स्वप्नांच्या पलीकडले ७

Submitted by shilpa mahajan on 17 June, 2013 - 05:02

. आमचे तंबू ठोकले गेले. या वेळी आम्हाला वाट पहावी लागली नाही. आम्ही तंबूत बसायला जाणार तोच आम्हाला उषाची चाहूल लागली. आम्ही लगेच बाहेर आलो. पहातो तर गोपाल आणि उषा दोघेही एका खडकापाशी आले होते. फूटभर लांब दाढी वाढलेला , ऋषी मुनि सारख्या केसांच्या जटा झालेला आणि निस्तेज दिसणारा गोपाल पहिल्यांदा ओळखूच आला नाही. उषा बरोबर होती म्हणूनच तो गोपाल होता असे म्हणावे लागले, इतका तो बदलला होता. उषाची अवस्था त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. फक्त मागच्या वेळी ती जितकी भावुक झाली होती तितकी यावेळी झाली नाही. नव्या जीवनाला
नाइलाजाने का होईना पण सरावली होती. दोघांच्याही चेहेऱ्यावर एक वेगळाच उदासीन.
भाव दिसत होता. का कोण जाणे मला तिने आधी ओळखले नाही. शिवाय जयवंत आमच्या बरोबर होता . एक अनोळखी व्यक्ती दिसल्यानातर मात्र तिची स्त्रीसुलभ लज्जा जागृत झाली. तिने नजर खाली झुकवली. पण तिला तसे फार वेळ थांबावे लागले नाही कारण भाभीजी तयारीत होत्या. त्यांनी तिच्यासाठी प्लास्टिकचा एप्रन आणला होता. तो त्यांनी तिच्या गळ्यात घातला. ती ही मग सावरली. तिचं पोट फारसं दिसत नव्हतं . प्रसूतीला अवकाश होता कि बाळाची वाढ पुरेशी झाली नव्हती हे कळत नव्हतं . भाभीजी दोघांसाठी चहा आणि खायला घेऊन आल्या. उषा बरोबर गोपालने खाल्ले , पण याही वेळी तो बोलला मात्र काहीच नाही. भाभिजींनी तिला प्रभातच्या फोटोंचा अल्बम दाखवला. तो पहाता पहाता उषा चा उदासीनपणा कुठल्याकुठे गळून पडला. ती हमसाहमशी रडू लागली. अल्बमचे मुके घेऊ लागली. तिची अवस्था पाहून भाभिजींनाही रडू आवरले नाही.
इतका वेळ जयवंत निरीक्षण करत होता आणि त्याच बरोबर काही तयारी करत होता. पण त्याकडे आमचे कोणाचे लक्ष नव्हते.पुढच्या तयारीसाठी तळ्याजवळ खड्डा खोदायला मजुरांना सांगावे म्हणून पाठकजी निघाले तेव्हा त्याने 'थांबा ' असा संकेत केला. त्याने आपल्याबरोबर आणलेला छोटासा टब काढला. आणि त्यात तळ्यातले पाणी भरायला लावले. त्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर ची नळी टब मधल्या पाण्यात सोडून बटण चालू केले.पाण्यात बुडबुडे येऊ लागले. थोड्या वेळाने त्याने उषा ला त्यात तोंड बुडवून श्वास घेता येतो का ते बघायला सांगितले. उषा ने प्रयत्न केला खरा पण तो यशस्वी झाला नाही. ती दम कोंडून पटकन तळ्यात शिरली. काही मिनिटांनी तीबाहेरआली.जयवन्तानेतिला धीर दिला. थोड्या प्रयासानंतर तिला ते जमेल असे पटवून दिले .तिनेही मग पुन्हा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात तिला ते जमले .त्यामुळे तिचा चेहेरा एकदम उजळला. ते पाहून जयवंत खूष झाला आणि म्हणाला " याचा अर्थ आता टबमधल्या पाण्यात योग्य प्रमाणात ऑक्सिजन शिरला आहे ."
