विषय क्रमांक १ सामर्थ्य आहे दूरशिक्षणाचे

Submitted by शोभनाताई on 24 August, 2013 - 23:37

विषय क्रमांक १
१९८५ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना ही माझ्या मते भारतीय पातळीवरील सकारात्मक परिणाम घडवणारी घटना.पण ज्या उद्देशाने ही निर्मिती झाली ते उद्दिष्ट फलद्रुप व्हायचे आहे.. मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणार्‍या दूरशिक्षणाचे सामर्थ्य समाजाला समजले आहे,ते पुरते वापरले जात आहे असे वाटत नाही. स्पर्धेच्या निमित्त्याने दूरशिक्षणाच मला जाणवलेले आणि मी अनुभवलेले सामर्थ्य विशद करण्याचा छोटासा प्रयत्न

सामर्थ्य आहे दूरशिक्षणाचे

शिक्षण हे शांततापूर्ण सामाजिक बदल घडवून आणणारे साधन आहे असे मानले जाते.स्वातंत्र्योत्त्तर भारतात कल्याणकारी राज्याची कल्पना आस्तित्वात आली.शिक्षण देणे ही राजकीय जबाबदारी बनली.शिक्षणाबाबत सार्वत्रिक शिक्षण आणि शिक्षणाच्या समान संधी यांची घोषणा केली गेली.देशाच्या विकासासाठी मनुष्यबळाचा विकास होणे गरजेचे आहे आणि मनुष्यबळाच्या विकासासाठी शिक्षण हे महत्वाचे साधन आहे असे योजनाकारांच्या लक्षात आले.त्यासाठी औपचारिक शिक्षणावर भर देण्यात आला.पण हळुहळु औपचारिक शिक्षणाच्या मर्यादा शिक्षणतज्ञाना जाणवू लागल्या.औपचारिक शिक्षण पद्धतीत समाजातील सर्व थरातील लोकाना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत.सामाजिक आर्थिक परीस्थीतीमुळे वयाच्या विशिष्ठ काळी प्रवेश घेतला नाही तर शिक्षणाची संधी हुकते.भरमसाठ पैसा खर्च करुन शिक्षणाची उद्दिष्टे मात्र पुरी होऊ शकत नाहीत. १९६४च्या कोठारी आयोगाने औपचारिक शिक्षणाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक उणीवांवर मात करण्या साठी अनौपचारिक शिक्षणाचा पर्याय सुचविला होता.पण आपल्याकडे एखादा विचार परकीय साज चढवून आल्यावरच त्याविषयी हालचाल सुरु होते.आणि तसेच झाले.

जागतिक पातळिवरही औपचारिक शिक्षणाचे शैक्षणिक गरजा पुरवण्यातील अपयश जाणवून विचार मंथन सुरु होते.याचा परिपाक म्हणुन १९७२ मध्ये युनेस्कोतर्फे इंटरनॅशनल कमिशनचा "Learning to be" हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. सतत शिकणारा समाज आणि व्यक्ती हे ब्रिद वाक्य झाले..बदलत्या सामाजिक जीवनाच्या वाढत्या ज्ञानाच्या कक्षा गाठणारी आणि मानवी कल्याण साधणारी अनौपचारिक शिक्षण पद्धती पुढे आली.यामुळे समाजातील सर्व सामाजिक वर्गाना शिक्षण मिळुन जीवनमान सुधारता येइल हा विचार दृढ झाला.या पद्धतीच्या अंतर्गत मुक्त शिक्षण,निरंतर्,दूरशिक्षण असे नवे शिक्षण प्रवाह उदयास आले.या प्रत्येक प्रवाहाने औपचारिक शिक्षणाच्या जोडीने शिक्षण सर्व सामान्य जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.अनौपचारिक शिक्षण प्रणालीने.औपचारिक शिक्षण पद्धतितील साचेबंदपणा दूर करुन लवचिकता आणली. दूरशिक्षणाने विविध अत्याधुनिक संपर्क माध्यमाद्वारे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी केले.निरंतर शिक्षणाने शिक्षणाचा काळ संपल्यावरही प्रत्येकाला आयुष्यभर शिकण्याची संधी दिली.तर मुक्त शिक्षणाने अभ्यासक्रम निवडुन तो केंव्हा कसा पुर्ण करावा हे स्वातंत्र्य दिले.

