Submitted by बेफ़िकीर on 25 April, 2013 - 06:49
फिरलेत मनाचे वासे... होत्याचा नव्हता झालो
मी केले प्रेम जरासे... होत्याचा नव्हता झालो
जे माझे होते त्यांनी... तेथे पोचवले जेथे
नव्हत्यांनी दिले दिलासे... होत्याचा नव्हता झालो
गेलीस विसरुनी पुरती... तू देवघेव श्वासांची
मी विरलो देत उसासे... होत्याचा नव्हता झालो
होतो तेथे का नव्हतो... नव्हतो तेथे का होतो
देऊन स्वतःस खुलासे... होत्याचा नव्हता झालो
नव्हत्याचे होता यावे... हे दान पाहिजे होते
पण पडले उलटे फासे... होत्याचा नव्हता झालो
क्षण अन् क्षण मोजत मोजत... काही दशकांनी मेलो
मी इतक्या महत्प्रयासे... होत्याचा नव्हता झालो
मी रडतो कारण की मी... नव्हतो तो झालो आहे
'बेफिकीर' जग हे हासे... होत्याचा नव्हता झालो
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
apratim.......... manala
apratim.......... manala sparshun geli.........
गझल आवडली, वेगळी रदीफ. होतो
गझल आवडली, वेगळी रदीफ.
होतो तेथे का नव्हतो... नव्हतो तेथे का होतो
देऊन स्वतःस खुलासे... होत्याचा नव्हता झालो
व्वा!
Outstanding . . . . .Befikeer
Outstanding . . . . .Befikeer ! ! !
I don't know why, but today many of you are talking exactly what I feel at times,
it gives you a real peace, when you suddenly hear something from others what you always feel ! ! !
Great . . . .
फारच फ्रेश गझल
फारच फ्रेश गझल बेफिजी..!!
गेलीस विसरुनी पुरती... तू देवघेव श्वासांची
मी विरलो देत उसासे... होत्याचा नव्हता झालो
होतो तेथे का नव्हतो... नव्हतो तेथे का होतो
देऊन स्वतःस खुलासे... होत्याचा नव्हता झालो
>> उत्तम शेर..
रदीफ भारीच आहे , जरा मोठी ..आज वाचनाची सुरुवात या गझलेने ..क्या बात!!
Apratim gazal.... sagale
Apratim gazal.... sagale sher dirghakal smaranat rahanare.
सर्वांचे मनापासून आभार मानतो.
सर्वांचे मनापासून आभार मानतो.
सुंदर गझल....फार आवडली
सुंदर गझल....फार आवडली
होतो तेथे का नव्हतो... नव्हतो
होतो तेथे का नव्हतो... नव्हतो तेथे का होतो
देऊन स्वतःस खुलासे... होत्याचा नव्हता झालो
परब्रह्म यांनी म्हटल्याप्रमाणे हा अनुभव प्रत्येकाला आपलाच वाटावा इतका सार्वत्रिक आहे..
कविता जिव्हारी पोचते.
मतला वगळता गझल आवडली! काही
मतला वगळता गझल आवडली!
काही ठिकाणी रदीफ पालुपदाप्रमाणे वाटला!
फिरलेत मनाचे वासे.......अलौकिक प्रतिमा! पण दुसरी ओळ तिला न्याय देणारी वाटली नाही!
_______/\___________
_______/\___________
मतला असाही
मतला असाही व्हावा.......
फिरताच मनाचे वासे होत्याचा नव्हता झालो!
लवले हे नेत्र जरासे....होत्याचा नव्हता झालो!
*************इति कर्दनकाळ
फिरताच मनाचे वासे होत्याचा
फिरताच मनाचे वासे होत्याचा नव्हता झालो!
ही ओळ मस्त आहे प्रोफेसर!
इति कर्दनकाळ म्हणजे काय?
श्रीयुत कर्दनकाळ, आपण 'असाही
श्रीयुत कर्दनकाळ,
आपण 'असाही व्हावा' म्हणून दिलेल्या मतल्यात आशयाचा कडेलोट, चमत्कृती, वक्रोक्ती, काव्यसांगड असल्याचा प्रत्यय व बांधणीतील अभंगता (सीमलेस स्ट्रक्चर) आढळत नाही.
