बाकड्यावर बसलेल्या एकदोघांचं तिकडे लक्ष गेलं.
"थांबवू नका गाडी. गाडी थांबवू नका." रडवेल्या आवाजात त्या मुलीच्या तोंडून कसेबसे शब्द फुटले.
कंडक्टरने समजल्यासारखं करत गाडी न थांबण्याचा इशारा केला. हुंदके देऊन रडणार्‍या त्या मुलीचं काय करावं ते कुणालाच कळेना.
"कुठे जायचं आहे तुला?"
ती मुलगी डोळे फाडून तशीच कंडक्टरकडे पाहतं राहिली.
"मला नाही कुठे जायचं."
"गाडीत चढलीस ना? मग कुठे उतरायचं आहे?"
"त्या गुंडापासून जीव वाचवायला चढले मी गाडीत. मवाली नुसते. त्याच गावात राहते मी. दुसरीकडे कुठे जाणार?"
"काळोख पडल्यावर एकटं दुकटं बाहेर पडूच नये पण. कुठे जायचं नाही म्हणतेस मग थांबवतो गाडी इथेच." कंडक्टरला नसती लफडी नको होती. मागे बसलेल्या दोन तीन प्रवाशांनी मात्र हरकत घेतली.
"अहो, त्या पोरांना माहीत असेलच ना ती इथेच येईल परत ते. थांबलेले असतील तिथेच फाट्यावर."
"मग काय करायचं? पोलिस स्टेशनवर घेऊ का गाडी?"
"नको, नको, आबा वैतागतील." त्या मुलीने घाईघाईने म्हटलं.
"आबा कोण?"
"वडील माझे. गावात दुकान आहे आमचं भांड्याचं."
"घरी गेली नाहीस तर काळजीत पडतील, आणि अशा आडवेळेला जाणार कुठे तू. तालुक्याच्या गावात कुणी नातेवाईक, ओळखीपाळखीचं आहे का?" प्रवासी, कंडक्टर कुणालाच काय करावं ते कळत नव्हतं. ती नकारार्थी मान हलवित राहिली.
"गाडी थांबवा." चेतन एकदम उभा राहिला.
"तुम्हाला काय झालं आता? शिंची, काय कटकट आहे ही. आणि ह्या पोरी, नको त्या वेळी बाहेर पडायचं आणि पोरं मागे लागली की......."
"मी घरी नेऊन सोडतो तिला. चालत जाऊ आम्ही. तुम्ही गाडी थांबवा इथेच." कंडक्टरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चेतनने गाडी थांबवायला भाग पाडलं.

ही सुरुवात होती अडचणीतून एखाद्याला सोडवायला धावायची? की औषध विक्रेता झाल्यावर भटक्या आयुष्याची सवय होत चालली, खेड्यापाड्यातलं कधी न पाहिलेलं जीवन आवडायला लागलं ती? चेतनला ठरवता येईना. पण त्या मुलीला मदत केल्यानंतर चेतनच्या मनाला या प्रश्नाने विळखा घातला होता. दवाखान्यात त्याच्या भेटीची वेळ होईपर्यंत वाट पाहत बसलं की आपोआप मनाचा ताबा तो प्रसंग घेई. पण काय करायचं सुचत नव्हतं. गावातल्या एक दोघांशी बोलल्यानंतर ’आधार’ चं त्याच्या मनात घोळायला लागलं. जेवायला खानावळीत गेलं की या विषयावर बोलणं होईच तिथे कुणी असतील त्याच्यांशी. नक्की काय करायचं, या कामासाठी माणसं कशी मिळवायची, सुरुवात कशी करायची याची तीन चार महिने उलट सुलट चर्चा होत राहिली आणि ’आधार’ ची पाटी त्याच्या खोलीवर लटकली. गावातल्या शाळेत, महाविद्यालयात जाऊन त्याने, त्याच्या दोन तीन मित्रांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. मदतीचं आवाहन केलं. निराधार, टाकलेल्या, फसलेल्या, घर सोडलेल्या अशा स्त्रियांना, मुलींना ’आधार’ च्या रूपाने हक्काचं घर मिळावं, त्यांनी स्वावलंबी व्हावं ही ’आधार’ ची कल्पना. हळूहळू ’आधार’ ला स्थैर्य आलं. सात आठ वर्षात रोप चांगलं फोफावलं आणि आज मीनाने त्याला त्या धुंदीतून जाग आणली. तिचा रोखठोकपणा त्याला आवडला. खरं तर अशा स्वरूपाचं तो कितीतरी वेळा बोलला नव्हता का? खूपदा बड्या घरातली मुलं वेगळं काहीतरी करायचं या ऊर्मीने अशा उपक्रमात सामील होत. बरोबर कुणीतरी हवं म्हणून मित्रमैत्रिणींना त्यात ओढत. खेडेगावात सगळी हुंदडायला यावं तशी येणार. गप्पा गोष्टी, खिदळणं असं करत काम उरकणार. त्यांच्या चेहर्‍यावरुनच किती कळकळ आहे कामाबद्दल ते कळायचं त्याला. कडवट शब्द आपसूकच निघायचे. असं झालं की काम करणारी मुलं क्षमा मागायची. खाली माना घालून कामाला लागायची. पण ह्या मुलीची प्रतिक्रिया वेगळी होती. त्यालाच विचार करायला लावणारी.

