स्वप्नांच्या पलीकडले ५
थोड्या वेळाने ती स्वतःचशांत झाली
मावशी, मी इथे कशी याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल न ? सांगते, सर्व काही सविस्तर सांगते."
"त्या दिवशी सारेजण आपापल्या कामाला रवाना झाल्यावर मी आणि गोपाल फिरायला निघालो. काही वेळ तळ्याच्या काठाकाठाने फिरल्यावर आम्हाला तळे ओलांडून पलीकडे जाउन यावे अशी उर्मी आली. मग काय, आम्ही लगेच निघालो .
तळे ओलांडण्यासाठी काही रुंद तर काही अरुंद अशा खडकांचा बनलेला नैसर्गिक पूल हाच एक आधार होता. त्यावरून आम्ही निघालो.. वेळी एकजण जाउ शकेल एवढाच रुंद खडक असल्याने आमच्या दोघात थोडे अंतर पडले. गोपाल पुढे गेला आणि मी मागे राहिले. इतक्यात मला एका खडकापाशी एक स्त्रीसारखी आकृती दिसली. माझी जिज्ञासा जागी झाली. मी खडकाच्या अगदी काठावर जाउन पाहू लागले.
इतक्यात मला पाठीमागून कोणीतरी जोरात धक्का मारला आणि मी तोल जाउन पाण्यात पडले. माझ्या मागोमाग मला धक्का माराणाऱ्याने पण पाण्यात उडी मारली आणि तो माझे पाय धरून मला खोल पाण्याकडे ओढत नेऊ लागला. इतक्यात आणखी तिघेजण त्याच्या मदतीला आले आणि मला खोल पाण्यात नेऊ लागले.
मी जोरात किंचाळले. माझी किंचाळी ऐकून धावलेला गोपाल मला दिसला पण त्याला पोहता येत नाही हे मला माहिती होते त्यामुळे तो माझ्यासाठी काही करू शकणार नाही हे मी ओळखले. मी श्वास रोखून धरला आणि स्वतःला सोडवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. पण ते चारजण होते आणि मी एकटी ! किती वेळ झगडणार ? अखेर मी हरले आणि माझ्या नाकातोंडात पाणी गेलं ! माझा अंत होत असल्याचा विचार मनात घेउन मी बेशुद्ध झाले.
किती वेळानंतर कोण जाणे पण मला शुद्ध आली . शुद्धीवर येताच पहिला विचार मनात आला तो हाच की मी जिवंत आहे की स्वर्गात आहे ? जडावलेल्या पापण्या उघडून मी जेव्हा आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा मला माझ्यापासून थोड्या अंतरावर बरेच दाढीवाले नग्न पुरुष आणि काही स्त्रिया देखील जमा झालेले दिसले. ते सर्वजण माझ्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष पूर्वक पहात होते. मी एकदम उठून बसण्याचा प्रयत्न केला. पण मला ते जमले नाही. मी मग सावकाश उठून उभी राहिले. त्यांना काही विचारण्याचा प्रयत्न केला.
पण तोंडातून आवाज उमटला नाही. फक्त पाण्याचे काही बुडबुडे तोंडातून निघाले. मी पाण्याच्या आत आहे याची मला कल्पना आली. दुसऱ्याच क्षणाला मी जिवंत कशी याचा मला विचार पडला.
मी तिथून पळून जाण्यासाठी पाउल उचलले आणि माझ्या लक्षात आले कि पाण्यात हालचाल करणेही वाटते तितके सोपे नाही. मी धडपड करत कशी बशी तळ्याच्या काठाशी आले. पाण्याबाहेर येउन मदतीसाठी हाका मारण्याचा खूप प्रयत्न केला. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या तोंडातून आवाजच उमटत नव्हता आणि थोडाबहुत निघाला तरी तो ऐकायला तिथे होतेच कोण ? मी पाण्यात पडल्यापासून किती वेळ मध्ये गेला होता कोण जाणे, पण माझा शोध थांबवून सारे बहुधा परत गेले असावेत !
