गोल गुबगुबीत रंगीत पोपट उडता उडता आकाशात गेले त्याने सोबत चार पाच फळ नेले .
फळ होते लाल- लाल आणि रसाळ गोड, त्याला लगेचच खाण्याचा झाला मोह.
आता रंगीत पोपट ढगाच्या आडोश्याला बसला.
लाल चुटूक फळ एक एक करून खाऊ लागला.
फळखाऊन त्याने बिया तिथेच टाकून दिल्या. फळ खाऊन पोट भरले म्हणून त्याने तिथेच ढगांवर एक डुलकी काढली आणि थोडा वेळाने उडून गेला.
ढगांनी बघितलं रंगीत पोपट तर उडून गेला परंतु त्याची काहीतरी वस्तू इथेच राहिली .
रंगीत पोपटाला हाक मारत ढग रंगीत पोपटाच्या मागे धावत सुटला.
पण कसलं काय रंगीत पोपट तर पटदिशी दूर निघूनही गेला .
ढगांनी आता त्या बियांना हात लावला.
गोल गोल बी बघून ढगाला खूप आनंद झाला ही छोटीशी अदभूत गोष्ट आता आपल्या बाळाला दाखवली पाहिजे म्हणून ढग आपल्या बाळाला शोधू लागला .
"ढगुल्या SSSS ए SSSS ढगुल्या"
ढगुल्याला शोधायला ढगाने आकाश पालथ घातलं पण ढगुल्या काही केल्या सापडेना .
हम्म…
ढगुल्या नक्की चंद्राकडे गेला असणार आता त्याच्याकडेच जाऊन ढगुल्याला शोधले पाहिजे. असा विचार करत ढग आपला चंद्राकडे निघणार तितक्यात त्याला
ग.....ड असा आवाज ऐकू आला
" अरे बापरे मला गड करतोस! घाबरलो ना मी! "ढग आपल्या लहानग्या बाळाकडे पाहून म्हणू लागला.
ढगुल्याला मग बाबांनी छान छान बिया खेळायला दिल्या.
ढगुल्या सोबत रोज रोज खेळतात फुलपाखरू आणि पक्षी .
चंद्र आणि चांदण्या
परंतु आज ढगुल्याला मिळाल्या छान छान बिया ,
गोल गोल बिया ढगुल्याने पहिल्यांदाच पहिल्या होत्या ढगुल्याला त्या बिया खूप आवडल्या.
मग ढगुल्या त्यांना घेऊन उडूनच गेला उडता उडता खूप दूर गेला बियांशी खेळण्यात त्याचा वेळ कसा गेला त्याला समजलेच नाही .
ढगुल्या जसा हलायचा तश्या बिया सुद्धा हलायच्या
कधी डावीकडे कधी उजवीकडे ,
घरंगळत घरंगळत इकडे
आणि घरंगळत घरंगळत तिकडे.
ढगुल्याला त्याचे हे नवे मित्र खूप आवडले. आज दिवस भर त्याला बियांशीच खेळायचे होते त्याला दुसरे काही नको होते .
तितक्यात तिथे खोडकर वारा आला आणि जरा रुबाबातच म्हणाला , “आज सकाळ पासून ढगुल्या कुठल्या कामात अडकला आहेस रे तू की तुला साध खेळायला यायला वेळ मिळाला नाही ?"
वार्याला जरा ढगुल्याचा रागच आला तो ढगुल्या बोवती गुण-गुण करत फिरू लागला आता हसत खिदळत ढगुल्या जवळ येऊन उभा राहिला.
वार्याचे लक्ष ढगुल्याने हातात घट्ट धरून ठेवलेल्या बियांकडे गेलं.
"काय आहे रे ते तुझ्या हातात मला बघू ."
मला बघू , मला बघू अस म्हणत वार्या त्याच्या हातातून बिया हिसकावू लागला.
ढगुला बिचारा नाजूक ह्या आडदांड वार्या पाशी त्याच थोडी काही चालणार .
“नाही रे वार्या ते माझ आहे .मी नाही देणार तुला.” ढगुला त्याला विनवणी करू लागला
ढगुल्याने बिया हातात घट्ट पकडून ठेवल्या .
आता वार्याला ढगुल्याचा भयंकर राग आला.मला दाखवत नाही म्हणजे काय. याची आता चांगलीच मजा केली पाहिजे असा विचार करत वार्याने ढगुल्याच्या हातावर जोरात फुंकर घातली .
तश्या ढगुल्याच्या हातातल्या सर्व बिया खाली पडू लागल्या.
ढगुला आपला पटकन खाली जाऊन बिया पकडू लागला पण वार्याने त्याला खाली जाऊच दिले नाही .तो तर ढगुल्या पेक्षा जोरात खाली जाऊन ढगुल्याला वर उडवू लागला .
आता ढगुल्याला काही केल्या खाली जाता येईना.
बिच्चारा ढ्गुला..... त्याचे नवे मित्र जमिनीवर पडून हरवले सुद्धा.
ढगुला खूप रडला खूप रडला त्याला वार्याचा फार राग आला .
खिदळत खिदळत वार्या तिथून निघून गेला .
ढगुला आपल्या आईच्या कुशीत जाऊन बसला त्याला त्याचे मित्र आठवायचे. मित्रांबरोबर खेळण्यात घालवलेला दिवस आठवायचा आणि लगेचच वार्याचा आडदांडपणा सुद्धा आठवायचा तो खूप खूप रडला. दोन तीन दिवस तो सतत रडतच होता.
काही दिवसांनतर ………..
हळू हळू तो आपले दुखः विसरायला लागला. आता तो दुःखाणे व्याकुळ होऊन आपल्या मित्रांना आठवत नव्हता तर मित्रांबरोबर केलेली मजा आठवून आनंदी राहायला लागला .
असेच खूप दिवस
मग खूप महिने
आणि खूप वर्ष सुद्धा संपले .
ढगुल्याचे मित्र जमिनीवर पडले त्या नंतर काय गंमत झाली माहित आहे काय?
झाले असे की ढगुल्याचे मित्र जमिनीवर कुठेतरी पडले आणि हरवले. परंतू ते हरवले नव्हतेच ते जमिनीच्या पोटात लपून बसले . ढगुल्या खूप खूप रडला आणि त्याच्या डोळ्यातले पाणी जमिनीवर पडले.
बियांना पाणी मिळाले तसे त्याचे छानसे रोपे तयार
झाली .
काही दिवसातच त्याचे मोठे मोठे झाड तयार झाली त्यांना लाल लाल फळे सुद्धा आली.
झाड रोजच खूप उंच उंच वाढतायेत .
का?
अहो त्यांना उंच उंच जाऊन आभाळातल्या आपल्या मित्राला म्हणजे आपल्या ढगुल्याला
भेटायला जायचे आहे ना!
अनघा हिरे
नासिक
सॉल्लिड लिहीलेस. खूप्पच
सॉल्लिड लिहीलेस. खूप्पच आवडले.:स्मित:
आभारी आहे
आभारी आहे
अरे वा. फारच सुंदर. घरी
अरे वा. फारच सुंदर. घरी मुलीला सांगिन ही गोष्ट.
कल्पक...
कल्पक...