चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग तिसरा

Submitted by स्वप्ना_राज on 30 May, 2013 - 05:21

आमचे प्रेरणास्थान - फारएन्डाचे लिखाण

काही चित्रपटविषयक नियम - भाग १
चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा

१. हिरोचा बाप लवकर गचकलेला असतो. त्याची आई नोकरी करणारी नसते. कपडे शिवून ती त्याला लहानाचा मोठा करते. मग हिरोने चांगलं काम केलं तर 'आज अगर तुम्हारे बापू/पिताजी जिंदा होते' हा आणि तो वाईट मार्गला लागला असेल तर 'तुमने घरानेकी इज्जत मिट्टीमे मिला दी' हा ड्वायलॉग बापाच्या फोटोपुढे म्हणण्यात येतो. ह्या सोयीसाठीच त्याचा फोटो घराच्या हॉलमध्ये लावलेला असतो.

२. हिरोच्या आईला मूली/आलूचे पराठे आणि गाजरका हलवा ह्याव्यतिरिक्त काहीही बनवता येत नसल्याने खाणावळ चालवून उदरनिर्वाह करणं अशकय असतं.

३. हिरोने 'साली आधी घरवाली' ह्या म्हणीचं पालन करू नये म्हणून हिरविणीला बहिण नसते. ती बहुतेक एकुलती एक लेक असते. किंवा तिला भाऊ असलाच तर तो हिरोचा जानी दोस्त निघतो. हिरविणीचा बाप नामांकित वकिल, जज किंवा बिझनेसमन असतो. त्याचा बिझनेस काय हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. त्यांचा मोठा वाडा असतो, त्यात कृष्णाची/रामाची/राम-सीतेची मूर्ती असलेलं देवघर असतं, एक मोठी तिजोरी असते. तिचे वडिल चिरूट ओढत पुस्तकांनी भरलेल्या लायब्ररीत बसलेले असतात. आणि तिची आई अतिप्रेमळ असून 'अजि सुनते हो' म्हणून लेकीच्या लग्नाची भुणभूण नवर्‍यामागे लावत असते. घरात एक मुनीम आणि खांद्यावर फडकं घेतलेला नोकर असतोच असतो. घराला गच्ची असलीच तर तिचा उपयोग हिरोच्या विरहात विव्हळण्यासाठी होतो. हॉलमध्ये भिंतीवर पूर्वजांच्या फोटोशेजारी बंदूक असेल तर तिचे वडिल ती हिरोवर रोखणार हे समजावं.

४. हिरविणीला एक पुस्तक घेऊन कॉलेजात जाणे, मैत्रिणीसोबत सायकल किंवा गाडीतून फिरणे आणि हिरोचा फोटो घेऊन पलंगावर लोळत पडणे एव्हढेच उद्योग अस्तात. 'मेरा फ्युचर पक्का' हे तिला माहित असतं. पिक्चरच्या सुरुवातीला ती हिरोच्या गरीबीचा मजाक उडवते आणि मग पिक्चरभर सुतासारखी सरळ येते. आपल्याला मात्र पिच्कर संपला तरी हिचं आणि हिरोच्या माताजीचं कसं पटणार ही चिंता लागते.

५. हिरोला बहिण असली तर फक्त ऐन मोक्याच्या वेळी व्हिलनने ओलिस धरण्यासाठीच तिला देवाने त्या घरात जन्माला घातलेलं असतं.

६. हिरोने खोटी दाढी-मिशी लावली की त्याचं वेषांतर पूर्ण झालं असं समजावं. मग व्हिलनच्या बापाची टाप नाही त्याला ओळखायची. व्हिलनला वेषांतर करायचं असेल तर चेहेर्‍यावर एक मोठा काळा मस लावला की झालं. व्हिलन लोकांना विचित्र विगखेरीज अन्य मेकअप करण्यास सक्त मनाई असते. फार तर ते हॅट घालू शकतात.

७. हॉरर पिक्चरमध्ये रात्री अपरात्री चित्रविचित्र आवाज आले की रामरक्षा किंवा गायत्री मंत्र म्हणत पांघरूण डोक्यावरून घेऊन झोपण्याऐवजी 'ये कैसी आवाज है' किंवा 'कौन हे वहा' असले निरर्थक संवाद म्हणत लोक बाहेर पडतात आणि मरतात.

८. भूताखेतांना मारायला भगवान शंकरांचा त्रिशूळ बरा. त्यावेळी विजा चमकत असल्या आणि सोसाट्याचा वारा वाहत असला तर भूतांचा आत्मा लवकर अनंतात विलीन होतो.

९. मोकळे सोडलेले केस आणि पांढरी साडी हा युनिफॉर्म असल्याशिवाय भूतिणींना 'हडळ' म्हणून मान्यता मिळत नाही.

१०. हिरॉइन गावकी गोरी असेल तर हिरो बडे बापका बेटा असतो. हे बडे बाप ठाकूर किंवा जमीनदार (म्हणजे मराठी पिक्चरमधल्या सूर्यकांत्/चन्द्रकांत्/साळवी वगैरे पाटलांचे काऊन्टरपार्टस) असतात (ह्या बाबतीत विश्वजीत बाबूमोशायनी पीएचडी केलेली आहे). इथे हिरवीणीला शेळ्यामेंढ्यांचे कळप चारणे, उस दाताने तोडणे, नदीवर पाणी भरायला जाणे, सावनके झुलोंपर झुलणे, शेताच्या बांधांवरून धावत जाणे आदि महत्त्वाची कामं पार पाडावी लागतात. कधीकधी व्हिलनच्या अड्ड्यावर त्याच्यासमोर हिरोचा जीव वाचवायला नाचावं लागतं.

११. व्हिलन हिरोला धुणं धुतल्यासारखा बडवत असताना पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला तर व्हिलन आरामात पळ काढणार हे समजावं. हिरो व्हिलनला मारताना सायरन वाजला तर पिक्चर संपणार हे समजून उठायची तयारी करावी. शेवट्च्या सिनमध्ये हिरो-हिरविणीचे आईबाप पोरांचं लग्न लावण्याबाबत, हिरोचा मित्र आणि हिरोची मैत्रिण आपल्या लग्नाबाबत आणि पिक्चरातलं एखादं पात्र प्रेक्षकांकडे वळून जे काही संवाद म्हणतात त्याचा तिकिटाचे पैसे वसूल होण्याशी काssही संबंध नसतो.

१२. हिरविणीला चक्कर आली किंवा तिने उलटी केली तर तिला अपचन्/अ‍ॅसिडीटी/पित्त ह्यापैकी एक किंवा सर्व झाले आहे किंवा 'काल रात्री घेतलेली जास्त झाली' असं न म्हणता रोगी चेहेर्‍याचे डॉक्टर्स ती प्रेग्न्ंट आहे हा निष्कर्ष काढतात. तपासून झाल्यावर डॉक्टरांचे पैसे कोणी देताना दिसत नाही. आणि ते त्यांची बॅग उचलायला जातात तेव्हा झटकन पुढे होऊन 'मै लेता हू' म्हणून कोणीतरी ती का उचलतं हे मला न सुटलेलं कोडं आहे.

१३. हिरविण 'मै तुम्हारे बच्चेकी मा बननेवाली हू' म्हणण्याऐवजी 'तुम मेरे बच्चेके बाप बननेवाले हो' असं कधी का म्हणत नाही?

१४. कोणालातरी रक्ताची नितांत गरज असताना एखादी व्यक्ती 'डॉक्टरसाहब, मेरे शरीरसे खूनका एकेक कतरा निकाल लिजिये लेकिन इसे बचाईये' असं म्हणते. अरे, तो डॉक्टर आहे का ड्रॅक्युला? जास्तीचं रक्त घेऊन काय तो ग्लासात घालून पिणार आहे का? एखाद्या कर्तव्यनिष्ठ डॉक्टराने ब्लड ग्रूप मॅच होण्याचा मुद्दा (विरोधी पक्ष लावून धरतात तसा) लावून धरलाच तर 'मुझे यकीन है हमारा खून मॅच होगा' असं बिनदिक्कत सांगतात. हे असे सांगणारे बहुधा मुस्लीम असतात. ख्रिश्चन लोकांचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याच्या दृष्टीने फारसा उपयोग नसतो. नवनिर्वाचित पोप ह्याकडे लक्ष देतील काय?

