"एक अतिशय हुशार, होतकरू तरुण मुलगा आकाशात उंच उडायचं स्वप्न बाळगुन २००० किमी पेक्षा जास्त प्रवास करत देहरादूनला पोचला. भारतीय हवाई दलात पायलट व्हायचं हेच त्याचं स्वप्न होतं, बऱ्याच काळापासून मनात जपलेलं! आकाशात उंच उडायचं स्वप्नं! देहरादूनमध्ये भारतीय हवाई दलाची निवड समिती आज पंचवीस मुलांची मुलाखत घेणार होती. मुलाखतीतच त्याला जाणवलं की इथे आपल्या बुद्धीपेक्षा व्यक्तिमत्व, तंदुरुस्ती याला महत्व दिले जातेय. पंचवीस पैकी आठ मुलांची निवड झाली आणि तो नेमका नवव्या स्थानावर होता. हवाई दलात जाण्याची, आकाशात उंच उडण्याची त्याची संधी हुकली होती. निराशेने त्याला घेरलं. पुढे काय करायचं याचा विचारही त्याला करवत नव्हता."
कुठलाही संदर्भ गाळून हा प्रसंग वाचला तर त्याचे महत्व कळून येणार नाही. कुठल्याही सर्वसामान्य तरुण मुलाच्या आयुष्यात घडणारी ही घटना! भारतीय हवाई दलाच्या निवड परीक्षेत आजवर हजारो मुलं फेटाळली गेली असतील. पण हा नकार वेगळा होता , एका अर्थाने स्वतंत्र भारताचे भविष्य घडवणारा नकार !
निराश झालेला तो तरुण तसाच हृषिकेशला पोहोचला. तिथे त्याची एका स्वामींशी भेट झाली. त्या स्वामींनी त्याला सांगितले की "आपल्या अंतर्मनातून एखादी इच्छा निर्माण झाली तर त्यापासून निघणारी उर्जा ती इच्छा पूर्ण करायला नक्कीच मदत करते. फक्त ती इच्छा तितकी निर्मळ आणि अतीव उत्कट असायला हवी." या क्षणानंतर मात्र त्या मुलाचं नैराश्य कुठल्या कुठे पळून गेलं. अपयश विसरून तो दिल्लीला पोचला. तिथे 'डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल डेवलपमेंट अॅण्ड प्रॉडक्शन ( एअर )' - DTD&P(Air) चे नियुक्तीपत्र त्याची वाटच पहात होते. दुसऱ्याच दिवशी अवुल पाकिर जैनूलाब्दीन अब्दुल कलाम आपल्या 'सिनीअर सायिण्टिफिक असिस्टंट' या पदावर रुजू झाले. आणि भारताच्या इतिहासात एक नवे कोरे, तंत्रज्ञानाला वाहिलेले पान जोडले गेले. साल होते १९५८. या पानावरचा इतिहास डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. विक्रम साराभाई अशा महारथींच्या हस्तेच लिहिला गेला.
तिथे काम सुरु केल्यापासून काही काळातच त्यांची नियुक्ती एरॉनॉटीकल डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (ADE) , बंगळुरू इथे झाली. इथे त्यांनी ग्राउण्ड इक्विपमेंट मशीन बनवायचे एक प्रोजेक्ट चालू केले. कुठलेच मशीन बनवायचा अनुभव नसलेल्या, अगदी छोट्या, चार जणांच्या टिमने अतिशय तुटपुंज्या अर्थसंकल्पात चालू केलेले हे प्रोजेक्ट होते मात्र अगदी महत्वाकांक्षी! हे नवीन, सक्षम भारताचे पहिले, पूर्ण भारतीय तंत्रज्ञान असणारे होवरक्राफ्ट असणार होते. प्रोजेक्ट चालू केल्यापासून अडीच वर्षात या होवरक्राफ्टचा प्रोटोटाईप तयार होता. "नंदी" - शंकराचे वाहन - असे नाव असलेल्या या प्रोटोटाईप होवरक्राफ्टमध्ये डॉ. कलाम यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांना बसवून प्रात्यक्षिकही दिले. पण पुढे मात्र राजनैतिक इच्छेच्या अभावी या प्रोजेक्टचे काहीच झाले नाही. जवळपास ५० वर्षांनी आजही आपण होवरक्राफ्ट आयात करतो यापेक्षा वेगळे दुर्दैव ते कुठले !!
