'फॅमिली ड्रामा' - गप्पा श्री. अजित भुरे यांच्याशी...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 May, 2013 - 10:10

मानवी नातेसंबंधांचा थांग लागणं कठीण. ही नाती कायमच नाटककारांना भुरळ घालत आली आहेत.

वेगवेगळे विषय हाताळणार्‍या मराठी रंगभूमीवर दाखल झालेलं नवंकोरं नाटक 'फॅमिली ड्रामा' मानवी नात्यांना केंद्रस्थानी ठेवूनच काहीतरी सांगू पाहतं. आजच्या काळातल्या करमरकर कुटुंबाची ही कथा. जरासं विस्कटलेलं असं हे कुटुंब. 'खेळ नात्यांचा' ही दूरचित्रवाणी मालिका या घरातल्या गृहिणीचं सर्वस्व, तर कुटुंबप्रमुखाचा आपल्या मुलाशी फारसा संवाद नाही. मग एक दिवस हे चित्र पालटेल, असं वाटायला लावणारी एक घटना घडते.

अद्वैत दादरकर या तरुण नाटककारानं लिहिलेलं आशयघन पण हलकंफुलकं, मस्त मनोरंजन करणारं नवं नाटक म्हणजे 'फॅमिली ड्रामा'. या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे विजय केंकरे यांनी, तर निर्माते आहेत चंद्रकांत लोकरे. अजित भुरे, भक्ती देसाई, अद्वैत दादरकर, निखिल राऊत आणि सुकन्या कुलकर्णी यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत.

जुलै महिन्यात बोस्टन इथे होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात हे नाटक सादर केलं जाणार आहे. या निमित्तानं पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हर्पेनharshalc या मायबोलीकरांनी अजित भुरे यांच्याशी गप्पा मारल्या.

Slide2.jpg

उत्तम अभिनेते, नाट्य-चित्रनिर्माते, दिग्दर्शक, पार्श्वभाषक, लेखक आणि नाट्यसंस्थाचालक म्हणून अजित भुरे यांना मानाचं स्थान आहे. गेली वीस वर्षं ते आयएनटी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांचं आयोजन करत आहेत. 'बदाम राणी गुलाम चोर' व 'रेस्टॉरंट' या मराठी चित्रपटांची व 'प्रेमाच्या गावी जावे', 'नेव्हर माईंड', 'सारखं छातीत दुखतंय', 'काटकोन त्रिकोण', 'मुंबई मुंबई', 'मिस्टर नामदेव म्हणे', 'ढोलताशे', 'घरात घुसले तारे' व 'मीटर डाऊन' या गाजलेल्या नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. 'काटकोन त्रिकोण', 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री', 'संसारगाथा' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिकाही केल्या आहेत.

'फॅमिली ड्रामा' या नाटकातली कुटुंबप्रमुखाची त्यांची भूमिका सध्या गाजते आहे.

ajitbhure.jpg

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी 'फॅमिली ड्रामा' नाटक निवडलं गेल्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत?

अजित भुरे : आनंद तर आहेच, कारण मी स्वतः बर्‍याच वर्षानंतर, म्हणजे 'ढोलताशे'चे प्रयोग थांबवल्यानंतर केवळ अभिनेता म्हणून या नाटकात काम करतोय. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे, अद्वैतसारख्या तरूण नाटककारानं लिहिलेलं हे नाटक आहे. त्यानं त्याच्या नजरेतून सध्याची आणि आधीची पिढी यांच्यातील संवाद-विसंवाद मांडलेले आहेत. आपल्याकडच्या जुन्या पद्धतीच्या नाटकांसारखं, म्हणजे मध्यमवयीन लोकांसाठीचंच नुसतं हे नाटक नसून, त्याच्या वयाच्या लोकांसाठी, त्यांच्या बोलीतून मांडलेलं हे नाटक आहे. ज्यात नव्या पिढीचा जुन्या पिढीशी असलेला संघर्ष, आणि प्रेम एकाच वेळी त्यानं समतोल साधत दाखवलाय. त्यामुळे सध्याच्या तरूण पिढीला आवडेल असं हे नाटक आहे. अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांनाही हे आवडेल असा विश्वास वाटतो.

निर्माता, दिग्दर्शक, लेखक म्हणून इतकी वर्षं काम करण्याचा अनुभव असताना नव्या पिढीच्या नाटककाराच्या या नाटकात केवळ अभिनय करण्याचा निर्णय कसा घेतलात?