भारतातही यातुनच दूरशिक्षणाची सुरुवात झाली.नाव दूरशिक्षण असले तरी वरील सर्व विचार प्रवाह यात एकवटले.खाजगी संस्था काही विद्यापीठे यानी दूरशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरु केले.पण याचे स्वरुप प्रामुख्याने पुर्वीच्या बहिस्थ शिक्षणाला पत्रव्यवहाराची जोड असे होते.काही ठिकाणी प्रवेशाबद्दल लवचिकता होती.काही बलस्थाने होती ती म्हणजे प्रवेशावर विद्यार्थी संख्येचे बंधन नव्हते,कोणत्याही वयात अध्ययन शक्य होते,विद्यार्थ्याला कोठे कसे आणि केंव्हा शिकायचे याचे स्वातंत्र्य होते.प्रामुख्याने बी.ए.,बी.कॉम्,एम.ए,एम्,कॉम असेच अभ्यासक्रम होते.

दूरशिक्षणाबाबत राजकिय इच्छाशक्ती मात्र क्षीणच होती.१९७०मध्ये डि.एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाने दूरशिक्षणदेणारे स्वतंत्र विद्यापीठ असावे यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेत मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याविषयी सूचना करण्यात आली.जी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समिति नेमण्यात आली.समितीने १९७४ साली अहवाल सादर केला.लवकारात लवकर अशा प्रकारचे विद्यापीठ स्थापन होण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली.स्वरुप कार्यवाही,आर्थिक बाबिंविषयी सूचना असा मसुदाही तयार झाला.पण कोठे माशी शिंकली माहित नाही कार्यवाही मात्र झाली नाही..प्रत्यक्ष कार्यवाहीला १९८५ साल उजाडावे लागले.

राजीव गांधी पंतप्रधान असताना ही कल्पना उचलून धरली. १९८५ मध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची (IGNU)घोषणा झाली.संसदेच्या कायद्यान्वये स्थापना झाली.कार्यक्षेत्र संपुर्ण भारत होते.विविध संपर्क साधनाद्वारे शिक्षणाचा विकास करुन उच्च शिक्षणापासुन वंचित असलेल्यांपर्यंत शिक्षण पोचविणे,देशातील दूरशिक्षण व मुक्तविद्यापीठाच्या कार्याला चालना देणे,अशाप्रकारचे कार्य करणार्‍या व्यवस्थांचा दर्जा ठरवणे व संघटन करणे ही उद्दिष्टे होती.

यापुर्वी दूरशिक्षणाचे काम करणार्‍या संस्था आता इग्नुच्या छताखाली आल्या.विविध राज्यात स्टेट ओपन युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आल्या..महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्यातील एक.याशिवाय पारंपरिक विद्यापीठाच्या दूरशिक्षण कार्यक्रमाला Distance Course Institute (DCI) असे संबोधले गेले.महाराष्ट्रातील एस.एन.डी.टी.,टिळक विद्यापिठ,मुंबई विद्यापीठ ही अशी DCI आहेत. भारतात इग्नुच्या झेंड्याखाली १० मुक्तविद्यापीठे आणि ६२ डीसीआय आल्या.१९८२ मध्ये दूरशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ४/९%होती ती २०% झाली. सुरुवातीला प्रामुख्याने औपचारिक शिक्षणातील अभ्यासक्रम दुरशिक्षणाद्वारे दिले जात होते.पत्रव्यवहार आणि लिखित साहित्य हेच संपर्काचे साधन होते. आता अभ्यासक्रमाच्या विविधतेतही वाढ झाली.कामगार कायदा शेती,ग्रामविकास,सह्कार,आहारशास्त्र असे समाजाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम सुरु झाले.मुक्त अस्वरुपाचेही काही होते.पाणिप्रश्नावरील शिक्षणाची कोणतीही अट नसणारा जलव्यव्स्थापन अभ्यासक्रम,श्री.अ.दाभोळकरांच्या प्रयोगपरीवारवर आधारित कोणतेही शिक्षण नसले तरी करता येणारा शेती विषयक अभ्यासक्रम हे उदाहरणादाखल सांगता येतील.पत्रव्यवहाराबरोबर दृकश्राव्य फिती,आकाशवाणी, दुरदर्शन,उपग्रहवाहिनी,टेलीकॉन्फरंन्सिंग अशि विविध साधने आली.

