पूर्णविराम
(भाग पहिला... नेहाच्या मनातला)
"करर्र्र्र" दरवाज्याच्या आवाजासकट तो आत आला. मधुचंद्राची रात्र होती त्याची. टिव्हीमध्ये दाखवतात तसा बिछाना सजवलेला नव्हता किंवा टेबलावर दुधाचा ग्लास नव्हता. सर्वसामान्य माणसाच्या घरातला मधुचंद्र बिछान्याच्या कर्र्रर्र आवाजासकटच साजरा केला जातो.
बिछान्यावर नेहा स्तब्ध बसली होती. शवात आणि विचारांच्या भोवऱ्यात खोल बुडालेल्या माणसात फक्त श्वासाचाच फरक असतो.
प्रसंग आपल्यासोबत घडत असतात. आपण त्या प्रसंगात असूनही त्या प्रसंगाचे भाग नसतो. कधीकधी असं का होतं? हजर असूनही गैरहजर का असतो आपण? आपल्या उपस्थितीत आपण अनुपस्थित का असावं? अशीच काहीशी परिस्थिती होती तिची. नेहा तिथे असूनही तिथे नव्हती. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र अमावस्येतल्या मधुसमोर उभा होता.
नेहाच्या मनात एकच कल्लोळ माजला होता.
"आपलं आयुष्य एका क्षणात इतकं बदलावं आणि तेही आपल्याला परवानगीशिवाय !!! मग ह्या आयुष्याला आपलं का म्हणावं?"
ती साडीच्या पदराचे टोक बोटांनी बोटाभोवती गुंडाळत होती. विचारात दुबळी होती. खोल बुडत होती.
"गरिबाने मुलं जन्माला घालूच नयेत. का घालावीत? अजून एक गरीब जगात आणण्यासाठी?
गरीबाचा जगाला एकाच गोष्टीसाठी उपयोग होतो. एखाद्या जातीच्या लोकांचा आकडा वाढवण्यासाठी.
ह्या गरिबीमुळेच मला ह्या वयात लग्न करावे लागले. हे लग्न समीरशी झाले असते तर? तर तेव्हाही मला इतकेच दु:ख झाले असते का? नाही. तेव्हा ह्या विचाराने मनाला स्पर्शही केला नसता माझ्या.
पण माझं लग्न झालंच नाही समीरशी. का तर म्हणे? इज्जत. घरात वाटीभरच पीठ उरलेल्या गरिबालाही त्याच्या जवळ असलेल्या वाटीभर इज्जतीची इतकी काळजी?
भरभरून कमावणाऱ्या श्रीमंताला इतकी इज्जत असतानाही त्याची काळजी वाटू नये आणि जग ढुंकूनही पाहत नाही अश्या गरिबाला स्वतःच्या इभ्रतीची इतकी काळजी असावी? का? कशाला? कशासाठी? आणि ह्या चिमुटभर इज्जतीपायी त्यांच्या मुलांनी स्वत:च्या आयुष्याचे असे हालहाल करून घ्यावेत? अश्या इच्छा माराव्यात?
माणसाने गरीब जन्माला येऊच नये आणि गरीब जन्माला आलाच तर गरीब मरू नये."
विचारांचे वावटळ नेहाला लांब घेऊन जात होते. मधुचंद्राची रात्र सरत चालली होती. चंद्राला पत्ताही नव्हता की, तो उपभोगतोय ते मन नसलेले शव आहे. शरीरावरचा हक्क म्हणजे मधुचंद्र नव्हे. त्यासाठी मनं जुळावी लागतात. नाहीतर अश्या रात्रीतून फक्त मुलं जन्माला येतात, नाती नाहीत.
वाऱ्याच्या मंद झुळुकेने वेळेचे सगळे लक्ष भूतकाळाकडे नेले. तिला समीर आठवू लागला. समीर. कानात कुजबुजून आयुष्य बहरून गेला तो.
लहानपणीची ओळख प्रेमाकडे कधी झुकली हे कळलंच नाही.
