द लंचबॉक्स चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 21 September, 2013 - 09:28

एकटेपणा......

दमविणारा , भिवविणारा, रडविणारा.... दुर्धर रोगांशी साहसाने सामना करणार्‍यांचे कौतूक होते, त्यांच्या लढ्याची पुस्तके छापून येतात, ब्लॉग्स आवडीने वाचले आणि शेअर केले जातात. पण एकटेपणाशी
एकट्यानेच लढा देणार्‍याच्या पदरी फक्त आणि फक्त उपेक्षाच येते. कोरड्या वैराण वाळवंटात भटकणारा जीव जसे आपला मृत्यूच आता शक्य आहे हे माहीत असूनही रोज काही पावले पुढे टाकत जातो मृगजळाच्या मागे भगभगीत वाळूच आहे हे सत्य माहीत असूनही त्या हिरव्या-निळ्या मरीचिकेत रमून जातो तसे एकटेपण भोगणार्‍याचे होते. सर्वकाही असूनही हा एकटा जीव आपल्या वैयक्तिक
वाळवंटातून एकेक दिवसाची वैतागवाणी पावले टाकत पुढे जातो. दुकटे होण्या च्या काही शक्यता जरी निर्माण झाल्या तरी बावचळतो. घाबरतो. थोडी फार पावले पुढे टाकून परत मागे येतो आणि आपल्याच कोषात मग्न होतो.

कालच प्रदर्शित झालेल्या द लंच बॉक्स ह्या सिनेमात इला आणि साजन ह्या अश्या दोन जिवांची कथा
अतिशय संवेदनशील पद्धतीने मांडली आहे. बॉलिवूड नावाने उगीचच जगभर प्रसिद्ध झालेल्या गर्हणीय चित्रपटशैलीशी फारकत घेउन रितेश बत्रा ह्या दिग्दर्शकाने एक हळुवार कथा अतिशय नजाकतीने, पण सादरीकरणाची लय बिघडू न देता मांडली आहे. एडिटिंग इज जस्ट राइट.

मुंबईतील एका दिवशी ह्या कथेची सुरुवात होते. जीवनाची तीचती चेपलेली पुंगळी सरळ करून रोज नव्या उत्साहाने एका अतिरेकी दिवसाला सामोरे जाणारे मुंबईकर! त्या लोकल्स, स्टेशनवरील गर्दी आणि बॅगा घेऊन कार्यालयाच्या दिशेने चिंबलेली पावले टाकणारे चाकरमाने लोक. ह्यातलाच एक साजन. मध्यमवयीन विधूर. आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन नाशीकला स्थायिक होण्याची वाट बघत असतो.

बायको वारल्यावर, कसलेच कौटुंबिक बंध न उरलेला, त्यातून एकल कोंडा , विक्षिप्त झालेला ,
कुठेच फिट होऊ न शकणारा साजन इर्फान खानने नुसता रंगवला नाहीतर जिवंत केला आहे. एकट्याने आवरून कार्यालयात येणे. रोजचे रूटिन काम पण बारकाईने, निगुतीने करणे. कारण काही डिस्ट्रॅक्षनच नाही! न बायकोचा फोन न मुलांच्या/ घरच्या कटकटी. जिवंत राह्ण्यासाठी आवश्यक म्हणूनच केवळ करायची ती नोकरी. लोकल मधून धक्के खात घरी आल्यावर कॉलनीतील मुलांवर व्यक्त होणारा वैताग. पार्सल एकट्याने उघडून वाढून घेणे आणि जेवणे. बाल्कनीत उभे राहून धुम्रपान करणे. असह्य झाले कि डोळे मि टून पडणे. हे जीवन असेच एक दि वस संपून जाणार आहे हे अधोरेखित करणारा
आजुबाजूचा न बदललेल अवकाश. जुनी सायकल, जुने पाने सामान, व्ही एच एस टेप्स त्याव र बायकोने रेकॉर्ड केलेले जुन्या मालिकांचे भाग. सगळे कसे साकळलेले. कुंद एखादा विनोद सुचला तर, हपिसात वादावादी झाली तर एखादे गाणे आवडले तर सांगायला, शेअर करायला कोणीच नाही असा
एकसंध एकटेपणा.

ह्यात एकदम बदल होतो म्हणजे एक दिवस त्याला इलाने बनवून दिलेला डबा चुकीने मिळतो. घरच्या जेवणाला तरसलेला ( हपापलेला नव्हे) साजन सुखावतो व सर्व फस्त करतो. आपली इलाशी ओळख आधीच झालेली असते. नवर्‍याचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुष्क संसारात परत जान आणण्यासाठी धडपड णारी इला उत्तम चविष्ट अन्न बनवून नवर्‍याला पाठवत असते पण कामाच्या रेट्यात, विवाहबाह्य संबंधात गुंतलेला तो तिला समजून घेणे सोडा, तिचा पारच अनुल्लेख करत असतो. त्यांच्या संसारातला साचलेपणा तिला असह्य होतो. पण उपाय सापडत नाही म्हणून ती तशीच गतानुगतिकतेने दिवस-रात्री मोजत जगत असते.