"माझ्या बरोबर काम करायला आवडेल?" दुसर्‍यादिवशी त्याने सकाळीच मीनाला गाठलं.
"अं?"
"तुमचं म्हणणं मला पटतं आहे. विसरलो आहे मी कामाची नशा. माझ्याबरोबर काम कराल तुम्ही?"
आश्चर्य लपवित ती म्हणाली,
"तुमच्याच संस्थेत काम करते आहे मी."
"हो, पण मी म्हटलं माझ्याबरोबर. तुम्हीच म्हटलंत ना की मी ती नशा विसरलो आहे. पुन्हा एकदा त्या नशेचा अनुभव घ्यावासा वाटतो आहे. "
"म्हणजे?"
"तुम्हाला शहरात यावं लागेल. दोन तीन ठिकाणी कार्यालयं आहेत संस्थेची. मी जिथे असेन तिथे तुम्हालाही यावं लागेल. एकमेकांची मदत झाली तर मला तुम्ही म्हणता तशी नशा अनुभवण्याची संधी मिळेल." मिश्किल हसत तो म्हणाला.
"पण मला कार्यालयीन कामात रस नाही."
"पण दोन्हीचा अनुभव मिळेल की तुम्हाला. नुसत्याच कार्यालयीन कामात गुंतवणार नाही मी तुम्हाला. आपण दोघं मिळून काम करू." आर्जवी स्वरात चेतन म्हणाला.
"मी विचार करून सांगते." मीनाने हो नाही करत आठवड्याभरात होकार दिला आणि सातार्‍याला ती त्याच्या कार्यालयात रुजू झाली. सातारा, निपाणी, इचलकरंजी...अशिक्षित, टाकून दिलेल्या, फसलेल्या, आई वडिलांना जड झालेल्या मुली..., गावातल्या प्रमुखांशी बोलायचं, वाचनालयात, दुकानात माहितीपत्रकं लावायची. कुणी ना कुणी माहिती दिली किंवा कुणी स्वत:हून पुढे आलं की त्या स्त्रियांशी, मुलींशी बोलायचं, धीर द्यायचा, ’आधार’ ची माहिती द्यायची. मुलं असतील तर त्यांचीही व्यवस्था ’आधार’ मध्ये होईल याची ग्वाही द्यायची. चेतन, मीना सगळीकडे जोडीने काम करायला लागले. एकमेकांच्या सहवासाशिवाय दोघांनाही करमेना. लग्न दोघांनाही करायचं नव्हतं. समाज काय म्हणेल याची पर्वा करण्याच्या भानगडीत न पडता ते एकत्र राहायला लागले. चेतनला अधूनमधून मुंबईच्या खेपा मारायला लागायच्या. पण मीनाच्या जोरावर तो निश्चित होता. तिच्यामुळेच तर पुन्हा एकदा नवीन नवीन कल्पना सुचायला लागल्या होत्या. मुलींची, बायकांची नुसती आश्रमात राहायची व्यवस्था आणि पापड, शिवण अशा कामातून मिळणार्‍या स्वयंरोजगारापेक्षा या मुलींनी, स्त्रियांनी शिक्षण घ्यावं, संगणक शिकावा, त्यांच्या आवडी निवडीची कल्पना आली की त्यानुसार त्यांना शिक्षण, काम मिळावं यावर चेतनचा भर होता. समाजोपयोगी इतर कामांवरचा भर वाढवायचा होता. त्यासाठी अर्थातच पैशाची गरज होती. मुंबईत ’आधार’ संस्थेचं नाव आता चांगलंच झालं होतं. उद्योगपती, सरकार सगळीकडून अनुदान, देणग्या मिळत होत्याच. परदेशातल्या संस्थांशीही संपर्कात होता तो. औषध विक्रेता असल्याचाही फायदा त्याने संस्थेसाठी करून घेतला. ओळखीच्या डॉक्टरांमुळे परदेशातल्या बर्‍याच संस्था त्याला मदत करत होत्या. सगळं मनाजोगतं चाललं होतं आणि...

