झपाटलेला

Submitted by आशूडी on 12 June, 2013 - 14:10

प्रत्येक कलाकाराच्या कारकीर्दीत त्याच्या हातून अशी एखादीच कलाकृती घडून जाते की जी त्याची 'सिग्नेचर' होते. त्यानंतर त्यानं काहीही केलं नाही तरी चालेल इथपर्यंत रसिक त्यावर फिदा झालेले असतात. हा माईलस्टोन त्याच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावून ठेवतात. किंबहुना त्यासाठीच तो कायम स्मरणात राहतो. अमिताभचा डॉन, सचिन दिग्दर्शित अशी ही बनवाबनवी आणि महेश कोठारेचा झपाटलेला हे सगळे याच प्रतीचे.

२० वर्षांपूर्वी 'झपाटलेला' ने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहासाचं नवीन पानच लिहीलं. मूळ कल्पना जरी कुठूनतरी 'प्रेरणा' घेऊन आलेली असली तरी त्या चित्रपटानं जे करुन दाखवलं ते त्याआधी कधी झालं नव्हतं. गब्बर नंतर प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिलेला खलनायक जर कुणी असेल तर तात्या विंचू. त्याचा थरार, त्याची भीती आणि त्याचा गोंडसपणा हे केवळ योगायोगानं तयार झालेलं रसायन नव्हतं. तात्या विंचू या नावातच त्याचा नैसर्गिक वेगळेपणा उठून दिसतो. महेश कोठारेच्या कवट्या महाकाळ, टकलू हैवान, गिधाड गँग अशा मुधोळकरी बालसाहित्यातून जन्मलेल्या खलनायकांच्या रांगेत तात्या विंचू मात्र अव्वल ठरतो. याचं श्रेय अर्थातच दिलीप प्रभावळकर आणि त्या गोल घार्‍या डोळ्यांच्या, भुरुभुरु उडणार्‍या सोनेरी केसांच्या बाहुल्याला!

खरंतर झपाटलेला हा चित्रपट म्हणजे महेश कोठारेचा नेहमीचाच फॉर्म्युला होता. भोळ्या भाबड्या लक्ष्याला कुणीतरी क्रूरकर्मा खलनायक छळणार आणि मग 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' सिद्ध करत तो त्याच्याशी झटापट करताना इन्स्पेक्टर महेश देवासारखा धावून येऊन त्याची सुटका करणार. पण ज्या पध्दतीने संपूर्ण चित्रपटभर थरार आणि विनोद यांचे ना कम ना ज्यादा मिश्रण जमले आहे ते करणे खुद्द महेश कोठारेलाही पुन्हा जमले नाही. हल्ली अमिताभ जसा कोणत्याही सिनेमामध्ये 'अमिताभ'च वाटतो तसा तेव्हा लक्ष्या होता. त्याच्या भूमिका जर दुसर्‍या कुणी केल्या असत्या तर त्या नक्कीच वेगळ्या झाल्या असत्या. तो कोणतंही काम इतक्या सहजतेने करत असे की 'असं' काहीतरी करणं, नव्हे - सतत करत राहणं हे किती अवघड आहे हे आता तो नसताना समजतं. त्या समकालीन मराठी चित्रपटातली गाणी संगीत इतकं उल्लेखनीयही नव्हतं की आजच्यासारखे फक्त गाण्यांच्या आधारे चित्रपट चालावेत!वेशभूषा, नृत्य इत्यादींबद्दल बोलण्यासारखे तरी काय होते? तरीही झपाटलेला ने रातोरात गल्ले जमवले. प्रेक्षकांच्या पिढ्यानपिढ्या झपाटून टाकलेल्या काही मोजक्या कलाकृतींमध्ये याचा समावेश झाला.

