हे असलच काहीतरी वाईट ऐकायला मिळणार हे माहीत असूनही प्रत्यक्षात ऐकल्यावर, आपल्या मनाची तयारी किती नव्हती, ते सुनीलच्या लक्षात आलं. त्याला इतकं गुदमरल्यासारखं झालं, की विस्फारलेल्या डोळ्यांनी तोंडावर हात घेऊन, बाजूलाच बसलेल्या ॠताला तिथेच सोडून तो कन्सल्टिंग रूमच्या मागच्या दाराने वेगाने बाहेर पडला. बाल्कनीत कठड्याला धरून उभा राहिला.
दोन दीर्घ श्वास घेताच त्याला आजूबाजूच्या जगाची जाग आली आणि ॠता अजून आतच आहे, तिला आत्ता आपली खरी गरज आहे, असे कसे आपण बाहेर पडलो... हे सगळं आठवून तो तिरासारखा परत आत आला. एव्हाना डॉक्टर मिनू तिच्या जवळ येऊन उभी राहिली होती आणि अजूनही अचळ, स्तब्ध ऋताच्या पाठीवरून हात फिरवीत होती. तिच्या इतर पेशंट्स सारखी ही आता रडली तर बरं..... हे मिनूच्या चेहर्यावर दिसत होतं.
सुनील आत आलेला बघून ती बाजूला झाली. सुनीलने ॠताच्या खांद्यावर हात ठेवत तिला आधार द्यायचा प्रयत्नं केला. जणु काही जळता अंगार अंगावर टाकल्यासारखी ॠता ताडकन उठली आणि दरवाज्याकडे निघाली.
’ॠता, वेट.... ॠता, तुला हा निर्णय लवकरात लवकर...... म्हणजे उद्यापर्यंत तरी घ्यायलाच...’, डॉ. मिनूने तिला समजवायचा प्रयत्नं केला.
’सुनील, लेट्स गो. चल...’, ॠता दरवाजा बाहेर पडलीही.
’मि. सुनील, प्लीज तिला समजवा... मी काऊन्सिलिंगसाठी क्लिनिकमधून कुणालातरी घरी पाठवते... बट... यू नो...’, डॉ. मिनूने सुनीलचा आधार घेतला.
अर्धवट दारात आणि अर्धवट बाहेर पडत सुनीलने, ’मी फोन करतो’, एव्हढच सांगितलं. एव्हाना ॠता लिफ़्टमधे शिरलीही. धाड धाड पायर्या उतरत तो खाली पोचला तेव्हा रिसेप्शनमधल्या खांबाचा आधार घेऊन उभी दिसली ॠता.
इतकी कोसळलेली दिसली की, पुढे होऊन आधार द्यायचंही सुचेना सुनीलला. रुमालाने चेहरा पुसत, कसातरी धीर गोळा करीत तो पुढे आला.
’ऋता, पाणी आणू?’, सुनीलनं विचारलं. तिनं मान हलवली तशी तुढे म्हणाला, ’ओके... मग चल. घरी जाऊया आधी. घरी जाऊन बोलू’, तिच्या कोपराला धरून तो तिला चालवू गेला. त्याचा आधार न घेता ऋता झपझप चालत गाडीत जाऊन बसली. एक शब्दं न बोलता अर्ध्या तासाचा प्रवास झाला.
घरी आले तर..... घरातल्या कोणत्याच खोलीत ॠताला क्षणभरही थांबवेना. त्यानं काढलेले तिचे फोटो, मोठ्ठे करून लावलेले इथे तिथे...... सर्वत्रं तिच्याच रूपाचे दिमाखदार पैलू, आणि त्याचं तिच्या रूपाविषयीचा अभिमान, प्रेम, असोशी... सुनीलनं आपली सारी कला पणाला लावून बंदिस्तं करून ठेवलेली तिच्या शरिराची विविध लेणी, छायाचित्रं....
भिरभिरल्यासारखी ती बेडरूममध्ये गेली आणि समोर ठेवलेला अजून अपूर्णं तिचा अर्ध पुतळा दिसला.