नेहमीप्रमाणे उठल्याउठल्या एकेक इ मेल चेतन वाचत होता. बिग फार्माचं इ मेल आलेलं पाहून त्याने ते आधी उघडलं. गेले कितीतरी दिवस त्याच्यांशी देणगीसाठी पत्रव्यवहार चालू होता. काम झालं तर सात आठ लाख नक्की मिळाले असते. कमीत कमी तीन ते चार शाखांना हे पैसे पुरून उरले असते. घाईघाईत तो वाचायला लागला,
चेतन,
कळविण्यास आनंद वाटतो की बिग फार्मा आपल्या ’आधार’ संस्थेसाठी वीस लाखांची देणगी देऊ इच्छिते. त्याचबरोबर बिग फार्माला ’आधार’ साठी एक प्रस्तावही मांडायचा आहे. सध्या मधुमेहावर उपाय म्हणून बिग फार्माचे शास्त्रज्ञ नवीन औषध तयार करत आहेत. त्याबद्दल प्रत्यक्ष भेटून आपल्याशी चर्चा करता यावी अशी अपेक्षा आहे. सध्या आमचे प्रतिनिधी मुंबईत आहेत. सोयीची वेळ कळविल्यास ते आपली भेट घेतील.
बिग फार्माच्या वतीने,
मार्क
वीस लाख! चेतनने बिग फार्माकडे फक्त दहा लाखाची देणगी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आता एकदम वीस लाख. तो खूश झाला. घाईघाईत त्याने मीनाला फोन लावला. मीनाने ते कोणत्या शाखेसाठी कसे वापरता येतील याबद्दलचे कितीतरी दिवस मनात योजलेले बेत फोनवरच त्याच्यासमोर मांडले.
"तूच ये ना त्यांच्यांशी बोलायला. तुझे बेत त्यांना ऐकव. वाढवतील ते देणगी." तो हसत हसत म्हणाला. तीही हसली.
"अरे, मला काय कळतं आहे यातलं. तू औषध विक्रेता आहेस. कळत असेल थोडंफार ते तुलाच. पण या नवीन औषधाचा आपल्याशी काय संबंध?"
"नक्की अंदाज आला नाही. कदाचित संस्थेतल्या बायका, मुलांवर औषधांचा परिणाम किती होतो ते पाहायचं असेल. आपल्याकडे आहेतच मधुमेह झालेल्या स्त्रिया. पण तसं असेल तर आपली तयारी आहे का याचा विचार करावा लागेल."
"विचार कसला रे. नाहीच दाखवायची अशी तयारी. शेवटी ते प्रयोग आहेत. काही बरं वाईट झालं म्हणजे? आपण या स्त्रियांना आधार द्यायचा प्रयत्न करतो आहोत. आगीतून फुफाट्यात असं नको व्हायला." मीनाला चेतन याबद्दल विचारही करू शकतो याचंच आश्चर्य वाटलं.
"ठीक आहे. भेटून तर घेतो. बघ तुला जमत असेल तर तू येच." क्षणभर विचार करून त्याने उत्तर दिलं. त्याच्या स्वरातला तिने येण्याबद्दलचा आग्रह कमी झाल्याचं तिला जाणवलं. काही न बोलता तिने फोन ठेवला.