आता गोष्ट झपाटलेला-२ ची. वीस वर्षांनंतर पुन्हा तोच चमत्कार घेऊन रसिकांपुढे येणं हे फार अवघड आव्हान होतं. जुन्या कथेशी कुठेतरी लागेबांधे जुळवत नव्या कलाकारांसोबत नव्या कथेला सादर करणं सहजसाध्य नसणारंच. जेव्हा मूळ चित्रपटाचा भक्कम आधारस्तंभच - लक्ष्मीकांत बेर्डे - गमावलेला असतानाही हे आव्हान स्वीकारणं धाडसाचंच होतं.वीस वर्षांनंतर एखाद्या चित्रपटाचा जेव्हा सिक्वेल येतो तेव्हा काळाच्या गतीने अनेक संदर्भ बदललेले असणार हे गृहीत धरुन प्रेक्षकांनी तेवढी सूट द्यायला हवी.झपाटलेला २ रसिकांसाठी अनोखी भेट घेऊन येतो ती म्हणजे ३ डी ची. केवळ कमाल! पहिल्या झपाटलेला मध्ये एखादा बाहुला चालतो, बोलतो हा जसा चमत्कार वाटत होता तसेच उच्च दर्जाचे चमत्कार करत चित्रपट पुढे सरकतो. चित्रपटाचा नायक आदिनाथ कोठारे कुठेही 'लक्ष्याचा लेक' असल्याचा फुटकळ आविर्भाव करण्याचा प्रयत्नही करत नाही हे विशेष. मकरंद अनासपुरेही त्याच्या स्वतःच्या शैलीतच समोर येतो. विनोदाची अधिकाधिक बाजू त्याने सहज तोलून धरली आहे हा मोठाच दिलासा. लक्ष्मीकांत बेर्डे सारखं किंवा त्याच्या जवळपास जाणारं काम कुणीही करु शकत नाही, त्याची नक्कल करण्याचा अयशस्वी प्रयत्नही करु नये हीच या चित्रपटाद्वारे त्याला दिलेली श्रध्दांजली. आदिनाथ कोठारेचा वावर आश्वासक आहे. मराठीमध्ये दिसायला चांगले आणि बरा अभिनयही जमणारे असे 'हीरो' नेहमीच कमी होते- आहेत. त्या मोजक्यांपैकी एक म्हणून आदिनाथची लवकरच गणना होईल.

सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्या चित्रपटांच्या यादीत आणखी एकाची भर एवढाच काय तो त्यांना झालेला फायदा. त्या दोघींकडून चित्रपटाला मिळालेलं योगदान शून्य. मुली जरी पुण्याच्या फर्गसन कॉलेजात बी.ए. करत असल्या किंवा न्यूज रिपोर्टर असल्या तरी कोणत्या ठिकाणी कसे कपडे घालावेत हा 'साधा कॉमन सेन्स' ही त्यांना नसावा याचं आश्चर्य वाटलं. पुण्यातही काही 'विशिष्ट' भाग सोडले तर इतरत्र सहज कुणी घालणार नाहीत असे मिनीज, हॉल्टर नेक ड्रेसेस या पोरी श्रीरंगपूरच्या जत्रेत घालून स्वैर बागडत असतात आणि त्यांचे त्यांचे हीरो सोडले तर इतर कुणी त्यांना एकदाही वळून बघत नाहीत यातच काय ते आलं. सहज मनात आलं, पहिल्या झपाटलेला मध्येही पूजा पवार आणि किशोरी अंबिये यांची काय विशेष कामगिरी होती? त्यांचे कपडे तर म्युझियममध्ये ठेवण्याजोगे. पण तेव्हा ते खटकत नव्हतं. वीस वर्षांचा फरक फरक तो हाच महाराजा!

अवधूत गुप्तेचं पार्श्वसंगीत थरारपटाला शोभेलसं मस्त जमलं आहे. पण लावणी आणि गणपतीच्या गाण्यात त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. तिथे मात्र अजय अतुलच हवे असं प्रकर्षानं जाणवलं. 'मदनिके' गाणं चांगलं झालंय पण तो तर अवधूतचा हातखंडा. 'मदनिके' सारखं कानात घुमत असताना मला चुकून विडंबनच सुचायला लागलं- ' सदनिके... सदनिके.. किती झाले तुझे गं मोल!'

