अनुभव हि पण एक अजब चीज आहे.आपण जेव्हा तो अनुभवत असतो तेव्हा मनात "कुठून तडमडायला इथे आलो" असं क्षणभर वाटून जातं. पण भविष्यात त्याच अनुभवाकडे वळून पाहताना "आपण किती भाग्यवान आहोत की हे आपल्याला अनुभवायला मिळालं" असंही वाटून जातं. आमच्या कोकण बाईक एक्सस्पिडीशनची स्टोरी पण अशीच असंख्य भन्नाट अनुभवांनी सजलेली…काही अनपेक्षित पण अविस्मरणीय घटनांनी नटलेली आणि अशाच काही सुखद आठवणींनी बहरलेली….
दिनांक १२ फेब्रुवारी… ऑर्कुट नावाचं फेसबुकचं सध्या नामशेष झालेलं सावत्र भावंड त्यावेळी लई फॉर्मात होतं. असंच दुपारी सर्फिंग करत असताना अचानक "विनय बिरारी" या नावाच्या माणसाने मला "Hi" टाकलं आणि मी प्रचंड खुश झालो. विनय आणि मी पहिली ते चौथी पर्यंतचे जिगरी दोस्त. एकमेकांच्या घरी रोजचं येणं जाणं. पण चौथी नंतर शाळा बदलल्याने मार्ग वेगळे झाले आणि पर्यायाने संपर्कही संपुष्टात आला. पण ऑर्कुटने विनयला अस्मादिकांना शोधून देण्यात मोलाची मदत केली आणि आम्ही पुन्हा एकदा संपर्कात आलो. पहिल्या पाच सेकंदातच त्याचा नंबर घेतला आणि त्याला फोन लावला. काही फॉर्मल गप्पा झाल्यावर अर्थातच ट्रेकचा विषय निघाला आणि फोन बंद व्हायच्या आत ट्रेक ठरला सुद्धा !!!! तुम्हाला खरं सांगू का… म्हणजे अगदी तुमच्या मनातलं… नीट चर्चा करून… आधी फिल्डिंग लावून केलेल्या ट्रेकपेक्षा हे अचानक ठरलेले आणि तितक्याच अचानकपणे "एक्झिक्युट" झालेले ट्रेकच जास्त लक्षात राहतात !!! ते होतात पण तितकेच भन्नाट !!! विनयने फोनवरच "तुला जो ट्रेक ठरवायचाय तो ठरव… मला मधे घेऊ नकोस… मी फक्त बाईकवर बसायचं काम करणार आहे" असा गांधीवादी पावित्रा घेतल्याने मी त्याच क्षणी निर्णय घेतला….मंडणगड - पालगड - रसाळगड - गोविंदगड - दातेगड आणि गुणवंतगड… !!! कोकणातले चार आणि देशावरचे दोन असे सहा निखालस देखणे दुर्ग...!! कोकण बाईक एक्सपीडीशन म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर निळाशार समुद्र तरळायला लागतो. मखमली वाळूचे पांढरेशुभ्र किनारे दिसू लागतात. त्या थंडगार सागरी वा-याबरोबर मुक्त विहार करणारे समुद्री पक्षी दिसतात आणि याच समुद्राच्या काठाने अनेक सुंदर वळणं घेत गेलेला काळाकुळकुळीत घाटरस्ता दिसतो. पण ही झाली नेहमीची बाईक सफारी. आमची भेट होणार होती कोकणातल्या सर्वांगसुंदर गिरिदुर्गांशी !!! विनयने तर यातल्या एकाही किल्ल्याचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं !!! आम्ही दिवस निवडला होता…१४ फेब्रुवारी… ' व्हॅलेंटाइन्स डे' !!!! ज्या दिवशी संपूर्ण जग आपला दिवस गुलाबाच्या फुलांची खरेदी करण्यात घालवतं त्याच दिवशी आम्ही सह्याद्रीतल्या रानफुलांना आपलसं करायला निघालो होतो.आपल्याला मिठीत शिरणारं कोणीतरी हवं या विचारात वणवण भटकणा-या "कॉमन" लोकांना सोडून आम्ही त्या सह्यकड्यांच्या कुशीत विसावणार होतो !!!! आपलं पहिलं प्रेम…अर्थात आपला सह्याद्री….त्याच्याविषयीचं आपलं निस्सीम प्रेम व्यक्त करायला ह्याच्यापेक्षा योग्य दिवस तरी कोणता सापडला असता !!!! आमचा प्रवास बराच लांबचा असल्याने शनिवारी पहाटे ४ वाजताच निघायचं ठरलं होतं. आम्ही अस्मादिकांच्या तीर्थरूपांची CT १०० ही मायलेज आणि दूरच्या प्रवासाला उत्कृष्ट असलेली बाईक घेऊन जाणार होतो. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं !!!
