सौभाग्यवती मालविकादेवी सत्यशील जहागिरदार - सुमित्रा भावे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 27 September, 2013 - 02:16

एक चित्रपट दिग्दर्शिका.
एक निर्मात्री.
एक लेखिका आणि एक अभिनेत्री.

या दिग्दर्शिकेला एक संहिता लिहायची आहे.
पण या संहितेचा शेवट कसा असावा?

आपली संहिता आपल्याला लिहिता येते का?

या चौघींना आपल्या संहितेचा सुखांत करता येईल का?

सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स व अशोक मूव्हीज प्रा. लि. यांच्या सहकार्यानं सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेनं 'संहिता'ची निर्मिती केली आहे.

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला असून दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं या चित्रपटानं पटकावली आहेत.

देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी, सारंग साठ्ये, नेहा महाजन यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

'संहिता'चं लेखन केलं आहे सुमित्रा भावे यांनी, आणि गीतं लिहिली आहेत सुनील सुकथनकर यांनी.

लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही भूमिका सांभाळणार्‍या सुमित्रा भावे यांनी उलगडून दाखवलेली ही 'संहिता'...

samhita1_0.jpg

’संहिता’ हा आमचा नवा चित्रपट निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजला आहे. येत्या ११ ऑक्टोबरला तो प्रदर्शित होतो आहे. आपण स्त्रीमनाचा काही वेगळा पदर प्रेक्षकांना उलगडून दाखवतो आहोत का, या कुतूहलात मी आणि सुनील (सुकथनकर) दिग्दर्शक म्हणून बुडून गेलो आहोत.

’संहिता’ हा चित्रपट म्हणजे एका दिग्दर्शक स्त्रीचा स्वतःच्या चित्रपटासाठी, एका कथेवर आधारित पटकथा लिहिण्याचा प्रवास.

माझा स्वतःचा दिग्दर्शक म्हणून प्रवास निराळा असतो. माझ्या चित्रपटांची कथा मला इतर कुणी देत नाही, किंवा ती नुसती स्वतंत्र कथा म्हणून मलाही सुचत नाही! संपूर्ण चित्रपट डोळ्यांसमोर उलगडल्याप्रमाणे दिसू लागतो आणि मग मी कागदावर उतरवते ती, कथा-पटकथा-संवाद, कला-वेशभूषा इतकंच काय पण कॅमेरा-साऊंड यांच्या सूचनांसह अशी संपूर्ण संहिता.

त्यामुळेच राणी मालविका मला कशी, केव्हा, कुठे भेटली हा शोध घ्यायला मला उलटं उलटं जावं लागतंय. देविका दफ्तरदारनं पडद्यावर साकारलेली ही राणी मालविका, अनेक स्त्री-पुरुष प्रेक्षकांना मनापासून आवडते आहे. अगदी माझ्या मनात होती तशी ती पडद्यावर जाणवते आहे. आणि त्याच पद्धतीनं प्रेक्षकांच्या मनाच्या पटलावरही तिची तशीच छबी उमटते आहे.

संहितामधली नायिका-दिग्दर्शक रेवती- ही ज्या कथेवर चित्रपट बनवणार आहे, त्याची नायिका ही मालविका. ही मालविकाच नायिका म्हणून माझ्या मनात कशी उभी राहिली? खरंतर दरबारी गायिका भैरवी ही त्या कथेची नायिका होऊ शकली असती. संहितामधली निर्माती शिरीन, रेवतीला ही कथा सांगते, तेव्हा तिच्या मते ती राजा सत्यशील आणि गायिका भैरवी यांच्या प्रेमाची कथा सांगते आहे.

मला आठवतंय, माझ्या मनात संहिताची रूपरेषा तयार होत असताना कथेमधल्या कथेतली ही पात्रं- राजा सत्यशील, राणी मालविका आणि गायिका भैरवी माझ्या मनात सतत रुंजी घालत होती. जणूकाही आम्ही काय स्वभाव, गुणदोष घेऊन, नातेसंबंध घेऊन जन्माला येणार आहोत. आम्ही पुढे कसे वागणार आहोत- आमचं भविष्य काय- असे प्रश्‍न माझ्यासमोर उभे करत होती.