कानात एकदिवशी फक्त म्हणाला, "मला तू आवडतेस."
आयुष्याला कलाटणी देणारा तो दिवस. ते ऐकून कसे लाजून पळत सुटलो होतो आपण. वाऱ्यासोबत पीस कसं उडतं, अगदी तसं. अलगद. तो क्षण, ती हुरहूर, ती भीती, छातीचे ते ठोके, वाढलेले श्वास...
धावताना रस्त्यात किती जनांना धक्का लागला असेल कुणास ठाऊक. त्या नंतरच्या त्या रात्री म्हणजे आयुष्याच्या सर्वात सुंदर रात्री. हा चंद्र साक्षीदार आहे त्याचा. पण नियतीला आपलं सुख पाहवत का नाही?"
एक थेंब नेहाच्या पापण्यांच्या कडेहून गालावरून खाली सरकला. उशीला भिडला. मुरला आणि संपला.
"नेहा, घरचे तयार नाहीत आपल्या लग्नाला."
"तू समजाव न त्यांना."
"मी अजिबात नाही समजावले असे वाटतंय का तुला?"
"समीर..."
त्या हाकेत एक खोल दु:ख होतं, किंकाळी होती.
हवं असलेलं डोळ्यांसमोरून निसटत असताना मारलेल्या किंकाळ्या ज्याच्या त्यालाच ऐकू जातात. समीरने ऐकल्या त्या. पण...
या 'पण' वर कित्येक कथा येऊन संपल्या असतील.
नेहाच्या मनाचा एक कोपरा समीरजवळ धावत जात होता पण साडीचा पदर लग्नातल्या उपरण्याच्या गाठीत अजूनही तसाच अडकून होता.
मनाची एक बाजू समीरला फक्त शाप देत होती.
"समीर, खेळ खेळल्याचे पैसे मिळतात. पण, मनाशी खेळल्याचेही पैसे मिळत असते ना तर तू आज खूप श्रीमंत असतास ना? हे नाते पुढे न्यायचे नव्हतेच तर मग सुरूच का केलेस हे नाते?
दु:ख स्वत:हून नाही येत रे आयुष्यात कुणाच्या. आधी ते सुखाची सवय लावतं आणि मग दिलेलं सुख सोबत घेऊन जातं. तू का आलास माझ्या आयुष्यात? तू नव्हतास तेव्हा खुश होते मी. सुख नसलं, तरी दु:खही नव्हतं.
आई बाबांना वाटतंय की,चल मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली.
पण त्यांना काय माहित की, नवीन वाक्य सुरुवात व्हायला आधीचं वाक्य संपावं लागतं. पण काही वाक्य कधीच संपत नाहीत. ती अशीच सोडली जातात... अर्धवट... माझ्या आणि समीरच्या प्रेमासारखी.
मला माफ कर समीर. पण मी तुला आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही."
(भाग दुसरा... किनाऱ्यावरचा... समीरच्या मनातला)
जमिनीवरचा एक दगड उचलून त्याने असेल नसेल तितका जोर लावून समुद्रात भिरकावला. जणू तो दगड जितका लांब जाईल, तितका त्याचा राग शांत होणार होता. अजब समीकरण होते ते. पण प्रत्येक वेळेची स्वत:ची समीकरणं असतात आणि ती प्रत्येकासाठी वेगवेगळीच असतात. त्याचं समीकरण सध्या हेच होतं.
त्याला दम लागल्यासारखे वाटत होते. शेवटी तो तसाच त्या वाळूवर बसला, जसे पुन्हा कधी उठायचेच नव्हते तिथून. डोके सुन्न झाले होते. सगळं आठवत होतं. आठवण ही चीजच अजीब आहे. आली तरी त्रास आणि नाही आली तरी प्रश्न. खरंतर एखादी गोष्ट 'आठवण' बनली याचाच त्रास जास्त होत असतो.
सकाळी काय झालं घरात?