टब मध्ये श्वास घेणे जमल्याबरोबर उषा इतकी उत्साहित झाली की एकदम उठून उभी राहिली आणि तळ्याबाहेर यायला निघाली. पाण्याबाहेर हवेत तोल राखण्याची सवय सुटल्यामुळे तिचा तोल एकदम गेला आणि ती धाडकन पडणारच होती, पण या गोष्टीचा विचार जया ने आधीच केला असावा , कारण तो अगदी तयारीत होता. त्याने तिला लगेच आधार दिला . मग मला भाभिजीनच्या मदतीने तिला दोन्हीकडून खांद्याला धरून आणायला सांगून तो स्वतःऑक्सिजन सिलिंडर पाठीशी लावून आणि त्याची नळी टब मध्ये टाकून पाण्याचा टब हातात घेऊन सोबत निघाला. तंबू तळ्यापासून खरं तर अगदी जवळ होता परंतु तिथपर्यंत येता येता उषा अगदी थकून गेली. तंबूमध्ये मोठ्या बाथ टब एवढा रबरी टब त्याने केव्हा लावून ठेवला होता ते आमच्या लक्षातच आले नव्हते. मजुरांनी त्यातही पाणी भरले. त्यातही ऑक्सिजन भरला गेला आणि उषाने टेस्ट करून पाहिल्यावर तिला त्यात झोपायला सांगितले. श्रमलेली उषा टब मध्ये शिरताच निपचित पडून राहिली . . उषाचे हे असे जगावेगळे जीवन भाभिजींनीही पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवले. तिच्यासाठी त्यांचा जीव अगदी कासावीस झाला. रात्रभर उषा टबमध्ये आरामात झोपली होती . पण पहाटे पहाटे तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि सर्वांचीच झोप उडाली. या वेळी डॉक्टर शेजारीच होता, त्यामुळे तशी काळजी नव्हती. भाभीजी आणि जयवंत दोघांनी मिळून प्रसूती पार पाडली. जन्माला आलेले मूल अगदी अशक्त होते. ते जन्मानंतर जेमतेम तासभर जगले . त्याला पाण्याबाहेर जगवण्याचा प्रयत्न निष्फळ झाला. आश्चर्य म्हणजे उषा ला त्याचे मुळीच वाईट वाटले नाही. भाभिजींवर किती जबाबदारी टाकायची याचे तिला आलेले टेन्शन उतरले असावे. शिवाय ते मूल फारच अशक्त होते. “परमेश्वरालाच त्याची दया आली म्हणायची !" एवढे बोलून तिने तो विषयच बंद करून टाकला . तिच्या संमतीनेच भाभिजीनी तिला तांबी बसवून दिली .
हे सर्व झाल्यावर भाभिजींनी तिचे जटा झालेले केस कापून अगदी बारीक करून दिले.
तिची वाढलेली नखे कापून दिली.तिच्या हातापायाला मालीश करून दिली. एवढे केल्यावर उषा थोडी सुखावली आणि पुन्हा भावूक झाली.
यानंतर पुन्हा एकदा निरोप घेण्याची वेळ आली. जयवंत पुढे आला . त्याने तिची संमती असल्यास तिच्यावर प्रयोग करून, तिच्या फुफुसात भरलेले पाणी काढून टाकून , तिला हवेत श्वास घेण्यास लायक करण्याची ,पाहिल्यासारखे आयुष्य जगता यावे असा प्रयत्न करण्याची इच्छा आणि तयारी बोलून दाखवली. तो एक जगावेगळा आणि आव्हानात्मक प्रयोग असणार होता . यशापयशाबद्दल कसलीच खात्री देता न येणारा , पण सोनेरी पहाटेचं स्वप्न दाखवणारा ! त्यासाठी मात्र तिला त्याच्या हॉस्पिटल मध्ये जावे लागणार होते. ते अर्थातच फार कठीण होते. ज्या अवस्थेत तिला प्रवास करावा लागणार होता ते पहाता त्यात खूप मोठी रिस्क होतीच ,शिवाय यशाची खात्रीही नव्हती.