अजून घडलं काहीच नव्हतं... आकार कशालाच नव्हता, वळसे, वेलांट्या, उंचवटे... काहीच नव्हतं.... आणि म्हणूनच इतका भेसूर वाटला तिला, तो.
मागे, अगदी जवळ येऊन उभ्या राहिलेल्या सुनीलच्या श्वासाची मानेला लागलेली चाहूल ह्यावेळी तिला वणव्यासारखी भाजून गेली... तिथून धावत जाऊन ती घरामागल्या पडवीतल्या झोपाळ्यावर पाय पोटाशी घेऊन कुरवंडून पडली.
अगदी लहानपणी अशी झोपली की पपा येऊन जवळ घ्यायचे, विचारायचे काय झालं, बच्चूला? ..... अन ती उठायची तेव्हा सगळं तिच्या मनासारखं झालेलं असायचं....
जणु काही तशीच जादूची कांडी अख्ख्या जगावरून फिरणारय आणि.. आणि आपण उठू तेव्हा सगळं पूर्वी सारखं नीट, स्वस्थं, आनंदी असणारय. आपण उठू तेव्हा डाव्या स्तनात वस्तीला आलेला हा अनिष्टं रोग नसेल.... रोग जगातच नसेल...
****************************************************
सैरभैर झालेल्या सुनीलला काय करावं कळेना. म्हणजे आत्ता काय करावं? आत्ता?
फार पुढचा विचार नाहीच. हे सगळं आपण दोघे कसं निभावणार आहोत वगैरे, पैलतीरावरचे प्रश्नं वाटतायत. उद्या कसा उजाडेल ते ही माहीत नाही.
आत्ता.... आत्ता काय केलेलं ॠताला बरं वाटेल? चालेल?
काही बोलू का? काय बोलू?
मी जवळ गेलेलं चालेल?
अशी स्वत:भोवती कुंपण घालून बसलीये... मी जवळ घेऊ का तिला?
नको. मगाशी कोपर धरलेलंही चाललं नाही... कोण मदत करेल आपल्याला? दोघांनाही? तिला तर मदत लागेलच पण मलाही लागेल..... तिला मदत करायला....
ते नंतर.... आत्ता, आत्ता काय करू?
ॠताचं तिच्या पप्पांशी किती सख्य होतं हे माहीत असल्यानं त्याने पप्पांना कसतरी कळवलं. पप्पांचं तिथेच मटकन खुर्चीवर बसणं आणि मग भरलेल्या आवाजात त्यांच्या बछड्याची चौकशी.... सुनीलला कळलं की, आपल्याला इथे मदत मिळणार नाहीये...
अधिक हतबल झाला तो.
शेवटी धीर करून त्यानं झोपाळ्याजवळ जाऊन हळू आवाजात म्हटलं, ’ऋता, मी... मी ना, खायला बनवतो काहीतरी. तू झोप’.
कसतरी काहीतरी जुजबी जेवण बनवलं आणि तिला उठवण्यासाठी गेला आणि चित्रं झाला.
ॠता उठली होती. झोपाळ्याच्या कडीला डोकं टेकून क्लान्त मुद्रेनं समोर बघत होती. मागे प्रकाशणार्या बागेतल्या दिव्यानं चेहर्याच्या भोवतीची कुरळी महिरप सोनेरी केली होती, एका बाजूला पाय घेऊन तिचं रेलून बसणं त्याला खुळावून गेलं. इतर वेळी चटकन पॅड घेऊन त्यानं तिच्या ह्या रूपाला बंदिस्तं केली असती स्केचमध्ये.
आत्ता मात्रं त्या चेहर्यावरचे.... हरवण्याच्या सतत प्रयत्नात ते दु:खी, विद्ध डोळे त्याला बघवेना. स्वत:च्याही नकळत आवेगाने तो तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिला मिठीत गोळा केली.
धडपड करून विखुरलेले आपलेच तुकडे अधिक विखरत ॠता घशातल्या घशात घुसमटत म्हणाली.... ’डोन्ट, सुनील डोन्ट.’
