या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला 'इन्व्हेस्टमेंट' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आहे.
पैसा, प्रगती, महत्त्वाकांक्षा यांच्या गर्तेत सापडलेल्या कुटुंबाची कहाणी या चित्रपटात आहे. सुप्रिया विनोद यांची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे.
सुप्रिया विनोद या श्री. रत्नाकर मतकरी यांच्या कन्या. लेखन, अभिनय, चित्रकला या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी नाव कमावलं आहे. 'अधोरेखित', 'त्रिपुटी' ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. 'तनमन' यांसारख्या नाटकातून आणि 'सतरंगी रे'सारख्या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे.
'इन्व्हेस्टमेंट' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद -

तुमच्या घरात साहित्य, नाटक होतंच. तुमच्या जडणघडणीवर आईवडिलांचा प्रभाव काय पडला, ते सांगाल?
माझ्या वडिलांबद्दल खूप महिती आहे सगळ्यांना. त्यांची आता शंभराच्या वर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, पन्नासच्या आसपास नाटकं आहेत त्यांची आणि आता हा चित्रपट येतोय. पूर्वीपासून त्यांचे चाहते जगभर आहेत. परंतु माझ्या आईबद्दल थोडं कमी माहिती असेल लोकांना जे मला सांगायला आवडेल. ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, म्हणजे राष्ट्रीय नाट्य महाविद्यालयाची पदवीधर आहे, दिग्दर्शनामध्ये तिचं स्पेशलायझेशन होतं आणि तिला तिथे सुवर्णपदकसुद्धा मिळालंय. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. मला असं वाटतं की तिच्याकडूनच माझ्यात अभिनयगुण आले असावेत.
आई आणि वडिलांच्या मिळून दोन संस्था होत्या प्रायोगिक नाटक आणि बालनाट्य करणार्या. सूत्रधार आणि बालनाट्य अशी त्यांची नावं. बालनाट्यचं दरवर्षी मे महिन्यात एक नाटक मुलांकरता व्हायचं आणि सूत्रधार संस्थेचं एक नाटक राज्यनाट्य स्पर्धेत दरवर्षी नोव्हेंबरमध्ये, असं ठरलेलं होतं. त्यामुळे वर्षाला दोन नाटकं ही व्हायचीच अन् ती खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सादर व्हायची. एकमेकांपेक्षा अत्यंत वेगळी असायची. हे सगळं माझ्या जन्माआधीपासून सुरू होतं, त्यामुळे मी या वातावरणातच वाढले आहे. अगदी लहानपणापासूनच तालमींना जाणं, नाटकांच्या प्रयोगांना जाणं, कळलं, नाही कळलं तरीही नाटकं पाठ होणं, हे सगळं व्हायचं!
याबाबतीत माझ्या भावाची, गणेशची एक आठवण सांगण्यासारखी आहे. ’आरण्यक’ नावाचं एक अतिशय गाजलेलं नाटक आहे. महाभारताच्या अखेरच्या पर्वावर हे नाटक आधारित आहे. हे नाटक गणेश दोनपाच वर्षांचा असताना पाठ म्हणायचा अन् दारामागे लपून आम्हांला म्हणायचा की, बघा रेडिओ लागलाय! तर इतक्या लहानपणापासून नाटक आमच्या घरात होतं आणि कळतनकळत ते आमच्यात भिनलं. नाटकांमुळेच भाषा सुधारली, पाठांतर आपोआप होत गेलं, कुणाला हे करा किंवा ते पाठ करा असं सांगायची वेळ नाही आली.
तुम्ही ’बालनाट्य’ या संस्थेचा उल्लेख केला. रत्नाकर मतकर्यांनी महाराष्ट्रात बालनाट्यचळवळ फुलवली. त्याबद्द्ल काही सांगू शकाल का?
महाराष्ट्रातली बालनाट्यचळवळ त्यांनी फार वेगळ्या पद्धतीनं फुलवली. ते स्वत:, सुधा करमरकर अन् वंदना विटणकर यांनी त्या काळात बालनाट्याकरता खूप काम केलं. सुधा करमरकरांनी या चळवळीची सुरुवात केली, लेखक बाबाच होते नाटकाचे (मधुमंजिरी). त्यानंतर त्यांची संस्था वेगळी झाली कारण बाबांना असं वाटायला लागंल की, मुलांना सोपं नाटक द्यावं. मुलांच्या कल्पनेला वाव असलेलं नाटक द्यावं. उदाहरणार्थ, निम्माशिम्मा राक्षस या नाटकामध्ये नदी म्हटलं की एकजण कापड आणायचा अन् या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरायचा, मग त्यात मासे म्हटले की मासे आणून लावायचा; म्हणजे मुलांना काही करायला मिळेल, त्यांना वाव मिळेल असं नाटक त्यांच्या नजरेसमोर होतं. म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं नाटक करणं सुरू केलं. परंतु या तिघांनीही बराच वेळ त्यासाठी दिला. बर्याच शाळांमधून प्रयोग केले.