उषाने त्याला नकार दिला.तिच्यामते ,ती जर हवेत श्वास घेण्यालायक होऊ शकली नाही तर तिची अवस्था फारच विचित्र होईल.तिची तिथे अवस्था घरात पाळलेल्या माशासारखी होईल. इथे निदान तिच्यासारखे जीवन जगणारे इतर अनेक जीव असल्याने कसा का होईना, एक समाज होता.तिथे मात्र ती एकटीच अशी असल्याने तिचे आयुष्य विचित्र होईल. आणि सामान्य आयुष्य जगणारे सर्व लोक सतत डोळ्याना दिसत राहिल्यामुळे स्वतःचे आयुष्य जास्तच दुःसह होईल.
अशा तऱ्हेने क्षणोक्षणी मरण्यापेक्षा उर्वरित आयुष्य इथेच काढायची तिची तयारी होती. तिच्या बोलण्यात तथ्य होते . आम्ही सारे दुःखी मनाने परत निघालो. या वेळी उषा साठी वेळोवेळी केस कापण्यासाठी कात्री, नखे कापण्यासाठी नेलकटर आणि आणखी काही वस्तू एका छोट्या पेटीत ठेवून याशिवाय खाण्याच्या उरलेल्या सर्व वस्तू ठेवून आम्ही परत जायला निघणार, एवढ्यात एक नवल घडले. आम्ही आल्यापासून आसपास राहूनही गप्प गप्प रहाणारा गोपाल पुढे आला. जयवन्ताच्या प्रयोगासाठी आपण तयार असल्याचे त्याने सांगितले. सामान्य आयुष्य जगता यावे यासाठी प्राण पणाला लावण्याची त्याची तयारी होती. प्रयोग अयशस्वी झाला तरी चालेल पण इथून त्याला सुटका हवी होती. अर्थात उषावर त्याचे निरतिशय प्रेम असल्याने तिचा विरह त्याला असह्य होणार होता. पण प्रयोग यशस्वी झाला तर तो तिला न्यायला परत येणार होता. आपल्या सुखी संसाराची त्याची आस या निमित्ताने पुन्हा जागृत झाली होती.
. गोपाळ निघालेला पाहून उषाचा गळा दाटून आला. तिचा जिवाभावाचा आधारच चालला होता. त्याच्या सोबतीच्या आधारावरच ती हे खडतर आयुष्य जगणार होती. पण तिने त्याला रोखले नाही, उलट शुभेच्छा दिल्या. त्याच्या तिला न्यायला येण्याची वाट पहाण्याचे वचन दिले आणि ती तळ्याच्या खोल पाण्यात निघून गेली.
जयवन्ताने गोपालला टबमध्ये श्वास घेण्याचा सराव करवला. त्यानंतर त्याला तंबूत नेउन त्याचे केस कापले, दाढी करवली, त्याची व माझी देहयष्टी सारखी असल्याने माझे कपडे घातले. आणि दोघा मजूरां करवी आधार देत जीपमध्ये बसवले.मी मागोमाग पाठीशी सिलिंडर लावून आणि हातात टब घेऊन चालतच होतो. दर मिनिटाने त्याच्या समोर धरत होतो. जीपमध्ये बसल्यावर टब त्याच्या शेजारी बसलेल्या मजुराच्या हातात देऊन , दुसऱ्या मजुराला गोपालला आधार द्यायला सांगितले आणि जया जीप चालवायला बसला. येताना माना गावातून खरेदी केलेले दोन अरुंद तोंडाचे मातीचे रांजण तळ्याच्या पाण्याने भरून घेतले तेव्हा कुठे त्यावेळी आमच्या लक्षात न आलेले त्याचे महत्व आम्हाला कळले . रस्त्यातल्या खडबडीत पणामुळे हिंदकळून पाणी सांडल्यामुळे टब मध्ये ते पुन्हा पुन्हा भरायला त्याचा उपयोग होत होता . माना गावावरून जाताना वाटेत भेटणारे गावकरी कुतूहलाने पहात होते . भाभीला शिव गणांनी काही केले नाही , ती सुखरूप परत जात आहे याचे त्यांना वाटलेले आश्चर्य त्यातून स्पष्ट दिसत होते . त्यांच्या जास्त जवळ न जाता दुरूनच त्याना नमस्कार करत गाडी पटकन पुढे काढली कारण त्यांनी गोपालला पाहू नये अशी आमची इच्छा होति.
