मुलं - काही नोंदी
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.
अवनी. वय १७.
गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही !
नीरव,वय १९.
लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध !
रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.
सरयू.२१ वर्षे.
११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही.
संकेत आणि संध्या.
१४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले.
विरेन.१४ वर्ष.
अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही.
अक्षता. १५ वर्षं.
गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत.
रीमा. वय ८.
कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण..
अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक.
निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे.
अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही.
राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही.
सारिका वय ११
वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही.
आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही.
केतन. वय १७.
वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत.
संकल्प, वय १२
आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय.
मृण्मयी वय १५.
दहावीत शिकणार्या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे.
सारंग, वय ८
मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" !
आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो.
निनाद, वय ८
६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये."
निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती.
ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही.
अकल्पिता, वय ४
घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही.
मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?
हे वाचून काय लिहावं तेच कळत
हे वाचून काय लिहावं तेच कळत नाहीये.
तूझं कामं खूप महत्वाचं आहे.
मितान, तू इथे ह्या विषयावर
मितान, तू इथे ह्या विषयावर लिहायला सुरूवात केलीस हे खूपच चांगलं झालं. मी कधीची तुझ्या लेखमालेची वाट बघतेय.
प्रत्येक मूल वेगळं, एकाच घटनेचे प्रत्येक मूलाच्या मनात उमटणारे पडसाद पण वेगळे असतील नाही?
तू नुसत्या घटना न लिहीता, त्यावर समुपदेशक म्हणून तुझी थोडी टिपणी (जरी तुला असं वाटलं की तुझी टिपणी काहींना रुचेल काहीना नाही तरीही तू लिहावीस हे माझं मत) , तू योजत असलेले उपाय योजना (अगदी सविस्तर नाही पण निदान तुला ह्यात पालकांचा काय सहभाग अपेक्षित आहे त्याबद्दल)
संवाद तर महत्वाचाच पण मुलांच्या कानाने, मुलांच्या डोळ्याने आपण एक पालक म्हणून त्यांचं जग कसं बघावं? आपली मतं न लादता ती योग्य शब्दात कशी पोहोचवावीत? ह्याबद्दल पण थोडं लिही ना
कविन +१.
कविन +१.
मितान, तुम्ही या मुलांच आणि
मितान, तुम्ही या मुलांच आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन कसे करता ? एक उत्सुकता म्हणुन विचारतो. नाही लिहिलंत तरी चालेल. पण अल्पना म्हणाल्या तसं तुमच काम खरंच खूप महत्वाचं आहे.
सुन्न !!! मितान.. मी काही मदत
सुन्न !!!
मितान.. मी काही मदत करू शकते का गं?
हि इवलुइवलुशी पाखरं कसल्या विचित्र ताणात आहेत. वाचवतच नाहीये..
कविन +१
तुझी टिप्पणी वाचायला आवडेल.
बापरे!
बापरे!
मितान खूप महत्वाचं लिहिता
मितान खूप महत्वाचं लिहिता आहात.
पूर्ण नाही वाचु शकले... भयानक
पूर्ण नाही वाचु शकले... भयानक आहे हे सगळे
एकतर ही मुले गोडुली सोनुली
एकतर ही मुले गोडुली सोनुली पाखरे वयातून कधीच बाहेर पडलेली असतात. टू पेरेन्ट फॅमिलीत पण असे त्रास होतात हे वाचून वाइट वाटले. मितान तुम्ही खूप दिवसांनी आणि नेहमीप्रमाणे उच्च
दर्जाचे लिह्ले आहे. मी एक छान वाक्य वाचले. Let your child be the CEO of his life and you should be the consultant. which I totally agree. Kids these days are facing a very tough life and different choices. one has to really earned their respect.
from a cool mom.
(No subject)
मितान, ह्या केसेस वाचून पोटात
मितान, ह्या केसेस वाचून पोटात तुटलं. ह्यांच्यात सुधारणा होत जातील तश्या इथे शक्य असेल तर कळवशील का? पॉझिटिव्ह चेंजेस वाचून आम्हालाही बरं वाटेल.
"बालक पालक" आठवला.
बापरे मितान मितान, ह्या
बापरे मितान
मितान, ह्या केसेस वाचून पोटात तुटलं. ह्यांच्यात
सुधारणा होत जातील तश्या इथे शक्य असेल तर
कळवशील का? पॉझिटिव्ह चेंजेस वाचून
आम्हालाही बरं वाटेल.>>>>+ 11111
बापरे! इतकं काही होतं असेल
बापरे! इतकं काही होतं असेल चिमुकल्या वयात??