मला आता वाईट वाटतं की, इतकी चांगली चळवळ पुढे जाऊ शकली नाही कारण जेवढं सहकार्य शाळांकडून आणि समाजाकडून मिळायला हवं, ते कधीच बालनाट्याला आपल्याकडे मिळालं नाही. त्यात पैशाची गणितं असतील, किंवा काही पालकांना असं वाटतं नसेल की, आपल्या मुलांनी नाटक पाहणं महत्त्वाच आहे. खरं म्हणजे नाटक हे मुलांच्या दृष्टीनं फार महत्त्वाच आहे. बाबा हे मोठ्यांच्या पुस्तकांचे लेखक होते, त्यांना कळत होतं की मुलांना वेगळ्या पद्धतीनं शिक्षण देणं आवश्यक आहे. मुलांपर्यंत रंगभूमी पोहोचणं हाच केवळ हेतू नव्हता, तर त्या मुलांमधून चांगली माणसं घडवणं आवश्यक आहे, हे ते जाणून होते. आता हे सगळं जवळजवळ संपल्यातच जमा आहे.
लेखक आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिकांमध्ये रत्नाकर मतकरी वावरलेले आहेत. या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ते कसे असतात, याबद्दल सांगाल?
लेखन करता ते एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतात. अक्षरश: दिवसभर! दुपारी तासभर फक्त जेवायला उठतात अन् रात्री साडेदहा-अकरा वाजेपर्यंत लिहितात. सकाळी दहा वाजता लिहायला बसलेतरी रात्री उशिरापर्यंत लिहीत बसतात. त्यावेळातच ते विचार करतात, मननचिंतन करतात. आपल्याला असं वाटतं की लेखकांना फार शांतता हवी असते, डिस्टर्ब केलेलं चालतं नाही; पण त्यांच तसं नाहिये. आम्ही कधीही त्यांच्या खोलीत जातो, त्यांना काही विचारायचं असेल तर विचारतो, काही बोलायचं असेल तर बोलतो. ते कधी नाही म्हणत नाहीत. आता माझं अमूक चाललंय, असं म्हणत नाहीत. पण तरीही त्यांच्या डोक्यात कल्पना असतात. त्या प्रत्यक्षात येतात. कागदावर साकार होतात. पूर्वी जेव्हा ते नोकरी करायचे, तेव्हा वार्षिक सुट्टी असायची, त्या संपूर्ण महिन्याभराच्या रजेत ते लिखाण करायचे.
दिग्दर्शनाच्या बाबतीत बोलायचं, तर दिग्दर्शन करताना ते फारच मनमिळाऊ असतात. लिखाणाच्या संदर्भात आपण काहीच म्हणू शकता नाही कारण त्यावेळी ते एकटेच असतात. पण दिग्दर्शनाच्या वेळी हास्यविनोद करतात, नटांवर फारसे चिडत नाहीत. एरवी ते एखाद्या गोष्टीबद्दल खूप चर्चा करतील, एखादी गोष्ठ ठासून सांगतील, पण दिग्दर्शनाच्या वेळी ते खूपच समंजस अन् शांत असतात. काही दिग्दर्शक मी असे पाहिलेत, उदाहरणार्थ सत्यजित दुबेजी, की जे पटकन चिडायचे. कधीतरी ही त्यांची स्ट्रॅटेजीही असायची! असं बाबांच्या बाबतीत नाही. त्यांची कुठलीही स्ट्रॅटेजी नाही. त्यांना फक्त मन लावून काम हवं असतं. त्याकरता जी माणसं योग्य असतील ती घेणं अन् सतत लक्ष्यावर लक्ष ठेवून काम करणं, हे ते करतात. एखाद्या नाटकाचं दिग्दर्शन करताना ते पूर्णवेळ दिग्दर्शक असतात. त्यावेळेस ते इतर दुसरं काम नाही करत. घरीसुद्धा ते नाटकाचं स्क्रिप्ट घेउन बसलेले असतात. ते त्यावरच चित्र काढतात. नेपथ्य, वेशभूषा ते स्वत: करतात. हल्ली त्यासाठी माणसं नेमतातच, पण तरीही त्यांचं काम तयारच असतं!