मात्र हाच प्रोटोटाईप पाहून प्रो. एम. जी. के. मेनन यांनी डॉ. कलाम यांना इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) मध्ये रॉकेट इंजिनिअर म्हणुन बोलावणे पाठवले. नासा (NASA) मध्ये तयार केलेले रॉकेट भारतातून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्या नंतर भारतीय डॉ. विक्रम साराभाई यांनी एक फार महत्वाकांक्षी स्वप्न पाहीले. भारतीय बनावटीचे उपग्रह प्रक्षेपण यान म्हणजेच सॅटेलाईट लाँच व्हेइकल (SLV) !
एखादा उपग्रह जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यासाठी सोडायचा असतो तेव्हा तो प्रक्षेपण यान वापरून अवकाशात सोडला जातो. उपग्रह घेऊन अवकाशात उडणे, योग्य ठिकाणी उपग्रह सोडणे आणि त्या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यासाठी गतिमान करणे हे प्रक्षेपण यानाचे कार्य.
मात्र डॉ. विक्रम साराभाई अतिशय दूरदर्शी होते. त्यांनी नुसते उपग्रह प्रक्षेपण यानाचे स्वप्न न बघता, पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत सोडता येणारे रोहिणी हे साऊंडींग रॉकेट आणि क्षेपणास्त्रे (मिसाईल) यांच्यावरही काम चालू करायला लावले. साऊंडींग रॉकेट म्हणजे वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणाजवळ सोडले जाणारे रॉकेट्स. आणि क्षेपणास्त्रे तर आपल्या सर्वांनाच चांगल्या प्रकारे माहित आहेत. वेगात असलेल्या लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये असते.
भारतातल्या अनेक नेत्यांना आणि सर्वसामान्य जनतेलाही या इतक्या मोठ्या कामाचे महत्व लक्षात येत नव्हते. भारतात, जिथे बहुतांश सामान्य जनतेला दोन वेळेचे पोट भरायची मारामार आहे त्या नवनिर्मित, गरीब देशाने अवकाश पादाक्रांत करण्याची स्वप्ने का बघावीत हा त्यांचा सवाल होता. पण डॉ. विक्रम साराभाई आणि तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहेरु यांना मात्र या कार्याचे महत्त्व अगदी व्यवस्थितपणे जाणवले होते. जर भारताचे भविष्य उज्ज्वल बनवायचे असेल तर प्रगत तंत्रज्ञानात मागे राहून चालणार नाही हे त्यांचे स्पष्ट मत होते.
शिवाय १९६२ आणि १९६५ मध्ये भारतात झालेल्या दोन युद्धानंतर भारताला लष्करात प्रगत तंत्रज्ञान आणुन बाकीच्या राष्ट्रांवर वचक ठेवण्याखेरीज पर्याय नव्हता हे ही एक महत्वाचे सत्य समोर होते. रशियाकडून आपल्याला क्षेपणास्त्रे आणता आली होती. मात्र दूरदृष्टी दाखवून या क्षेत्रात तंत्रज्ञानासाठी स्वयंपूर्ण होणे किती जरुरी आहे ते डॉ. विक्रम साराभाई सारख्या द्रष्ट्या माणसाला उमगले होते. त्यामुळेच एकाच वेळी ही तीन प्रोजेक्ट्स आणि सैनिकी विमानांसाठी रॉकेट असिस्टेट टेकऑफ सिस्टीम (RATO) यांचे कामही साधारणपणे एकाच सुमारास चालू झाले. ही तीनही प्रोजेक्ट्स वरवर बघता वेगवेगळी असली तरी त्यात परस्पर संबंध होता आणि म्हणुनच डॉ. साराभाईंना हे एकाच सुमारास चालू करणे जरुरी वाटले होते. SLV आणी RATO सारख्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टस वर काम करण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोण असणार?
