कसा बेभरवशी निघाला भरोसा (नविन )

Submitted by ganeshsonawane on 22 March, 2013 - 07:54

कसा बेभरवशी निघाला भरोसा

जगी माणसाचा न वुरला भरोसा
कसा काय देवू कुणाला भरोसा?

गळा ऐनवेळीच कापून गेला
कसा बेभरवशी निघाला भरोसा

पहाताच लाटा सरकले किनारे
किनाऱ्या वरूनी उडाला भरोसा

तुझ्या वाचुनी रात्र सुनसान जाते
जपूनी उराशी दिलेला भरोसा

मला पाहुनी वाट बदलून गेली
तिचा काय होता निराळा भरोसा?

दिले तोंड बांधून संतास फाशी
पुराव्याविना व्यर्थ ठरला भरोसा

विसंबुन विठूवर कसा काय राहू ?
तयाचाच नाही तयाला भरोसा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिलकधारीजी, कुलकर्णी सर दुरुस्ती करून गझल पुन्हा पोस्ट केली आहे. चुका निदर्शनास आणल्या बद्दल धन्यवाद!

तिलकधारीजी, कुलकर्णी सर दुरुस्ती करून गझल पुन्हा पोस्ट केली आहे. चुका निदर्शनास आणल्या बद्दल धन्यवाद!<<<

काय चुका दुरुस्त केल्यास रे गणेश सोनावणे? तुला चुका समजलेल्याच नाही आहेत.

गणेशजी आधी सुचवलेले बदल तांत्रिक होते ते आपल्याल समजले नसावेत

या शेरांमध्ये लगावली जवळजवळ सर्वच शेरात पाळली गेली आहे
(यतिस्थानाचा विचार माझ्याही गझलेत फारसा केला गेलेला नसतो म्हणून मी त्याबद्दल तुम्हालाही काही म्हणू शकत नाही )

काफिया माझ्यामते तुम्हाला आ या अलामतीचा हवा होता पण तिचे काफियातले स्थान तुम्ही निश्चित करू शकला नाही आहात
~अलामत शेवटच्या अक्षरावर हवी असेल तर एक पर्सनल फंडा सांगतो जो मी पाळतो की ज्या अक्षरावर ती येईल ते अक्षर- व्यंजन सर्व शेरात बदलत ठेवावे मी तरी अनेकदा आवर्जून असा प्रयत्न केलाय इथे उदा. द्ययचे झाल्यास: निघाला निराळा कशाचा असे काफिये करू शकता जे बरोबर असेल
~अलामत अधेमधे ती हवी असेल तर तिच्या मागोमागगची अक्षरे एकसमानच हवीत उदा: निघाला कुणाला म्हणाला उद्याला तयाला असे बरोबर असेल

रदीफ भरोसा अशी निवडलीत छान आहे ती महत्त्वाचे हे की च्यालेंजिंग आहे......पण ती निवडलीत तशी निभावावीही लागते जे या गझलेतील अनेक शेरात झालेच नाही
पहिल्या व शेवटच्या शेरात दुसर्‍या ओळीत तो जरासा निभावला गेलाय (माझे वैयक्तिक मत )
....म्हणजे भरोसा या शब्दास अर्थाच्या दृष्टीने पूर्णत्व आल्यासारखे तिथे वाटते आहे व भाषिक बाबींचा विचार करताही त्या जागी ती बरोबर आहे असे म्हणता येईल असे माझे मत इतरत्र तसे झाल्याचे नाही वाटत

खयाल हा मुद्दा खूपच व्यापक व सूक्ष्मही आहे
इथे थोडक्यात सांगायचेच झाले तर अनेक खयाल सुसुत्रता सखोलपणा परिपक्वता यात कमी पडतात
.... शिवाय वाचणार्‍यास भावतील निदान पटूतरी शकतील असेही नाहीयेत फारसे ....माझे वैयक्तिक मत आहे हेही !(..ते खयाल असे.. काफिया-रदीफ न हाताळता आल्याने झाल्याची शक्यता अधिक )
बाकी खयाल हा मुद्दा माझाही अजून नीटसा अभ्यासून झाला नसल्याने त्याबद्दल तूर्तास इतकेच म्हणत् आहे

मतला त्याचे वैशिष्ठ्य व त्याचे गझलेतील महत्त्व या बद्दल अधिक माहीती आपणच स्वाभ्यासाने मिळवावी

शेर व त्याची मांडणी सहसा शयार पहिल्या ओळीत प्रस्तावना व दुसरीत समारोप करतात त्यापेक्षा मह्त्त्वाचे की दोनही ओळी अर्थासाठी एकरूप-एकजीव -एकात्म करण्याचा प्रयत्न शायराने केला असतो
अजून एक सांगण्यासारखे म्हणजे पहिली ओळ झाली की ती दुसरीबद्दल उत्कंठा वाचकाच्या मनात निर्मान कशी करेल व पुढची ओळ ती उंत्कंठा अनपेक्षित पद्धतीने पूर्ण करून वाचकास अधिकाधिक आल्हाद कशी देईल याचेही शायराने पहायचे असते

अधिक महत्त्वाचे : मायबोलीवर एकदा पोस्ट केली तर हवातेव्हा त्यातच स्वतःस बदल करता येतो
त्यासाठी संपादनाची सोय आहे नवीन पोस्ट करायची तसदी घेवू नये

सर्वाधिक महत्त्वाचे : मला सर म्हणू नये माझी पात्रताच नाही मुळी

असो आज वेळ असल्याने अक्कल पाजळली आहे इतकेच माझ्या बद्दल गैरसमज करू घेवू नये

चूक भूल द्यावी घ्यावी

आपला नम्र
वैवकु:)