"बिग फार्माच्या शास्त्रज्ञांनी मधुमेहावर नवीन औषध तयार केलं आहे. ते बाजारात येण्याआधी मधुमेहावर किती प्रभावशाली आहे हे पाहण्यासाठी आम्ही ’आधार’ मधील मधुमेहग्रस्त रहिवाशांवर त्याचा प्रयोग करू इच्छितो. ह्या कालावधीत ज्या स्त्रियांवर याचा वापर होईल त्यांचा दैनंदिन खर्च, शिक्षणांचा खर्च, नोकरी मिळवून देण्याची शाश्वती या सर्वांची हमी आम्ही घेतो. त्यांना मुलं असतील तर त्यांच्याही शिक्षणांचा खर्च आम्ही करू. आपल्याला हे मान्य असेल तर ’आधार’ ला पन्नास लाखांची देणगी देऊ." बिगचा प्रतिनिधी म्हणाला. फार्माच्या आलिशान कार्यालयात पाऊल टाकतानाच चेतन दिपून गेला होता. आणि आता एकदम पन्नास लाखाची देणगी. आपण नक्की काय प्रतिक्रिया द्यावी तेच चेतनला कळेना. पन्नास लाख! ’आधार’ च्या सर्व शाखांना पुरून उरेल इतका पैसा होता हा. पण त्यासाठी रहिवाशांनी नक्की काय किंमत मोजायची? पाण्याचा ग्लास तोंडाला लावत त्याने शंका विचारण्यासाठी तोंड उघडलं.
"शेवटी हा प्रयोग आहे. पण आधी वेगवेगळ्या कसोट्या लावून झालेल्या आहेत त्यामुळे तसा धोका नाही."
"निष्पाप लोकांच्या जीवांशी खेळ तर होणार नाही ना?" आवंढा गिळत चेतनने विचारलं. त्याला उत्तर ऐकायचं होतं आणि नव्हतंही.
"नाही, अर्थात कोणत्याही औषधांचा शरीर कसं स्वीकारतं त्यावरच परिणाम ठरतो. आम्ही पन्नास लाख संस्थेला देऊ इच्छितो." दोन वाक्यांमध्ये ’म्हणून तर’ हा शब्द जाणीवपूर्वक टाळला गेला हे चेतनच्या लक्षात आलं. तो गप्प झाला. निश्चित उत्तर मिळालं नव्हतं. त्यानंतर बिग फार्माचा प्रतिनिधी त्यांनी किती ठिकाणी देणग्या दिल्या आहेत, कंपनीतला प्रत्येक कर्मचारी कशी समाजसेवा करतो, कितीतरी देशात आपत्कालीन परिस्थितीत त्याच्यांकडून औषधं मोफत कशी दिली जातात यावरच बोलत राहिला. चेतनच्या मनातून काही केल्या पन्नास लाख जात नव्हते. प्रतिनिधीने मागवलेला चहा घेऊन त्याने बिग फार्माला होकार दिला.

