प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव
भारतात अजूनही प्रामाणिकपणा हे एक जीवनमूल्य आहे, आशेला जागा आहे .
स्वानुभव - २०-७-१३
आज सकाळी मी माझ्या फेरीला नेहेमीसारखा निघालो. आज शनिवार असल्याने अस्मादिक खुषीत होते. पहाटे पाऊस झाला असल्याने हवेत गारवा होता आणि रस्ते निर्मनुष्य होते. त्याच मूडमध्ये मी दुधाच्या दुकानापाशी थांबलो , त्याने नेहेमी प्रमाणे दुधाच्या पिशव्या दिल्या. मी खिशात हात घातला तर पाकीट नव्हते. एवढ्या पहाटे , ते कोणी मारण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता . माझ्या साठीच्या प्रवेशाबरोबरच माझा साथीदार बनलेल्या विस्मरणाचा हा परिणाम असावा , मी पाकिट आणायचे विसरले असावे,असा समज करून घेवून दुकानदाराकडून उधारीवर पिशव्या घेवून घरी परतलो. घरी तयार असलेला गरमागरम नाष्टा केला. पेपर वाचले , आंघोळ केली अन तयार होवून शनिवारची फावल्या वेळातील कामे उरकण्यासाठी बाहेर पडण्यसाठी पाकिट शोधू लागलो. काही केल्या ते सापडेना. घरबर शोधले. कपाटे, खाने, ड्रॉवर्स, सगळे झाले, जिथे तीळभरही शक्यता नव्हती त्या जागा म्हणजे, मायक्रोवेव्ह्च्या आत, वॉशिंग मशीन ,कारची डिक्की अशा हास्यास्पद जागा ही शोधून झाल्या. अगदी अगतिक झालो होतो , पुढची पायरी म्हणजे बँकांना, क्रेडिट कार्ड वाल्याना फोन इ. भानगडी मला वाकुल्या दाखवित होत्या. शेवटी हताश होवून , ते हरवले या निर्णयाप्रत पोहोचलो अन पुढील २ तास सर्व बँकाना फोन करून १ दाबा, मग ३ दाबा , मग ५ दाबा इ करण्यात, कार्डे ब्लॉक करण्यात आणि डुप्लिकेट कार्डाची मागणी करण्यात गेले. अशा 'दारुण' प्रसंगी सुध्दा ते कॉल सेंटर्वरील लोक मला कमी व्याजाने कर्ज, अॅड ऑन कार्ड वगैरेची प्रलोभने ठेवण्याचा गड लढवत होते. प्रसंग काय, माझी मनःस्थिती काय, पण शेवटी ते आपला कार्यभाग साधण्याच्या मागे होते.
मला सोमवारी आर. टी .ओ कडे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज देण्याचे दु:स्वप्न सतावत होते. ती कसरत नकोशी झाली होती अन त्यात माझ्याकडे त्या लायसन्सचा नंबर पण नव्हता,फोटो कॉपी देखील नव्हती.
खूप उदास झालो होतो. पाकिटात पैसे फारसे नव्हते पण ते कुठे गेले हे कोडे सुटत नव्हते.
अखेरीस कसाबसा जेवलो अन क्लांत, श्रांत होवून पडलो, डोळा केव्हा लागला कळले नाही.
साधारण ३-३० च्या सुमाराला हीने उठ्वल्याचा भास झाला. डोळे उघडले तर हीच्या हातात पाकिट होते, मला वाटले मी झोपेत स्वप्न पाहतोय की काय? हीने हळूच स्पर्श केला तेव्हा ते खरे आहे यावर विश्वास बसला.ती मला बाहेर घेवून गेली. एक पोरसवदा तरुण पावसातून आला होता. त्याचे जॅकेट चिंब भिजले होते. तो म्हणाला, "साहेब! हे मला इंडस्ट्रियल इस्टेटच्या वळणावर सकाळी सापडले. यातील ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमचा पत्ता वाचला अन शोधत आलो. " मी त्याचे मनःपूर्वक आभार मानले अन त्याचे अभार व्यक्त करण्यासाठी तसेच त्याचे कौतुक म्हणून त्याला काही रक्कम बक्षिसादाखल देवू केली. त्याने ती नाकारली अन म्हणला, " साहेब! प्रामाणिकपणा अन कर्तव्य नावाचीही काही चीज असते. मला ती संधी मिळाली." मी त्याचे नाव अन सेल नंबर लिहून घेतला. त्याला आत बोलावले, चहा देवू केला , तोही त्याने नाकारला.
