वड्यांचं सांबारं (झिलमिल)

Submitted by मृण्मयी on 11 August, 2013 - 11:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

डाळीचं पीठ
हळद
तिखट
मीठ
हिंगं
सावजी मटण मसाला किंवा मराठा दरबारचा 'काळं' मटण मसाला किंवा कुठलाही मराठी पध्दतीचा तिखट मसाला
कांदे
सुक्या खोबर्‍याचा कीस
आलं
लसूण
खसखस
तेल
पाणी
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

सांबारं (रस्सा) :
-कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यावा.
-खोबरं कीस मंद आचेवर परतून घ्यावा.
-तेलावर कांदा परतायला ठेवावा. यात किंचित मीठ घालावं. म्हणजे पाणी सुटून कांदा शिजायला मदत होईल.
-कांदा परतत असतानाच आता यात परतलेला खोबरंकीस घालावा.
-पाण्याचे शिपके देऊन कांदा-खोबरं व्यवस्थीत परतून घ्यावं. (कांदा गळायला हवा.)

vadyancha-sambara-maayboli-1.jpg

-मिक्सरमधून शक्य तितकं बारीक वाटून घ्यावं.
-कांदा-खोबरं परतताना एकीकडे आलं-लसूण वाटून घ्यावं.
-दोन्ही वाटणं थोडीशी वेगळी काढून ठेवावी. ही वड्यांना वापरायची आहेत.
-तेल गरम करून त्यात हिंग घालावा.
-यावर आलं-लसणाचं वाटण, तसंच कांदा-खोबर्‍याचं वाटण घालून परतावं.
-व्यवस्थीत परतून, सगळ्या वाटणांचा गोळा तेल सोडायला लागला की यात हळद, तिखट, मीठ आणि मसाला घालून परतावं.

vadyancha-sambara-maayboli-7.jpg

-उकळीचं पाणी घालून पातळ रस्सा करावा.

vadyancha-sambara-maayboli-8.jpgवड्या:
-जाड बुडाच्या भांड्यात तेल घालून त्यात वेगळी काढून ठेवलेली वाटणं परतून घ्यावी.
-यात हळद-तिखट-मीठ घालून परतावं.
-डाळीचं पीठ घालून पुन्हा खमंग परतून घ्यावं.
-पाण्याचे शिपके देऊन शिजवावं.
-पाणी घालताना एक गोळा तयार होईल, त्याला दणदणीत वाफ येऊ द्यावी.

vadyancha-sambara-maayboli-3.jpg

-गरम गोळ्याला बोटांनी (जपून) चिमटा काढावा.
-बोटांना चिकटला नाही म्हणजे शिजला असं समजावं.
-हे शिजत असताना एकीकडे ताटात खोबरं, खसखस आणि कोथिंबीर पसरून ठेवावी.

vadyancha-sambara-maayboli-2.jpg

-शिजलेला गोळा यावर घालून, थापून, जाडसर वड्या पाडाव्या.

vadyancha-sambara-maayboli-4.jpgvadyancha-sambara-maayboli-5.jpg

-कापून वेगळ्या ठेवाव्या.

vadyancha-sambara-maayboli-6.jpg

-जेवायला बसताना वाटीत वड्या घेऊन त्यावर रस्सा घालावा.

वाढणी/प्रमाण: 
कराल त्याप्रमाणे
अधिक टिपा: 

-सढळ हातानं तेल आणि तिखट घातल्यावर गडद्-काळपट लाल असा तवंग येतो. खाण्याची तब्बेत नसलेल्यांच्या डोळ्यांसमोर झिलमिल तारे चमकतात. पोटाची औकात नसल्यास आपण पुचाट रस्सा करावा.

-वड्या आणि रस्सा एकत्र उकळवू नये.

-काहीही आंबट घालू नये. अगदीच न राहवल्यास सावजी आणि कोकमं एकाच वाक्यात आल्याबद्दल आश्चर्य न वाटू देता कोकमं घालावी.

-ही पध्दत पारंपारीक 'सावजी स्टाइल' आहे असं कळलं. एरवी वड्यांचं सांबारं वेगळ्या पध्दतीनं होतं.

माहितीचा स्रोत: 
बहीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रेसिपी. नक्की ट्राय करेन.
झिलमिल नावही बेष्ट वाटले.
<<गरम गोळ्याला बोटांनी (जपून) चिमटा काढावा>> हे पण भारीच एकदम. Happy

Lol आमचा रस्सापण पुचाटच आहे.

वाढायच्या भांड्यात काढल्यावर लागलीच फोटो घेतला. जरा वेळात त्यावर खोबर्‍याच्या सुटलेल्या आणि एकूणच परतलेल्या मसाल्यातल्या तेलाचा तवंग येतो.

अगदीच न राहवल्यास सावजी आणि कोकमं एकाच वाक्यात आल्याबद्दल आश्चर्य न वाटू देता कोकमं घालावी.
>>>> लोल.

मस्तय झिलमिल. Happy

भारी आहे. मस्त चमचमीत रस्सा बघून तोंडाला पाणी सुटले.

सांबार्‍यात वड्या सोडल्यावर (किंवा उलट) फोटो का नाही (किंवा नाही का) काढला?

वड्यां थापतानाचे फोटो (४,५,६) दिसत नाहियेत.. ते जरा पहाशील का? बाकी फोटो व कृती झक्कास आहेत. पुचाटचा प्रयोग करणे भाग. Happy

ह्याच त्या पाटवड्या! (पाटोड्या)! ह्या वड्या नुसत्या सुद्धा मस्त लागतात Happy
पण ही भाजी २५/३० लोक असले तर करावी अन झ ण झ णी त च ती मस्त लागते. बोटभर तरी वर तेलाची तर्री हवी!

लाळ गाळू रेसीपी.
आमच्या कडे आजी सात पुडच्या पाटोड्या करतात. आताच माहेरी जावेसे वाटते आहे हे बघुन.

मस्त. या वड्या, रस्सा आणि आमरस पोळी असा बेत असतो आमच्यात. रस्सा असाच झणझणित असेल तरच छान लागतो. Happy फक्त आम्ही कांदा-खोबरं आधी भाजून मग वाटण करतो.

एवढा जहाल पदार्थ आमच्या घरात होणे शक्यच नाही. Happy पण कृती भारी आहे.

त्या पाटवड्या मात्र अधूनमधून आई करायची, मला फार आवडतात.

Pages