मी पळून जाण्याच्या इराद्याने किनाऱ्या पाशी आले. गोपालला हाका मारल्या. तेवढ्याच श्रमांनी मी क्लांत झाले आणि पुन्हा बेशुद्ध झाले. हे सर्व होत असताना सर्व दाढीवाले नग्न लोक फक्त पहात होते. कुणीही काहीच केलं नाही. त्यानंतर ते दाढीवाले मला पुन्हा पाण्याच्या तळाशी घेऊन गेले.
" असं का ?" ---मावशी
" कारण हे सर्व असं घडणार हे त्यांना माहीतच होतं . प्रत्येक नवा मेंबर जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा हे सर्व याच क्रमाने घडतं आणि मग मुकाट्याने तो किंवा ती त्यांच्यातलीच एक होते."
“ इथल्या लोकांच्या आयुष्यात नव्या व्यक्तीचे आगमन हीच एक नवी गोष्ट असते. पाण्यात पडून माश्याचे आयुष्य जगण्यास भाग पडणारा मनुष्य आणखी कुणाला तरी तसे करायला लावून आपल्या मनाला शांती मिळवू पहातो, किंवा आपल्या मनातला क्षोभ शांतवू पहातो. वर्षभरापूर्वी असाच या पाण्यात पडलेला मनुष्य मला पाण्यात ढकलायला आला होता, आणि त्यासाठी सावज म्हणून त्या स्त्री ला त्यानेच पाठवले होते.
मावशी, मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले. सारे लोक माझ्या प्रयत्नाचे साक्षीदार बनून पहात होते. कुणी विरोध करत नव्हतं पण कुणी मदतही करत नव्हतं . सुरुवातीला त्यांनी मला मासे वगैरे आणून दिले पण मी ते खाउ शकले नाही. मी तसा प्रयत्न करण्याच्या मनस्थितीत नव्हतेच ! मी नशिबाला बोल लावत एकटी एकटी रहात होते.
एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे मी हवेत श्वास घेऊ शकत नव्हते. एका श्वासात जेवढे काही करायचे ,--म्हणजे बोलायचे, हाक मारायचे किंवा तळ्या बाहेर कोणी व्यक्ती दिसते का ते शोधायचे-- ते केल्यावर दम कोन्डू लागायचा. आणि पाण्यात शिरले कि बरे वाटायचे . श्वास घेता यायचा. मनाला हे पटायला बराच वेळ लागला , पण अखेर पटवून घ्यावेच लागले की आता मला ,जर जगायचे असेल तर या तळ्यातच रहावे लागेल. एकदा मला पाण्यात पडल्यावर मी मेले असे वाटले होते आणि आता तळयाबाहेर पडले तर मरेन हे कळले. खूपदा वाटले की तळ्याच्या बाहेर यावे आणि एकदाच काय ते मरावे. नाहीतरी जगाच्या दृष्टीने मी मेले होतेच , आणि जलचराचे आयुष्य जगणे म्हणजे मानवी आयुष्याचे मरणच होते ना ? पण मावशी, कसं सांगू हो, या पोटातल्या बाळाच्या ओढीने मला मरू सुद्धा दिले नाही ! किती काळ मी फक्त पाणी पिउन काढला ते माझं मलाही ठाऊक नाही. पण मी उपाशी राहू शकत होते पण त्यामुळे माझ्या बाळाची उपासमार होत होती ! पोटात त्याची होणारी तडफड मला जाणवत होती. मानवी अन्न मिळण्याची आशा मावळत मावळत संपून गेली , आणि मावशी, माझ्या बाळाला जगवण्यासाठी मी मानवी आयुष्य संपवून पूर्णपणे जलचराचे आयुष्य जगायला सिद्ध झाले. त्याची सुरुवात मी बेडूक खाण्यापासून केली. जो बेडूक मी सायन्स शिकताना शरीरातले अवयव शिकण्यासाठी कापत असे तोच बेडूक मी माझे शरीर जगवण्यासाठी मारून खाल्ला. सुरुवातीला मला तो खाल्ल्याबरोबर भडभडून ओकारी झाली.