जसा आला तसाच तो निघून गेला.
मी अवाक होवून पहात राहिलो.
आजचा दिवस मात्र- सोन्याचा झाला.
आपल्या देशाला, सर्व अक्षरांची अन आकड्यांची कूट कारस्थाने अन भ्रष्टाचार झाले तरी अजून आशेस खूप जागा आहे.
PS All my calls to the card agencies to reverse the blocking were politely declined in plastic tones.
--
चांगला अनुभव रेव्यु. मलाही
चांगला अनुभव रेव्यु.
मलाही नाशिकला असताना असा एक अनुभव आला होता.
लिहीते लवकरच.
सहज शब्दात सुखद अनुभव
सहज शब्दात सुखद अनुभव सांगितलात ....
असे अनुभव यायला भाग्य लागते.
सुखद अनुभव. पाकिटातील पैसे
सुखद अनुभव.
पाकिटातील पैसे गेले या दु:खापेक्षा त्यातील अन्य बहुमोल वस्तू गेल्या आणि त्या पुनश्च मिळविण्यासाठी काय काय कसरत करावी लागेल यांच्या विचाराने तुमच्या मनी जो गोंधळ झाला त्याची कल्पना मी करू शकतो, कारण मीही काही वर्षापूर्वी अशाच प्रसंगातून गेलो होतो. फरक इतकाच की माझी पिशवी {पाकिट नव्हते} व त्यातील कागदपत्रे अखेरीस घरीच सापडले होते.
त्या तरुणाचे जादाचे कौतुक इतक्यासाठी करावे की पावसाची संततधार चालू असतानाही त्याने तुमचा पत्ता शोधून पाकिट परत केले. "प्रामाणिकपणा" हा गुणधर्म किती लोभसवाणा वाटू शकतो याचेच हे उदाहरण.
अशोक पाटील
खूप छान वाटलं वाचून.
खूप छान वाटलं वाचून.
खरेच सुखद अनुभव,
खरेच सुखद अनुभव,
चांगला अनुभव.
चांगला अनुभव.
वाचुन नवा हुरुप आला... पाकिट
वाचुन नवा हुरुप आला... पाकिट परत करणार्या मुलाचे अभिनन्दन....
छान वाटल वाचुन
छान वाटल वाचुन
तुमचा अनुभव वाचून आनंद झाला .
तुमचा अनुभव वाचून आनंद झाला .
मस्त अनुभव. असे अनुभव खरच
मस्त अनुभव.
असे अनुभव खरच शेअर करायला हवेत. सगळीकडे नुसते वाईट अनुभवाबद्दलच आपण ऐकत असतो त्यामुळे आता काय चांगल घडतच नाही की काय असं वाटायला लागत.
प्राची,अशोकजी,
प्राची,अशोकजी, उल्हासजी,श्यामली,एस आर डी,उदय,जाई,साती,शैलजा,चिन्नु

धन्यवाद त्या तरुणाचे आणि तुमच्या कदर करण्याचे
हाच अनुभव मला मागच्या
हाच अनुभव मला मागच्या महिन्यात आलाय

मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त वाटतं असलं काही पाहून
तो मुलगा केवळ तुमचे पाकिटच
तो मुलगा केवळ तुमचे पाकिटच परत नाही करून गेला तर त्याच्याकडचा प्रामाणिकपणा सुद्धा त्याने पास केला.. यापुढे जेव्हा तुम्ही त्या मुलाच्या जागी असाल तेव्हा हे लक्षात ठेऊन तुम्हीही प्रामाणिकपणाच दाखवाल ..
अर्थात हे घडले नसते तर तुम्ही पुढे भविष्यात अप्रामाणिक वागला असता असा अर्थ कृपया यातून काढू नका, हे वैयक्तिक नसून जनरल स्टेटमेंट आहे..