तो काळ भारतातल्या तंत्रज्ञान विषयक प्रयोगशाळांसाठी भारलेला असा काळ होता. बहुतेक प्रयोगशाळा त्यांना नेमून दिलेल्या विशिष्ठ भागावर त्यांचे प्रयोग करत होत्या पण सर्वांचे एकत्रित लक्ष साऊंडींग रॉकेट बनवणे हेच होते. मोठी ध्येय समोर ठेवणे आणि त्यानुसार स्वातंत्र्य देऊन, लोकांवर विश्वास ठेवून काम करून घेण्यात, काम करण्यात डॉ. अब्दुल कलाम आणि डॉ. साराभाई आणि त्यांचे सहकारी वाकबगार होते. तेव्हा भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात खूप मोठी उलाढाल होत होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वसंत गोवारीकर,मुथूनायागम, श्री. कुरूप, डॉ. ब्रह्मप्रकाश, प्रोफ. धवन असे अनेक दिग्गज त्यावेळी एकत्र काम करत होते. याच कामाला समांतर असे काम नारायणन यांच्या नेतृत्वाखाली डी.आर.डी.ओ.ने जमिनीवरुन हवेत मारा करता येणाऱ्या ( सरफेस टू एअर ) क्षेपणास्त्रांच्या रुपात सुरु केले होते.
प्रक्षेपण यानांसाठी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर श्रीहरीकोटा इथल्या बेटावर शार (SHAR) रॉकेट लॉन्च स्टेशन तयार करण्यात आले. त्याच काळात इस्रो - Indian Space Research Organisation (ISRO) ची स्थापना झाली. १९७२ साली RATO ची यशस्वी टेस्ट झाली आणि सुखोई १६ विमानाने फक्त १२०० मीटरची धाव घेत हवेत उड्डाण केले. या यशस्वी तंत्रज्ञानाने RATO ची आयात बंद करून भारताची करोडो रुपयांची बचत झाली आणि डॉ. साराभाई यांचे एक स्वप्न साकार झाले. मात्र ते बघायला डॉ. विक्रम साराभाई हयात नव्हते.
अगदी कमी तंत्रज्ञ घेऊन केलेल्या अथक परिश्रमानंतर १९७९ साली SLV-3 चे एक अयशस्वी उड्डाण झाले. त्यावेळी माध्यमांनी इस्त्रोच्या या कामगिरीवर बरीच टिका केली होती. मात्र त्या प्रयत्नांनंतर १९८० साली भारताच्या पहील्या SLV-3 चे यशस्वीरीत्या अवकाशात प्रक्षेपण झाले. SLV-3 ने पे-लोड म्हणुन नेलेला रोहिणी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावला. डॉ. कलाम यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर या नात्याने या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशाची घोषणा केली आणि भारताने अवकाशाला गवसणी घातली. इस्त्रोचे तत्कालीन चेअरमन प्रो. धवन होते. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही टीमचे अभिनंदन केले. भारताच्या इतिहासातल्या तंत्रज्ञानाच्या पानावर सुवर्णाक्षरात एक महत्वाची नोंद झाली.
१९८१ साली डॉ. अब्दुल कलाम यांना पद्मभूषण किताबाने आणि प्रो. धवन यांना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले.
