आपल्याकडे धुळवड/होळी किंवा महा शिवरात्रीला ला 'भांग' पिउन आत्मिक,अध्यात्मिक आणि पारलौकिक वै. आनंद मिळवण्याची एक उच्च परंपरा आहे. या परंपरेचे पाईक होण्याचे प्रयत्न आम्ही करून बघितले पण बहुतेक पात्रता (व पुरेशी हीम्मत ) नसल्याने या आत्मिक वै. आनंदास आम्ही मुकलो. पण आमचे काही 'तपस्वी' मित्र भांग पिउन या पारलौकिक तुर्यावस्थेत गेल्यावर ज्या काही लीला करते झाले त्या लीलानुभावाच्या परम भाग्याचे धनी मात्र झालो.
भांग मिसळलेली थंडाई पिउन किंवा भजी खाऊन वर थोडीशी मिठाई रिचवली की थोड्या वेळानी काही जणांची विमानं उडायला लागतात, काही काळ जमिनीवरून थोड्याच उंचीवर असलेली ही विमानं भांगेच्या चढत्या अंमलानिशी उंच उंच उडायला लागतात. आणि मग ही उंच उडालेली विमानं आणि त्यांचे वैमानिक खाली जमिनीवर येईपर्यंत काय काय धिंगाणा घालतात,जमिनीवर राहणाऱ्या किंवा ज्यांची विमानं उडालीच नाहीत अशा पामरांना काय काय सहन करावा लागतं यांच्या मजेशीर किस्स्यांसाठी हा धागा . . .
वारुणी पिउन विमान उडवणाऱ्यान चे किस्से सांगितलेत तरी चालतील पण भांग पिउन/खाऊन कल्पनेच्या अचाट भराऱ्या मारणाऱ्या आपल्या वैमानिक मित्र/मैत्रीणीना प्राधान्य द्यावे ही विनंती.
या धर्तीवरील एखादा धागा मायबोली वर असेल तर कृपया सांगावे हा धागा काढून टाकता येइल.