"हे मी तुला शेवटचं सांगतोय समीर. यापुढे हा विषय अजिबात निघता कामा नये घरात. तुझं लग्न तिच्याशी होणार नाही. कधीच नाही. कळलं?"
"पण पपा, माझं काय? प्रेम आहे माझं तिच्यावर. त्याला काहीच किंमत नाहीयेय का?"
"प्रेम!!! हे प्रेम बीम न भूत आहे सध्या तुझ्या डोक्यावर. उतरलं न एकदा की, मग सगळं स्पष्ट दिसेल तुला. किती वेळा सांगितलं तुला? आम्ही तुझं वाईट करू असं वाटतंय का? आमच्या नकाराची कारणं तुला आधीही सांगितलीयत मी."
"समीर पप्पा काय सांगतायत ते काळात नाहीये का तुला? किती वेळा सांगायचे?"
समीरच्या मनात विचारांच्या लाटा येत होत्या. पण वाहून जाता येत नव्हतं. डोळ्यासमोर नेहा येत होती.
"काय कमी आहे तीच्यात? साधी, सरळ, घरातले प्रत्येक काम मन लावून करते, कष्टाळू आहे, प्रेमळ आहे. पण मग हे प्रेम मम्मी-पप्पाना का दिसत नाहीयेय? ही आपली माणसं!!! आपली माणसं" दोन क्षण तो एकटाच हसला.
"आपलीच माणसं शत्रूसारखी वागू लागली की, त्यांना 'आपलं' कसं म्हणावं? नाती माणसाला सांभाळतात की, बंधनं बनून अडवून ठेवतात? एखाद्याच्या पोटी जन्माला येणं हा व्यवहार आहे का?
होय व्यवहाराच असणार. नाहीतर जन्माला घातल्याची किंमत मागितली नसती कोणत्याही आईवडिलांनी स्वत:च्या मुलांकडे.
माझं प्रेम, माझं मन, माझ्या भावना यांना काहीच किंमत नाहीयेय का? की त्यांना वाटतंय तेच करायचे मी आयुष्यभर.स्वत:ला स्वत:च्या आयुष्यात जे काही करता नाही आले, ते पूर्ण करण्यासाठी मुलं जन्माला घातली जातात का?
म्हणजे ज्याला त्याला स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन पिढ्या जगाव्या लागणार. स्वत:च्या पिढीत स्वत:ची स्वप्न कधीच पूर्ण करता येणार नाहीत का?"
तिचा स्पर्श आठवला त्याला. पहिला स्पर्श, थरथरता, घाबरलेला, प्रचंड विश्वासाचा.
एक टपोरा थेंब टपकन गालावरून हातावर पडला त्याच्या.
"वचन दिले होते आपण तिला. पण...
पूर्ण होतं ते वचन, बाकी सगळे फक्त शब्दच... निरर्थक शब्द."
पुन्हा एक दगड उचलून त्याने भिरकावला. आतला राग आत मावतच नव्हता. जोरात ओरडावेसे वाटत होते.
थेट जावे आणि त्याच आईवडिलांचा गळा घोटावा असेही वाटले त्याला.
"का? का? का वागताय तुम्ही असे? चांगली आहे हो नेहा. प्रेम केलंय मी तिच्यावर. तुम्हाला वाटतंय ना की, ती चांगली मुलगी नाहीयेय, पण तरी मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला. पुढे काही वाईट झालेच तर मी तुम्हाला दोष देणार नाही. पण लग्न नाही झालं तर मात्र आयुष्यभर दोषी बनाल तुम्ही माझे.
सगळं हवंय मला. तुम्ही, मम्मा आणि हो हो...ती सुद्धा. हा 'सगळं' हा शब्द इतका मोठा आहे का? की तो फक्त एक काल्पनिक शब्द आहे. जगात कुणालाच भेटला नाहीये हा शब्द अजून. "
भरलेलं मन डोळ्यांतून वाहूनही संपत नव्हतं
खिशातला मोबाईल सारखासारखा वाजत होता. कोणाचा फोन आहे पाहण्यासाठी समीरने मोबाईल डोळ्यांसमोर धरला.
