प्रवासातला पेशंट

Submitted by डॉ अशोक on 27 July, 2013 - 08:53

प्रवासातला पेशंट

प्रवासात मला पुस्तक वाचत बसणं, किंवा मोबाईलशी खेळत बसणं अजिबात आवडत नाही. मी मनुष्यवेडा माणुस आहे. त्यामुळे मला विमान प्रवासापेक्षा रेल्वे किंवा बस प्रवास आवडतो. एका विमान प्रवासात जलाल आगा माझ्या शेजारच्या सीट्वर होता. (हो, तोच तो! "शोले" मधे त्याच्यावर "मेहेबूबा ओ मेहेबूबा" हे गाणं चित्रीत झालंय !) पण दोन तासाच्या प्रवासात गडी एका वाक्यानंही माझ्याशी बोलला नाही ! मी प्रयत्न करून सुद्धा. त्यामुळे विमान प्रवासात मला मजा येत नाही.

एका बस प्रवासात एक वयस्क जोडपं आणि त्यांची वीस बावीस वर्षाची मुलगी असे तिघे सोबत होते. मुलगी काही बोलत नव्हती. पण तिच्या वडिलांची माझी चांगलीच गट्टी जमली. मी त्यांना सहज विचारलं की "मुलीची तब्बेत बरी नाही कां?" यावर त्यांनी सांगितलं की: तिला दोन महिन्या पासून सारखा ताप येतोय. तिचं वजन ही खूप कमी झालंय आणि आता तर तिच्या घशात इन्फ़ेक्शन झालंय. त्यामुळे तिला ना काही जेवण जातंय ना काही बोलता येतंय. अहो, नाही तर तिनं भंडावून सोडलं असतं तुम्हाला. खूप बोलकी आहे ती !". वडिलांच्या चेहे-यावर लेकीचं कौतुक ओसंडून वहात होतं " मग कळलं की ही मंडळी माझ्याच गावची होती. मुलगी पुण्याला एका प्रख्यात कंपनीत सॉफ्ट्वेअर इंजिनीअर होती. काही महिन्यापूर्वी ती ट्रेनींग साठी चेन्नईला गेली आणि तिथून हे इन्फ़ेक्शन आणलं असा तिच्या वडिलांचा अंदाज होता. "काय झालंय तिला घशात?" मी विचारलं. यावर तिचे वडील म्हणाले: "फंगल इन्फ़ेक्शन आहे. कॅंडीडीया आहे म्हणून सांगितलंय डॉक्टरांनी !" यावर मात्र मला रहावलं नाही आणि मी विचारलं: "मग कुणाला दाखवलंत?" यावर त्यांनी माझ्या गावच्या एका ईएनटी सर्जन चं नाव सांगितलं. एव्हाना मी डॉक्टर आहे हे मी सांगून टाकलं होतं. त्या गृहस्थानं मग मला सगळी फाईलच दाखवली.

माझा मात्र वेगळाच विचार चालू होता. दोन महिने ताप, वजन कमी होणं आणि घशात फंगल इन्फेक्शन हे कॉंबिनेशन मला धोक्याची सूचना देत होतं. पण प्रवासातल्या जुजबी ओळखीवर हे कसं बोलायचं हा प्रश्न माझ्या समोर होता. शेवटी मी वेगळ्या पद्धतीनं जायचं ठरवलं आणि विचारलं "हीच्या लग्नाचा विचार आहे की नाही?" यावर ते जोडपं आणि ती मुलगी चपापलेच! शेवटी त्या मुलीची आई म्हणाली" "डॉक्टर साहेब, तुमच्या पासून काय लपवायचं. हीला एक मुलगा आवडलाय. पण आम्हाला तो अजिबात पसंत नाही. काही काळ त्याच्या पासून सुटका व्हावी म्हणूनच ही मुलगी ट्रेनिंग ला म्हणून चेन्नईला जाऊन आली होती, तीन चार महिने तिथं राहून ती काही दिवसांपूर्वीच पूर्वीच परत आली होती.