त्यानंतर मला लहानसा मासा मिळाला. शिजलेला, तळलेला मासा मी पूर्वी चवीने खात असे पण असा कच्चा मासा खाण्याचा विचारच सहान होत नव्हता. पण नाइलाजाने तो खाल्ला. त्यानंतर खूप वेळ माझ्या पोटात ढवळत होते. पण माझ्या बाळाची तडफड कमी झाल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हापासून मी पोटात आग पडली कि जो प्राणी मला मारता येणे शक्य असेल तो मारून खात स्वतःला जगवले आहे. फक्त माझ्या बाळासाठी! एकदा का माझे बाळ जन्माला आले की मग माझ्या जिवाचे काहीही होऊ दे !
" उषा, एक विचारू ?" --मावशी
" काय ?"
" इतक्या पुरुषांमध्ये तू एकटी सापडलीस, त्यांनी तुला काही ....." मावशी अडखळली .
" नाही मावशी ! तुला वाटते ती भीती इथे नाही . इथल्या समाजात स्त्रियांची संख्या फारच कमी आही. दहा बारा पुरुषामागे एखादी स्त्री असेल. स्त्रीची कृपादृष्टी होण्याची वाट पहाणाऱ्या लोकांचा घोळका सदैव स्त्रीच्या मागे फिरत असतो. एखाद्याने आपली इच्छा स्त्रीवर लादण्याचा प्रयत्न करायचा म्हटला तरी बाकीचे लोक त्याला तसे करू देत नाहीत. इथे कधी मधी मुले जन्माला येतात पण जगतात फारच कमी ! आत्ताही माझ्यामागे चारजण आहेतच. आम्ही पाण्यात रहाणा रे लोक जिवंत तर आहोत पण कुणालाच फारसे श्रम झेपत नाहीत. त्यामुळे फारसे भांडण तंटे होत नाहीत."
" तुझ्यामागे सदैव लोक असतील तर त्यांना कळेलच की आम्ही कशासाठी आलोत ते ! ते काही विरोध तर करणार नाहीत ना ?"
" नाही , तशी शक्यता नाही. इतक्या दिवसात मला हे कळून चुकले आहे की आपला एक मेंबर --तोही स्त्री मेम्बर ---गमावणे कुणालाच आवडणार नाही व परवडणार नाही.
त्यामुळे माझ्या प्रसूती दरम्यान त्यांच्या हस्तक्षेपामुळे माझ्या जिवाला धोका होईल असे ते काही करणार नाहीत. आणि महत्वाची गोष्ट महणजे इथल्या कुणाच्या प्रसूतीसाठी बाहेरच्या जगातून कुणी येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असेल !"
" अरे हो ! मला याच गोष्टीचे आश्चर्य वाटत आले आहे की तू गोपालला पत्र कसं पाठवू शकलीस ?" मी बराच काळ मनाला पडलेला प्रश्न विचारला.
