आर्थिक वर्षाखेरीचे दिवस आहेत. नक्कीच ऑफिसमध्ये अनेकांच्या फुल्ल नाईट्स, लेट नाईट्स चालू असतील. हे दिवसच असे असतात की 'लोड' घेतल्याशिवाय काम होणारच नसतं. करोडोंचे पुस्तकी आणि प्रत्यक्ष हिशेब जुळवताना गद्धेमजुरी आणि मगजमारी कुठलाही मागचा-पुढचा, 'हे माझे काम आहे की नाही' वगैरेसारखा विचार न करता, करावीच लागते. ती करत असताना डोकं फिरतं, वैताग येतो, संताप येतो, चीडचीड होते पण अचूक ठोकताळा लागल्यावर, मेहनतीचं चीज झाल्यावर मिळणारा आनंदही अपूर्व असतो. तो पराकोटीचा मानसिक आणि शारीरिक थकवा एक वेगळंच समाधान देतो. कारण कुठे तरी, आत, आपण स्वत:च्याही नकळत एकदा तरी ठरवलेलं असतं की, 'आजचा दिवस (रात्र?) माझा' आहे !
पण काही वेळी, वर्षअखेर नसताना किंवा कुठलीही तातडी नसतानाही, उगाचच एखादं काम एखादी अवास्तव 'डेड लाईन' घेऊन केलं जातं. त्यात बहुतकरून केवळ साहेबी हट्ट असतो, दुसरं काही नाही. पण समजा एखादं 'नेक' कारण असेल तर ? ('नेक' कारणासाठी कॉर्पोरेटमध्ये झिजायला क्वचितच मिळत असावं, पण शासकीय नोकरीत, मनात असेल तर, अक्षरश: रोज अशी नेकी करता येईल, नाही?)
असाच एक दिवस उगवतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते (सचिन खेडेकर), पक्षांतर्गत बंडाळीवर मात करून, राज्यपालांच्या राजकारणावर कुरघोडी करून, आपली खुर्ची कायम ठेवण्यात यशस्वी होऊन दिल्लीहून परततात. अख्खा दिवस अभिनंदन, सत्कार, सदिच्छा भेटी ह्यात सरून जातो आणि संध्याकाळी एका महत्वाच्या व्यक्तीकडे, पत्नीसह (अश्विनी भावे), लग्नाच्या स्वागत समारंभास ते जातात. उपस्थित इतर प्रतिष्ठित व्यक्तींशी सोहळ्याचे यजमान मुख्यमंत्र्यांची ओळख करून देतात. त्यावेळी त्यांच्याकडून एका ज्येष्ठ अंध कलावंताचा अवमान घडतो. कर्तव्यदक्ष राज्यकर्ता असलेल्या विश्वासरावांच्या मनात अपराधी भावना येते. मन खाऊ लागते. आपल्या ह्या उन्मत्त वर्तणुकीचे प्रायश्चित्त करायलाच हवे, असं ते ठरवतात. पण काय करता येईल?
पं. गुंजकरांनी आठ वर्षांपूर्वी कलावंत म्हणून मुंबईत सदनिका मिळावी ह्यासाठी अर्ज केलेला असतो, असे समजते. बास्स.. सदनिकेची किल्ली पहाटेच्या सूर्याच्या किरणांसोबत गुंजकरांना मिळालीच पाहिजे, अश्या राजहट्टास मुख्यमत्री पेटतात आणि रात्री अकरापासून पहाटेपर्यंत मंत्रालय जागं राहातं. फायली उपसल्या जातात, कागदपत्रं बनवली जातात, आदेश काढले जातात.
गोष्ट छोटीशी, पण उत्कृष्ट सादरीकरण म्हणजे काय तर "आजचा दिवस माझा" !