माझं लहानपण रास्ते मंडळींच्या संस्थानी जीवनाच्या खूप निकटच्या सान्निध्यात गेलं. माझे वडील रास्त्यांच्या जहागिरीची व्यवस्था पाहत असत. बावडा, कुरुंदवाड, तासगाव, बुधगाव अशा अनेक संस्थानिकांशी रास्त्यांचे नातेसंबंध. रास्त्यांच्या मुलांशी खेळायला मी रास्तेवाड्यात जात असे.
अशा संस्थानी, देखण्या, देश-परदेश बघितलेल्या, वेल-रेड, फॅशनेबल, खानदानी स्त्रिया मी माझ्या लहानपणी पाहिलेल्या होत्या.

Sam3.JPG

संहिताचं कथानक माझ्या डोळ्यांसमोर उमटायला लागलं, तेव्हा या स्त्रिया माझ्या नजरेसमोर यायला लागल्या. या स्त्रिया काही बाबतीत स्वतःला मॉडर्न समजून राज्यकर्त्या- ब्रिटिश स्त्रियांचं काही बाबतीत अनुकरण करत असत. बॉबकट, मेकअप, पायातले शूज, सेंट लावणं या गोष्टी त्यांच्या जीवनशैलीचा सहज भाग झाल्या होत्या. टेबल-खुर्चीवर बसून जेवण, कन्व्हर्टेबल- डॉजसारख्या मोठ्या चारचाकी गाड्या वापरणं, पुण्या-मुंबईत क्लबमध्ये जाणं, बॅडमिंटन-पत्ते असे खेळ खेळणं, बोलताना इंग्रजी शब्दांचा सहज वापर करणं, हॉलिवुडचे सिनेमे बघणं, त्या नटनट्यांची माहिती असणं या गोष्टी संस्थानिक स्त्रियांच्या जीवनाचं अविभाज्य अंग बनल्या होत्या. ब्रिटिश आमदानीत या गोष्टी मध्यमवर्गीय स्त्रीला अगदीच दुष्प्राप्य होत्या.

या स्त्रिया इंग्रजी भाषा किंवा पियानोसारखी पाश्‍चात्त्य वाद्यं खास पाश्‍चात्त्य शिक्षक लावून शिकत असत. (संहितामधली राणी मालविका असा पियानो वाजवतानाही मला दाखवायची होती; पण ते राहून गेलं.)
त्यामुळे या स्त्रिया स्मार्ट आणि आत्मभान असलेल्या, रसिक व बहुश्रुत असत. अशा स्त्रियांचं वर्णन आपल्या महाराष्ट्रात चित्रपटांतून किंवा वाङ्मयातूनही फारसं आलेलंच नाही. हे वर्णन माझ्या लहानपणीचं- भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या वर्षांमधलं आहे. राणी मालविका अशा स्त्रियांपैकी एक आहे.

आज संहितामधल्या दर्पण या कथेतली पात्रं रंगवताना ही सामग्री आणि मनाची अवस्था माझ्याजवळ होती.
त्यामुळेच असेल, दर्पण कथेमधला राजा, राणी आणि गायिका यांच्यातला प्रेमाचा त्रिकोण रंगवत बसण्यात मला रसच वाटला नाही. दर्पण ही कथा ही संहिता चित्रपटातल्या लेखिका तारा देऊस्कर यांनी लिहिलीय असं दाखवलंय. पण मुळात तारा देऊस्कर हेच मी रंगवलेलं पात्र असल्यामुळे त्यांनी लिहिलेली दर्पण नावाची कथा- हीही मला म्हणजे सुमित्रा भावेलाच लिहायची होती! मी ताराताईंच्या मनातही प्रवेश करून पाहिलं. त्यांच्या मनात गायिका भैरवीविषयी सॉफ्ट कॉर्नर असेलही. (तो कसा- हे कळायला वाचकांनी हा चित्रपटच पाहायला हवा!) पण मला मात्र सत्यशील आणि भैरवीच्या प्रेमकथेपेक्षा मालविकेकडेच झेपावंसं वाटत होतं.