१५. हिंदी पिक्चरमध्ये पार्टी ही खूप महत्त्वाची घटना असते. ह्याला लागणारे महत्त्वाचे घटक म्हणजे पियानो, न शोभणारे सूट घातलेले पुरुष आणि चित्रविचित्र केशरचना केलेल्या ललना. मध्येमध्ये ड्रिन्क्सचा ट्रे भरून चालणारे वेटर्स असावे लागतात. ह्या पार्टीत बहुधा हिरविणीचे श्रीमंत वडिल तिच्या लग्नाची घोषणा करतात. मग हृदयाला भोक पडलेला हिरो पियानो बडवत गाणं गातो. प्रत्येक कडव्याच्या वेळेस हिरविण, तिचा होणारा नवरा आणि तिचे वडिल पार्टीत वेगवेगळ्या जागी, पण चेहेर्‍यावर तेच एक्सप्रेशन घेऊन फिरतात. हिरोचा मित्र असलाच तर असहायपणे पहातो. हिरविणीची मैत्रिण तिला धीर देत हिरोच्या मित्रावर लाईन मारते. हाच सीन पिक्चरच्या सुरुवातीला असला तर हिरो इजहार-ए-प्यार करायला वापरतो. पियानो वाजवत गाणार्‍या हिरोच्या अगदी तोंडासमोर हिरविणीला टेकून उभं रहाता यावं यासाठी पियानो बनवणार्‍यांनी त्याची रचना केलेली असते. हिरोवर आणखी कोणी बाई मरत असेल तर ती हिरोच्या मागे उभी राहून मागून लाईन मारत असते. ह्या नियमाचं प्रात्यक्षिक पहायचं असल्यास 'तीन देविया' मधलं 'ख्वाब हो तुम या कोई हकिकत' हे गाणं पहावं. त्यात सिमी आणि कल्पना ह्या दोन बाया भयानक मेकअप करून (आणि चेहेर्‍यावर वेडगळ हसू घेऊन) पियानोवर गाणार्‍या देवच्या समोर उभ्या असतात (आणि त्यांच्या मागे २ पात्रं त्यांच्यावर लाईन मारत उभी असतात). पार्टीतली इतर जनता प्रत्यक्ष पहा, वर्णन करता येणं अशक्य आहे.

१६. हिरोच्या फॅमिलीत एकापेक्षा जास्त मुलं असतील तर ती कधीकाळी हरवली तर आईबापांना त्यांना शोधणं सोपं जावं म्हणून त्यांनी कुटुंबाचं एक अ‍ॅन्थेम बनवून ठेवलेलं असतं. ते गायलं की हरवलेले लोक परत मिळतात. किंबहुना हिरोची फॅमिली असं गाणं गाताना दाखवली की त्यांची ताटातूट होणार हे समजावं. २ मुलं असतील तर एक श्रीमंताकडे आणि एक गरीबाकडे जाणार, पुढे एकमेकांच्या खूनके प्यासे होणार आणि शेवटच्या रीळापर्यंत आपल्यला पकवणार हे समजून पुढला चित्रपट स्किप करून आपल्या आयुष्याची वर्ष वाढवावीत. (उदा, यादोंकी बारात निकली है, जिंदगी हर कदम एक नई जंग है)

१७. हिरो किंवा हिरविणीच्या गाडीचा अ‍ॅक्सिडेन्ट झाला किंवा करवला गेला आणि तो किंवा ती डोक्याला पांढरी पट्टी लावून हॉस्पिटलात दिसले रे दिसले की त्याने किंवा तिने तोंड उघडायच्या आत 'मै कहा हू' असं ओरडून आजूबाजूच्या प्रेक्षकांना कॉमिक रिलिफ द्यायचं काम केल्यास आपल्या खाती खूप पुण्य जमा होतं हे ध्यानात असू देत.

१८. कितीही मोठा अ‍ॅक्सिडेन्ट झाला अस्ला आणि शरीराचा कुठलाही अवयव निकामी झाला असला तरी पट्टी ही नेहमी डोक्यावरच बांधली असली पाहिजे आणि त्यावर तीट लावल्या सारखा रक्ताचा एकच ठिपका हवा.

१९. शेवटच्या मारामारीत हिरोला लागल्यास तो हिरविणीच्या भांगावर हात धरून तिची मांग भरणार हे नक्की. हे किती अनहायजिनिक आहे हे आपल्याला माहित असतं, त्याला पर्वा नसते. हिरविणीला खूप लागलं असलं तर मांग भरो सजना चा कार्यक्रम पार पडल्यावर ती हिरोच्या मांडीवर डोकं ठेवून सुखाने सुहागन मरते. हिरो मग हाराकिरी केल्यासारखा व्हिलनला यमसदनाला पाठवून आपण तिथे जाणारी पुढली गाडी पकडतो.

२०. पूर्ण पिक्चरमध्ये कोणीही मेलं असलं आणि तिथे इन्स्पेक्टर आला की तो आपली टोपी का काढतो हे मला कळलेलं नाही. त्याने काढली काय किंवा नाही काढली काय, मुडद्याला काहीही फरक पडणार नसतो. हे काम इप्तेकार आणि जगदीश राजने इतक्या वेळा केलंय की ही भूमिका करताना 'नको ती टोपी' असं त्यांना होत असेल.

२१. 'अब इन्हे दवा की नही, दुवाकी जरुरत है' हे वाक्य डॉक्टरांना hippocratic oath बरोबर शिकवतात का?

२२. ही दुआ मांगता यावी म्हणून हॉस्पिटलच्या एका कोपर्‍यात संतोषी मा (शेरावाली) किंवा आपला गणपती बाप्पा ह्यांना जागा रेन्टवर दिलेली असते. भगवान शंकरांचा उपयोग आधी म्हटल्याप्रमाणे अतृप्त आत्म्यांच्या नाशासाठी त्रिशूळ उसना द्यायला असतो त्यामुळे ते सहसा हॉस्पिटलात दिसत नाहीत. हिरो किंवा हिरविणीचे नातेवाईक तिथे जाऊन आरडाओरडा करतात. ह्याला 'जिन्दगीकी भीक मांगना' असं का म्हणतात ते त्याम्नाच ठाऊक. बहुतेक आई, बहिण अश्या बायाच इथे येतात. बाप, भाऊ वगैरे मंडळींना जन्मात काही बोलायचा चान्स मिळालेला नसल्याने हया अचानक मिळालेल्या संधीचं सोनं करता येणार नाही ह्या भीतीने त्यांना पाठवलं जात नाही. बहुतेक करून ह्या प्रार्थनेची सुरुवात 'भगवान, मैने आज तक तुमसे कुछ नही मांगा' अश्या संतापजनक प्रस्तावनेने होते.

२३. हिरविण हिरोला आपण प्रेग्नंट असल्याचं सांगते तेव्हा तो 'सच?' असं का विचारतो हे मला आजतागायत न सुटलेलं कोडं आहे. ती काय टाईमपास म्हणून सांगते का असं? आणि त्यात आश्चर्य वाटण्याचं काय कारण आहे? 'कर्मण्येवाधिकारस्ते...' ह्या गीतावचनाच्या पालनाचा हा उत्तम नमुना आहे.