माना गाव ओलांडल्यावर समोरून एक पांढरी गाडी येताना दिसली. मला जरा आश्चर्य वाटले. गाडी जवळ आल्यावर माझे नवल आणखीनच वाढले. कारण ती एक रुग्णवाहिका होती, बद्री नारायणाच्या एका खाजगी दवाखान्याची होती. आणि जयानेच तीआपल्या एका मित्राची ओळख वापरून मागवली होती . गोपालला त्यात झोपता आले. गोपाल , जया , पाठक पती पत्नी रुग्ण वाहिकेत बसले. मजूर आणि मी मग जीप मध्ये बसलो. अर्थातच रुग्णवाहिकेच्या मागे जीप चालवत नेण्याचे काम माझ्यावर आले . रुग्णवाहिका फक्त चालकासह मागवली. होती .त्यामुळे जास्त गवगवा किंवा बोभाटा न होता गोपालची व्यवस्था आम्हाला करता आली.
अर्थातच पाण्यात श्वास घ्यावा लागत असल्याने त्याचा आणि पाण्याच्या टब कडे सारखे लक्ष पुरवावे लागत असल्याने इतरांचाही प्रवास कठीणच होता यात शंका नाहि. पण सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळे तो तडीस गेला .
हरिद्वार पर्यंत त्या गाडीने आलो. तिथे आल्यावर दिसले कि जयाच्या दवाखान्याची सुसज्ज रुग्ण वाहिका आमची वाट पहात थाम्बली आहे . गोपाल ची व्यवस्था हळुवारपणे त्या आलेल्या रुग्णवाहिकेत केल्यावर पहिली रुग्ण वाहिका परत गेली . आता जयाबरोबर त्याचे सहायक असल्याने आमच्या मदतीची गरज उरली नव्हती . तिथूनच आम्ही जयाचा आणि गोपाळचा निरोप घेतला . आमचे मन अगदी कातर झाले होते. गोपालला पुन्हा भेटता येईल कि नाही या विचाराने उदास झाले होते. जयाने आम्हाला धीर दिला . त्याने आम्हाला अत्यंत कठीण अशी अट घातली . आम्ही कोणाजवळ हि या सर्व प्रकाराची वाच्यता करायची नाही , एवढेच नव्हे तर जयाशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधायचा नाही . योग्य वेळ आल्यावर तो स्वतःच आमच्याशी संपर्क साधणार होता . होकार देण्यावाचून आम्हाला पर्याय नव्हता . जड अंतःकरणाने आम्ही वेगळे झालो . गोपाल जया बरोबर त्याच्या दवाखान्यात गेला . आम्ही सर्व दिल्लीला आलो . माझ्या घरून प्रभात ला घेऊन पाठक गुरुजी उर्फ विष्णू शर्मा कोटद्वाराला रवाना शाले. मी देखील ड्यूटीवर हजर झालो . अर्थातच जीप आणि मजूर परत पाठवून मगच !
तेव्हापासून रूढ अर्थाने आम्ही आपापले आयुष्य जगत आहोत खरे ,पण रोज सकाळी डोळे उघडले कि पहिला विचार येतो तो ' आज जयाचा काही फोन येईल का , गोपाल ज्या प्रयोगासाठी आला आहे त्या प्रयोगाला यश लाभले असेल का ?
फोन वाजला कि वाटतं की हा फोन ठीक झालेल्या गोपालचा तर नसेल?