आ ए एस ऑफिसर रहिमतपूरकर च्या भूमिकेत महेश मांजरेकर, मुख्यमत्र्यांच्या पत्नीच्या (छोट्याश्या) भूमिकेत अश्विनी भावे आणि खाजगी सचिव 'पी. डी. शिंदे'च्या भूमिकेत हृषीकेश जोशी अप्रतिम काम करतात. रहिमतपूरकर आणि विश्वासरावांमधली खडाजंगी रंगतदार झाली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांत सचिन खेडेकर हे नाव समाविष्ट होण्यास हरकत नसावी. अप्रतिम देहबोली, अचूक संवादफेक, संयत अभिनय आणि कॅमेरासमोर अगदी सहज वावर ह्या सगळ्यामुळे खेडेकरांचा मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते संस्मरणीय झाला आहे.
'रिमेक'साठी सिनेमा निवडतानाही, एखादा मुळातच भिक्कार दळभद्री सिनेमा निवडण्याची वैचारिक दिवाळखोरी, खिश्यात करोडो रुपये असतानाही दाखवणारा एक ओंगळवाणा सिनेमा दुसऱ्या पडद्यावर चालू असताना, मी एक सुंदर मराठी सिनेमा पाहात आहे, ही भावना सिनेमाभर मला मनातल्या मनात गुदगुल्या करत होती. ह्या उच्च वैचारिक गुदगुल्या अनुभवायच्या असतील, तर 'आजचा दिवस माझा' म्हणा आणि लावा लाईन तिकीटबारीवर !
रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/03/aajcha-divas-majha-movie-review.html
अप्रतिम चित्रपट. एकदा जरुर
अप्रतिम चित्रपट. एकदा जरुर पहावा.
बघेनच
बघेनच
तुकाराम सारखा दळभद्री चित्रपट
तुकाराम सारखा दळभद्री चित्रपट दिल्यावर जरा साशंक होतो चंद्रकांत कुलकर्णींसाठी.... पण फारच सुंदर अनुभव मिळाला...! "मस्ट वॉच कॅटेगरी" मधला कधीही नं चुकवावा असा....
आवडलं परिक्षण !
आवडलं परिक्षण !
'रिमेक'साठी सिनेमा
'रिमेक'साठी सिनेमा निवडतानाही, एखादा मुळातच भिक्कार दळभद्री सिनेमा निवडण्याची वैचारिक दिवाळखोरी, खिश्यात करोडो रुपये असतानाही दाखवणारा एक ओंगळवाणा सिनेमा दुसऱ्या पडद्यावर चालू असताना, मी एक सुंदर मराठी सिनेमा पाहात आहे, ही भावना सिनेमाभर मला मनातल्या मनात गुदगुल्या करत होती. ह्या उच्च वैचारिक गुदगुल्या अनुभवायच्या असतील, तर 'आजचा दिवस माझा' म्हणा आणि लावा लाईन तिकीटबारीवर !
प्रचंड सहमत ! मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिमेक'साठी सिनेमा निवडतानाही,
रिमेक'साठी सिनेमा निवडतानाही, एखादा मुळातच भिक्कार दळभद्री सिनेमा निवडण्याची वैचारिक दिवाळखोरी, खिश्यात करोडो रुपये असतानाही दाखवणारा एक ओंगळवाणा सिनेमा >>>>>>>>> +१
बघायला हवाच.
बघायला हवाच.
बघायला हवा. नेहमीप्रमाणेच
बघायला हवा. नेहमीप्रमाणेच उत्सुकता वाढवणारा रिव्ह्यू !
छान रिव्यू आहे. नक्कीच
छान रिव्यू आहे. नक्कीच पाहणार.
बघणार
बघणार
मी एक सुंदर मराठी सिनेमा
मी एक सुंदर मराठी सिनेमा पाहात आहे, ही भावना सिनेमाभर मला मनातल्या मनात गुदगुल्या करत होती.
अप्रतिम...
रिमेक'साठी सिनेमा निवडतानाही,
रिमेक'साठी सिनेमा निवडतानाही, एखादा मुळातच भिक्कार दळभद्री सिनेमा निवडण्याची वैचारिक दिवाळखोरी, खिश्यात करोडो रुपये असतानाही दाखवणारा एक ओंगळवाणा सिनेमा दुसऱ्या पडद्यावर चालू असताना, मी एक सुंदर मराठी सिनेमा पाहात आहे, ही भावना सिनेमाभर मला मनातल्या मनात गुदगुल्या करत होती.