’का? व्हाय नॉट? मी कुणी नव्हे तुझा? हे एकटीनं भोगण्यासारखं नाही. यू कान्ट गो थ्रू धिस अलोन, ऋता....’, दुखर्या तरी समजावणीच्या सुरात सुनील तिला सांगू गेला.
’सवय कर.’, ताडकन तोडणार्या आवाजात ॠता म्हणाली. ॠताचं हे रूप त्याला नवीन होतं.
’गेट युज्ड टू धिस, सुनील. तुला... तुला आवडते तशी.... हवी तशी गोल, घडीव... नसणारय मी. तुझ्या त्या अर्धपुतळ्यासारखी..... ओबडधोबड... खडबडीत, आकारहीन.... कुरूप... ’ धक्का बसून एकटक तिच्याकडे बघत ऐकून घेणार्या सुनीलकडे बघत ॠतानं शेवटचा घाव घातला..... दोघांवरही.
’तसाच ठेव तो... तो बस्ट... काही काम करायला नकोय त्यावर..... फक्तं नाव बदल त्याचं.... ’टोटल मॅस्टेक्टमी’!... पहिलं प्राईझ मिळेल तुला....
प्रत्येक गोष्टं आर्टिस्टिक असते रे तुझी.... मी... मी त्यात येत नाही.... आता.’, स्वत:चा आणि त्याचाही असा चक्काचूर करून रक्तबंबाळ झाल्यासारखी ॠता तिथून धावत आत गेली.
बधीर होऊन तिथेच बसला सुनील. फक्तं मधे कधीतरी, ’पपांकडे जातेय... मला... मी फोन.. मला...’ असलच काहीतरी खूप दुरून ऐकू आल्यासारखं वाटलं. उठण्याचंही भान राहिलं नाही त्याला.
****************************************************
किती वेळ बसून होता असा, कुणास ठाऊक. कसल्यातरी झुंजात लढून जखमी झाल्या सारखा झोकांड्या खात तो घरात आला. सगळीकडे तिच्याच खाणा-खुणा. तिने आणि त्याने मिळून सजवलेलं घर. त्यानं कधी आग्रहाने बसवून तर कधी तिच्याही नकळत टिपलेले तिच्या सौदर्याचे ठसे.... किती किती रूपात, ठाईठाई.
काल सकाळी ती ओले केस उलटे करून झटकताना काढलेलं ते स्केच..... ते वरचंच पान फडफडतय. त्याच्या मागचं परवाचं स्केच... तिनच लाजून फाडून टाकलेलं.
तो फोटो... नुस्त्या काळ्या-पांढऱ्या आणि केशरी रंगाच्या छटांत डेव्हलप केलेला? पाठमोरी ऋता, भगव्या, पिवळ्या पिसांचा फुलोरा कसातरी आवरत सोनेरी सळसळ करीत पाण्यात शिरणारा सूर्य ती बघतेय का सूर्य तिला.... कळत नाहीये.... अंगांगाचे चढाव, उतार, केसरियाने माखलेले... आणि फोटोच्या उजव्या कोपर्यात उडून चाललेली तिची सफेद ओढणी.... तिच्यापासून कधीच अलग झालेली...
आणि... हे एक ब्लॅक ऍंड व्हाईट, त्याचं सगळ्यात सगळ्यात आवडतं. डोक्यावरून स्कार्फ, हातात पूजेची थाळी, त्यात निरांजन... घाटाच्या पायर्या चढून येताना, मागे गंगेचा घाट.... त्यात सोडलेल्या पणत्यांच्या वराती.... आणि एक इथे हिच्याही डोळ्यातल्या पाण्यात....
कुणाचं सहजासहजी लक्षं जाणार नाही असं.... पण लक्षं गेलच तर माणूस थबकेल असं, दरवाज्या आडून डोकावून बघत डोळा मारणाऱ्या ॠताचा एक अल्लड, मोहक फोटो... चक्क सिलिंगला.... त्या बाथरूममधून बाहेर येणारा प्रत्येकजण दोन पावलं मागे जाऊन वेडपटासारखा छताकडे मान वाकडी करून बघतोच बघतो...... कितीही वैतागात, घाईत असला तरी, उरलेला दिवस प्रसन्नं करणार्या त्या खळीदार हास्याचा शिडकावा....