धन्यवाद.
लवले हे नेत्र जरासे हे अगदीच
लवले हे नेत्र जरासे हे अगदीच अनावश्यक हे मात्र खरे.
भूषणराव, नेत्र लवणे, डोळ्याची
भूषणराव,
नेत्र लवणे, डोळ्याची पापणी लवणे इत्यादी शब्दयोजनेत निमिषार्धात काय झाले असा भाव येतो!
घराचे वासे फिरले, की अख्खे घर फिरायला लागते ही म्हण आहे, जिचा टोकाच्या कल्पकतेने वापर आपण पहिल्या ओळीत केला आहे! ते हृदयंगम आहे!
मनाचे वासे फिरणे यात काही तरी माझ्या मनाविरुद्ध अचानक घडले, ज्याला खुद्द माझे मनच जबाबदार आहे असे भावतरंग आमच्या तरी मनात पहिली ओळ वाचल्यावर उमटले!
पण दुस-या ओळीने फारच निराशा झाली, कारण मी प्रेम केले जरासे ही गोष्ट शायराच्या काय मनाविरुद्ध होती?
ज्यामुळे तो होत्याचा नव्हता झाला?.............नाही पटले बुवा!
फिरताच मनाचे वासे असे केल्याने क्षणार्धात/निमिषार्धात हा भाव सूचीत होतो, जे निभवायला लवले हे नेत्र जरासे ही शब्दयोजना पूरक वाटते!
अवांतर: आमचा एक जुना शेर आठवला तो देत आहे..........
ही घडी बसण्यास सारी जाळली मी जिंदगानी;
पापणी लवते न लवते; तोच वाताहात होते!
******************इति कर्दनकळ
श्री विजय दिनकर
श्री विजय दिनकर पाटील,
दखलपात्र.....अदखलपात्र हा नीरक्षीर विवेक नावाजण्याजोगा वाटला!
भूषणराव, होत्याचे नव्हते
भूषणराव,
होत्याचे नव्हते झाले................असा रदीफ जास्त कलात्मक वाटला असता या गझलेत!
विजयराव एक गाणेही
विजयराव एक गाणेही आठवले..............
ये दोस्ती हम नहीं भूलेंगे.........................
आवडली गझल मधे ते डॉटस् का
आवडली गझल
मधे ते डॉटस् का दिलेत हे समजले नाही
१. फिरलेत व फिरताच याबाबत -
१. फिरलेत व फिरताच याबाबत - सर्वसाधारणतः घराचे वासे फिरतात, अशी म्हण आहे. मनाचे वासे फिरणे ही एक काव्यात्म संकल्पना पहिल्या ओळीत मुद्दाम घेतलेली आहे. तेथे 'फिरताच' हा शब्द वापरल्यास 'मनाचे वासे फिरणे' हे जणू आम आहे, सामान्य आहे, नेहमी व प्रत्येकाच्या बाबतीत घडणारे आहे असा भाव निघतो. प्रत्यक्षात मनाचे वासे फिरणे हे कधीच होत नाही. त्यामुळे तेथे 'फिरताच' हा शब्द लागू होत नाही. अधिक स्पष्ट करायचे झाल्यास 'बेल वाजताच मुले धावत सुटली' हे विधान उदाहरणार्थ घ्यावे. शाळेची बेल वाजताच मुले धावत सुटली यामध्ये प्रत्येक शाळेत 'शाळा सुटण्याची घंटा' वाजणे ही नित्य बाब आहे जी समोर येते. तसेच, 'फिरताच मनाचे वासे' म्हंटल्यावर जणू मनाचे वासे हे फिरतातच असा भाव प्रकट होतो जो काव्यात्म तर नाहीच (कारण काल्पनिकतेला नित्यनेहमी घडणारी बाब ठरवणारा आहे) पण तार्किकदृष्ट्याही पटत नाही. पहिली ओळ गुंगायला लावणारी, विचाराला ट्रिगर करणारी करण्यासाठी, दुसर्या ओळीबाबतची उत्सुकता वाढवण्यासाठी 'फिरलेत मनाचे वासे' अशी करणे त्यामुळे आवश्यक ठरते. हे पटण्यासाठी तटस्थ व न्यायी विचारमंथन करून शेर रचणे आवश्यक आहे.