आमच्या जीवनाला एक नवीनच नाव लाभलं आहे," प्रतीक्षा! निरंतर प्रतीक्षा ! एका सोनेरी भविष्यकाळाची प्रतीक्षा !
समाप्त
"
----------------------------------------------------0------------------------------------------------------
समस्त मायबोलीकर वाचक हो , नमस्कार ! गेले काही दिवस तुम्ही सर्व जी एक " हटके" असलेली कथा वाचली ती माझी नाही . माझे वडील श्री गौरीशंकर पाध्ये यांनी ती लिहिली आहे . ते आता हयात नाहीत . त्यांनी हि कथा प्रकाशित करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी झाला नव्हता . एके दिवशी त्यांनी मला या कथेची फाइल आणून दिली आणि तुला याचे काही जमले तर कर असे सांगितले . मी ती वाचून पाहिली . कथा छानच होती परंतु ते टेक्निकल लाइनचे होते . लेखन हा त्यांचा प्रांत नव्हता . त्यामुळे भाषा विषयक सुधारांची गरज होति. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत मला काही ना काही अडचणींमुळे त्यांची इच्छा पूर्ण करणे जमले नाही . त्यांना रूप कुन्डा विषयी पेपरात आलेल्या बातम्या वाचून ही कथा सुचली असे त्यांनी मला सांगितले होते .
आज फादर्स डे ऊर्फ पितृदिन ! आजच्या दिवशी ही कथा पूर्ण करून मायबोलीकर वाचकांच्या सुपूर्द करताना माझ्या वडिलाना गिफ्ट दिल्याचा फील येतो आहे . माझ्या वडिलांच्या पवित्र स्मृतीला हि माझी भावपूर्ण श्रद्धांजली !!
.
शिल्पा महाजन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या दिवशी ही कथा पूर्ण करून मायबोलीकर वाचकांच्या सुपूर्द करताना माझ्या वडिलाना गिफ्ट दिल्याचा फील येतो आहे>>> अरे वाह!!!
छान कथा होती.

वा! कथा खरंच आवडली.
अशी वडिलांची इच्छा पूर्ण करून त्यांना श्रद्धांजली देण्याची कल्पनाही आवडली.
तुम्हालाही पुढिल कथा लेखनाकरिता शुभेच्छा!

माझ्या वडिलांनी लिहिलेल्या कथेची शेवटची काही पाने गहाळ होती . मी कथेचे पुनर्लेखन करायला घेतले तेव्हा ते मला कळले . त्यामुळे त्यांनी शेवट केला होता कि नाही किंवा केला असल्यास काय केला होता हेच मला कळले नाही . मग माझ्या कल्पनेने मी जया ही व्यक्तिरेखा निर्माण करून जमला तसा शेवट केला, परंतु मला सायन्स ची पार्श्वभूमी नसल्याने शास्त्रीय प्रयोगांसाठी आवश्यक असलेली बुद्धीची सखोल कल्पनाशक्ती (ती देखील खरी वाटेल अशी ) माझ्यापाशी नाही . म्हणून तसा काही प्रयोग करून टीकेला कारणीभूत होण्यापेक्षा ते वाचकांच्या कल्पना शक्तीवर सोडणे मला जास्त योग्य वाटले .

माझ्या वडिलांच्या पवित्र स्मृतीला हि माझी भावपूर्ण श्रद्धांजली !!>>> खुपच चांगली श्रद्धांजली !!
कधाही आवडली. Happy

आजच्या दिवशी ही कथा पूर्ण करून मायबोलीकर वाचकांच्या सुपूर्द करताना माझ्या वडिलाना गिफ्ट दिल्याचा फील येतो आहे>>> मस्तच. खुपच चांगली श्रद्धांजली.

खूप इंट्रेस्टिंग वाटली कथा, अगदी धनंजय मधल्या अतर्क्य आणि अद्भुत कथेचा फील आला, आणि भाषा सुद्धा चांगली वाटली Happy
शुभेच्छा!!