आता SLV-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर यापुढचे काम जिओ सॅटेलाईट्स लाँचवर सुरु झाले. सरफेस टू एअर मिसाईल्सही यशस्वी झाली होतीच. गाईडेड मिसाईल्स वर काम सुरु झाले. भारताच्या शत्रूला धडकी भरवणारी आणि भारतीयांची मान अभिमानाने ताठ करणारी पृथ्वी (१९८८), अग्नी(१९८९), आकाश(१९८९) ही क्षेपणास्त्रे तयार झाली. या सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी SHAR हे एक महत्वाचे प्रक्षेपण केंद्र बनले. अण्वस्त्रे निर्मिती झाली आणि भारताचे नाव अणु तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण म्हणुन प्रसिध्द झाले. आता १ ऑगस्ट २०१३ ला भारताचा अतिप्रगत असा वातावरणाचा अभ्यासक INSAT-3D अवकाशात स्थिर झालाय. हवामानातले बदल जाणणे आणि त्याचा अभ्यास करणे त्यानुसार शेती आणि इतर गोष्टी यांचा विचार करणे आता अधिक सुकर होणार आहे.
मात्र पुन्हा एकदा आपण इतिहासात अडकून राहून इतिहासाची पुनरावृत्ती तर करणार नाही ना याची भिती वाटते. हजारो वर्षापूर्वी भारत कसा होता, किती प्रगत होता याच्या चर्चा आपण आताही करतो पण नुसत्याच पोकळ चर्चा! त्यातून निष्पन्न काहीच नाही. तसेच पन्नास वर्षापूर्वी काही द्रष्ट्या माणसांनी जी स्वप्न पाहिली, जसे झोकून देऊन काम केले त्याबद्दल नुसतेच बोलत राहिलो तर त्याचा काय उपयोग आहे? डॉ. साराभाई, प्रो. धवन यांच्या काळात ज्या आत्मियतेने देशासाठी सर्वस्व झोकून देऊन काम झाले तसे आता होताना फारसे दिसत नाही.
विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टी हातात हात घालून चालतात. कुठलेही तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ज्या मुलभूत विज्ञानाचा अभ्यास करावा लागतो त्या अभ्यासात आपण कमी पडतो असे मला वाटते. विकसित देशात अनेक नवनवीन शोध लागत असतात, विविध संशोधने होत असतात, वेगळ्या विषयांवर काम करण्यासाठी चालना दिली जाते. त्या तुलनेत व्हायला हवे त्या प्रमाणात भारतात संशोधन होत नाही, अशा प्रयोगांना चालना, पाठबळ मिळत नाही . याचे कारण काय असावे? अगदी परदेशातून तंत्रज्ञान आयात केले तरीही आपल्याकडे ते योग्य रित्या वापरले जात नाही. अवकाशातले जाऊ द्या साधे चांगले रस्ते बनवायचे कौशल्य आपण बाळगू शकत नाही. चार महिने भरपूर पाऊस मिळणाऱ्या आपल्या देशात दुष्काळ टाळण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत. नद्या जोडणीसारखे प्रकल्प अनेक दशके कागदावरून प्रत्यक्षात उतरतच नाहीत. विविध आणि विपुल प्रमाणात असलेले आमचे नैसर्गिक उर्जास्त्रोत अजून आम्ही पुरेसे वापरून घेऊ शकत नाही. आज ६७ वर्षानंतरही सर्व भारताला पुरेश्या विजेचे उत्पादन आपण करू शकत नाही. आज ६७ वर्षानंतरही वीज, पाणी या मुलभूत सोयी न मिळणारी, मुख्य रस्त्याशी न जोडलेली गावं भारतात आहेत. आज ६७ वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या गरजा न भागलेली कुटूंबे आहेत. या प्रश्नांना राजकीय, समाजशास्त्रीय, भौगोलिक असे अनेक पैलू असले तरीही मुळ मुद्दा तोच रहातो.
