विषय क्रमांक २ - अमुल - द टेस्ट ऑफ इंडिया !

Submitted by सौरभ.. on 24 August, 2013 - 10:36

साल १९४६.
आणंद. तालुका खैरा. गुजराथमधील एक छोटसं खेडेगाव.
स्वातंत्र्यलढयानी आणि स्वातंत्र्याच्या चाहुलीनी भारलेला देश.
ब्रिटिश सरकारने पोल्सन नावाच्या एका कंपनीला या गावातुन दुध गोळा करण्याचे एकाधिकार दिलेले. या कंपनी मार्फत ठरविले जाणारे गाय आणी म्हशीच्या दुधाचे अन्यायकारक भाव, दुरवरच्या खेड्यापाड्यातुन आणंद मधे दुध पोचवण्यासाठी करावी लागणारी पायपीट, उन्हाळ्यात त्यामुळे खराब होण्यार्‍या दुधामुळे सोसावं लागणार नुकसान आणि एकाधिकारामुळे चालणारा या कंपनीचा मनमानी कारभार, यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. या शोषणाच्या विरोधासाठी निर्माण झाली खैरे दुग्ध सहकारी संस्था. सरदार वल्लभाई पटेल, मोरारजी देसाई यांसारखी मोठी नाव या शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी राहिली. पोल्सन कंपनीला दुध न पुरविण्याचा आणि फक्त नव्याने स्थापन झालेल्या सहकारी दुध संस्थेमार्फतच दुध वितरण करण्याचा निर्णय झाला. यातुन सुरु झाला शेतकर्‍यांच्या आत्मसन्मानाचा, आर्थिक स्वातंत्र्याचा अहिंसक लढा. काही आठवड्यातच दुधाच्या कमतरतेनं सरकारला या दुध महासंघाशी बोलणी करणं भाग पडलं.कदाचित या अशिक्षित, अडाणी शेतकर्‍यांचं हे सहकार आंदोलन काही दिवसही टिकणार नाही अश्या विचारानी मुंबई प्रांतानी या दुध सहकारी संस्थेकडुन दुध घेण्यास सुरवात केली. आणि इथुन सुरु झालेल्या या दुधमहासंघाच्या वाटचालीने एक इतिहास घडवला ! आज याच शेतकर्‍यांच्या सहकारी दुग्धनिर्माण चळवळीला आपण 'अमुल' या नावने ओळखतो !
आत्मनिर्भरतेच्या आणि आत्मसन्मानाच्या लढ्यातुन जन्माला आलेल्या या सहकारी दुध चळवळीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं ते डॉ. वर्गिस कुरियन यांनी.आज गुजराथच्या गावागावातुन लाखो शेतकरी वेगवेगळ्या दुध संग्राहक केंद्रांवर आपलं दुध जमा करतात. या दुधाच्या दर्जानुसार त्यांना त्यांचा मोबदला लगेच मिळतो.या सहकारी दुध महासंघाचे मालकही हेच लाखो शेतकरी आहेत.या महासंघाच्या नफ्याचा वाटाही या शेतकर्‍यांना मिळतो.हा 'अमुल पॅर्टन' निर्माण करुन या देशातल दुग्ध उत्पादन वाढवणार्‍या आणि तळागाळातल्या शेतकर्‍याना त्याचा थेट फायदा मिळवुन देणार्‍या डॉ. वर्गिस कुरियन यांनी या देशात दुग्धक्रांती धडवुन आणली आणि भारताला दुग्ध उत्पादनात जगातील सर्वोत्तम पाच देशात नेऊन बसवलं.

आज अमुल हा जागतिक दर्जाचा ब्रॅंड आहे. गुजराथच्या खेड्यापाड्यातुन दिवसभरात लाखो लिटर दुध अमुलच्या विविध दुध संग्राहक केंद्रांवर जमा होतं.त्या दुधाचं तेथल्या तेथे अत्याधुनिक साधनांनी दर्जामापन करुन शेतकर्‍याला त्याचा मोबदला दिला जातो.मग ते दुध अमुलच्या विविध प्लॅंट्स मध्ये प्रक्रियेसाठी पाठवलं जातं. तेथे दर्जा राखण्याच्या अनेक चाचण्यातुन पार होत, या दुधापासुन बटर, चीज, आईस्क्रीम, चॉकोलेट्स यासारखी अनेक उत्पादन बनविली जातात आणि अत्यंत सक्षम व दुरवर पसरलेल्या वितरण व्यवस्थेमार्फत ही उत्पादनं अक्षरशः काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत वितरित केली जातात. आज अमुल हा फक्त एक
ब्रॅंड राहिला नसुन ते बनलं आहे विश्वासाचं, आत्मनिर्भरतेचं प्रतिक. आपणही छोट्या शेतकर्‍यांच्या मदतीने जागतिक दर्जाची उत्पादन बनवु शकतो हा विश्वास म्हणजे अमुल. अमुलनी सिध्द केलेला 'अमुल पॅर्टन' आज देशाच्या अनेक दुग्ध सहकारी कार्येक्रमांमधे वापरला जातो. यानुसार खेड्यापाड्यातल्या शेतकर्‍यांच्या उत्पादन क्षमतेला गाव, तालुका आणि राज्यपातळीवर पसरलेल्या दुध सोसायट्या आणि महासंघामार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञाशी जोडल जातं आणि त्यातुन मिळणारा फायदाही शेतकर्‍यापर्यंत पोचवला जातो.
आज अमुल परिवारात २६ लाखाहुन अधिक शेतकरी आहेत.विविध केंद्रांवर ९५ लाखाहुन अधिक दुध दररोज जमा होतं.१५ कोटींहुन अधिक रोख रक्कम मोबदल्याच्या स्वरुपात शेतकर्‍यांना वाटली जाते. गुजराथ दुधमहासंघाची वार्षिक उलाढाल आजे १५०० कोटींच्या वर आहे.आणंद येथिल प्लांट हा आशियाती सर्वात मोठा दुध पावडर बनविणारा प्लांट आहे. येथेच जगात सर्वप्रथम म्हशीच्या दुधापसुन पावडर बनविली गेली.अमुलकडे आज आशियातील सर्वात जस्त दुध प्रक्रिया करण्याची क्षमता आहे आणि सर्वात मोठे शीतपदार्थ वितरण जाळे आहे. या सहकारी चळवळीमुळे भारताच दुध उत्पादत १९७१ ये १९९६ या काळात तिपटिनी वाढलं आणि आज ते ९० कोटी मेट्रिक टनांवर पोचलं आहे. अमुलची उत्पादन आज ३७ हुन अधिक देशात निर्यात केली जातात. विविध देशांच्या मॉल्स मधे अमुलची उत्पादन बाकीच्या ब्रॅंड्स बरोबर स्पर्धा करताना पाहुन अभिमानानी छाती फुलुन येते की हे माझ्या मातीतल्या शेतकर्‍याच्या सहकाराच फलित आहे.