तुम्हीही लेखन आणि अभिनय या क्षेत्रांत आहात. दोन्हीपैकी कुठलं क्षेत्र अधिक जवळचं वाटतं?
तशी माझी तीन क्षेत्रं आहेत. नाटक, लेखन आणि चित्रकला, ज्यात माझं शिक्षण झालयं. जे जे स्कूल ऑफ आर्टची मी पदवीधर आहे. या तीनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आवडीपेक्षा त्या त्या वेळच्या त्या आपल्या गरजा असतात. लेखनाचं म्हटलं तर, अमूक एक अनुभव आपल्याला येतो की जो कागदावर उतरवलाच पाहिजे अशी निकड वाटते, तेव्हा मी लिहिते. मी बाबांसारखी पूर्णवेळ लेखिका मात्र नाही. पूर्वी मला काहीजण विचारायचे, की बाबांनी लिहून दिलंय का? त्यावेळी मला राग यायचा, पण आता गंमत वाटते. किंवा विचारायचे की, बाबा लिहितात म्हणून तू लिहितेस का? तर असं अजिबात नाही. बाबांमुळे लेखन रक्तात आलं असणं शक्य आहे थोडंफार. मला असं वाटतं की, असं दुसरं कुणी नाही लिहू शकत दुसर्यासाठी. एखादी गोष्ट आपल्याला जाणवते ती आपल्याला उतरवायची असते, म्हणून आपण लिहितो. त्यामुळे माझ लिखाण हे मर्यादित आहे.
चित्रकलेचं मी प्रशिक्षण घेतलं आहे आहे आणि मला प्रचंड आवडही आहे. किंबहुना मला चित्रकलेची आवड असल्यामुळे मी ती शिकले. बाबाही चित्रकार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही ती माझ्याकडे आली असण्याची शक्यता आहे. चित्रकलेसाठी फार अंतर्मुख असावं लागतं, जी मी आहे खरं. पण त्यासाठी एकटीनं वेळ खूप द्यावा लागतो, जे मला वाटतं की, एकूण परिस्थिती पाहता एकटं राहणं शक्य नाही.
त्यादृष्टीनं अभिनायासाठी वेळ मला आत्ता देता येतो. म्हणून अभिनेत्री म्हणून मी जास्त दिसते. पण तरीही अभिनय आणि चित्रकला या दोन्ही कला मला अतिशय आवडतात. दोन्ही प्रकारांनी मी जगू शकते. सगळ्यांशी मिळूनमिसळून राहणं अन् चित्रांमध्ये रमणं हे दोन्ही माझ्या आवडीचं आहे. वेळेचाच खरा प्रश्न आहे! लहानपणापासून मी अभिनयात असल्याकारणानं मी त्यात डावं-उजवं नाही करू शकत. अभिनायही तितकाच माझ्या रक्तात आहे जितकं चित्र आहे.
’अधोरेखित’ या तुमच्या नुकत्याच प्रकाशित पुस्तकाबद्दल सांगाल?
माझी दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेतत आतापर्यंत. 'त्रिपुटी' अन् 'अधोरेखित'. अजून एक कादंबरीही मी लिहिली आहे, जी मासिकांतून प्रसिद्ध झाली आहे, पण पुस्तकरूपात अजून आलेली नाही. 'कैफा-हालत-कोमा' हे या कादंबरीचं नाव. मी ओमानमध्ये होते सात वर्षं, त्या वास्तव्याच्या वेळी ती लिहिली आहे.
'अधोरेखित'बद्दल बोलायचं झालं तर ती व्यक्तीचित्रं आहेत. रंगभूमीबद्दल जिवापाड प्रेम असणारी ही माणसं आहेत. उदाहरणार्थ, नेपथ्यकार द. ग. गोडसे आहेत. अरुण होर्णेकर आहेत. किंवा रसिका जोशी, रिमा या अभिनेत्री आहेत. माझी आवडती माणसं आहेत ही.
’इन्व्हेस्टमेंट’बद्दल बोलूया. तीन-चार वर्षांपूर्वी जेव्हा ही कथा दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती, त्यावेळी या कथेबद्दल काय वाटलं होतं?