अतिशय क्लेशाने सुनीलने डोळे मिटून घेतले. काय झालं हे? कोणाची दृष्टं लागली? ॠताची आई होती तोपर्यंत तिच्या प्रेत्येक फोटो शूट नंतर, ऍड प्रमोशन्सच्या समारंभांनंतर दृष्टं काढून टाकायची....
दृष्टं लागेल अशीच... ॠता!
गंमत म्हणून मैत्रिणींबरोबर फोटो दिले आणि निवडली गेलीही. आता एकच, हे अजून एकच असं करता करता अनेक देशी-विदेशी ऍड एजन्सीजनी तिचा मोहक, बोलका चेहरा, सुरेख अंगप्रत्यंग वापरलं.
सुनीलच्या समोर आली तेव्हा एक नावाजलेली मॉडेल झाली होती.
त्याला स्वच्छ आठवला तो दिवस, ज्या दिवशी.... स्त्रीचं शरीर कॅमेर्यातल्या नजरेच्या प्रश्नांना इतकी मधाळ बोली उत्तरू शकतं.... तो वेडा झाला. आत्ता पर्यंत इतक्या शरिरांची अगदी वाट्टेल तशी चित्रं, छायाचित्रं काढली. ह्या व्यवसायात कोणत्याही क्षणी अंगावरचं वस्त्रं फेकून देऊन हवी ती पोझ देणारे देह बघितले. बघायचं काही शिल्लक नाही ह्या भावनेने तो त्या फोटो शूटला गेला होता.
रेखीव अंगप्रत्यंग, उत्कृष्ठ सौष्ठव, नितळ कांती.... काही नवीन नाही. फोटो दाराला ओठंगून उभ्या तिच्या पाठमोर्या आकृतीचा होता.... चेहरा बघायची गरजही नव्हती. नेहमीप्रमाणे त्याने सिच्युएशन, त्याला आवश्यक पोझ वगैरे समजावून सांगितली. मॉडेलसना हे माहीत असतं... मग फोटोग्राफरच्या बोलण्याकडे फारसं लक्षही नसतं...
हा सुनीलचा अनुभव खोटा ठरला. ॠताने एक-दोन प्रश्नं विचारले, त्याला दाराजवळ उभं करून लायटिंगचा स्वत: अंदाज घेतला आणि नुस्त्या मानेने आपण तयार असल्याचं सागितलं. एका तलम पांढर्या वस्त्राचा डोक्यावरून घेतलेला पदर मागे सांडला होता.
त्यानं सिग्नल देताच शटर उघडून तिची आकृती कॅमेरात बंदिस्तं होण्याच्या एक क्षण आधी तिनं घेतलेला अर्धवट श्वास.... त्यानं किंचित उचलले गेलेले खांदे... फक्तं तेव्हढ्याच हालचालीने..... त्या शुभ्र वस्त्राने तिच्या कटीप्रदेशाशी लगट करण्याची केलेला प्रयत्नं....
हे सगळं सुनीलनं निमिषार्धात वेचलं आणि त्याच्या कॅमेर्याने एकामागोमाग एक अनेक चित्रं घेतली.
हे आपण आत्ता काय बघितलं... त्याला काही सुचेना. छायाचित्रकारासाठीचा तो विलक्षण क्षण मनात साठवून घेत, डोक्यात बंदिस्तं करण्यासाठी त्यानं त्या दृश्याकडे पाठ फिरवली आणि डोक्यावर हात घेऊन छताकडे बघत उभा राहिला.
’कुछ गलत हुआ? क्या हुआ?’, ॠता आता ते वस्त्रं अंगाला लपेटून घेत सामोरी झाली होती.
जे झालं तो एक योगायोग की ही मुलगी खरच आपल्या शरिराचा असा वापर करू शकते... तिची परवानगी घेऊन मग तिची अनेक छायाचित्र घेतली त्याने. प्रत्येकवेळी तिची देहबोली वेगवेगळ्या भाषेत त्याच्या कॅमेर्याला, नजरेला प्रतिसाद देत राहिली. चेहर्यासारखं शरिराच्या चढाव-उतारांतून, क्षणिक सुक्ष्मं हालचाल, थरथर... ह्यातून भावना व्यक्तं करू शकत असे ती.