राजा सत्यशील आणि राणी मालविका आते-मामे भावंडं. त्यातही मालविका सत्यशीलच्या सावत्र आईची भाची. त्यामुळे त्यांचा संसार अगदी भावा-बहिणीसारखा म्हणावा असा चाललेला. पण ही प्रेम नावाची वल्ली तिथे रुजलेलीच नाही! त्या प्रेमाचा पत्ता सत्यशीलला लागतो तो भैरवी या गायिकेच्या सुरांमधून. (आरती अंकलीकरांनी गायिलेली, सुनीलनं लिहिलेली आणि शैलेन्द्र बर्वेनं संगीतबद्ध केलेली गाणी ही त्यामुळेच संहिताचं महत्त्वाचं अंग आहे.) अशा या नात्यांच्या गुंत्यातली ही मालविकाच माझ्या मनात तयार होत गेली ती नायिका म्हणून. सत्यशील आणि भैरवीच्या प्रेमकथेची नायिका भैरवी असेल; पण माझी नायिका मालविकाच! मालविका रूपवान आहे, पण रूपगर्विता नाही. ती बुद्धिगर्विता आहे. तिचा अहंकार ती लपवत नाही. कारण तो बुद्धीचा आहे. वाचनातून, अभ्यासातून आलेल्या प्रगल्भतेता आहे. रूपाचा अभिमान कदाचित तिला एलिमेंटरी वाटेल!

महाराष्ट्रातल्या सुधारकी परंपरेच्या खांद्यावर उभं राहत, इंग्रजीचा नवा चष्मा चढवत मालविका जगाकडे कुतूलहानं पाहते आहे. नवर्‍याचं प्रेम किवा खरंतर पॅशन-आसक्ती याला आपण पारखे आहोत, हे तिला विसरायला झालंय, इतकी ती जेम ऑस्टिनच नव्हे, तर शेले, किट्स, बायरन यांच्यासारख्या आयुष्य उधळून देऊन आयुष्याबद्दलची आसक्ती सिद्ध करणार्‍या रोमँटिक पोएट्सची पोएट्री वाचते आहे. या वाचनातून उलगडणारं, तेव्हाच्या संस्थानी बंदिस्त भिंतींमध्ये न सापडणारं असं काहीतरी तिच्या मनात चालत असेल का? राजवाड्याच्या दोन टोकांना असणारी स्वतंत्र शयनगृहं असणारे, एकमेकांना अधिकृतरीत्या बाय अपॉईंटमेंट भेटणारे हे राजा-राणी एकमेकांना नजरेनंदेखील प्रेमाचा अनुभव कसा देत असतील? त्यामुळेच मालविका ही बिचारी, उपेक्षित, एकाकी न वाटता ऐटबाज, तडफदार, संयमी पण व्यक्त होऊ शकणारी आणि मुख्य म्हणजे आयुष्याच्या अनेक गुंत्यांकडे भाबड्या, बायकी भावनिकतेनं न पाहता बुद्धिमान वैचारिकतेनं पाहणारी अशी माझ्या मनात आकार घेऊ लागली.

New Image1.JPG

आपल्यापैकी अनेकींना आपण स्वतः किंवा मागल्या पिढ्यांमधल्या कुणी आयामाया आठवतील. राजघराणं असो वा नसो, पण आपापल्या काळातल्या घालमेलींकडे एका विश्‍लेषक आणि तरीही उत्कट नजरेनं पाहण्याची क्षमता असणार्‍या स्त्रिया प्रत्येकच काळात असत आल्या आहेत. कुटुंब, समाज, संस्कृती यांनी त्यांच्यासमोर यक्षप्रश्‍न उभे केले; पण त्यांनी कधी मनात, तर कधी जनात त्यांची उत्तरं शोधली. ही उत्तरं कधी तथाकथित अयशस्वी ठरली, तर कधी यशस्वी. पण या उत्तरांनीच संस्कृतीचे प्रवाह बदलले. नदीनं प्रवाह बदलल्यावर नव्या जमिनी सुपीक व्हाव्यात तशी अनेक जीवनं, कुटुंबं त्यातून खर्‍या अर्थानं समृद्ध झाली. अशा मालविकाचा आंतरिक अहंकार त्यामुळेच स्वाभिमानातच रूपांतरित होतो आणि तिला प्रगल्भ ऋजुतेची वाट दाखवतो.