या संख्यात्मक वाढी बरोबर दूरशिक्षण गुणवत्तापुर्ण कसे होइल हे पाहणे हि महत्वाचे होते.दूरशिक्षण हे विद्यार्थीकेंद्री असते येथे स्वयंअध्ययन हे महत्वाचे असते स्वयंअध्ययन साहित्य,संपर्क केंद्रे,विद्यार्थ्यानी घरुन लिहून पाठवलेले गृहपाठ तपासून योग्य त्या सूचना देऊन परत पाठवणे या सर्वातून स्वयं अध्ययनाला हातभार लागतो या सर्वाचे तंत्र ,शास्त्र विकसित झाले आहे.पण प्रत्यक्षात ही कामे औपचारिक शिक्षण व्यवस्थेतून आलेली मंडळीच करत होती लिखित साहित्याशिवाय इतर संपर्क साधने तुरळक प्रमाणातच होती.अशा तर्‍हेच्या गरजा भागविण्यासाठी भारतातील सर्व दूरशिक्षणसंस्थांमार्फत गुणवतापूर्ण शिक्षण देणे,विकासासाठी अर्थसहाय्य करणे,इत्यादी कामे करणारी इग्नुची डेक आस्तित्वात आली.विविध ठिकाणी चालणारे अभ्यासक्रम स्वयंपूर्ण असल्याने आर्थिक चणचण असायची ती दूर झाल्याने स्वतःचा विकास साधणारे विविध उपक्रम राबवता येऊ लागले.केवळ लिखित साहित्यावर अवलंबुन न राहता अनेक संस्थानी दृकश्राव्य फिती,तयार केल्या गुणवत्ता वाढवण्या साठी अनेक तांत्रिक साधने घेतली हि साधने तयार करणे वापरणे,स्वयंअध्ययन साहित्य तयार करणे,स्वयं अध्ययन सुलभ होइल अशा तर्‍हेचे संपर्क सत्रात अध्यापन करणे यासाठीचे प्रशिक्षण आवश्यक होते.यासाठी इग्नुच्या STRIDE तर्फे दुरशिक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी दूरशिक्षणाच्या या विविध पैलुबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ लागले.परीक्षाही ऑनलाइन घेता येउ लागल्या..

हे सर्व इतके विस्ताराने सांगण्याचे कारण आजही सर्वसाधारण समाजातच नाही तर शिक्षण क्षेत्रातील लोकांच्या मनातही दूरशिक्षणाबाबत दुजाभाव दिसतो.ते दुय्यम प्रतीचे वाटते.अर्थात इथे सर्व आलबेल आहे असे अजिबात नाही.अनेक अभ्यासक्रम पुरेशा तयारीशिवाय घाइघाइने सुरु होतात.अनेक संस्था दूरशिक्षणाला "सोन्याचे अंडे देणारी कोंबडी" समजतात.लोकोपयोगी अभ्यास क्रमाऐवजी पैसे मिळवून देणार्‍या व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर देतात.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉक्टर उत्तम भोइटे म्हणाले."दूरशिक्षण पद्धती हे सावटातील रोपटे आहे.त्याचे संगोपन काळजीपुर्वक करावे लागते" हे अगदी खरे आहे.उद्दिष्टे,रचना,सर्व बाबी चांगल्या असुनही कार्यवाहीच्याबाबत घोडे पेंड खाते. भारतीय पातळीवर सर्वच चांगल्या योजनांबाबत ही परिस्थिती असली तरी दूरशिक्षणाबाबत प्रथम समाजात विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जास्त जबाबदारीने पाउले उचलणे आवश्यक आहे.कोणत्याही नव्या विचाराला या दिव्यातून जावे लागतेच स्त्रीशिक्षण कुटुंबनियोजन अशा अनेकाबाबत हे आपण अनुभवले आहे.

याशिवाय विचारवंत एखादा उत्तम विचार मांडतात त्यानुसार कार्यवाही सुरु होते पण हळुहळु कार्यवाही करणार्‍यापर्यंत विचाराची झीरपणी होतच नाही गाभा हरवला जातो.शिवजयंती गणेशोत्सव,साहित्यसंमेलन यांचे आजचे स्वरुप आपण पाहतोच.दुरशिक्षणाबाबतही हिच भिती निर्माण होते.मी स्वतः एका डिसीआय मध्ये २२वर्षे काम केल्याने दूरशिक्षणापुढच्या निसरड्या वाटा आणि दूरशिक्षणाचे सामर्थ्य दोन्ही जवळुन पाहिले आहे