शुक्रवारी विनयला बस स्टॉप वर आणायला मी निघालो आणि घरापासून पाच फुट गेल्यावर अचानक बाईकचं मागचं चाक पूर्ण पंक्चरावस्थेत जाऊन स्थानापन्न झालं !!!! तातडीने मी तिच्यावर उपचार करायला तिला पंक्चराधिपतीकडे घेऊन गेलो आणि त्या महानुभावानेही त्याच्या धंद्याच्या पॉलीसीशी इमान राखत आणि माझ्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेत "सायेब टयूब फाटलीये… बदलावी लागल नायतर सरकारी हापिसासारख्या रोज माझ्याकडे चकरा माराव्या लागतील" असं धमकीवजा उत्तर दिल्याने मीही त्याच्यासमोर नांगी टाकली !!! १४ फेब्रुवारी उजाडला. आज काहीही झालं तरी ९.३० पर्यंत मंडणगड गाठायचाच होता. घरच्यांचा निरोप घेऊन आणि आमच्या कालच ब-या झालेल्या द्विपादरथाला "प्रवास सुखाचा होउदे" असं मनोमन साकडं घालत आम्ही घर सोडलं. पहिली २० मिनिटं अगदी सुखात गेली आणि अचानक काहीतरी विचित्र जाणवल्याने मी रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली !!!! आपल्या गाडीचा मागचा टायर लवकरच आपली साथ सोडणार आहे हे क्षणार्धात माझ्या लक्षात आलं आणि जर का हिला या स्थितीत आपल्याबरोबर असंच ओढत नेलं तर दोन दिवस हिचा फुकटचा सासुरवास सहन करावा लागेल हे मी ओळखलं. त्या सुनसान रस्त्यावर चिटपाखरुही नव्हतं.काय करावं तेच कळेना.विनयने माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं आणि पुन्हा आमचा मोर्चा घराकडे वळाला !!! आता आमच्यापुढे शेवटचा पर्याय उरला होता….
गेल्या दिवाळीत आमच्या घराचं माप माझ्या को-या करकरीत स्प्लेंडर प्लसने अगदी धुमधडाक्यात ओलांडलं होतं !!! तिला फिरायला घेऊन जायची वेळ आता येउन ठेपली होती.मनाशी पक्का निश्चय करून मी स्प्लेंडरला किक मारली आणि ताम्हिणीच्या दिशेने तिचे लगाम सोडले. फेब्रुवारी महिन्यातला पहाटेचा थंडगार वारा अंगावर अक्षरश: काटा आणत होता. शहराला थोडी जाग यायला सुरुवात झाली असल्याने रस्त्यावर वाहनं दिसू लागली होती.साधारणपणे चांदणी चौकापर्यंत जाईस्तोवर (म्हणजे घरापासून अंदाजे ४ किलोमीटर्सवर) सगळं सुरळीत सुरु होतं. आता अगदी घरी परत येईपर्यंत कसलाही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटत असतानाच माझं लक्ष पेट्रोलच्या काट्याकडे गेलं आणि खरच आपण एका झपाटलेल्या मुहूर्तावर निघालो आहोत आणि "अब भगवान तो क्या तुम्हे रजनीकांत भी नही बचा सकता" हे वाक्य एखादं कर्णपिशाच्च सारखं माझ्या कानात येउन सांगून जात आहे असा भास मला त्याच क्षणी व्हायला लागला !!!! आमच्या या रथात आम्ही जेमतेम पौडला पोचू एवढंच पेट्रोल शिल्लक होतं !!!! ट्रेकच्या सुरुवातीला बसलेला दुसरा मोठा धक्का !!! अक्षरश: हादरवून सोडणारा. पहिल्या प्लॅननुसार CT १०० घेऊन जाणार असल्याने आम्ही त्या गाडीची टाकी फुल केली होती आणि त्यामुळे ट्रेकसाठी स्प्लेंडरमध्ये पेट्रोल भरण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता !!! त्यात पिरंगुट वगैरे गावांचे पेट्रोलपंप सात - साडेसातला उघडत असल्याने हे मधले दोन तास वाया घालवले तर आमचं पुढचं सगळं वेळापत्रक कोलमडणार होतं !!! आता मात्र माझा संयम सुटायला लागला होता.अत्यंत वरमलेल्या स्वरात मी विनयला सगळी परिस्थिती सांगितली. पण त्याने अत्यंत शांतपणे "जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ…पुढचं पुढे बघता येईल " असं सांगितल्याने माझा जीव पेट्रोलच्या टाकीत पडला !!!! बिचा-याचा माझ्याबरोबर पहिलाच ट्रेक आणि सुरुवातीलाच काळाने चक्र फिरवलेली !!!! पण आमचं नशीब इतकंही **** नव्हतं !!!! माझ्या अपेक्षेच्या कितीतरी पट चांगली साथ माझ्या बाईकने (नवीन असल्याने) आम्हाला दिली आणि आम्ही मुळशीत येउन दाखल झालो. साडेसहा वाजले होते. गाव एव्हाना जागं झालं होतं. आता आमच्या पेट्रोलच्या काट्याने असहकाराचा नारा द्यायला सुरुवात केल्याने मुळशीच्या एस.टी. थांब्याच्या टपरीजवळ गाडी उभी करून आम्ही एका दगडावर मान खाली घालून बसून राहिलो.दोघंही पूर्णपणे ब्लॅंक झालो होतो. मनात नैराश्य,उद्विग्नता,चिडचिड,काळजी यांचं काहूर माजलं होतं. ट्रेकची सुरुवातच जर इतकी निगेटिव्ह झालीये तर पुढे काय वाढून ठेवलं असेल,पुन्हा आयुष्यात ट्रेकचं नावही काढणार नाही असं मत तयार व्हायला भाग पाडणारा कोणता दुर्धर प्रसंग तर नाही ना ओढवणार अशा अनेक विचारांनी मनात वादळ निर्माण केलं होतं.इतक्यात त्या टपरीवर एस.टी ची वाट बघत उभ्या असलेल्या सत्तरीच्या एका म्हतारबुवांचं लक्ष आमच्याकडे गेलं. नक्कीच काहीतरी गंडलय हे त्यांच्या लक्षात आलं असावं . "काय रे प्वोरांनो… कुटून आलात अन चाललात कुटं… काय झालंय??? " सकाळच्या बोच-या थंडीत ते ओलाव्याने भरलेले शब्द ऐकताच आम्हालाही हुरूप आला आणि मी त्यांना घडलेलं सगळं रामायण सांगितलं. "आयला…येवढच ना… येक काम करा. त्या समोरच्या घरामंदी एक जण राहतात. त्यांच्या घरी पेट्रोल असतं.मी पाठवलंय म्हणून सांगा त्यांना.आरामात मिळंल" इति आजोबा. त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानावेत हेच मला कळेना !!! शेवटी त्यांच्या पाया पडून आणि "सांभाळून जा रे बाबांनो" ही त्यांची प्रेमळ सूचना मनात साठवून मी त्यांनी सांगितलेलं घर गाठलं . सकाळी शाळेत निघालेल्या त्या सद् गृहस्थांच्या पोराने "गाडीत पेट्रोल भरायची अक्कल नाही आन चालले कोकनात तडमडायला" असा चेहरा करत आमच्या स्प्लेंडरची टाकी फुल्ल केली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. कोणत्याही बाईक एक्सपीडीशनवर येणारी सगळी संभाव्य संकटं टळली होती. आमच्या दिवसाची (आणि व्हॅलेंटाइन डेची सुद्धा !!!!) एक अनपेक्षित सुरुवात झाली होती. आमचा पुढचा मार्ग आता सुकर झाला होता !!!