कधी मुग्धं, कधी एखाद्या झर्यासारखं उत्फुल्लं, तर कधी संकोचून आतल्याआत समेटून घेणारं तिचं अंगांग.... त्याला बंदिस्तं करू शकणारे त्याच्या कॅमेर्याचे डोळे... ह्यापलिकडे गेले दोघे.
आधी ठरवून एकत्रं राहू लागले.... नकळत एकमेकांचे झाले.
****************************************************
एकदम थरारून उठला सुनील.... काय झालं हे?
आपला-तिचा व्यवसाय, फक्तं सुंदर, रेखीव, सजलेल्या चेहर्याच्या, देहांच्या जत्रेत आपलं कायम वावरणं...
ह्यातून आता तिचं हद्दपार होणं... ह्यानं बावरलीये ऋता. जे आजवर खरं मानलं, सजवत, कुरवाळत राहिलो, भोगत राहिलो... तीच एकमेव गोष्टं, सुख... आयुष्य निर्दय शांतपणे परत मागतय...
’देतेस की जाऊ?’ ह्याच एका बोलीवर!
कसं समजवायचं तिला? कोणत्या शब्दांत?
देहाच्या माध्यमातून एकमेकां ची ओळख पटली... त्यातून आनंदाची कारंजी फुलवत जगलो आत्तापर्यंत.
पण आत्ता मनाला जाणवणारं देहाच्या पलिकडचं आपलं तिच्याशी नातं.... ते... ते कधी व्यक्तं केलं आपण?
देहांच्या वळसे, वेलांट्यांच्या गुंत्यात मनाचे न दिसणारे, फक्तं जाणवणारे गहिरे रंग.... भरले तर खरं पण, आत्ता शब्दात मांडता येत नाहीत असं का व्हावं? मनाची बोली हरवली की काय? बोललोच नाही तर भाषाही परकी होते... तसं काहिसं?
कसे व्यक्तं झालो एकमेकांना? असेच? देहबोलीतच? होयही आणि नाहीही....
नक्की कसं व्यक्तं झालं म्हणजे त्याला प्रेम म्हणायचं? बोलून दाखवता न येणारं... हे तुटणं, ही घुसमट... ही नि:शब्दं बोली नाही का?...
पण... दूर जाणार्याला साद न घालता परत कसं बोलवायचं?
कसं दाखवू हिला... ह्या शरीराच्या गरजांच्या पलिकडे मनाच्या अंगणात रोवलेलं ते झाड..... तिच्याही अन माझ्याही. तिथं आलेली झुळुक गंध इथवर घेऊन येते, तिथं तुटलेली मुळं इथे भळभळतात, तिथे हसलेली माती इथे झरा होऊन झुळझुळते... हा अनुभव तिचाही आहेच.... मला माहीत आहे, तिचाही आहे... पण आजवर जी भाषा बोललोच नाही, त्या शब्दांत कसं समजाऊ तिला.... की... की तू त्या सगळ्यापलिकडे माझी आहेस?
****************************************************
पहाटेची, दीड-दोनची वेळ असावी.... पपांच घर चार बिल्डिंगा सोडूनच असलं तरी स्वत: तिथे जाण्याचा त्याला धीर होईना. आपल्याला बघून बिथरून अजून कुठे निघून गेली तर काय?
सुनील शेवटी धीर करून उठला आणि त्याने नंबर फिरवला.
त्या बाजूला रिंग वाजत राहिली. सुनीलला पोटात खड्डा पडणं म्हणजे काय ते कळलं. अन... फोन उचललाही रूताने.
त्याने घाबरतच म्हटलं, ’हॅलो, ॠता,...’
’...’
तिथून फक्तं श्वासाचा आवाज येत राहिला. सुनीलच्या काळजाचं पाणी झालं.
’रितू... रितू... ऐक.... नुस्तं ऐकून घे... मी काय म्हणतोय’, अगदी अगदी स्वत:शी बोलताना ॠतासाठी जी हाक त्याच्या मनाच्या दारात यायची ती हाक आत्ताही आली.