अमुलच्या अनोख्या जाहिरात फलकांनीही भारतीय जाहिरात क्षेत्रात नवे पायंडे पाडले.अमुलची ती छोटी गोड 'अमुल गर्ल' आज जगाच्या कानाकोपर्‍यात पोचली आहे.देशात घडणार्‍या विविध बर्‍यावाईट घटनांवर भाष्य करणारे अमुलचे जाहिरातफलक लक्ष वेधुन घेतात आणि जणु आपल्याला सांगतात, 'मित्रा, जर तु या देशात जन्माला आला असशिल, तर या देशात घडणार्‍या बर्‍यावाईट घटनांशी फटकुन राहु शकत नाहीस.' आपल्या आजुबाजुला घडणार्‍या बर्‍यावाईट घटनांपसुन अलग रहाण्याची, 'माझं वैयक्तिक जग, माझं भवितव्य' यात हरवुन जाण्याची एक प्रवृत्ती आज समाजमनात जाणवु लागली आहे. माझ्या मते अमुलचे हे जाहिरात फलक या मानसिकतेला आव्हान देतात आणि विचार करण्यास प्रवृत्त करतात.
शेतकर्‍यांच्या एका आंदोलनाच एका जागतिक दर्जाच्या ब्रॅंड मधिल हे रुपांतर खरोखरच थक्क करुन सोडणार आहे.हे होत असतानाही अमुलने आपलं भारतियत्व आणि शेतकरी हिताचा मंत्र सोडला नाही. म्हणुनच कदाचित अमुलचं घोषवाक्य, 'Amul - The taste of India' आहे आणि 'Amul - The taste of Gujrath' नाही !
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक राजकीय पंडितांनी, 'हा इतकी टोकाची विविधता, विषमता आणि गरिबी असणारा देश एकसंध राहुच शकणार नाही, त्याचे काही वर्षातच तुकडे पडतील' हे छातीवर हात ठेऊन सांगितल. पण आजही तो अखंड आहे. यामुळेच प्रो. रामचंद्र गुहा यांनी भारताला 'अनैसर्गिक देश' अस संबोधलं - 'असा देश जो एकसंध रहाण्याची नैसगिक कारणं सापडत नाहीत' ! आणि यामागची कारणं शोधण्याचा प्रयन्त आपल्या 'गांधिंनंतरचा भारत' या पुस्तकात केला. अमुल आणि त्यासारख्या अनेक संस्थांची भारतियत्वाशी न तुटलेली नाळ हेही कदाचीत यामागचं एक कारण असु शकेल. चला, हाच वारसा आपण आपल्या पुढच्या पिढिला देउयात !
'Amul - The taste of My India' !

******
संदर्भ: विकिपेडिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अमूल" हे खर्‍या अर्थाने या देशातील घराघरात पोचलेले नाव असल्याने त्याविषयी कुणीही बोलले वा लिहिले तर त्यातील जवळपास सारीच माहिती वाचणार्‍याला किंवा ऐकणर्‍याला असतेच. श्री.सौरभ यांचा हा प्रयत्न स्तुत्य तर आहेच शिवाय अमूल उलाढालीबद्दलचे आकडेवारीही त्यानी चांगली गोळा केली आही.

खटकणारी एक बाब म्हणजे ज्या डॉ.वर्गीस कुरियन यांचे नाव अमूल बद्दल त्यानी घेतले आहे त्या खुद्द वर्गीस यानीच 'त्रिभुवनदास पटेल' याना अमूल आणि अमूलच्या प्रचंड वाढीबद्दल गुरू मानले होते. त्रिभुवनदास पटेल यांच्याशिवाय अमूल अपुरे आहे. १९६३ मध्ये डॉ.वर्गीस कुरियन याना प्रतिष्ठित असा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाला होता पण तो त्याना एकट्याना नसून श्री.त्रिभुवनदास पटेल आणि "आरे मिल्क" चे डॉ.दारा खुरोडी याना संयुक्तपणे मिळाला होता.

असो. इतक्या चांगल्या अभ्यासू लेखात श्री.पटेल यांचा उल्लेख हवा होता असे वाटल्यामुळे ह्या प्रतिसादाचा प्रपंच केला आहे.

अशोक पाटील

अमूल सारख्या अनेकांच्या जिवाभावाच्या विषयावर लेख पाहून उत्सुकता वाढली होती. पणफक्त विकिपिडियावरची माहिती मराठीतून रुपांतरित करुन मांडली आहे हे पाहून निराशा झाली.