संहिता चित्रपट- त्याची दिग्दर्शक रेवती- हे मीच निर्माण केलेलं पात्र आणि कथेमधली जी कथा त्यातली मालविका- हीही मीच घडवलेली मूर्ती. या माझ्या मानसकन्या तरी कशा म्हणू? म्हटलं तर माझी रूपंच!

देविकाला आमची वेशभूषाकार सजवून तयार करत असे. पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांनी तर खरे सोन्याचे दागिने- खास पारंपरिक असे- घालायला दिले होते. ते खर्‍या अर्थानं वजनदार दागिने घालून, त्या भरजरी अवतारात देविका उभी राहिली, की तिलाही तिची नेहमीची मध्यमवर्गीय, आपल्या घरच्या मुलीची स्वप्रतिमा टाकून द्यावीशी वाटत असावी. तिच्या चालण्यात, उभं राहण्यात, प्रश्‍न करण्यात, संतापानं एखादी भृकुटी वाकडी करण्यात जी ऐट दिसायची, त्यानं आम्हाला खूप मौज वाटायची. गाणं ऐकताना दिसणार्‍या पतीच्या चेहर्‍याकडे पाहतानाचे तिचे भाव, किंवा भैरवीच्या सौंदर्याची तारीफ करतानाचा तिचा आविर्भाव यात आम्हाला दिग्दर्शक म्हणून अपेक्षित असणारी- निरागसता आणि वैचारिक कुतूहलातून होणारी घालमेल- यांची व्यामिश्रता देविकानं उभ्या केलेल्या मालविकाच्या डोळ्यांत आम्हाला दिसते आणि खूप समाधान वाटतं.

अशी ही मालविका माझ्या मनात जन्म घेत गेलेली आणि पडद्यावर साकार झालेली. इथून पुढे स्वयंभूपणे ती कदाचित मलाही रस्ता दाखवू शकेल. कारण तिचं माझं आंतरिक नातं जुळलं आहे. कुठल्याही नातेसंबंधात असेल- कधी आसक्ती-अनासक्तीचा खेळ असेल, तर कधी इतर क्लेषाचा, बेचैनीचा अनुभव असेल- मालविका मला असाहाय्य, विद्ध होऊ देणार नाही, तर बुद्धिमान नजरेनं स्वतःचं आणि परिस्थितीचं विश्‍लेषण करायला लावेल.

स्वतःची संहिता स्वतःच लिहायला लावेल.

samhitaposter.jpg
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्मात्री हा शब्दं पहिल्यांदा वाचला.
निर्माती वाचला होता.
संस्कृत वाटतोय.
या सिनेमाबाबत किंवा एकंदरच सुमित्राभावे यांच्या बरोबरच्या प्रवासाबाबत सुनिल सुखथनकरांनी एका दिवाळी अंकात लेख लिहिला होता . तेव्हापासून उत्सुकता होती.
मायबोली अश्या भव्यदिव्य आणि जागतिक पटलावर गौरविलेल्या चित्रपटाची मिडिया पार्टनर आहे हे बघून छान वाटतंय.

आवडलं. Happy
चित्रपट बघायची उत्सुकता आहेच. कलकत्त्याला कुठल्या फिल्म फेस्टिवलमधे स्क्रीनिंग झालं का? (असल्यास मला कळलं नाही Sad )...