'स्वीट होम' असे नाव होते. फोन घरूनच होता. तो स्वीट होम शब्द वाचून तो एकटाच हसला आणि पुढच्याच क्षणी मनात रागाची एक मोठी लाट आली. हातातला मोबाईल तसाच त्या दगडासारखा समुद्रात फेकून द्यावा. फक्त मोबाईलच नव्हे, स्वत:लाही तसेच त्या लाटांमध्ये झोकून द्यावे असे वाटलं त्याला.
"स्मशानभूमीकडे नेताना शवाच्या मागे जितकी गर्दी असते ना, तितकी त्या व्यक्तीची इज्जत असते. मेल्यानंतरच्या या इज्जतीसाठी माणूस जिवंतपणी जिवंत शरीरातल्या, एक संवेदनशील मन असलेल्या स्वत:च्या माणसांच्या कित्येक इच्छांचा खून करतो. अश्या खुणांना शिक्षा का नसते?"
प्रश्नावर प्रश्न. ते ही स्वत:लाच.
बराच वेळ वाजणारा फोन शेवटी त्याने कंटाळून उचलला.
"समीर, अरे किती वेळ झाला? आहेस कुठे तू? घरी कधी येणार आहेस?" पलीकडून आईचा आवाज होता.
"येईन. वाटलं की येईन. आता कसलीही घाई नाही राहिलीय मला. तू नको काळजी करूस."
ठेवला त्याने फोन. तसाच स्विच ऑफ करून टाकला.
उठला घरी जायला. उठता उठता अंगात जोर नसल्यासारखा पुन्हा त्याच वाळूत धडपडून पडला. स्वत:वरच हसला आणि पुन्हा उठला घरी जाण्यासाठी.
रस्ता तसाच गजबजलेला होता. लोकांना कुठे माहित होतं की, याच्या मनात काय चाललंय? आणि माहित असतंच तर कोण काय करू शकणार होतं? जिथे स्वत:च्या आई-वडिलांनी साथ नाही दिली तिथे जगाकडून काय पेक्षा ठेवणार?
त्याचे पाय अंतर कापत होते पण, तो मात्र मागेच रेंगाळत होता. त्याच वाळूपाशी, त्याच आठवणींपाशी. रस्त्यात मंदिराजवळ पोचला. मंदिरात घंटा वाजत होत्या. पण देवावर इथे कोणाचा विश्वास होता?
"देव! हाहाहा जोक आहे हा मोठा. सर्वात मोठं खोटं. हाहाहा. वेडे आहेत सगळे. उगाच पाया पडतात."
मनातले मनात बडबडत तो तसाच यंत्रवत गाभाऱ्यात गेला. भिजलेल्या शर्टाने चेहरा फुसून तसाच त्याच मूर्तीपुढे हात जोडून मनातल्या मनात म्हणाला,
"तिला सुखात ठेव. बस. बाकी काही नको मला."
हुंदका फुटायच्या आता तो तसाच निघाला मंदिरातून.
जग स्वत:च्या नादात होतं. त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. अगदी त्याचं स्वत:चंही.
"ओ बाई घ्या की, अहो चांगली आहे भाजी."
"पांच का दो, पांच का दो"
"अबे आज बाईंनी कसला फटकावला ना त्या जोश्याला, भारी धमाल."
"प्लाटफ़ोर्म क्रमांक १ वर येणारी गाडी...."
"ऑनड्यूटी पुलिस स्टेशन मास्तर के कार्यालय में आईये"
आजूबाजूला फक्त आवाज घुमत होते. गोंधळ होता. पण मनाच्या गोंधळात बाहेरचा गोंधळ ऐकू कुठे येतो?
"दिखता नही क्या? आंखे फुट गयी क्या साले? देख के चल भाई"
लागलेल्या धक्याने तो भानावर आला.
कोणत्या तरी ट्रेन मध्ये जाउन बसला. कितीची ट्रेन? कुठे जाते? कुठे थांबणार? कसली ही काळजी नव्हती त्याला. कारण त्याला कुठे पोहोचायचंच नव्हतं.