ताम्हिणी घाट
प्लस व्हॅली… ताम्हिणी घाट
एका नाट्यमय प्रवासाचे दोन साक्षीदार…
ताम्हिणी घाट… एक झलक…
रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ मंडणगड हे तालुक्याचं गाव !!! किंबहुना किल्ल्याच्या नावावरूनच तालुक्याचं बारसं झालेलं. तालुक्याचं गाव असल्याने सगळ्या मुलभूत सोयीसुविधा असलेलं आणि प्रचंड प्रमाणात गजबजलेलं.गावाच्या मागेच मंडणगडाचा टेकडीवजा किल्ला उभा आहे. मंडणगड गावाच्या बस स्थानकापासून सरळ जाणारा कच्चा रस्ता (आम्ही गेलो होतो तेव्हा कच्चा होता… आता बहुदा डांबरी झाला असावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही ) सरळ गडमाथ्यावर जाऊन थांबतो. मंडणगडाचा विस्तार ब-यापैकी मोठा असून किल्ल्यावर गणपतीचं नुतनीकरण झालेलं एक मंदिर,एक मोठा तलाव,एक विहीर,एक ब-यापैकी मोठी आणि (शेंदरी रंगात भिजवलेली !!!!) तोफ, एक अलीकडे बांधलेली शाळेची छोटी इमारत,एक कोरडा तलाव,काही कोरीव नक्षीदार दगड,काही उध्वस्त जोती,सदरेचे अवशेष,कुलुपाच्या आकाराचे काही दगडी गोळे,एक पीर आणि तुरळक तटबंदी आहे. संपूर्ण किल्ला व्यवस्थित भटकायला एक दीड तास सहज लागतो. किल्ल्याच्या पूर्व कड्यावरही उध्वस्त तटबंदी आणि काही कोरीव दगड अस्ताव्यस्त विखुरलेले असून आपण गावातून किल्ल्याच्या कच्च्या रस्त्याचा चढ चढून येताना उजवीकडे वर काही सिमेंटच्या पाय-या गेलेल्या दिसतात.त्या पाय-यांनी वर गेल्यावर या भागात पोचता येतं. ताम्हिणीतून निघाल्यापासून सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करूनही आम्ही मंडणगडावर अगदी वेळेत पोचलो होतो. सुमारे तासभर किल्ला डोळ्याखालून घातल्यावर पुन्हा त्या कच्च्या रस्त्याची धूळ (स्वत:च्याच अंगावर !!!) उडवत आम्ही मंडणगड गावात पोचलो आणि खेडच्या दिशेला गाडी दामटली. पुढचं लक्ष्य होता पालगड !!!!
किल्ले मंडणगड… पूर्व कड्यावरुन
किल्ल्यावरचं गणपती मंदिर
किल्ल्यावरचं पडकं जोतं… मागे किल्ल्याचा पूर्व कडा
किल्ल्यावर असलेली मोठी तोफ
किल्ल्यावरील सदरेचं जोतं
कुलुपाच्या आकाराचे दगड
किल्ल्याच्या पूर्वकड्यावरची तटबंदी
मंडणगडावरील नक्षीदार दगड
किल्ले मंडणगड… मधल्या पठारावर डाव्या कोप-यात गाडीचा कच्चा रस्ता दिसतोय
किल्ल्याच्या पूर्वकडयावर घेऊन जाणा-या सिमेंटच्या पाय-या
मंडणगड गावातली जनता… यातल्या सर्वात पुढे उभ्या असलेल्याने "तू मोठेपणी कोण होणार?" यावर "राज ठाकरे" असं उत्तर दिलं होतं !!!!!