" त्याचं असं झालं की सुरुवातीचे काही दिवस मी उद्विग्न मनस्थितीत होते, भुकेने कळवळलेली होते. किडे खाववत नव्हते आणि या सगळ्या दाढीवाल्यांची किळस यायची . अशा अवस्थेत एकदा तळ्याच्या काठाशी आले तर मला तिथे तीन दगडांची मांडलेली चूल आणि काही जळक्या काटक्या दिसल्या. ते पाहून कधी ना कधी कोणी पर्यटक का होईना किंवा आम्ही आलो होतो तसे लोक इथे येत असले पाहिजेत हे माझ्या लक्षात आले. . . नशिबाने तशी कोणी व्यक्ती आली आणि माझी साडी त्याला दिसली तर उत्सुकता वश तो तिच्याकडे आकर्षित होईल अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली . मला एक कल्पना सुचली. मी अचानक पाण्यात पडले तेव्हा माझ्या हातातली माझी पर्स उडून एका खडकाच्या सापटीत जाउन पडली होती. काही दिवसानंतर मला ती दिसली होती. मला तिचा काहीच उपयोग नव्हता म्हणून मी ती उचलली नव्हती , तिची मला एकदम आठवण झाली. मी लगेच तिथे जाउन पाहिले तर ती तिथेच पडलेली दिसली. मला ब्रह्मानंद झाला. मी ती उघडून पाहिली. त्यात मी आणलेले आतर्देशीय आणि पेन जागेवरच होते.
पत्र पाहून मला सर्वप्रथम स्वतःचा संताप आला की ही कल्पना मला आधीच का नाही सुचली ? नंतर थोडी शांत झाले आणि लिहायला बसले तर काय लिहू, किती लिहू , कसं लिहू याचा प्रचंड गोंधळ उडाला. कसेतरी स्वतःला सावरून जसे जमले तसे लिहिले खरे, पण प्रश्न होता तो ते पत्र तुमच्यापर्यंत पोहोचेल कसे याचा ! बराच वेळ विचार केल्यावर मला कल्पना सुचली.
पाण्यात पडले तेव्हा माझ्या अंगावर लाल रंगाची साडी होती. ती आता फाटून चिंध्या झालेल्या स्वरूपात का होईना पण तिथेच पडलेली होती . मी ती वाळवली. घडी करून खडकावर ठेवली . तिच्या लाल रंगामुळे कुणाचेतरी लक्ष वेधून घेईल अशी मला आशा होती. साडीच्या घडीवर प्लास्टिक च्या पिशवीत ते पत्र ठेवलं .त्यावर माझी सोन्याची अंगठी बोटातून काढून ठेवली.
कुणीतरी माझा हेतू समजून पत्र पोस्ट करेल अशा आशेने मी ते ठेवलं होतं . त्यानंतर दर दोन चार दिवसांनी मी येउन पहात असे. एके दिवशी माझी साडी ,पत्र असलेली प्लास्टिक ची पिशवी आणि अंगठी मला नाहीशी झालेली दिसली. माझा हेतू साध्य होईल असे वाटून त्या दिवसापासून मी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे. " उषा बोलली आणि पुन्हा तिला रडू कोसळले.
मावशीनी पण डोळे पुसले.
" उषा , ही इथली कडाक्याची थंडी सहन कशी करतेस ? आम्हाला तर बदरी नारायणातच पाण्यात हात घालत येत नव्हता . पाणी बर्फासारखं गार होतं ." मी म्हणालो
" दादा, तसं असतं तर हा प्रश्नच उद्भवला नसता. मी पाण्यात पडून गोठून मेले असते. कारण इथे तिथल्यापेक्षाही जास्त थंडी असते. पण या तळ्याच्या वरच्या अंगाला गरम पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे तळ्याचे पाणी कायम कोमट असतं . पहा हात घालून !"
" नको नको! " ही एकदम घाबरून म्हणाली. "
" घाबरू नको मावशी , मी आहे ना ! कोणी तुला काही करणार नाही ."--उषा
" नकोच पण ! कशाला विषाची परीक्षा ?"
" बरं बरं ! राहू देत ."
बोलता बोलता बराच वेळ झाला होता, सर्वाना भूक जाणवू लागली . मावशी तंबूत जाउन खिचडी करून घेऊन आली. उषाने पोटभर खिचडी खाल्ली . अर्थातच सर्व खाद्य पदार्थ , चहा सर्व काही तिला त्या खडकाजवळ , जिथे ती आम्हाला प्रथम दिसली होती तिथेच नेउन द्यावे लागत होते. एक घास खाल्ला कि तिला श्वास घेण्यासाठी तोंड पाण्यात बुडवावे लागे . शिवाय तिचा आवाज देखील अगदी हळू येत होता . ती काय बोलते ते ऐकण्यासाठी तिच्या जवळ जावे लागे. तिच्या अवस्थेमुळे फक्त भाभीच ते काम करू शकत होती .