मला खूप आवडली होती. बाबांचं सगळंच लिखाण मला फार आवडतं. प्रत्येक वेळी त्यांचं लिखाण ते आम्हांला प्रकाशनाच्या आधीच वाचायला देतात. या कथेच्या बाबतीत सांगायचं तर मनावर ठसा उमटवणारी कथा होती ही आणि तशा प्रतिक्रिया इतर अनेक वाचकांकडूनही आल्या होत्या. या कथेवर चित्रपट करण्याविषयीही अनेकांनी विचारलं होतं. त्या वर्षीच्या दिवाळी अंकांमधील विशेष उल्लेखनीय लेखनांत या कथेचा समावेश झाला होता, इतकी ती लोकप्रियसुद्धा झाली होती.
चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काही सांगू शकाल का ?
चित्रपटातील मी - प्राची - आणि आशिष हे दोघं आजच्या प्रगतिशील पिढीचं प्रतिनिधित्व करतात. प्रगतीच्या नावाखाली जो एकप्रकारचा र्हास होतो आहे, ते हे दोघेही मिळून करत आहेत. दोघांपैकी कुणीही यामध्ये कमी हातभार लावतोय, अशातला भाग नाही. या चित्रपटातील व्यक्तिरेखा जाणीवपूर्वक कुणाचं वाईट करत नसून नकळतपणे हळूहळू ते एकेक करून मूल्यं सोडत जातात. ही व्यक्तिरेखा साकारत असताना मी एक आई म्हणून तिच्याकडे बघू लागले. एकेक दृश्य रंगवत असताना मनात असा विचार येई की, आपणही यातल्या आईच्या जागी आहोत का ? जे आपण वागतो, ते योग्य आहे का किंवा सध्या योग्य/ अयोग्य ठरवणंच किती कठीण झालं आहे. जे काही आपण करतोय, त्याच्या योग्यायोग्यतेला पडताळून कसे पाहायचे? ते भविष्यात आपल्या मुलाच्या कितपत कामी येणार आहे हे कसं ठरवायचं? असे अनेक प्रश्न मला ही भूमिका करताना पडायला लागले, जे सहसा पडत नाहीत. एरवी एखादी व्यक्तिरेखा साकारताना आपण तशी व्यक्ती कुठेतरी पाहिलेली असते, पण तरी आपण असे प्रश्न जिवाला फार लावून घेत नाही. मन लावून काम करत असतो, ती व्यक्तिरेखा आपल्याला कळलेली असते त्याप्रमाणे साकारत जातो. पण इथे मात्र अनेक प्रश्न पडत गेले. आणि आता ती भूमिका साकरल्यानंतर, अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर, चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ज्या एकंदरीत प्रतिक्रिया लोकांकडून मिळाल्या, त्या धक्कादायक होत्या. कारण त्या प्रतिक्रिया 'ही भूमिका खूपच नकारात्मक आहे' अशा अर्थाच्या होत्या. खरं तर तुमचंच वागणं तुम्हांला चित्रपटातून दाखवलं जात आहे, तुम्हांला आरसा दाखवला जात आहे आणि ते तुम्हांलाच पाहताना नकारात्मक वाटतंय! याचा अर्थ समाजच नकारात्मक बनत चालला आहे!
तुम्हांला स्वतःला असं वाटतंय का ही भूमिका नकारात्मक आहे?
ही भूमिका स्वीकारल्यानंतर मी ’ही भूमिका नकारात्मक आहे का’ हा प्रश्न बाबांना विचारला होता. मी तोपर्यंत बहुतकरून सहानुभूती घेणार्या भूमिका केल्या होत्या. कारण आपल्याकडे सहसा मध्यवर्ती भूमिका या सहानुभूती घेणार्याच असतात. लेखकालाही त्या भूमिकेविषयी सहानुभूती असतेच, त्याशिवाय लेखक अशा भूमिका लिहिणारच नाहीत. पण ही भूमिका मात्र मध्यवर्ती असूनही तिला जराशी गडद छटा आहे. म्हणून मी बाबांना विचारलं की मी ही भूमिका करावी का? की इतर कुणी अभिनेत्री हवी जिनं अशी गडद छटांमधली कामं, भूमिका अधिक केलेल्या आहेत? तेव्हा ते मला म्हणाले होते की, मी ही भूमिका गडद रंगातली म्हणून लिहिलेली नसून वास्तववादी म्हणून लिहिलेली आहे. त्यातले जे रंग गडद वाटतील, त्याबद्दल प्रत्येकानं आत्मपरीक्षण करावं. आमच्या विचारानुसार ही आजची स्त्री आहे. नोकरी करणारी, तरी स्वतःच्या घराकडे लक्ष देणारी, घरासाठीच सगळं करणारी आहे. ती घराची जबाबदारी झटकणारी नाही. तरी शेवटी ती नकारात्मक आहे की नाही, हे ज्याचं त्यानं ठरवावं.