इच्छाधारी नागावरील चित्रपटः

२४. इच्छाधारी नाग हे डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, वकिल वगैरे नसतात. नेहमी जंगलातच सापडतात.
२५. ते नागातून मानवीरुपात येताना त्यांच्या अंगावर अचानक कपडे येतात आणि परत नागरुपात जाताना ते अचानक गायब होतात.
२६. हे इच्छाधारी नाग नागाप्रमाणे बेडूक वगैरे खातात का माणसाप्रमाणे चपाती, भात खातात ह्याचा उल्लेख कुठल्याही पिक्चरात नाही.
२७. इच्छाधारी नाग किंवा नागीण जोडपं म्हणूनच जन्माला येत असावेत. मी त्यांना नेहमी जोडीनेच पाहिलं आहे. एकेकटे जन्माला येत असल्यास लव्ह मॅरेज होतं का अ‍ॅरेन्जड कळायला मार्ग नाही. त्यांना आई, बाप, भाऊ, बहिण, आत्या, मामा, काका, मावश्या, मित्र, मैत्रिणी कोणीही नसतं. फक्त राजाराणीचा संसार असतो.
२८. ह्या नागांनी आणखी काही केलं नाही तरी चालेल पण पुंगीची धून असलेल्या गाण्यावर नागाच्या स्टेप्स असलेला डान्स केल्याशिवाय त्यांना 'इच्छाधारी नाग' ह्या जातीचा दाखला मिळत नसेल.
२९. दोघांपैकी एकाला दुष्ट शिकार्‍यांनी मारलंच पाहिजे. तेव्हा जोडीतला दुसरा मौजूद नसतो. म्हणून आपल्याला उरलेला पिक्चर पहावा लागतो.
३०. शिकार्‍यांचे फोटो मृत नागाच्या डोळ्यात असतात. त्यावरून त्याच्या जोडीदाराला कोणाचा बदला घ्यायचा ते कळतं. आता हे फोटो जीपीएस कोऑर्डिनेटस असल्यासारखे ते नाग त्यांना कसे शोधतात ह्यावर गुगलने सर्च मारायला हरकत नाही. नागांना मोतीबिंदू वगैरे सारखे रोग नसतात. त्यामुळे फोटो व्यवस्थित दिसतात, आऊट ऑफ फोकस नसतात, त्यांना फ्लॅश लागत नाही आणि शिकारी कुठेही असला तरी हे फोटो क्लोजअपच असतात.

आता थोडं भूतपटांबद्दल:

३१. ह्यात बाकी काही असो वा नसो, एक पुरानी हवेली असायलाच लागते. ती दिवसाढवळया कधी दाखवत नाहीत. नेहमी रात्रीचा लॉन्ग शॉट दाखवतात. कुठेही आग न लागताही तिथे आसपास धूर येत असतो. आणि बॅकग्राउन्डला अगम्य प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज.

३२. इथले दरवाजे नेहमी कर्र असा आवाज करतच उघडतात. हॉलमध्ये मध्यभागी एक झुंबर, भिंतीवर मेलेल्या प्राण्यांची मुंडकी (एक वाघाचं, एक अस्वलाचं आणि एक काळवीटाचं इज अ मस्ट) आणि पूर्वजांच्या तसबिरी असतात. २४ तास वीज नसल्याने लाईट कधीही येतात पण भुताची एन्ट्री झाली की हमखास जातात.

३३. लाईट गेले की सहज मिळाव्या अश्या रीतीने मेणबत्त्या ठेवलेल्या असतात. आम्हाला लाईट गेले की २-३ ठिकाणी ठेचकाळल्या शिवाय मेणबत्ती काही मिळत नाही. मग ही मेणबत्ती घेऊन एकमेकांना बघून घाबरायचा कॉमिक सीन असतो. पुढे हसयला मिळेल न मिळेल म्हणून प्रेक्षकांनी हसून घ्यावं ही अपेक्षाही असते.

३४. पिक्चरात गूढ दिसणारा जुना नोकर असल्याशिवाय सेन्सॉर बोर्ड हॉरर चित्रपट म्हणून मान्यता देत नाही.

३५. हिरो किंवा हिरवीणची ही पुश्तैनी हवेली असते. त्याचे किंवा तिचे वडिल शाल पांघरून शहरात सुरक्षित बसलेले असतात. हवेली पाडून तिथे मोठं हॉटेल उभारावं असा विचार त्यांच्या मनात कधीही येत नाही. हिरो-हिरवीण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत इथे येतात. ह्या ४-५ लोकांमध्ये आधी कोण गचकणार ह्यावर छान बेटिंग होऊ शकतं. ह्यातलाच कोणीतरी त्या भूताला उचकवतो.

३६. हया मित्रांपैकी एक कोणातरी गावच्या गोरीच्या प्रेमात पडतो. ती भूताकडून मारली गेली नाही तर त्यांचं लग्न होतं.

३७. आत्मे नेहमी बायांचेच असतात. एखादा पुरुष प्रेमभंग झाला म्हणून त्याचं भूत झालेलं मी तरी पाहिलेलं नाही. ह्या भुतांचे केस नेहमी लांब असतात. तोकडे केस असलेलं भूत असेल तर त्याचा वचक वाटत नसावा. आसपास कुठेही वारा नसताना ह्यांचे केस उडत असतात. साडी पांढरीच असावी असा संकेत आहे. भूताला विकट हसता यायला हवं. साबणाच्या फुग्यापेक्षाही पारदर्शक असायला हवं आणि बंद दरवाज्यातून/भिंतीतून तरंगत आत जायला येता हवं. देवाची मूर्ती, अंगारा, ताईत ह्या गोष्टींपासून ह्यांना धोका संभवतो.

३८. ओम ह्या चिन्हाला भूतपटात खास महत्त्व आहे. बॉलीवूडमध्ये क्रॉस दाखवला की भूत पळतं. इथे ओम दाखवला की तात्पुरती का होईना सुटका होते.

३९. भूताचा नाश झाला की मंडळी आपापल्या घरी जातात. एव्हढे लोक मेलेत त्यांच्या नातेवाईकांना किंवा पोलिसांना काय सांगतात हे आपल्याला कधीच सांगत नाहीत.

कानून, पुलिस आणि गुनहगारः

४०. पोलिस स्टेशनमध्ये खून वगैरे झाल्याचा फोन आला की पिक्चर आणि सिरियलीमध्ये फोन घेणारा इन्स्पेक्टर 'क्या?' असं ओरडतो. आता पोलिस स्टेशनमध्ये असेच फोन येणार ना? बारश्याच्या किंवा लग्नाच्या आमंत्रणाचे तर येणार नाहीत. मग लगेच कोणाला तरी गाडी काढायला सांगून धावत निघतात. आणि एव्हढं करून सगळं झाल्यावरच मुक्कामी पोचतात.

४१.'कानून के हाथ बडे लंबे होते है' आणि 'कानून को अपने हाथमे मत लो' एव्हढं बोलण्यापुरताच त्यांचा आणि कानूनचा संबंध असतो. आणखी एक फेव्हरेट वाक्य 'पुलिस ने चारो तरफसे तुम्हे घेर लिया है. अपने आपको पुलिस के हवाले कर दो'.

४२. ह्यांच्या पिस्तूलातून किती गोळ्या निघू शकतात ह्यावर संशोधन होणं ही काळाची गरज आहे. गोळी बाहेर पडताच फटाका फुटल्यावर होतो त्यापेक्षा जास्त धूर होतो. त्याचा फायदा घेऊन गुन्हेगार पळेल की काय अशी भीती ह्यांना वाटली नाही तरी आपल्याला वाटते.

४३. एक पोलिस अधिकारी करप्ट असेल तर एक कर्तव्यनिष्ठ असलाच पाहिजे. कर्तव्यनिष्ठ बहुतेक करुन मुस्लिम असतो आणि पिक्चरचा शेवट व्हायच्या आधीच अल्लाला प्यारा होतो.कधीकधी हिरोचा मोठा भाऊ कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी असतो. तो गुन्हेगारांकडून मारला जातो. मग भाभीमावर - जिने हिरोला लहानाचं मोठं केलेलं असतं (हिरो आणि त्याच्या भावात एव्हढं अंतर का हे आपण विचारू नये. पाळणा लांबला ह्यात त्या दोघांचाही दोष नसतो!) - त्याला सन्मार्गाला लावण्याची आणि पिक्चरच्या शेवटी त्याचं लग्न लावायची जबाबदारी येऊन पडते. ह्यात बिचारीला व्हिलनच्या अड्ड्याची ट्रीप पण फुकटात पदरात पडते. तिचं दुसरं लग्न लावून द्यावं असे आधुनिक विचार हिरोच्या मनात येत नाहीत. बहुतेक फुकटात आया हवी असेल.