आता तिला गोपालची चिंता लागली होती. त्याच्यासाठी काहीतरी नेण्याची तिची इच्छा होती. पण पाण्यात नेउन खराब होणार नाही असा पदार्थ लक्षात येईना . शेवटी दोन सफरचंदे दिसली . ती घेऊन उषा गेली.
जाता जाता " उद्या परत येईन " हे सांगायला विसरली नाही.
दुसऱ्या दिवशी ती आली ते प्रसूतीची लक्षणे घेऊनच ! मला शरमेने कसनुसं होत होतं , पण उषा मात्र निर्वस्त्र लोकांच्यात वावरायला सरावलेली असल्याने संकोचत नव्हती. ही मिडवाइफ असल्याने प्रश्न प्रसूतीचा नव्हता पण श्वास घेण्यासाठी उशाला सारखं पाण्यात जावं लागत होतं त्याचं कसं काय करावं ते समजत नव्हत .शेवटी एक युक्ती सुचली. तळया शेजारी एक मोठा खड्डा खोदला. त्यात तळ्यातले पाणी झिरपून आले आणि उषाच्या श्वास घेण्याची सोय झाली. आता ही बाहेर राहून तिची प्रसूती करू शकणार होती. पहिली प्रसूती असल्याने वेळ लागणार होता. एक कळ येउन गेली की बराच वेळ मध्ये जायचा . वेळ घालवायचा कसा हे कळेना. अखेर हिने त्या वेळात उषाला पाण्याखाली वावरणाऱ्या लोकाबद्दल माहिती विचारायला सुरुवात केली.
त्यामुळे दोन हेतू साध्य झाले. पहिला म्हणजे उषाचे लक्ष वेदनेपासून दुसरीकडे वळवता आले आणि आम्हाला खूप गोष्टी जाणून घेता आल्या. गोपाल अजूनही येण्याच्या स्थितीत नव्हता.
" उषा, तू या लोकांशी संवाद कशी साधतेस? याना हिंदी येतं ?"
"दादा, जे लोक पाण्यातच जन्मले आहेत त्यांच्यात आणि माशात काहीच फरक नाही. त्यांना भाषेची गरजच नाही. शिवाय या जीवनात बोलण्यासारखे विषय तरी कुठे आहेत ? या लोकांना कपडे, भांडी, आग, शिजलेले अन्न याबद्दल काहीच माहिती नाही. पण माझ्यासारख्या बाहेरचे जग पाहून येणारया लोकांना हिंदी येते असे मी पाहिले आहे. पण पाण्याच्या आत बोलता येत नाही. काही काळ गेल्यावर बोलण्याची गरजच उरत नाही. मी अजून आपली भाषा विसरले कशी नाही याचे मलाच आश्चर्य वाटते !
उषाचा प्रसूतीचा समय जवळ येत होता. आल्यापासून प्रथमच आम्हाला पाण्यात हालचाल जाणवली. उषा म्हणाली ते खरे होते. चार जण दूर उभे राहून आमच्याकडे रोखून पहात होते. आम्ही उषा ला ते सांगितलं तेव्हा ती म्हणाली, " काळजी करू नका. या समाजात सर्व काही उघड आणि उघड्यावरच घडत असतं .मी आल्यापासून प्रसूतीचे दोन प्रसंग पाहिले आहेत. दोन्ही वेळी सारेजण असेच जमले होते."
