चांभारगड - सोनगड - गंधारपाले गुहा

Submitted by बंकापुरे on 23 July, 2013 - 10:26

मंडळ :

निनाद बारटक्के
नितीन तिडके
श्रवण प्रसाद
केदार नरवाडकर
सुशील गोवर्धन
सचिन गोस्वामी
दत्तू तुपे

995405_10201647897305582_1313893869_n.jpg

दिनांक : ७ जुलै २०१३

कोळेश्वर ट्रेक नंतर बरेच दिवस सुधागड - ठाणाळे - खडसंबळे गुहा चा 'पिलान' बनवत होतो… पण काही अपरिहार्य कारणांमुळे तो योग जुळून आला नाही … बरेच घाटवाटा ट्रेक झालेत…एखादा किल्ला ट्रेक करूया ... इति बारटक्के … गंधारपाले गुहांविषयी ऐकून / वाचून होतो पण नुसत्या गुहांना भेट देण्यापेक्षा आजूबाजूचे एखाद-दुसरे किल्ले सुद्धा उडवायचे म्हणून सोबतीला चांभारगड आणि सोनगड मनाच्या दृष्टीक्षेपात आले… आणि बारटक्केच्या विनंतीला मान देऊन… सरतेशेवटी एकदिवसीय ट्रेक वर शिक्कामोर्तब झाला…

केदार चा मित्र सचिन सुद्धा अकस्मात आदल्या दिवशी यायला तयार झाल्यामुळे केदारच्या मित्राची गाडी (Honda Unicorn) घेण्यात आली… हो- नाही म्हणता पुण्याहून सहा मंडळी तयार झाली…नेहमीप्रमाणे पहाटे ५ :३० AM ला भेटण्याचे ठरले असताना Indian Standard Time नुसार ०६:०० AM ला निघालो …'रिटर्न टोल' भरून वाटेत कापूरव्होळ ला चहा मारून आणि पुढे पेट्रोल भरून भोर फाट्याला वळायला गेलो तर रस्ताच गायब … शासनाच्या कृपेने एका अर्धवट बांधलेल्या पुलाखालून गाडी काढायला गेलो तर पुढे रस्ता चांगला फुटभर खचलेला … करकचून ब्रेक मारून गाडी थांबवून अलगदपणे दगडावरून बाहेर काढत पलीकडे भोर च्या दिशेला लागलो… वाटेत भरपूर पाउस लागला… तासाभराच्या प्रवासानंतर वरंध घाटातून किल्ले-कावळ्या च्या वर असलेल्या 'भजी-पॉईंट' पाशी भजी खायला गाडी थांबवली … चहा मारून आणि मर्कटलीला बघून १०:०० AM च्या सुमारास महाड गावी 'येष्टी ष्ट्यांड' ला पोचलो… सुशील सुद्धा २० मिनिटांत महाड ला हजर झाला आणि मग चांभारखिंड गावी गाडी थांबवली… गाडी आडोश्याला लावून … कपडे आवरून चांभारगडावर जायला सज्ज झालो…

चांभारगड
महेंद्रगड असे चांभारगडाचे दुसरे नाव होय… चांभारगडावर जायला गावातूनच एक वाट आहे… १५ मिनिटांच्या सोप्या चढाईनंतर खिंडीत पोचलो… खिंडीत आल्यावर दोन रस्ते फुटतात… एक पश्चिम बाजूने घसाऱ्यावरून तर दुसरा पाठीमागून पूर्वेकडून … दोन्ही मार्ग थेट एका खिंडीत येउन मिळतात… गडावरून ३-४ प्लास्टिकच्या पाण्याचे पाईप खाली चांभारखिंड गावी आणलेत…खिंडीत आल्यावर मोडकळीस आलेल्या पायर्‍यांमार्गे गडावर प्रवेश केल्यावर ४-५ भल्या मोठ्या शिळा अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसतात … नैऋत्येला मंगळगड (कांगोरी किल्ला) उठवलेला आहे… वायव्येला गांधारी नदीच्या वर ढगांत लपलेला सोनगड आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा खटाटोप करताना दिसतो … त्याच्या जरा शेजारी पनवेल - गोवा राष्ट्रीय महामार्ग - १७ च्या बरोबर वर गंधारपाले गुहा … आ वासून विकासाच्या प्रतीक्षेत वाट बघताना दिसतात … धुक्यामुळे ईशान्येला पोटला, गुहिरी आणि कळकाई डोंगर व पलीकडे रायगड दिसू शकला नाही …