आता मात्र मला काही धागे जुळत आहेत असं वाटलं. मग मी त्या मुलीच्या वडिलांना माझ्या जवळच्या सीटवर घेतलं त्यांना सांगितलं की या वयात घशात फंगल इन्फेक्शन ही गंभीर बाब आहे. त्यात परत दोन महिने ताप. वजन कमी होणं ह्याची त्यात भर पडली आहे आणि तिला फक्त घशातल्या इन्फेक्षन ची ट्रीट्मेंट चालू आहे. अजून काही केलं पाहिजे आणि मी काय केलें पाहिजे , काय तपासण्या केल्या पाहिजेत ते सांगितलं. आता मात्र ते तिघं गंभीर झाले. अशा बाबतीत पहिली रिऍक्शन "मला हा आजार कसा होईल? शक्य नाही ते " अशी असते. याला डिनायल रिऍक्शन म्हणतात. एव्हाना प्रवासाचा शेवटचा टप्पा आला होता. त्या गृहस्थानं माझा फोन नंबर घेतला आणि त्याचा मला दिला. प्रवास संपला आणि मी ही गोष्ट विसरून गेलो. आठच दिवसांनी त्यांचा मला फोन आला. त्यांना मला भेटायचं होतं.

आम्ही भेटलो. भेटीतच त्या गृहस्थाच्या डॊळ्यातून अश्रू धारा सुरू झाल्या. मला माझा अंदाज बरोबर आला याचा मला अजिबात आनंद झाला नाही. त्या मुलीनं चेन्नईला ट्रेंनिंग च्या दरम्यान त्या मुलाला तिथं बोलावून घेतलं होतं आणि तिथं आई-वडीलांना न सांगता लग्न केलं होतं. तो मुलगा मुलीच्या आई-बापाला पसंत नव्हता यात नवल नव्हतं! तो बाहेर ख्याली होता. त्याला अनेक "मैत्रिणी" होत्या. आणि आता त्यानं आपल्या बायकोला एच-आय-व्ही इन्फेक्शन ची देणगी दिली होती हे तपासण्यां अंती दिसून आलं होतं.

आता ती दोघं एच-आय-व्हीचा ईलाज घेत आहेत. आपली चूक त्या मूलीला पुरेपूर कळालीय. आपल्याला मूल होवू द्यायचं नाही. वाटलंच तर दत्तक घ्यायचं हे त्यांनी ठरवलंय.

-अशोक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्दैवी किस्सा...

एक पडलेला प्रश्न .. (गूगाळून चेक करू शकतो, पण हे वाचून पडला आणि आपण डॉक्टर आहात म्हणून इथेच विचारतो)
हा वायरस शरीरात शिरल्यावर ही लक्षणे दिसायला लगेच सुरुवात होते का? वा किती काळाने?

अभिषेक
व्हायरस शरिरात शिरल्यावर मधे दोन ते तीन महिन्याचा कालावधी जातो. याला विंडो पिरीअड असे म्हणतात. त्यानंतर त्याच्या टेस्ट पॉझिटीव्ह येतात. त्यानंतर मग हे सगळं सुरु होतं, म्हणजे वेगवेगळी लक्षणं.... हा कालावधी मात्र व्यक्ति सापेक्ष असतो.

धन्यवाद डॉक्टर ..
वरच्या अनुभवात तुम्ही त्या मुलीला वेळीच भेटलात आणि वेळीच निदान झाले.. उद्या जाऊन हि वेळ इथे आमच्यापैकी कोणाच्याही मित्रमैत्रीणीवर येऊ शकते त्यासाठी हे लक्षात राहील..

शरीरातील रोग प्रतिकारक क्रिया बंद पडणे म्हणजेच एडस् .त्यालाच व्हायरस म्हणू .मग साधा सर्दी खोकलाही बरा होत नाही .औषधाने पुढे केलेला मदतीचा हातसुध्दा शरीर झिडकारते .

पियु परी....
वेगवेगळी लक्षणे म्हणजे ज्यावरून कळते की आपली जी नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आहे ती कमी होणे. उदाहरणार्थ
१. काही ही कारण नसता वजन कमी होणे
२. वारंवार हगवण, श्वसन मार्गात संसर्ग होणे
३. जो संसर्ग सर्वसाधारण्त: होत नाही तो होणे (जसे की या मुलीच्या बाबतीत झाले: कॅंडीडीअल इन्फ़ेक्षन
४. नेहेमीच्या औषधांना दाद न देणारे संसर्ग होणे