हिन्दी चित्रपटातली आणखी एक महत्त्वाची जागा म्हणजे कोर्टः

४४. न्यायदेवता, तिच्या हातातला तराजू आणि डोळ्यावरची पट्टी तसंच जजच्या मागच्या भिंतीवर लटकलेला गांधीजींचा फोटो ह्या गोष्टी ह्या सिन्सचा अविभाज्य भाग आहेत.

४५. ह्या सिन्समध्ये पुढील वाक्यं किमान एकदा तरी यायलाच हवीत -

१. ऑर्डर ऑर्डर
२. गीता पर हात रखकर कसम खाता हू के जो कुछ कहूगा सच कहूंगा सच की सिवा कुछ नही कहूंगा
३. युअर ऑनर ये मेरे मुअक्किल पर सरासर गलत इल्जाम लगा रहे है
४. मेरे अगले गवाह है...
५. इन्साफकी तौहिन
६. कानून अंधा है सुना था लेकिन बहरा भी है ये आज देख रहा हू
७. तमाम सबूत और गवाहोंके बयानात को मद्द-ए-नजर रखते हुए ये अदालत इस नतीजे पर पहुंची है की
८. बाइज्जत बरी किया जाता है

४६. ह्यापैकी 'गीता पर हात रखकर' हे वाक्य म्हणून व्हिलन मंडळी इतक्या वेळा खोटं बोलली आहेत की भगवान कृष्णाला गीता सांगितल्याचा पश्चात्ताप व्हावा.

४७. "सजाये मौत सुनाती है" ह्या वाक्यानंतर 'टू बी हॅन्ग्ड टिल डेथ' म्हणून इंग्लीश शेपूट जोडल्याखेरीज निकालाला वजन येत नसावं.

४८. 'बाइज्जत बरी' म्हणजे शाही इतमामाने पुरण्याचा समारंभ अशी माझी अनेक दिवस समजूत होती.

४९.'तमाम सबूत और गवाहोंके बयानात' म्ह्णायच्या आधी हिरो गुन्हेगार ठरेल असेच पुरावे सादर केले गेले असतील तर जज 'इस नतीजे पर पहुंची है की' पर्यंत पोचल्यावर कोणीतरी व्यक्ति 'ठहरिये जजसाहब' म्हणून धावत येणार हे नक्की समजा.

५०. ही व्यक्ति जखमी किंवा आजारी असेल तर आपली साक्ष देऊन मगच प्राण सोडते. ह्यानंतर भर कोर्टात रडारडीचा प्रोग्राम होतो.

५१.'बाइज्जत बरी' झाल्यावर हिरो वकिलाशी हस्तांदोलन करणे, समोर दिसेल त्याच्या पाया पडणे आणि हिरविणीकडे चोरून बघणे ही कामं एका दमात करतो. ह्यानंतर लगेच त्याच्या लग्नाची घोषणा होऊन 'समाप्त'चा बोर्ड झळकतो. बॅकग्राउन्डला हिरो हिरविणीचं ह्याच पिक्चरातलं एखादं गाणं लावतात. आणि 'They lived happily thereafter'

सुहागरात ह्या विषयावर न लिहिणं अशक्य आहे:

५२: ह्यातला USP म्हणजे फुलांनी सजवलेला पलंग. एव्हढी मेहनत घेऊन हा पलंग सजवणारा/री डोंगरात लेणी खोदणार्‍या कारागिरासारखे 'नाही चिरा नाही पणती' अज्ञात रहातात. मला बिचार्‍या त्या फुलांची दया येते. विशेषतः हिरो प्रकु, राकु, मकु असे कुमार असतील तर जास्तच. त्याहून जास्त दया हिरविणीची येते. असा प्रसंग वैर्‍यावरही येऊ नये.

५३: नंतरची आवश्यक गोष्ट म्हणजे फुल टू भरलेला दुधाचा ग्लास. आता एव्हढा ग्लासभर दूध रिचवून दात घासले नाहीत तर ते किडणार नाहीत का? पण हिरोच्या दातांची काळजी कोणालाच नसते.

५४: हिरवीणीच्या मैत्रिणी खिदळत तिला खोलीपर्यंत आणतात आणि विहिरीत ढकलल्यासारखं आत ढकलतात. ह्याला 'बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना' असं म्ह्णत असावेत. ह्या सर्व मैत्रिणी अविवाहित असतात. म्हणून खिदळत असतात. एका तरी पिक्चरमध्ये हिरो पलंगावर बसलाय आणि हिरोईन मागून सावकाश येतेय असं दृश्य पहायला मिळावं अशी माझी तहे-दिलसे ख्वाहीश आहे. नाही म्हणायला 'रुक जा रात ठहर जा रे चंदा' ह्या गाण्यात मीनाकुमारीला तिची सुहागरात (का!) आठवते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला खोलीत आणतात आणि तिथे राकु आधीच असतो असं दाखवलंय. तो तिचे डोळे का बंद करतो ते मात्र अजूनही न सुटलेलं कोडं आहे.

५५: तो पलंग बर्‍याचदा एव्हढा छोटा असतो की दोघं त्याच्यावर कसे मावणार ही काळजी आपल्याला लागते. ते निवांत असतात.

५६: ह्यानंतर घुंगट बाजूला करायचा कार्यक्रम यथासांग पार पडतो. पंखा नसलेल्या त्या खोलीत फुलांनी झाकलेल्या पलंगावर नखशिखांत दागिने घालून घुंगट घेऊन बसलेल्या हिरविणीच्या तोंडावर घामाचा टिपूस नसतो. आणि आपण एका सेकंदासाठी पंख्याखालून बाजूला झालो की घामाच्या धारा लागतात.

५७. मग काहीकाही पिक्चरमध्ये हिरो तिचे दागिने उतरवतो (पहा:कभी कभी). तेही इतक्या सावकाशपणे की काही न घडताच रात्र संपेल की काय असं आपल्याला वाटून जातं.

५८: 'लगता है चांद जमीनपे उतर आया है' किंवा 'ये सपना है या सच' असले निरर्थक संवाद म्हणून हिरो साखरपेरणी करतो. ह्याला 'ताकाला जाऊन भांडं लपवणं' म्हणतात. 'ये सपना है या सच' म्हटल्यावर हिरविणीने त्याच्या कानाखाली एक सणसणीत आवाज काढावा अशीही माझी तह-ए-दिलसे ख्वाहिश आहे.

५९: हिरो हिरविणीच्या फार जवळ आला की कॅमेरा आज्ञाधारकपणे फुलांवर विसावतो. "सुज्ञांस सांगणे न लगे" हा मंत्र सिनेमावाले फार कसोशीने जपतात. मग लगेच दुसर्‍या दिवशी सकाळी हिरविण लवकर उठून केस-बिस धुवून तुळशीला पाणी घालताना किंवा देवासमोर भजन म्हणताना दिसते. हिरो मात्र सावकाशपणे उठून काहीतरी मोठी कामगिरी केल्याच्या आवेशात एकेक जिना उतरून खाली येतो. किंवा हिरविण चहाचा कप घेऊन 'अब उठिये ना, नीचे सब इंतजार कर रहे है' असं काहीतरी म्हणते (इथेही केस धुतलेले असतात!). खाली काय मंडळी साग्रसंगीत वृत्तांत ऐकायला गोळा झालेली असतात का काय देव जाणे. हिरो पुन्हा जवळ यायला लागला की 'कोई आ जायेगा' आहेच. बये, मग दरवाज्याला कडी घाल की. हात कोकणात गेलेत का?