साती, संस्कृतच्या नियमांप्रमाणे खरंतर निर्मात्री हाच शब्द बरोबर आहे (उदा: अन्नदाता - अन्नदात्री)

यांचे चित्रपट उत्कृष्ट असतातच, पण ते बघायला मिळाले तर. कधीतरी २-४ वर्षांनी चुकुन एखादी डीव्हीडी मिळाली तर किंवा ऑनलाईन. यावर काही उपाय नाही का?

प्रतिक्षेत,

मस्त, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांचा 'वास्तुपुरुष' हा चित्रपट फार आवडला होता.
संहिता चित्रपट बघायची खूप उत्सुकता आहे, पुण्यात असल्याने जाऊन बघता येइल Happy

चिनुक्स बरोबर, पण ते पुण्यात्/मुंबईत.... न आमच्या गावाकडे मिळणार, ना इकडे परदेशांत. Happy

असो. कोणी येणार असेल, तर कळवतो त्याला डिव्हीडी आणायला.

अरे वा सुरेख दिसते आहे देविका. बघणार.

सर्व डिव्हीडीज चा एकत्रित संच माबो खरेदी विभागात मिळू शकेल का? प्लीज टुबी टेलिन्ग्ज.

मस्तच... वास्तुपुरुष, दोघी, नितळ सारेच खूप आवडले होते. हा सुद्धा नक्कीच बघणार. उत्तरा बावकरांचा अभिनय भावेंच्या चित्रपटात जरा जास्त्च दमदार असतो.

संस्कृतच्या नियमांप्रमाणे खरंतर निर्मात्री हाच शब्द बरोबर आहे >> +१ ऋकारान्त पु. शब्दांचे स्त्री. "त्री" होते.

नक्की बघायचा आहे. देविका दफ्तरदार आवडत्या अभिनेत्रीपैकी आहे. राजेश्वरीदेखील खूप दिवसांनी मराठी चित्रपटात दिसतेय ना?

दैवकृपेने चेन्नईला स्क्रीनिग झालंच तर मला नक्की कळवा प्लीज. सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायचीच मजा जास्त. ताकावर तहान म्हणून डीव्हीडीवर बघावा लागेल नाहीतर.

व्वा!
स्वतःच्या कलाकृतीबद्द्ल इतका विचार असणारे आणि तो प्रभावीपणे मांडू शकणारे कलाकार, विशेषतः सिनेमा क्षेत्रात फार कमी आहेत.
रच्याकने, इज 'दॅट' द फेमस बुक?!!!!!!!

नाही आगावा, फोटोतलं बुक वेगळंय.. ते फेमस बुक जुनंपानं दिसणारं पीटर उस्तिनोव्हचं 'डीअर मी' नामक आत्मचरित्र आहे.

ग्रेट!! मायबोली, धन्यवाद. चित्रपटाचे एकुण एक पैलू आकर्षक वाटतायत, संहिता, कास्टिंग, वेशभुषा, संगीत, गायिका.. अर्थात भावे-सुकथनकर ह्या पैलूपासूनच आधी सुरुवात.. त्यामुळे बघितलाच पाहिजे! मात्र मिलिंद सोमणसाठी जास्त पहाणार, प्रचंड आवडतो, त्याचा रुबाबदार संस्थानिक पहायची जबरदस्त उत्सुकता आहे...

सुंदर संकल्पना.. 'निर्मिती' या माझ्या एका कवितेची आठवण झाली. (आज येथे शेअर करावीशी वाटली ) कदाचित सुमित्राजींची मनःस्थिती तिच्यात आली असेल..त्यांना शुभेच्छा.
अशी अनेकपदरी संहिता पडद्यावर कशी उलगडेल बघायची उत्सुकता आहे.सगळी नावे मातब्बर आहेत.
साती >>मायबोली अश्या भव्यदिव्य आणि जागतिक पटलावर गौरविलेल्या चित्रपटाची मिडिया पार्टनर आहे हे बघून छान वाटतंय >> + १ ..

>मायबोली अश्या भव्यदिव्य आणि जागतिक पटलावर गौरविलेल्या चित्रपटाची मिडिया पार्टनर आहे हे बघून छान वाटतंय. +१

नक्की बघणार हा सिनेमा...