कै च्या कै, अकारण तुलना...... पाल आणि घोरपड यांची तुलना केल्यागत आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भिक्कार, दळभद्री, वैचारिक
भिक्कार, दळभद्री, वैचारिक दिवाळखोरी -- विशेषणे सिनेमा आणी निर्माता ला ही लागू पडतील का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अपेक्षा वाढल्यावर एवढी
अपेक्षा वाढल्यावर एवढी जबरदस्त निराशा क्वचितच कोणत्या चित्रपटाने केली असेल. अर्थात निराशा म्हणणे चूक आहे कारण दोन तास आम्ही मनमुराद हसत होतो - समोर काय चालले आहे त्याला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याची एवढी तारीफ केलेल्या समीक्षकांनी व आम्ही एकच चित्रपट पाहिला का अशी आता शंका येते.
जेथे क्रेडिट देणे आवश्यक आहे ते द्यायचे म्हणून - सचिन खेडकर चे काम जबरदस्त झाले आहे, आश्विनी भावे ने जो मराठीचा ग्रामीण उच्चार वापरला आहे, तो जमून गेला आहे. ते महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले आहेत ते दाखवले का नाही ते आठवत नाही, त्यामुळे तो पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण उच्चार आहे की नाही ठाऊक नाही, पण जो आहे तो कन्सिस्टंट आहे. त्यामुळे तिचा रोलही छान. हृषिकेश जोशीचे गंभीर बेअरिंग - विशेषतः सुरूवातीला- जबरी जमले आहे.
महेश मांजरेकर चे काम चांगले झाले आहे पण रोल नीट लिहीलेला नाही. तसेच पुष्कर श्रोत्रीचे. ते अंध गायक दाखवलेत त्यांना फारसा वाव नाही.
बाकी जवळजवळ सगळे म्हणजे It's so bad, it's good कॅटेगरीतले वाटले, निदान ग्रूपमधे बघताना तरी.
नक्की कोणता चित्रपट दाखवायचा होता? राजकीय संघर्ष, पॅरोडी, विडंबन, फार्स, की सगळे एकत्र? पात्रे व प्रसंग समोर ठेवून कायिक, भाषिक, फार्सिकल, अंगविक्षेपवाले जे कोणते विषयाशी संबंधित-असंबद्ध विनोद सुचले ते सगळे कोंबायचा प्रयत्न केलेला आहे. दर मिनीटाला प्रेक्षकाला हसवले पाहिजेच अशी सक्ती असल्यासारखी पटकथा आहे.
त्यात प्रेक्षकांपैकी ज्यांना फक्त फालतू विनोदांमुळेच हसू येते त्यांना हसवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. . प्रसंगानुरूप विनोद एखादा जमला की तेथेच न थांबता मराठी फार्सिकल नाटकांत असतात तसे आरड्याओरड्याचे विनोद आणखी भरले आहेत. काही इतर (गंभीर) शॉटस ही जमून गेले आहेत, पण तेथे न थांबता, तो पूर्ण शॉट प्रेक्षकांना समजावून देण्याची गरज आहे अशा पद्धतीने पुढचे संवाद आहेत
थिएटर मधे बरेच लोक तुफान एन्जॉय करत होते, त्यामुळे हा चित्रपट अनेकांना आवडला हे उघड आहे, तो चालेलही (आणि जरूर चालावा, त्याबद्दल काही नाही). पण मला एक चांगले प्रॉमिस वाया घालवले असेच वाटले.
दुसरा आक्षेप हा: सचिन खेडकर, महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री. तीन चांगले अभिनेते व कथेत चांगला संघर्ष असण्याची पूर्ण सोय - राजकारणी व नोकरशाही यातील. नागरिकांच्या प्रश्नाकडे बघण्याची पूर्ण वेगळी दृष्टी व त्यामुळे दोघेही अगदी 'सिन्सियरपणे' एखादी गोष्ट करायला गेले तरी त्यातून निर्माण होणारी आव्हाने व राजकीय/प्रशासकीय गमतीजमती यापैकी काही दर्जेदार बघायला मिळेल अशा अपेक्षेने गेलो होतो. एखाद दुसरा शॉट वगळला तर तसे दिसले नाही. सचिन खेडकर हीरो म्हणून त्याची बाजू अनावश्यकरीत्या उचलून धरलेली आहे (मुख्यमंत्री) व महेश मांजरेकरची पूर्ण उभीच केलेली नाही (प्रधान सचिव).
