जागू यांच्या या पाककृतीवरून सुचलेली ही पाककृती एकदा करून बघा.
==========================
लागणारा वेळ:
४३ मिनिटे
लागणारे जिन्नस:
आळस - दोन ते तीन दिवसांचा
पाऊस - घराबाहेर खच्चून
पाव कप देशीची झिंग
आकाश काळे गडद
२ तक्के उशाला
सगळ्या लोकल ट्रेन्स फेल
प्रत्येक रस्त्यावर पाणी साठून घोळ
पांघरूण गरजेनुसार
हाताची बोटे कडाकडा मोडून
मोठी जांभई जबडा चिरून
क्रमवार पाककृती:
चेंगट म्हणजे उत्साही माणसापासून गल्हट माणूस तयार करणे! प्रथम खिडकीतून १३ मिनिटे बाहेर पाहावे. विरार फास्ट, बोरिवली स्लो वगैरे सर्व गाड्या अजगरासारख्या सुस्तावलेल्या दिसल्या की पडदा ओढून घ्यावा. दुसर्या खिडकीतून २० मिनिटे बाहेर पाहावे. खालच्या रस्त्यावर एकमेकांना शिव्या आणि हॉर्न्स देत आणि साठलेल्या पाण्यात गाडी जागच्याजागी थडथडा उडवत असलेली माणसे बघावीत. तिसर्या, मोकळ्या प्लॉटकडे उघडणार्या खिडकीतून दहा मिनिटे आभाळाकडे पाहून घराबाहेर खच्चून पाऊस पडत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच आकाश अजून कित्येक तास काळे गडद राहील याचीही खात्री करून घ्यावी. मग आत येऊन आरश्यात पाहून एक मोठा आळस द्यावा. हाताची बोटे कडाकडा मोडून जबडा फाटेल अशी जांभई द्यावी. चांगली दोन जाड ब्लँकेट्स बेडवर अस्ताव्यस्तपणे पसरावीत. पाव कप देशी घशात ढकलावी. दोन जाडजूड तक्के उशाला घेऊन सरळ पडी टाकावी.
झाला ४३ मिनिटांत एक चेंगट माणूस तयार!
दुसरी पद्धत - स्वतः चेंगट होण्यास तयार नसलेली व दुसर्याला सुखासुखी चेंगट होऊ न देणारी अशी माणसे वेगळी काढून ती घरातून हाकलून द्यावीत. ह्या पद्धतीने चेंगट लवकर तयार होऊ शकतो.
अप्रतिम झोप लागते. चेंगट अगदी रोज बनायचे म्हंटले तरी कंटाळा येत नाही.
माहितीचा स्त्रोत - ऑफीस