अश्याच एक सीटवर जाऊन तो शांत बसला. तीच शून्य नजर आणि मनात तोच एक मोठा शून्य घेऊन.
विचार पाठलाग सोडत नव्हते. ट्रेनमधल्या डोक्यावरच्या बंद पंख्यामध्ये एक गृहस्थ कंगवा घालून तो चालू करण्याचा प्रयत्न करत होता.
त्याच्याकडे पाहून समीर मनात म्हणाला,
"आयुष्यातली खूप माणसं असतात. ह्या ट्रेनमधल्या पंख्यासारखी. पण त्यातली काही काहीच कामाची असतात. बाकी सगळी अशीच बिनकामाची. न चालणाऱ्या ह्या पंख्यासारखी. कोणच येत नाहीये माझ्या मदतीला. कुणी तरी या ना यार." खिडकीच्या लोखंडी जाळीवरची त्याची पकड रांगणे घट्टच होत चाली होती.
ट्रेनच्या एका दरवाज्यावर एक जोडपं गप्पा मारत उभं होतं. त्यांना पाहून तो मनातल्या मनात म्हणाला, "अरे, असे फिरू नका सगळ्यांसमोर. नजर लागेल तुम्हाला या जगाची.खरं सांगतोय मी."
समोरच्या सीटवरती एक लग्न झालेलं जोडपं आपल्या लहान मुलाला घेऊन बसलं होतं. त्या मुलाची आई त्या मुलाला खेळवत होती.आपल्या बाळाला गाल फुगवून हसवत होती. तेच फुगवलेले गालचे फुगे स्वत:च्याच मुठीने खोटे खोटे फोडत होती. मधेच वेडेवाकडे चेहरे करत होती. वेगेवेगळे आवाज काढत होती. बाप बाजूला बसून हसत होता. आजूबाजूचे लोक ही त्यांना पाहून कौतुकाने हसत होते.
समीरही दोन क्षण हसला त्यांना पाहून.
पण पुढच्याच क्षणी मनात म्हणाला,
"बाळा, अरे हसू नको जास्त. हे आईवडील जे तुला हसवत आहेत ना, ते उद्या त्या हसवण्याची किंमत मागतील तुझ्याकडे आणि ती किंमत तुला तुझ्या आयुष्यातली सर्वात आवडती गोष्ट देऊन फिटवावी लागेल. नको हसू."
कोणतं तरी स्टेशन आलं, गाडी स्लो झाली म्हणून आणि समोरचं दृश्य असह्य झालं म्हणून समीर उठला आणि दरवाज्याजवळ जाऊन उतरण्यासाठी उभा राहिला.
पुन्हा लक्ष त्या बाळाकडे गेले ते त्याच्या रडण्याने. खेळता खेळता बाळ सीटला थोडेसे आपटले होते आणि जोरात रडत होते.
त्या बाळापेक्षा त्याच्या आईचे डोळे जास्त वाहत होते. बाळाच्या गालाचे भरभर मुके घेऊन घेऊन ती सारखी त्याला समजावत होती. सीटवर हाताने फटके मारून सांगत होती,
" हे बघ, हे बघ. कसे फटके मारले मी. माझ्या बाळाला मारतो काय!! हटट...हटट... मारले हा मी त्याला. ललायचं नाही आता. शहाणं आहे ना बाल आमचं!"
गालावरच्या आसवांना घेऊन बाळही आईकडे पाहून हसू लागले आणि त्याची आई सुद्धा.
समीर सर्व पहात होता. बाजूच्या काकांना त्याने विचारले, " काका, स्टेशन कोणतं आलंय? गाडीचा लास्ट स्टोप कोणता?"
"ठाणा गाडी आहे रे. कुर्ला आलंय आता."
स्विच ऑफ केलेला मोबाईल त्याने चालू केला. मोबाईलवर घरून आलेले १२- १५ मिस-कॉल होते.