त्या काळात कुठल्याही सोयी, सुविधा नव्हत्या, पुरेसा निधी नव्हता, माहिती तंत्रज्ञान अगदी बाल्यावस्थेत म्हणावे असे होते, देश अतिशय गरीब अवस्थेत होता आणि तरीही भारत अवकाशाला गवसणी घालू पहात होता. त्यातुलनेत आता देश कितीतरी चांगल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आहे, संशोधनासाठी सोयी, सुविधा उपलब्ध होऊ शकतात. हवे असल्यास स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करता येण्याची क्षमता भारतात आहे. परदेशातले संशोधन आणि त्याविषयीची माहिती काही क्लिक वापरून मिळू शकते. चांगले शिक्षण उपलब्ध आहे. मात्र तरीही आपण खूप प्रगती केली असे म्हणता येणार नाही. याची कारणे आपल्या पिढीने आत्ताच शोधली नाहीत तर फार उशीर झालेला असेल. भारत महासत्ता बनणार हे वाक्य हजारो, लाखो वेळा बोलून आणि त्यावर चर्चा करून देश महासत्ता बनत नसतो. तो बनतो ते धडाडीच्या, देशावर प्रेम करणाऱ्या, कणखर राजकीय नेतृत्वामुळे! डॉ. साराभाई, डॉ. कलाम, प्रो. धवन यांच्यासारख्या दूरदर्शी लोकांमुळे!! हे असे नेतृत्व, हे असे दूरदर्शी लोक तुमच्या आमच्यामधुनच पुढे येतात. म्हणुनच आज गरज आहे ती या मोठ्या लोकांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून काहीतरी करून दाखवण्याची, पुढच्या पिढीला सक्षम बनवायची. नुसत्या पोकळ चर्चा न करता काहीतरी घडवून दाखवायचे हे शिवधनुष्य आज आपल्यापुढे आहे.
स्वप्नाली मठकर
-----------------------------------
संदर्भ -
विंग्स ऑफ फायर - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम , अरुण तिवारी
http://dos.gov.in/launchvehicles.aspx
http://www.isro.org/scripts/Aboutus.aspx
सावली, सुंदर लेख! अव्वुल
सावली,
सुंदर लेख! अव्वुल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन.
इस्रोचे काही अग्निबाण पडले, नाही असं नाही! पण त्यातून ते लोकं जिद्दीने परत उभे राहतात. हे खरोखरंच कौतुकास्पद आहे. मला १९८१ मधील रोहिणी उपग्रहाची कक्षा भरकटल्याचं आठवतं. त्यावेळचा अग्निबाण SLV3 (Satellite Launching Vehicle) होता. अनेकांनी बरीच टीका केली. नेहमीच्याच अंगाने की भारत गरीब देश आहे, वगैरे. पण पुढील SLV3 चं उड्डाण (साल १९८३) इस्रोने यशस्वी करून दाखवलंच!
घन इंधनाच्या पुढील तंत्रज्ञान म्हणजे द्रव इंधनावर उडणारे अग्निबाण. ASLV (Augmented SLV) असं प्रकल्पाचं नाव होतं. अनेक उड्डाणे डब्यात गेली, पण इस्रोवाले खचले नाही. परत नव्या जोमाने उभे राहिले. शेवटी १९९४ साली ASLV चं पाहिलं यशस्वी उड्डाण झालं. तोवर हा प्रकल्प बंद व्हायची वेळ आली होती. पण पुढील अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालूच होते. पुढील टप्पा PSLV (Polar SLV) चा होता. यात मात्र पहिल्या अपयशानंतर दैदिप्यमान यश मिळत गेलं. आज PSLV जगातला अतिशय यशस्वी आणि स्वस्त अग्निबाण आहे. यापुढील टप्पा म्हणजे शीतकोठार अग्निबाण अर्थात क्रायोजेनिक रॉकेट. प्रकल्पाचं नाव GSLV (Geostationary SLV). यातही पहिले दोन्ही प्रयत्न अपयशी झाले आहेत. तरीपण जिद्द अभंग आहे.
इस्रोच्या विजिगिषु वृत्तीस मानाचा मुजरा!
आ.न.,
-गा.पै.
छान आहे निबंध. आवडला.
छान आहे निबंध. आवडला.
सावली, भारताच्या ह्या
सावली, भारताच्या ह्या महत्वाच्या कामगिरीचा चांगला आढावा घेतला आहे.