कविन +१
मितान, खूप महत्वाचं लिहीत
मितान, खूप महत्वाचं लिहीत आहेस.
इकडे शाळेत समुपदेशक असतात. ते मुलांशी त्यांच्या नकळत संवाद साधत असतात. जराही बदल वाटला तर पालकांना कळवतात.
मी ऐकले आहे की भारतातही हल्ली असे समुपदेशक असतात. त्यांच्या लक्षात आल्या होत्या का वरच्या समस्या?.
कवितासारखेच मलाही वाटते. तू या समस्यांवर काय केले पाहिजे, आई वडीलांची / घरातल्यांची भूमिका काय असली पाहिजे वगैरे टिप्पणी करशील का?
तू नुसत्या घटना न लिहीता,
तू नुसत्या घटना न लिहीता, त्यावर समुपदेशक म्हणून तुझी थोडी टिपणी (जरी तुला असं वाटलं की तुझी टिपणी काहींना रुचेल काहीना नाही तरीही तू लिहावीस हे माझं मत) , तू योजत असलेले उपाय योजना (अगदी सविस्तर नाही पण निदान तुला ह्यात पालकांचा काय सहभाग अपेक्षित आहे त्याबद्दल) >>>> सहमत.
खरोखर, वाचवत नाहीये इतक्या विचित्र कहाण्या आहेत या ....
(No subject)
मितान, वाचुन कस् तरिच झाल !
मितान, वाचुन कस् तरिच झाल ! पॉझिटिव्ह चेंजेस वाचायला आवडतिल...
. तू या समस्यांवर काय केले
. तू या समस्यांवर काय केले पाहिजे, आई वडीलांची / घरातल्यांची भूमिका काय असली पाहिजे वगैरे टिप्पणी करशील का? >> +११११११११११११११११११११११११
तू नुसत्या घटना न लिहीता,
तू नुसत्या घटना न लिहीता, त्यावर समुपदेशक म्हणून तुझी थोडी टिपणी (जरी तुला असं वाटलं की तुझी टिपणी काहींना रुचेल काहीना नाही तरीही तू लिहावीस हे माझं मत) , तू योजत असलेले उपाय योजना (अगदी सविस्तर नाही पण निदान तुला ह्यात पालकांचा काय सहभाग अपेक्षित आहे त्याबद्दल)>>> हो मीतान.
लेक १२ची आहे. हे असे काही वाचून भीतीच वाटते
लेक १३ ची आहे. हे असे काही
लेक १३ ची आहे. हे असे काही वाचून भीतीच वाटते +१
बापरे ! मी घाबरवलं का
बापरे ! मी घाबरवलं का माबोकरांना ?
ही प्रत्येक केस लिहायची म्हटली तर एकेक स्वतंत्र लेख होइल.
कविन, पियुपरी, शशांक मी जमेल तसे लिहायचा प्रयत्न करेन. भ्रमर, अदिती मी स्कूल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करते. त्या भूमिकेतूनच निरीक्षणं लिहिली आहेत.
पालकांचा मुलांशी असलेला संवाद, मैत्रीपूर्ण नातं, आपल्या मर्यादांची योग्य जाणीव आणि सशक्त ( सर्वार्थाने ) सपोर्ट ग्रुप असेल तर बालपण खरोखर आनंदी असतं. यापैकी एखादाही दुवा कच्चा असेल तर विसंवाद निर्माण होतोच.
मुळात मुलांच्या भावनिक बौद्धिक गरजा माहीतच नसणे ही आपल्या पालकांची मुख्य समस्या आहे. त्या गरजांची जाणीव करून देणं, ते ही त्यांना न दुखावता ( बहुतेक वेळा ) हे प्रत्येक केस बाबत करावं लागतं. त्याबद्दल पुढे कधीतरी लिहीन.
आपल्या सर्वांच्या संवेदनशील प्रतिसादांबद्दल धन्यवाद
मुळात मुलांच्या भावनिक
मुळात मुलांच्या भावनिक बौद्धिक गरजा माहीतच नसणे ही आपल्या पालकांची मुख्य समस्या आहे.
अगदी खरे .
मलापण काही केसेस कश्या सॉल्व केल्या ते वाचायला आवडेल.
तू या समस्यांवर काय केले
तू या समस्यांवर काय केले पाहिजे, आई वडीलांची / घरातल्यांची भूमिका काय असली पाहिजे वगैरे टिप्पणी करशील का?>>+++१११
मुलगा १० वर्षाचा आहे . त्या दिवशी आभ्यासासाठी प्रेमाने एकला नाहि तर मारले तर रागवला ..आनि बोलतो हाताची नस कुठे आहे ? असे विचारायला लागला ..मि तर घाबरलेच त्याच्या या वाक्याने.....