राघवेंद्र कडकोळ, अभिजित चव्हाण आणि प्रभावळकर दमदार अभिनय, आवाजाच्या आधारावर आपल्याला पहिल्या झपाटलेल्याशी पटकन जोडून देतात. वीस वर्षांनंतरही प्रभावळकर फक्त आवाजावर टाळ्या आणि शिट्ट्या घेतात तेव्हा विलक्षण कौतुक वाटते.फक्त त्यांचं संपूर्ण चित्रपटात (आत्म्या-भुताच्या रुपाने का होईना) एकदा तरी दर्शन व्हायला हवं होतं असं राहून राहून वाटतं. मधू कांबीकरने जुन्या आणि नव्या काळाशी सांगड सुरेखपणे साधली आहे. कितीही सुधारणा झाल्या तरी खेड्यातलं रांगडेपण पूर्णपणे पुसलं जात नाही हे ती सहज दाखवून देते.इन्स्पेक्टर महेशरावांबद्दल बोलायला शब्द कमी आहेत. वय वाढलं तरी त्यांची स्मरणशक्ती, नजर आणि नेम अचूक आहेत! कसे ते क्लायमॅक्सला पहालच. आपल्या गोजिर्‍या तात्या विंचू बद्दल सांगायचं तर ३ डी मध्ये तो अक्षरशः जिवंत होतो! त्याच्या काही हालचाली इतक्या विलोभनीय आहेत की आणखी थोड्या करामती हव्या होत्या असं वाटतं.
जेव्हा आताचीही लहान मुलं तात्या विंचूला घाबरुन किंचाळतात तेव्हा पुन्हा एकदा प्रभावळकर आणि त्या बाहुल्याला दाद मिळते.

'मराठी चित्रपटातही आम्ही हे करु शकतो' हे महेश कोठारेने वीस वर्षांनंतरही तेवढ्याच ताकदीने सिध्द केले आहे याचा अभिमान तर आहेच! खूप वर्षांनंतर आपण आपल्या शाळेत जुन्या आठवणी शोधायला जावं आणि तिथलं चित्र बर्‍यापैकी बदललेलं पाहून 'कालाय तस्मै नमः' म्हणावं अन मागे फिरावं याशिवाय आपल्या हातात दुसरं काय असतं? त्या आठवणी, तो गोठलेला गतकाळ हे आपलं संचित असतं.झपाटलेला -२ पहायला जाताना आपलं हेच लाखमोलाचं देणं असतं - नॉस्टॅल्जियाचं. ते सोबत घेऊन आपण संपूर्ण सिनेमा पाहतो आणि नव्याचं कौतुक करता करता मनातल्या मनात 'जुनं ते सोनं' अशी नकळत कबूलीही देतो. हे दोन्ही चित्रपटांचं यश आहे. एका संपूर्ण पिढीला 'झपाटलेला' आणखी एक पिढी झपाटतो आहे याचे साक्षीदार आपण आहोत हे काय कमी आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परिक्षण Happy
निबंधात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवत असेल ही.

ही भावली मिळेल काय. म्हणजे मर्चंडाइज! >>> कशाला अमा? रात्री अपरात्री स्वतःला घाबरवून घ्यायला? चुकून टेडिबेअर सारखा उशाशी वगैरे ठेवशील आणि रात्री भस्सकन समोर दिसला तर किंचाळशील Proud

अश्विनी के +१
स्टार माझावर जेव्हा महेश कोठारेंनी तात्या विंचूचे बाहुले मार्केटमध्ये येणार असे सांगितले तेव्हा माझ्य मनात हेच आल, असल गोंड्सपण डेंजरस बाहुल कोण विकत घेईल.