"अरे असा कसा अविचार केलास तू? काय ठरलं होतं आपलं? त्याच्यांशी काय बोलणं झालं ते तू मला सांगशील, काही दिवस मागून घेशील निर्णयासाठी." मीना दुखावली गेली. संतापली.
"मीना तू शांतपणे विचार कर. वेळ दिलाच नाही त्या लोकांनी. आज काय ते सांगा, नाहीतर ठरल्याप्रमाणे वीसलाखांचा चेक फाडतो म्हणायला लागले. मीना, विचार कर ना, अगं किती शाखांचं भलं होईल या पैशांमुळे. हे पैसे काही माझ्या वैयक्तिक खात्यात जाणार आहेत का? कितीतरी जणी स्वावलंबी होतील या पैशातून झालेल्या शिक्षणामुळे, त्याच्यांसाठी एखादा व्यवसायच सुरू करू शकू आपण."
"आणि कुणाचा जीव गेला तर?"
"मीनाऽऽऽ" त्याच्या मनातली भिती त्याने मनाच्या तळाशी गाडून टाकली होती ती अशी स्पष्टपणे मीनाने व्यक्त केल्यावर चेतन उगाचच ओरडला.
"ओरडू नकोस असा. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे."
"नाही जाणार कुणाचा जीव. त्यांनी वेगवेगळ्या कसोट्या आधीच लावल्या आहेत असं सांगितलं."
"लिहून देतोस?" त्याला काय बोलावं ते सुचेना.
"मी तिथे आल्यावर बोलू आपण या विषयावर." चेतनने फोन बंद करत संभाषण संपवलं. मीना अस्वस्थ झाली. कुणाला सांगावं, काय करावं? चार दिवसांनी चेतन येणार होता. नको ती देणगी आणि नको ते जीवघेणे प्रयोग, चाललं आहे ते काय वाईट आहे? का चेतनला ही अशी दुर्बुद्धी होते आहे? समजावून सांगितलं तर ऐकण्याच्या मन:स्थितीत असेल तो? शंकांचं भेंडोळं तिला वेढून राहिलं. एकदा वाटलं, निघून जावं, त्याच्याबरोबर काम करणं थांबवावं. तसंही लग्नाने बांधील थोडेच आहोत. लग्न न करताच एकत्र राहण्याच्या निर्णयाचा तिला पहिल्यांदाच इतका आनंद झाला. घटस्फोटाची किचकट प्रक्रिया, वाट पाहत बसणं असलं काही नाही. घेतलं स्वत:चं सामान, निघालं इथून. संपला संबंध. पण खरंच असा संपतो संबंध? त्याच्याबरोबर उपभोगलेले क्षण, एकमेकांना मिळालेला आधार, तनमनाने एकत्र आलेले दोन जीव असे पटकन दूर जाऊ शकतात? विचार करून तिचं डोकं भणभणलं पण एरवी ठामपणे निर्णय घेणार्‍या मीनाच्या मनाने कच खाल्ली. बघू, खरंच आपल्याला वाटतं तसं झालं तर ठरवू काय करायचं ते. चार दिवसांनी तिने चेतनचं हसतमुखाने स्वागत केलं.

चेतन आणि मीना एकत्र काम करत राहिले. मीनाच्या मनातली रुखरुख दिवसेंदिवस वाढत होती. चेतनला पैसे मिळवण्याचा एक नवीन मार्ग मिळाला होता. ’आधार’ साठीच तो झटत असला तरीही मीनाला ’आधार’च्या रहिवाशांचं आयुष्य धोक्यात टाकून इतरांना मिळणारं स्वास्थ्य नको होतं. रोज रोज तोच विषय आणि वाद यामुळे दोघांच्याही नकळत त्याचं बाहेर राहणं, एकमेकांना टाळणं वाढलं. चेतन भारतात, परदेशातल्या कंपनीना पत्र पाठवून औषधांचे प्रयोग करायचे असतील तर ’आधार’च्या स्त्रियांवर करायची तयारी दर्शवित होता. इथल्या असाध्य आजाराने पीडित स्त्रियांच्या आजाराचा खर्च संस्थेच्या आवाक्याबाहेरचा होई खूपवेळा. कितीतरी वेळा डोळ्यादेखत पैशाच्या अभावी रुग्ण गेलेला पाहावा लागे, मुलांचं कुपोषण होतंच. प्रत्येक कंपनीकडून तो पैशाबरोबरच या स्त्रिया, मुलांसाठी इतर सोयीसुविधांची मागणी करे. आता तर संस्थेची रुग्णालयं जिथे जिथे त्यांच्या शाखा असतील त्या गावात काढण्याच्या महत्त्वाकांक्षेने तो झपाटला होता. चेतन आणि ’आधार’ एकमेकांशी जोडले गेले होते. देशात, परदेशात नाव होत चाललं होतं. माहितीपट निघत होते, मुलाखती होत होत्या. मीना चेतनचं यश, लोकांमध्ये मिसळणं पाहत होती. समाजसेवेचेही नशा कशी चढते ते चेतनच्या बरोबरीने प्रत्यक्ष अनुभवत होती; तो प्रसंग घडेपर्यंत.