या समस्यांच्या उपाय
या समस्यांच्या उपाय योजनांबद्दल, समुपदेशनाबद्दल लिहिणे कठिण वाटते. त्याला कारणं आहेत.
आता इथे थांबते. वेळ मिळाला की नक्की लिहिणार आहे.
प्रत्येक वेळी सुचवलेला उपाय हा त्यावेळच्या परिस्थितीवर, पालकांच्या प्रतिसाद देण्याच्या पद्धतीवर, त्यांच्या आर्थिक, भावनिक, बौद्धिक क्षमतेनुसार सुचवलेला असतो. इथे सामान्यीकरण करून लिहिले तर अनेकांना ते अशास्त्रीय किंवा असमाधानकारक वाटू शकते.
शिवाय आम्ही समूपदेशक कधीही रेडीमेड सोल्युशन्स देत नाही. चांगला समूपदेशक तोच जो निर्णय घ्यायला, उपाय शोधायला मदत करेल. त्यामुळे बर्याच केसेस मध्ये पालकांना मुलांची नेमकी समस्या समजावून सांगितली की तेच उपाय सुचवतात. बहुतेक केसेस मध्ये पालक पूर्ण सहकार्य करणारे असतात. काही केसेसमध्ये दीर्घकालीन थेरपी ( प्ले थेरपी, बिहेविअरल थेरपी, स्टोरी टेलींग, आर्ट आणि क्राफ्टचा उपयोग ) घेण्याची गरज असते. त्यासाठी लागणारा पेशन्स पालकांमध्ये नसतो. साधी सुचवलेली दिनचर्या, डायरी किंवा निरीक्षणांची नोंद या गोष्टी बरेचदा पालकांना महत्वाच्या वाटत नाहीत. वर्षानुवर्ष मुरलेली समस्या दोन तीन सेशन्समध्ये संपावी अशा अवास्तव अपेक्षाही असतात. असे पालक मग एकाच उपचारपद्धतीवर ठाम न राहाता डॉक्टर्स, समुपदेशक, थेरपिस्ट, शाळा, शिकवण्या बदलत राहतात. कोणत्याही उपायाला पुरेसा वेळ न दिल्याने मुलं म्हणजे अक्षरशः गिनिपिग होतात !
मला वाटतं दुसर्या लेखाची सुरुवात झालिये
मितान, घाबरवल नाहीस ग पण
मितान, घाबरवल नाहीस ग
पण लहानपणी कसं वाटत ना की वाईट गोष्टी फक्त लोकांच्या घरी होतात. आपल्याकडे कस सगळ छान छान होणार आहे. मोठ झाल्यावर, जग बघायला लागल्यावर समजते की असे नसते. हे आपल्याला सुद्धा फेस करावी लागू शकते. आणि मग भीती वाटते.
मितान, लिहित राहा. या
मितान, लिहित राहा. या चिमुकल्यांना कश्या परिस्थितीतून जावं लागतंय हे वाचणंच खूप अवघड जातंय.
पालकांनी मुलांशी कश्या प्रकारे संवाद साधावा, त्यांना लहानपणापासून कशा प्रकारे बोलते करावे, कसे नाते प्रस्थापित केले असता मुले मोकळी होतात याबद्दल तुझे अनुभव, निरीक्षण, मत जाणून घ्यायला आवडेल. कारण इथे मुले ही त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचे, माणसांचे एक प्रतिबिंब आहेत. ते वातावरण बदलले तर या मुलांमध्येही नक्की फरक घडून येईल असे वाटते.
धस्स झालं वाचून! पुढच्या
धस्स झालं वाचून!
पुढच्या लेखाची वाट बघते आहे!
मितान... एक एक केस वाचून
मितान... एक एक केस वाचून सुन्न झालं..
संकेत आणि संध्या.
१४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले. <<<< कोणता तो क्लास?
मितान... एक एक केस वाचून
मितान... एक एक केस वाचून सुन्न झालं.. >> +१
मितान एकेका केसबद्दल न लिहिता, अकु म्हणतेय तसे जनरल लिहिलेस तर उत्तम होईल.
फार वाईट वाटले वाचून यांच्या
फार वाईट वाटले वाचून
यांच्या बाबतीत निदान काउन्सेलर ला भेटण्याची तरी स्टेज आली . कित्येक वेळा अवेअरनेस नसणे, अज्ञान, निष्काळजीपणाने त्या मुलांनाच बिघडलेली इ. म्हणून लेबले लागतात अन अशी मुलं अजून सफर होतात ...फार डिप्रेसिंग आहे हे.
Pages