ll आयुष्याचा सुगंधी धूर ll (१७)
कुठल्याशा सत्संगाचा कार्यक्रम होता. अजून महाराज व्यासपीठावर यायचे होते. महिला सडा-रांगोळ्या करत होत्या. एक भक्त उद्बत्त्यांचा गुच्छ ठिकठिकाणी लावून वातावरण सुगंधित करण्याचे काम करत होता. एक चिमुरडा या सगळ्या गोष्टींकडे कुतुहलाने पहात होता. उदबत्त्यांच्या धुराची नक्षी पहाता पहाता तो चिमुरडा हरखून गेला. त्याला काहीतरी सुचले असावे. त्याने त्या उदबत्तीच्या सुगंधी धुराभोवती आपल्या चिमुकल्या हातांची ओंजळ धरली. त्याला लक्षात आले. ओंजळीत आपण धूर पकडला आहे. आता त्याने ओंजळ घट्ट मिटली. ओंजळीत पकडलेला सुगंधी धूर दाखवायला बंद मुठीसह तो आपल्या मित्राजवळ गेला. 'मी सुगंधी धूर पकडला . बघ ! बघ !!' असं म्हणून तो आपल्या मित्राला ओंजळीतला सुगंधी धूर दाखवायला उतावीळ झाला ,आणि त्याचा मित्रही तो सुगंधी धूर पाहायला उत्सुक. ओंजळ उघडताच मात्र त्या चिमुरड्याचा चेहरा हिरमुसला झाला. मघापासून ओंजळीत घट्ट पकडून आणलेला तो सुगंधी धूर फक्त मुठीत नव्हता. मूठ खाली होती. ' कुठे गेला धूर ?असा कसा गायब झाला ? मी तर किती घट्ट पकडला होता . मग असं कसं झालं ?' किती तरी प्रश्न त्या चिमुकल्याच्या निरागस चेहर्यावर स्पष्ट दिसत होते; आणि त्याला उत्तर सापडत नव्हते.
त्या छोट्या मुलाची अवस्था आपण समजू शकतो; पण मोठ्यांचे तरी काय वेगळे आहे. मृत्युशय्येवर पडल्यावरच प्रश्न पडतो अनेकांना ,'अरे, असा कसा मी मरू शकतो ? इतक्यात ? जगणं असं कसं बघता बघता गायब होवू शकतं ?' खरं तर त्या चिमुकल्याचा मुठीतील धूरासारखच नसतं का आयुष्य ? कितीही घट्ट पकडून ठेवलं तरी बघता बघता गायब होणारं. जेव्हा आपल्याला ते डोळेभरुन बघायचे असते. जगण्याचा प्रत्येक सूर आपल्याला जाणिवेच्या कानांनी मनभर ऐकायचा असतो. आपण त्यासाठी नुकतेच कुठे तयार होतो.. आणि अचानक लक्षात येतं , अरे जगण्याचा धूर तर गायब ! मग मारणार्याची चिडचिड होते. चरफड होते. एक असहाय हतबलता. विवशता . स्वत:ला , स्वत:च्या आयुष्याला असं धूरासारखं गायब होतांना पाहून काय होत असेल याची कल्पना करून पहायलाच हवी. नक्कीच एक छान समज , छानसं शहाणपण आल्याशिवाय रहाणार नाही.
खरच आयुष्य हे सुगंधी धूरासारखच आहे. ते गतीशील आहे. चंचल आहे. अस्थिर आहे. एकच एक अवस्था त्याला नाहीये. त्याचा रंग ,त्याचे रूप, त्याचा गंध प्रत्येक क्षणी बदलतो. त्याचा आस्वाद त्याच क्षणी घेणे हेच बरोबर. भविष्यात निवांतपणे आयुष्य उपभोगू असे वाटणे वेडेपणाचे आहे. श्रीमंत ,सत्तधीश ,ज्ञानी , उच्चपदस्थ , माननीय होण्याच्या वेडात आयुष्याचा सुगंधी धूप ,धूर गायब तर होत नाही न ? चला आयुष्याला पाहू या , जाणू या. त्याच्या रंगांचा , गांधांचा ,सौंदर्याचा आस्वाद घेऊया . परमेश्वराच्या प्रसादाचा श्रद्धेने आस्वाद घेऊया . जीवनावर प्रेम करूयात. नाहीतर मुठीत धूर असण्याची खात्री असलेल्या मुलासारखीच आपली अवस्था होईल.
कमलाकर देसले
23 एप्रिल 2013