’हे जे काय चाललय.... मी.... मला कल्पना आहे... पूर्ण कल्पना....’,आपले शब्दं किती पोकळ आहेत त्याचं त्यालाच जाणवलं.
’....थांब, वेट अ मिनट.... तशीच थांब’, पुढचे शब्दं न फुटता सुनीलला घुसमटल्यासारखं इतकं झालं, आजूबाजूची हवा जड झाली..... स्वत:ला सावरण्यासाठी त्यानं फोन कानाचा काढून घट्ट उराशी धरला....
त्याच्या हृदयाची धडधड ॠताला छातीवर डोकं टेकून ऐकावी तशी ऐकू येत होती... फक्तं यावेळी, इतकी जोरात की, छाती फोडून बाहेर येईल त्याचं काळीज...
...तरीही एक शब्दं न बोलता ती तिथेच तशीच बसून राहिली, फोन कानाला लावून... जणू त्या दोघांमधे मिळून ती एकमेव जिवंतपणाची खूण तिच्या मनाच्या कुंपणाने कवाडाशीच थांबवली.
’... सॉरी. रितू, ऐकतेयस ना?
रितू, चुकलो.... तू... तू ज्यातून जातेयस, त्याची मला जराही कल्पना येणं शक्यं नाही... मी अंदाजही करू शकत नाही. स्त्रीला तिच्या देहाची जाणीव म्हणजे नक्की कशाची जाणीव... ते फक्तं एक स्त्रीच जाणू शकेल, कदाचित...
टोटल मॅस्टेक्टमी... ह्याचा...’, नुस्त्या त्या शब्दांच्या उच्चाराने सुनीलच्या मनात काहूर उठलं आणि गळ्यात आवंढा आला. आपली ही अवस्था तर ऋताचं काय होत असेल....
त्या बाजूला गळ्यात आलेला आवंढा टाळीत घेतलेला खोल खोल श्वास त्याला स्पष्टं ऐकू आला.
’..ह्याचा मेडिकली अर्थ काय ते कुणीही सांगू शकेल... बट.... बट, व्हॉट इट मीन्स टू यू... ह्याची तुझ्या मनातली पडझड, तुझी घालमेल, तुझ्या स्त्रीत्वावर बसलेला घाव, होणारी अपूर्णतेची जाणीव.... हे दुसरं कुणी कुणी अगदी शब्दात मांडणं सोड, पण मनातल्या मनातही नाही कल्पना करू शकणार... त्याचा थांगही लागणं शक्य नाही दुसर्या कुणालाही.... रितू, मलाही नाही.’
’... रितू, मी काय सांगतोय ते नीट ऐक. राणी, तुझ्या अनेक रूपांना मी अनेक तर्हांनी बंदिस्तं केलय. जसं जमेल तसं तुझं शरीर वाचत राहिलो, जसं जमेल तसं चितारत राहिलो....
तुझ्या शरीराचा एकेक कण मी रांगोळीच्या एकेका कणासारखा वेगळा बघू शकतो.... ह्याचा अर्थ मला तुझं शरीर कळलय असं होत नाही... त्यात असा बदल... मला कळणच शक्यं नाही, तू काय विचार करतेयस.... तुला काय वाटतय.... कबूल.... कबूल...
पण... पण.... तुझी माझी बोली आता देहापुरती राहिलेली नाही.... मला नीट शब्दांत सांगता येत नाहिये.... समजून घे’
सुनील श्वास घ्यायला थांबला.
’हे असलं बोलायची वेळच आली नाही कधी आपल्यावर. बोलत होतो ते, बोलत होतो त्या भाषेत पुरत होतं... ॠता, जेव्हा जेव्हा मी शरीराने तुझ्या पासून दूर होतो ना... तेव्हा तेव्हा मनाने तुझ्या आसपास वावरायचा, कुठे असशील?.... काय करत असशील आत्ता?