त्याने घरी फोन केला.
"हेल्लो, समीर अरे आहेस कुठे? आणि फोन का बंद ठेवलास बाळ? ये रे घरी लवकर. जेवायचे थांबलोय आम्ही. वाट पाहतोय तुझी. ये हा लवकर." आईचा आवाज काळजीने भरलेला होता.
"ह्म्म्म." हुंकार देऊन त्याने फोन ठेवला.
नेहा समीरला कधी माफ करू शकेल का? समीर तरी स्वत:ला माफ करू शकेल का? आईवडिलांना माफ करू शकेल का? दोष कुणाला द्यायचा? माफ कोणाला करायचे आणि कोणी करायचे?
अश्या कित्येक कथा आजवर घडल्या असतील. अजून एक कथा आज संपली होती. संपली नव्हती, संपवली गेली होती.
आयुष्याचे कित्येक पूर्णविराम आपल्या हातात नसतात. नियती ते पूर्णविराम न सांगता, न बोलता नकळत आयुष्याच्या एखाद्या वाक्यामध्ये आणून ठेवते.
या पूर्णविरामाने काही वाक्य अर्धवट राहतात, काही पूर्ण होतात.
पूर्णविरामापुढेही आयुष्य बरंच बाकी असतं. मागची अपूर्ण वाक्यं पुढचे शब्द गिळून नवीन वाक्य सुरूच करू देत नसतात.
पण...
आयुष्य कधीच थांबत नाही. ते वाहत राहतं.
आयुष्यात आलेल्या पूर्णविरामाला अल्पविराम मानून थोडासा विसावा घेऊन पुन्हा पुढे चालत जायचं... पुढच्या पूर्णविरामाला भेटण्यासाठी.
-- आशिष राणे
(No subject)
????
????
वरच्या दोन प्रतिक्रिया वाचुन
वरच्या दोन प्रतिक्रिया वाचुन (बघुन) कथा वाचलिच नव्हती. पण आता वाचली. मला आवडली मित्रा. आयुष्य असच असतं. नेहमीचेच स्वल्पविराम. मस्त लिहिलय...
लिहित रहा. शुभेच्छा...
आवड्ली कथा..
आवड्ली कथा..
आयुष्य कधीच थांबत नाही. ते
आयुष्य कधीच थांबत नाही. ते वाहत राहतं. >> +१
Chaan
Chaan
आयुष्याचे कित्येक पूर्णविराम
आयुष्याचे कित्येक पूर्णविराम आपल्या हातात नसतात. नियती ते पूर्णविराम न सांगता, न बोलता नकळत आयुष्याच्या एखाद्या वाक्यामध्ये आणून ठेवते.
>>
सुरेख वाक्य!
माफी आणि प्रेम ही अजब जोडी आहे.
प्रेम मिळवण्यातुन नव्हे तर देण्यातुन आनंद देते.
माफी ही दुसर्याला नाही तर स्वतःला करावी लागते क्रोधापासुन.
होप नेहा कधीतरी भविष्यात स्वतःला या त्रासापासुन माफ करु शकेल.
धन्यवाद सगळ्यांचे
धन्यवाद सगळ्यांचे
प्रेम मिळवण्यातुन नव्हे तर
प्रेम मिळवण्यातुन नव्हे तर देण्यातुन आनंद देते.>>>>+१०००
पण माफ करणं इतक सोप्पं नाही.....नक्कीच!!>>>>भ्याड निर्णया साठी माफी? अवघड आहे...स्वतःलाही नाही..आणि दुसर्याला तर नाहीच नाही..!!
नाना माफ करणे म्हणजे पुन्हा
नाना
माफ करणे म्हणजे पुन्हा प्रेमात पडणे असे नाही म्हणायचे मला. तर माफ करणे म्हणजे
असेल समीरने त्याच्या कुवतीप्रमाणे निर्णय घेतला नाही पटला तो आपल्याला असे समजुन नेहाने नविन वाक्य चालु करणे स्वतःची घुसमट न करता.