६०. हिरो-हिरविण ट्रेनने जात असताना स्टेशनात गाडी थांबली म्हणून हिरो काही आणायला उतरला की गाडी चालू होते आणि दोघांची ताटातूट होते.

६१. पिक्चरच्या शेवटी हिरो किंवा हिरविण ट्रेनने सोडून जाणार असले आणि ट्रेन जाताना दाखवली की पासिंजर त्या ट्रेनने कधीच जात नाही. ट्रेन धडधडत पुढे निघून जाते तेव्हा (रिकामी!) बॅग हातात घेऊन फलाटावर उभा असतो. ह्यांना बॅगा उचलायला कधी हमाल लागत नाहीत आणि हे कायमचे शहर सोडून चाललेले असले तरी ह्यांचे सगळे कपडे एकाच बॅगेत मावतात (पिक्चरभर उंडारताना वापरलेले कपडे धोब्याने हरवलेले असतात का?)

६२. कोणालाही आत्महत्या करायची असेल तर गाडीसमोरून दुरून धावत येतात. हे मला एस्कलेटर चढून जाण्याइतकं मूर्खपणाचं वाटतं. एका बाजूला शांतपणे गाडी येण्याची वाट पहात थांबावं आणि ती आली की तिच्यासमोर उडी मारावी हे शहाणपण त्यांना नसतं.

६३. कोणीही विष घेतलं की त्या बाटलीवर मोठ्या अक्षरात 'जहर' असं लिहिलेलं असतं. बाकी कंपनीचं नाव, एक्सपायरी डेट वगैरे बाबी नसतात. बहुतेक ते खाऊन कोणी मेलं नाही तर त्यांचे नातेवाईक बडवायला येतील म्हणून कंपनीने घेतलेली काळजी असते.

६४. बायका नेहमी ओढणी किंवा साडीनेच गळफास लावून घेतात. बेडशीट किंवा पांघरूण वापरलं तर जीव जायची हमी नसते. ह्यांच्या वजनाने कधी पंखे तुटत नाहीत किंवा खुर्च्या मोडत नाहीत. पुरुषांना दोरीला लटकण्यावाचून पर्याय नसतो कारण त्यांचा पायजमा ते गेल्यावर त्यांच्या बायकांना बोहारणीला द्यायला उपयोगी पडणार असतो.

६५. कोणी सुरा स्वत:च्या पोटात खुपसून घेतला की हिरो किंवा हिरविण तो त्यांच्या पोटातून बाहेर काढायच्या मागे लागतात. तो आत राहिला तर आत्म्याला मुक्ती मिळत नसावी.

६६. हिंदी सिनेमात कोणीतरी गचकणार ह्याचा आडाखाही आधी बांधता येतो.....

१. कुठेही वारा नसताना देवासमोरच्या समई/निरांजनाची ज्योत फडफडणे आणि विझणे. लगेच 'हे भगवान, ये तो बहोत बडा अपशगुन है'
२. हिरविणीच्या हातातून सिंदुरची डबी पडणे. ही कधीही रिकामी नसते. नेहमी काठोकाठ भरलेली असते.
३. हिरविणीचा चुडा फुटणे.
४. एखादं कुटुंब अति आनंदी दाखवणे. आई वडिलांत कुठल्याही लग्न झालेल्या जोडप्यात आढळणार नाही एव्हढं प्रेम. मुलं अतिसद्गुणी. छोटं पण सुखी घर. वगैरे वगैरे. म्हणजे लवकरच वडिल वरची वाट धरणार. आईच्या नशिबी मोलमजुरी. मुलांची ताटातूट किंवा वाईट मार्गाला लागणे.

६७. चित्रपटात गाणं कधीही, कुठेही सुरु होऊ शकतं. त्याला काळ, वेळ, ठिकाण ह्याचं बंधन नाही. तरी....

१. गाणं गावात घडत असेल तर तळं, नदीकाठी पाणी भरणार्‍या बायका, शेळ्यामेंढ्यांचा कळप, तो राखणारे गुराखी, डोंगर, दर्‍या, गावातली मुलं, जंगल, झाडाला बांधलेले झुले ह्यातलं काहीही गाण्यात येऊ शकतं.
२. गाण्याची सुरुवात वाळवंटात झाली तरी पुढल्याच कडव्यात बर्फाच्छादित डोंगर असू शकतात.
३. गाण्याचे शब्द आणि ते जिथं म्ह्टलं जातंय ते ठिकाण ह्याचा संबंध शक्यतो नसावा. उदा. ये पर्बतोंके दायरे ह्या गाण्यात पर्बत दूर कुठेतरी सुरुवातीला दिसतात आणि मग गायब होतात. कृपया हे गाणं शोधून पाहू नका कारण कुमुद छुगानी आणि विश्वजीत अशी जोडी आहे. पाहिल्यास निद्रानाशाचा उद्भव संभवतो.
४. गाण्यात बर्फाच्छादित डोंगर असतील तर हिरॉईन स्लिव्हलेस असली पाहिजे.
५. हिरो वयस्कर असेल तर म्हातारा गळा लपवायला मफलर हवा.
६. हिरविण गावकी गोरी असेल तर गाण्यात घागर हवीच
७. हिरोचा शर्ट आणि पॅन्ट मॅचिंग असता कामा नयेत. शर्ट शक्यतो पिवळा, लाल आणि हिरवा अश्या रंगाचा असला तर प्रेक्षक पेंगत नाहीत. पॅन्ट त्याच रंगाची किंवा स्वस्तात मिळाली तर खाकीही चालते.
८. हिरो-हिरविण गात बागडत असताना व्हिलन त्यांच्या डोळ्यांसमोर असेल तरी त्यांना दिसत नाही.
९. हिरविणीच्या अंगावरचे दागिने स्पेसमधून दिसतील एव्हढे चमकतात.
१०. गाण्यात धर्मेन्द्र असेल तर १-२ स्टेप्समध्ये नाच संपतो. जितेन्द्र असेल तर हिरॉईनला खेचणे आणि उड्या मारणे हे प्रमुख भाग. मनोजकुमार संपूर्ण गाणंभर आपला चेहेरा कॅमरापासून लपवायचा प्रय्त्न करतो. भाभु, प्रकु, राकु हे आपण गाण्यात आहोत हेच हिरविण, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांवर अनंत उपकार आहेत अश्या समजुतीमुळे फार काही करत नाहीत. जॉय मुकर्जी डझनभर रसगुल्ले खाल्ल्यासारखा चेहेरा ठेवून असतो. आणि शम्मी असेल तर मानवी चेहेरा किती वेडावाकडा करता येऊ शकतो ते दाखवतो.

६८. पिक्चर ग्रामीण असेल तर त्यात एक मास्टरजी (हे बहुतेक जुल्मके खिलाफ आवाज उठवल्यामुळे मध्यंतराआधीच गचकतात), एक जमीनदार (हिरविणीवर वाईट नजर ठेवायची जबाबदारी ह्याची), एक सेठजी (गरीबांना जास्त दराने कर्ज देऊन त्यांना त्रास देत असतो), मुनिम (सेठजी/जमीनदाराचा चमचा), एक खानचाचा (पापभीरू आणि सर्वधर्मसमभावावर दृढ विश्वास) ही पात्रं स्टॅन्डर्ड आहेत.

---

६९.कोणी मरणासन्न असल्याची किंवा गचकल्याची बातमी एखाद्या व्यक्तीला सांगायची असेल तर त्या व्यक्तीच्या हातात एखादं भरलेलं ताट (पूजेचं असल्यास बरं!) किंवा पाण्याने भरलेला घडा असणं गरजेचं आहे. बातमी ऐकताच त्या व्यक्तीच्या हातातून ते निसटलेलं दाखवता येतं. त्याचा जमिनीवर पडल्याचा आवाज आणि मागून 'नहीssssssss' म्हणून ओरडल्याचा आवाज ह्या दोन्हीमुळे झोपलेल्या प्रेक्षकांना जागं करता येतं. हा योग साधारणत: आई किंवा भाभीमा ह्या दोघींच्या कुंडलीत असतो.