दूरशिक्षणाच्या एका प्रयोगात मी १९८५ मध्ये सामील झाले.बी.ए.चा अभ्यासक्रम होता.५०० विद्यार्थ्यानी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता.वंचितांपर्यंत शिक्षण पोचावायच हि भूमिका होती निश्चित असे कोणतेच प्रतिमान नव्हते.नेमके करायचे काय्?प्रतिसाद कसा असेल? भवितव्य काय असेल सर्वच धुसर होत.नवी वाट निर्माण करायची होती.तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाचे स्वरुप सामाजिक शास्त्राचा समन्वित अभ्यास असे होते.लोकशाही परिपूर्ण करणारा सुजाण नागरिक बनवणे हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट होते.विद्यार्थ्याना देण्यासाठी मे.पुं रेगे, ना.वा कोगेकर,नि.वी. सोवनी अशा प्रथितयश विचारवंतानी लिहिलेल्या विज्ञान आणि समाज या विषयावरील पुस्तिका तयार होत्या.१९व्या शतकातील न्यायमूर्ती रानडे ,लोकहितवादी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक इत्यादी विचारवंत; रावसाहेब पटवर्धनाचे लोकशाही सिद्धांत आणि प्रयोग,साव्ररकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध,बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीच्या भवितव्याबाबतचे चिंतन गांधीजींचे खरे स्वराज्य, अत्रेंचे मी कसा झालो, पु.लं.चे चिंतन असे साहित्यातून समाज दर्शन घडवणारे गद्य वेचे निवडून तयार होते.त्या लेखकांचा परिचय लिहायचा होता.एकूण अभ्यासक्रमच अभिनव असा होता.तयारी करता करता आम्हीच घडत होतो.

विद्यार्थी तर समोर नव्हते. कोण आहेत हे विद्यार्थी? उत्सुकता वाढत होती विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज पाहिले.आणि वर्गवारी केली.वैयक्तिक,व्यावसायिक,शैक्षणिक सामाजिक पार्श्वभूमीचे एक चित्र उभे राहिले.जीवनाच्या अनुभवाच्या शाळेत शिकलेल्या या प्रौढ विद्यार्थ्याना शिकवायचे तर आपल ज्ञान अद्ययावत पाहिजे याची जाणिव झाली.महाराष्ट्रातील विविध केंद्रावर वर्षातून तीनदा संपर्कसत्रात ( दोन दिवसाच्या कार्यशाळा. ज्या, एखाद्या मध्यवर्ती गावात घेतल्या जात. विद्यार्थी आपापल्या गावाहून तेथे येऊन शिक्षण घेत ) शिकवायचे होते.२१ ते ८० वर्षापर्यंत वयाचे शिक्षणापासून वंचित विद्यार्थी होते.पूर्व शिक्षणाची अट नसल्याने प्रवेश चाचणीद्वारे आलेले १०वीपर्यंतही शिक्षण न झालेले विद्यार्थी होते.घर प्रपंच नोकरी स्वतःच्या आरोग्याचे प्रश्न,रात्रपाळी अस सर्व सांभाळत ते शिकत होत.शिक्षणाबाबतची तळमळ मात्र सर्वांची एकच होती. अगदी येरवडा जेलच्या संपर्क केंद्रातील कैद्यांचीही.निवासीसंपर्कसत्र ( बाहेर गावातील विद्यार्थ्यांना पुण्यात येऊन राहण्याची व्यवस्था करून घेतली गेलेली शिबिरे ),माध्यम हे नियतकालीक, ज्या आम्ही काम करता करता ऐकु शकु या विद्यार्थ्यांच्या सूचने वरुनच तयार केलेल्या श्राव्यफिती असे विविध उपक्रम करण्र्यास विद्यार्थ्यानीच आम्हाला प्रवृत्त केले.विद्यार्थी व त्यांच्या व्यवहार्य सुचनातून ठरलेल्या रचनेतही बदल होत होते.पुस्तकं अधिकाधिक अद्ययावत होत होती चुकत सुधारत आम्ही पुढे जात होतो दूरशिक्षणाच एक अस्सल भारतीय प्रतिमान घडत होत. विद्यार्थीच नाही तर आम्हीच किती नशिबवान अस वाटायला लागल.

पदवीनंतर विद्यार्थी बाहेरच्या जगात जात होते. अभ्यासक्रमाचे यश सिद्ध करत होते.१०वी नापास सुवर्णा नाइक निंबाळकरनी पुणे विद्यापीठत रा.ग जाधवांकडे पीएच. डी. केली. त्यावर आणि इतर पुस्तकेही लिहिली. रात्र शाळेतुन शिकलेले बेस्टमध्ये सुरक्षा रक्षक असलेले गौतम ननावरे मुक्त पत्रकार झाले.लोकप्रभा लोकसत्ता,नवशक्ती मधून वैचारिक लेख लिहू लागले .जिथे दिवे नाहीत पोष्टही नाही अशा खेड्यातला विकास सुर्यवंशी आय ए.एस. झाला.टाटा मोटर्समध्ये कुशल कामगार असलेल्या निनादनेही असेच उत्तुंग यश मिळऊन परकिय दूतावासात स्थान मिळवले.गृहिणी असलेल्या प्रीती कोल्हे प्राध्यापक झाली.एम.एस्,डब्ल्यु,एम.ए.,लॉ,बी.एड.तर अनेकानी केल औपचारिक अभ्यासक्रमातून आलेल्यापेक्षा आम्ही कमी नाही हे दाखवून दिले.दूरशिक्षणाची विश्वासार्हता वाढवली.या सर्वानी आपल्या यशाच श्रेय आमच्या अभ्यासक्रमाला दिले.