मंडणगड गावातून आपण खेडच्या दिशेने जाऊ लागलो की सुमारे १५ किलोमीटर्सवर पालगड गाव आहे. मंडणगडापासून जवळ असूनही पालगड मात्र दापोली तालुक्यात मोडतो. साने गुरुजींचं मूळ गाव असलेलं हे पालगड अजूनही गुरुजींच्या विचाराने भारावलेलं आहे !!!! गावात साने गुरुजींचं स्मारक असून त्यांच्या घराचं नुतनीकरण करून स्मारक तयार करण्यात आलं आहे. आतमध्ये साने गुरुजींच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांचे फोटो लावलेले आहेत.आम्ही आता किल्ल्याच्या मुख्य रस्त्याला लागलो होतो.रामराणा जन्मला ती टळटळीत दुपारची वेळ !!!! पालगडाचा आकार मात्र काही केल्या लक्षात येईना. रस्त्यावर तशी फार वर्दळ नव्हती. एखाद दुसरी एस.टी किंवा टेम्पो आम्हाला मागं टाकून जात होते. एक दोन बाईकवाल्यांना पालगड किल्ल्याचा रस्ता विचारल्यावर "हये गाव हाये पालगड नावाचं. किल्ला कुटून काढलात तुमी " असली उत्तरं ऐकायला मिळत होती !!! कोणी किल्ल्याचा नीट पत्ता सांगायला तयार नाही. शेवटी कंटाळून आम्ही धामणी गावापर्यंत आलो आणि रस्त्याच्या एका बाजूला सावलीत गाडी उभी केली. तेवढयात आमच्यामागून एक रिक्षावाला अवतरला. पंचावन्नच्या आसपास वय असावं !!! "इकडे पालगड किल्ला कोणाला कळणार नाही. डोंगरावरची कदमवाडी विचारा… कोणीही सांगेल". अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात फक्त हेच काका शाळेत गेले असावेत असं मला क्षणभर वाटून गेलं !!! आपल्याला स्थानिक नावं माहित नसण्याची आणि स्थानिकांना आपली पुस्तकी नावं माहित नसण्याची वेळ नेमकी एकच असते. धामणी गावाच्या पुढे डावीकडे एक गंजलेली पाटी आहे. तिच्या शेजारून जाणारा चढाचा अरुंद रस्ता आपल्याला अर्ध्या पाउण तासात थेट पालगड गावात घेऊन जातो. पालगड गावाचं आणि पालगड किल्ल्याचं लोकेशन नितांत सुंदर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला एक अतिशय लोभसवाणा आणि छोटेखानी किल्ला. पालगड गावाच्या कदमवाडी उर्फ घेरा पालगड गावात मारूतीचं मुक्कामासाठी उत्कृष्ट असं प्रशस्त मंदिर आहे. गावाच्या मागेच पालगडाचा स्वत:च्या कातळकडयावर तटबंदीचा शिरपेच धारण केलेला छोटा डोंगर दिसतो. पालगड गावातून १० मिनिटात छोटी चढण चढून आपण एका पठारावर येतो. इथे एका झाडाखाली काही मूर्ती ठेवल्या आहेत. इथून पालगडाचा भग्न दरवाजा व तिथपर्यंत नेणा-या भक्कम पाय-या स्पष्ट दिसतात. त्या पाय-या चढून गेलो की आपला किल्ल्यात प्रवेश होतो. पालगडाचा आकार अतिशय छोटा असून किल्ल्यावर काही जोती,त्यातल्या एका जोत्यावर ठेवलेली एक तोफ,अर्धवट पडलेली तटबंदी,जमिनीत अर्धी गाडलेली एक तोफ व मगाशी आपण आलो तो भग्न महादरवाजा इतकेच अवशेष आहेत. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची मात्र अजिबात सोय नाही. तसेच निदान पाण्याची खोदीव कोरडी टाकीही कुठे दिसत नाहीत. वरून दिसणारं दृश्य मात्र अप्रतिम आहे !!! पूर्वेकडे महिपत,सुमार व रसाळगड,दक्षिणेकडे खेड शहर,खाली दिसणारे छोटेसे पण अतिशय सुंदर घेरा पालगड गाव आणि मंडणगडाची बाजू…. सुख !!!! पावसाळ्यात तर इथला माहोल काय असेल याच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहतात !!!! किल्ल्यावर बघण्यासारखे फार काही विशेष नसले तरी हा नजारा तृप्त करतो आणि पालगड किल्ला कायमचा लक्षात रहातो !!!! पालगडाने एक सुंदर अनुभव दिला होता. त्याच्या माथ्यावरून आमचे लक्ष सहज वेधलेल्या आमच्या पुढच्या लक्ष्याचे नाव होते रसाळगड !!!!