अशा चित्रपटात विनोद असावा पण तो राजकीय पद्धती, लोकांचे स्वार्थ, गटबाजी, प्रशासकीय संथपणा, प्रोसेस बद्दल व स्वतःचे महत्त्व ठेवण्याबद्दल असलेला अट्टाहास या संदर्भात असावा. इथे ते तारतम्य पाळलेले दिसत नाही.
त्यात प्रत्येक पात्राला आपली कैफियत आपल्याला सांगणारा मोनोलॉग द्यायची काय गरज होती ते कळत नाही. बर्याच 'टडोपा मूमेंट्स' आणल्या आहेत.
कोणीतरी पहिल्यांदाच राजकीय कथेवर चित्रपट बनवलाय आणि त्यावर अवास्तव अपेक्षेतून टीका करतोय असे असते तरी ठीक आहे. पण सामना, सिंहासन, वजीर, सरकारनामा, घराबाहेर (सचिन खेडकर, सोनाली कुलकर्णीचा), झेंडा ई. चित्रपटांनी राजकीय संघर्ष खूप जबरदस्त पद्धतीने दाखवलेला आहे. त्यादृष्टीने हिन्दीलाही नाही एवढी समृद्ध पार्श्वभूमी मराठी चित्रपटाला आहे. त्यामुळे त्यांनी गाठलेल्या लेव्हलच्या पुढे नाहीतर निदान त्या लेव्हलला तरी हा असेल असे वाटले होते. त्यामुळे निराशा झाली.
हा चित्रपट इतरही बर्याच जणांनी पाहिलेला दिसतो. जरूर सांगा तुम्हाला असे काही जाणवले का.
कथेत चांगला संघर्ष असण्याची
कथेत चांगला संघर्ष असण्याची पूर्ण सोय - राजकारणी व नोकरशाही यातील >>>
ते अंध गायक दाखवलेत त्यांना फारसा वाव नाही. >>>
कथेत चांगला संघर्ष असण्याची पूर्ण सोय - राजकारणी व नोकरशाही यातील. >>>
नागरिकांच्या प्रश्नाकडे बघण्याची पूर्ण वेगळी दृष्टी >>>
अशा चित्रपटात विनोद असावा पण तो राजकीय पद्धती, लोकांचे स्वार्थ, गटबाजी, प्रशासकीय संथपणा, प्रोसेस बद्दल व स्वतःचे महत्त्व ठेवण्याबद्दल असलेला अट्टाहास या संदर्भात >>>
फारेंडा, भाबडेपण किंचित जास्त होतंय, असं वाटलं.
(शिवाय वर उद्धृत केलेल्यापैकी पहिलं आणि दुसरं वाक्य एकमेकांना छेद देतात असंही.)
सामना, सिंहासन, वजीर, सरकारनामा यांतली कॅरेक्टर्स आपण शोभिवंत कपाटांत, शोकेसमध्ये ठेवली आहेत. ती आता बाहेर काढायला हवीत. त्या पात्रांना पुढे किंवा मागे सोडणारी नाही, तर त्यांना वळसे घालून जाणारी पात्रं आता यायला हवीत.
हा राजकीय सिनेमा नाही. नोकरशाहीवर भाष्य करणाराही नाही. विनोदी नाही - असं माझं मत. हिरोला आणखी हिरो करणारा असेल बहुतेक, पण हातून झालेल्या एका चुकीचं परिमार्जन, तेही स्वतःच्या नजरेत स्वतःला 'उभं' करण्यासाठी- इतकंच या सिनेम्यात आहे. त्याला उगाच वजीर नि सामना चा सामना करायला लावू नये, असं वाटतं. त्या दृष्टीने बघून, मग परीक्षण करून, मग वाईट म्हणलं तर हरकत नाही.