१९९१मध्ये 'डिरेक्टरी ऑफ डिस्टन्स एजुकेशन इंडिया' तयार झाली.आणि संस्थेचा समावेश भारतीय पातळीवरील दूरशिक्षणाच्या नकाशात झाला.हैद्राबाद्च्या सिफेलसारख्या संस्थेत विविध दूरशिक्षण संस्थांच्या प्राध्यापकांसाठी रिफ्रेशर कोर्स आयोजित केला होता त्यामध्ये सहभागी होता आले.दूरशिक्षणाच्या अनेक पैलूंची ओळख झाली इतर संस्थांशी देवाणघेवाण झाली.स्ट्राइडने (Staff Training and Research Institute of Distance Education) स्वयंअध्ययन साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण दिले.तंत्रज्ञानाचा किती मोठ्या प्रमाणात उपयोग करुन घेता येतो आणि त्याआधारे कोणताही अभ्यासक्रम तयार करु शकतो याची जाण आली..एकाच अभ्यासक्रमावर न थांबता विविध अभ्यासक्रम करण्याची प्रेरणा मिळाली.वृत्तपत्रविद्या पदवी, समाजकार्य पदविका, बी.सी.ए. जलव्यवस्थापन असे नवे अभ्यासक्रम सुरु झाले. डेककडून आर्थिक मदत मिळणे शक्य झाल्याने संगणक प्रशिक्षण,संपर्ककेंद्रांचा विकास,नविन अभ्यासक्रमाचे स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यासाठी. आर्थिक सहाय्य मिळाले.विद्यार्थी संख्या ५००वरुन ४०००पर्यंत गेली.आधी कुटिर उद्योग होता आता लघु उद्योग झाला.इग्नु या मोठ्या उद्योगाच्या आधाराने वाढणारा.संख्यात्मक वाढ झाली खरी पण उद्योगाबरोबर येणार्‍या इतर संस्थांशी स्पर्धा,त्यासाठी तत्वांशी फारकत,मार्केटींग,यांत्रिकताहि आली.आणि मला व्यक्तिशः वाटले वंचितापर्यंत शिक्षण या मुळ उद्दिष्टापासुन दूर जात आहोत पर्सनल टच कमी झाला आहे.यु.जी .सी.च्या भारतभर सर्व अभ्यासक्रमात सारखेपणा आणण्याच्या भूमिकेला अनुसरुन आमचा अभिनव अभ्यासक्रमही बदलला गेला.आता बाहेर पडतिल ते फक्त पदवीधर. मला नाही वाटत यातून कोणी सुवर्णा, विकास, गौतम घडतील.

वरील उदाहरण सामर्थ्य आणि सामर्थ्यावर येणार्‍या मर्यादा सांगण्या साठी दिले आहे. असे असले तरी अनेक चांगल्या गोष्टी घडल्या.औपचरिक शिक्षणात वर्षानुवर्ष जुन्या नोट्सवर शिकवणारे अनेक प्राध्यापक आढळतात.दूरशिक्षणामुळे त्यात्या क्षेत्रातील तज्ञानी तयार केलेल्या स्वयंध्ययन साहित्याद्वारे एकाचवेळी लाखो विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम मार्गदर्शन पोचले.डॉक्टर राम ताकवले,जेष्ठ पत्रकार एस.के. कुलकर्णी,मे.पुं रेगे,डॉक्टर प्रकाश देशपांडे,अशी काही नावे सांगता येतील.यामुळे मराठीतुन आणि इतर प्रादेशीक भाषातुन विविध विषयाचे शास्त्रीय ज्ञान निर्माण झाले.या क्षेत्रात काम करणारेही अनेक लिहिते वाचते झाले.स्पर्धा परीक्षांसाठी हे साहित्य उपयुक्त असल्याचे या क्षेत्रात यश मिळवणार्‍या अनेकानी नमुद केले.तळा गाळा तील वाड्या वस्त्यातील,दर्‍याडोंगरातील सामाजिक आर्थिक कारणामुळे शिक्षणापासुन वंचित असणार्‍या पर्यंत ज्ञानाची गंगा पोचली.आणि सुप्तावस्थेतील गुणवत्तेला जिवन मिळाल.ज्ञानासाठी आसुसलेल्या प्रौढाना बंद असलेली विकासाची दारे मोकळी झाली.हे शासकीय पातळिवरच झाल.व्यक्तिगत पातळिवरही दुरशिक्षणाचा वापर होत आहे.जग जवळ आल्याने वैश्विक समाज झाला आहे.जगाच्या पाठिवर कोणत्याही भागातुन कोणालाही शिकणे आता शक्य झाले आहे.पुढे काही उदाहरणे देत आहे.