योग्य वेळी उषाची सुखरूप सुटका झाली. तिला मुलगा झाला. आमच्या अपेक्षेप्रमाणेच तो अतिशय कमी वजनाचा होता. त्याची नीट काळजी घेणे आवश्यक होते. एकदा उषाला मुलगा दाखवून लगेच त्याला गरम कपड्यात लपेटून आम्ही तंबूत घेऊन गेलो. उषा डबडबलेल्या डोळ्याने त्याला बघत राहिली, आणि मग पाण्यात निघून गेली. उषा च्या दुःखाने आमचाही उर भरून आला पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो . दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या नवजात बालकाला घेऊन परत जायला निघालो. उषा आली. तिने त्या बालकाला डोळे भरून पाहून घेतले. निसर्गाने तिला बहाल केलेली अमूल्य भेट -मातृत्वाचा पान्हा-- त्याला पहिल्यांदा आणि शेवटचाच पाजला आणि त्याला आमच्या हवाली केले. थंडी मुलाला बाधू नये म्हणून आम्हाला घाई करणं आवश्यक होतं .उषा ची अवस्था काय सांगावी ? तिच्या काळजाचा तुकडा तिने आपल्याच हाताने आमच्या हवाली केला होता.
त्याला स्वतःजवळ ठेवणे तिला शक्य नव्हते आणि तिची तशी इच्छा देखील नव्हती . शरीरापासून प्राण विलग होताना कदाचित यापेक्षा कमी यातना होत असतील. मुलावर आपली नजर टिकवून आम्हाला उद्देशून ती बोलत होती." दादा, वहिनी, आता इथून पुढे तुम्हीच याचे आई आणि बाप! पुन्हा याला मी कधी बघेन की नाही कोणास ठाऊक !तुम्हाला वाटलं तर योग्य वेळी त्याला माझ्याबद्दल आणि गोपाल बद्दल सांगा. गोपालच्या नशिबात त्याचे मुख दर्शनही नसावे याचे वाईट वाटते . तो अजूनही सावरलेला नाही. " बोलत बोलत उषा ने आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि हिच्या हातात ठेवल्या. " माझा हा मुलगा जगला वाचला तर त्याच्या बायकोसाठी ही माझी भेट ठेवून घ्या. " आणि ती जायला वळली.
अचानक मला काहीतरी सुचले. मी माझ्याबरोबर आणलेले पोस्टेज --कार्डे, पाकिटे, आंतरदेशीय पत्रे त्यावर माझा पत्ता घालून ठेवला याशिवाय , दोन बॉल पेने, आणि काही कोरे कागद एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून दिले. शिवाय १०,२०,५०,रुपयांच्या काही नोटाही त्यात ठेवल्या. आणि सांगितले, "जमलं तर पुन्हा भेटू आपण . पत्र पाठवत जा. कधी तुझ्या मुलाला तुझ्याबद्दल सांगायच ठरलं तर दाखवायला उपयोगी पडतील ती. पत्र पोस्त करण्यासाठी या नोटा पुरेशा आहेत. जो कोणी तुझं पत्र पोस्त करेल तो सेवा किंवा मदत म्हणूनच करेल नाही का? "
उषाने यांत्रिकपणे मान हलवली. तिला बोलावत नव्हते. आम्ही देखील तिची अवस्था जाणून होतो. मुकाट्याने आम्ही परतलो……
…….तर अशा रीतीने हा लहानगा प्रभात आमच्या जीवनात प्रवेश करता झाला .
क्रमशः
अजुन पुढे आहे का? प्लिझ
अजुन पुढे आहे का?
प्लिझ क्रमशः टाकत जात ना.
आणि जेव्हा संपेल तेव्हा समाप्त पण लिहायला विसरु नका....
पु.ले.शु.
छान
छान
गोष्ट आवडली.
गोष्ट आवडली.
छान कथा
छान कथा
या कथेचे मागचे भ्हाग कुथे
या कथेचे मागचे भ्हाग कुथे आहेत
छान आहे. पण भाग लवकर
छान आहे.
पण भाग लवकर टाका.
लिँक तुटते.