सिनेमा चालेल, याबद्दल अनुमोदन. कारण सामान्य प्रेक्षकाचा विचार करून बनवलेला हा कमर्शियल सिनेमा आहे.
साजिर्या, माझी गोची फार
साजिर्या, माझी गोची फार अपेक्षा वाढवून गेल्याने झाली असावी. त्या एकूण फार्सिकल टच बद्दल तुझे काय मत?
सामान्य प्रेक्षकाबद्दल - चित्रपटाच्या तंत्राबद्दल तज्ञ/जाणकार रसिक व सामान्य प्रेक्षक यातील फरक समजू शकतो. पण सर्वसामान्य प्रेक्षकाला राजकारणातील खाचाखोचा समजतात, ज्या पटकन समजत नाहीत त्या समजून घ्यायला आवडतात. 'सिंहासन' हा एकदम 'वरचा' चित्रपट समजला जात असला तरी तो 'जन्ते'लाही तितकाच आवडला होता.
तसे काहीतरी न करता मधला बराच चित्रपट आपण 'गंपूचा टंपू' छाप नाटक पाहात आहोत असे वाटले मला.
शिवाय वर उद्धृत केलेल्यापैकी पहिलं आणि दुसरं वाक्य एकमेकांना छेद देतात असंही>> हे कोणत्या वाक्यांबद्दल? असू शकेल तसे पण मला लक्षात येत नाहीये. जरा संस्प दे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बघू....वेळ मिळाला कि नक्की
बघू....वेळ मिळाला कि नक्की पाहू.
हा सिनेमा राजकीय संघर्षावर
हा सिनेमा राजकीय संघर्षावर आधारित आहे, अशी अपेक्षा केली हे ठीक; पण सिनेमा पाहून झाल्यावरही त्यात राजकीय संघर्ष का नाही? हा प्रश्न का पडावा ? का असायला हवा होता राजकीय संघर्ष? प्लॉटमध्ये 'जागा' आहे म्हणून ? उगाच ?
साधी गोष्ट आहे. विश्वासराव पक्षांतर्गत विरोधकांच्या नाकावर टिच्चून दिल्ली जिंकून आला आहे. आणि त्याच दिवशी ही सारी कहाणी घडते. खूप मोठा विजय मिळवल्याचा अभिमान वाटत असताना, मनाला कुठे तरी एक बोच जाणवते आणि तोच अभिमान 'होत कसं नाही? मी नक्कीच करू शकतो.' अश्या हट्टास पेटतो आणि सर्वांना एका अर्थाने वेठीस धरतो.
@फारएण्ड,
मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही, पण प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणार्यांना असे 'साहेबी हट्ट' चांगलेच माहित असायला हवेत. काहीही कारण नसताना केवळ कुठलासा 'इगो' शांत करण्यासाठी उशीरापर्यंत किंवा रात्र रात्रभर मी काम केले आहे. ते करण्यामागे कुठलाच 'कॉर्पोरेट' संघर्ष किंवा डावपेच वगैरे नव्हता पण केलं होतं.
असो. तुम्हाला आवडला नाही, तुमचं मत आहे. मी आदर करतोच. पण सिनेमा हास्यास्पद वाटण्यासारखा नव्हता, असं मला वाटलं म्हणून हे लिहिलं.
धन्यवाद !!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनिलकपूरच्या नायक पेक्षा
अनिलकपूरच्या नायक पेक्षा वेगळं काही आहे का यात ? हा प्रश्न सारखा सारखा मनात येत होता वाचताना.
मुळात नायक पण कुठल्या तरी दाक्षिणात्य मूव्हीचा हिंदीतला रीमेक होता. ( निर्मात्यानेच बहुधा केलेला असेल).
बराच फरक आहे. तो पेट्रोल पंप
बराच फरक आहे. तो पेट्रोल पंप होता, हा तेलसाठा.
प्रंचssssssssssssssssssssssss
प्रंचssssssssssssssssssssssssssड आवडला !