कॅनडातील न्युरॉलॉजिस्ट मंदार जोग शास्त्रिय संगिताचे शिक्षण ऑनलाइन घेतात भारतात येउन मैफलहि गाजवतात.स्काइपच्या आधारे तंबोरा लावणे वाद्यशिकणेही शक्य होते.आपलीच एक मायबोलीकरीण अवलने शिकाशिकवा असा विणकामाचा अभ्यासक्रम तयार केला या आधारे तिच्या अमेरिकेतील विद्यार्थिनिने आपल्या छकुल्याला स्वेटर केला.घरबसल्या आपले काम करताकरता असे छंदही जोपासता येतात.दुसरी मायबोलीकर अरुंधती कुलकर्णिने अमेरीकेतील विद्यापिठाचा कोर्सेराद्वारे 'लिसनिंग टु वर्ल्ड म्युझीक' हा अभ्यासक्रम केला तिचापासुन प्रेरणा घेऊन अनेक मायबोलीकरानीही अभ्यास्क्रमास प्रवेश घेतला..हे झाले वैयक्तिक प्रयत्न असे प्रयत्न संस्थात्मक पातळीवर झाल्यास जास्तितजास्त लोक याचा फायदा घेउ शकतील.आज कितीतरी विषयांच्या ज्ञानाची समाजाला गरज आहे.आणि काही विषयांच ज्ञान समाजाला देण्याची गरज आहे.विवाह्पुर्व समुपदेशन,बाल संगोपन, पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्या,हे काही कौटुंबिक गरजेचे प्रश्न उदाहरणादाखल .समाजाला देण्याच्या ज्ञानात माहितिचा अधिकार्,जलव्यवस्थापन आणि नियोजन,स्त्रिविषयक कायदे,स्थानिक इतिहास हे सांगता येतील दुरशिक्षणाची सुरुवात शासनाकडुन झाली.तरी उद्दिष्ट पुर्तीसाठी फक्त शासन पुरेसे नाही. दुरशिक्षणाद्वारे हे अभ्यासक्रम तयार करण्यात स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा.आणि सामजिक प्रश्नाविषयी सजग असणार्‍या मायबोलिनी आणि मायबोलिकरानीहि घ्यावा मायबोलिकडे तंत्रज्ञ आहेत्,विषयातील तज्ञ आहेत.मुख्य म्हणजे समाजाविषयी आस्था असणारे तळमळीचे कार्यकर्ते आहेत.माझ्या लेखातील मर्यादांची मला जाण आहे परंतु स्पर्धेच्या निमित्त्याने हे आव्हान करण्यासाठीच हा लेखन प्रपंच. .

__________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या जाणिवा समृद्ध करणारा लेख.
>>याशिवाय विचारवंत एखादा उत्तम विचार मांडतात त्यानुसार कार्यवाही सुरु होते पण हळुहळु कार्यवाही करणार्‍यापर्यंत विचाराची झीरपणी होतच नाही गाभा हरवला जातो. >>
किती यथार्थ निरीक्षण कारण स्वानुभवातून सिद्ध झाले आहे.
दूरशिक्षण हा कुटिरोद्योग झाल्याचे विपरित अनुभव आपल्यापैकी कित्येकांनी घेतले असतील, मीही. पण या व्यक्तिगत फसगतींपलिकडे नेणारा, दूरशिक्षणाचा आवाका, त्याची गरज व मर्यादा व्यक्त करणारा लेख आवडला शोभनाताई. शुभेच्छा.

या विषयावर लिहायचे म्हणजे लेखकाच्या ज्ञानाचा कस लागणार असल्याचे प्रथमच स्पष्ट होते आणि ती बाब शोभनाताई यानी अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे. "दूरशिक्षण" बद्दल इतके सविस्तर अन् तेही योग्य त्या आकडेवारीच्या साहाय्याने शब्दबद्ध करणे ही फार मोठी कसरत आहे. मी दोनवेळा हा लेख वाचला, एवढ्यासाठी की या क्षेत्रात समुपदेशन तसेच शिक्षणज्ञानाचे कार्य करणार्‍या व्यक्तीपुढे नेमकी कोणती आव्हाने असतात शिवाय एखाद्या कामाचा ध्यास घेणे म्हणजे काय, याचाही उलगडा होत गेला.