अशा विचारसरणीच्या स्त्रिया किंवा माणसं तुम्ही कधी पाहिली आहेत का?
मला असं वाटतं, अशी अनेक माणसं आपल्या भवती आहेत. आपल्या आसपासही आणि आपल्यामध्येही थोडाफार प्राचीचा अंश आहे. आपल्या समाजात कुठे तडजोड करावी व कुठे नाही, असे विचार करायला लावणारे प्रसंग अनेकदा येतात. त्यांतल्या काही गोष्टी आपल्या इतक्या जास्त फायद्याच्या असतात की छोटी तडजोड आपल्याला काहीच विशेष वाटत नाही. त्यामुळे कमीअधिक प्रमाणात तडजोडी करणारे आणि त्याबद्दल दोषी वाटेनासं झालेले अनेक आपल्या देशात आहेत. अगदी माझ्यासकट. ते खरंतर असा विचार करतात की, 'धिस इज अ पार्ट ऑफ द गेम!'
ही सगळी मानसिक तयारी, या भूमिकेसाठी, तुम्ही कशी केली?
खरं सांगायचं तर हा चित्रपट करायला घेतला तेव्हा आम्हांला अशा वेगळ्या तयारीसाठी काहीच वेळ मिळाला नाही. म्हणजे आज मागे वळून बघताना असं वाटतंय की, इतक्या धावपळीतून इतकी चांगली कलाकृती कशी काय निर्माण झाली? कारण आमच्याकडे उत्तम लिहिलेली पटकथा होती, पण मनुष्यबळ अत्यंत कमी होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर, मी ज्या चित्रपटांत काम करते, त्या चित्रपटांसाठी वेशभूषासंकल्पन मी कधीच करत नाही. हे चित्रपटाच्याच बाबतीत नव्हे, तर मी काम करत असलेल्या नाटकांची वेशभ्हूषाही मी करत नाही. एरवी मी अनेक मालिकांसाठी, नाटकांसाठी वेशभूषासंकल्पन केलं आहे. रसिका जोशी 'व्हाईट लिली, नाईट रायडर' करत असताना मी त्या नाटकासाठीही वेशभूषासंकल्पन केलं होतं आणि मला त्यासाठी पारितोषिकसुद्धा मिळालं होतं. पण हे मी स्वतः काम करत असताना करत नाही. कारण मला भूमिकेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याची इच्छा असते. पण ’इन्व्हेस्टमेंट’मध्ये मात्र मी दोन्ही केलं आहे. कारण वेशभूषेसाठी स्वतंत्र व्यक्ती नेमण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्हांला हा विचार लोकांपर्यंत न्यायचा आहे, ही एकच जिद्द होती आमची. आमचा फक्त एक ग्रूप होता. हा ग्रूप मात्र हुशार आणि अनुभवी लोकांचा होता. म्हणजे सुलभाताई, तुषार दळवींसारखे अनुभवी नट होते. इतरही तंत्रज्ञ असेच अनुभवी लोक होते. या सर्वांनी आपली सगळी ताकद या चित्रपटासाठी वापरली. त्यामुळे पैसा नसूनही हा चित्रपट उत्तम बनला. मीही फक्त वेशभूषासंकल्पनच नाही, तर घरचंच प्रॉडक्शन असल्यानं इतरही ठिकाणी लक्ष देत होते. अगदी जेवण आलं की नाही हे बघण्यापासून कामं मी केली. डबिंगच्या वेळीही जेव्हा माझं डबिंग चालू असायचं, तेव्हा पाहुणे कलाकार म्हणून आलेल्या पंकज विष्णू, शिरिष आठवले यांसारख्या कलाकारांचं डबिंग अध्येमध्ये करून घेणं अशा अनेक गोष्टींकडे लक्ष देत मी ही भूमिका केली आहे. परंतु एक मात्र नक्की की वर्षानुवर्षं ही कथा मला माहीत होती, अनेक वाचनं ऐकली होती त्यामुळे अभ्यास हा नकळत खूप झाला होता. डोक्यामध्ये सगळं तयार होतं. माझी अध्येमध्ये जराशी चीडचीड व्हायची की, 'अरे, इतकं मोठं काम करायचंय... मला जरासा वेळ द्या लक्ष केंद्रित करायला!!' पण तरी मी निभावून नेलं. कारण हे शिवधनुष्य पेलायचंच, हे मी ठरवलं होतं.