सगळ्यांचच काम आवडलं ,पण सचिन खेडेकर रॉक्स !
चित्रपट आवडला पण फारएण्डने
चित्रपट आवडला पण फारएण्डने लिहिल्याप्रमाणे अजुन खुप चांगला करता आला असता. विशेषतः इतकी चांगली स्टारकास्ट आणि चंद्रकांत कुलकर्णीसारखे दिग्दर्शक असताना अजुन अपेक्षा होत्या.
बराच फरक आहे. तो पेट्रोल पंप
बराच फरक आहे. तो पेट्रोल पंप होता, हा तेलसाठा. >> +१११११११
मला खुप आवडला... खर तर राजकिय म्हटल्यावर २-४ खुप , ५-६ मारामार्या वगैरे ..... पण इथे मुख्यमंत्राची वेगळी भुमिका भाव खाउन गेली. चित्रपट सचिनचा होता आणि त्याने तो एकदम मस्तपैकी केला. {शब्द नाही भावना समजुन घ्या}.
मी तर सचिन खेडेकरचा चाहताच झालोय. अगदी काकस्पर्शपेक्षा मला सचिन यात अधिक चांगला वाटला. का माहीती नाही. पन बघायलाच हवा असा....
यातले दोन्ही गाणे एकदम झकास.
माझ्याकडुन *****
मस्त चित्रपट फार आवडला
मस्त चित्रपट फार आवडला
काल परवाच आपली मराठी वर
काल परवाच आपली मराठी वर पाहिला- कथानक वेगवान होतं यात शंकाच नाही आणि सगळ्यांनी कामंपण सहीच केलीयत!
पण हां- सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांच्यात काही संघर्ष वगैरे जाणवला नाही! मुख्यमंत्र्यांना हिरो दाखवायच्या प्रयत्नात त्या आय.ए.एस ऑफिसरचा व्हिलन का करायचा? आय मीन, तुम्हाला मुख्यमंत्री हिरो करायचा असेल तर ठीके पण म्हणून अगदी शेवटच्या सीनमध्येसुद्धा आय.ए.एस ऑफिसरच्या मुलीने त्याचा पाणउतारा केल्याचा सीन दाखवून काय साधलं गेलं?
बाकी सगळीच्या सगळी पात्रं, संवाद, उपकथानकं आवडली….पण परीक्षण वाचून खेडेकर विरुद्ध मांजरेकर असलं काहीतरी बघायला मिळेल वाटलेलं ते मात्र काही झालं नाही!
अवांतरः जरासा ढ प्रश्न. काल
अवांतरः जरासा ढ प्रश्न.
काल परवाच आपली मराठी वर पाहिला
आपली मराठी वर पाहिला तर निर्मात्याला किंवा ज्यांनी यासाठी गुंतवणूक केली त्यांना कसे पैसे मिळतात? तेथे ऑनलाईन तिकिट काढता येते काय?
हे कसे काय चालते? आपली मराठी हे निर्मात्यांचे चॅनल आहे का?
राजकारणापेक्षा सत्ताधारी
राजकारणापेक्षा सत्ताधारी (राजकारणी) आणि नोकरशहा यांच्यातला संघर्ष दाखवायचा होता. यशवंतराव चव्हाणांचं " राजकारण्याने नाही आणि नोकरशहाने होय म्हणायला शिकावे", रहिमतपूरकरांची -राजकारणी टेम्पररी तर आम्ही पर्मनन्ट ही दर्पोक्ती, आनंद इंगळेंचे पार्टी उकळतानाचे हे काम करायला मला पगार मिळतो अशा टाइपचे काहीतरी वाक्य,आजारी पडणारा स्टेनो, इ.इ.
पक्षांतर्गत राजकारणाची झलक एक साइड स्टोरी राज्यपाल आणि मुख्यमंत्री व्हायला टपलेल्या मंत्र्याच्या रूपात. बाकी विरोधी पक्ष कुठे दिसला नाही.