७०.व्हिलनच्या तावडीत सापडलेल्या बाईने 'भगवानके लिये मुझे छोड दो' हे वाक्य म्हटलं नाही तर व्हीलन नालायक आहे असं समजावं. त्याने उर्वरित आयुष्य काशीला जाऊन नामस्मरणात घालवावं.

७१. पेशंट हॉस्पिटलात असताना अतिआवश्यक दोन गोष्टी म्हणजे उश्याशी लावलेलं सलाईन आणि हार्टबीट दाखवणारं मशीन. हे मशीन दिसलं की त्यावरचा डिसप्ले flat होऊन पुढेमागे पेशंट गचकणार हे सांगायला डॉक्टरांची गरज नसते. मरणारी व्यक्ती चरित्र अभिनेता/अभिनेत्री असेल तर ते नक्की मरतात. पण कोणी महत्त्वाची व्यक्ती असेल तर लगेच कोणीतरी त्याच्या/तिच्या अंगावर पडून किंवा तिला/त्याला गदागदा हलवून 'नही, तुम मुझे ऐसे छोडके नही जा सकते. भगवान इतने निर्दयी नही हो सकते. वापस आ जाओ' असं ओरडून जिवंत लोकांचे कान किटवतं. हा संवाद म्हणणारी 'सुहागन' असेल तर 'तुमने अग्निको साक्षी रखकर सात जनम तक साथ निभानेका वादा किया था' अशीही फोडणी असते. ह्या आरडाओरडयाला यमाचे दूत भयंकर घाबरत असल्याने ते लगेच त्या व्यक्तीचे प्राण परत देतात. मग 'भगवानने मेरी सून ली.' हे पालुपद म्हटलं जातं. जसं काय तो भगवान वरती ह्यांचं ऐकायला जीवाचे कान करून बसलाय.

७२. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने ओरडून ओरडून बोलावं असा संकेत आहे. नाहीतर पलीकडल्या माणसाला बोलणं ऐकू जात नसावं. एखादा स्पाय मुव्ही असेल तर 'हेलो हेलो, धिस इज टायगर. वन टू थ्री." असं चाळीच्या सार्वजनिक कार्यक्रमात माईक टेस्ट करणारा बोलतो तश्या थाटात बोलून जेम्स बोंडच्या इज्जतीची लक्तरं करतात. ह्या अश्या मुव्हीजमध्ये भिंतीवर एक मोठा बोर्ड असतो आणि त्यावर हिरवे, पिवळे, लाल दिवे असतात. ह्याचा उपयोग काय हे बोंडपटातल्या 'क्यू' च्या बापालाही सांगता यायचं नाही. एका पिक्चर मध्ये (बहुतेक आंखे) ललिता पवार हेर असते आणि कृष्णाच्या मूर्तीच्या खाली लावलेल्या ट्रान्समीटर मधून बोलत आणि ऐकत असते हे दृश्य मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंय. दुसर्या साईडला चायनीज म्हणून पिचपिचे डोळे केलेला मदन पुरी होता. हा पिक्चर चायनीज लोकांनी पाहिला असता तर स्वत:च्या हातांनी स्वत:चे डोळे उपटून काढले असते.

७३. 'नर्स, पेशंटको इंजक्शन दे दो' हे वाक्य जगात एकच प्रकारचं इंजक्शन असल्यासारखं डॉक्टर बोलतात.

७४. 'अब मै बस कुछ ही दिनोंकी महमान हू' हे वाक्य म्हणणारं पात्र चांगलं मध्यंतरापर्यंत टिकतं.

७५. हिरोचा बाप किंवा आई, हिरवीणीचा बाप किंवा आई गचकताना तिथे फार जवळ उभं राहू नये एव्हढी अक्कल त्या दोघांनाही नसते. त्यामुळे ते मरायच्या आधी त्यांना काहीतरी वचन द्यावं लागतं. आणि ते पूर्ण होईपर्यंत पिक्चर पाहायची शिक्षा आपल्याला मिळते.

७६.'बंजारे' हा हिंदी चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

अ. बंजाऱ्यांचा कबिला असतो. त्यात ७-८ बैलगाड्या असतात. Background ला उगवता किंवा मावळता सूर्य नसेल तर कबिला गावात येत नाही किंवा गावातून निघत नाही. बैलांच्या गळ्यात न चुकता घुंगरू असतात. हे लोक उदरनिर्वाहासाठी नक्की काय करतात ह्याचा उलगडा आजवर कुठल्याही पिक्चरात झालेला नाही.

ब. हिरवीण कबिल्याच्या सरदाराची एकुलती एक मुलगी असते. सरदार विधुर असतो. काबिल्यात कोणाकडे नसली तरी सरदाराकडे एक बंदूक असतेच असते.

क. घागरा, कंबरेपर्यंत येणारा ब्लाउज आणि ओढणी हा हिरवीणीचा ड्रेस कोड असतो. हातात मोठमोठ्या बांगड्या (गाण्यात वाजवायला) आणि पायात पैंजण (व्हिलन तिला पळवून नेताना पडून हिरोला क्लू मिळावा म्हणून) असतात. ही अतिशय भोळी असते.

ड. हिरवीणीची मैत्रीण ड्रेस डिपार्टमेंट मध्ये तिच्यासारखीच असेल तर हिरोचं आणि तिचं जमावं म्हणून मदत करण्यापलीकडे तिला फारसा रोल नसतो. पण ती जास्त गरीब असल्याने तिच्याकडे थोडे कमी कपडे असतील तर ती एक तर बदचलन असते नाहीतर हिरोच्या मागे लागते. पिक्चरच्या शेवटी उपरती होऊन हिरवीणीचा हात हिरोच्या हातात देऊन मरते. हिच्याकडे एक चाकू किंवा खंजीर नेहमी आढळतो. भक्त आणि भगवंत ह्यांच्यात नसेल एव्हढं तादात्म्य ही भूमिका आणि अरुणा इराणी ह्यांच्यात आहे.

इ. बंजाऱ्यांच्या तळावर किमान एक गाणं नसेल तर ते बंजारी म्हणून घ्यायला नालायक असतात.

फ. बंजाऱ्यांचं जगायचं तत्त्वज्ञान सोपं असतं - ज्याच्यावर प्रेम करायचं त्या व्यक्तीसाठी जीव द्यायची तय्रारी ठेवायची आणि तिरस्कार करायचा असेल तर जन्मभर करायचा. थोडक्यात 'वारा येईल तशी पाठ द्यायची' हे ब्रीद असलेल्या कलीयुगात ते जगायला योग्य नसतात. हे वाक्य पिक्चरमध्ये हिरोला एकदा तरी ऐकवलं जातंच.

ग. सरदाराचा एक चमचा असतो. त्याला सरदार व्हायचं असतं आणि त्याचा हिरवीणीवर सुध्दा डोळा असतो. थोडक्यात काय तर आपला एक हात दुधात आणि एक तुपात असावा अशी त्याची माफक इच्छा असते. तो सरदाराचे कान हिरोबद्दल फुंकतो. हिरवीणीला पळवून नेतो, सरदाराला वर पाठवतो आणि मग शेवटी पिक्चरच्या शेवटी हिरोकडून यथेचछ मार खाऊन भरल्या पोटी मरतो. थोडक्यात काय तर त्याचं तेल जातं, तूप जातं, आणि धुपाटण्याने मार खायचं नशिबात येतं.

७७. हिरो हिरविणीच्या जवळ आल्यावर हात का पसरत नाही? ती दूर दिसली रे दिसली की पसरलेच ह्याने हात. मग तिला बिचारीला धावत यावं लागतं. बरं ह्यात पण ती कुठे पडत ठेचकाळत नाही. व्यवस्थित पोचते.