मी आणि माझी बायको दोघेही वस्तू हरवण्यात वस्ताद असल्याने आमच्या गाठीशी प्रामाणिक आणि अप्रामाणिक अश्या दोन्ही पठडीतले बरेच अनुभव आहेत.. पैकी प्रामाणिक अनुभव तेवढे आयुष्यभरासाठी आम्ही लक्षात ठेवले आहेत ..
अन्यथा एकेकाळी कॉलेजला असताना आम्हा मित्रांना मिळालेले ४००-४५० रुपये असलेले पाकिट आम्ही परत न करता त्या पैश्यात मौजमजा केली होती..
हा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद
सुखद अनुभव वाचताना परत
सुखद अनुभव
वाचताना परत जाणवले की प्रामाणिकपणा आणि सत्याचा आग्रह जो धरतो त्याची आंतरीक ताकद अफाट असते. अश्या व्यक्ती निर्भिड असतात. मोठ्या गोष्टींमध्ये तर नाहीच, पण क्षुल्लक वाटणार्या गोष्टींमध्येही असत्याची मदत घ्यायचा त्यांचा स्वभाव नसतो. कधी कधी एवढंस्सं खोटं बोललं/वागलं तर काय होतंय? अशी कॅज्युअल विचारसरणी देखील आपल्याला असत्याची सवय लावून आपला एक व्यक्ती म्हणून गुणांचा र्हास करते.
उदा. कधी कधी कुणाचे फोन घेणे टाळण्यासाठी मुलांना पुढे करुन "आई झोपली आहे" किंवा "बाबा अंघोळीला गेलेत" असं खोटंच सांगायला सांगितलं जातं. मग हे अप्रामाणिकपणाचे, असत्याचे संस्कार नकळत मुलांच्या मनावर घडतात. त्यात ज्याचा फोन टाळला जातो त्याने सहजच किंवा संपर्कात राहण्यासाठी फोन केला असेल तर त्याचं काहीच बिघडत नाही. त्याचं काही खरोखरचं काम असेल किंवा त्याला खरोखर तुमची त्यावेळेस गरज असेल तर तुमच्या नकळत तुमच्या हातून काहीतरी चुकीचं घडत असतं. पण सगळ्यात नुकसान हे असतं की पुढच्या पिढीला तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींत असत्य बोलण्यात काहीच गैर नाही हे नकळत बिंबवत असता. तेच प्रयोग उद्या तुमची मुलं तुमच्यावर करु शकतात. त्यापेक्षा त्या व्यक्तीचा अपमान न करता योग्य त्या भाषेत बोलून फोन अटेंड केला तर मुलांनाही हे बारिक सारिक गोष्टींतही कसं वागायचं? मुल्यं काय असतात आणि ती कश्याप्रकारे जपावीत हे बाळकडू आपोआप मिळतं. त्यासाठी वेगळे संस्कारवर्ग घ्यायची आवश्यकता नसते. तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव बनून ती आदर्श व्यक्ती बनू शकतात.
साहेब! प्रामाणिकपणा अन कर्तव्य नावाचीही काही चीज असते. मला ती संधी मिळाली. >>>> ही जाणीव आणि नम्रपणा ज्या समाजात जास्त आढळेल तो समाज नक्कीच जास्त प्रगती करेल. ह्या मुलाला वाढवताना, हे रोप वाढवताना त्याच्या पालकांनी, शिक्षकांनी त्याच्यावर निर्मळ पाण्याचं शिंपण केलेलं असणार त्याचं सोनं करायची वृत्ती तो बाय बर्थ घेऊन आला असणार..
चांगला अनुभव. वाचून बरं
चांगला अनुभव. वाचून बरं वाटलं.
अश्विनी, सुरेख पोस्ट. हे रोप
अश्विनी, सुरेख पोस्ट.
हे रोप वाढवताना त्याच्या पालकांनी, शिक्षकांनी त्याच्यावर निर्मळ पाण्याचं शिंपण केलेलं असणार त्याचं सोनं करायची वृत्ती तो बाय बर्थ घेऊन आला असणार.. >> +१
धन्यवाद. श्यामली यांच्याशी
धन्यवाद. श्यामली यांच्याशी सहमत.
हे असे सामान सापड्ण्याचे आणी
हे असे सामान सापड्ण्याचे आणी माझे सख्य आहे.