काही मुद्द्याबाबत चर्चेच्या अनुषंगाने लिहितो.....ही टीका नव्हे. इटॅलिक केलेल्या ओळी तुमच्या आहेत :

१. "...औपचारिक शिक्षण पद्धतीत समाजातील सर्व थरातील लोकाना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत...."
मला वाटते असे होत नव्हते. मूळारंभापासून क्वॉन्टीटी, क्वालिटी आणि इक्वॅलिटी यांचा प्रसार, समानता व दर्जा साधणार्‍या, स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील सरनामा, मार्गदर्शन तत्वे मूलभूत हक्क व कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याचे ज्ञान व भान देणार्‍या नवशिक्षण व्यवस्थेचा शोध हे नवभारतापुढेल प्रथम क्रमांकाचे आव्हान होते. त्यानुसार केन्द्र सरकारच्यावतीन राज्यपातळीवर 'श्वेतपत्रिका' प्रकाशित करून शिक्षणगंगा खोलवर कशी रुजू शकेल याकडे लक्ष देण्यात आले होते. त्या दृष्टीने पाहिल्यास औपचारिक शिक्ष पद्धतीत समाजातील सर्व थरातील मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत हा आग्रह होता. आता ही बाब अलग की झाडून सार्‍या पालकांनी सरकारच्या या उदात्त हेतूकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलाला शिक्षण देणे म्हणजे घरातील एक कमावता हात कमी करणे अशी खुळी समजूत करून घेतली होती. त्या काळात कुटुंबात किती मुले असावीत याला कसलाही घरबंध नव्हताच. थोडक्यात तुम्ही म्हणता तसे लोकांना शिक्षणाच्या संधी जरी मिळत नसल्या तरी त्यामागे सरकार दोषी आहे असा जो सूर निघतो तो सरकारी यंत्रणेवर निष्कारण ठपका ठेवतो.

या संदर्भात यु.जी.सी. करीत असलेले शिक्षणप्रसाराचे [त्यातही आर्थिक बाजू भक्कम करणे] कार्य आदर्शवत असेच ठरले आहे.

२. "...१९७२ मध्ये युनेस्कोतर्फे इंटरनॅशनल कमिशनचा "Learning to be" हा अहवाल प्रसिद्ध झाला होता..."

या विषयी मी वाचले होते मात्र भारत सरकारने ह्यातील शिफारशींचा जशाच्यातसा स्वीकार केला असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट मानली पाहिजे. किबहुना "अनौपचारिक" शिक्षण प्रणालीची लर्निंग टु बी ही गंगा असेल तर युनेस्कोने त्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. Learning to know, Learning to do, Learning to live together, Learning to be हे ते अनौपचारिक शिक्षणाचे चार खांब, ज्याभोवती ही शिक्षणपद्धती गुंफण्यात आली आहे. [खरे तर या मुद्द्यावर अजून सविस्तर लिहायला हवे, पण माझ्या सवयीप्रमाणे मूळ लेखापेक्षा प्रतिसादच मोठा होत जाणार याची भीती वाटत आहे....पुढे केव्हातरी..!]

३. "....आजही सर्वसाधारण समाजातच नाही तर शिक्षण क्षेत्रातील लोकांच्या मनातही दूरशिक्षणाबाबत दुजाभाव दिसतो.ते दुय्यम प्रतीचे वाटते....."

~ असं असेल तर मग ही फार दुर्दैवी घटना आहे. दूरशिक्षणाबाबत दुजाभाव असलाच तर तो नियमित शाळाकॉलेजला जाऊन आपले अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांत आणि तेथील टीचिंग स्टाफमध्ये असणार [याबाबतही शंका आहेच]. "शिक्षण दुय्यम प्रतीचे वाटते..." असा टीकेचा सूर नियमित शिक्षकवर्गाकडून काढला जात असेल तर ते फार चुकीचे असून लोकांची दिशाभूल करणारे आहे.

४. "...सुवर्णा नाईक-निंबाळकर, गौतम ननावरे, मायबोलीकर अवल, अरुंधती कुलकर्णी..."

आदी विद्यार्थ्यांच्या/कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल तसेच अनौपचारिक शिक्षणातील यशाबद्दल शोभनाताई यानी दिलेली माहिती खूप उत्साहवर्धक आहे. बाकी लेखातील सर्वच घटकांवर अजूनही सविस्तर लिहायला आवडले असते, पण वर लिहिल्याप्रमाणे प्रतिसाद मोठा होऊ नये म्हणून थांबतो.

लेखिका स्वतःच या क्षेत्राशी गेली २०-२५ वर्षी संबंधित असल्याने लिखाणामागील त्यांची तळमळ स्पष्टपणे जाणवते.