डबा चाटूनपुसून खाल्लेला पाहून इला आशावते. पण मग अदलाबदल झाल्याचे कळल्यावर निराश
होऊन एक चिठ्ठी डब्यात टाकते. अहो आश्चर्यम! त्या चिठ्ठीचे उत्तरही येते. आंतरजालावरही आता अभावानेच आढळणारी अ‍ॅनॉनिमिटी ह्या दोघांना अपघाताने नसीब होते. दोघे आपापले जीवन, विचार शेअर करतात. अनवधानाने मनाने जवळ येत जातात. भेट्णे अपरिहार्य होते त्या पॉइन्टलाच कथानक एक वळण घेते आणि एका अनपेक्षित, अनिश्चित क्षणी हा प्रवास संपतो. इन्सेप्शनच्या शेवटाप्रमाणेच हाही शेवट हुरहुर लावून जातो. डबेवाल्यांच्या ज्ञानोबा माउलीच्या जपात सूर आणि पावले मिळवून आपण बाहेर पडतो. आपल्या जीवनातल्या हुकलेल्या संधी, मैत्रीच्या शक्यता पडताळून पाहात,

पण कथानकाचे आणि दिग्दर्शनाचे कौशल्य हेच आहे कि कुठेही मनात कडवटपणा उरत नाही. मनाचे बंध कुणाशी, काही काळ का होईना जुळले तर! नाहीतर पुढे आहेच एकटेपणाशी झुंज! सारे माहितीचे
आणि असह्य! गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमधील अम्मू -वेलुथा, मुराकामीच्या आय क्यू ८४ मधील तेंगू आणि आओमामी अश्या काही अपघाताने भेटलेल्या जोडप्यांचा संदर्भ घेतल्यास दिग्दर्शकाचे विषय हाताळणीतील कौशल्य अधिक नजरेत भरते आणि मनावर एक सुखद अस्तर पसरते. इला आणि साजन यां चे वैयक्तिक विश्व कधीच एकमेकांत मिसळत नाही. ती तिचे जीवन जगते आणि तो त्याचे. पण जगात
कुठे तरी तो आहे आणि ती आहे ह्या जाणिवेनेच त्यांच्या जीवनातला एकटेपणा मिटतो. आपल्या आईचे जीवन ज्या चाकोरीत घट्ट बांधले गेले होते ते आणि तसेच आपलेही जीवन जात आहे; जाणार आहे ह्याची जाणीव झाल्यावर ती हादरते. पण जीवन संपवत नाही' तर एका वेगळ्या दिशेने स्वतःचा प्रवास चालू करते. ह्यात तिला साजनची सोबत हवी असते, गरजही असते पण तो नाहीच आला तरीही तिचा
निर्णय झाला आहे. ती स्त्रीवादी नाही, फक्त एक माणूस म्ह्णून जगण्यातील घुसमट, तोचतोपणा नाकारून नवे काहीतरी अनुभवायचा आपला हक्क ती तपासून बघणार आहे.

रोजचे आंबट दही नको वाटले तरी खावे लागणार्‍या माण सा ला अनपेक्षित पणे एखाद दिवशी
तिरामिसू मिळाले तर काय वाटेल तशी साजन ची मनःस्थिती होते. इलाला भेटायच्या कल्पनेने तो फुलतो
पण आपल्या मध्यमवयीन सेन्सिबिलीटीज त्याला नाकारता येत नाहीत. तिला नुसते बघून तो मागे फिरतो. पण रिटायरमेंट व पुढे येणार्‍या वृद्धत्वाला निमूटपणे स्वीकारावे अशी स्वतः ची समजूत
घालणारा तो जगून बघण्याच्या एका आदिम योलो जाणिवेतून आयुष्याला परत सामोरा जातो.
मनाची घट्ट बंद केलेली दारे किलकिली करून बाहेरचा प्रकाश, प्रेमाची, सहअनुभवाच,, सहवेदनेची जाणीव अनुभवायचे धाडस करतो. पुढे काय तर ग्यानबा तुकाराम! इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे अल्ला जाने क्या होगा आगे?