धामणीतून दिसणारा पालगड
घेरा पालगड गावाकडे जाणारा अरुंद रस्ता…
पालगड गावातून दिसणारा पालगड किल्ला
पालगडाचा भग्न दरवाजा व पाय-या… पहिल्या पठारावरून
जोत्यावर ठेवलेली तोफ… किल्ले पालगड
पालगडावरची भग्न तटबंदी व जोती… मागे क्षितिजावर धुरकट दिसणारे महिपत व सुमारगड
पालगडाचा बुरुज
भग्न तटबंदी… पालगड
अर्धवट गाडलेली तोफ… पालगड
कमान हरवलेला दरवाजा… पालगड
पालगडाच्या माथ्यावरून दिसणारे छोटेसे घेरा पालगड गाव
धामणी - घेरा पालगड रस्त्यावरून दिसणारा पालगड
आम्ही पालगड सोडला तेव्हा दुपारचे अडीच वाजत आले होते. पोटातल्या भुकेच्या डोंबाने बोंबा मारायला सुरुवात केली होती. घेरा पालगड गावात जेवण बनवून देणार का असं विचारल्यावर "आत्ताच आमचं जेवण झालंय. तुम्हाला ताजं बनवून देते. तासभर थांबा" असं उत्तर आलं आणि समोर रसाळगडाचा चेहेरा दिसल्याने आम्ही तो नाद सोडला. त्या मातेला पुन्हा त्रास देणंही संयुक्तिक नव्हतं.खेडच्या दिशेने एकतरी ढाबा मिळेल आणि आपला "भूकंप" आटोक्यात येईल या आमच्या विचारालाच त्या रस्त्याने सुरुंग लावला. खेडला पोहोचेपर्यंत एक धाबा सोडा साधी चहाची टपरीही उघडी दिसली नाही (ही त्यावेळची परिस्थिती आहे. सध्या नवीन हॉटेल्स झाल्याचं माहित असल्यास ही माहिती अपडेट करता येईल ). आमच्याकडचा बिस्किटांचा पुडा सकाळी नाष्ट्यालाच संपल्याने आता तोही पर्याय उरला नव्हता. भर दुपारच्या तळपत्या उन्हाने गाडीचं सीट १०० डिग्री सेल्सियसमध्ये भाजून काढल्यासारखं गरम केलं होतं (आणि त्याचे "दुष्परिणाम" आम्ही दोघांनीही भोगले !!!). त्यात मला "सकाळी त्या संत व्हॅलेंटाइनला एखादा नारळ फोडून निघालो असतो तर निदान वडापाव तरी मिळाला असता" असं सारखं राहून राहून वाटत होतं !!!! जसं जसं आपण पुढं जाऊ तसं तसं खेडचे माईलस्टोन्स त्या शहराचं अंतर वाढवतच नेत चाललेत असाच भास व्हायला लागला होता. शेवटी दोघंही पोटातल्या खड्ड्यासकट एकदाचे खेडमधे पोचलो आणि रसाळगडाचा रस्ता विचारण्यासाठी एका पानाच्या टपरीसमोर गाडी थांबवली. मी त्या पानवाल्याशी काहीतरी बोलणार तेवढयात विनयने मधेच तोंड घालून "इथे जेवायला कुठे मिळेल" असं विचारलं.त्याने हे शब्द उच्चारताच त्या मध्यमवयीन मालकाने आधी दुकानातल्या घड्याळाकडे आणि नंतर आमच्या दोघांकडे अशा काही जालीम नजरेनं पाहिलं की त्याच्या चेहे-यावर "काय बेशिस्त कार्टी आहेत…" हा अतितुच्छतादर्शक भाव अगदी स्पष्ट झळकला !!!!
"वाजले किती ???"….हॉस्टेल वर राहणा-या सुंदर तरुणीने रात्री बारा वाजता हळूच मेन गेट उघडून चोरपावलाने आत शिरण्याचा प्रयत्न करावा आणि मागून रेक्टरने अचानक मानगूट पकडल्यावर तो ज्या आवाजात त्या तरुणीला हा प्रश्न विचारेल अगदी तशाच बेरकी आवाजात ह्या अस्सल कोकणी माणसाने आमच्याकडे रोखून बघत आम्हाला विचारलं !!!!
"म्हणजे ???" विनय !!!!!
"दुपारचे तीन वाजून गेले अन तुम्ही विचारताय जेवायला मिळेल का"……. तेवढयात त्याचं लक्ष आमच्या बाईकच्या "MH १२" कडे गेलं आणि "तरीच !!!!!" हे आम्हाला मुद्दाम स्पष्ट ऐकू जाईल अशा आवाजात त्याने उच्चारलं !!!!
"पाव्हणे दिसताय… सगळं बंद झालं आता… आता थेट रात्रीचं जेवण !!!" पानाला चुना लावत तो म्हणाला.
"वडापाव पण नाही मिळणार का कुठे ???" विनयच्या या "निर्लज्ज" प्रश्नावर त्याने " आता निघताय का तुम्हालाही अडकित्त्यात सोलून काढू !!!" असला जहाल लुक आम्हाला दिल्यावर मी विनयचं तोंड आणि पुढचा वाद दोन्ही आवरतं घेतलं आणि दुस-याच एकाला रसाळगडाची वाट विचारून गाडीची चाकं त्या दिशेने सोडली !!!!
" **** साला… काय चुकीचं विचारलं होतं मी" विनयेश्वर उवाच !!!!