सचिन खेडेकरचे शुद्ध स्वच्छ नितळ उच्चार ऐकायला आवडले तरी ते शाळाकॉलेजात कायम पहहिला येणार्या अतिगुणी विद्यार्थ्याचे वाटले. सचिनचे अस्खलित शहरी उच्चार अश्विनी भावेच्या उच्चारांशी मॅच करत नव्हते. विरोधकांवर मात करून पद टिकवणार्या राजकारण्याचा थोडासा तरी बेरकीपणा, आवाजात हवा होता. विशेषतः दोन नव्या मंत्र्यांची बिनपाण्याने करताना. (अरुण सरनाईक आठवलेच).
त्या रात्रीत जे काम करायचं होतं ते करायला अगदी खूप आटापिटा पडला, घाम गाळला असं काही वाटलं नाही. अगदी चुटकीसरशी नाही, तरी बर्यापैकी सहजतेने काम पार पडलं.गायकाने आठ वर्षांपूर्वी दिलेल्या अर्जाचे काय झाले ते कळले नाही. रहिमतपूरकर एकटेच आडवे आले आणि त्यांना आडवं करायला फार त्रास पडला नाही. शेवटचं घराला रंग वगैरे जरा ताणल्यासारखं वाटलं.
घर अलॉट करणारं जे कोणतं खातं होतं ते मुख्यमंत्र्यांच्याच अख्त्यारीत होतं, तर त्या खात्याचा सचिव मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मर्जीतला निवडला असता. दोघांच्या संबंधात किमान इतका ३६चा आकडा नसता. सचिवाच्या पातळीचा माणूस मुख्यमंत्र्यांना योग्य तर्हेने गाइड करणारा असायला हवा होता. तेच हे खाते मुख्यमंत्र्याच्या विरोधी गोटातल्या मंत्र्याकडे असून तो मंत्री आडवा आला असे दाखवले असते तर कदाचित संघर्ष उत्कंठावर्धक वाटला असता.
मुख्यमंत्री-पीए यांच्यातले रिलेशन्स खूप छान दाखवलेत. पण या पीएशिवाय मुख्यमंत्र्यांला इकडची काडी तिकडेही करता येणार नाही असे दोघांचे चित्रण झाले.
शेवटच्या दृश्यात मुख्यमंत्री झोपडपट्टीचे निरीक्षण करताना बरोबर बॉडिगार्ड्स होते का? तसेच शेवटच्या पाठमोर्या दृश्यात मुख्यमंत्री खर्या झोपडपट्टीसमोर नव्हे तर झोपडपट्टीच्या चित्रासमोर उभे होते.
मला जेवढं माहितीय त्यावरुन
मला जेवढं माहितीय त्यावरुन सांगतोय- साधारण कुठलाही सिनेमा एकदा टीव्हीवर दाखवला, किंवा कुणी तूनळीवर टाकला की त्याची लिंक 'आपली मराठी'वर येते!
निर्मात्यांना पैसे मिळतात का त्याची कल्पना नाही पण 'आपली मराठी' साईट चालवायला मदत करा म्हणून जरूर सांगतं. अलीकडे गाजलेला, बहुचर्चित नवा सिनेमा 'आपली मराठी'वर आला की अशा देणग्या दिलेल्या लोकांना तो लगेच बघता येतो! इतरांना एक-दोन दिवस वाट बघावी लागते!
नुकताच स्टार प्लस वर
नुकताच स्टार प्लस वर पाहिल्ला... साधा सरळ मेसेज... जर ईच्छा शक्ती असेल तर कोणतही काम होउ शकत... त्यासाठी संपुर्ण सिस्टीमही हलवता येते....
फक्त ईच्छा ही मनापसुन अगदी खोचुन बोच लागुन पाहीजे....
रहिमतपूरकर आणि
रहिमतपूरकर आणि मुख्यमंत्र्यांचा संघर्ष अनावश्यक वाटला आणी शेवटचा तो म. मां. आणी त्याच्या मुलीचा सीन पण गरज नसलेला वाटला.
सचिनचे अस्खलित शहरी उच्चार अश्विनी भावेच्या उच्चारांशी मॅच करत नव्हते>> +१
पण तरिही सिनेमा फारच आवडला. एकदम फील गुड सिनेमा.
Pages