करण जोहरने सादर केली असली तरीही ही रूढ अर्थाने प्रेम कथा नाही. त्याला साचेबंद अंत नाही उत्तरायण सारखी कंपॅनिअन शिपची कथा पण नाही. या वयात को णीतरी पाहिजेच ना असा मध्यमवर्गी द्र् ष्टिकोण ह्यात नाही. तर जीवनाने तुम्हाला कसलाही डाव दिलेला असो तो खेळून बघितला पाहिजे, त्यातल्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत असे ह्या चित्रपटातून व्यक्त होते. हा एक दृष्य अनुभव आहे दोन माणसांच्या जीवन रेखा एकमेकांत मिसळू बघतात त्याचा. चित्रपटाची नेपथ्य, कॅमेरा इत्यादी अंगे पण अतिशय पूरक आहेत. मुंबई अंगावर येत नाही. पात्रांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या जगण्यातूनच दिसत राहते. नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम नेहमीप्रमाणेच उत्तम. त्याच्या परिस्थितीतील विसंगती, फाइल वर भाजी चिरणे, लोकल मध्ये बसून! सहज विनोद निर्माण करणारी संवाद फेक ...
हा कलाकार नेहमीच एक गोळीबंद पर्फॉरमन्स सादर करतो.

भारती आचरेकरांची आवाजी सोबत इला बरोबरच आपल्यालाही मिळत राहते. एक भुतानीज प्रेमगीत रात्री च्या अंधारात ह्वेत विरत जाते तो क्षण फार गोड वाटला मला! तेव्ढ्या पुरते इला आणि साजनचे प्रेम जिवंत होते. शक्यता अशक्यतेच्या धुक्यातून पुढे यायचा प्रयत्न करतात एकटेपणाला दुसरा एकटेपणा येऊन मिळतो आणि अंतर्धान पावतो.

डबेवाल्यांचे खास मराठी पण नीट पकडले आहे. ते कुठे तरी हलवून टाकते. त्यांचे मेहेनती प्रामाणिक चेहरे
जवळीक साधतात. कदाचित मी मराठी असल्याने असेल.

मुराकामीने लिहिल्या प्रमाणे,

" I'm tired of living unable to love anyone. I don't have a single friend - not one. And, worst of all, I can't even love myself. Why is that? Why can't i love myself? It's because I can't love anyone else. A person learns how to love himself through the simple acts of loving and being loved by someone else. Do you understand what i am saying? A person who is incapable of loving another cannot properly love himself.”
― Haruki Murakami, 1Q84

सोमवार पासून डबा लावावा म्हणते जेवायचा.

मुराकामी यांचे कोट जालाव रून साभार. पण पुस्तक पैसे देऊन विकत घेतले आहे तरीही आक्षेप असल्यास
काढून टाकते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय तरल परिक्षण..

बारकाव्यांसहित कथानक उभं केलत असं वाटलं..

आवडलं!

मस्स्स्त लिहिलं आहेस, अ.मा. Happy

गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमधील अम्मू -वेलुथा >>> यांची आठवण होते सिनेमा पाहताना? वा!! Happy

मस्त लिहिलंय.
इलाचे काम करणार्‍या अभिनेत्रीचे नाव निम्रत कौर. मुंबईतल्या इंग्रजी - हिंदी थिएटरमधे अ‍ॅक्टिव्ह असलेली मुलगी आहे. फार उत्तम अभिनेत्री.

अप्रतिम सिनेमा! अत्यंत सुंदर ह्यूमन एलेमेन्ट असलेला असा सिनेमा क्वचित बघायला मिळतो. इरफान खानने पॉजेसमधून जो संवाद साधलाय तो थक्क करुन जातो.

परिक्षणही सुरेख. प्रत्येकातल्या कोणत्या ना कोणत्या अस्पर्श स्तराला हा सिनेमा तरलपणे स्पर्शून जातो.

छान.

फारच सुंदर आणि तरल परीक्षण - नक्कीच पहाणार हा सिनेमा ....

शेवटचे वाक्य.....

आणि हो तो मुराकामीचा कोट तसेच राहू द्या - फारच अ‍ॅप्ट आहे ते ....

अर्रे........आता नक्कीच बघणार हा चित्रपट.
अश्विनी काय अप्रतीम परीक्षण केलंस!
जीवनाची तीचती चेपलेली पुंगळी सरळ करून रोज नव्या उत्साहाने एका अतिरेकी दिवसाला सामोरे जाणारे मुंबईकर!>>>>>>>>>> भारी!
सकाळी चहा पिताना टीव्ही लावला होता तेव्हा या सर्व लोकांची कोणत्या तरी चॅनलला मुलाखत चालू होती.
करण जोहर, निम्रत कौर आणि आपला इर्फान! त्यांचं म्हणण आहे की हा चित्रपट ऑस्करला जाईल!

त्यांचं म्हणण आहे की हा चित्रपट ऑस्करला जाईल!>> नाही गेला, भारताची एन्ट्री म्हणून गुजराती सिनेमा "दि गुड रोड" निवडला गेला आहे.

Pages