७८. शेवटच्या सीनमध्ये हिरविण महान त्याग म्हणून जीव द्यायला निघाली की हिरो, दोघांचे आईबाप, काका, मावशी, आत्या, मामा, मित्र-मैत्रिणी, शेजारीपाजारी आणि सर्वात शेवटी मागून पोलिस अशी वरात त्यांच्यामागून धावत निघालीच पाहिजे. ह्याची परिणती शेवटच्या क्षणी हिरोने हिरविणीला कड्यावरून मागे किंवा ट्रेनसमोरून मागे खेचण्यात होते. एव्हढं ऑलिम्पिकमध्ये धावले असते तर देशाला मेडल्स तरी मिळाली असती.

७९. हिन्दी चित्रपटांत रक्षाबंधन, होळी, दिवाळी, करवा चौथ आणि स्वातंत्र्यदिन सोडून आणखी कुठलेही सण साजरे करण्यास सख्त मनाई आहे. ह्यापैकी होळीचा उपयोग भांग पिऊन पडण्यासाठी आणि हिरोईन ची छेड काढण्यासाठी तर दिवाळीचा उपयोग फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत कोणालातरी यमसदनाला पाठवायला होतो. रक्षाबंधन साजरे केल्यामुळे हिरोला एक बहिण आहे आणि तिचा उपयोग त्याला वाकवण्यासाठी होऊ शकतो ही उपयुक्त माहिती व्हिलनला मिळते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतमातेच्या नावाने गळा काढून अहिंसा, सचोटी, देशत्याग वगैरेवर भाषणं देता येतात. तसंच गांधीजी, भगतसिंग, नेहरू, सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री आदींना स्क्रीन टाईम मिळतो.

८०.करवा चौथच्या दिवशी हिरोईन दिवसभर उपवास करूनही टुणटूणीत असते. आणि रात्री चांद दिसला की चाळणीतून दिवसभर व्यवस्थित जेवलेल्या हिरोचं थोबाड बघून त्याच्या हातून ग्लासभर दूध/पाणी पिऊन उपास सोडते. हा चांद नीट बघता यावा यासाठी त्यांच्या चन्द्रमौळी घरालाही मोठी बाल्कनी असते. हे चाळणी प्रकरण काय आहे हे कोणी सांगत नाही कारण सगळे भारतीय पंजाबी आहेत असा सिनेमावाल्यांचा पक्का समज होता/आहे/राहील.

८१. हिरो-हिरवीणीमध्ये 'रुप तेरा मस्ताना' फक्त पावसाळ्यात होतं. घामाच्या धारा वाहात असताना होणं अशक्य. त्यातून विजा चमकत असतील आणि ढग गडगडत असतील तर ही प्रक्रिया अधिक वेगाने होते.

८२. आकाशात वीज चमकली ते चमकली की हिरवीण आसपास हिरो असेल तर त्याला बिलगते. तो नसताना काय करते हा प्रश्न फक्त आपल्याला पडतो. वर्षानुवर्ष हा सीन दाखवूनही एकाही सिनेमात वीज डोक्यात पडून हिरो-हिरवीण गचकल्याचं ऐकिवात नाही.

८३. मध्यंतराच्या आधी हिरवीणीच्या पदरात एक मुलगा टाकून हिरो वर गेला म्हणजे समजावं की त्या मुलाचं काम करायला तो परत येणार आहे.

८४. हिरो किंवा हिरवीण नदीत पडले आणि त्यांची डेड बॉडी मिळाली नाही की ते मेलेत असं सर्वांना वाटतं. आपण मात्र अनेक पिक्चर्स पाहिलेले असल्याने ते कुठल्यातरी किनार्यावर लागलेत आणि मध्येच कुठूनतरी उपटणार हे ओळखतो. ह्या लोकांना पाण्याबाहेर काढायची जबाबदारी कोळी लोकांवर येऊन पडते. कारण त्यांना खाण्याइतकी वाईट अवस्था कुठल्याच माश्याची नसते.

८५.हिरोच्या गाडीला अपघात झाला, ती झाडावर आपटली किंवा अगदी दरीत पडली तरी हा वाचतो. व्हिलनच्या गाडीची पेट्रोलची टाकी मात्र लगेच फुटते, आग लागते आणि त्याचा अंतिम संस्कार करायच्या कामातून पोलीस वाचतात.

८६. हिरवीण सावळी असली आणि हिरो गोरापान असला तरी गाण्यात मात्र ती गोरी आणि तो सावरीयाच असतो.

८७. हिरवीण एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की घरात कुठेही असली तरी धावत धावत आपल्या खोलीकडे जाते, धाडकन दरवाजा उघडून आत शिरते आणि पलंगावर जाऊन रडत पडते. कारण तिच्या बापाची हवेली असते, वन बीएचके नसतो.

८८. हिरवीण हिरोला 'तुम मुझे भुल जाओ' असं म्हणते तरीही त्याला कधीही आनंदाच्या उकळ्या फुटत नाहीत.

८९. डाकूंच्या टोळीतील किमान एका तरी डाकूचं नाव शेरा असतं. त्याच्या आईवडिलांना तो मोठेपणी डाकू होणार हे आधीच कळलेलं असतं. थोडक्यात बाळाचे पाय चंबळच्या खोर्यात दिसलेले असतात. डाकूला पाचुंदाभर मिश्या असल्याशिवाय पोलीस त्याला डाकू समजत नाहीत. डाकूंच्या टोळीत सहसा एकही बाई नसते त्यामुळे डाकू पाककलानिपुण असतात.

९०. हिरो-हिरवीण कुठेही रहात असले तरी त्यांच्या घराच्या खिडकीतून चंद्र दिसतोच दिसतो, मग ऋतू कोणताही असो. तो फक्त रात्रीच दिसतो, दिवसा दिसत नाही हे आपलं नशिब.

९१. घरात दिवाणखान्यात टेबलावर पाण्याचा जग/तांब्या भरून ठेवलेला दिसला की समजावं एखादी शॉकिंग न्यूज कळल्यावर कोणाला तरी पाणी पाजायला त्याचा उपयोग होणार आहे. ह्याच टेबलावर जी फळं असतात त्यात प्रामुख्याने सफरचंद, केळी किंवा अगदीच श्रीमंत घर असेल तर द्राक्षं असतात. लीची, स्ट्रॉबेरी, कलिंगड किंवा सीताफळ ठेवलेलं निदान मी तरी पाहिलेलं नाही. ह्या फळांजवळ चाकू असेल तर त्याचा उपयोग अनुक्रमे हिरवीण हिरो येईतो व्हिलनला थोपवून धरायला, हिरो व्हिलनवर उगारायला आणि हिरोची बहिण व्हिलनपासून सुटका नाही असं दिसताच पोटात (स्वत:च्या, व्हिलनच्या नव्हे!) खुपसायला करतात. स्वीस नाईफ नंतर एव्हढं बहुउपयोगी शस्त्र हेच.

९२. रहस्यमय पिक्चरमध्ये प्रत्येक खून झाला की चेहेर्यावर खोटा आहे हे लहान पोरालाही कळेल एव्हढा मोठा मस असलेला माणूस दिसतो त्याला खुनी समजायची चूक करू नये. तो इन्स्पेक्टर किंवा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतो. आणि हे सत्य पिक्चरच्या शेवटीच उघडकीस येतं.

९३. हिंदी चित्रपटात चाकू शक्यतो पोटात खुपसला जातो. गोळी कधीही डोक्यात मारत नाहीत. कोणी विष घेतलं असेल किंवा साप चावला असेल तर तोंडाला फेस दाखवतात. कार अपघातात मृत्युयोग असेल तर डोक्यातून रक्त आलेलं असतं. गाडी कड्यावरून पडते तेव्हा तिच्यात कधीही पेट्रोल नसतं असं होत नाही त्यामुळे ती लगेच पेट घेते. हो, आणि सुनसान रस्त्यावर गाडी बंद पडते तेव्हा कधीही तिचा टायर पंक्चर होत नसतो, तर रेडीयेटर मध्ये पाणी नसतं. ते घेऊन यायला गाडीत रिकामा डबा मात्र नेमका ठेवलेला असतो. कोणी गळफास लावून घेतला असेल तर मागून येणारे लोक त्या व्यक्तीच्या पायाला धरून आधी यथेच्छ रडून घेतात आणि मगच तिला खाली काढतात. ना जाणो थोडी धुगधुगी असेल तर काय घ्या असा सुज्ञ विचार असावा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) सापाच्या चित्रपटात ( उदा नागिन) सापाच्या डोळ्यात लै भारी डी एस एल आर कॅमेरा बसवलेला असतो बाय डिफॉल्ट.
साप हा जिप्स्या पेक्षा भारी फोटोग्राफर असतो. त्यामुळे मरताना सगळ्यांचे उत्तम क्लोज अप फोटु सेव्ह करतो.