मी काहीही बोललो नाही !!!! आधीच ट्रेकची सुरुवात अशी झालेली…पोटात अन्नाचा कण नाही आणि त्यात त्या पानवाल्याने अजूनच डोकं फिरवलं होतं !!!! शेवटी एका दुकानातून पार्लेजीचे तीन पुडे,पेप्सीची एक बाटली आणि शाळेचा विषय चालल्याने तो माहोल क्रिएट व्हावा म्हणून बॉबीची चार पाकीटं अशा "बिलो पॉवर्टी" भांडवलावर समाधान मानून आम्ही तासाभरात तळे - झापाडी - निमणी मार्गे रसाळगड गाठला !!!! रसाळगडाच्या सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत डांबरी रस्ता काढण्यात आला असून किल्ल्याच्या कड्याजवळ गाडी लावता येते. ह्या संपूर्ण वाटेवर डावीकडे महिपत आणि सुमारगड तसेच त्यांना जोडणा-या सह्याद्रीच्या कराल रंगाचं जे काही अपूर्व दर्शन होतं त्याला तोडच नाही !!!!! शब्दातीत करून टाकणारं ते दृश्य किती वेळ बघत रहावं याचं खरच भान राहत नाही !!! व्वा !!!! आपण जिथे गाडी लावतो तिथून किल्ला उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत एका अरुंद पायवाटेने रसाळगडावरच्या रसाळवाडी उर्फ घेरा रसाळगड उर्फ पेठ रसाळ या गावासाठी बसवलेल्या पाण्याच्या टाकीपाशी सुमारे वीस मिनिटात येतो.या टाकीपासून किल्ल्याकडे नजर टाकली की किल्ल्याचा भक्कम दरवाजा दृष्टीपथात येतो. टाकीपासून बांधीव पाय-यांच्या मार्गाने आपण वीस मिनिटात गडाचे तीन दरवाजे पार करून माथ्यावर दाखल होतो. पहिल्या व दुस-या दरवाजाच्या मधल्या वाटेवर मिशा असलेल्या आणि कमरेला खंजीर लावलेल्या मारुतीची मूर्ती आहे. माथ्यावर पोचल्यावर रसाळगडाचा प्रचंड विस्तार आपल्या दृष्टीपथात येतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मोजक्याच श्रीमंत गिरीदुर्गांपैकी रसाळगडाचा क्रमांक सर्वात वरचा असावा.रसाळगडाच्या अवशेषांवर तर एक पूर्ण लेख लिहिता येईल इतके अवशेष या देखण्या किल्ल्यावर आहेत. रसाळगडाच्या मुख्य पठारावर झोलाई देवीचे नव्यानेच जीर्णोद्धार केलेलं मंदिर (मुक्कामासाठी अप्रतिम),त्याच्या समोर एक दीपमाळ,काही जोती,एक मोठं कोठार,वाड्याचे अवशेष,गणपतीचं एक छोटं मंदिर,काही समाध्या,एक गुहेतील खांबटाकं,सदरेचे अवशेष,एक शिवलिंग व नंदी आणि खणखणीत अवस्थेतल्या तब्बल अठरा तोफा ह्या सुंदर किल्ल्यावर आहेत. एवढ्या तोफांचा एकमेव धनी असलेला हा रत्नागिरी जिल्ह्यातला बहुतेक एकमेव किल्ला असावा !!! रसाळगडावर फिरताना घड्याळाचे पुढे सरकत असलेले काटे खरोखरंच आमचा मानसिक छळ करत होते. मुक्कामासाठी एक सर्वांगसुंदर ठिकाण आणि तितकाच भरपूर अवशेषांनी संपन्न असलेला एक लाजवाब गिरिदुर्ग असं रसाळगडाचं सहजसोपं वर्णन करता येईल. किल्ल्याच्या माथ्यावरून पालगड,मकरंदगड,महाबळेश्वरच्या दिशेच्या आभाळस्पर्शी सह्यरांगा आणि शेजारचे जीवाभावाचे सोबती असणारे सुमारगड आणि महिपतगड… वर्णनाला शब्दच थिटे पडावेत. महिपत आणि सुमारगडाची डोंगरयात्रा व्यवस्थित पार पाडायला तीन चार दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. तसंच रसाळवरून महिपत - सुमारच्या वाटेला जाताना अंगावरचा जीवघेणा चढ असून एका लिमिट नंतर रणरणत्या उन्हात हा चढ नकोसा होतो. त्यामुळे खेडहून तळे मार्गे दहिवली किंवा वाडी जैतापूर या महिपतच्या पायथ्याच्या गावाला येउन तिथून महिपत चढून त्या दिवशी गडावर मुक्काम करावा. दुस-या दिवशी सकाळी लवकर महिपतवरून निघून आणि वाटेतला सुमारगड पाहून रसाळवर मुक्कामाला यावं. सुमारगड मात्र कठीण श्रेणीतला किल्ला असून सुरक्षिततेच्या सर्व साधनांशिवाय तो चढण्याचा प्रयत्न करू नये. रसाळगडाच्याच्या रसाळवाडीत जेवणाची माफक दरात अप्रतिम सोय होते. तसेच महिपतगडावरून रसाळगडाला येताना वाट सोपी आणि उताराची असल्याने अनावश्यक दमछाकही टाळता येते.
मंत्रमुग्ध होऊन आम्ही रसाळगड उतरायला सुरुवात केली. आमच्या बाईक एक्सपीडीशनमधला आजच्या दिवसातला शेवटचा आणि आजच्या दिवसातला सगळ्यात अप्रतिम,देखणा आणि तितकाच अविस्मरणीय किल्ला बघितल्याचं समाधान दोघांच्याही चेहे-यावर झळकत होतं !!!! आता आजचं शेवटचं ठिकाण होतं चिपळूणच्या गोविंदगडाच्या पायथ्याचं गोवळकोट गाव… आमचा रात्रीचा मुक्काम तिथेच असणार होता…आणि त्याच वेळेला तिथे एक मोठ्ठं सरप्राईज आमची वाट पाहत होतं… !!!!