गणेश मतकरी या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत. या चित्रपटासाठी त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा अनुभव कसा होता?
गणेश जास्त बोलत नाही. तो बरंचसं तुमच्यावर सोडतो. मला पूर्वीपासून असा अनुभव आहे की बहिण म्हणून तो कधीच मला आदर दाखवत नाही, पण अभिनेत्री म्हणून त्याला माझ्याविषयी प्रचंड आदर आहे. हा आदर छोट्याछोट्या गोष्टींमधून दिसतो. त्यानं ’गहिरे पाणी’ या मालिकेसाठी जेव्हा पहिली गोष्ट दिग्दर्शित केली होती, तेव्हा त्यानं मला सांगितलं होतं की, तू यामधे काम कर, आपण अशी गोष्ट निवडू की जीत तुला वाव असेल, म्हणजे माझा नटांना शिकवण्याचा भार कमी होईल, कारण तुला एकतर बाबाच्या कथांबद्दल माहिती आहे आणि अभिनेत्री म्हणून माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू हे पेलून नेशील. तीच गोष्ट या सिनेमाबाबतीतही घडली. त्याला पूर्णपणे माहीत होतं की मी नक्कीच या चित्रपटाला न्याय देइन. या चित्रपटानंतर मी त्याच्याबरोबर एक लघुपटही केला आहे. मी आणि मुक्त बर्वे अशा दोघींचाच त्यात अभिनय आहे. हा त्याचा एक खूप मोठा विश्वास माझ्यावर आहे, जो बाबांचाही आहे. त्यामुळे ’इन्व्हेस्टमेंट’च्या दिग्दर्शनावेळी तो फार काही सांगत नसे, परंतु तो एवढं बघायचा की कुठलीही एक ओळसुद्धा जास्त उंचावली जात नाहिये ना. बाबा संपूर्ण परिणामाकडे जास्त बघायचे. पण माझं काम व्हॅम्पिश होत नाहीये ना, संवाद खूप टिपिकल होत नाहीयेत ना हे गणेश खूप बारकाईनं बघायचा. चित्रपटाचं छायालेखन करणार्या अमोलनंही या गोष्टी बारकाईनं बघितल्या.
अमोल गोळे हे नाव उत्तम डिजिटल छायालेखनाशी जोडलं गेलं आहे. अमोलबद्दल अजून सांगू शकाल का?
अमोल गोळेबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा चित्रपट तयार व्हायला अमोल गोळे हे एक प्रमुख कारण आहे. कारण बाबाकडे पटकथा लिहून तयार होती, तेव्हा अमोलनं वारंवार घरी येऊन सांगितलं की, आपण हा चित्रपट डिजिटल करू, जास्त पैसे लागणार नाहीत. अर्थात नंतर कळलं की, कसंही चित्रित केलं तरी पैसे लागतातच. पण हे मात्र खरं की डिजिटल तंत्रज्ञानामुळे शूटिंगला खूप कमी पैसे लागतात. पण अमोलनं सतत ’हा चित्रपट आपण करू, सुंदर कल्पना आहे तुमची, एवढा चांगला स्क्रीनप्ले आहे, कसंही करून आठदहा लाख जमवून आपण हा चित्रपट करू’ हा घोषा लावल्यामुळे हे सर्व झालं. शिवाय त्यानं तारखा, पैसे यांबाबतीत खूप सहकार्य केलं. पहिली गोष्ट अमोलनं मला सांगितली होती, ती म्हणजे मेकअपशिवाय काम करायचं. हे ऐकून मी हबकले होते. मी त्याला म्हटलं, अमोल, मी काही अप्रतिम सौंदर्यवतींपैकी नव्हे की ज्या सिनेम्यामध्ये मेकअपशिवाय छान दिसतील. तो मला म्हणाला की, माझं ऐक, कारण तुला दुसरा पर्याय नाहीच आहे, तुला माझं ऐकावंच लागेल. मग आम्ही पहिल्यांदा चित्रपटात जो पहिला सीन आहे, तोच शूट केला. तो पहिला शॉट त्यानं मला दाखवला, ते पाहिल्यावर मी खूप निश्चिंत झाले. अमोल म्हणत होता ते मला पटलं. चित्रपटातलं सौंदर्य, फ्रेममधलं सौंदर्य आणि आपल्या सौंदर्याचा काहीच संबंध नाही. सिनेमा चांगला होणं म्हणजे त्यातली ती पात्रं खरी दिसणं. अमोलनं या चित्रपटातला वास्तववाद खूप जपला. आणि दुसरं म्हणजे अमोल भयंकर झोकून काम