मी तर चुकुनही नाही विकत घेणार असली बाहुली Proud

आशु, मस्त लिहिलयेस... याला म्हणतात परिक्षण.. नक्की पहाणारच!
अपेक्षाभंग झाला तरी तयारी आहे

किती मनापासून लिहीलंय तुम्ही सगळ्यांनी! धन्यवाद.
ज्यांनी पहिलाच झपाटलेला अजून पाहिला नाही, त्यांना आता तो पाहून कितपत आवडेल शंकाच आहे. कारण अनेक गोष्टी कालबाह्य वाटू शकतात. त्या काळाचे संदर्भ लक्षात ठेवून पाहिलात तर मात्र नक्कीच मजा येईल.
प्रिया अरुण ऐवजी पूजा पवार असा बदल करते वर. राज आणि आगाऊ, धन्यवाद.
महामृत्युंजयमंत्र आणि त्या बाहुल्याबद्दलही अगदी, अगदी.
मयूरेश आणि केश्वि, डॉक्टरांप्रमाणे मराठीचे शिक्षकही 'एकाही विद्यार्थ्याला आम्ही मराठीच्या पेपरात एकाही प्रश्नाचे पैकीत पैकी गुण देणार नाही. ' अशी शपथ घेत असल्याने कधी मिळाले नाहीत असे गुण. Proud चांगले शेरे मात्र मिळायचे.

हा सिनेमा शनिवार, रविवार सर्व शो हाऊसफुल होता. मंगळवारी दुपार, रात्रीच्या शोलाही खच्चून गर्दी होती. हा सिनेमा बच्चेकंपनीसोबत पाहिल्याने जास्तच मजा आली. आपल्याला स्वतःला जरी त्यातला थरार आधीइतका जाणवला नाही तरी आजूबाजूला रडणारी मुलं, 'आई, मी यापुढे तुझ्यासोबत कुठल्याही सिनेमाला येणार नाही', असे उद्गार ऐकून हलकेच हास्याची कारंजी उडत होती. जसा पहिला झपाटलेला बालचमूमध्ये लोकप्रिय झाला तसाच आताही करण्यात महेश कोठारे जिंकला आहे. त्यासाठी त्याला जत्रेतल्या निरर्थक पळापळीचा, सोप्या विनोदांचा आणि खुसखुशीत संवादांचा वापर करावा लागला असला तरी.

जेव्हा हिंदी सिनेमासारखं एका रात्रीत भारतभर, भारताबाहेरही शेकडो मल्टिप्लेक्सेसमध्ये रिलीज होऊन कितीही टुकार सिनेमा असूनही करोडोंचे गल्ले जमवले जात नाहीत, किंबहुना एखादा तरी मुख्य शो लावण्यासाठी हांजी हांजी करावी लागते तिथे त्या दर्जाच्या उच्च निर्मितीमूल्यांची अपेक्षाच करणं गैर आहे. तरीही लोकाश्रयाचा अफाट इतिहास असलेला असा सिनेमा पुन्हा आणताना मास आणि क्लास दोन्हीचा समतोल साधणं ही तारेवरची कसरत यशस्वी झाली आहे. महाराष्ट्रातही काही विशिष्ट ठिकाणीच प्रदर्शित होऊन जेव्हा यशापयश जोखलं जाणार आहे तिथं आपण मराठी माणसानं झुकतं माप द्यायला काहीच हरकत नसावी. Happy

आशू,
परीक्षण अतिशय आवडलं. मुख्य म्हणजे कुठेही कथा उघड न करता, अवास्तव व अनावश्यक शेरेबजी न करता तू या चित्रपटाबद्दल लिहिलंस, ते आवडलं.