२. समारोप - 'फिरलेत मनाचे वासे, होत्याचा नव्हता झालो' ही ओळ संपूर्ण आहे. या ओळीपुढे अथवा मागे काहीच नसले तरीही अर्थपूर्ण अशी ओळ आहे. अशी ओळ / ओळी गझलेत निर्मण होऊ शकतात. अश्या ओळींमुळे 'दुसरी ओळ हवीच कशाला' असा प्रश्न विचारणारे काही महाभागही आमच्या परिचयात होते. ते असो! केवळ गझलतंत्रासाठी दुसरी ओळ रचण्यापेक्षा ही एक ओळ एखाद्या कवितेची समारोपीय ओळ म्हणून स्वतंत्ररीत्याच वापरली असती तर काय बिघडले असते असा प्रामाणिक प्रश्न विचारणारे काही अभ्यासकही आम्हास भेटले. तेही असो. प्रथमपासून 'मी केले प्रेम जरासे, होत्याचा नव्हता झालो' या ओळीने गारूड घातल्यामुळे मतला तयार झाला आहे. मी जरासेच प्रेम केले तर पार होत्याचा नव्हता झालो असे म्हणायचे आहे. यात 'लोकांनी कसे काय बुवा आयुष्यच्या आयुष्य प्रेमाखातर उधळले असेल, कसे काय बुवा लोक प्रेयसीच्या एका कटाक्षासाठी तासनतास फिरत असतील' अशी अदृष्य टिपण्णी आहे. दुसरी ओळही स्वयंपूर्ण आहे. तिला आगापीछा नसला तरीही! आता अश्या दोन ओळींमधून शेर होऊ शकेल का या प्रश्नाचे न्याय्य उत्तर हेच आहे की शेर किंवा मतला रचलाच पाहिजे असा कुठे कोणाचा आग्रह आहे? पण ओळीचा स्वभाव, प्रवृत्ती हे गझलेस शोभणारे आहेत, गझलेस पूरक आहेत. एखादे भावगीत, लावणी, ओवी, भजन यास शोभणार्या या ओळी नव्हेत. झाली तर यांची गझलच होऊ शकेल. या ओळी जन्मतःच गझलेचे बाळसे घेऊन आलेल्या आहेत. त्या सॅक्रिफिशिअलही मानल्या जाऊ शकतात. म्हणजे फुटकळ शेरात कुठेतरी वापरून त्यांचा बळीही दिला जाऊ शकतो. पण त्यांच्यात निर्माण होऊ शकणारे कोरिलेशन खुलवण्यातील आपला आनंद घालवून एक चांगली जमीन हाती येता येता का सोडायची असा मोहही भुरळ पाडतोच. म्हणून येथे कवी दिलासे, फासे, खुलासे हे तीन काफिये असलेल्या विविध ओळी अनंतवेळा मनाशी घोळवून शेवटी 'वासे' हा काफिया असलेल्या ओळीपाशी येऊन आपले शोधकार्य संपवतो. कवीच्या मते फिरलेत मनाचे वासे ही ओळ सर्वाधिक न्याय देणारी ठरते. का? तर जरासेच प्रेम केल्यामुळेसुद्धा आपले मन आपल्याविरुद्ध झाले, कायमचे तिचे झाले, तिच्याशिवाय दुसरा विचार करेनासे झाले, स्वतःचा फायदाही बघेनासे झाले, स्वतःचे भलेही बघेनासे झाले. आपलेच मन आपल्याच विरुद्ध झाले. त्यामुळे ही ओळ सर्वार्थाने न्याय्य पर्याय ठरली.