निमणी - रसाळगड रस्त्यावरून दिसणारा महिपतगड (फोटोच्या मधला आडवा) आणि सुमारगड (उजवीकडून दुसरा)
महादरवाजा…. रसाळगड
पहिल्या दरवाज्याकडून दुस-या दरवाजाकडे जाताना दिसणारी मारुतीची मूर्ती
गडमाथ्यावरील एक जोते
गडावरील भग्नावशेष व तटबंदी
रसाळगडावरचं भक्कम अवस्थेतलं कोठार… फोटोच्या मधल्या भागात जमिनीत अर्धवट गाडलेली छोटी तोफ दिसतीये
किल्ल्याचा बुरुज
झोलाई मंदिराशेजारील पाण्याचे टाके
जीर्णोद्धाराचं काम चालू असलेलं झोलाई मंदिर व डावीकडे छोटे गणेश मंदिर
शेवटचा सलाम…. रसाळगड
रसाळवाडी जवळून दिसणारा रसाळगड…. एक अविस्मरणीय अनुभव…
रसाळगड उतरून निमणी - झापडी - तळे मार्गे आम्ही पुन्हा खेडच्या भरणे नाक्यावर आलो आणि चिपळूणकडे कूच केलं (जाता जाता विनय त्या पानवाल्यावर "बुरी नजर" टाकायला विसरला नाही !!!!). खेडहून लोटे परशुराम मार्गे चिपळूण सुमारे ३५ किलोमीटर्स वर आहे. आजचा मुक्काम चिपळूणच्या गोविंदगड उर्फ गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याला होता. गोविंदगडाच्या पायथ्याला करंजेश्वरी देवीचं प्रशस्त मंदिर आहे. तिथे राहायला मिळालं तर सगळाच प्रश्न सुटणार होता. पण मंदिर किल्ल्याच्या पायथ्याला असलं तरी चिपळूणसारख्या शहरात असल्याने मंदिराच्या विश्वस्तांना शोधून त्यांची परवानगी काढून मगच राहावं लागणार होतं.त्यामुळे हे कामही सोपं नव्हतं.फायनली आम्ही चिपळूण मध्ये पोचलो. गोवळकोट गावाचा रस्ता विचारायला मी रस्त्यावरून चालणा-या एका तरुणाच्या शेजारी नेउन गाडी थांबवली आणि इष्ट प्रश्नाचा नंबर फिरवला. त्याने आधी विनयच्या हातातल्या कॅरीमॅटकडे आणि नंतर आमच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना बांधलेल्या सॅक्सकडे नजर टाकली आणि थेट प्रश्न केला "ट्रेकर आहात का?". चिपळूणसारख्या…जिथे एक छोटा किल्ला आहे हे ट्रेकर्सना तर सोडाच पण ब-याच स्थानिकांनाही माहित नाही… अशा शहरात हा प्रश्न ऐकायला मिळालेला बघून माझ्या आशा कमालीच्या पल्लवित झाल्या !!! मी त्याला अस्मादिकांच्या आगमनाचं प्रयोजन सांगितल्यावर त्याने खिशातून मोबाईल काढला आणि बोलायला सुरुवात केली "हॅलो दिनेश…मी बोलतोय…पुण्याहून माझे दोन मित्र आलेत आपला किल्ला बघायला. त्यांची राहण्याची सोय कर. बाय !!!!!". आम्ही हिप्नॉटाइज झाल्यासारखं त्याचं फोनवरचं बोलणं ऐकत होतो. मला खरच विश्वास बसत नव्हता आणि आजही बसत नाहीये !!! कोण कुठले आम्ही… त्याला फक्त किल्ल्याचा रस्ता विचारतो काय आणि आमची थेट राहण्याची सोय होते काय !!! सगळंच अविश्वसनीय !!! राहुल नाव त्याचं. त्याने दिनेश म्हणून ज्याला फोन लावला होता तो साक्षात गोविंदगड पायथ्याच्या करंजेश्वरी देवीच्या पालखीचा भोई आणि मंदिराच्या कमिटीचा एक माननीय सभासद. आम्हाला मंदिरात ग्रीन कार्ड एन्ट्रीच मिळाली होती. त्याचे शतश: आभार आभार मानून (खरं तर ते पण कमीच होते !!! ) आम्ही चिपळूणच्या सुप्रसिद्ध अभिषेकमध्ये यथेच्छ मासे हादडले आणि गोवळकोट मध्ये पोचलो. दिनेश आमची वाटच पाहत होता. त्याने आम्हाला त्याच्या राहत्या घराच्या मागच्या बाजूला नेलं आणि स्वत:च्याच एका नव्याको-या आणि वेल फर्निश्ड बंगल्यात राहण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली आणि सकाळी उठल्यावर फोन करा आमचा माणूस चहा आणून देईल असं सांगून निघून गेला !!!! आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो दोन !!! खरंच स्वप्नवत होतं हे सगळं. सह्याद्रीच्या खडबडीत कातळांवर झोपेचं सुख घेणा-या आपल्यासारख्या दुर्गवेड्यांना राहण्यासाठी मिळालेला एक नवा कोरा बंगला म्हणजे ख-या अर्थाने स्वर्गच नाही का !!! काय हवं अजून. आमची दिनेशशी ना कुठली पूर्वीची ओळख ना कुठलं रक्ताचं नातं…पण त्याच्या या निखळ आणि निस्वार्थी आदरतिथ्याने आमच्या नव्या मैत्रीचे ऋणानुबंध मात्र कायमचे जोडले गेले होते !!!
जबरी रे दोस्तांनो - फारच मस्त
जबरी रे दोस्तांनो - फारच मस्त लिहिलंय, प्र चि देखील सुंदरच .....
कुठले गड/किल्ले शोधून काढाल आणि एवढ्या उत्साहाने तिथे जाल - धन्य, धन्य आहे तुम्हा मंडळींची .......
पुढच्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे .......
एकदम चटपटीत खुसखुशीत
एकदम चटपटीत खुसखुशीत लिहीलंयस.. मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लेख, पण परत परत तसेच पडझड
छान लेख, पण परत परत तसेच पडझड झालेले भग्नावशेष बघून वाईट वाटतं.. खरंच यांचे अभ्यासपूर्ण नूतनीकरण नाहीच का होऊ शकत ?
लै भारी!!! पुढच्या भागाच्या
लै भारी!!!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
<जबरी रे दोस्तांनो - फारच
<जबरी रे दोस्तांनो - फारच मस्त लिहिलंय, प्र चि देखील सुंदरच .....कुठले गड/किल्ले शोधून काढाल आणि एवढ्या उत्साहाने तिथे जाल - धन्य, धन्य आहे तुम्हा मंडळींची ....... >>+१००००००००
सुमारगडावर आता शिडी बसवणार
सुमारगडावर आता शिडी बसवणार आहेत असं कुठेतरी वाचलं..
एकदम मस्त वर्णन व फोटो! छान..!!
