शहर (स्फुट)

Submitted by उद्दाम हसेन on 1 September, 2013 - 07:42

ना या शहरातला गोंगाट थांबतो
ना माझ्यातला
जसं काही एक आख्खं बकाल शहर
माझ्यात वसतंय
कुठल्या तरी दुर्धर रोगाची सूज
आणि कुरुपता मिरवतंय
चेहरा हरवलेलं ,ओळख विसरत चाललेलं
शहर !
एक बाहेरचं, एक आतलं
न थांबणारं, न द्रवणारं
बेभान, बेफाट, बेमुर्वत, बेछूट
शहर
किडामुंग्यांसारखी माणसं चिरडत धावणारी
चकचकीत वाहनं..संवेदना चिरडत जाणारी
असहाय्य जर्जर नजरांच्या.. ह्रदयाचे ठोके चुकविणारी
कधी काळी फुलल्या होत्या
इथे फुलांच्या बागा
शुभ्र, नील, पीत, नारिंगी
रंगीबेरंगी रांगा
घमघमणारा मोगरा..धुंद करायचा
झक्क फुललेला गुलाब.. मुग्ध करायचा
वटवृक्षाखालच्या बाकड्यांवर तासनतास बसलं तरी
कळायचं नाही किती वेळ गेला..
ना उन लागायचं, ना पाऊस भिजवायचा
जाणा-या येणा-यांच्या वळणा-या नजरांचं
काहीच वाटायचं नाही
खूप छान वेळ घालवला एकत्र.. नाही का ?
वेळ होता खूप...
गालावर खळी होती
थोडं हसू थोडी स्वप्ने होती
आणि बागाही होत्या,
तशीच होती रस्त्याच्या कडेची दाट झाडी
त्यांनी केलेली कमान
त्या कमानीखालून सायकलवर डबलसीट जातांना
उन्हातून घाम येऊन श्रम झाल्यासारखं वाटायचंच नाही
श्वास फुलला कि शुद्ध हवा फक्त छातीत भरून घ्यायची
आणि खट्याळ वा-याने उडणारे तुझे केस
माझी खोडी काढायचे
मी उगाच चिडलो कि
तू खळाळून हसायचीस
आणि मग थकवा कुठल्या कुठे पळून जायचा
काय बिघडलं नेमकं ?

आता छातीत हवा नाही, कार्बन मिळतो
बारीक खोकला बळावलाय
डोळे चुरचुरतात
सायकल सोडून दिलीय.. धडक बसल्यापासून
डोक्यावरची ती कमान हरवलीये
चकचकीत इमारतीतून एसीचे उष्ण भपकारे अस्वस्थ करतात
त्या बागा दिसत नाहीत आता
त्यावरून फ्लायओव्हर गेलाय भलामोठा
बांधकाम चालू असतांना बाग उखडली
झाडाच्या फांद्या ठेकेदारांनी नेल्या
शहराचा विकास झाला
बाहेरच्याही आणि माझ्या आतल्याही
चुकून इतक्यात
नदीवर गेलो होतो
पुन्हा नाही ती चूक करणार
खडकावर बसून झुळझुळ वाहणारं पाणी
आपल्या भावनांसारखं नित़ळ वाटायचं
आत्ता दुरूनच कसलासा उग्र भपकारा आला
तुला नाही आवडणार हे नवं शहर
तुला सहन होणार नाही
मी सरावलोय तरीही
सिग्नलला थांबल्यावर एका तंद्रीतून बाहेर यावं तसं..
कोण जाणे कसं
पण कधीतरी ते जुनं शहर उफाळून बाहेर येतं नक्की...
तेव्हां
आपल्या त्या बागेतलं बाकडं दिसत नाही
ना मोगरा घमघमतो
ना गुलाब वेडावतो
ना धीरगंभीर वटवृक्ष नजरेस पडतो
नव्या शहराने पुसलेल्या या खुणा अस्वस्थ करतात
तुझ्या माझ्या कानातल्या कुजबुजीसरशी विरून गेल्यात
नकळतच..
डोळ्याच्या कडा किंचित ओलावाल्यासारख्या वाटतात
तेव्हढंच बरं वाटतं..
काहीतरी टिकून आहे आजही
तुला आवडणारं..
त्या हरवलेल्या शहरातलं !!

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीतरी टिकून आहे आजही
तुला आवडणारं..

काहीतरी म्हणजे पैसा हो!
नुसती कानातली कुजबूज वगैरे ऐकायला शहरातच कशाला जायला पाहिजे? खेड्यातहि ती तितकीच गोड असते!

झक्कीकाका, तुम्ही स्फुट वाचलंत हीच माझ्यासाठी नोबेल पुरस्कारासाठी नामांकन जाहीर होण्यासारखी गोष्ट आहे. Happy

_____/\_______

असलंच लिहित जा रे तू फक्त!
पुन्हा एकदा 'पाऊस' आणि 'चैत्र' वाचावा लागणार आता