सरळ उत्तरेला गेल्यावर खाली पाण्याच्या तीन टाक्या दिसतात… एकाच ढासळलेल्या बुरूजाशेजारून एक पायवाट खाली पाण्याच्या टाक्यापाशी उतरते … टाक्यापाशी काही PostHoles - खड्डे (खांब रोवण्यासाठी) केलेले दिसतात…त्याच्या शेजारीच अजून एक पाण्याची टाकी आहे… खाली पूर्वेकडच्या बाजूला अजून एक पाण्याची टाकी आढळते… आणि तशीच बरोबर पश्चिमेला सुद्धा (विरुद्ध दिशेला) अजून एक पाण्याची टाकी आहे… गडमाथ्यावर निशाणी म्हणून एक भगवा झेंडा रोवला आहे … खिंडीशेजारच्या माथ्यावर एक बांधकामाचे जोते शिल्लक आहे… सगळा गड बघायला अर्धा तास पुरून उरतो…गडाच्या माथ्यावर उकडलेली अंडी, चिक्की, केळी असा नेहमीप्रमाणे आणलेला संमिश्र सामिष आहार घेतला… अचानक श्रवण ने थर्मास मधून सगळ्यांना गरम गरम कॉफी दिली आणि चिंब भिजलेल्या 'मनाला' तरतरी आली…
1001015_10201647898145603_1838863407_n.jpg
गडाच्या शेजारच्या डोंगरावरची अखंड हिरवळ बघून मला एकदम नखशिखांत पांढऱ्या कपड्यांतला जितेंद्र आणि जयाप्रदा चं गाणं आठवलं : तोफा तोफा तोफा तोफा … लाया लाया लाया लाया …
फरक एवढाच कि चांभारगडावर 'तोफा' नसून फक्त पाण्याच्या टाक्या शिल्लक आहेत Happy

चांभारगड उतरून बलोबल १२ :३५ PM च्या शुभ-मुहूर्तावर चांभारखिंड गावी ओलेते परतलो… गाडीत बसून तडक 'पाले' येथील गंधारपाले गुहांपाशी पोचलो… बघतो तर पिकनिक पब्लिक ची तोबा गर्दी… म्हणून आल्यामार्गी परत येउन 'मोहोप्रे' गावी पोचलो…

सोनगड
मोहोप्रे गावी पोचल्यावर श्री. चव्हाण भेटले… त्यांनी सोनगडाचा रस्ता सांगून झाल्यावर त्यांचा प्रतिप्रश्न आला … तुम्ही कुठून आलात? कशाला आलात? कोण कोण काय काय करतं? सगळेच IT मध्ये आहेत सांगितल्यावर त्यांनी अतिरिक्त माहिती 'ऐटीत' देण्यास सुरवात केली … त्यांची एक मुलगी 'Cognizant' मध्ये कामाला आहे आणि दुसरी मुलगी 'Oracle' मध्ये कामाला आहे … आणि स्वत: SAP ह्या तंत्रज्ञानावर काम करतात असंही कळवलं…होय ते सगळं मान्य आहे हो… पण सोनगडाचा रस्ता सांगा ना ? मग त्यांनी लांबवर अंगुलीनिर्देश करून धुक्यामध्ये लपलेल्या डोंगरावर झेंडा फडकताना दाखवला … हाच तो सोनगड… पण तिथे बघायला काहीच नाहीये…नाही पण … आम्हाला फक्त रस्ता दाखवा… मग ह्या समोरच्या टेपाडावरून चढून खाली उतरा आणि पुन्हा डाव्या बाजूने वर चढत जा… वढा वोलांडून जायचं …

मुसळधार पावसात समोरच्या टेपाडावरून १५ मिनिटांत चढून खाली एका छोट्याश्या खिंडीत आलो… मग 'वढा' शोधण्याच्या नादात चुकून उजव्या अंगाला चढायला सुरवात केली… नंतर लक्षात आलं की SAP-वाल्या काकांनी डावीकडच्या अंगाने चढायला सांगितलं होतं… मजल-दरमजल करीत मुसळधार पावसात चढत एका छोट्याश्या ओढ्यापाशी आलो… ओढा ओलांडून पलीकडे टेपाड चढून मोकळवनात पोचलो… तेवढ्यात एक मुंगुस पळत जाताना दिसलं… मग मोकळवनातून बाहेर पडत सोनगडाला उजव्या अंगाला ठेवत एका पठारावर पोचलो…पठारावरच्या उतरत्या अंगाला स्थानिक ग्रामस्थांनी बऱ्याच ठिकाणी चर बांधून शेतीसाठी छोटे छोटे बांध तयार केले आहेत… डावीकडे ती वाट सरळ पलीकडे 'पाले' गावच्या गंधारपाले गुहांच्या वर जाते …