ओंकार भाऊ आमच्या अंगणात
ओंकार भाऊ आमच्या अंगणात बागडून गेलात.
मात्र माझ्या साठी अजूनही ते अंगणातले गड दूरच राहिले आहेत. पावसाळ्यात वाट वाकडी करावी म्हणतो.
खेडला पोहोचेपर्यंत एक धाबा सोडा साधी चहाची टपरीही उघडी दिसली नाही (ही त्यावेळची परिस्थिती आहे. सध्या नवीन हॉटेल्स झाल्याचं माहित असल्यास ही माहिती अपडेट करता येईल ). > धामणी कडून आल्यावर साखरोली फाट्यावर चहा टपरी आहे. मात्र पुढे खेड पर्यंत काहीच सोय नाही.
हेम...सुमारगडा संबंधित फेसबुक
हेम...सुमारगडा संबंधित फेसबुक वर आलेली बातमी खालीलप्रमाणे...
नमस्कार दुर्ग-मित्रांनो,
आपल्या सर्वांना सह्याद्रीमधील सुमारगड माहिती असेलच. ह्या गडावर जाण्यासाठी बिकट वात तर आहेच पण शेवटच्या टप्प्यात एक १००-१२५ फुटांचा रॉक प्याचही आहे. गेल्या २५ वर्षात येथे जाताना किंवा उतरताना १० जणांना मृत्यूने कवटाळले आहे. ह्या सर्वच विचार करून Ratnagiri Gadkot Vachwa Samiti,Khed व स्थानिक ग्रामस्थ मिळून येथे चकदेव किंवा रतनगडच्या प्रकारची कायमची शिडी उभारण्याचा प्रस्ताव आहे.
आधी सर्वांच्या सूचनांचा अभ्यास करून प्रस्ताव आखला जाणार आहे.
तरी, कृपया सर्वांनी आपली मते, सल्ले, फोटो आमच्याशी शेअर करा.
आमचा इमेल - ratnagirikot@gmail.com
भ्रमणध्वनी - प्रवीण कदम - 9323294530
@ सारिका,दिनेशदा,शापित गंधर्व,शशांकजी,विनायकजी...मनापासून धन्यवाद !!!
@ इंद्रा
जल्ला आधी माहित असतं तर "बिलो पॉवर्टी भांडवलावर" समाधान मानवं लागलं नसतं !!!! पुढच्या वेळी नक्की !!!
रच्याकने हे किल्ले पावसाळ्यात स्वर्गसुख आहेत !!! आत्ता गेलास तर एवढा मजा येणार नाही !!!
पुढचा भाग पोस्टतोय....
एकच नंबर...कसला भारी
एकच नंबर...कसला भारी अनुभव....
बास आता हा भाग करून टाकायचाच...मी असाही केव्हापासून एखाद्या बाईक भटकंतीच्या शोधात होतोच...
जितकी माहीती देता येईल तितकी दे...नकाशे वगैरे असतील तर ते पण दे...
या सप्टेंबर मध्ये नक्की
बाकी तुझ्या उपमा अलंकारांना तोड नाही...
तो पानवाल्याचा किस्सा तर जबरीच
आणि तो फोनचा पण...
तसाच अनुभव आम्हाला वेंगुर्ल्याला आला होता. पत्ता विचारायला थांबल्यावर तिथल्या एकदाने आमची डायरेक्ट मुक्कामाचीच सोय करून टाकली होती. अजून काही भागात इतका पाहूणचार असल्याचे पाहून खूप छान वाटते
आशू... आमच्या बाईक सफारीचा
आशू...
आमच्या बाईक सफारीचा संपूर्ण रूट खालीलप्रमाणे
पुणे - ताम्हिणी घाट - माणगाव - लोणेरे - आंबेत फाटा - मंडणगड (१) - अंदाजे १७० किलोमीटर्स
मंडणगड - खेड रोड - धामणी - पालगड घाट - पालगड किल्ला (२) - अंदाजे ३५ किलोमीटर्स
पालगड - खेड - तळे - झापाडी - निमणी - रसाळगड (३) - अंदाजे ५० किलोमीटर्स
रसाळगड - लोटे परशुराम - चिपळूण - गोवळकोट गाव (गोविंदगड) (४) - अंदाजे ४५ किलोमीटर्स
गोविंदगड - - चिपळूण - पोफळी - कुंभार्ली घाट - मोरगिरी फाटा - मोरगिरी गाव - गुणवंतगड (५) - अंदाजे ४५ किलोमीटर्स
गुणवंतगड - पाटण - चाफोली रोड - दातेगड घाट - दातेगड (६) - अंदाजे ३० किलोमीटर्स
आमचा रूट असा होता. दातेगड पासून एक रस्ता सात-याला जातो.चुकूनही तिथून जाऊ नकोस असा माझा स्पष्ट सल्ला आहे. संपूर्ण ५० किलोमीटर्स अंतर लाल मातीच्या रस्त्याने भरलेले असून गाडी चालवताना जीव जातो.
वर दिलेली सगळी अंतरं अंदाजे आहेत. ७-८ किलोमीटर्सचा फरक पडू शकतो.गुणवंत सोडला तर बाकी सगळ्या किल्ल्यांवर गाडी जाते.पाणी रसाळगड सोडला तर जास्त कुठे खास नाही.मुक्काम रसाळवरच करावा ही आग्रहाची विनंती.अविस्मरणीय अनुभव आहे.रसाळवाडीत जेवणाची सोय आहे.
अजून काही माहिती हवी असल्यास कळविणे
मस्त वर्णन आणि प्रचि
मस्त वर्णन आणि प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)