३. क्रम असाच का? - पहिली व दुसरी ओळ यांची अदलाबदल का नाही? याची दोन कारणे आहेत. पहिले कारण! मतल्याचा सानी हा सहसा असा ठेवावा की ज्याचा अर्थ 'सर्वसाधारणीकरणास सुलभ' ठरू शकेल. म्हणजे, 'मी केले प्रेम जरासे, होत्याचा नव्हता झालो' ही ओळ सुलभ, कधीही लक्षात राहणारी, सहज गुणगुणता येणारी, अनेक ओळींशी वा प्रसंगांशी सशक्त संबंध लागू शकणारी आहे. तर 'फिरलेत मनाचे वासे' ही ओळ 'विशिष्ट ओळ' आहे. तिला खास अर्थ व अर्थाची ढब आहे. तिच्या वापरासाठी खास प्रसंग, खास आठवणी आवश्यक आहेत. मतल्यातील सानी नेहमी 'कुठेही, कधीही लक्षात राहणारा. सहजसुलभ' असा घ्यावा. त्याने गझल खुलते. पण हे कारण तसे तांत्रिकच झाले. दुसरे महत्वाचे कारण (अदलाबदल न करण्याचे) हे की 'फिरलेत मनाचे वासे' यावरून रसिकाच्या मनात दुसर्या ओळीची उत्सुकता निर्माण होत आहे. 'असे काय झाले असेल बुवा?, हा असे का म्हणतोय, हा पुढे त्याचे एक्स्प्लनेशन देणार आहे की काय करणार आहे?' असे प्रश्न जाणकार गझलरसिकाला पडतात. 'मी केले प्रेम जरासे' ही ओळ पहिल्यांदा ऐकून रसिकाला एक कथानक ऐकल्यासारखे वाटेल. की ठीक आहे बुवा याने काहीतरी प्रेम वगैरे केले त्यामुळे हा होत्याचा नव्हता झाला इतकेच म्हणत आहे. म्हणून अदलाबदल नाही.
४. मतल्याला रदीफ नसतीच तर? -
समजा असा मतलाच ठेवला असता:
फिरलेत मनाचे वासे
मी केले प्रेम जरासे
तर काय बिघडले असते? पुढचे शेर बदलावे लागले असते इतकेच. पण हाही मतला आहेच की?
पण प्रश्न असा आहे की लहान बहरीत बसणारे मुद्दे त्या गझलजन्माच्या प्रक्रियेच्या वेळी मनात होते का? की मुद्दे मोठाल्ले होते? मग मोठे मुद्दे असताना बहरीसाठी नाही तो त्याग आणि वृत्तशरणता का करायची?
वगैरे!
धन्यवाद!
मधे ते डॉटस् का दिलेत हे
मधे ते डॉटस् का दिलेत हे समजले नाही <<<
देणारच नव्हतो. पण मायबोलीवर असे काही गझलकारही मला भेटले जे स्वच्छ अक्षरगणवृत्तात असलेले वृत्त त्यांना माहीत नसल्याने 'तुमच्या ओळी वाचता आल्या नाहीत' असे म्हणाले. त्यांना यती लक्षात यावा म्हणून मुद्दाम डॉट्स दिले आहेत.
धन्यवाद.
सर्व मुद्दे पटले धन्यवाद
सर्व मुद्दे पटले
धन्यवाद
सगळेच शेर आवडले खुलासे
सगळेच शेर आवडले
खुलासे जास्तच!
प्रोफेसर, यू आर इंपॉसिबल
प्रोफेसर,
यू आर इंपॉसिबल
सुंदर गझल... !! आवडली
सुंदर गझल... !! आवडली
जबरदस्त..... !! अख्खी गझल जाम
जबरदस्त..... !!
अख्खी गझल जाम आवडेश....
आवडली. तुमच्या लिखाणात सहसा न
आवडली. तुमच्या लिखाणात सहसा न दिसणारे शब्दाचे रिपिटिशन या गझलेत जाणवले. पण त्याचा त्रास होत नाही म्हणजे वापर जाणीवपूर्वक आहे?
तिलकधारी आला आहे. जे माझे
तिलकधारी आला आहे.
जे माझे होते त्यांनी... तेथे पोचवले जेथे
नव्हत्यांनी दिले दिलासे... होत्याचा नव्हता झालो <<< वा
गझल छान. होतो, नव्हतो फार झाले आहे. शब्दांचा खेळ वाटेल अशा गझला रचू नयेत.
तिलकधारी निघत आहे.
रदीफ चांगला निभावला
रदीफ चांगला निभावला आहे.
मात्र रदीफ असा आहे की गझल काही शेरांनंतर शब्दखेळ होऊन राहतो.
सर्वच शेर
सर्वच शेर सर्वांगसुंदर.
आवडली.