"मॅडम, लवकर या. चंदूला आकडी आली आहे." ती घाईघाईत चंदूच्या खोलीत गेली. हातपाय वाकडे करून तो जमिनीवर बेशुद्ध पडला होता. संस्थेचे सावंत डॉक्टर त्याच्यावर घाईघाईत उपचार करत होते.
"मिरजेला न्यावं लागेल."
"काय झालं अचानक?"
"औषध जास्त घेतलं असं वाटतं आहे."
"गेले कितीतरी महिने घेतो आहे की चंदू औषध. त्याला ठाऊक नाही किती घ्यायचं ते?"
"हे नवीन होतं. चेतनसाहेबांनी नुकतंच पाठवलेलं. चुकून आधीच्या औषधाच्या प्रमाणाने घेतलं असावं." घाईघाईत खुलासा करून सावंत चंदूला मिरजेला हलवायच्या तयारीला लागले.
"वाचेल ना तो?" रुग्णवाहिकेत ठेवलेल्या चंदूकडे पाहत तिचा जीव तिळतीळ तुटत होता. सावंत काहीच बोलले नाहीत. रुग्णवाहिका गेल्यावर तिने चेतनला फोन लावला,

"धिस इज इट चेतन." मी नाही आता संस्थेत राहू शकत.
"अगं काय झालं तरी काय?" चेतनच्या शांत स्वराने ती भडकलीच.
"तू लाव सगळ्यांची आयुष्य पणाला. प्रयोग म्हणून दे ही नवीन, अजून बाजारात न आलेली औषधं."
"काय झालं ते सांगशील का? आत्तापर्यंत या औषधांची मदतच झाली आहे. कुणीही जीव गमावलेला नाही."
"हो त्याचीच वाट पाहतोय ना आपण? कुणाचा तरी जीव गेला की मग शिकू धडा. चंदूने चुकून जास्त घेतलं आहे तुझं ते नवीन औषधं. त्याला मिरजेला हलवावं लागलंय. आय ॲम टेलिंग यू चेतन, थांबव आता हे."
"मीना, एकदम संस्था सोडण्याच्या गोष्टी नको करूस. आपण काही नुसतेच सहकारी नाही. जीव गुंतला आहे एकमेकांत आपला. आणि मी आत्ता मिरजेच्या जवळच आहे. मी जातो चंदूला पाहायला. त्याला परत घेऊन आलो की निवांत एकमेकांच्या सहवासात काढू. कितीतरी दिवस, महिने भेटत नाही आपण हल्ली. मी मिरजेहून आठ दिवस राहायलाच येतो आहे." काही न बोलता मीनाने फोन ठेवला.

चेतनच्या टेबलावर चिठ्ठी ठेवून ती घराबाहेर, त्या खोलीबाहेर पडली. कुलूप घालताना पुन्हा एकदा आत डोकावून पाहावं असं तिला वाटून गेलं. काही राहायला नको. ती स्वत:शीच हसली. काही राहायला नको...राहण्यासाठी काही असावं तर लागतं. रिकाम्या खोलीसारखंच रिक्त मन.