निवडलेला विषय आणि लेख दोन्ही
निवडलेला विषय आणि लेख दोन्ही आवडले
मस्त! विषय नि लेख दोन्ही
मस्त! विषय नि लेख दोन्ही आवड्ले
आज भारतीय स्वातंत्र्यदिन अन्
आज भारतीय स्वातंत्र्यदिन अन् अगदी नेमक्या या पवित्र दिनी असा तितकाच सुंदर आणि मनी हर्ष निर्माण करणारा अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. डॉ.एपीजे कलाम हे नाव जरी टंकले तरी आपल्या बोटातून एक पुण्यकर्म झाल्याची भावना निर्माण होते इतके हे नाव इथल्या मातीशी निगडित आहे. भारतीय वैज्ञानिक परंपरेचे निशाण पुढे अग्रस्थानी ठेवण्याचे कामे डॉ.विक्रम साराभाई, भाभा, धवन, गोवारीकर आदी ऋषितुल्य व्यक्तींनी केले आणि इस्त्रोने त्याचा पाठपुरावा कसा केला आहे त्याचे वर्णन लेखात अचूक आले आहे.
लेखिकेने संदर्भ ग्रंथांचा छान अभ्यास केल्याचे स्पष्ट दिसत आहे, त्यातही विशेष म्हणजे डॉ.कलाम यांच्याविषयी इतकी माहिती असूनही या लेखात त्यांच्याबद्दल वाचताना ते व्यक्तिमत्व काळाच्या किती पुढे होते आणि संशोधनच्याबाबतीत किती प्रगल्भ होते हे लेखातून स्पष्ट झाले आहे.
एका सुंदर निबंधाबद्दल सावली यांचे अभिनंदन.
अशोक पाटील
अभ्यासपूर्ण लेख. विषयाची
अभ्यासपूर्ण लेख. विषयाची निवडही आवडली.
छान लेख सावली!
छान लेख सावली!
विषय आणि लेख दोन्ही
विषय आणि लेख दोन्ही आवडले!!!
शुभेच्छा!
धन्यवाद गामा_पैलवान , अशोक.
धन्यवाद
गामा_पैलवान , अशोक. विशेष आभार
लेख सुंदर झालाय सावली
लेख सुंदर झालाय सावली
अभ्यासपूर्ण लेखासाठी मनापासून
अभ्यासपूर्ण लेखासाठी मनापासून अभिनंदन!!
मस्त अभ्यासपूर्ण लेख. छान
मस्त अभ्यासपूर्ण लेख. छान विषय व मस्त हाताळणी.
मस्तं लेख. आवडला.
मस्तं लेख.
आवडला.
छान विषय, व्यक्तिमत्वाची
छान विषय, व्यक्तिमत्वाची निवडही चांगली, मांडणी सुरेख. शुभेच्छा!
[ >>>> मात्र पुन्हा एकदा आपण इतिहासात <<<< येथुन पुढील "भाष्य" टाळता आले असते किंवा वेगळ्या शैलित दिले असते तर अधिक बरे झाले असते. तसे त्यात चूकीचे असे काहीच लिहीलेले नाही, मात्र स्पर्धेचा विषय म्हणून मांडणी जरा वेगळी करता आली असती, अन या सर्व बाबी प्रत्यक्षात असताना त्यासामोरे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्व त्यांचे कार्यामुळे कसे स्वतंत्ररित्या शतकपुरुष म्हणून उठून दिसते असे दाखविता आले असते. असो. हे आपले माझे वैयक्तिक मत. ]
इतर 'सरकारी' प्रयोगशाळांच्या
इतर 'सरकारी' प्रयोगशाळांच्या तुलनेत इस्रोने अत्युत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे मला इस्रोबद्दल अत्यंत आदर आहे.
>> त्या प्रमाणात भारतात संशोधन होत नाही, अशा प्रयोगांना चालना, पाठबळ मिळत नाही . याचे कारण काय असावे?