पठारावरून उजवीकडे एक बारीकशी मळलेली वाट सरळ धारेवरून खाली येते… त्या वाटेला धरून चढायला सुरवात केली… पाउस मात्र रेम्पाटून कोसळत होता…मध्येच ढगांचा कडकडाट ऐकू येत होता… सुमारे अर्धा तास चढल्यावर अत्यंत ढासळलेल्या अवस्थेतला एक बुरुज आणि त्याच्या डावीकडे पाण्याने तुडुंब भरलेली एक चौकोनी विहीर लागली…तसंच थोडासं पुढे चढल्यावर लगेच ढासळलेला एक पडका वाडा आणि त्याच्यावर Summit केल्याची मुख्य खुण म्हणून ३-४ भगवे झेंडे दिसले… सोनगडाचा मुख्य वापर टेहळणी साठीच असावा…अधिक ऐतिहासिक माहिती साठी श्री. सचिन जोशी ह्यांच्या पुस्तकाचा आधार घ्यावा … चला सोनगड संपला… चिक्की, उकडलेली अंडी, केळी फस्त करून आम्ही आल्या-मार्गी परत मोहोप्रे गावी बलोबल ३:३५ PM ला पोचलो …

गंधारपाले गुहा
गाडीत बसून पनवेल च्या दिशेला 'पाले' येथील गंधारपाले गुहांपाशी ५ मिनिटांत पोचलो… सुदैवाने तिथली पिकनिक पब्लिक गायब झाली होती… आता फक्त महामार्गावरून जाणाऱ्या तुरळक गाड्यांचा आवाज आणि साथीला कोसळणाऱ्या पावसाची साद ऐकू येत होती … दिवसभर पावसात भिजणाऱ्या सुशील ने लगेच तत्परतेने 'क्यामेरा' काढला आणि सोबतीला छत्री सुद्धा घेतली … घरी जाण्याचे डोहाळे लागल्यामुळे बहुदा सगळ्यांनी छत्री घेण्याचा निर्णय घेतला असावा …

स्थापत्य :
सुमारे ७५ पायऱ्या चढत असतानाच वाटेत डावीकडे एक मोडलेल्या स्थितीत 'स्तूप' चा खांब पडलेला दिसतो…तसंच पुढे गेल्यावर चार मजली इमारत उभी असल्याचा भास ह्या गुहांना बघितल्यावर होतो…

सोनगडाच्याच दक्षिण अंगाला गंधारपाले गुहांचा २८ लेण्यांचा समूह महामार्गावरून स्पष्ट दिसतो… त्याच्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत… स्थानिक मंडळी ह्यांना पांडवलेणी म्हणून ओळखतात… पुरातत्व खात्याने ह्या गुहांना क्रमांक दिलेले आहेत …काही लेणी अर्धवट खोदुन सोडून दिलेली वाटतात… बहुकोनी स्तंभ, अर्धव्यक्त चौकोनी स्तंभ, घटिकयंत्र पद्धतीची वैशिष्ठ्यपूर्ण नक्षी ह्या लेण्यांमध्ये बघण्यासारखी आहेत… पहिल्या लेण्यातील स्तुपावर कोरलेली बुद्ध मूर्ती, डमरू वाल्याचे शिल्प आणि ह्या लेण्यातील सर्वात मोठे दालन हे पहिल्या लेण्यामध्येच आहे…विहारच्या भिंती आणि खांबांवर बोधीसत्व व त्यांचे अनुयायी कोरलेले आहेत … नवव्या लेण्यातील स्तूप जरी भग्नावस्थेत असले तरी त्यावरची छत्री अजून चांगल्या अवस्थेत टिकून आहे… पंधराव्या लेण्यात अजून एक अर्धवट अवस्थेमधला स्तूप आढळून येतो…सोळाव्या लेण्यातील कमानी ह्या वैशिष्ठ्यपूर्ण आहेत… एकविसाव्या लेण्यातील चैत्य आणि कोरीव मूर्ती ह्या अत्यंत रेखीव आहेत… १५ व २१ वे लेणे स्तूप लेणे असले तरी यातील स्तूप (दागोबा) आत नसून बाहेर उघड्या कातळावर आहेत… सत्ताविसाव्या लेण्यातील ब्राम्ही शिलालेख हा ह्या लेण्यावर दृष्टीक्षेप टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो …

इतिहास :
गंधारपाले गुहांविषयी बऱ्याच इतिहासतज्ञांची वेगवेगळी मतं आहेत… प्रत्येकाचा वेगळा पण सखोल अभ्यास आहे…पण अधिक माहितीसाठी श्री.सचिन जोशी सरांच्या पुस्तकाची प्रत घेऊन ह्या लेणी बघण्याचा ऐतिहासिक अनुभव आपल्याला नक्कीच अनुभवाने श्रीमंत करेल… जोशी सरांचा सखोल अभ्यास झालेला आहे … काही लेण्यांचा Top - View नकाशा सुद्धा दिलाय …
मज पामराने इथून-तिथून थोडीफार माहिती गोळा करून माझ्या ह्या ट्रेक च्या अनुभवला थोडीफार ऐतिहासिक माहितीची मदत केलीये…