तिचं विचारात गुरफटलेलं मन जागं झालं ते फेसबुकवर झालेल्या किणकीण आवाजाने. परदेशातली मैत्रीण चौकशी करत होती. तिच्याशी गप्पा मारता मारता तिने चेतनची फेसबुकवरची टाइमलाइन पाहायला सुरुवात केली. जव्हार जवळच्या कुठल्याशा आदिवासी पाड्यात तो काम करत होता. गेली दहा वर्ष. त्याच्याबद्दलच्या माहितीतलं वाक्य वाचून हे आपल्यासाठीच तर नाही ना असं वाटून गेलं तिला.
’समाजसेवेसाठी पैसा लागतो हे खरं पण तो नसला तरीही तुमचे अथक प्रयत्न कितीतरी आयुष्यांना वेगळी वाट दाखवू शकतात...तेच करायचा प्रयत्न." म्हणजे हा बदलला असेल? थांबवलं असेल देशी, परदेशी कंपन्यांकडून औषधं आणि त्यातून मिळणारी मदत घेणं? तिला कळेना. गेल्या कितीतरी वर्षात तिने ’आधार’ बद्दल काहीही ऐकलं नव्हतं. ठरवून. चेतनला सोडताना तिने तिची मनोभूमिका स्पष्टपणे लिहिली होती. कोणतेही प्रयोग चेतन आपल्या आधारासाठी आलेल्या माणसांवर करणार नसेल तरच पुन्हा त्याचं नातं पहिल्यासारखं होण्याची शक्यता व्यक्त करून तिने, तिची आणि त्याची असलेली ती एकमेव खोली सोडली होती. स्वत:च्या पत्त्याचा थांगपत्ताही लागू न देण्याची खबरदारी तिने आजवर घेतली होती. कधी मैत्रिणींकडे राहा, कधी कुठल्या तरी संस्थेत तर कधी नातेवाइकांकडे राहा असं करत तिने आपलं काम चालूच ठेवलं होतं. आता ती लांज्याला स्थिरावली होती. आणि आज जवळजवळ एक तपाने तो तिला भेटायची इच्छा व्यक्त करत होता, कशाला? निदान एकदातरी... म्हणजे हा मन वळवायचा प्रयत्न की खरंच पुलाखालून खूप पाणी वाहून गेल्यानंतरचं हे नुसतंच भेटणं असेल? तिचं मन आपसूक त्याच्याकडे धाव घेऊ लागलं. मधली वर्ष पुसून टाकावीशी वाटायला लागली. चंदूचं काय झालं, त्याने त्याचे मार्ग बदलले का, किती काय काय विचारावं अशी अचानक ऊर्मी दाटून आली तिच्या मनात, त्याचवेळेला एक निरिच्छपणा स्वत:भोवती आवळल्याची भावना दाटून येत होती. लांजा हे तिचं आता घर होतं, विश्व होतं. चेतनकडे परत जायचं तर त्याने किंवा तिने आपापलं कार्यक्षेत्र सोडून कुणा एकाचं स्वीकारायला हवं होतं. की त्यातूनच सापडेल काही मध्य? जमेल? करायची ही तडजोड, शोधायचा काही मार्ग? का आणि कुणी? विचार करता करता तिला स्वत:चंच हसू आलं. उड्या मारत होती ती कल्पनेच्या. कदाचित चेतनचा उद्देश सहज भेट हाच असेल. कितीही पत्ता लागू द्यायचा नाही असं ठरवलं तरी आंतरजालावर अस्तित्वाच्या खुणा उमटतातच. आपलं नाव दिसल्यावर भेटावं असं वाटलं असेल आणि त्यांवरून आपण हे सारे तर्क करतो आहोत.

विचारांच्या नादात तिने चेतनला पत्र लिहिलं. मनातला उलटसुलट गोंधळ त्याच्यापाशी व्यक्त केला. पाठवायचं हे पत्र? गुंतायचं पुन्हा की नुसतंच ठेवायचं मैत्रीचं नातं? एक टिचकी दाबली की तिच्या भावना त्याच्या पत्रपेटीत बंदिस्त झाल्या असत्या. काय करावं? मनातला गोंधळ संपेपर्यंत, संभ्रम दूर होईपर्यंत तिने ते पत्र पाठवायचं नाही असं ठरवलं. पुन्हा पुन्हा ती ते पत्र वाचत राहिली, त्यातले शब्द बदलत राहिली. तशीच बसून राहिली. संभ्रमित!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मला पण अपुर्णच वाटली, पण चांगली आहे कथा आणि त्यामुळेच असेल कदाचित क्रमश: असायला हवी असेही वाटले Happy

जाई, दाद, मुग्धा, नीत्सुश, हर्पेन, तृष्णा, दिनेश सर्वांना धन्यवाद. मीनाने निर्णय न घेतल्याने कथा अपुरी वाटली असावी. पण ती संभ्रमित आहे :-). कदाचित पुढची स्वतंत्र कथा ती जो निर्णय घेते तो का घेते यावर :-).

आवडली.