शाळेत असताना ५० रु ची नोट सापडली होती बस स्टॉप वर. त्या वेळी ती रक्कम म्हणजे फारच मोठ्ठी होती. जवळपास लोकांना विचारले प्रामाणिकपणे, आणि त्या सर्वांनी त्याच प्रामाणिकपणे आपली नसल्याचे सांगीतले.मग मातोश्रींच्या सांगण्यावरुन तिथल्याच मंदिराच्या पुजारी आजोबांना दिले.लहान पणापासुन घरात आई नेहमी दुसर्याच्या वस्तु घेवु नयेत नाही तर आपल्या हारवतात असे सांगते.
अमेरिके मधे १ वर्षात तीन वेळा पाकीटे सापडली.
प्रत्येक वेळी त्यातला पत्ता अथवा आय कार्ड ( शिकत असतानाची गोष्ट) बघुन त्या त्या लोकांना कॉलुन परत केले.
आणि गम्मत म्ह्णजे एकदा एअर्पोर्ट वर माझेच पाकीट हरवले. मला पत्ताच नव्हता. जेंव्हा नाव पुकारले गेले तेंव्हा कळाले कि कोणि तरी तिथे आणुन दिले होते.
कोणी दिले कळाले पण नाही. पण खुप बरे वाटले. सो त्यावेळी उगाच आठवले करावे तसे भरावे
सुखद अनुभव इथे शेअर
सुखद अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
खरोखर लक्षात रहाण्यासारखा
खरोखर लक्षात रहाण्यासारखा सुखद अनुभव!
चांगला अनुभव.
चांगला अनुभव.
जगात सच्चे आणि दुसर्याला
जगात सच्चे आणि दुसर्याला जाणणारे अनेक लोक अद्याप आहेत हा अनुभव काल मला पण आला. माझ्या मुलीच्या मैत्रीणीचा साधारण ३५ रुपये किंमतीचा मोबाईल तिच्या पर्समधुन पडला. त्याची बॅटरी संपत आल्यामुळे फोन लागतही नव्हता. ती रडवेली झाली होती.
थोड्यावेळाने तिच्या वडीलांना फोन आला. तुमच्या मुलीचा फोन हरवला आहे का ? त्या हरवलेल्या फोन वरुन शेवटचा कॉल तिच्या वडिलांना तिने केला होता.
काही मिनिटातच तिचा हरवलेला फोन तिला मिळाला तोही कोणत्याही अपेक्षेशिवाय.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
god dwells among us everyday
god dwells among us everyday
खूप छान वाटले रेव्यू
खूप छान वाटले रेव्यू
@नीतीनचंद्र - तुम्हाला ३५
@नीतीनचंद्र - तुम्हाला ३५ हजार म्हणायचंय का?
छान अनुभव. खरे तर अशा लोकांची
छान अनुभव. खरे तर अशा लोकांची नावासकट प्रसिद्धी करायला हवी.
एकदा माझ्या मित्राचे पाकीट
एकदा माझ्या मित्राचे पाकीट मारल्या गेले, पण २ दिवसांनंतर त्याला (विथाऊट पोस्टेज) एक लिफाफा मिळाला, त्यात त्याचे कंपनीचे आयकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स आणि रेल्वेचा पास होता. चोरही बरेचदा प्रामाणीक असतात की काय?
खूप छान अनुभव .... इथे शेअर
खूप छान अनुभव ....
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद ...
चांगला अनुभव..... मी एकदा
चांगला अनुभव.....
मी एकदा रिक्षात बॅग विसरले होते. ऑडिट वरुन येताना पहाटे गाडी आली ती ही १ तास लौकर. म्हणुन स्टेशन येणार्यांची वाट न पहाता सरळ रिक्षेने घरी येवुन आई-बाबांना सर्प्राइज करण्याच्या नादात एक हँडबॅग रिक्षातच राहिली. लक्षातच आलेनाही... नंतर साधारण एक तासाने रिक्षावाला घरी बॅग घेवुन आला. त्या वेळेस खरच त्याचे किती आभार मानु आणि किती नको असे झाले... कारण बॅगेत मनी पर्स होती आणि ऑडिट्च्या कामाचे सगळे पेपर्स.....
Pages