इसवी सन पूर्व १५० - ३०० AD काळात पूर्वाभिमुख बांधलेल्या एकूण २८ बौद्ध लेणी ह्या जुन्या महाड-वरंध व्यापारी घाटमार्गावर आणि सावित्री-गांधारी नदीच्या संगमावर ६० मीटर उंचीवर अजूनही शाबूत आहेत … अकराव्या शतकातील शिलाहार अधिपत्याचा 'राजा अनंतदेव' ह्यांच्या नावाने पहिल्या मजल्यावरील ब्राम्ही शिलालेखानुसार आणि पुरातन ग्रीक लेखांमध्ये 'Periplus of Erythraean Sea' DT 247 BC च्या उल्लेखानुसार ह्या गुहांना आधी 'पालीपट्टण' असे नाव होते …आणि 'गंधारे' गाव असे ही संबोधायचे … महाडच्या प्राचीन बंदराच्या आश्रयाने येथील वर्षावास सुखावह होता… दंतकथेनुसार पांडवानी एका रात्रीत ही लेणी बांधली होती… पण इतिहास संशोधक आणि पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार ही प्राचीन बौद्ध लेणी युवराज विष्णू पुलित कंभोज च्या अधिपत्यात बांधली गेली आहेत …

लेणी बघून झाली तरी बारटक्के आणि तिडके गायबचं होते…इथे हाका मारून मारून Althrocin च्या गोळ्यांची आठवण होयला लागली… पण थोड्यावेळाने दोघेही खाली आले आणि म्हणाले कि वरच्या लेण्यात Meditation करीत बसलो होतो…ध्यान करीत असताना भान हरपले त्यामुळे काहीच ऐकू आले नाही…असो
मग खाली उतरून महाड ला पोचलो आणि सुशील ला महाड च्या 'येष्टी ष्ट्यांड' वर 'टाकून' वरंध घाटाच्या दिशेने लागलो… पुढे Honda Unicorn वर केदार आणि सचिन आधीच गेले … 'भजी-पॉईंट' ला चहा-भजी मारून पुण्यात रात्री ८:१२ PM ला आपापल्या घरी पोचलो…

ठळक वैशिष्ठ्ये :

१. केदार च्या नवीन Sony Xperia Z च्या Mobile Phone ने भर पावसात अप्रतिम साथ दिली आणि झकास छायाचित्रे काढण्यात आली…
२. एका दिवसात टेहळणी साठी बांधलेले चांभारगड आणि सोनगड असे दोन छोटेखानी किल्ले उडवले … शिवाय साथीला ऐतिहासिक गंधारपाले गुहा सुद्धा बोनस म्हणून बघायला मिळाल्या…
३. श्रवण ने थर्मास मध्ये आणलेली फर्मास कॉफी…सुभानल्ला

ट्रेकळावे,
तुप्यांचा दत्तू.

माफी असावी, पण मला प्र.चि कश्या व्यवस्थित Include करायच्या हे माहीत नसल्यामुळे खालील URL वर टिचकी मारा :
http://www.bankapure.com/2013/07/Chaambhaargad-Songad-GandhaarpaaleCaves...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
>>> अकराव्या शतकातील शिलाहार अधिपत्याचा 'राजा अनंतदेव' ह्यांच्या नावाने पहिल्या मजल्यावरील ब्राम्ही शिलालेखानुसार

शिलाहारांचे लेख ब्राह्मीमध्ये आढळत नाहीत. ब्राह्मीचा तेव्हा लोप झाला होता. त्यांचे लेख एकतर कन्नड किंवा देवनागरीत आढळतात.

@ डोंगरवेडा : धन्यवाद, ही माहिती मी इकडुन तिकडुन ढापून लिहिली आहे ...
माहिती बद्दल आणि माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल :), पुन्हा एकदा धन्यवाद ...

दत्तू: मस्तंच!! Happy

आम्हाला गांधारपाले लेण्यांच्या बाजूनी चढताना, ढगात हरवलेल्या सोनगडचं कोडं सुटलं नव्हतं... Sad
खुन्नस म्हणून सोनगडला कधीच न जाण्याचा 'पण' केलाय.. Proud

ऑफबीट ट्रेक्सच्या वृतांतांचे तुझ्या ब्लॉगवर चाहते होतेच.. माबोवर भटकंती वृतांत अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचतील.. शुभेच्छा!!!