नाही.... तसलं काहीही मनात आणू नकोस.... तुझे विभ्रम, तुझ्या शृंगारलीला, आपल्या बेभान रात्री.... ह्यातलं काही काही आठवत नाही... आठवतं तुझं नुस्तं आसपास वावरणं..... शरीरानेच नाही, वेडे.... असंच.... नुस्तच.... झुळकीसारखं... किंवा तुझ्या पूजेनंतरच्या त्या मॅड वासाच्या उदबत्तीसारखं.....’
’....काहीही आठवतं मग.... सकाळी तुझं दात घासत तोंडात पेस्ट असताना बोबडं बोलत काहीतरी सांगत रहाणं, कधीतरी सकाळी मी जागा झालो की, तू जागीच आहेस आणि माझ्याचकडे बघतेयस हे लक्षात येणं, गंमत म्हणून माझ्या मोबाईलचे रिंगटोन माझ्या नकळत बदलून ठेवणं, कॅरम खेळताना एक डोळा बारीक करून, एका बाजूने जीभ बाहेर काढीत नेम धरणं, गुणगुणत गाडी चालवणं, क्रिकेटच्या मॅचच्या दिवसात रिमोट लपवून तो हरवल्याचा नेहमीचा बहाणा, कधीतरी अंगात आल्यासारखी घरातली साफसफाई..... रितू, हे असलंच सगळं काय काय वेडपट आठवून बेचैन, हळवा व्हायचो मी.
.... आणि जाणवलं ते एकच की.... इतकं तुझं असणं भासायचं की...., की वाटायचं की... की तू बाहेर कुठे नाहीसच... इथेच माझ्याकडे... सारखी माझ्याजवळ... नव्हे माझ्यातच आहेस.
ऋता.... ऋता, मी काय म्हणतोय ते नीट ऐक..... मी... मी विचारतोय तुला, माझ्याशी लग्न करशील? माझी... माझी होशील?... पाहिजेतर आत्ता उत्तर देऊ....’
दुसर्या बाजूला हुंदका फुटलेला सुनीलने ऐकला.... आणि... आणि फोन कट केलेलाही....
ताण असह्य होऊन रेलून उभा होता त्या भिंतीला टेकून घसरत सुनील खाली बसला.
आपण भावनेच्या भरात काय केलं? हे केलय ते बरोबर की चूक, आता त्याचे काय काय परिणाम... हे सगळं डोक्यात, मनात घोंघावत होतच.... पण जणू काही दुसर्याच कुणाच्या तरी आयुष्याचा चालेला मूव्ही आपण बघतोय.... इतका अलिप्त, बधीर झाला तो.
आणि तरीही मन घोंघावतच राहिलं प्रश्नांच्या चक्रीवादळात....
काय केलं हे आपण? बरोबर का चूक? ही वेळ होती का, प्रपोज करण्याची? आपल्यामते ॠताची आयुष्यभरासाठीची साथ मागतोय आपण, ह्या आजारपणात आणि नंतरही. पण तिला हे काहीतरी अनिष्टं वाटलं का? तिची कीव येऊन घातलेली भीक वगैरे?
नाही. ती तसा विचार करणार नाही. पण आत्ता हल्लक झालेलं तिचं मन काहीही विचार करू शकतं. श्शी... भावनेच्या भरात असे कसे विचार न करता वागलो आपण?
ॠताsssss... रितूssss.... जोरात ओरडून हाक मारावी, ती येणार नाहीये हे कळून मग कुणाच्यातरी कुशीत शिरून लहान होऊन, अगदी हमसून हमसून रडावं असं त्याला वाटू लागलं.
काय करू? कसं सांगू तुला? कोणत्या शब्दांत पटवून देऊ? तुझं-माझं असं तुकड्या तुकड्यात जगणं नकोय मला. आत्ता याक्षणी माझ्या असण्याइतकं स्वच्छ जाणवणारं असं... फक्तं तुझं इथे नसणं आहे....
जे काय वाट्याला येईल ते आपल्यात असूदे, दोघं मिळून भोगूया... तुझ्या-माझ्या वाट्याचं एकच काय ते... काय वाट्टेल ते येऊदे मग.... मी डरत नाही कशालाच.