याची अनेक कारणे आहेत, प्रत्येक कारण स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
नुकतंच (खालचे दुवे पहा) भारताने काय साध्य केलंय ते पहाता हळूहळू का होईना पण प्रगती चालू असल्यामुळे मी अजून आशावादी आहे.
पूर्ण भारतीय बांधणीची विमानवाहू नौका --
http://www.dailymail.co.uk/news/article-2390112/Indian-aircraft-carrier-...
पूर्ण भारतीय बांधणीची अणुशक्ती वर चालणारी पाणबुडी -- http://www.bbc.co.uk/news/world-asia-india-23648310
छान लिहीले , अब्दुल कलाम
छान लिहीले , अब्दुल कलाम यांचे पुस्तक मी वाचले आहे.
सुंदर लेख. आवडला.
सुंदर लेख. आवडला.
सुंदर विषय आणि उत्तम मांडणी.
सुंदर विषय आणि उत्तम मांडणी.
विषयाची निवड खूप सुंदर आहे,
विषयाची निवड खूप सुंदर आहे, लिहिले पण छान आहे, सावली.
लेख आवडला!
लेख आवडला!
पुन्हा एकदा इतका मोठा लेख
पुन्हा एकदा इतका मोठा लेख वाचुन अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
गामा_पैलवान,
सकाळी वेळ नव्हता, त्यामुळे प्रतिसाद त्रोटक दिला. हो ASLV (Augmented SLV), PSLV (Polar SLV) हे महत्वाचे मानबिंदू आहेत. द्रव इंधनासाठीही बरेच संशोधन करावे लागले होते असे वाचलेले आठवते. थोडक्यात आढावा घेताना हे मुद्दे घेतले नव्हते.
अशोक.,
लेख मुद्दामच १५ ऑगस्टला प्रकाशित केला.
limbutimbu, मान्य आहे. मात्र तो मुद्दा मनापासुन लिहीलेला आहे. नुसते स्पर्धेसाठी म्हणुन गोड लिहीत कौतुकाचा वर्षाव करण्यापेक्षा आपण खर्या अर्थाने सत्य काय आहे , अशा प्रश्नांची कारणे काय आहे ते तपासुन बघणे जरूरीचे वाटले. मी लेख लिहीला म्हणजे लगेच काही फरक पडेल असे नाही मात्र तसा विचार करुन लिहायचेच नाही यालाही अर्थ नाही. कदाचित इथे हा लेख वाचुन एखाद्या तरी तरुण मुलाने याबाबत विचार केला तर ती खुप मोठी अॅचिव्हमेंट ठरेल. म्हणुन तो मुद्दा न वगळता लिहीणे पटले नव्हते.
चिमण,
इतर 'सरकारी' प्रयोगशाळांच्या तुलनेत इस्रोने अत्युत्कृष्ट कामगिरी केली आहे. >> अर्थातच. त्याबाबत प्रश्नच नाही. पण अख्ख्या भारतात अशा अगदी मोजक्याच संस्था असतील हे ही तितकेच खरे आहे.
"त्याप्रमाणात भारतात संशोधन होत नाही" हे मुलभूत संशोधनाविषयी लिहीले आहे. तंत्रज्ञानाविषयी नाही. तुम्ही दिलेली उदाहरणे तंत्रज्ञान वापरण्याबद्दल आहेत. त्यातही बहुतेक ठिकाणी आपण रशियन, जर्मन तंत्रज्ञांची मदत घेतोच. ( वरच्या पाणबुडीच्या लेखातही रशियन मदतीबद्दल आहे ) अगदी फुकाच्या वल्गना केल्या नाहीत तरी बाहेरच्या कुणाचीच मदत न घेता भारतात तंत्रज्ञान वापरणे शक्य नाही हे पटत नाही. भारतात सध्या इतरही कितीतरी सामान्य प्रश्न आहेत ते तंत्रज्ञानाच्या माध्यमाने सोडवणे शक्य आहे असे वाटते पण तिथेही फारसे काही होत नाही.