अजित भुरे : हे नाटक आवडलं हा भाग तर आहेच. जसं मी सांगितलं की, दहा वर्षांपूर्वी 'ढोलताशे'चे प्रयोग थांबवले होते, आणि निर्माता म्हणून जास्त वेळ काम करण्यामुळे अभिनय करणं बाजूला राहिलं होतं. परंतु या नाटकाचे निर्माते चंद्रकांत लोहकरे आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनीच मला या नाटकातल्या भूमिकेसाठी विचारलं. तेव्हा त्यांनी विचारल्याचा आनंदच झाला, कारण त्यांना असं वाटलं की मी ही भूमिका चांगली निभावू शकेन. मग ही संधी सोडण्यापेक्षा ती घेतली आणि केवळ अभिनेता म्हणून या नाटकात काम करतोय.

मग निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता यातली कुठली भूमिका तुम्हांला सगळ्यांत जास्त आवडते?

अजित भुरे : अभिनेता म्हणून मला माहिती आहे की, मला काही मर्यादा आहेत. त्यामुळे मी स्वतःला त्यात फार झोकून देत नाही. दिग्दर्शन मला आवडतं, त्यामुळे ते करायला आवडतं. पण त्याहीपेक्षा, एक निर्माता म्हणून मला स्वतःलाच एक जबाबदारी घ्यावीशी वाटते. गेल्या तीस वर्षांत, मला नाटकांनी जे दिलं, मी ज्या प्रकारच्या कलाकारांसोबत काम केलं आणि त्यांची संवेदना, नाटकांबद्दलची आस्था मी पाहिली, त्यानुसार येणारी नाटकं निर्माता म्हणून करणं मला जास्त आवडेल. चांगल्या प्रकारची नाटकं निर्माण करणं, नव्या पिढीतल्या कलाकारांसोबत काम करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ’मी नाही तर कोण करणार', या भावनेनं मला निर्माता हीच भूमिका माझ्यासाठी योग्य वाटते.

यावेळच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची थीम आहे 'ऋणानुबंध'. तुमच्या आयुष्यातल्या व्यक्तींशी, संस्थांशी जुळलेल्या तुमच्या ऋणानुबंधांबद्दल सांगाल का?

अजित भुरे : माझ्यासाठी कुठलीही एक व्यक्ती किंवा संस्था यांच्यापेक्षा गेल्या तीस वर्षांत मी केलेल्या कामाशी जुळलेला माझा ऋणानुबंध मला मुख्यत्वे सांगावासा वाटतो. कारण या तीस वर्षांत खूप लोक भेटले, त्यांतल्या एका कुणाचा असा उल्लेख करणं अवघड आहे. म्हणजे मी जेव्हा व्हॉईस डबिंगचं, अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं होतं, तेव्हा मी या क्षेत्रात करीअर करेन, असं वाटलं नव्हतं. त्यामुळे हा संपूर्ण प्रवासच एक जुळलेला बंध आहे.

हे नाटक ’बीएमएम’मध्ये होतंय, त्यानिमित्तानं एक आठवण सांगतो. याआधी, ’बीएमएम’मध्येच, मी निर्माता म्हणून 'सारखं छातीत दुखतंय' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग केला आहे. आणि याच प्रवासात आता मी बर्‍याच काळानंतर अभिनेता म्हणून ज्या नाटकात काम करतोय, त्या नाटकाचा प्रयोगही ’बीएमएम’मध्ये होतोय. त्यामुळे ’बीएमएम’शीही माझा ऋणानुबंध आहे, असं म्हणायला हरकत नाही.

मायबोलीसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अधिवेशनातील प्रयोगासाठी आणि एकंदर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अजित भुरे : मीसुद्धा ’मायबोली’चे आभार मानतो, कारण अशाप्रकारचं एक व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं आहे, ज्याद्वारे आमच्या नाटकाबद्दल बर्‍याच लोकांपर्यंत माहिती पोहोचेल. अशा प्रकारची नव्या युगातील माध्यमं ही काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्हांलाही शुभेच्छा आणि धन्यवाद.

P4181500.JPG

***

या मुलाखतीतील श्री. अजित भुरे यांचं छायाचित्र त्यांच्या खाजगी संग्रहातून.

***

'फॅमिली ड्रामा' या नाटकाचे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठीचे प्रायोजक आहेत 'सुगी ग्रूप' (http://www.sugee.co.in/).

***
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users