अशोक पाटील

शोभनाताई,
अतिशय अभ्यासपूर्ण लेख. शुभेच्छा!
अशोकजी,
सर्वच लेखांवरील आपल्या प्रतिक्रिया वाचत आहे त्यातून तुमचा प्रत्येक विषयावरील अभ्यास स्पष्ट्पणे जाणवतो. अगदी मनापासून वाटतं की तुमचाही लेख स्पर्धेत असता तर स्पर्धा अधिक समृध्द झाली असती.

थॅन्क्स लालटोपी....

तुम्हा युवा मंडळीचे लेखन वाचण्यात मला जो आनंद मिळत आहे तो माझ्या प्रतिसादातून क्वचित उमटतही असेल. आता अभ्यासाचे म्हणाल तर इतकेच म्हणू शकेन की काही विषयांची आवड असल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करीत नसलो तरी अभिप्राय देऊ शकतो. शिक्षण हे त्यापैकीच एक.

शिवाय शोभनाताई यांच्यासारख्या शिक्षिका असले प्रभावी लेखन देत असताना त्यांचेच कौतुक करणे मला भावते.

अशोक पाटील

अशोकजी तुमच्या दिर्घ आणि बहुमोल प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद.इतक्या मनापासुन याविषयावर कोणी चर्चा करु इछीत हेच माह्यासाठी खुप आहे.माझ्या मर्यादा माहित आहेत अस मी लेखात म्हटल आहेच या विषयाकडे लक्ष वेधण हाच मुख्य हेतु होता.समस्येची व्याप्ती मोठि आहे.बर्‍याच बाबी शब्द मर्यादामुळे लिहिता आल्या नाहीत.
जे.पी. नाईक यानी क्वालिटी क्वान्टिटि,इक्व्यालिटी या पुस्तकात आपण मांडलेल्या विचारांचा उहापोह केला होता खर तर त्यांच्यावर लिहाव अस एकदा वाटल होत पण ते वेळेच्या मर्यादेत शक्य होइल असे वाटले नाही पण पुनः लिहिन.
औपचारिक शिक्षणाच शिक्कामोर्तब नसल तर शिक्षण बंद होण ठराविक वयात शिकण, कोणताही विषय केंव्हाही शिकता न येण,.पुर्णवेळ शाळेत जाउनच शिकाव लागण अशा विविध मर्यादा मला म्हणायच्या होत्या. सर्व दोष शासनाला देऊन चालणार नाही या आपल्या मुद्द्याशी मी सहमत आहे.योजना चांगला असतात अम्मल बजावणी करताना घोड पेंड खात अस मि लिहिल होत.पण शब्द संखया कमी करताना बहुता गाळल.
माझ उत्तर पुनः एक लेख होउ नये म्हणुन थांबते.

लाल टोपी धन्यवाद अशोकजींबद्दलच्या आपण मांडलेल्या मताशि सहमत.

काकू, मस्त विषय. तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडून मला इथे यापेक्षा जास्त सखोल, तपशीलातले, तुमची मतं असलेले लेख वाचायला आवडतील. शिवाय संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर या ग्रूपमधेही तुमचे लेख येतील या आशेवर आहे Happy

छान लेख.
अगदी खरं सांगायचं तर या लेखाने माझे जे विषय शिकायचे राहीलेत ते निवृत्त झाल्यावर शिकता येतील,
अशी आशा वाटायला लागली आहे. या क्षेत्राचा विकास व्हावा असे मनापासून वाटते.

अरे वा, शोभना छान लिहिलय्स . कित्ती आठवणी जाग्या झाल्या Wink
अशोकमामा, नेहमी प्रमाणे अतिशय अभ्यासू प्रतिसाद !

कविन, जाइ,रैना,दिनेशदा,अवल्,शुगोल सर्वाना आवर्जुन वाचुन प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद

या विषयावर वेगळा असा विचार कधीच केला नव्हता.
तुमच्या लेखामुळे बर्‍याच गोष्टी सामोर्‍या आल्या.
छान लेख Happy

अभ्यासपूर्ण आणि तळमळीने लिहीलयत तुम्ही >>> +१०००...

काकू, मस्त विषय. तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडून मला इथे यापेक्षा जास्त सखोल, तपशीलातले, तुमची मतं असलेले लेख वाचायला आवडतील. >>> +१००....

अत्यंत सुंदर लेख. विशेषतः दूरस्थ शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या सर्व 'विद्यार्थ्यांचे खरंच कौतुक. दिनेशदा म्हणाले तसं या लेखाने माझे जे विषय शिकायचे राहीलेत ते निवृत्त झाल्यावर शिकता येतील,
अशी आशा वाटायला लागली आहे

धन्यवाद