<जेव्हा हिंदी सिनेमासारखं एका रात्रीत भारतभर, भारताबाहेरही शेकडो मल्टिप्लेक्सेसमध्ये रिलीज होऊन कितीही टुकार सिनेमा असूनही करोडोंचे गल्ले जमवले जात नाहीत, किंबहुना एखादा तरी मुख्य शो लावण्यासाठी हांजी हांजी करावी लागते तिथे त्या दर्जाच्या उच्च निर्मितीमूल्यांची अपेक्षाच करणं गैर आहे. तरीही लोकाश्रयाचा अफाट इतिहास असलेला असा सिनेमा पुन्हा आणताना मास आणि क्लास दोन्हीचा समतोल साधणं ही तारेवरची कसरत यशस्वी झाली आहे. महाराष्ट्रातही काही विशिष्ट ठिकाणीच प्रदर्शित होऊन जेव्हा यशापयश जोखलं जाणार आहे तिथं आपण मराठी माणसानं झुकतं माप द्यायला काहीच हरकत नसावी.>

हा परिच्छेद विशेष आवडला. मराठी चित्रपटासाठी असंख्य लोक खस्ता खात असताना भंपक हिंदी चित्रपटांवर खर्च करणारे प्रेक्षक चांगले मराठी चित्रपट का डावलतात हे कळत नाही.

मराठी चित्रपटासाठी असंख्य लोक खस्ता खात असताना भंपक हिंदी चित्रपटांवर खर्च करणारे प्रेक्षक चांगले मराठी चित्रपट का डावलतात हे कळत नाही.<<< Happy

जसा पहिला झपाटलेला बालचमूमध्ये लोकप्रिय झाला तसाच आताही करण्यात महेश कोठारे जिंकला आहे. << मग वीस वर्षानंतरही महेश कोठारे आपला टारगेट ऑडियन्स नक्की कोण आहे ते ओळखण्यात आणि त्याला चित्रपटगृहात आणण्यात यशस्वी झाला आहे असं म्हणायला हरकत नसावी.

मस्त लिहिलंयस.

'मदनिके' सारखं कानात घुमत असताना मला चुकून विडंबनच सुचायला लागलं- ' सदनिके... सदनिके.. किती झाले तुझे गं मोल!'
>>> लै भारी. पूर्ण विडंबन होऊन जाऊ द्या! Happy

मराठी चित्रपटासाठी असंख्य लोक खस्ता खात असताना भंपक हिंदी चित्रपटांवर खर्च करणारे प्रेक्षक चांगले मराठी चित्रपट का डावलतात हे कळत नाही.>> आत्यंतिक जनरलायझेशन असले तरी तुझा मुद्दा बरोबर आहे. मार्केटींग नाही म्हणून प्रेक्षक नाही आणि प्रेक्षक नाही म्हणून मार्केटींग झेपत नाही असे झाले आहे.
पण त्याचबरोबर खस्ता खाउन तयार झालेला सिनेमा आपोआप चांगलाच होत नसतो आणि पैसा घालून, मार्केटिंगच्या मदतीने १०० कोटी कमवणारा प्रत्येक सिनेमा या कारणाने भंपक होत नाही हे ही आहेच.

फक्त टीका व वरीजनलशी तुलना करत बसण्यापेक्षा चांगले काय घ्यावे हे कळले पाहीजे खरच.>>> केपीशी पुर्णपणे सहमत ! रसपचा रिव्ह्यु वाचुनच चित्रपट पाहायचे असे ठरवले होते, आता तर पाहावाच लागेल Happy

पण त्याचबरोबर खस्ता खाउन तयार झालेला सिनेमा आपोआप चांगलाच होत नसतो आणि पैसा घालून, मार्केटिंगच्या मदतीने १०० कोटी कमवणारा प्रत्येक सिनेमा या कारणाने भंपक होत नाही हे ही आहेच.
>>>>>>>>+१

मराठी चित्रपटासाठी असंख्य लोक खस्ता खात असताना भंपक हिंदी चित्रपटांवर खर्च करणारे प्रेक्षक चांगले मराठी चित्रपट का डावलतात हे कळत नाही.>> अशी अगतिक उपकाराची भाषा कशासाठी ? सिनेमा हा व्यवसाय आहे. लोकांना जे आवडते ते ते पाहतील पैसे खर्च करून. मराठी आवडला तर मराठी पाहतील , हिन्दी , इन्ग्लिश आवडत असेल , तर ते पाहतील.

Pages