अवांतर मुद्दा - पाणबुडीबद्दलच म्हणायचे तर सध्याची परिस्थिती काय आहे? २०ची अगदी गरज असताना आपल्याकडे १४ पाणबुड्या आहेत त्यातली एक आताच बुडली. या सगळ्या रशियन बनावटीच्या आहेत. मग इतक्या वर्षात आपल्याला एकही साधी पाणबुडी करता येऊ नये का? की तशी इच्छाशक्तीच नाही? हा मुद्दा आहे.
छानच.
छानच.
मस्त झालाय लेख सावली ! छान
मस्त झालाय लेख सावली ! छान विषय.
अभ्यासपूर्ण लेख. अभिनन्दन
अभ्यासपूर्ण लेख. अभिनन्दन सावली.
उत्तम विषय आणि चांगला,
उत्तम विषय आणि चांगला, अभ्यासपूर्ण आढावा.
सॅटेलाईटसचं प्रक्षेपण हे कोणे एके काळी खूप कुतुहलाचं वाटायचं. त्या घटनेचं दूरदर्शनवरचं थेट प्रक्षेपण डोळे विस्फारून पाहिलं जायचं. त्यादरम्यान मागे जे निवेदन चालू असे, त्यातच कधीतरी डॉ.कलाम यांचं नाव प्रथम कानावर पडल्याचं आठवतं.
नाव ऐकताक्षणीच मान अभिमानानं ताठ व्हावी अशी जी काही मोजकी व्यक्तिमत्त्वं आहेत, त्यात हे नाव अग्रेसर आहे.
त्यांची बुध्दीमत्ता, द्रष्टेपणा वादातीत आहेच, पण अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, आजही ते भारतातल्या तरुणांविषयी, नव्या पिढीविषयी खूप आशावाद जागवताना दिसतात.
छान लेख सावली.
छान लेख सावली.
मुळातच संशोधन आणि
मुळातच संशोधन आणि तंत्रज्ञानातील प्रगती ह्या संथपणे चालणार्या गोष्टी आहे. असो. लालफितीत अडकणारा "नंदी" किंवा तात्कालिक फायद्यासाठी प्रकल्प गुंडाळणारे महान लोकही आहेत. अजुनही संशोधन ही आपली प्राथमिकता नाही, कारण त्यात असलेली खुप मोठी आर्थिक व वेळेची गुंतवणुक.
तरीसुद्धा ISRO, आणि काही CSIR लॅब्स बघुन आनंद होतो. चांगला लेख.
शेवटचे भाष्य आवडले. आपल्या पुढची पिढी आपल्याला शिव्या घालणार आहे, यात शंकाच नाही.
सावली विषय मांडणी,भुमिका
सावली विषय मांडणी,भुमिका सर्वच दृष्टीने छान लेख आधी वरवर वाचला होता म्हणुन प्रतिक्रिया दिली नव्हती.२५तारीख गाठुन झाल्यावर एकएक लेख सविस्तर वाचतॅय. लेख आवडला.राजकीय आणि सामाजिक इछ्याशक्तीचा अभाव हे सर्वच क्षेत्रात दिसत. तरी नेटाने आदर्श लोकांपुढे मांडण्याच्या तुझ्या विचाराशी पुर्ण सहमत.म्हणुनच शेवटच भाष्य आवडल.
जागू, पराग, विजय, दिपक,
जागू, पराग, विजय, दिपक, ललिता, रैना,शोभनाताई मनःपुर्वक आभार
नाव ऐकताक्षणीच मान अभिमानानं ताठ व्हावी अशी जी काही मोजकी व्यक्तिमत्त्वं आहेत, त्यात हे नाव अग्रेसर आहे.
त्यांची बुध्दीमत्ता, द्रष्टेपणा वादातीत आहेच, पण अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, आजही ते भारतातल्या तरुणांविषयी, नव्या पिढीविषयी खूप आशावाद जागवताना दिसतात. >>> ++
Pages