आत्ता याक्षणी किती एकटा झालोय.... तुझ्या निघून जाण्यानं किती अपुरा, अधुरा झालोय.... कोणत्या शब्दात सांगू?
तू जवळ असलीस की हरवतो आणि गेलीस की सापडतच नाही.... होय, असच आहे.... हेच आहे!
काय करावं त्याला कळेना. न राहवून त्याने परत एकदा फोन फिरवला..... आणि ...
त्याचा विश्वास बसेना..... कारण रिंग दाराजवळ कॉरीडोर मध्ये वाजत होती.... सगळी शक्ती एकवटून तो धावला.... हातातला फोन उराशी घट्ट धरून ऋता तिथेच बसली होती..... त्याच्या आवडत्या चित्राखाली...
ह्यावेळी तिला विखरू न देता त्यानं मिठीत गोळा केली....अलगद, संपूर्णं... कुठेही जराही... अगदी थेंबही सांडणार नाही अशी, तिच्या डोळ्यातल्या ज्योतींसकट आणि.... आणि अंधारासकट!
-- समाप्तं
मला
मला मॅस्टेक्ट्मी या शब्दाचा अर्थ ठाऊक नव्हता. अर्थात संदर्भावरून 'सम टाइप ऑफ ब्रेस्ट कॅन्सर' असा अर्थ मी लावला. नंतर प्रतिसाद देण्यापूर्वी नेटवर पाहिले.
ती एक मॉडेल होती म्हणून तिची तगमग समजू शकतो आपण.
स्त्रीच्या फक्त शरीरालाच पुरुष (विशेषतः नवरा किंवा प्रियकर - अगदी पहिल्या वर्षीसुद्धा) महत्व देतात असे नाही. पण नायिकेची भावना स्वतःची तगमग इथंपर्यंतच रहात नाही; नवर्याला काय वाटेल या भावनेने तिला जास्त दु:ख झाले असावे.
कथा छानच गुंफलीय. मी फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो.
छान!
शरददा
पहिल्यादा
पहिल्यादा प्रकाशित झाली तेव्हाच वाचली.....काय लिहाव.कस लिहाव हे सुचेना म्हणून प्रतिक्रिया द्यायच राहिल होत....
रितु अन सुनिल ची घुसमट मी अनुभवलीय...डॉ.मिनू च्या भुमिकेतून..
पहिल्यादा Total Mastectomy assist केली तेव्हाची माझ्याच मनातली तग मग ..आठ्वली..
ड्रेसिन्ग बदलवताना पाझरणारे डोळे दिसले कि मी आधी विचारयचे दुखल का, माफ करा...मग कळायच हे पाणि, हे अश्रू..शरीराच्या दुखण्याचे नव्हेतच ......
दाद्...सुरेख.....अस कस सगळ... सगळ्याच्या मनातल...जमत तुम्हाला शब्दातुन मान्डायला....अप्रतिम....
दाद, एक खरं
दाद, एक खरं सांगू...एथे प्रियकर-प्रेयसी आहे...मी पाहिलेली , अनुभवलीये ती आई आणि मुलाची घुसमट! नेहमी प्रमाणेच नात्यांतली गुंफण, त्यातले कंगोरे अप्रतीम..ती तगमग पिळवटून टाकत्ये वाचताना...बाकी आम्ही पण फोटोग्राफरच म्हणून >>आत्ता पर्यंत इतक्या शरिरांची अगदी वाट्टेल तशी चित्रं, छायाचित्रं काढली. ह्या व्यवसायात कोणत्याही क्षणी अंगावरचं वस्त्रं फेकून देऊन हवी ती पोझ देणारे देह बघितले. बघायचं काही शिल्लक नाही ह्या भावनेने तो त्या फोटो शूटला गेला होता.>> हे पटलं.
दाद....तुला साष्टांग नमस्कार!!
खुपचं भावस्पर्शी लिखाण आहे
खुपचं भावस्पर्शी लिखाण आहे गं दाद.
अ प्र ति म!!!!!!!!!!!!! अजुन
अ प्र ति म!!!!!!!!!!!!! अजुन कहि शब्द्च सुचत नाही...
Pages