करतो. चित्रपटात एक प्रसंग आहे, ज्यात तुषार सोळाव्या मजल्यावरच्या बाल्कनीत अस्थिकलश टांगतो. हा शॉट त्यानं बाल्कनीच्या कठड्यावर उभा राहून शूट केला, कारण आमच्याकडे इक्विपमेंट नव्हती. खूप अवाढव्य इक्विपमेंट घरात आणणंही शक्य नव्हतं. कारण त्या घरमालकांनी इमारतीत चित्रीकरण करण्याची परवानगीच दिली नसती. त्या कठड्याला खूप कमी लांबीचं पॅरापीट होतं. वरून माणूस पडला तर संपलंच सगळं. आणि हा तिथे उभा राहून लायटिंग करत होता. मी माझ्या सीनचा विचार करण्यापेक्षा अमोलकडेच लक्ष देऊन होते. चित्रपट पाहिल्यावर तुमच्या ल़क्षात येइल की, अमोलनं अनेक वेगळे अँगल यात वापरले आहेत आणि हा संपूर्ण हॅन्डहेल्ड कॅमेरा आहे.
याबद्दल मी तुम्हांला विचारणारच होतो. संपूर्ण चित्रीकरण हे कुठेही ट्रायपॉड न वापरता झालेलं आहे. यामुळे काही फरक पडला का?
फरक पडला, पण तो चांगला फरक होता. सुमित्रा भाव्यांनी विचारलं की एवढे अप्रतिम अँगल्स अमोलनं मिळवले कुठून? जिथे जागा नाही अशा ठिकाणी हॅन्डहेल्ड कॅमेर्याशिवाय पर्यायच नसतो. सामान्य आकाराच्या खोलीत, जर नेहमीचं फर्निचर भरलेलं असेल, तर ट्रायपॉड वगैरे वापरत चांगले अँगल मिळवणं शक्य नसतं. अमोलच्या हँडहेल्ड कॅमेर्यामुळे वेगळे अँगल मिळाले, परंतु मला एक तोटा त्याचा असा दिसला की त्याला पाठीचा त्रास झाला. त्यानं पाठीवर घालायला जॅकेटसारखं काहीतरी बनवून घेतलं होतं. कॅमेरा न हलण्यासाठी त्याचा उपयोग झाला, पण तरी पाठीवर वजन येतंच. शेवटी मी त्याला म्हटलं की, अमोल, तू सगळे सिनेमे जर असे करशील तर तुला पाठीचा मोठा आजार होइल. सिनेम्याच्या दृष्टीनं खूप चांगली असली तरी हॅन्डहेल्ड कॅमेरा ही फार दमवणारी गोष्ट आहे.
तुमचा सुलभा देशपांडे आणि तुषार दळवी यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?
सुलभामावशीबरोबर यापूर्वी मी काम केलं आहेत. ’कुलवधू’ नावाच्या मालिकेत आणि त्याहीपेक्षा खूप आधी मी अगदी कॉलेजात असताना ’अग्निदिव्य’ नावाचं बाबांचंच नाटक होतं. त्यात सुलभामावशीची सासूची नकारात्मक भूमिका होती. मी त्यात सुनेच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. माझी मध्यवर्ती भूमिका नव्हती, पण माहेरची बाजू सांगणारा माझा फार सुंदर रोल होता. व्यावसायिक रंगभूमीवर माझी पहिली भूमिका मला अरविंद देशपांड्यांनी दिली. कानेटकरांच्या ’प्रेमाच्या गावा जावे’ हे ते नाटक. त्यामुळे देशपांडे कुटुंबाशी माझे खूप जुने, प्रेमाचे संबंध आहेत. त्यामुळे सुलभामावशीचा आणि माझा रॅपो सेटवर उत्तमच होता. पण तिचा या चित्रपटाच्या बाबतीतला अनुभव मला अवश्य सांगण्य़ासारखा वाटतो. चित्रपट सुरू करताना तिला सांगितलं होतं की, आम्ही चित्रपट सुरू करत आहोत, पण पैसे नाहीत, त्यामुळे चित्रपटाचा काय होईल, हे माहीत नाही. तेव्हा ती म्हणाली की, रत्नाकरला चित्रपट करायला उशीरच झालाय. तो चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय आणि मी त्याचा एक भाग असणार आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मग बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. तुम्हांला यातून पैसे मिळालेच तर मी म्हणेन, मला देऊ नका ते पैसे, त्यातून दुसरा सिनेमा करा ते पैसे घालून. इतकी तिची प्रतिक्रिया उत्साहवर्धक होती.