Great

ये पर्बतोंके दायरे - despite warning सुरुवात बघितली. काय करणार! रंग ओला आहे म्हट्ल्यावर बोट लावून खात्री करणार्या वंशातले आम्ही. असो. दोन मैत्रिणींचं गाणं बघतोय असं वाटलं. तरी ती निळ्या कपड्यातली (विश्वजीता) दिसायला बरी होती. कुमुद छगानी बाईंनी नुसता आडनावातच नाही तर बाकी ठिकाणी सुद्धा मार खाल्लाय.

चांगल्या गाण्याला आपल्या अभिनयातून वाट दाखवणारे बरेच अभिनेते झाले. पण चांगल्या गाण्याची आपल्या अभिनयातून वाट लावणार्यांचं उदाहरण म्हणून राजकुमार चं नाव फार मोठं आहे. उदा. झनक झनक तोरी बाजे पायलिया (मन्ना डे च्या पूर्वजन्मी च्या पापाची फळं, दुसरं काय), किंवा, मिलो न तुम तो हम घबराये.

अ‍ॅडमिन यांना एक नम्र विनंती आहे... एक नविन विभाग सुरु करावा " हे धागे ऑफिसात वाचु नये" या नावाने....
.
.उद्या कुणाची नोकरी गेली तर जवाबदार कोण ?????????????????? Biggrin

मस्त..... लगे रहो...
५४. >>>रुक जा रात ठेहेर जा रे चंदा मधे रा.कु. मी.कु. चे डोळे का मिटतो.......>>>>>
आमचा (म्हणजे आमच्या पूर्वायुष्यातील कॉलेजकंपूचा सर्वानुमते) असा कयास आहे की येथे दिग्दर्शकाचा उद्देश 'सेम सिच्युएशन' मधे 'व्यास ॠषींना' बघून 'अंबिके' वर जो परिणाम झाला (म्हणजे संतती अंध निपजणे, त्याचा पुढे महाभारत होण्यास हातभार लागणे, वगैरे) तसं काही मी.कु. यांना होऊ नये, असा असावा.... त्यांना आसवे ढाळण्यासाठी इतर व्यवस्था केलेली आहेच.

<<<हिरविण हिरोला आपण प्रेग्नंट असल्याचं सांगते तेव्हा तो 'सच?' असं का विचारतो हे मला आजतागायत न सुटलेलं कोडं आहे. ती काय टाईमपास म्हणून सांगते का असं? आणि त्यात आश्चर्य वाटण्याचं काय कारण आहे? 'कर्मण्येवाधिकारस्ते...' ह्या गीतावचनाच्या पालनाचा हा उत्तम नमुना आहे.

Biggrin Biggrin

<<खाली काय मंडळी साग्रसंगीत वृत्तांत ऐकायला गोळा झालेली असतात का काय देव जाणे. हिरो पुन्हा जवळ यायला लागला की 'कोई आ जायेगा' आहेच. बये, मग दरवाज्याला कडी घाल की. हात कोकणात गेलेत का?
Biggrin Biggrin
<<मनोजकुमार संपूर्ण गाणंभर आपला चेहेरा कॅमरापासून लपवायचा प्रय्त्न करतो. भाभु, प्रकु, राकु हे आपण गाण्यात आहोत हेच हिरविण, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांवर अनंत उपकार आहेत अश्या समजुतीमुळे फार काही करत नाहीत.
Biggrin Biggrin

हसून हसून मुरकुटी वळ्ली.... जबरदस्त....अप्रतिम...

मंडळी धन्यवाद Proud अजून काही नियम अ‍ॅड केलेत. तरी दिनेशदांनी सुचवल्याप्रमाणे तवायफ ह्या इन्स्टिट्युशन बद्दल आणि कॅब्रे अर्थात आयटम नंबर बद्दल लिहायचं बाकी आहे.

हिरो हा अत्यंत सुस्वभावी, सद्गुणी सज्जनाचा पुतळाच असतो. कधी त्याला कोणती बाई आवडत नाही का कुणाला डोळे मारत नाही. नियत ही नेहमी चांगलीच असते. आणि तो चित्रपटात इतर कामांबरोबर आजूबाजूच्या आया बायांची लुटू घातलेली इज्जत पण वाचवतो.

जर हिरो हिराविण वाट चुकुन कुठल्याशा कबिल्यापाशी वा आदिवासी वस्तीजवळ आले तर ती नेमकी पूरणमासीची रात असते. बसतीवाल्यांची अशी प्रथा असते म्हणे की त्या दिवशी येणार्‍या मेहमानाला त्या दिवशी बस्तीवाल्यांच्या बरोबर नाचावेच लागते. मग हिरॉईन लाजत लाजत, आढेवेढे घेत त्याला तयार होते. कुठल्याही साईझची असली तरी बसतीवाल्यांच्या बस्त्यात तिच्या मापाचे कपडे असतात. मेकअप वगैरेही क्षणार्धात तयार असतो. त्या हिरवीणीला अशा प्रसंगी म्हणायचे गाणे मुखोद्गत असते. आणि अहो आश्चर्यम! बस्तीवाल्यातील नर्तकसमूहाला कुठले गाणे म्हटले जाईल ह्याची पूर्ण कल्पना असते. तमाम नृत्यवृंद कुठल्याही तालमीशिवाय एका तालात नाचू लागतात. तमाम वाद्यवृंद योग्य ती वाद्ये बडवू लागतात. (ज्या हौशी कलाकारांनी नाच बसवले आहेत वा त्यात सहभागी झालेले आहेत त्यांना ह्या अफाट कर्तृत्वाने थक्क न होणे अशक्य आहे!)

अशा वेळी हिरोसाहेबांकडे दोनच पर्याय असतात
१. मुखियाच्या बरोबरीने बसून मोठ्या कौतुकाने हिरविणीचे नृत्य बघत बसणे. हिरो धाडसी असेल तर मुखियाच्या धूम्रपानात वा मदिरापानातही सहभागी होतो.
२. बस्तीवाल्यांच्या कपड्याच्या बस्त्यात आपल्या मापाचा कपडा शोधणे (तो मिळतोच), ती वस्त्रेप्रावरणे नेसून वरील नृत्यात सामील होणे. आणि आपल्या कुवतीनुसार नाचणे गाणे.
३. पहिली एक दोन कडवी पर्याय १, उरलेले गाणे पर्याय २.

असे झाले तर हिर्वीण (क्वचित हिरो) मुखियाची बिछडी हुई बेटी/बिछडा हुआ बेटा निघण्याची दाट शक्यता असते हे लक्षात घ्यावे.

'पूरणमासीची रात' वरून, 'वॅलेंटाईन डे जब पूनम की रात को आता हैं' ची आठवण जागी झाली (संदर्भः दि. तो. पा. है.)

शेंडेनक्षत्र,
नाच सुरु होताना जरी पूर्ण चंद्र असला तर गाणं संपता संपता, अचानक पाऊस कोसळू शकतो.
बस्तीत नेमकी एक झोपडी रिकामी असतेच..... विस्तव असतो आणि लोणीही असते Happy

'वॅलेंटाईन डे जब पूनम की रात को आता हैं >>>> अगदी अगदी. शुध्द, सात्विक, बावनकशी आचरटपणाचा तो मूर्तिमंत नमूना होता.

Pages