तुषारबरोबर मी काही वर्षांपूर्वीच ’तनमन’ हे व्यावसायिक नाटक केलं होतं. त्यामुळे आमच्यात ताळमेळ आहे. आम्हांला एकमेकांची खूप माहिती आहे. आम्ही कशा प्रकारे प्रतिकेइया देऊ एखाद्या विशिष्ट संवादाला हे आम्ही जाणतो. शिवाय आम्हां दोघांनीही प्रायोगिक नाटकांपासूनच सुरुवात केली आहे.
भविष्यातल्या प्रोजेक्ट्स्बद्दल सांगाल?
हो, एक खूपच महत्त्वाचा चित्रपट मी नुकताच केला आहे. जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या यशवंतराव चव्हाण नावाच्या एका चित्रपटामध्ये मी भूमिका केली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यावर आधारित असा हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे, आणि यात मी एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व साकारलं आहे. ही भूमिका करायला मिळणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.

टंकलेखनसाहाय्य - रसप, नंदिनी
चिनूक्स, नंदिनी, रसप... आभार!
चिनूक्स, नंदिनी, रसप... आभार!
चांगली झाली मुलाखत
चांगली झाली मुलाखत
छान झाली आहे मुलाखत!!
छान झाली आहे मुलाखत!!
इन्व्हेस्टमेंट बघितला पाहीजे..
मुलाखत वाचताना मला अचानक जाणवले, की जो चित्रपट परिक्षणाचा ब्लॉग मी आवडीने वाचते तो "आपला सिनेमास्कोप" लिहीणारे गणेश मतकरी हेच की!
कसली टॅलेंटेड फॅमिली आहे सगळी! 
आवडीपेक्षा त्या त्या वेळच्या
आवडीपेक्षा त्या त्या वेळच्या त्या आपल्या गरजा असतात. >>
मुलाखत छान झाली आहे ...
छान मुलाखत. हे गणे श बालपणी
छान मुलाखत. हे गणे श बालपणी दूरदर्शन वर पाहि ले आहेत. फार गोड छोटे बाळ होते. खरेच खूप कलासक्त फॅमि ली आ हे. क्यामेराची नवी माहिती कळली.
खुपच सुरेख मुलाखत. गणेश
खुपच सुरेख मुलाखत.
गणेश मतकरी यांचा ब्लॉग मी वाचतो नेहमी.
ते रत्नाकर मतकरी यांचे चिरंजीव हे माहिती नव्हतं.
सुप्रिया विनोद ह्या त्यांच्या कन्या हे ही माहिती नव्हतं.
ह्या मुलाखतीत बरीच माहिती मिळाली.
फक्त चित्रपटाचीच नव्हे तर सर्वच..
अगदी मराठी निर्मात्याला येणार्या अडचणीसहीत...
व्वा!!!!!!१ सुरेख मुलाखत
व्वा!!!!!!१ सुरेख मुलाखत
योगेश, मस्त झाली आहे मुलाखत !
योगेश, मस्त झाली आहे मुलाखत !
योगेश, मस्त झाली आहे मुलाखत !
योगेश, मस्त झाली आहे मुलाखत !
सुप्रिया विनोद ह्या रत्नाकर
सुप्रिया विनोद ह्या रत्नाकर मतकरींच्या कन्या आहेत, हे मलाही माहित नव्हतं..
मुलाखत मस्त घेतली आहे.. खूप छान सुरुवात !!
खूप छान मुलाखत.
खूप छान मुलाखत.
छान मुलाखत
छान मुलाखत
मस्त मुलाखत
मस्त मुलाखत